मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १२ एप्रिल २०२२ रोजी ‘माझ्या, तमाम हिंदू बांधवान्नो’ म्हणत, ठाणे शहरात झालेल्या उत्तरसभेत मुस्लिम मोहल्ल्याविषयी एक प्रक्षोभक विधान केलं. बेहरामपाडा व मुंब्र्यातील मुस्लिम मोहल्ल्यात शस्त्रे असतात, असं हे वाक्य होतं. शिवाय त्यांनी पुढं असंही म्हटलं की, मदरसे व मस्जिदीमध्ये कथितरित्या शस्त्रास्त्रे ठेवलेली असतात. अर्थात राज ठाकरे काही नवीन बोलत नाहीत; यापूर्वी आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व त्यांच्या समविचारी, संघटना, लेखक, भाष्यकार, संवादक व प्रवक्ते सातत्याने हेच सांगत होते व आहेत.आता मनसेने भगवा झेंडा स्वीकारून मुस्लिमविरोधी राजकारण सुरू केल्याने ह्या पक्षाकडून (मराठीजणांच्या) विकासाच्या राजकारणाची अपेक्षा करणे फोल ठरते. (केवळ) प्रखर मुस्लिमद्वेशाचं राजकारण केल्यानंतर सत्ता मिळू शकते, हे गणित संघ व भारतीय जनता पक्षाने गेल्या सात-आठ वर्षांत सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे मुस्लिमफोबिक हिंदुत्ववादी राजकीय रेट्यात अडगळित पडलेल्या पक्षाने ही भूमिका घेणे व त्याला वेगवेगळ्या तऱ्हेने प्रचारित करणं फारसं आश्चर्याचं नाही.
स्मरण असावं की, “मदरसा व मस्जिदीमध्ये शस्त्रे नसतात, शिवाय अशा ठिकाणी दहशतवादी तयार केले जात नाही, ही केवळ एक कल्पना आहे”, अशा प्रकारचा अहवाल कर्मठ हिंदुत्वाचे धुरीण नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जारी झालेला आहे. होय हे खरं आहे.
२०१४ साली देशात भाजप सत्तेवर आलं, त्यानंतर काहीच महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयाने हा खुलासा जारी केला होता. सदरील रिपोर्ट म्हणतो, “मदरसा किंवा मस्जिदमध्ये प्रचारित केलं जात तसं काही आम्हाला आढळलं नाही, शिवाय मदरश्यांमधून दहशतवादी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, हा केवळ भ्रम आहे.” हा अहवाल देशभरातील मदरशांच्या सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या गटाने वर्षभरात केलेल्या विवेकपूर्ण सर्वेक्षणावर आधारित होता, असं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने इकोनॉमिक टाइम्सला म्हटलं होतं.
अहवालात पुढे म्हटलं आहे की, “देशात प्रामुख्याने चार प्रकारचे मदरसे वेगवेगळ्या विचारसरणीचं अनुसरण करतात. परंतु भारतीय शिक्षक असलेले हे सर्व मदरसे कट्टरता किंवा प्रक्षोभक शिकवण्यांवर लक्ष केंद्रित करत नाहीत.” तत्कालीन केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी बहुधा या विषयावर लोकसभेत मांडणीदेखील केली होती.
त्यावेळी सदरील रिपोर्टची फारशी चर्चा झाली नाही. कारण संबंधित अहवाल भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आरएसएस व त्यांच्या कथनीय संदर्भ साधनांवर तहयात केलेले खोटे आरोप, मिथक व दिशाभूल करणाऱ्या भाषणांची पोलखोल करणारा होता. विशेष म्हणजे हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी सरकारने हा अहवाल जारी केला होता. परिणामी सोयीस्करित्या त्याकडे दुर्लक्ष झालं.
सातत्याने मुस्लिमद्वेशी अजेंडा राबविणाऱ्या ब्राह्मणी प्रसिद्धी माध्यमानेदेखील हा अहवाल प्रकाशात येऊ नये, याची पूरेपूर काळजी घेतली. एका मराठी दैनिकात आतल्या पानात कुठेतरी दोन कॉलमी बातमी होती. ती निदर्शनास किंवा लक्षात न आल्याने सामान्य लोक त्याविषयी अनभिज्ञ होते. शिवाय कोणी लोकशाहीवादी, प्रागतिक व संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटनांनी त्यावर चर्चा घड़वून आणली नाही. त्यामुळेदेखील ही पोलखोल नजरेआड राहिली.
मदरश्यासंदर्भात अजून एक महत्त्वाची निर्णय भाजप सरकारने घेतला होता. २०१४च्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने मदरशांच्या आधुनिकीकरणाचं आश्वासन दिलं होतं. किंबहुना त्यापूर्वी मनमोहन सिंहप्रणित यूपीए सरकारने राबविलेल्या मदरसा आधुनिकीकरणाचा विस्तार करण्यात येईल, अशी ही भूमिका होती. अर्थातच उपरोक्त मिथकांना बळ देण्यासाठी किंबहुना मदरश्यात घुसखोरी करण्यासाठी ही घोषणा होती. त्यासाठी ३७५ कोटींची तरतूद केली जाईल, असंही भाजपने म्हटलं होतं. वास्तविक, त्यासाठी केलेल्या संशोधन अहवालातून उपरोक्त बाबी उघड झाल्या होत्या. मग अपरिहार्यपणे ‘मदरसा कथितरीत्या दहशतवादा’ची केंद्र नाहीत, असा खुलासा करावा लागला.
मोदी सरकारने आपलं पहिलं बजेट सादर केलं, त्यावेळी मदरसा आधुनिकीकरणासाठी सुमारे १०० कोटी रुपये देऊ केले. होय, हेही खरं आहे. जो भाजप मदरश्यांबद्दल काही-बाही खोटं पसरवत असतो, त्याच भाजपच्या सरकारने हे केलं होतं. त्यावेळी सगळे भक्तसंप्रदाय, समर्थक, सोशल मीडिया सेलिब्रिटी, भाष्यकार, संवादक व पगारी प्रचारक गप्प होते. पुढे हा बजेट कमी-कमी होत गेला हा भाग अलाहिदा..
मुद्दा असा की, एकच खोटं वारंवार सांगितलं की ते खरं वाटते, हा हिटलरी सिद्धान्त भाजपने गेली अनेक दशकं तंतोतंत स्वीकारला आहे. त्यातूनचे ते केवळ मुस्लिमच नाही तर दलित, ख्रिश्चन, आदिवासी, कम्युनिस्ट व आता काँग्रेसी शिवाय सर्व विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अशा प्रकारची निव्वळ खोटी माहिती पसरवली जाते.
त्यासाठी कानगप्पांवर आधारित खोटी मिथकं तयार केली जातात. त्याच्या विस्तारासाठी दिशाभूल करणारी एकांगी माहिती, बुद्धिभेद करणारी कथने, विधाने, ऐकीव बोलवा वारंवार प्रकाशात आणतात. वैयक्तिक चर्चा, जाहिर सभा-संमलने, व्याख्याने, पत्रकार परिषदा, न्यूज चॅनेलच्या प्राइमटाइम चर्चेमधून ह्या दिशाभूल करणाऱ्या असत्य कानगोष्टी सांगत सुटतात. त्यामुळे सामान्य जणांना ही मिथकं खरी वाटू लागतात. अलीकडे ह्या असत्य बाबी पचनी पडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. पण प्रचारी यंत्रणेच्या मुबलकतेमुळे पुन्हा-पुन्हा ही असत्य व खोटी माहिती ‘विशिष्ट उद्दिष्ट’ साध्य करण्याचं प्रयोजन म्हणून प्रसारित केली जाते.
वाचा : काश्मिरच्या ‘अर्धवट’ फाइल्स
वाचा : ‘काश्मिर फाइल्स’च्या अनुपम अंकलना पत्र
वाचा : जहांगीर पुरी : गांधी-आंबेडकरांना स्वीकारल्याची शिक्षा!
मदरसा-मस्जिदी सर्वांसाठी खुल्या
ब्राह्मण्यवादी संघटना, भाजप व आरएसएसच्या सततच्या हल्ल्यामुळे भारतीय मुसलमान आता सुज्ञ झालेले आहेत. उशीरा का असेना त्यांनी संघीय मिथकांना एक-एक करून उघडे पाडण्याची भूमिका राबवली आहे. देशात विविध ठिकाणी मुस्लिम समुदाय आपल्या मदरसे, मस्जिदी सर्वधर्मीय समुदायासाठी खुली करीत आहेत. गेली चार-पाच वर्षे महाराष्ट्र व देशात वेगवेगळ्या शहरात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजिले जात आहेत.
मदरसा-मस्जिद परिचयाचा विशेष कार्यक्रम घडवून गैरमुस्लिम बांधवाना मस्जिदचे गर्भगृह व आतल्या परिसराचा फेरफटका घडवून आणला जातो. तिथं बसून मुस्लिम समाज, इस्लाम, प्रार्थनापद्धती, धर्मशास्त्रावर चर्चा केली जाते. प्रचारी गैरसमजांना समजून घेऊन त्याची वस्तुनिष्ठता समोर ठेवली जाते. वास्तविक मस्जिदमध्ये कुरआनच्या प्रती व काही हदीस संकलने सोडली तर बाकी काहीही नसते. सगळा गर्भगृह रिकामा व मोकळा असतो. अगदी इमाम जिथं नमाज अदा करतो, त्या मिंबरपर्यंतही कोणालाही सहज जाता येते.
मदरसा पाठशाळेतील शिक्षण प्रक्रियेचा परिचय घडविला जातो. अभ्यासक्रम, पुस्तके व इतर संसाधनांची ओळख, तलबा अर्थात विद्यार्थ्यांशी ओळख करून दिली जाते. ज्यांना आपल्या परिसरातील मदरसा-मस्जिद पहायची आहे, त्यांनी कुठलंही शंका-कुशंका न बाळगता स्थानिक लोकांशी संपर्क केल्यास ते मुक्तपणे विहार घडवून आणतात. जे काही आहे ते सर्व उदारपणे दाखवतात. त्यामुळे कानगप्पांमधून काही-बाही ऐकण्यापेक्षा सुज्ञ नागरिक मिथकांची स्वत: खातरजमा करू शकतात. औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे येथे असे उपक्रम करणाऱ्या मस्जिद कमिट्या, अनेक संस्था, संघटना आहेत. शिवाय ‘जमात ए इस्लामी’सारख्या संघटनेने देशात प्रत्येक भागात अशा प्रकारचा परिचय कार्यक्रम तयार केला आहे, त्यांच्याशी सहज संपर्क होऊ शकतो.
मदरसा व मस्जिदमध्ये काही-बाही (शस्त्रे) असते, ही आरएसएस व हिंदुवादी लोकांनी पसरवलेलं लोकप्रिय खोटं कथन आहे. अनेकदा संस्ता, संघटना व केद्रीय-राज्य पातळीवरील तपास यंत्रणांनी तिथं असं काही नसतं, हे सांगूनही हाच मुद्दा परत-परत चर्चेला आणला जातो. अर्थातच त्याचा उद्देश मुस्लिमांबद्दल जनमाणसात संशयाची वातावरण निर्मिती, विश्वासार्हता कमी करणे, शंका निर्माण करणे असा असतो.
बहुसंख्याक हिंदूच्या मनामध्ये मुस्लिमांविषयी भय निर्माण करणे, अस्तित्वाला आव्हान देणे; असाही हेतू असतो. त्यासाठी चिथावणीखोर भाषणे, पुस्तके, पत्रके वितरित केली जातात. प्रचारी मेसेज तयार करून ती फेसबुक, वाटस्अपमधून प्रसारित केली जातात. युट्यूब व प्रत्यक्ष कुजबुज मोहिमेतून मुस्लिमांना लक्ष्य केलं जाते. थोडक्यात मुस्लिमविरोधी मानसिकता घडविण्याचं हे षडयंत्र असते. वेळ आली तेव्हा अशा भित्र्या व भेदरलेल्या लोकांना शेजारी-पाजारी, मित्र, संपर्कातील लोकांविरोधात दंगलीसाठी उभं केलं जाऊ शकते. कारण अनभिज्ञता, भिती, शंका, गैरसमज, संशय आणि अनिश्चितता कुठलीही कृती करण्यास सहज उद्युक्त करते.
अर्थात सामान्य लोकांना आपल्या निकटवर्तीय व संपर्कातील मुसलमानांविरोधात हिंसेला प्रवृत्त करून त्यास उत्तेजन देण्यास मानसिक बळ प्राप्त करून देण्याचं हे कारस्थान असते. भडकवणारी ही डोकी अदृष्य स्वरूपात असतात. परंतु त्याचे वाहक कळत-नकळत सामान्यजण होतो. तो अनावधानाने दिशाभूल करणाऱ्या माहिती प्रसारित करण्याचे माध्यम होतो. त्यामुळे प्रतिक्रियात्मक दंगलीत सामान्यजणच होरपळले जातात. त्यावेळी ही अदृश्य डोकी नजर जाईल, तिथपर्यंत कुठेच नसतात. पण त्याच्या दृष्कृत्यांचा परिणाम मात्र समाजात दीर्घकाळ टिकून राहतो.
वेळोवेळी प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणे करून समाजात अस्थिरता निर्माण केली जाते. वेगवेगळे निमित्त करून मुस्लिमांना असंस्कृत, कट्टर, परंपराप्रिय, मागास, आधुनिकतेला विरोध दर्शवणारा, हिंसक, शत्रू ठरवलं जातं. अर्थात ह्या कृतीचा उद्देश सुशिक्षित तरुण-तरुणींनी प्रक्षोभक विधाने करावी, टोकाची भूमिका घ्यावी, असंस्कृत वर्तन करावे असा असतो. उच्चशिक्षित मुस्लिम तरुणाईंचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करून त्यांच्यावर सामाजिक दडपण वाढवले जाते. एक प्रकारे मानसशास्त्रीय युद्ध खेळले जाते.
त्यामुळे चिथावणीखोर भाषणे ऐकताना व त्याविषयी चर्चा करताना मेंदू व बुद्धी जागेवर ठेवावी लागते. मिथकांना बळी पडण्यापूर्वी विवेक जागृत ठेवून खोटं काय आणि खरे काय, याचा विचार भद्र जणांनी करावा. किंबहुना मन-मेंदू जागृत ठेवल्याने प्रसंगावधान राखून पुढचा अनर्थ टाळता येऊ शकतो.
औरंगाबाद विद्यापीठात प्रस्तुत लेखकाचं पत्रकारितेच्या पदवीचं शिक्षण झालं. त्यावेळी लेखक विद्यापीठाला चिकटून असलेल्या विद्युत कॉलनीतील ‘आलमगीर मस्जिद’मध्ये राहत असे. ही सर्व नॉनमुस्लिम लोकांची वस्ती आहे. ही मंडळी मगरिबच्या नमाजनंतर पाण्याचे ग्लास, मग घेऊन बाहेर उभी असते. इमामसाहेब बाहेर येऊन त्या पाण्यात दुआ करून फुंकर मारतात. ह्या लोकांची श्रद्धा व विश्वास आहे की हे फुंकर मारलेलं पाणी आजारी व्यक्तीला पाजल्यास आजार उपचाराला सहकार्य करतो. शिवाय या पाण्याने घर निर्जंतुकीकरण करणे, देव्हारा पवित्र ठेवणे, गर्भार महिलेला पाजणे, बाळंतीणला देणे, घरातल्या पाण्याच्या माठात मिसळणे, इत्यादी कार्य केली जातात.
तत्पूर्वी ह्या लोकांपैकी अनेकांना वाटे की, मस्जिदमध्ये बाहेरून लोक येतात, दोन-दोन दिवस राहतात. साहजिकच त्यांना भिती होती की, त्यांच्याविषयी काहीतरी कट शिजत असावा. पुढे मस्जिदींचे इमाम साहेबांचा गल्लीतील लोकाशी संपर्क वाढला तसा हा भ्रम त्यांनी कळविला. इमाम साहेबांनी सर्वांना मस्जिदमध्ये बोलावलं आणि फिरवून दाखवलं. शिवाय ज्यावेळी बाहेरून लोक (जमात) येतात, त्यावेळी काहींना त्यांच्या धार्मिक व इहवादी चर्चामध्ये आणून बसवलं. त्यानंतर त्यांचा सगळा भ्रम दूर झाला, असं त्यांनी प्रस्तुत लेखकाला सांगितलं.
त्या वस्तीत मस्जिदमध्ये राहणारे सात-आठ विद्यार्थी सोडले तर बाकी निवासी सर्व गैरमुस्लिम होते! मनुष्य हा समाजशील प्राणी असतो, या कथनाप्रमाणे प्रस्तुत लेखकाची तिथल्या लोकांशी मैत्री जमली. मैत्रीपूर्ण संवादातून त्यांच्या मनात काय होतं, हे त्यांनी लेखकाला सांगितलं. त्यामुळे मदरसा-मस्जिदींविषयी कोणताही भ्रम मजबूत करण्यापूर्वी प्रत्यक्ष जाऊन पाहणे कितीही चांगले!
वाचा : रोहित सरदाना : मुस्लिमांच्या उद्ध्वस्तीकरणाचा खलनायक
वाचा : ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला मुस्लिमद्वेषी विरोध
दुष्प्रचाराची भूमिका
प्रारंभी उल्लेखित राज ठाकरेंचं संबंधित भाषण ‘काश्मीर फाइल्स’नंतरच्या एका मोठ्या योजनेचा भाग असू शकतो. कारण हा सिनेमा बहुसंख्याक समुदायाला मुस्लिमविरोधी हिंसा करण्यास प्रवृत्त करतो. सिनेमा पाहून देशात अनेक ठिकाणी मुस्लिमफोबियातून ‘हेट क्राइम’चे प्रकार घडले आहेत. वेगवेगळे कारणं पुढे करून चार-पाच राज्यांमध्ये मुस्लिमविरोधी हिंसा व दंगलीच्या घटना घडल्या.
उत्तराखंड, उत्तरप्रदेश, दिल्ली शिवाय राजस्थानच्या करौलीमध्ये अनेक दिवस मुस्लिमविरोधात लक्ष्यकेंद्री हल्ले झाले, जाळपोळ, संपत्तीची नासधुसीच्या घटना घडल्या. हा सिनेमा भारतीय मुस्लिमांमुळे इथला ‘हिंदू खतरे में’ आला आहे, असा दुष्प्रचार राबवितो. ही अनामिक भिती यशस्वीपणे जनमाणसात रुजविण्यात भाजप व त्यांच्या समविखारी सहयोगी संघटना यशस्वी ठरल्या आहेत. प्रचारकांच्या भाषणानंतर हा दुष्प्रचार आणखी बळकट झालेला दिसतो.
वास्तविक, इथल्या सर्वसामान्य हिंदूना राजकीय हिंदुत्वाच्या धार्मिक झेंड्याखाली आणून ‘हिंदू खतरे में हैं’, अशी आरोळी ठोकली की, त्यांचं राजकीय संघटन करणे सोपं जातं. शिवाय त्यांच्यामध्ये मुसलमानांचे भय निर्माण करून त्यांना हिसेंला प्रवृत्त करता येऊ शकते. मुळात भारतात ‘हिंदू कधीच खतरे में’ नव्हता, असा अहवाल २१ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेला आहे. नागपूरचे माहिती हक्क कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी हा प्रश्न गृहमंत्रालयाला विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना “अशा प्रकाराचे काहीही पुरावे नाहीत”, असं अमित शहा यांच्या मंत्रालयाने म्हटलं होतं. पुढे मंत्रालयाने असंही स्पष्ट केलं की, अशा प्रकारच्या ‘काल्पनिक’ प्रश्नांचं उत्तर दिलं जाऊ शकत नाही.
परंतु देशात हिंदू संकटात आल्याची बतावणी करत सामाजिक अशांतता पसरवणे नित्याचेच झालं आहे. किंबहुना महाराष्ट्रात राजकीय सत्तांतराच्या लोभापायी छुप्या शक्ती दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याच्या हालचाली करत आहेत. सप्टेंबर २०१९ पासून ‘ऑपरेशन लोट्स’साठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला ‘इडी’चं भय दाखवून अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहेत. ‘काश्मीर फाइल्स’नंतर त्यात अजून एक अजेंडा समाविष्ट झालेला दिसतो. मार्चच्या शेवटी औरंगाबादमध्ये ३७ तर एप्रिलमध्ये पिंपरी-चिंचवडला ९७ तलवारींचा मोठा साठा तपास यंत्रणांच्या हाती लागला. यानंतर २९ एप्रिल रोजी नांदेड शहरात हरियाणा येथून आणलेल्या २५ तलवारी पोलिसांनी जब्त केल्या. पुढच्या आठ दिवसातच आणखी १० तलवारी पकडल्या. महिनाभरात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडणे हा केवळ योगायोग असू शकत नाही. हिंसेला उत्तेजन देण्यासाठी त्या खरेदी-विक्री केल्या असाव्यात असं राज्य गृहमंत्रालयाचं म्हणणं होतं. परिणामी रामनवमीला राज्याच्या शांततेला काळिमा फासणारी घटना मुंबई व अचलपूराला घडलीच!
हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत देशात अनेक भागात भगव्या टोळ्यांनी तलवारी, बंदूका व इतर शस्त्रे नाचवून शक्ती प्रदर्शन केलं. दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल व झारंखडमध्ये मुस्लिमविरोधी हल्ल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी मस्जिदमध्ये घुसून धुडगुस घालण्यात आला, उपद्रव माजविला गेला. कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये एका मस्जिदसमोर उभं राहून स्थानिक मुसलमानांनी शोभायात्रेतील हिंदू बांधवांना शरबत, पाण्याचं वाटप केलं. परंतु परतीच्या वेळी त्याच मस्जिदसमोर भगवे झेंडे हाती घेतलेल्यांनी प्रचंड नासधूस केली. मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये शोभायात्रेत दगडफेकीचा आरोप करीत तिथल्या सरकारने मुसलमानांची घरे बुलडोझर लावून नष्ट केली. कोपरपासून दोन्ही हात नसलेल्या वसीम शेखवर दगडफेकीचा आरोप ठेवून त्याचं दुकान-घर नष्ट करण्यात आलं.(पाहा बीबीसीची स्पेशल स्टोरी)
मुळात आरोप, दोष सिद्ध न होता, शिक्षेचं असं कृत्य करणे कायदाबाह्य होतं. ज्या १२ मुस्लिमांची घरे नष्ट केली त्यांच्याच अल्पवयीन मुलांना गुन्हेगार म्हणून अटक केली. या प्रकारावर देशभरातून टीकेची झोड उठली. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यावर अमानवीयतेचा ठपका ठेवला गेला. बहुसंख्य व धर्मांध झालेल्या मोदीभक्तांना खुश करण्यासाठी भाजप सरकारने ही कृती केली. परिणामी ‘जमियत ए उलेमा हिंद’ संघटनेने ह्या क्रूर अत्याचाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने ६० वर्षीय हसीना फखरू यांचे नष्ट केलेले घर पुन्हा उभे करून देण्याचं आश्वासन दिलं. पण बाकी घरांबद्दल मौन बाळगलं.
मुस्लिम हिंदूंच्या मिरवणुकीत दगडफेक करतात, हा फॉर्म्युला आता जुना झाला आहे. शिवाय मुस्लिमही अशी कृती करून आपल्या संकटाना कदापि वाढविणार नाहीत. अंतिमत: याचा फटका त्यांनाच बसतो, हे मुस्लिमांना ठाऊक आहे. त्यामुळे मुस्लिमांचं राजकीय व सामाजिक अलगीकरण करणाऱ्या भाजपशासित काळात ही चूक त्यांच्याकडून हेतूत:देखील घडू शकत नाही.
किंबहुना मिरवणुकीवर कथितरित्या दगडफेक करणे हे भाजपचेच षडयंत्र होतं, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी केला. २६ एप्रिल २०२२ रोजी मध्य प्रदेशमधील एका कार्यक्रमात खरगोन प्रकरणावर बोलताना त्यांनी ही पोलखोल केली. म्हणतात, “हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे करून दंगली घडवून आणणे हा भाजपचा उद्देश आहे. भाजप गरीब मुस्लिमांच्या मुलांना दगडफेक करायला लावते अशीही माहिती आमच्याकडे आहे, आम्ही त्याचा शोध घेत आहोत.” पुढे ते म्हणतात, “आरएसएस स्फोटकं पेरतो आणि स्फोटकं तयार करण्याचे प्रशिक्षण देतो असे पुरावे आहेत.”
या आरोपाला पुष्टी देणारी एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. अयोध्येत दंगल घडवण्याचा कट रचणाऱ्या बजरंग दलाच्या टोळीतील ७ गुंडांना अटक करण्यात आली. अतिशय सुनियोजित पद्धतीने या लोकांनी मस्जिदींसमोर आक्षेपार्ह वस्तू, धार्मिक ग्रंथ आणि प्रक्षोभक पोस्टर्स लावून शहराला आग लावायची होती, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं. जाळीदार टोप्या घातलेल्या उपद्रवी गुंडानी शहरातील मस्जिदींवर मांस आणि आक्षेपार्ह पोस्टर्स फेकले.
मीडियाला माहिती देताना अयोध्येचे एसएसपी शैलेश पांडे म्हणतात, “या घटनेत ११ जणांचा समावेश होता. मुख्य आरोपी महेश कुमार मिश्राने त्याचे साथीदार प्रत्युष श्रीवास्तव, नितीन कुमार, दीपक कुमार गौर उर्फ गुंजन, ब्रिजेश पांडे, शत्रुघ्न प्रजापती आणि विमल पांडे यांच्या मदतीने ही घटना घडवली. घटनेचा सूत्रधार महेश कुमार मिश्रा आहे, ज्याने दिल्लीतील जहांगीर पुरी येथे झालेल्या घटनेच्या विरोधात दंगल घडवण्याचा कट रचला होता.”
‘नवभरात टाइम्स’च्या वृत्तानुसार सदरील घटना २६ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. पोलीस तक्रारीत टाटशाह मस्जिद कमिटीच्या फिर्यादींनी सांगितलं की, “चार मोटारसायकलवरून आलेल्या ८ संशयित तरुणांनी मस्जिदीसमोरील पवित्र धार्मिक ग्रंथांची पाने आणि फ्लेक्सवर लिहिलेल्या आक्षेपार्ह पट्ट्या टाकून पळ काढला. रमजानच्या निमित्ताने शहरात जातीय दंगल घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे. प्रकरण अतिशय गंभीर असून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे शांतता राखू इच्छितो.” मौलानांनी मस्जिदीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज उपलब्ध करून दिले.
दैनिक भास्करच्या ३० एप्रिलच्या वृत्तानुसार पोलिसांच्या तपासात समोर आलं की, मास्टरमाइंड महेश कुमार मिश्रा याने त्याच्या साथीदारांसह ब्रिजेश पांडेच्या घरी हा कट रचला. महेशने लालबागच्या आशिर्वाद फ्लेक्समधून पत्रिके छापली. येथूनच आणखी काही फ्लेक्स खरेदी केले. चौकातील गुदडी रोडवर आरोपी प्रत्युष श्रीवास्तवने रफिक बुक स्टोअरमधून कुरआनची दोन प्रती विकत घेतल्या.
पम्मीने कॅप हाऊसमधून जाळीदार टोप्या विकत घेतल्या गेल्या. आकाशने लालबाग येथून मांस खरेदी केले. २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता सगळं साहित्य वर्मा धाब्यावर एकत्रित करण्यात आलं. त्यानंतर सर्वजण ब्रिजेशच्या घरी आले. इथं फ्लेक्सवर प्रक्षोभक टिपण्या लिहिण्यात आल्या.
यानंतर सर्व जण चार दुचाकीवरून देवकाली बायपासमार्गे बेनीगंज तिराहा येथे पोहोचले. पीआरव्ही (पोलीस रिस्पॉन्स व्हेईकल) वाहन असल्याने येथे घटना घडू शकली नाही. त्यानंतर काश्मिरी मोहल्ला मस्जिदीत जाऊन कुरआन शरीफ आणि मांस फेकण्यात आले. यानंतर त्यांनी राजकरण शाळेसमोरील टाटशाह मस्जिदीवर आक्षेपार्ह पत्रके व मांस फेकले. त्यानंतर तुरुंगाच्या मागे असलेल्या गुलाब शाह दर्ग्यात कुरआन शरीफ आणि मांस फेकले. ईदगाह सिव्हिल लाइन, घोसियाना रामनगर मस्जिद येथेही अशीच आक्षेपार्ह पत्रके टाकण्यात आली.
आयजी केपी सिंह यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं की, “पोलिसांच्या पथकाने कठोर परिश्रम घेतले आणि मांस विकणारी दुकाने, फ्लेक्सच्या साध्या पट्ट्या, धार्मिक ग्रंथ इत्यादी विकणाऱ्या दुकाने शोधण्यास सुरुवात केली. हे साहित्य जिथून खरेदी करण्यात आलं त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. दुकानात चौकशी केली असता, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये आरोपी मास्क आणि कॅप न घालता दिसले, त्यानंतर त्यांची ओळख पटल्यानंतर शोध सुरू करण्यात झाला आणि २८ एप्रिल रोजी ७ आरोपींना अटक करण्यात आली.
घटनेतील सर्व आरोपी अयोध्येतील आहेत. महेश मिश्राविरोधात एकूण चार एफआयआर आधीच दाखल आहेत. ‘दि क्वेंट’ने या घटनेला रिपोर्ट करीत म्हटलं आहे, “मे २०१६मध्ये, अयोध्येतील कारसेवक पुरम येथे बजरंग दलाच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात शस्त्रे आणि बंदुकांसह प्रशिक्षणाचा वीडियो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मुस्लिम धर्म आणि मुस्लिम लोकांना मारणे असे शब्द वापरले गेले होते. या व्हिडिओमध्ये महेश मिश्रा दिसत होता.”
पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींशी बोलल्यावर समोर आलं की, त्यांना रमजान ईदपूर्वी शहरातील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवण्याचा त्यांचा उद्देश होता. शांतता आणि सहजीवनाच्या संस्कृतीवर विखार ओतण्याचा हा कट होता. मात्र बजरंग दलाचे गुंड आपल्या राक्षसी कृत्यात अयशस्वी झाले. मस्जिद कमिटी, मुस्लिम नागरिकांचा समजूतदारपणा आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अयोध्या जातीय दंगलीत अडकण्यापासून वाचली.
वास्तविक, नंग्या तलवारी हाती घेत मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन त्यांच्याविरोधात ‘हिंदुस्तान में रहना हैं तो, जय श्री राम कहेना होगा’ सारखी घोषणाबाजी करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, घरात शांत बसलेल्या मुस्लिमांना डिवचणे, उन्मादी झुंडीला मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करण्यास प्रवृत्त करणे इत्यादी प्रकार सुरू होते. माजी पोलीस महासंचालक विभूतीनारायण रॉय यांनी ‘कॉम्बेटिंग कम्युनल कॉन्फ्लिक्ट्स’ पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, मुसलमानांपुढे अशी परिस्थिती निर्माण केली जाते की, त्यांनी पहिला दगड उगारावा. परंतु स्थानिक मुस्लिम समुदाय शांत राहिला.
‘आज तक’ने १७ एप्रिल २०२२ रोजी प्रसारित केलेल्या एका वृत्तानुसार (https://bit.ly/38X9YiJ) “दक्षिण दिल्लीतील जहांगिर पुरी भागात अशाच प्रकाराची मुस्लिमाविरोधात घोषणाबाजीचं सत्र सुरू होतं. गुंडांनी सी ब्लॉकमधील एका मस्जिदीत घुसून भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न केला. (अनेक ठिकाणी अशा प्रकारे भगवी झेंडे लावल्याचे घटनांचे फोटो, वीडियो व्हायरल झालेली आहेत.) स्थानिक नागरिक, मौलवींनी त्यास विरोध केला. परिणामी उन्मादी झुंडीने तलवारी दाखवत त्यांचा प्रतिकार केला. भगव्या टोळींनी ‘मुल्ले काटे जाएगे’ म्हणत महिला व लहान मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. अशावेळी मस्जिदीचे पावित्र्य राखण्यासाठी आणि आत्मरक्षणाच्या दृष्टीने जहांगिरपुरीतील मुस्लिम नागरिकांनी त्या उन्मादी व हिंसक झालेल्या झुंडीवर दगडांचा वर्षांव केला.”
२० एप्रिल २०२२ रोजी ‘दि वायर’ने प्रकाशित केलेल्या ३० मिनिटाच्या स्पेशल वीडियो फिचरमध्ये (https://bit.ly/3M9MPbk) एक स्थानिक गैरमुस्लिम महिला म्हणते, “इफ्तारची वेळ झालेली होती. अगदी मस्जिदीच्या समोर ही लोकं डीजे वाजवत होती. मुस्लिमांना उद्देशून शेरबाजी करीत होती. मुस्लिमांच्या विरोधात उलट-सुलट बोलत होती. त्यांना उत्तेजित करीत होती. मारू, कापून काढू म्हणत होती. त्या बजरंग दलाच्या लोकांच्या हाती चाकू, सुऱ्या, बंदूका होत्या. परंतु ही लोकं (मुस्लिम) निशस्त्र होती. त्यांच्यावर हल्ले झाले मग ते स्वत:चं रक्षण करतीलच की!”
परंतु ‘मोदीभक्त मीडिया’ने मात्र एकांगी बातमी प्रचारित करीत मुस्लिमविरोधी हिसेंची भलामण केली. न्यूज चॅनेलच्या पॅनल चर्चांमध्येदेखील हा मुद्दा वारंवार उपस्थित केला गेला. परंतु मस्जिदीत घुसून जाळपोळ केल्याचे, नासधूस केल्याचे, गर्भगृहाचे पावित्र्य भंग केल्याचे, पवित्र ग्रंथाची अवमानना केल्याची, शिवाय भगवे झेंडे लावल्याची दृश्यं मात्र मीडियातून अदृष्य होती. मोदीभक्त मीडिया असो वा समाज माध्यमं सगळीकडे एकतर्फी घटनांना प्रसिद्धी देऊन दंगलीचं समर्थन केलं गेलं. मुसलमानांच्या विरोधात राबवलेली हिंसा रास्त आहे, असा युक्तिवाद झाला. प्रत्येक ठिकाणी सांप्रदायिक झालेल्या पोलिसांनी खरे गुन्हेगार सोडून पीडित मुस्लिमांविरोधात गुन्हे दाखल केले, त्यांना अटक केले. यालाच चोर सोडून संन्याश्याला फाशी! असं का म्हणता येऊ नये?
इथेही पुन्हा भाजपचा तोच बुलडोजरचा ‘आदित्यनाथ फॉर्म्युला’ वापरला गेला. खरगोनसारखं इथंही दंगलपीडितांची घरे बुलडोजर लावून धाराशायी केली गेली. वास्तविक, सुप्रीम कोर्टाने २० एप्रिल रोजी भल्या सकाळीच दक्षिण दिल्ली महापालिकेला आदेश देऊन कथित अतिक्रमणविरोधी कारवाई रोखण्याचा आदेश जारी केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवमानना करीत दंगलग्रस्ताविरोधात कार्रवाई केली गेली. क्षणार्धात त्यांचे निवारे नष्ट केले गेले. जिथं भगवे झेंडे लावले, त्या मस्जिदचा समोरचा भागही पाडला गेला. परंतु शेजारी चिकटून असलेल्या आणि रस्त्यावर पसरणाऱ्या मंदिराला मात्र धक्काही लावला नाही. भाजपसत्ताक महापालिकेने केलेला हा उघड पक्षपात होता.
आक्रमक आणि धर्मांध कोण?
भाजपच्या सहयोगी संघटनांनी भारतीय मुसलमानांबद्दल अनेक दुष्प्रचार आणि मिथकं परसवली आहेत. त्यापैकी एक असा की, “मुसलमान मासांहार करतो, त्यामुळे तो अधिक हिंसक होतो.” अर्थात आज घडीला कर्मठ हिंदुवादी संघटना व भाजपच्या समर्थक गटांनी चालवलेल्या मुस्लिमविरोधी हिंसेला पाहून वाटतं की, हिंदूच अधिक आक्रमक व हिंसक आहे. नृशंस मॉब लिचिंग, जीवंत जाळणे, मुस्लिमविरोधी हिंसा व महिलांना उघडपणे बलात्काराच्या धमक्या देणे, अहिंसेचं तर लक्षण नाही!
थोडक्यात असं म्हणता येईल की, राज ठाकरेंची संबंधित भूमिका भारतातील सांप्रदायिक वातावरणाला खतपाणी घालणारी होती. तशीच ती हिंदूधर्मभिमानी चळवळींना पोषणमूल्ये देणारी होती. त्यांनी ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुढे करीत अजानचे भोगे बंद करण्याची घोषणा केली. मात्र ‘अजान’वगळता इतर मार्गाने होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबद्दल सोयीस्कर मौन बाळगले. मिरवणूका, गणेशोत्सव, दांडिया, दहीहंडी, डीजे, जगराता, वाऱ्या, भंडारे, पालख्या, रथयात्रा, शोभायात्रा, जयंत्या, लग्न-साखरपुडे, जागरण-गोंधळ, मंदिरातले सप्ताह आणि प्रवचने, किर्तने, पहाटे चाललेल्या आरत्या, राजकीय सभा, संमेलने, ट्रॅफिक, निवडणुकीचे प्रचार, नेत्यांचे वाढदिवस अशा विविध निमित्ताने सुरू असलेल्या गोंगाटावर ते काही बोलत नाही. फक्त अजानमुळेच सामान्याला त्रास होतो का? उपरोक्त घटक राज ठाकरेंच्या ‘हिंदूंच्या त्रासा’च्या व्याख्येत बसत नाही का?
त्यातून खड्यासारखं फक्त अजानला अलग करून ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करणे पक्षपातीपणाचं आहे. अर्थातच ध्वनी प्रदूषणाला मुसलमानच कारणीभूत व जबाबदार आहेत, असं चित्र रंगवलं गेलं. परिणामी एका वेळी होणाऱ्या दीड मिनिटांच्या अजानला हिंदूविरोधात घोषित करून त्याला हनुमान चालिसाने प्रत्युत्तर देण्याची घोषणा झाली. म्हणजे ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून त्याला संपुष्टात आणण्याऐवजी ते आणखी कसं वाढेल, याची ‘राजकीय काळजी’ घेतली गेली. म्हणजे स्पष्ट आहे की, राज ठाकरेंची अजानविरोधाची भूमिका ध्वनी प्रदूषण कमी करण्याची नाही तर मुस्लिमफोबिक वातावरण तयार करून आपलं राजकीय बळ वाढविण्याची आहे.
राज ठाकरेंनी राजकीय मरगळ दूर करण्यासाठी ‘मराठी’ मुद्दा सोडून राजकीय हिंदुत्वाची शाल पांघरली आहे, हे वेगळे सांगायला नको. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकातील मतांचं राजकारण डोळ्यांसमोर ठेवून राबविला गेलेला हा दुष्प्रचार आहे. राज्यातील सांस्कृतिक संघर्ष घडवून आणून सामाजिक शांतता बिघडवण्याचं हे कारस्थान असू शकते. त्याच धर्तीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यरत झालेले दिसून येतात. नेमकी वेळ साधत त्यांनी ‘अजान’ला केंद्रस्थानी ठेवून कार्यकर्त्यांना मराठी मुस्लिमविरोधात उभं राहण्याचा आदेश जारी केला.
मार्च-एप्रिल महिन्यात घडलेल्या देशातील काही दंगली पाहता राज ठाकरेंचं मुस्लिमविरोधी भाषण भविष्यात असामाजिक तत्त्वांच्या शस्त्रांना मूठ देणारे ठरू शकते. शिवाय त्यांचं उपरोक्त भाषण देशभरात दाखवलं गेलं. त्याचा अर्थ काय असावा, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या भाषणाचा सार मुस्लिमविरोधी हिंसेला उत्तेजन देणारा आहे, हे उघड आहे. त्यामुळे प्रसंगावधान राखून सामान्य जनतेची विवेकाची भूमिका घेणे शहाणपणाचे आहे.
मदरसा असो वा मस्जिद, शिवाय मुस्लिमांबद्दल गैरसमज, शंका, कुशंका, संदेहाला जागा निर्माण होण्यापूर्वी आसपासच्या मुसलमानांशी संवाद साधा. इतकंच नाही तर कॉलनी, मोहल्ला, गल्ली, ऑफीस, शाळा-कॉलेजमधील आपल्या मुस्लिम सहकाऱ्यांशी बोला. त्यानंतर कानाने ऐकलेलं सफेद झूठ, दिशाभूल करणारे, खोटं आणि द्वेश निर्माण करणारे आहे, याची खात्री पटेल. शिवाय राजकीय भाषणाच्या आहारी जाऊन तंटे-बखेडे उभे करून, स्वत:वर पोलीस खटले नोंदवून घेऊन होणारे कौटुंबिक व सामाजिक उद्धवस्तीकरण थांबवणे हे आपल्याच हाती आहे.
(सदरील लेख सर्वप्रथम संक्षिप्त स्वरूपात ‘कर्तव्य साधना’त आणि त्यानंतर ‘पुरोगामी जनगर्जना’ मासिकाच्या मे अंकात विस्ताराने प्रकाशित झालेला आहे.)
कलीम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com