![]() |
Photos / AP Photo/Manish Swarup |
घसा कोरडा होऊन दुखायला लागलाय. हळुवार कंप
येतोय. वर्तुळाकार चुरचूर करतोय. अंगात ताप आहे. दरदरून घाम फुटतोय. डोकं भयान
दुखतंय. छातीत कळा. सर्दीमुळे नाकं कोंदलंय. शिंका आणि कोरडा खोकला आहे. तसा हा
नित्याचा व सामान्य आजार. पण हा नेहमीपेक्षा जरा वेगळाच जाणवतोय. कोरोना झालाय का
म्हणून स्वत:च वारंवार तपासून बघतोय.
बीबीसीवर कोरोनाची लक्षणे वारंवार वाचतोय.
आपल्यात तसं काही दिससंय का? याचा तपास
घेतोय. काही सीमटम्स सारखीच वाटतात. निष्कर्षाअंती घाम फुटतोय. बैचेन होऊन उठून
उभा राहतो. आरशात बघतो. त्रासिक चेहरा घेऊन परत खुर्चीवर विसावतो. तीन-चार दिवस
झाले अवस्थेत बदल नाही. भूक उडालीय. जिभेला चव गेलीय. फुटकळ घरगुती उपाय करतोय. पण
फरक जाणवत नाही.
वारंवार गळ्याला हात लावून तापमान बघतोय. पण
तेही सामान्य. श्वास घेण्यास अडथडा, असह्य थंडी जाणवते का याचा अंदाज घेतो. पण तसे
काहीही नाहीये. त्यामुळे मनाला थोडासा दिलासा मिळतो. पण अंगातला ताप कमी होत नाही.
अंगाला–हाताच्या पंजाला घाम येतोच आहे. मधून-मधून खोकला सुरुच आहे.
नैराश्यात पुस्तके दिलासा देतात. ब्लास्फेमी
संपलंय. ‘स्पाय प्रिन्सेस’ नूर इनायत खानचं चरित्र वाचतोय. टिपू सुलतान,
नूरचा संघर्ष, पॅरीस, फजल मंझील, हिटलरचे हल्ले, देशांतर, ब्रिटेनला रवानगी,
चर्चील, गुप्तहेर, गेस्टापो, दूसरं महायुद्ध बरंच काही आहे तिच्या चरित्रात.
श्राबनी बासू या भारतीय पत्रकार बाईनं लिहिलंय.
#
तबलीगविरोधात विषारी प्रचार सुरूच आहे. फेक
बातम्यांचा सुळसुळाट वाढलाय. फेसबुकी दोस्त म्हणवणारी मंडळीदेखील वस्तुस्थितीकडे
कानाडोळा करत आहेत. चला एक बरं झालं, काहींचे सेक्युलर चेहरे उघडे पडले. तबलीग मुठभर
लोकांची संघटना. त्याचा देशातील बाकी मुसलमानांशी काय संबंध? त्यांना चुकीची वागणूक दिली जातेय. तथ्य व
सत्य नाकारलं जातं आहे. तबलिगींना मुस्लिम म्हणून सावत्र वागणूक दिली जात आहे. पीडितांच्या बाजुने बोलणं तेवढाच काय तो संबंध!
वास्तविक स्थितीवर कोणी बोलत नाही. कठिण
प्रसंगी सामान्य मुसलमान तबलिगींची बाजू लावून धरतोय. इतरासारखं तबलीगींवर बोलणं
म्हणजे सरकारच्या दृषकृत्याचं समर्थन करणं होय. भाजपच्या मुस्लिमद्वेशाला बळकटी
देण्यासारखं आहे. तबलीगींना नाकारलेल्या अधिकारावर बोललं जात नाही. फक्त मुस्लिमच वस्तुस्थितीवर
बोलतोय, असं दिसतंय. बाकी सगळे RSSचा प्रचार राबवत
आहेत. मीडियातून दाखवल्या जात असलेल्या लंपटगिरी, बनवेगिरी आणि असत्यावर कोणीही बोलत
नाही. शुक्र हैं फक्त मुस्लिमच बोलत आहेत? कारण हा मुस्लिमांचाच लढा आहे, त्यामुळे त्यांनाच भिडायचं आहे.
सजग मुस्लिम नागरिक, पत्रकार, अभ्यासक ‘हम तो पुछेगे’ म्हणत सरकारला प्रश्न विचारत आहेत. उलट सेक्युलर मंडळी फेक
न्यूज व प्रपोगंडावर लिहित-बोलत आहेत. पण कोणीही तटस्थ म्हणून मुसलमानांची स्थिती
समजून घेऊ इच्छित नाही. सर्वांना ट्रोल करण्यातच मजा. याद राखा, तुम्ही माणूस आहात
संघाचे प्रचारक नाहीत.
#
अस्वस्थता, बैचेनी सुरू असताना अक्षय इंडिकरचा
फोन आला. ११ एप्रिलचा हा दिवस. ख्यालीखुशाली, लॉकडाऊन, बरं-वाईट, कामाची प्रगती
आदींवर बोललो. रानडे कट्टा, व्यस्ततेची चर्चा केली. त्याला दुसऱ्या महायुद्धाच्या
चांगल्या डॉक्युमेंट्री सूचव म्हणालो. लागलीच प्रथमेशला मेसेज टाकलं, फर्स्ट व
सेकंड वर्ल्ड वॉरवरील चांगल्या डॉक्युमेंट्री सूचवण्याचा आग्रह केला.
रोजचा दिवस कुंठा, बैचेनी व नैराश्याच्या
गर्तेतला. गळ्याला हात लावून आजार कमी झालाय का तपासतोय. तबलीगचा फेक प्रपोगंडा जिव्हारी
लागलाय. डोकं बधिर तर मन अस्थिर झालंय. विखारी न्यूज फीड वाचून वेदना होत आहेत.
कधीही परत न येण्याऱ्या दरीत खोलवर लोटला जातोय असं वाटतंय. एका भयाण स्वप्नासारखं
सगळं काही. कास पचवू का आघात. का मलाच त्रास होतोय याचा!
दिवस उगवतो, तसा मावळतो ही. संसर्गाच्या
बातम्या भयाण रूप घेत आहेत. दिल्लीत गुरुद्वारात पाचशे, लोकं लपून नव्हती तर अडकून
होती. तिरुपती, वैष्णोदेवीतही लोक अडकलीत. नांदेड, निलंगा, उत्तरप्रदेश,
मध्यप्रदेश सगलीकडे फिजिकल डिस्टन्सिंगची वाट लावली जात आहे. पण ते मुस्लिम
नसल्यानं त्यात ‘वृत्त मूल्य’ नाही. छी न्यूजवाल्या सॉरी झी न्यूजच्या तिहाडी
अंकरला तबलगीचा खोटा प्रचार करण्यात धन्यता मिळतेय. जोडीला रूबिका, रोहित सरदाना,
राहुल कवंलही आलाय. ट्रोलिंगनं अमीश देवगणची वाट लागलीय.
#
वाशिंदहून योगेशचा वीडिओ कॉल आला. आज १४ एप्रिलचा दिवस. अवसान एकवटून बोललो. प्रथमेश व सुनीलला कॉन्फ्रन्सवर घेतो, म्हणत
त्यानं जोडलं. प्रथमेश डिस्कनेक्ट राहिला. सुनील मी योगेश तिघं बोललो. कोरोना,
सरकार, लॉकडाऊन बरंच काही बोलण्यात होतं.
सुनील फार्मसीवाला, त्याला सारखा घाम येतोय,
म्हटलं. तपासणी करून घेण्याचा त्यानं सल्ला दिला. हॉस्पिटल, कन्सल्टिंग सेंटर बंद
असल्यानं सिवीलशिवाय पर्याय नव्हता. त्यानं ताकिद केली. भाई टेस्टिंग को जाकर आओ.
वातावरण खराब है. तासाभरानंतर सुनीलनं प्रथमेशला जोडलं होतं. त्यावेळी बळच जेवत
होतो. ते सोडून कॉल घेतला. आता योगेश नव्हता. बऱ्याच दिवसांनी पीपीला बोलत होतो.
विषय आनंदच्या शरणागतीपासून सुरू होऊन, तबलीगचा फेक प्रपोगंडा, हिंदूराष्ट्र, आयटी
सेल, पुरोगामी-प्रतिगामी, इंडी जर्नलवर झालेला व्हर्च्युअल अटैक बरंच काही चर्चेत
होते. तासभर बोललो. जाता-जाता सुनीलनं तपासणीची गळ घातली.
#
(दूसऱ्या दिवशी) सकाळी सर्वात आधी एटीममधून
पैसे काढले. अडचण आली तर लागतील. सिविलला जाऊन औपचारिक उपचार केले. रक्त तपासणीला
दिले. गोळ्या-औषधे, WRS घेऊन घरी आलो. तसं बरं
वाटायला लागलं. गोळ्या-ओषधांनी फरक पडला. पण ताप काही कमी होत नाही. अधून-मधून
खोकला येतच आहे.
कुठे-कुठे गेलो. कोणाकोणाला भेटलो. काय काय
केलं. घरात कुठे-कुठे हात लावला. सगळं काही आठवू लागलो. संसर्गाचे टप्पे चेक केले.
पण कुठेच काही जाणवलं नाही. महिनाभरापासून घरीच आहे. कुठे जाण्याचा. संपर्काचा
प्रश्न नाही. पण मौत बिन बुलाए कहीं से भी आ सकती हैं. लॉकडाऊन व त्यात हॉस्पिटल
बंद असल्यानं आधीच काळजी घेत होतो. इतरवेळी फ्रिजच्या पाण्याशिवाय भागत नाही, पण अशात
हात लावला नाही. सारखं गरम पाणी पितोय. खाणंही मोजकं व लायकीतच. सगळी पथ्य पाळली तरी
आजार जडला.
दिवसभराचा कोर्स करून आज परत सिविलला. रक्ताचा
रिपोर्ट सामान्य. पण अंगातली कणकण कायम. घाम आहे. उन्हाळा सुरू आहे त्यामुळे येत
असावा, म्हणत दिलासा दिला. याआधी कधी उन्हाळ्यातही इतका घाम आलेला नव्हता.
उकाड्यात फॅन लागत नाही. मग इतका घाम का येतोय हे कळत नाही. घसा व छातीतलं दुखणं
सुरूच आहे. परत-परत नेटवर जाऊन कोरोनाच्या लक्षणे चाचपत आहे. कोविडच्या भितीनं घाम
येतोय का? असं स्वत:लाच म्हणतो होतो.
#
बेनाम सा यह दर्द ठहर क्यूँ नही जाताजो बीत गया व गुजर क्यूँ नही जाता
डिस्टन्सिंग आणखी वाढवावं लागेल. अम्मी
पन्नाशीनंतरच्या किरकोळ आजारात. बेगम अवघडलेली. त्यामुळे त्यांचीच जास्त काळजी.
अपना तो वैसे बी कुछ नही. सगळं काही सार्वजनिक. सबकुछ पब्लिक डोमेनमध्ये.
आंबेडकरांचा पाकिस्तान वाचायला घेतलाय. वीसएक
पाने झालीत. फुलेंच्या लेखावर प्रतिक्रिया आल्यात. पण वाचण्याचा मूड नाहीये. या
घालमेलीत चार-पाच दिवस उलटले. अंगातली कणकण काही जात नाहीये. स्वत:चे अलगीकरण केले. डिस्टन्स पाळून राहतोय. माझी
अवस्था पाहून बेगम अस्थिर झालीय. तिच्या पुढ्यात भविष्याची काळजी. चेहरा
चिंताग्रस्त दिसू लागला. डोळ्यानच तिचं सांत्वन करतोय. सबीनची लगट सुरूच आहे.
तिच्यावर डाफरलो. भेदरत झटकून विलग झाली. वाईट वाटलं. माझेच कान धरले.
#
न्यूज फीडचा सनसनाटीपणा वाचून बैचेन होतोय. मानसिक
अस्वस्थता, नैराश्य, अनिश्चितता, झोप उडाली आहे. रात्री-अपरात्री उठून बसतोय. छातीत
सारखंच दुखतंय. खोकला, डोकेदुखी आहेच. एका रात्री उठून बॅग भरून ठेवली. कपडे,
टॉवेल, ब्रश, पेस्ट, पांघरुण, पुस्तके, चार्जर, रुमाल, साबण सगळं काही बॅगेत कोंबलं.
नायडू किंवा ससूनला जायची गरज पडली तर बॅग तयार होती. तपासणीचा रिपोर्ट यायला वेळ
लागणार होता. त्यासाठी तयारी हवीय.
जुजबी ‘अलविदा’ लिहून ठेवला. पीसीत कुठे
काय आहे. ते कुणाच्या कामाचं, कुणाला द्यायचं. पेंडिग कामाची यादी. पुस्तकाचं काय
करायचं. कुणाकुणाला वाचायला दिलेली पुस्तकाची यादी. डेक्कन क्वेस्टच्या कामाचा
फॉलोअप, रिसर्च सेंटरच्या कामाचा फॉलोअप. एडिटेड फाईल. अर्धवट राहिलेली कामे. चालू
कामाची यादी. लॉकडाऊन उठल्यावर करायची कामे. संबंधित दोस्त-मित्र-संपर्कातल्यांना
(शेवटचा) प्रतिसाद लिहून ठेवला. बॅकेचे तपशिल. पासवर्ड. येणारा पैसा, उसने
घेतलेल्या पैशाची यादी एक-एक आठवून उर्वरित सोपस्कार पार पाडले.
#
पहाटे चार वाजलेत. डोळ्यांवर भगतसिंह धरला.
कुलदिप नैय्यरनं उत्तम चरित्र रेखाटलंय. संदर्भ ग्रंथाच्या नोटमध्ये आणखीन भर
टाकली. हायलाटर कुठेतरी पडलाय. पेन्सिलनंच खुणा केल्या. पाचला डोळा लागला.
१७ एप्रिलची सकाळ उजाडली. राहिलेली कामं आठवून
आटोपली. अमानत म्हणून राहिलेल्या वस्तू, गॅझेट, महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी
केली. नजरिया, डेक्कन क्वेस्टचा अडमीन यूजर-पासवर्ड, मेल, सोशल मीडिया अकाऊंटचे
पासवर्ड सर्वकाही यादी करून-लिहून मेलच्या ड्राफ्टमध्ये सेव्ह केला. आवराआवर करून
बेगमला उठवलं. माझी तयारी बघून तिच्या चेहरा मलूल झाला. म्हणालो, तयारी करना जरूरी
था. ऐसे ही नही जा सकता.
आजारातून उठलो तर चांगलं जगण्याचा प्रयत्न करेन
व लवकरच परत येईल म्हणालो. पण आतून ‘सगळी’ तयारी करूनच होतो. पैसे
व एटीएमचे ठिकाण सांगून ठेवलं. अम्मीला काहीच सांगू नको म्हणालो. अडमीट झालो तर मी
संगितल्याशिवाय कुणीही येऊ नका म्हणालो. सांगीन त्यावेळी पुस्तकं पाठव म्हणालो. सबीन,
बाजी-भाईजानला काही सांगू नको म्हटलं. बेगमनं उगाच म्हटलं, “अशावेळी पुस्तकं तरी सोडा.” म्हटलं, “वाचण्याची राहिलेली पुस्तकं
वाचून काढली हे समाधान तरी मिळू दे..” ती त्रासिक होऊन निघून गेली.
नऊ वाजता सहज म्हणून हेल्थ इन्फरमेशन हेल्पलाईन
सेंटरला १०४वर कॉऊन्सिलिंगसाठी फोन लावला. खोल आवाजात स्वत:हूनच व्यक्तिगत डिटेल, पत्ता, लोकेशन देऊन
आजाराबद्दल बोललो. पलीकडून अतिशय शांत व धीर देणारा आवाज होता. संबंधित व्यक्तीनं
सिनियर डॉक्टरांना जोडून देतो, म्हटलं. तीन-चार मिनिटांनी फोन जोडला गेला.
डॉक्टरांनी आपलं नाव सांगितलं. पण बैचेनीत मी विसरलो.
सगळे सिमटम्स रिपिट केले. डॉक्टर सुरुवातीलाच म्हणाले, घाबरू नका; मी सांगतो ती पथ्ये पाळा व औषधे घ्या. तीन-चार
मिनिटाचा संवाद. औषधांचा मेसेज आला. तो असा –
Name : self, 37 Years,
MALE, Caller Id:1352844,
Diagnosis : fever cough,
Drug: tab agumentin,
No Of Days : 5 days,
Usage: Daily 2 times,
Dosage: 625 mg,
Relationship with Food: After Lunch, After Dinner,
Side effects: Thank you
Drug: tab paracetamol, No Of Days: 2 days,
Usage: Daily 2 times, Dosage: 500mg,
Relationship with Food: After Lunch, After Dinner,
Side effects: Thank you
Drug: benadryl cough syrup,
No Of Days: 5 days,
Usage: Daily 2 times,
Dosage: 5ml,
Relationship with Food: After Lunch, After Dinner,
Side effects: Thank you
५ दिवसांचा कोर्स. १० वाजता बाजार उघडला. जाऊन लागलीच ओषधे आणली. खाऊन झोपी
गेलो. दोन-तीन तासानंतर जाग आली तसं बरं वाटायला लागलं. रात्रीचं औषध घेऊन लवकरच
झोपायचा प्रयत्न केला. त्या रात्री झोप चांगली लागली. बऱ्याच कालावधीनंतर झोपतोय
असं वाटलं. नींद क्या होती हैं त्या रात्री कळलं. अगली सुबह जरासा फ्रेश वाटलं.
#
ट्रीटमेंट सुरू करून तीन-चार दिवस झाली. हळूहळू
रिकव्हर होतोय, असं वाटतंय. रात्री राजरत्नचा फोन आला. भडभडून बोललो. तबलीगच्या
प्रपोगंडाची सगळी घुसमट उलटून टाकली. चार-पाच मिनिटात रिता झाल्यासारखं वाटलं. मधल्या
कालावधीत फोन कुणाशी बोलणं नाही, नुसतं पुस्तकात डोकं टाकून एकांत. रात्री झोप बरी
लागली. सकाळी उठून सबीनला जवळ घेऊन बराच वेळ तिच्याशी खेळत राहिलो. अवसान परत येत होतं.
घसा, खोकला, छाती, डोकेदुखी एकाएकी नाहीसी झाली. आठ दिवसात बऱ्यापैकी स्थिरस्थावर
होत गेलो.
#
आज २७ एप्रिल रमजानचा आदला दिवस. ताप नाहिसा तर
थोडासा खोकला जाणवतोय. हेल्पलाईनला परत फोन लावला. कॉलरनं काही साधी पथ्ये व
अडूळसा दिला. फॉलोअप देत-घेत राहा, असं म्हटलं. अडुळसा घरात होताच लागलीच घेतला. महात्मा
फुलेत रमलो. चिपळूणकर, रानडे बोलके सुधारक तर फुले कर्ते. उत्तरेत सर सय्यद,
मुमताज अली तर इकडे फुले. सामाजिक सुधारणासाठी रक्त आटवत होते. सलाम या बाप माणसांना.
संध्याकाळी रमज़ानचं चंद्रदर्शन झालं. सकाळी
उठून सहरी केली. फज़रनंतर झोपलो. दहाला उठून पीसी ऑन केला आणि लिहू लागलो.
अय बेनाम तेरा शुक्रिया..नही जानते आज क्या हो तूममेरे लिए वह डोर हो तूमजो तुफान के लहरो में मेरे हाथ लगी..
#
देशाचे अल्पसंख्याक मंत्री म्हणतात, तबलीगने
तालिबानी गुनाह किया हैं. आठवडाभरानंतर आपलंच विधान बदलत ते म्हणतात भारत
मुसलमानों के लिए जन्नत हैं. भारतातला हा अल्पसंख्याक मंत्री मुसलमानांवर हल्ले
होत असताना बिळात लपून बसतो. बाकीच्या वेळी तत्त्वज्ञानाचे डोस पाजत फिरतो. हा
व्यक्ती माणूस आहे की संघाचा प्रचारक हेच कळतच नाही.
धर्म, वर्ण व जातीय द्वेश, सांप्रयादायिक
हल्ले, ट्रोलिंग, तुच्छता, हिणकसपणा, तिरस्कार, हतबलता, अपमान, मानहाणी, अवमान, कुंठा, नैराश्य,
लाचारी, मजबुरीचा प्रवास करत महिना उलटला. तबलीगच्या निमित्ताने माझी सार्वभौमिकता,
लोकशाहीची श्रद्धा आणि घटनात्मक अधिकारांवर हल्ले झाले. माझ्या समुदायाचा मानव
म्हणून प्रवास रोखला. संघीय विखारी प्रचारात वाहवत जाणाऱ्यांनी माझ्या देशप्रेम,
राष्ट्रावादाची चाचपणी केली.
कोरोना संकट निस्तरायला सरकार कमी पडले. नियोजनशून्य
लॉकडाऊन लादले. थाळ्या वाजवल्या. मेणबत्त्या पेटवल्या, पण उपचार व उपाययोजनांची
शिस्त नाही. संरक्षण नाही. टेस्टिंग नाहीत. श्रीमंतांनी आणलेल्या आजाराचे बळी
गरीब. बिचारे रोजच मारले जात आहेत. मजुरांचे लोंढे अजूनही रस्त्यावरच. पण सरकारवर
बोलू नये म्हणून तबलीगकडे बोट उगारलं. सगळे साप समजून काठी बडवू लागले.
चारीकडून हल्ले द्वेश, नफरत का बाजार. मीडिया,
सत्ताधिश, फेसबुकी मित्र, सेक्युलर चेहरे मिरवणाऱ्या सगळ्यांनीच मुस्लिम
समुदायाविरोधात फेक न्यूजचा आधार घेऊन विष ओतलं. समाजात दूही निर्माण केली. तोडण्याची
भाषा केली. सामान्य हिंदूना मुस्लिमाविरोधात उभं केलं. हा हल्ला माझ्या हळव्या मनावर
कधी न भरून येणारा आघात करून गेला. एक ‘मुस्लिम’ म्हणून जखमी झालो. महिनाभर
आजारानं व्हिवळत पडलो.
रोजचा दिवस जीवघेण्या आजारात, मानसिक अस्वस्थेत
घातला. हर रोज तडप-तडप कर मरता रहा. जिने की उम्मीद लिए फिर उठ खडा हुआ.
माझ्यासारख्या रोजच लोकशाहीशी डिल करणाऱ्या, राजकीय समज-भान असणाऱ्या व्यक्तीची ही
गत असेल तर सामान्य मुसलमानांचं काय होत असेल. याचा विचार एक वाचक, एक माणूस, एक भारतीय
म्हणून कुणी करेल का?
कोरोना निघून जाईल; पण माझ्या देशबांधवाच्या मनात मुस्लिम समुदायाबद्दल
ओतलेलं विष कसं बाहेर निघेल. त्यांच्यातला संशय, अविश्वास, तुच्छता आणि द्वेश कसा
भरून निघेल. मनाच्या खोलवर लागलेली ही जखम भरून काढण्यासाठी औषध शोधलं जाईल का?
कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com