फ़िरोज़ अशरफ़ : सद्भावनेच्या परंपरेचे वाहक

भारत-पाकिस्तान हे दोन देश भौगोलिकदृष्ट्या वेगळे असले तरी दोघांतील समाजजीवन आजही एकसारखंच आहे. दोन्ही देशातील राहणीमान, लोकजीवन, साहित्य, संगीत, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक व्यवस्था इत्यादी घटकांत बरंच साम्य आढळतं. राजकीय संघर्ष आणि स्वार्थामुळे दोन देशातले लोक विभागले गेले. आजही दोन्ही देशांत जनमत घेतलं तर बऱ्याच जणांची मतं एकत्र होण्याची गरज मांडणारी असतील.
दोन्ही देशातील राजकारण्यांनी जर प्रामाणिक प्रयत्न केला तर जर्मनीसारखी मनभेदाची भिंत पडायला अवधी लागणार नाही. हा विचार काहींना अतिशयोक्तीचा वाटू शकतोपण हाच विचार घेऊन दोन्ही देशातील लोक गेल्या अनेक दशकांपासून कृतीशील आहेत. फ़िरोज़ अशरफ़ हे त्यापैकीच एक. ते गेली ५० वर्षं भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक दुवा म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी, ७ जूनला मुंबईतल्या जोगेश्वरीत एका अपघातात त्यांचं निधन झालं. ‘युद्ध नको शांतता हवी’ म्हणणारा एक सिद्धहस्त लेखक, विचारवंत, भाष्यकार फ़िरोज़ अशरफ़ यांच्या रूपानं देशानं गमावला आहे.
एक विचारवंत-लेखक अपघातात मृत्यू पावतो, ही केवळ त्याच्या कुटुंबाची व्यक्तिगत हानी नसते, तर ती समाजाची असते. फ़िरोज़ अशरफ़ यांच्या बाबतीत हे लागू होतं. ते भारतातील गंगा-जमुनी सद्भावनेच्या परंपरेचे वाहक होते. वारकरी संप्रदाय व सुफी संप्रदायाचे ते कर्ते सुधारक होते.
तहहयात त्यांनी भारतातील मिश्र संस्कृतीची मुळं (रुट्स) शोधण्याचं काम केलं. त्यांच्या घरात त्यांनी विविध विषयांवर केलेल्या कामांच्या बऱ्याच जुनाट फाईली रचून ठेवलेल्या आहेत. त्यांचं हे लेखन सामाजिक प्रबोधन व सुधारणेसाठी लागणाऱ्या विचारांचा अनमोल खजिना आहे.
त्या रात्री मित्रांची गप्पांची मैफल आटोपून ते घरी पोहचत होते. जोगेश्वरी स्टेशनला उतरत त्यांनी घरी फोन लावून सांगितलं की, १० मिनिटांत पोहोचतो. जवळच असलेल्या अब्बा अपार्टमेंटमधील घरी जाण्यासाठी ते रस्ता क्रास करत होते. त्याच वेळी एका ऑटोचालकानं त्यांना धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण त्यांनी जगाला अंतिम अलविदा केला.
मध्यरात्री त्यांच्या निधनाची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. दै. भास्कर, जनसत्ता, हिंदुस्थान, मुंबई मिररपासून ते बिझनेस स्टँडर्डपर्यंतच्या सर्वच अग्रणी वृत्तपत्रांनी फ़िरोज़ अशरफ़ यांना श्रद्धांजली अर्पित केली. दूसऱ्या दिवशी शनिवारी मालाड येथील कब्रस्तानात त्यांच्यावर दफनविधी पार पडला. या वेळी अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी उपस्थिती लावली होती.
पार्श्वभूमी
२३ जुलै १९४३ रोजी तत्कालीन बिहारच्या हजारीबागमध्ये फ़िरोज़ अशरफ़ यांचा जन्म झाला. फाळणीत त्यांचे अनेक नातेवाईक पाकिस्तानला निघून गेले, पण अशरफ़ यांचं कुटुंब मातीला चिकटून राहिलं. १९६५ला सेंट कोलंबस कॉलेजमधून बीएस्सी झाल्यानंतर पत्रकारितेच्या शिक्षणासाठी ते मुंबईला आले व मुंबईकर झाले.
भारतीय विद्या भवनमधून त्यांनी पत्रकारितेत डिप्लोमा पूर्ण केला. १९६५ पासूनच त्यांनी लहान-मोठी दैनिकं व मासिकांत लिखाण सुरू केलं. हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. ते सुधारणावादभारतीय राजकारण, सुफी-संत परंपराहिंदू-मुस्लीम सौहार्द आदी विषयांवर हिंदी आणि उर्दू भाषेत लेखन करू लागले. साप्ताहिक धर्मयुगया हिंदी वृत्तपत्रातून संपादक धर्मवीर भारती यांनी त्यांना पाकनामा’ लिहिण्यासाठी निमंत्रित केलं. भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक संबंध विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या सदरातून अशरफ़ यांनी हाती घेतला. अल्पावधीत हे सदर प्रचंड लोकप्रिय झालं.
१९८५पासून याच विषयावर टाइम्स ग्रुपच्या मुंबई नवभारत टाइम्सनं त्यांना ‘पाकिस्ताननामा’ लिहिण्यासाठी नियुक्त केलं. हे सदरही अपेक्षेप्रमाणे प्रचंड लोकप्रिय झालं. वाचकांची मागणी वाढली तसं हे सदर देशभरात प्रकाशित होऊ लागलं. सुमारे २५ वर्षं हे सदर नवभारत टाइम्सनं चालवलं. टाइम्स ग्रुपच्या इतिहासात २५ वर्षं अविरतपणे चालणारं हे एकमेव सदर ठरलं.
फ़िरोज़ अशरफ़ हे हरफनमौला (अष्टपैलू) वृत्तीचे होते. त्यांनी विविध पातळ्यांवर सामाजिक कार्याची धुरा सांभाळली. आपल्या लेखन कार्यासह त्यांनी १९६५ ते १९९७ पर्यंत इंडियन ऑईलमध्ये नोकरीदेखील केली. त्यांनी ट्रेड युनियनमध्ये महत्त्वाच्या पदावर सेवा बजावली. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या युवक क्रांती दलाचे ते उपाध्यक्षही होते. मुंबई विद्यापीठात त्यांनी उर्दूच्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे धडे दिले. तसंच अनेक सामाजिक संघटनांचे ते प्रवर्तकही होते. सेक्युलॅरिझम, राष्ट्रवाद, शिक्षण आदी विषयांवर त्यांनी संघटना बांधणीही केली.
अशरफ़ यांनी उर्दू भाषेत विपुल लेखन केलं आहे. अनेक टीव्ही मालिकांसाठीही लेखन केलं. त्यात दूरदर्शनवरील बाबाजी का बाईस्कोप’, ‘ग्लोबलायझेशन’, ‘दंगली’, ‘घर घर की बातइत्यादी मालिकांचा समावेश होतो. काही लघुपटांसाठीही त्यांनी संहिता लेखन केलं. तसंच लोकप्रिय सुरभीमालिकेसाठी त्यांनी १० वर्षं त्यांनी लेखन केलं. १९९६ साली दूरदर्शनवर गाजलेल्या ‘मई दिवसया कार्यक्रमाची पटकथा त्यांनी लिहिली होती. 
याशिवाय ते ऑल इंडिया रेडिओ, विविध भारतीमध्ये अनेक हिंदी, उर्दू टॉक शो आणि अन्य दिनविशेष कार्यक्रमांची रूपरेषाही तयार केली आहे. मराठीतली प्रतिष्ठित मासिके व नियतकालिकांतूनही ते लिहीत असत. मराठीतही त्यांनी लिहिलेली सदरं वाचकप्रिय ठरली. ‘सत्याग्रही विचारधारा’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’, ‘महाराष्ट्रआदी मासिकांतून त्यांनी भारतीय राजकारण, दहशतवाद, स्वातंत्र्य चळवळ, हिंदुत्ववाद, इस्लाम इत्यादी विविध विषयांवर दर्जेदार लेखन केलं. त्यांनी पाकिस्तानवरील लेखातून मराठी भाषकांना पाकिस्तानची नव्यानं सांस्कृतिक व साहित्यिक ओळख करून दिली.
सुफी परंपरा’ आणि ‘मुस्लीम समाज’ हे त्यांच्या आत्मीयतेचे विषय. त्यांच्या मते, सत्तालालसेपोटी भारतात आलेले परकीय मुसलमान हे ‘भारतीय’ कधीच नव्हते. पानवाला तांबोळी, दातवण विकणारा आत्तार, रजई विणणारा पिंजारी, बांगड्या विकणारा मनियार, हातरिक्षा चालवणारा, अंडी विकणारा, पंक्चर काढणारा, बिगारी मजुरी करणारा, शेती करणारा हा भारताचा खरा मुसलमान आहे. 
भांडी बनवणारा, नक्काशी काढणारा, हस्तकलेत पारंगत, रफू-शिलाई करणारा मुस्लीम भारतातील बहुसांस्कृतिक व वैविध्यपूर्ण समाजरचनेचा अविभाज्य भाग असल्याचं त्यांचं मत होतं. भारताच्या या ‘खऱ्या’ मुसलमानांची ओळख दर्शवणारा महत्त्वाकांक्षी ग्रंथ ते गेल्या काही वर्षांपासून लिहीत होते. हिंदी आणि उर्दू भाषेतील या ग्रंथात बिहार, उत्तर प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या चार राज्यातील सर्जन व कारागीर मुसलमान त्यांनी शब्दांकित केलेला आहे.
त्यांच्या मतेभारतातला मुसलमान हा प्रदेशनिहाय वेगळेपण जपणारा आहे. इथला मुसलमान वर्ग तुर्कस्तानच्या खिलाफतशिवाय अन्य देशांतील घटना-घडामोडींवर फारसा विचार करत नाही. महाराष्ट्रातील मुस्लीम गुजरातमधील मुस्लीम समुदायाच्या प्रश्नांशी अलिप्त असतो. तसंच बिहारच्या मुसलमानांना केरळच्या मुस्लिमांच्या प्रश्नांशी काही देणंघेणं नसतं. 
प्रत्येक जण वेगवेगळ्या समस्यांना घेऊन जगत आहे. प्रत्येक राज्यांत शिक्षणरोजगारसामाजिक सुरक्षा अशा प्रश्नांशी दोन हात करण्यात स्थानिक मुस्लिमांचा वेळ जातो. राज्या-राज्यात मुस्लिमांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, असं त्यांचं मत होतं. प्रा. इम्तियाज अहमद, डॉ. मोईन शाकीर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्यानंतरचे फ़िरोज़ अशरफ़ हे भारतीय मुसलमानांचं वस्तुनिष्ठ समाजशास्त्रीय आकलन करणारं महत्त्वाचे भाष्यकार होते.
१९९३च्या मुंबई दंगलीत त्यांना मालाडचं घर विकून जोगेश्वरीला स्थलांतरित व्हावं लागलं. १९९३ नंतर ते प्रथमच मुस्लीम वस्तीत आले. नाईलाजानं त्यांना मुस्लीम वस्तीत घर घ्यावं लागलं. हा धक्का त्यांच्यासाठी मोठा आघात होता. ते नेहमी म्हणायचे की, ‘मुंबईच्या दंगलीनं मला होळीच्या रंगापासून विभक्त केलं आहे.’ पण त्यावर अश्रू ढाळण्यापेक्षा त्यांनी मुस्लिमांच्या वाढणाऱ्या घेट्टो (सुरक्षित निवासी कंपू)वर संशोधन केलं. घेट्टो वाढण्याची सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कारणं शोधून काढली. मुस्लिमांच्या स्वतंत्र वस्त्यांवर त्यांनी केलेलं काम प्रशंसनीय आहे. या कामावर ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या (TISS) विद्यार्थ्यांनी पी.एचडी. व एमफीलचं संशोधन केलेलं आहे.
सुफी परंपरेवर त्यांनी केलेलं लेखन अतुलनीय आहे. अमीर खुसरो, निजामुद्दीन औलिया, ख्वाजा गरीब नवाज, बख्तियार काकी इत्यादी सुफी संतांचे बहूमुल्य विचार त्यांनी आपल्या लेखनीतून वाचकांपर्यंत पोहचवले. वास्तविक पाहता, भारतात गेल्या अनेक शतकांपासून सुफी परंपरेचा मोठा प्रभाव आहे. भारतातला इस्लाम हा सुफी इस्लाम आहे. 
देशभरात सुफी संतांच्या मजारीची संख्या मोठा आहे. तिथं उर्ससंदल आणि कव्वालीची मैफल सजत असते. देशभरातून सर्वधर्मीय भाविक तिथं जाऊन मजारीवर भक्तिभावानं दानधर्म करत रेशमी फुलांची चादर चढवतात. या मजारींवर येऊन मुसलमानांसह हिंदू बांधवही नवस बोलतात, कंदुरी करतात, अन्नदानासाठी रांगा लावतात. सुफी परंपरेनं हिंदूमुस्लीमशीखइसाई असा भेदभाव केला नाही. तोच विचार इथल्या मानवी समाजात आलेला आहे. सुवर्ण मंदिरात शिखांसह अनेक मुस्लीम व हिंदू बांधवही भक्तीभावानं भेटी देतात. दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन, मुंबईतील हाजी अली, नागपूरच्या ताजुद्दीन बाबा, परभणीच्या तुराबुल हक दर्गात भेट देणाऱ्यामध्ये मुस्लिमांची कमी पण गैरमुस्लिमांची मोठी संख्या आढळून येते. हाच माझा भारत देश आहे. भारताच्या संमिश्र व बहुरंगी संस्कृतीचा खरा वारसा हाच तर आहे.
फ़िरोज़ अशरफ़ यांनी सामाजिक सौहार्द व सदभावनेसाठी आपलं आयुष्य वेचलं. भारत पाकिस्तानमधील राजकीय संबध सुधारावेत यासाठी त्यांनी त्यांच्या पातळीवर अनेक प्रयत्न केले. भारत-पाक मैत्रीचे ते शांतीदूत होते. त्यांनी अनेक वेळा पाकिस्तानचा दौरा केला. तिथं जाऊन त्यांनी भारताच्या बहुसांस्कृतिकतेची महती गायली. पाकिस्तानी लोकांसमोर स्वत:ला हिंदुस्थानीम्हणताना त्यांना गर्व होत असे.  
गरीब व निराश्रीत बालकांसाठी ते ‘टिचर फ़ीरोज़ अंकल’ होते. त्यांच्या बिल्डिंगमधला गरीब चौकीदार आपल्या मुलीसाठी ट्यूशनचे पैसे भरू शकत नव्हता. ही अडचण त्यानं अशरफ़ यांना सांगितली. अशरफ़ यांनी चौकीदाराच्या मुलीला इंग्रजी शिकवण्याचं कबुल केलं. त्या मुलीसोबत इतरही मुली मोफत ट्यूशनसाठी येऊ लागल्या. अशा पद्धतीनं त्यांनी झोपडपट्टीतल्या गरीब मुलांना शिकवण्यासाठी ‘अंकल क्लासेस’ सुरू केलं. गरीब मुलांना पूर्णवेळ शिकवता यावं यासाठी त्यांनी १९९७मध्ये इंडियन ऑईलमधील नोकरीचा राजीनामा दिला. १९९७ पासून ते गेली ३० वर्षं अखंडपणे गरीब मुलांना विनामोबदला शिकवत होते.
सरकारी शाळेत गणित, विज्ञान आणि इंग्रजी शिकवण्याच्या उदासीन धोरणांचा ही गरीब मुलं बळी होती. फ़िरोज़ अशरफ़ यांनी या मुलांना अवघड विषयाची सोपी अध्ययन पद्धती शिकवली. त्यांच्या पत्नी मुंबई महापालिकेत नोकरीला होत्या. त्यांनीही निवृत्तीनंतर या गरीब मुलांना शिकवण्याच्या कामात हातभार लावला. लोकांमध्ये फिरून वर्गणी जमा करून ते या मुलांसाठी वह्या, पेन आणि पुस्तकांची व्यवस्था करत. अशा प्रकारे अशरफ़ यांनी अनेक शाळाबाह्य मुलांना शिक्षित केलेलं आहे. अशरफ़ यांनी आत्तापर्यंत तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांना ट्यूशन शिकवली आहे.
सुधींद्र कुलकर्णी संचलित ‘ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशनने (ORF) अशरफ़ यांच्या क्लासेसवर ‘अंकल - द स्कूल इन हिमसेल्फ’ नावाचा लघुपट आणि एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. त्यांच्या शिक्षण सुधार धोरणांवर विशेष परिसंवादाचं आयोजनही या संस्थेने केलेलं होतं. २००१ साली अशरफ़ यांच्या या शैक्षाणिक धोरणांच्या प्रचारासाठी युनिसेफनं त्यांना टोकियोमध्ये आमंत्रितही केलं होतं. याशिवाय सार्क देशाचा दौराही त्यांनी केला होता. वयाच्या सत्तरीही ते लेखन व समाजकार्यासाठी सक्रिय असत. भाषणासाठी मुंबईभर फिरत.
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा इथं ते गरीब व निराश्रित लोकांसाठी धर्मादाय दवाखानादेखील चालवत असत. त्यांच्या विविध कामांची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीसारखा सन्मानही त्यांना मिळाला. त्यांच्या कामाची दखल देश-विदेशात माध्यमांनी घेत त्यांच्यावर वेळोवेळी विशेष लेख प्रकाशित केले आहेत.
अलीकडे माझ्या संपादन कामामुळे फ़िरोज़ अशरफ़ यांच्याशी संपर्क वाढला होता. फोन लावला की, ते नेहमी म्हणायचे, “बेटा, फुरसत मिली ते आना मेरे घर. बैठकर गप-शप लडायेंगे.” शेवटची भेट १५ दिवसांपूर्वीच झाली होती. मागच्या दोन्ही वेळी ते मुंबई विद्यापीठात लेक्चरमध्ये व्यस्त असल्यानं आमची भेट झाली नाही. पण या मुंबई भेटीत मुद्दामहून जोगेश्वरीला गेलो होतो. त्यांनी व त्यांच्या पत्नीनं माझा चांगलाच पाहुणचार केला होता. आम्ही बराच वेळ समकालीन घडामोडींवर गप्पा मारल्या. निवडणुका, प्रचार, भाजप, इस्लाम, बिहारी-मराठी मुसलमान, सुफीझम इत्यादी विषयांवर भरभरून बोललो. एकत्र जेवलोदेखील.
जेवणानंतर मराठवाड्यातील कवी आणि शायरांचे बंधूंनी लिहिलेलं उर्दू पुस्तक त्यांना दिलं. पुस्तक पाहून खूप कौतुक केलं. संदर्भ ग्रंथ म्हणून मी विविध संस्थांना अभ्यासक्रमात लावायला सांगतो म्हणाले. त्यांनी लिहिलेली कागदं उत्साहानं काढून दाखवली. लिहीत असलेलं नवीन पुस्तक समोर ठेवलं. त्यांनी रचलेल्या कविता व शायरी वाचून दाखवल्या. आगामी अंकासाठी लोकसभेच्या निवडणुकांवर राजकीय विश्लेषण लिहून देतो म्हणाले. निघताना गेटपर्यंत सोडायला आले. पुन्हा लवकरच भेटू म्हणत मी त्यांचा निरोप घेतला.
त्या दिवशी सकाळीच फोनवरून मुंबईतल्या मोठ्या भय्यानं बातमी कळविली. ऐकताच जोराचा धक्का बसला. काहीच सुचत नव्हते. अशरफ़ अंकल लेख न देताच शेवटच्या प्रवासाला निघून गेले होते.

जाता जाता :
महात्मा गांधी तर आजही सुखरूप
'इतिहास डस्टरने पुसता येत नाही'

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: फ़िरोज़ अशरफ़ : सद्भावनेच्या परंपरेचे वाहक
फ़िरोज़ अशरफ़ : सद्भावनेच्या परंपरेचे वाहक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiySFexcB13H0S20I220G_TD49iB4UF15k6XUNcy-NRha8B0GPBeeEAWYM75YeKRIoYPTlavh1euJDQwTNjcHjQa2mSrc4mWONoVoCA5QZgYFs8nrTi1Y7lr-IN0gHQVFC1Nr8m3WYfR0OU/s640/ARTICLE_COVER_PIC_1560143175.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiySFexcB13H0S20I220G_TD49iB4UF15k6XUNcy-NRha8B0GPBeeEAWYM75YeKRIoYPTlavh1euJDQwTNjcHjQa2mSrc4mWONoVoCA5QZgYFs8nrTi1Y7lr-IN0gHQVFC1Nr8m3WYfR0OU/s72-c/ARTICLE_COVER_PIC_1560143175.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_25.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_25.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content