महात्मा गांधी तर आजही सुखरूप

गांधीहत्या ही सगळ्यात मोठी अफवा निघाली तर! ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या 'माथेफिरु'ने मोहनदास करमचंद गांधी नावाच्या ७८ वर्षांच्या एका वयोवृद्धाची हत्या केली. त्यामुळे नथुराम फासावर चढला. पण, प्रत्यक्षात तर हा सारा बनाव निघाला! नथुरामने हल्ला केला हे खरे, पण मोहनदास करमचंद गांधी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेच नाहीत. ते बचावले. तरीही बापड्या नथुरामला फासावर दिले गेले. आणि, इकडे गांधी मात्र आजतागायत जिवंत आहेत. यंदा हेच गांधी दीडशे वर्षांचे होत आहेत. त्यांच्या दीडशेव्या वाढदिवसाची धूम सर्वदूर सुरू असताना, न केलेल्या खुनासाठी नथुराम फासावर चढला, त्याचे काय करायचे? कोणत्या न्यायालयात त्यासाठी दाद मागायची?
नथुरामने केलेल्या हल्ल्यातून गांधी वाचले नसते, तर आज पुन्हा त्यांचा खून करण्याची वेळ का आली असती? वि. दा. सावरकरांनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या एका महिलेने ३० जानेवारीलाच गांधींचा खून करण्याचा पुन्हा प्रयत्न केला.
असा प्रयत्न पुन्हा पुन्हा करावा लागतो, तरी गांधी मरत नाही. हे काय प्रकरण आहे? गांधींना ना कोणती सुरक्षा व्यवस्था ना खास काही, तरी गांधींना मारता का येत नाही? अनवाणी पायांनी थेट गर्दीत घुसणारा हा लहान चणीचा, उघडा, वयोवृद्ध माणूस खून करण्यासाठी किती सोपा! कोणी यावे आणि त्याच्या विरोधात हवे ते बोलावे. वाटेल तसे वाह्यात जोक्स करावेत. नाटक- सिनेमांतून मस्त बदनाम करावे. एवढे सारे सोपे. तरी तो मरतही नाही आणि बदनामही होत नाही. आता तर 'गांधी- १५०' नावाने मस्त सेलेब्रेशनच सुरू झाले आहे. तिकडे नथुराम नाहक फासावर चढला आणि इकडे हा माणूस मात्र महात्मा म्हणून मिरवतोच आहे. पूर्वी 'गांधी जिथे असतील तिथे' अशा पत्त्यावर पत्रं जायची आणि गांधींना ती मिळायची. अवघा देश पिंजून काढणारा हा मांणूस आजही देशभर फिरतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत असतात. (क्वचित भारतातही असतात!) प्रत्येक ठिकाणी सोबत ते याच गांधींना घेऊन जातात. कधी गांधी बसलेल्या ट्रेनमध्ये ते बसतात. कधी गांधींच्या म्युझिअमला भेट देतात. कधी गांधींचं एखादं पेंटिंग त्यांना कोणी भेट देतं. गांधींच्या देशातनं आलोय, असं ते जगभर सांगत असतात आणि गांधीही मिस्कील हसत मोदींबरोबर जग फिरत असतात. ऐन तारुण्यात फासावर गेलेला नथुराम नाहक मारला जातो आणि इथे हा वयोवृद्ध माणूस तर आणखी वयोवृद्ध होत जगभर भटकताना दिसतो.
गांधींवर हत्या करण्याचे आजवर किती प्रयत्न झाले, त्याची मोजदादच नाही. इतिहास सांगतो की असे अकरा हल्ले झाले. आफ्रिकेतल्या २१ वर्षांच्या कालावधीत गांधीजींवर तीन जीवघेणे हल्ले झाले. भारतात आठ हल्ले झाले. भारतात झालेले सगळे हल्ले केले ते हिंदुत्ववाद्यांनीच. जे गांधी स्वतःला ‘सनातन हिंदू’ म्हणवून घेत, रघुपत राघव राजाराम, अशी भजनं आळवत, भगवद्गीतेला आईसमान मानत, त्यांचा हिंदुत्ववाद्यांना त्रास का बरं झाला असेल? गांधींवर झालेला पहिला हल्ला २५ जून १९३४ चा. पुण्यातच तो झाला. हरिजन यात्रेत भाग घेण्यासाठी गांधीजी आले होते. हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. काळे झेंडे दाखवले. गांधींच्या गाडीवर बॉंब फेकला गेला. अंदाज चुकला आणि गांधी वाचले. दुसरा हल्ला झाला तो पाचगणीत. भिलारे गुरुजींनी त्या हल्ल्यातून गांधींना वाचवलं. तिसरा हल्ला सेवाग्रामच्या दारासमोरच झाला. ९ सप्टेंबर १९४४ ची ही घटना. गांधीजींनी जीनांबरोबर बोलणी सुरू केली होती. त्यामुळे संतापलेल्या नथुराम आणि टीमने हा हल्ला केला. २९ जून १९४६ च्या रात्री गांधींना घेऊन जाणा-या गांधी स्पेशल गाडीला घातपात करण्याचा प्रयत्न झाला. २० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला हाऊसमधील प्रार्थना सभेच्या वेळी एकाने गावठी बॉम्बचा स्फोट केला. त्यानंतर ३० जानेवारी १९४८ चा हल्ला. या हल्ल्यात गांधीजींची हत्या झाली, असा समज होता. मात्र, ३० जानेवारी २०१९ च्या हल्ल्याने हे स्पष्ट झाले की, त्या हल्ल्यातूनही गांधी बचावले होते.
असाच एक हल्ला झाल्यावर गांधी म्हणाले होते, ‘मला मारुन कोणाला काय मिळणार आहे ते समजत नाही. पण, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी काही मरणार नाही. मी किमान १२५ वर्षे जगणार आहे.’ आणि, अखेर हे शब्द खरेच झाले तर. १५० वर्षे झाली तरी गांधी आहेतच. ते मरत नाहीत. पाकिस्तानला ५५ कोटी देण्याच्या निर्णयामुळे गांधींवर हल्ला झाला, असे म्हणणा-यांकडे १९३४ मध्ये असे कोणते कारण होते, ज्यामुळे गांधींवर हल्ला झाला! असे काय कारण होते की तथाकथित हिंदुत्ववाद्यांचाच गांधींना विरोध होता?
एक घटना बोलकी आहे. तुषार गांधींच्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकात ती आहे. खून करण्यापूर्वी नथुराम एकदा गांधींच्या आश्रमात आला होता. पुण्यातल्या उरळी कांचन आश्रमातली गोष्ट आहे ही. भेट म्हणून त्यानं गांधीजींसाठी एक टोपली आणली होती. त्यात फळं आहेत, असं तो म्हणाला. सुशीलानं ती टोपली घेतली. त्याला गांधीजींना भेटायचं होतं. पण, ‘बापू कामात असल्याने भेटू शकणार नाहीत’, असं सुशीलानं सांगितलं. तिनं त्याला नाव विचारलं. पण, त्यानं नाव सांगितलं नाही. तो अस्वस्थ वाटत होता. अखेर तो निघून गेला. नंतर टोपली उघडून पाहिली, तर त्यात जुने-पुराणे, फाटके जोडे, चपला असे काहीतरी निघाले. शिष्य संतापले. पण, गांधी हसले आणि म्हणाले, ‘हे विकून जे पैसे मिळतील, ते हरिजन फंडामध्ये जमा करा.’ तसे चार रुपये हरिजन फंडात जमा झाले. हे दुस-या दिवशी गांधीजींनी प्रार्थनेत सांगितल्यामुळे नथुरामला समजले. तो भडकलाच. चुकून का असेना, आपण हरिजन फंडाला मदत केली, या कल्पनेने तो संतापला. आश्रमात त्यानं गोंधळ घातला. ‘हरिजन निधीला ते पैसे दान करण्याची परवानगी मी दिली नव्हती’, असे म्हणत तो पैसे परत मागू लागला. सरदार पटेलही तेव्हा तिथे होते. प्रार्थनासभेतून नथुरामला जबरदस्तीने बाहेर काढावे लागले. त्याचा चेहरा मात्र सर्वांच्या लक्षात राहिला. ३१ जानेवारी १९४८ रोजी त्याचा फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला, तेव्हा सर्वांना ती घटना आठवली.
मोहनदास करमचंद गांधी नावाचा हा माणूस भारतात परतला ते १९१५ मध्ये. तेव्हा त्यांचे वय होते ४६. आफ्रिकेत २१ वर्षे गांधी होते. त्यानंतर ते भारतात आले. येताना आफ्रिकेतील वलय त्यांच्यासोबत होतेच. ती सक्सेस स्टोरीही होती. पण, त्यानंतर अवघ्या चारपाच वर्षांत गांधी देशाचे नेते होतील, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. तेव्हाचा देश, जिथे भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार हे सारे एकत्र होते. अशा देशाचा सर्वोच्च नेता होणं ही सोपी गोष्ट थोडीच आहे! अशा कालखंडात की जेव्हा दळणवळणाची साधनं नाहीत. संवादाची माध्यमं नाहीत. आजच्यासारखं ना इमेज मेकिंग आहे ना कोणतं व्यवस्थापन! अशा काळात गांधी देशाचे नेते झाले. फक्त नेते नाहीत झाले, त्यांनी अवघा देश स्वतःसोबत उभा केला. देशासोबत स्वतःला उभं केलं. लोकांच्या शहाणपणावर विश्वास ठेवत गांधी घडत गेले आणि गांधींसोबत देश घडत गेला. गांधी हा या देशाचा चेहरा झाला. गांधी या आयकॉनवर क्लिक केलं की भारताची लिंक ओपन व्हावी, अशी जादू झाली.
मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस इथपर्यंत पोहोचला, ते एवढ्या अल्पावधीत, असं समजण्याचं कारण नाही. गांधी हा मुक्काम नाही. गांधी हा प्रवास आहे. गांधी हे अव्याहत ‘Becoming’ आहे. स्वतःवर एवढे प्रयोग करणारा आणि सतत बदलत गेलेला गांधी समजण्यात आपली फसगत होते तीच मुळी आपण गांधींना ‘स्थितप्रज्ञ’ मानतो म्हणून. परिवर्तनवादी या शब्दाला जो अर्थ आला आहे, त्या व्याख्येनं आपल्याला गांधी परिवर्तनवादी वाटत नाहीत. विद्रोहीही वाटत नाहीत. गांधींचा मठ करुन टाकणारे गांधीवादी तर या पर्सेप्शनला सर्वात आधी जबाबदार आहेत. प्रत्यक्षात गांधी हे अत्यंत सळसळते, चैतन्यमय असे प्रकरण. बावीस वर्षांनी धाकटे असलेल्या बाबासाहेबांना भेटल्यानंतर, आंतरजातीय लग्नाशिवाय अन्य लग्नाला जाणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारे आणि अर्थातच ती पाळणारे गांधी.
गांधी हे ‘ओरिजिनल थिंकर’. एखाद्या लहानग्याच्या कुतुहलानं प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा. मग त्यावर आपली अशी मांडणी विकसित करायची. आणि, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सारं चिंतन कृतीशी जोडायचं. कृतीशी जोडायचं म्हणजे किती…! अगदी टोकच गाठायचं. एरव्ही ‘नेहमी खरे बोलावे’ या सुविचारात नवं ते काय? पण, गांधींच्या हातात असा सुविचार येतो आणि त्यांची अवघी आत्मकथा म्हणजे ‘सत्याचे प्रयोग’ होऊन जाते. या साध्या साध्या विचारांना महानपण आलं ते त्या विचारांच्या प्रत्यक्ष प्रयोगानं. मग सत्याग्रह हे शास्त्र होऊन गेले आणि तेच शस्त्रही झाले. ही सगळी शस्त्रं आणि शास्त्रं त्यांनी विकसित केली, त्यात कोणतंही ‘रॉकेट सायन्स’ नव्हतं. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या सामान्य माणसानं, त्याच्या साध्या आकलनातून विकसित केलेलं हे विज्ञान होतं. गांधी हा काही ‘थोर’ वगैरे माणूस नव्हता. तो कोणताही ईश्वरी अवतार वा प्रेषित नव्हता. त्याचं असामान्यत्व हेच की तो निखळ, निरागस, प्रामाणिक असा सामान्य माणूस होता. आपण सकाळी खातो काय इथपासून ते सकाळच्या शौचापर्यंत आणि आपल्या मनातील प्रेमापासून ते विखार- वासनेपर्यंत सगळ्याकडं तो नवजात कुतुहलानं पाहू शकत होता. प्रामाणिकपणे हे सारं नोंदवत होता आणि स्वतःचं शास्त्र, स्वतःची शस्त्रं घडवत होता. सर्वसामान्य माणसाकडं जे अंगभूत शहाणपण असतं आणि संस्कृती- परंपरेनं त्याला जे ज्ञान दिलेलं असतं, तेवढंच होतं मोहनदास करमचंद गांधी या माणसाकडं. पण, चारित्र्य आणि सत्याचा आग्रह, अपार करुणा आणि प्रेम यामुळं हा माणूस निर्भय झाला. मानवी मूल्यांवरील निष्ठेमुळे अखंड चालत राहिला. विचार आणि कृतीतील अद्वैतामुळे संग्रामाचा सेनानी झाला.
गांधी मजबूरी का नहीं, मजबूती का नाम है, एवढा तो बुलंद होत गेला. त्याला कोणापेक्षा मोठं व्हायचं नव्हतं. त्याला सतत मोठं व्हायचं होतं. उंच व्हायचं होतं. मातीत रुतलेले पाय आणि तरीही आकाशाकडे फैलावलेले हात, असा हा माणूस वाढत राहिला. या लहान चणीच्या माणसानं त्यातून असं विलक्षण तेज मिळवलं की नौआखालीत पेटलेल्या दंगलीत तो एकटा उतरला आणि अवतीभवतीच्या ज्वालांची पर्वा न करता निघाला. लॉर्ड माउंटबॅटननं तेव्हा गांधींना पत्र लिहिलं होतं. माउंटबॅटन म्हणतो, ‘प्रिय गांधी, पंजाबात आमच्याकडं ५५ हजार सैनिक आहेत. आणि, तरीही दंगल आटोक्यात येत नाहीए. बंगालमध्ये आमच्या सैन्यात एकच माणूस आहे. आणि, तिथं मात्र दंगल पूर्णपणे शमलेली आहे. या ‘वन मॅन बाउंड्री फोर्स’बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करु शकतो का?’
‘One Little Man of India’ अशी ज्याची ओळख परदेशात करुन दिली जात असे, त्या चिमुकल्या माणसानं जग घडवलं. गांधी नावाचा माणूस असा पुन्हा पुन्हा भेटत राहतो. नव्या नव्या प्रदेशात, नव्या नव्या रुपात त्याचं पुनरुत्थान होत असतं. कधी तो मार्टिन ल्युथर किंगच्या रुपात भेटतो आणि सांगतो, ‘आय हॅव अ ड्रिम’! कधी खान अब्दुल गफारखानच्या रुपानं ‘सरहद गांधी’ म्हणून भेटतो. कधी नेल्सन मंडेलांच्या वज्रमुठी उंचावत वर्णभेदाविरुध्द आरोळी ठोकतो. कधी गांधींचेच शब्द घेऊन उसने, आमचा ओबामा म्हणतो, Be the change, you believe in... Yes, we can!
गांधी इथं तिथं नसतोच मुळी. सरकारी भिंतीवर तो दिसला तरी त्याचा पत्ता आपल्या अंतःकरणात असतो. आणि म्हणूनच, कलेक्टर कचेरीत चिरिमिरी मागणा-या कारकुनाला सुनावणा-याला तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसातही गांधी असतोच! न घाबरता सत्तेला प्रश्न विचारणा-या प्रत्येकामध्ये तो असतो. कधी कधी आपण त्याला टाळतो, त्याची भेट नाकारतो, चुकीच्या वाटेने चालू लागतो, तेव्हा तो आपली वाट रोखून उभा राहतो आणि मिस्किल हसत विचारतो, ‘काय, इकडं कुठं?” ‘लगे रहो मुन्नाभाई’तल्या बापूसारखं तो हे विचारतो आणि आपण अंतर्बाहय चटपटतो.
गांधी आडवा येतो, आजही.
गांधींवर हल्ला करणं ते थांबवत नाहीत आणि गांधी काही मरत नाही!

संजय आवटे

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: महात्मा गांधी तर आजही सुखरूप
महात्मा गांधी तर आजही सुखरूप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj0ACzRG7DLd6myI2RPrN_udfymj4WxomJzGNn7-tx6q90TValNchS0inSGp7J6BMQ0rpHWsJ-gCi3od0ETXbHuZAXM1LL4FagoMdQ-TfYplKRjRA5CO5fUj0fXfSHB8AOiun7_h8ct2Odb/s640/Pooja-shakun-pandey-shooting-gandhis-poster.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj0ACzRG7DLd6myI2RPrN_udfymj4WxomJzGNn7-tx6q90TValNchS0inSGp7J6BMQ0rpHWsJ-gCi3od0ETXbHuZAXM1LL4FagoMdQ-TfYplKRjRA5CO5fUj0fXfSHB8AOiun7_h8ct2Odb/s72-c/Pooja-shakun-pandey-shooting-gandhis-poster.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/02/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/02/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content