राम गुहा यांचा मौलाना आज़ादाविषयी पूर्वग्रह

केकाळी पत्रकार राहिलेले राम गुहा विचारवंत मानले जातात. तशी लोकांची धारणा आहे. वास्तविक पाहता ते पेंग्विनच्या गांधी श्रृंखलेमुळे अचानक चर्चेत आले. असं असलं तरी हा माणूस नेमकी काय भूमिका घेतो व ती कधी बदलतो, हे कळायला मार्ग नसतो.

काश्मीर ३७० कलम हटवल्यानंतर त्यांनी काश्मिरी पंडितांबद्दल सहानुभूती दर्शवणारा एक वृत्तपत्रीय लेख लिहिला. त्यावेळी सगळेच सुधारणावादी व राष्ट्रवादी लेखक वेगळ्याच विषयावर लिहीत होते; पण हे महाशय तिसराच मुद्दा काढून त्यातही अर्थहीन चर्चा करत राहिले. सदरहू लेख वारंवार वाचला तरी नेमकं लेखकाला म्हणायचं काय, हे कळत नाही.

७ जून २०१९ रोजी राम गुहांनी इब्न खल्दून शब्दाला जोडून एक लेख ‘दि टेलिग्राफ’ला लिहिला होता. त्याचं शीर्षक होतं, “Why Sonia Gandhi Should Read Ibn Khaldun” त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सल्ला देत म्हटलं होतं की घराणेशाहीला प्रोत्साहित करताना काँग्रेसने खल्दूनकडून शिकायला हवं.

गुहांनी खल्दूनची घराणेशाही संदर्भातील काही वाक्य अधोरेखित केलेली आहेत. म्हणतात, “एखादा राजकीय वंश चौथ्या किंवा पाचव्या पिढीपर्यंत पोहोचला की, तो आपल्या ऱ्हासाची बीजे स्वतःच पेरू लागतो, असं इब्न खल्दूनचं मत होतं. अशा वेळी जनतेच्या नजरेत पूर्वजांकडून वारशाने मिळालेल्या वैभवाचे आकर्षण आणि महत्त्व कमी होऊ लागते. दुसऱ्या-तिसऱ्या हाताने मिळालेल्या कीर्तीबद्दलचा आदर ओसरतो आणि केवळ वंशपरंपरेच्या हक्कावर जगणाऱ्या विशेषहक्कप्राप्त वारसदारांविषयी लोकांच्या मनात तिरस्कार निर्माण होतो.”

घराणेशाहीचा संदर्भ सोडला खल्दूनचा काहीएक संबंध लेखात आढळत नाही. खरंतर तेवढ्यापुरताच तो संदर्भ त्यांनी हाताळला होता. पण घराणेशाहीवर बोलताना गुहांनी संघ-भाजपच्या आयटीसेलच्या विकृत वृत्तीप्रमाणे राहुल गांधींची संभावना केली. ते वाचून भाजप-संघवाल्यांना आनंदाच्या उकळ्या फुटणं स्वाभाविक आहे.




सोयीचे संदर्भ

वास्तविक, गुहांनी खल्दून खरंच वाचले का? या बाबतीत शंका येते. त्यांनी लेखात कबुल केलं होतं की, त्यांच्या एका लेखकमित्राने खल्दूनचा एक उतारा त्यांना पाठवला होता. तोच त्यांनी सदरील लेखात वापरला. म्हणजे त्यांनी खल्दून वाचला नाही. वाचला असता तर गुहांचं राजकारणशास्त्र व सामाजिक सामाजिक अर्थशास्त्रातील माहिती वाढून प्रत्यक्ष ज्ञानापर्यंत त्यांची पोहच वाढली असती.

इब्न खल्दून १४व्या शतकातील मध्यपूर्वेतील थोर तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म १३३२ मध्ये ट्युनिस इथं झाला होता. ‘मुक़द्दिमाह’ हे त्यांचा गाजलेला आद्यग्रंथ आहे. तो हिंदीसह इंग्रजी व जागातील इतर भाषामध्येही आलेला आहे. माझ्याकडे असलेली प्रत उत्तर प्रदेशच्या शासकीय माहिती विभागाने १९६१ साली प्रकाशित केलेली आहे.

खल्दून इतिहासकार होते. गुहा स्वत:ला इतिहासकार म्हणून घेतात, त्यामुळे त्यांनी या निमित्ताने इब्न खल्दून (१३३२-१४०६) वाचायला हरकत नाही. खल्दून हे राजकीय सिद्धान्तकारही होते. त्यांनी सरकारवर (राजा) अंकूश ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आयुधांचीही चर्चा केलेली आहे. राहुल गांधी भाजपच्या विद्यमान अनियंत्रित सत्ताकाळात ती भूमिका हाताळत आहेत.

विषय खल्दूनचा नाही. पण सोयीचा अर्थ तेवढा घ्यायचा व बाकी नाकारायचा, हे अव्यवहार्य आहे. गुहांनी हे लक्षात घ्यायला हवं की, सदरील टिपणात खल्दून आधुनिक लोकशाही नाही तर मध्ययुगीन राजेशाही संदर्भात मतं व्यक्त करतात. राजेशाहीतील पाच पिढ्यांच्या राजकारणाची चर्चा संबंधित टिपणात आहे. आज लोकशाहीत पाच पिढ्यापर्यंत राज्यकारभार शक्य आहे का?

राहुल गांधी राजकीय वारसदार असले तरी ते व लोकशाही प्रक्रियेतून ते निवडून आलेले आहेत. त्यांना कोणीही गादीवर बसवलेलं नाही. खल्दून वंशपरंपरागत राजकीय पिढीसंदर्भात भाष्य करत आहेत. किंबहुना राजेशाही व आधुनिक लोकशाही याची गल्लत गुहा करत असावेत. इथं खल्दूनच्या विचारांची चिकित्सा नाही, पण राम गुहा ज्या संदर्भात त्याचा आधार घेतात, त्याविषयी शंका आहे. खल्दूनचे संबंधित राजकीय विचार १४व्या शतकात ग्राह्य मानले गेले. त्यामुळे ते २१व्या शतकातील विद्यमान परिस्थितीला तंतोतंग लागू होतील, असं नाही. आज सर्वच वर्तमान संदर्भ बदलले आहेत.

गुहांनी दिलेला सल्ला काँग्रेस, राहुल गांधी व सोनिया गांधींच्या राजकीय स्थिती उंचावणाऱ्या नाहीत तर त्यांचा आशावाद मातिमोल करणारा आहे. भाजप-संघाच्या बलाढ्य सत्ता व सांस्कृतिक वर्चस्ववादासमोर राहुल एकटे उभे आहेत. संघाच्या डोळ्यात डोळे घालून त्यास आव्हान देत आहे. हेही नसे थोडके!

भाजप-संघाला खतपाणी घालणारे काँग्रेसचे पंतप्रधान, मुख्यमंत्री व इतर नेते आणि आता संघाच्या अस्तित्वाचं उद्ध्वस्तीकरण करू पाहणारे राहुल यात मोठा फरक आहे. त्यामुळे केवळ घराणेशाहीला घेऊन त्यांच्यावर टीका करणे असंयुक्तिक आहे. राजकीय पिढीचे वारसदार म्हणून आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या चुका त्या दुरुस्त करू पाहत आहेत. पण या निमित्ताने गुहांनी ‘मुक़द्दिमाह’ वाचावे. त्यातील ज्ञानमिमांसा वाचून गुहांना नक्कीच वर्तमान राजकीय विचारांचा अर्थबोध होईल.



अल्पज्ञान तरीही धाडस

३ जानेवारी २०२०ला गुहांनी ‘टेलिग्राफ’मध्ये हकीम अजमल खान यांचा संबंध जोडत लेख लिहिला. हा लेख वाचून बरं वाटलं. पण इतिहासाच गेलो, तेव्हा मला पुन्हा एकदा अल्पज्ञानी म्हणून गुहांचं दर्शन झालं. लेखात सीएए, एनआरसी प्रकरणी दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेल्या हल्ल्यावर भाष्य करण्यात आलेलं आहे.

नागरिकत्व कायद्याविषयी विद्यमान भाजप सरकारच्या अमानवी धोरणावर त्यात टीका केलेली आहे. राम गुहा हे स्वत: कर्नाटकमध्ये सीएए-एनआरसी संदर्भात सुरू असलेल्या सत्याग्रह मोहिमेत सामील झालेले आहेत. आंदोलनस्थळावरून त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं.

जामियातील ग्रंथालय पोलिसांनी उद्ध्वस्त केलं, या संदर्भात गुहांनी केलेली मांडणी चिंतनीय आहे. लिहितात, “सरकारने एका थोर विद्यापीठाच्या ग्रंथालयावर हल्ला केला यात काही नवल नाही; पण या हल्ल्यामुळे निर्माण झालेला आक्रोश किती झपाट्याने पसरला याचे नवल वाटते.”

गुहांनी विद्यापीठ निर्मिती प्रक्रियेत हकीम अजमल खान, महात्मा गाधी यांच्या भूमिकेचा उहापोह केला आहे. पण त्यांनी त्यातील अनेक नाव किंवा त्यांची विद्यापीठ स्थापनेमागील भूमिका डोळ्याआड केली. स्वाभाविक लेखाचा वेगळा विषय असल्याने त्यांच्या मर्यादाही असाव्यात. पण इतिहास माहिती करून घेतला तर त्यांचा वृत्तपत्रीय स्तंभलेख अजून समर्पक व टोकदार झाला असता.

सदरहू लेखात गुहांनी हकीम अजमल खान (जामियाचे संस्थापक) यांचं छोटसं का होईना व्यक्तिमत्व निदर्शनात आणून दिलं आहे. जामियाचे संस्थापक कुलगुरू म्हणून हकीम साहेबांचं स्मरण त्यांनी केलेलं आहे. लिहितात, “जामिया मिल्लिया इस्लामिया १९२० साली स्थापन झालं तेव्हा विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून हकिम अजमल खान यांची नेमणूक करण्यात आली. हे विद्यापीठ भक्कम पायावर उभं राहावं म्हणून त्यांनी देणग्या गोळा करण्याचा विडा उचलला. सुरुवातीच्या अडचणीच्या काळात त्यांनी विद्यापीठाचा सांभाळ केला, देखरेख केली.”

डिसेंबर, १९२७ मध्ये हकीम साहेबांचा मृत्यु झाला. त्यावेळी त्यांचं वय अवघं ५९ वर्ष होतं. महात्मा गांधींना त्यांच्या मृत्यूचा जबर धक्का बसला. कारण ते गांधीजींचे खासगी डॉक्टर होते. काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले हकीम साहेब पेशाने डॉक्टर होते. ते गरीब, निराश्रितांचे मोफत उपचार करत. हृकीम साहेब गेले तेव्हा गांधीजी मुंबईत होते. तिथं पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “सद्य परिस्थितीत आपलं हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. हाकिम साहेब हे भारताचे अत्यंत सच्चे सेवक तर होतेच पण हिंदू-मुस्लिम एकतेसाठी ती एक अतिशय मोलाची व्यक्तीदेखील होती.”

गुहा लिहितात, “हकीम अजमल खान यांच्या मृत्युनंतर ७२ वर्षांनी विद्यापीठाला नव्या संकटाला सामोरे जावं लागलं. नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यामुळे डिवचले गेलेले पोलीस विद्यापीठ परिसरात शिरले. तिथं त्यांनी बेफामपणे वसतीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थींना फरफटत बाहेर काढले. विद्यापीठाच्या ग्रंथालयाची तोडफोड केली. पोलिसांनी केलेल्या शारीरिक इजा आणि विद्यापीठाच्या नुकसानीचे व्हिडिओ देशभर आणि बाकी जगभरही व्हायरल झाले. त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या शासकीय क्रूरतेविरोधी जाहीरपणे दिलेल्या साक्षीदेखील व्हायरल झाल्या.”


राष्ट्रीयतेची बीजे

ब्रिटिशकाळात जामिया राष्ट्रीय चळवळीचं प्रतीक होतं. आता मोदींच्या सत्तेत राज्यघटनेवर आलेल्या संकटकाळी पुन्हा एकदा याच विद्यापीठाचे विद्यार्थी सज्ज झाले आहेत. स्वाभाविक बहुतांश विद्यार्थी मुस्लिम असल्याने भाजप-संघ सरकारने दडपशाहीची भूमिका घेतली. इथंपर्यंत टीक होतं. पण ज्ञानसाधने उद्ध्वस्त करणं विकृतीचं लक्षण आहे. पोलिसांनी मनमर्जीने ग्रंथाची नासधूस केली नसेल. किंबहुना आदेशाशिवाय ते असं पाऊल उचलूच शकत नाहीत. फॅसिस्ट प्रवृत्तीला वाटतं की समाजाने शिक्षित होऊ नये. समाज शिक्षित झाला की तो स्वत: विचार करेल. हेच संघाला नको असतं. त्याच प्रक्रियेतून ग्रंथागारावर हल्ला झाला, हे नवीन सांगण्याची गरज नाही.

गुहांनी विद्यापीठाचं ऐतिहासिक वैभव व राष्ट्रवादी विचारांचा केलेला उहापोह विचारप्रवर्तक आहे. पण जामिया एकाएकी उभं झालं नव्हतं. त्यामागे प्रचंड मोठी विद्रोहाची परंपरा आहे.

खरं तर ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीविरोधात राष्ट्रीय विचारातून जामियाची स्थापना झालेली होती. आता तिथूनच पुन्हा एकदा राष्ट्रीय विचारांचे वारे वाहत आहेत. अलीगड विद्यापीठातील शासनपुरस्कृत धोरणाच्या विरोधात उभ्या झालेल्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांनी जामियाची स्थापना केली होती. अलीगड कॉलेजचे तीन प्राचार्य ब्रिटिशविरोधी विचारप्रणाली व चळवलीला थोपवू पाहात होते. त्यांनी राष्ट्रीय विचार विद्यापीठात पसरू नये, याची काळजी घेतली होती. ते तीन प्राचार्य म्हणजे प्रा. थिओडोर बेक, प्रा. मॉरिसन आणि प्रा. आर्चीबाल्ड.

असहकार चळवळीत विद्रोहाची मोठी ठिणगी विद्यापीठातून बाहेर पडली. पण त्याचा विचार १९१२ साली मौलाना आज़ाद यांनी लिहिलेल्या लेखातून पुढे आला होता. मोठ्या चळवळीतून हे विद्यापीठ निर्माण झालं होतं. पुढे त्यात डॉ. हकीम अजमल खान, डॉ. एम. ए. अन्सारी, ज़ाकीर हुसैन, मुहंमद अली जौहर आणि महात्मा गांधी यांच्याशिवाय असंख्य विद्यार्थी होते. विद्यापीठ कॅम्पसमध्ये आणखी एका नव्या विद्यापीठाची स्थापना झाली होता. यापेक्षा मोठा विद्रोह अजून कोणता असू शकतो?

मुस्लिमांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक उत्थानासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी चर्चा १९१२ पासून अनेक प्रभुतींनी सुरू केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज़ाद यांनी १९१२च्या ऑगस्ट-सप्टेबर महिन्यात ‘अल हिलाल’मध्ये दोन प्रदीर्घ लेख लिहिले होते. त्याच वेळी अलीगडच्या ‘अँग्लो इंडियन मोहमेडन कॉलेज’ला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा द्यावा, ही मागणीही पुढे आली.



आज़ादांची थोरवी

मौलाना आज़ाद यांच्याविषयी राम गुहा यांची मते पूर्वग्रहदूषित आहेत. आज़ादांवर चर्चा टाळणं ठीक होतं. पण मी का टाळली याचं त्यांनी दिलेलं कारण अव्यवहार्य आहे. त्यांनी ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकात मौलाना आज़ाद विषयी कलुषित मतं नोंदवली आहेत.

डिसेंबर, २०११ला ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये लिहिलेल्या लेखात गुहा म्हणतात, “मौलाना आज़ाद हे थोर विद्वान, विचारवंत आणि राष्ट्रवादी असले तरी त्यांच्या लेखनात त्यावेळच्या समस्यांचं प्रतिबिंब दिसत नाही.” वास्तविक, त्यांचं हे विधान अर्धवट माहिती, अल्पज्ञान व एकांगी मतावर आधारलेलं आहे. कारण मौलाना आजाद यांनी १९१२ पासून राजकीय व सामाजिक तसंच धर्मचिंतन करणाऱ्या अनेक लेखमाला लिहिल्या आहेत.

लेखाचा मराठी अनुवाद लोकसत्तेत प्रकाशित झाला. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं. मुस्लिम विषयातील विद्वान अब्दुल कादर मुकादम यांनी लोकसत्तेतून त्याचा प्रतिवाद केला. त्यांनी लिहिलं, “गुहा यांचे उपरोक्त विधान वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे. शिवाय त्यांनी प्रखर राष्ट्रभक्त असलेल्या एका राष्ट्रीय नेत्यावर अन्याय केला आहे.”

मुकादम पुढे लिहितात, “मौलवी आझाद यांचा जन्म एका कर्मठ आणि धार्मिक परंपरा कटाक्षाने पाळणाऱ्या घराण्यात झाला. परंपरांचा वारसा विनातक्रार स्वीकारण्याचे बंधन असतानाही त्यांच्यातील बंडखोर वृत्तीमुळेच त्यांच्यात अमुलाग्र वैचारिक परिवर्तन झाले. शिवाय त्यांच्या या परिवर्तनाला मूलगामी चिंतनाची जोड होती. त्यामुळे हे परिवर्तन चिरस्थायी स्वरूपाचे झाले. समाजासमोरील समस्यांची यथार्थ जाण असल्याशिवाय अशा तर्‍हेचे चिरस्थायी परिवर्तन होऊ शकत नाही. परंपरेचा बंधनातून स्वतःच्या बुद्धीला मुक्त करून त्यांनी स्वतःचा वेगळा आणि स्वतंत्र मार्ग स्वीकारला. या मुक्ततेचे प्रतीक म्हणून ‘आज़ाद’ हे टोपण नाव त्यांनी धारण केले.”

मौलाना आज़ाद अद्भूत प्रतिभा असणारे व्यक्तिमत्व होतं. वयाच्या ११व्या वर्षी त्यांनी एका नियतकालिकाचं संपादकपद भूषवलं होतं. १९१२ साली त्यांनी ‘अल् हिलाल’ हे साप्ताहिक पत्र सुरू केलं. त्याचा पहिला अंक १३ जुलै १९१२ ला प्रकाशित झाला. सुरुवातीच्या कळातच आज़ादांनी मुस्लिम विद्यापीठाविषयी भूमिका स्पष्ट केली होती.

‘अल हिलाल’ व ‘अल बलाग’ या दोन वृत्तपत्रांमधून ते सातत्याने लिहित होते. ‘अल हिलाल’मधील राष्ट्रीयतेवर लिहिलेली लेखमाला ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने संकलित करून हिंदीत प्रकाशित केलेली आहे. शिवाय ‘अल हिलाल’ व ‘अल बलाग’चे समग्र खंडही उपलब्ध आहेत.

आज़ादांचं संपूर्ण वाङ्मय पाहिल्यानंतर गुहांचं माहिती किती अल्प आहे, हे लक्षात येतं. भारत सरकारने प्रकाशित केलेल्या समग्र खंडावरही नजर टाकली असती तर त्यांनी उपरोक्त कारण दिलं नसतं. गुहा स्वत:ला इतिहासकार म्हणवतात. त्यांना माहीत असावं की वसाहतवादी इतिहासाचा प्रकल्प नाकारून भारतीय राष्ट्रीयतेच्या जाणेवतून इतिहास लिहिण्याचा प्रकल्प मौलाना आज़ाद यांनी शिक्षणमंत्री असताना सुरू झाला होता.

आज़ाद यांनी केवळ धर्मशास्त्रच नव्हे, तर राष्ट्रीय शिक्षण धोरण, समाजिक चिंतन, परराष्ट्र व्यवहार, आधुनिक ज्ञानसाधना, इतिहास, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान, राजकीय तत्त्वचिंतन, समकालीन सामाजिक अवकाश इत्यादींवर विपुल लेखन केलेलं आहे.

केवळ आज़ाद नव्हे तर त्यांच्या काळात शिबली नोमानी, अहेमद अली उस्मानी आणि त्यांच्यापूर्वी सर सय्यद अहमद खान, मुहंमद इकबाल, मौलाना मुमताज अली, अल्ताफ हुसैन ‘हाली’ यांनीही बरंच सामाजिक व राजकीय विषयावर लिखाण केलेलं आहे. इतकंच नाही तर सर्वांनी राष्ट्रवाद, राजकारण, राष्ट्रीय आंदोलन, खिलाफत तथा धर्मचिंतन आदी विषयावर भरपूर लिहून ठेवलेलं आहे.

राष्ट्रवाद आणि धर्मचिंतन संदर्भात उपरोक्त सर्वांचा व्यासंग प्रचंड होता. सर्वजण त्या काळात सुधारणावादी विचारवंत म्हणून मान्यताप्राप्त होते. संबंधित लेखकांवर इंग्रजी, हिंदी आणि उर्दू व इतर भारतीय भाषांमध्ये बरचसं लेखन उपलब्ध आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही अनेक विद्वान उदयास आले. त्या सर्वांनी केलेले विचारचिंतन-लेखन गुहा यांनी वाचलेलं नाही. तरीही ते आत्मविश्वासाने ठोकून देतात. त्यांच्या कृतीची कीव येते.

कलीम अज़ीम, पुणे

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,55,इस्लाम,44,किताब,26,जगभर,132,पत्रव्यवहार,4,राजनीति,311,व्यक्ती,28,संकलन,65,समाज,274,साहित्य,81,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: राम गुहा यांचा मौलाना आज़ादाविषयी पूर्वग्रह
राम गुहा यांचा मौलाना आज़ादाविषयी पूर्वग्रह
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVWU5KBx8Z8jXT9RauyzrDZCGfMmQnr512G3eCsi11dtFCiRXismwBxg4flYU_wZ5mdH00TR9Za6qGbr67Xioxi3wwsFMpRECexxW4lx3FhRAumArKwvAG9jIpjuQF5D3KCKTFCETg0rVqaJs9NpLRF6lLWCaomaQxiMCv5pqzvtNqLUOPKWxLseu4mQYQ/w640-h400/Azad%20_Kot.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVWU5KBx8Z8jXT9RauyzrDZCGfMmQnr512G3eCsi11dtFCiRXismwBxg4flYU_wZ5mdH00TR9Za6qGbr67Xioxi3wwsFMpRECexxW4lx3FhRAumArKwvAG9jIpjuQF5D3KCKTFCETg0rVqaJs9NpLRF6lLWCaomaQxiMCv5pqzvtNqLUOPKWxLseu4mQYQ/s72-w640-c-h400/Azad%20_Kot.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/01/blog-post_20.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/01/blog-post_20.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content