भारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय?

भारतीय मुस्लिम नेहमीच प्रादेशिक होता. इस्लामच्या आगमनापासूनच त्यानं स्थानिक सहजीवन व संस्कृती स्वीकारली. कोकण व केरळमध्ये आलेल्या अरब व्यापाऱ्यांनी स्थानिक स्त्रियांशी लग्ने केली.

स्त्रिया आपल्या सांस्कृतिक व सामाजिक परंपरा घेऊन तिकडे (इस्लाम) गेल्या. इथल्या विवाहित स्त्रिया पतीसाठी मंगळसूत्र, सिंदूर आणि जोडवी परिधान करतात, हे तत्कालीन व्यापारी अरबांसाठी चकीत करणारे होते. त्यांनी त्याची कधीही मनाई केली नाही किंवा त्याला गैरइस्लामिकही म्हटलं नाही. आजही कोकणात स्थानिक तहेजीब आणि इस्लामचा सुरेख संगम आढळतो. कोकणी संस्कृतीचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम यांनी यावर सविस्तर लिहिलेलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम ख़वातीन सिंदूर भरतात तर काही टिकली लावतात. तिथल्या शहरी भागात अबाया घालणाऱ्या मुली आढळतात. मात्र त्यांची जुबान, तहेजीब, परंपरा, सण-उत्सव स्थानिक आहेत. इतकंच नाही तर हिंदू आणि मुस्लिम असा संस्कृती-संगम यांच्यात मोठ्या प्रमाणात आढळतो.

बंगालची ही बंगाली संस्कृती बांगलादेशात पाहयला मिळते. मुळात याच संस्कृतीसंघर्षातून त्याने पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून घेतलेलं आहे. तिथल्या मुस्लिम स्त्रिया आजही सिंदूर भरतात. पाकिस्तानच्या फॅशन वर्ल्डमध्ये टिकली लावणे सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं. जीओ टीवीच्या बराचशा सोप ओपेरात याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. शिवाय इंडोनेशिया देशातले मुस्लिम इस्लामीपेक्षा हिंदू संस्कृतीला अधिक जवळ मानतात. त्यांची नावे, सण उत्सवात हिंदू संस्कृतीचे प्रतिबिंब आढळून येते.

वाचा : मुसलमानांचे राजकीय व सांस्कृतिक आत्मभान

वाचा : धर्मनिरपेक्षतेचे कुली आम्हीच का व्हावे?’

वाचा : लोकसभा २०१४ : मुस्लिम राजकारणाची कोंडी

ओरिसामधील मुस्लिम उडिया बोलतात. तसेच मलयाळी स्थानिक भाषा बोलतात. तामिळनाडु, आंध्र, कर्नाटकातल्या मुस्लिमांनी प्रादेशिक बोली, परिधान, संस्कृती, खान-पान स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रातही मुस्लिम स्थानिक संस्कृतीला चिकटून आहेत. त्यांची भाषा, परंपरा, सण उत्सवात प्रादेशिकता आढळते. 

औरंगाबादसह मराठवाडा निजामी संस्थानाचा भाग असल्यानं तिथं उर्दू भाषा आणि संस्कृती नांदते. अगदी त्याच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रात मराठी संस्थानं असल्यानं तिथं मराठीपणा आढळतो. जसे इथले मुस्लिम मराठीपणा सोडू इच्छित नाहीत तसंच मराठवाड्याचे उर्दू मिजाज सोडू इच्छित नाहीत.

अलीकडे मराठवाड्यात मराठी बोलणाऱ्या मुस्लिमांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तो मराठीचा वाचक पूर्वीपासूनच होता पण बोलीत मात्र अळखडत. दिव्य मराठी आल्यापासून मराठवाड्यात मुसलमानांत मराठीचा व्यवहार वाढल्याचं माझ्या एका पत्रकार मित्राने सांगितलं. औरंगाबादला असताना मला बेगमपुरा परिसरात हा पेपर आणण्यासाठी सकाळी सातच्या आधी जावं लागायचं. इथले लोक पेपर संपल्यावर सिटी चौकातून आणून तो वाचतात. विशेष म्हणजे इथले बहुसंख्य मुस्लिम मध्यमवर्गीय व कामगार गटात मोडणारे आहेत.

जुन्या भागात औरंगाबाद टाइम्स’, ‘रहेबरही उर्दू दैनिकं हॉटेल, टपरी, दुकानात हमखास वाचली जातात. त्यामानानं त्याला खरेदी करणारे मात्र कमी आहेत. तसा त्याचा रोजचा खरेदीदारही मोठा आहे, पण तो आर्थिक सधन व मध्यमर्गीय गटातला आहे. 

याउलट सामान्य कामगर गटातली लोक मराठी दैनिक खरेदी करून वाचायला पसंती देतात. मराठवाड्यात हिंदूंच्या सण-उत्सवात मुस्लिमांचा सहभाग हमखास आढळतो. आजही ग्रामीण गणपती मंडळाचा अध्यक्ष मुस्लिम आढळतो. आमचे सोलापूरचे एक मित्र आहेत त्यांच्या गावात गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा मान त्यांच्या तांबोळी कुटुंबाकडे होता.

उत्तर भारतात अस्मितेचा शिरकाव झाल्याने परिस्थिती मात्र जराशी वेगळी आढळते. त्याला बाहेरून आलेले आक्रमक जबाबदार आहेत. सततच्या हल्ल्यांमुळे इथल्या प्रादेशिकतेला तडे गेले. परंतु तो ब्रिटिशांशी लढताना प्रथम देशीय व नंतर धार्मिक होता. 

बहुतेक उत्तरी भागात आजही प्रादेशिकता टिकून आहे. योगेंद्र सिंकद आणि सबा नकवी या अभ्यासकांनी उत्तर भारतातील या संस्कृती संघर्षावर 'दि सेक्रेड स्पेसेस' आणि 'इन गुड फेथ' नावाची स्वतंत्र पुस्तके लिहिली आहेत. रोमिला थापर आणि हरबंस मुखिया यांनीही या प्रादेशिकतेची दखल घेत लेख लिहिलं आहे.

वाचा : शिक्षण क्षेत्रात क्रांतिकार्य करणारे मराठी मुस्लिम

वाचा : आधुनिक मदरसे... एक नवी पहाट!

इशान्य भारत हा जसा हिंदू संस्कृतीच्या बाबतीत उर्वरीत भारताला अनभिज्ञ आहे. तसंच मुस्लिम संस्कृतीच्या बाबतीतही आहे. बहुतेकांना तो बांगलादेशी घुसखोर या संज्ञेपलीकडे फारसा माहीत नसतो. इशान्य भारतावर आधारित साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या काही विशेषांकात इथल्या बहुसांस्कृतिकतेची वैशिष्ट्य ठळकपणे दिसून आलेली आहेत. अलीकडे केरव्हान, फ्रंटलाईन सारख्या मीडियाने इशान्य भारताचे सुंदर दर्शन घडविणारे काही रिपोर्ट प्रकाशित केलेली आहेत.

इस्लामच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भारतीय मुस्लिमानी कधीही अरबी इस्लामचं अनुकरण केलेलं नाही. हां, काही बाबतीत तसे प्रयत्न झालेले आहेत. पण इथल्या प्रादेशिकतेपुढे ते टिकू शकले नाही. मुळात भारतातला इस्लाम हा सुफी परंपरेतून आलेला आहे. त्यामुळं त्यानं स्थानिक सहजीवनाला अधिक प्राध्यान्य दिलेलं आहे. त्यामुळेच इथले सण-उत्सव, आनंद सोहळे, रितीरिवाज, लग्ने, जन्म सोहळे, मयतानंतरच्या प्रथा, छिल्ला-छठी, नियाज (कंदुरी) इत्यादीत स्थानिकपणा आळढतो. त्याला अजूनही कुठलाही पुनरुज्जीवनवादी संघटक व संघटना थोपवू शकल्या नाहीत.

जाफर शरीफ यांनी 1890मध्ये लिहिलेल्या व ब्रिटिश अधिकाऱ्याने संपादित केलेल्या कानून ए इस्लामपुस्तकात असा संमिश्र व सांस्कृतिक समागमाचे अनेक संदर्भ आढळतात. अलीकडे मुशिरूल हसन, इम्तियाज अहमद, रोमिला थापरपासून फकरुद्दीन बेन्नूर, असगर अली इंजीनियर इत्यादींनी त्यावर विपुल लेखन केलेलं आहे. प्रा. बेन्नूर यांनी ही समाजरचनामांडणारे स्वतंत्र असं पुस्तकच लिहिलं आहे. उर्दूतही अशा प्रकारची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

सबा नकवी यांनी आपल्या 'इन गुड फेथ' पुस्तकात बंगाल व तामिळनाडु परिसरातील स्थानिक मु्स्लिमांच्या काही कथा प्रकाशित केलेल्या आहेत. तिरुचिल्लापल्ली भागातील व्यावसायाने कलावंत असलेले मुस्लिम कबिले हिंदू आणि मुस्लिम अशी दोन नावे धारण करतात. शिवाय लग्ने, उत्सव सोहळेदेखील दोन्ही रितीरीवाज व परंपरेत केली जातात. आरिफ मुहंमद खान यांच्या भाषेत बोलायचं झाल्यास दक्षिण भारतातला मुस्लिम हा भारताच्या संमिश्र संस्कृतीचा दूत आहे.

दक्षिण भारतातील अशा संस्कृतीसंगमाच्या अनेक कथा सबा नकवी यांनी आपल्या पुस्तकात नोंदवलेल्या आहेत. वाचकांनी हे पुस्तक कुतुहल म्हणून का होईना वाचायला हवे. मराठीत प्रमोद मुजुमदार यांनी त्याचं 'सलोख्याचे प्रदेश' नावाने छान भाषांतर केेेलंं आहे. भारतीय मुस्लिम हा पूर्वीपासूनच इथल्या संस्कृती व सभ्यतेत समरूप झालेला आहे. तो इथल्या मातीशी नाळ जुळवून आहे. कारण तो भारतीय सुफी परंपरेशी नाते सांगणारा आहे. महाराष्ट्रात आलेल्या अनेक सुफी संतांनी, शिवाय इथल्या मराठी मातीत जन्मलेल्या सुफींनी सामाजिक समन्वय, सहिष्णुता, सद्भावना, मिश्र संस्कृती आणि सहजीवनाचा प्रचार-प्रसार केला होता.

वाचा : ख्रिश्चन साजी चेरियन जेव्हा बनवतात मस्जिद

वाचा : गंगा-जमुनीप्रतीकांची पुनर्मांडणी

नव्वदीत इराक-अमेरिका युद्धानंतर भारतात सद्दाम नाव ठेवण्याची प्रथा पडली व ती अनेक दिवस टिकून राहिली. त्याला जितका तत्कालीन धर्मवादी वर्चस्ववाद जबाबदार होता, इतकाच भांडवली सत्तेला आपल्या पद्धतीने आव्हान देण्याचा मानस कारणीभूत होता. (आजही असा भाबडापणा आढळतो) उदारीकरणाने भांडवलया संकल्पनेला जसं महत्व आलं तसं भारतीय मुस्लिमांच्या धर्मवादी कल्पना हळहळू गळून पडताना दिसून आल्या. अमाप पैसा आल्याने धर्म आणि सत्ता याची तुलना होऊ लागली. पेट्रो डॉलरमधून त्याला भांडवली स्वरूप प्राप्त झाले. यूरोपच्या चंगळवादी बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेने या संधीचा फायदा घेत अमाप पैसा कमावला.

सन 2000च्या दशकात भांडवली व धार्मिक वर्चस्ववादातून साम्राज्यवाद फोफावला. अमेरिकेने नाटोप्रणित सैन्य मध्य आशियात घुसवून तिथल्या संस्कृतीचं उद्ध्वस्तीकरण केलं. धार्मिक दहशतवादाचे मिथक तयार करून अफगाणिस्तान व नंतर इराकमध्ये तांडव माजवण्यात आलं. नियोजनबद्ध पद्धतीने या दशकात जगभरात इस्लामोफोबिया वाढविण्यात आला. भांडवली प्रसारमाध्यमांनी जगभरातील मुस्लिम समुदायाला 'सेबोटाईज' केले. त्यांच्या शत्रुकरणाची प्रक्रिया आरंभली. पावर पोलीटिक्ससाठी इस्लामची भिती दाखवली गेली. युरोपियन भांडवली व्यवस्थेने त्याला 'इस्लामिक टेररिजम' असं नामकरण करून जागतिक दहशतची स्वरूप दिलं.

या दोहोत मध्य आशियातील इस्लामिक संस्कृतीवर आघात होऊन प्रादेशिकतेला तडे गेले. इथली प्राचीन संस्कृती उद्ध्वस्त झाली. अल् जंजिरा, बीबीसी, टाइमलाईनने या उद्धवस्तीकरणावर दीर्घ रिपोर्ताज केलेले आहेत. अफगाणिस्तान, इराक आणि पुढे सिरीया व मध्य आशियात झालेले हल्ले हे स्थानिक संस्कृती नष्ट करण्यास कारणीभूत ठरल्याचं मत मध्य आशियात बराच काळ वास्तवास असलेल्या मराठी लेखिका प्रतिभा रानडे नोंदवतात.

या संघर्षाचा परिणाम स्थानिक संस्कृतीवर होत प्रादेशिकतेपेक्षा धार्मिकतेला महत्त्व आलं व कंपू गटात त्याचे रुपांतर झाले. अर्थातच प्रतिक्रियावादातून त्याचा जन्म झालेला होता. त्यातूनच रुढी, परंपरेवर आधारित धर्म तत्त्वांना महत्व आलं.

गेल्या वीस वर्षात जगभरात वाढलेल्या फॅसिस्ट संघटनांनी इस्लाम व मुस्लिमांना वेगळे पाडण्याचे प्रयत्न केले. ठिकठिकाणी त्यांच्यावर दोषारोपण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुस्लिम वर्डमध्ये यातून बचाव करण्यासाठी मंथन सुरू झालं. महमूद ममदानी यांनी आपल्या 'गुड मुस्लिम बैड मुस्लिम' या पुस्तकात या बदलणाऱ्या जागतिक घडामोडींचे सुंदर विवेचन केलेलं आहे.

अमेरिका पुरस्कृत दहशतीच्या भांडवली बाजाराची नेमकी मेख वेळीच लक्षात आल्याने सावध भूमिका घेतली गेली. त्यातूनच मग इस्लामी संस्कृती, सभ्यता व प्रादेशिकतेची मांडणी सुरू झाली. भारतात मुशिरुल हसन, ताहीर महमूद, इरफान हबीब सारख्या प्रसिद्ध विचारवंतांनी भारतीय मुसलमानांच्या समाजरचनेबद्दल व संस्कृतीबद्दल मांडणी केली. योगेंद्र सिकंद यांचे सेक्रेट स्पेसेस हे पुस्तकही याच काळात आले. महाराष्ट्रात प्रा. बेन्नूर व असगर अलींनी या बदलांचा आढावा घेत विपुल लेखन केलेलं आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळतो.

रामजन्मभूमी आंदोलन, बाबरीचं उद्ध्वस्तीकरण, गुजरात, कंधमाल, कोक्राझार दंगल, 2000च्या सुरुवातीला आलेला कथित दहशतवादाचा डाग इत्यादी घटक मुस्लिमांमध्ये आत्ममंथनाची प्रक्रिया घडवून गेला. परिणामी एकीकडे आत्मकेंद्री तर दूसरीकडे व्यावहारिक, व्यावसायिक आणि लोकशाही घटकांशी जोडू पाहणारा समाज उदयास आला.

गेल्या सहा वर्षापासून या प्रक्रियेला अजून गती मिळाली आहे. त्यामुळे त्याला राजकीय व्यवहार आता कळू लागला आहे. अमेरिकेने अफगाणमध्ये तालिबानी सत्तेला मान्यता देणे व भारताने त्याला कबुली देणे आणि पर्यायाने युरोपीय व भारतीय गोदी मीडिया तालिबानी, तालिबानी करून ओऱड करणे, यातली भांडवली व राजकीय मेख तो ओळखून आहे. सोशल मीडियाच्या टोळधारी मंडळीने त्याला समज आणि माहितीच्या बाबतीत आत्मनिर्भरबनवले आहे. असो.

भारतीय मुसलमान हा पूर्वीपासून प्रादेशिक होता व आहे. यावर अल जझिराया अरबी मीडिया हाऊसने छान माहितीपट तयार केलेली आहेत. शिवाय TRT या तुर्की सरकारी चॅनेलनेही याची दखल घेतली आहे. बीबीसी, टाइमलाईन, वाईस ऑफ अमेरिका यावर सातत्याने रिपोर्ट प्रकाशित करत असतात.

अलीकडे सततच्या होणाऱ्या धर्मवादी हल्ल्यात भारतीय मुस्लिम समुदायाचे अधिकाधिक प्रादेशिक होत जाणे खूप काही सांगून जाते. एकीकडे त्याला वेगळे पाडून झोडपण्याची प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे तो स्वत:ला अधिकाधिक स्थानिक, भाषिक, सांस्कृतिक व सामाजिक करत आहे. अर्थात हेच भारताच्या कदीम तहेजीबचं प्राबल्य म्हणूया...

(सदरील लेखाचा विस्तारित भाग परिवर्तनाचा वाटसरू पाक्षिकाच्या १६ ते ३१ ऑगस्ट अंकात प्रकाशित झालेला आहे.)

कलीम अजीम, पुणे

मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: भारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय?
भारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIuCzCbgBbd0iPnKIcgrXkVJtiInINXwejseiMVBo1MoM8q1c8JF_bmZMsuCCL_7P9H3MJYIP5cr22Fd3iD9feb6FO9LWcNXlp_wPxQVtyLuB5u314mMx_wsxuS6g-lfNeSI90Dn-9wtmr/w640-h400/Mumbai+CAA+Protest+Communal+Hoarmony.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIuCzCbgBbd0iPnKIcgrXkVJtiInINXwejseiMVBo1MoM8q1c8JF_bmZMsuCCL_7P9H3MJYIP5cr22Fd3iD9feb6FO9LWcNXlp_wPxQVtyLuB5u314mMx_wsxuS6g-lfNeSI90Dn-9wtmr/s72-w640-c-h400/Mumbai+CAA+Protest+Communal+Hoarmony.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/08/blog-post_10.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/08/blog-post_10.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content