शिक्षण क्षेत्रात क्रांतिकार्य करणारे मराठी मुस्लिम


साथी श्रीयुत सुरेश खैरनार यांनी १३ ऑक्टोबर २०२० रोजी फातिमा शेख यांच्यावर एक फेसबुक टिपण लिहिलं. ही पोस्ट नंतर ‘चौथी दुनिया’ नावाच्या एक हिंदी वेबपोर्टलला लेख स्वरूपात प्रकाशित झाली. संबंधित टिपण लेख स्वरूपात प्रकाशित झाल्याने त्याची दखल क्रमप्राप्त ठरते. संबंधित टिपणात श्रीयुत खैरनार यांनी लिहिलं, “फातिमा शेख का काम उनके सौ साल बाद के हमीद दलवाई जी के काम के साथ तुलना हो सकती है।”

संबंधित टिपण त्यांनी फातिमा शेख यांच्या शिक्षण कार्यातील योगदानावर चर्चा करण्यासाठी लिहिलं होतं. उपरोक्त विधानात खैरनार म्हणतात, फातिमा शेख यांच्या कार्याची तुलना दोनशे वर्षांनतर दलवाईंच्या कामाशी केली पाहिजे.

खैरनार यांच्या मते दोनशे वर्षात फातिमा शेख यांच्या नंतर दुसरा कुठलाच (मुस्लिम) समाज सुधारक महाराष्ट्रात झाला नाही, असा याचा मथितार्थ आहे. संबंधित लेख १३ ऑक्टोबरला लिहिलेला आहे. त्यांच्या मते आज म्हणजे १३ ऑक्टोबरला फातिमा शेख यांचा स्मृतीदिन आहे.

फातिमा शेख यांचे विस्मरण केल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली आहे. दलवाई व फातिमा शेख यांचे विस्मरण केल्याबद्दल तथाकथित पुरोगामी चळवळीवर खैरनार बोट ठेवतात. लेखक पुरोगामी विचारांच्या राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. म्हणजे ते स्वत:ला पुरोगामित्वाशी अलग करून बघतात, असाही त्याचा अर्थ निघू शकतो.

संबंधित लेख फातिमा शेख यांच्यावर असला तरी त्यांचा जन्म, कार्य, व्यक्तिमत्व आणि मृत्युसंदर्भात त्यांनी नेमकी माहिती दिलेली नाही. या संदर्भात त्यांनी ठोस पुरावे, संदर्भ, ऐतिहासिक साधने किंवा तत्सम पुरावे उपलब्ध करून दिलेले नाहीत.

आज फातिमा शेख यांचा स्मृती दिवस आहे, असेही लेखक म्हणतात. त्यांनी जन्मतारखेचा किंवा मृत्यू तारखेचा कुठलाही पुरावा संदर्भ दिलेला नाही.

अर्थात पूर्णतः प्रागतिक वर्तुळातील ऐकीव माहितीवर लेख आहे, कारण फातिमा शेख संदर्भात कुठलीच माहिती पब्लिक डोमेनमध्ये अजूनतरी उपलब्ध नाही. सावित्रीमाई फुले यांनी महात्मा फुलेंना लिहिलेल्या एका पत्रात फातिमासअसा उल्लेख केला आहे, हा एक संदर्भ वगळला तर फातिमा शेख संदर्भात कुठलीच अधिकृत माहिती उपलब्ध नाही. असो. 

संदर्भ साधने नसल्यामुळे सत्यशोधक व पुरोगामी चळवळीतील अनेकजण केवळ प्रेमापोटी फातिमा शेख यांच्यावर लिहीत-बोलत असतात. सदरील लेखही सत्यशोधक चळवळ व फातिमा शेख यांच्या प्रेमापोटी लिहिला असावा, त्यामुळे त्याबद्दल कुठलाही आक्षेप नोंदवण्याचे कारण नाही.

परंतु लेखक महाशयांनी महात्मा फुले नंतर अर्थात फातिमा शेख नंतर थेट हमीद दलवाई यांचा उल्लेख केला आहे. या २०० वर्षांत कोणीही मुस्लिम नाही, असं त्यांना स्पष्टपणे म्हणायचं असावं. बहुदा मधल्या काळात महाराष्ट्रात कुठलाही (मुस्लिम) समाजसेवक निपजला नसावा, असं लेखकाला ठामपणे सूचवायचं असावं. 

उपरोक्त संदर्भ फातिमा शेख यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान संदर्भात आलेला आहे, असं गृहित धरू या. ही तुलना करताना लेखकाने दलवाई यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानावर चर्चा केली नाही. दलवाईंनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक काम केले असेल तर वाचकांना त्या कार्याबद्दल उत्सुकता आहे. नेमके कुठले शैक्षणिक कार्य उभे केले, ते कशा पद्धतीने पुढे नेले, हे लेखक महाशयांनी अन्य टिपणात सांगावे. 

लेखकाला या टिपणातून असे प्रस्तुत करावयाचे असेल की फातिमा शेख नंतर किंवा दलवाईच्या आधी कुठलेच मुस्लिम ज्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले नाही किंवा ते निपजले नाहीत.

वाचा : फातिमा शेख : शिक्षा क्षेत्र में काम करनेवाली मुस्लिम महिला

वाचा : रफीक झकेरिया : एक सुलझे हुए राजनितिज्ज्ञ

वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सहिष्णुतेचे महामेरू

मग हे गृहस्थ कोण?

१) बदरुद्दीन तय्यबजी : सदरील गृहस्थ ब्रिटिशकालीन बॉम्बे हायकोर्टाचे पहिले भारतीय मुख्य सरन्यायाधिश होते. ते १८८५ साली मुंबईत स्थापन झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या संस्थापकापैकी एक होते. त्यांनी १८७४ साली मुंबईत अंजूमन इस्लाम या शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. अर्थातच गरीब, शोषित, वंचितांना आधुनिक शिक्षण मिळवून देणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. म्हणजे तय्यबजी हे ज्योतिबा फुलेंचे समकालीन होते. म्हणजे फातिमा शेख यांच्या काळातच त्यांनी अंजूमन इस्लामची स्थापना केलेली होती.

अंजूमनचे अध्यक्ष या नात्याने बदरुद्दीन तय्यबजी यांनी 'भारतीय शैक्षणिक धोरण व मुस्लिम' या संदर्भात १८८२ साली हंटर कमिशनपुढे साक्ष नोंदवली होती. त्यात त्यांनी सद्यस्थितीत मुसलमानांना सरकारी नोकरी मिळत नाही, असा शेरा दिला होता. त्याचं कारण नोंदवताना ते म्हणतात, “इंग्रजी शिक्षणाचा अभाव आणि राजकीय पूर्वग्रह; या शिवाय फारसी आणि अरबी भाषेला महत्त्व कमी होणे. परिणामस्वरूप समाजात उच्च आणि प्रभावशाली स्थान असणाऱ्या व्यक्तींनी प्रयत्न करुनही (मुस्लिमांना) कुठेही नोकरी मिळत नाही.

याची कारणमीमांसा करताना पुढे त्यांनी म्हटल होतं, (१) मुस्लिम समुदाय भूतकाळात आपले साम्राज्य होते या स्वप्न जंजाळात आहे, त्यामुळे वर्तमान परिस्थितीला अनुरूप तो स्वतःला मोल्ड करू शकला नाही. (२) भारत, इराण आणि अरब यांच्या ज्या साहित्यावर तो प्रेम आणि अभिमान बाळगतो, त्यामुळे युरोपच्या आधुनिक कला, विज्ञान आणि साहित्य यांच्याशी जोडून घेण्यास तो अपयशी ठरला. (३) युरोपियन शिक्षण इस्लामी परंपरेच्या विरोधी आहे. त्यामुळे नास्तिकता किंवा ख्रिश्चन धर्मात रूपांतरित होण्याचे भय त्याला आहे.

(४) शिक्षण अधिकाऱ्यांद्वारे मुस्लिम तरुणांसाठी उपयुक्त शाळा स्थापन करण्यात अपयश आणि उदासीनता आहे. (५) गरीबी, ज्यामुळे वर्तमान शालेय सुविधेचा तो लाभ घेऊ शकत नाही. (६) सरकार त्याच्या दुर्बल स्थितीवर लक्ष देत नाही तसेच त्यातून बाहेर काढण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करत नाही, अशी भावना त्यांच्यामध्ये रुजली आहे. (७) सरकारी शाळेचे इंग्रजी शिक्षण सामान्य जीवनयापन करण्यासाठी व्यर्थ आहे आणि त्याचे काही व्यावहारिक मूल्य नाही, अशी प्रबळ भावना त्यांच्यात आहे.

या कारणांना दूर करण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले होते. त्यांनी म्हटलं होतं, मुसलमानांनी हळूहळू या बाबीवर विश्वास ठेवला पाहिजे की आपल्या प्राचीन गौरवाचं रक्षण करणं आणि त्यासाठी योग्यता धारण करण्यासाठी वर्तमान संधीचा जास्तीत-जास्त लाभ उचलला पाहिजे. निष्क्रियता आणि उदासिनता त्यांच्या परिस्थितीत अजिबात सुधार घडवू शकणार नाही. उलट त्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक खराब होत जाईल.

(२) मोईनुद्दीन हारीस : राष्ट्र सेवा दलाच्या प्रमुख नियंत्रण मंडळात हरीश यांनी उत्तमरीत्या काम केलं आहे. किंबहुना स्वातंत्र्यपूर्व काळात हरीश यांनी राष्ट्रसेवा दलाला जनमानसात पोहोचवण्याचा महत्त्वाचा कार्य केलेलं आहे. सदरील गृहस्थ साने गुरुजींच्या चाहत्यापैकी एक होते. म्हणजे साने गुरुजींच्या कल्पनेतून साकार झालेल्या राष्ट्र सेवा दलाच्या विचारांना ते माननारे होते. शिवाय साधना साप्ताहिकाच्या विश्वस्तापैकी ते एक होते. त्यांनी अंजूमन इस्लामचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात अंजूमनचा विस्तार मुंबईबाहेर म्हणजे कोकणातही झालेला आहे. अंजूमनच्या वेबसाइटवर हारीस याच्या उत्तुंग शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारे विशेष टिपण वाचायला मिळू शकते.

हारीस अजमल नावाचं उर्दू वर्तमानपत्र चालवायचे. ऐकेकाळी या वृत्तपत्राची मुंबईत फार चर्चा असायची. वृत्तपत्रातून त्यांनी मुस्लिम समुदायातील सामाजिक रुढी-प्रथा-परंपरा इत्यादींवर प्रहार केलेले आहेत. शिवाय त्यांचा सार्वजनिक कार्यातही नित्य वावर असायचा. मला नाही वाटत की मोईनुद्दीन हारीस श्रीयुत खैरनार यांच्या पिढीच्या विस्मृतीत गेले असावेत. आजही हारीस यांना ओळखणारे अनेकजण हयात आहेत.   

हारीस प्रख्यात विचारवंत होते, त्यांनी इस्लामवर विपुल लेखन केलं आहे. त्यांनी केलेल्या लिखाणावर इस्लामदृष्ट भूमिकेसाठी कुख्यात असलेल्या कुरुंदकर सारख्या समाजवाद्यांनी टीकाही केलेली आहे. संबंधित वाद समाजवादी चौकटीत आजही चर्चेला असतो.

जनाब मोइनुद्दीन हारीस यांचा पुण्यातील समाजवादी परिवारामध्ये नित्य वावर असायचा. मग खैरनार यांना मोइनुद्दीन हारीस यांचं स्मरण का होत नाही?

वाचा : मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तीन दशकं

वाचा : प्रतिकांचे साहित्यकारण किती दिवस?

वाचा : नरहर कुरुंदकर : एक टाळीबाज विद्वान

(३) इसहाख जामखानवाला : अंजूमन इस्लाम या शैक्षाणिक संस्थेला जी बदरूद्दीन तैय्यबजी यांच्या प्रयत्नाने उभी राहिली, ह्या संस्थेचा विस्तार करीत ज्या अनेक दिग्गजांनी ते कार्य पुढे नेले, अशामध्ये जामखानवाला एक होते.

नव्वदच्या दशकात जामखानवाला हे महाराष्ट्र व मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांनी समाजसुधारणा, शिक्षण व प्रागातिक विचार समाजात घेऊन जाण्यासाठी अथक प्रयत्न केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी अंजूमन इस्लाम संस्थेला पुढे नेण्याचे व त्याचा विस्तार करण्याचे काम केले. ते केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कमिट्यावर होते. प्रबोधनाच्या चळवळीमध्ये देखील त्यांचा मोठा सहभाग होता.

मराठी मुस्लिम साहित्य चळवळीला त्यांचं पाठबळ होते. १९९५ साली त्यांनी अंजूमन इस्लाम संस्थेत मराठी मुस्लिम लेखकांचं साहित्य संमेलनही भरवलं होतं. त्यात य. दि. फडके, अब्दुल कादर मुकादम, डॉ. भालचंद मुणगेकर, श्रीमती फय्याज शेख, विजय तेंडुलकर, कुमार केतकर, नागनाथ कोत्तापल्ले प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित होते.

साहित्य असो सामाजिक किंवा राजकीय नेतृत्व प्रत्येक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. मग श्रीयुत खैरनार यांना ते का आठवत नसावेत?

(४) हाजी गुलाम आजम (पुणे) : पुण्यातील हे गृहस्थ पुना कॉलेज व आजम कॅम्पस सारख्या बलाढ्य शिक्षण संस्थेचे संस्थापक होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम अतुलनीय आहे. पुण्यातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थामध्ये आजम कैम्पस अग्रणी शिक्षण संस्था म्हणून नावाजलेली आहे. संस्थेला सुमारे शंभर वर्षांचा इतिहास आहे.

असं म्हटलं जातं की, या संस्थेतील पहिल्या विद्यार्थ्यांपैकी एक असलेले सर मुहंमद रफीउद्दीन हे राणी व्हिक्टोरियाचे उर्दू शिक्षक होते.

हाजी गुलाम मुहंमद साहेब दानशूर, परोपकारी व्यक्ती होते. संस्थेच्या स्थापनेनंतर अल्पकाळातच ते प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ म्हणून नावारुपाला आले. तत्कालीन काळात पुण्यातील अनेक सुधारणावादी संघटनांसोबत कार्यरत होते, असं संस्थेच्या इतिहासात नमूद केलेलं आहे.

पुणे शहरातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा वावर असायचा. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले काम आजम कॅम्पसचा अवाढव्य विस्तार पाहिल्यास कळून येते. आज़म खान, अब्दुल कलाम खान आणि खान बहादूर जस्टिस हिदायतुल्ला यांच्या दूरदृष्टीतून ही संस्था आकाराला आली.

ब्रिटिश सरकारच्या काळात त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा व तत्सम कार्यात त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या कामावर आज़म कॅम्पस या शैक्षणिक संस्थेत बरंच संशोधन झालेलं आहे.

(५) पी.ए. इनामदार : आज़म कॅम्पसचा वैभवशाली वारसा आज पी.ए. इनामदार यांच्याकडे आहे. गेली चार-पाच दशके त्यांनी संस्थेला जागतिक क्रमवारीत स्थानबद्ध केलं आहे. त्यांनी शैक्षणिक कार्यात विविध प्रयोग केले. त्यांच्या कारकीर्दीत संस्थेविषियी झालेल्या एका महत्त्वाच्या खटल्याला विधी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहे.

आज आज़म कॅम्पसमधील विविध संस्थामधून नर्सरी, पहिलीपासून ते पीएचडीपर्यंतचे मेडिकल, इंजिनिअरिंग, सामाजिकशास्त्रे, फार्मसी, विज्ञान, कला, वाणिज्य सर्वच प्रकारचे आधुनिक शिक्षण मिळते. पुण्यातील हजारो विद्यार्थी या शिक्षणपद्धतीचा लाभ घेतात. तब्बल २३ एकरच्या परिसरात एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे आधुनिक शिक्षण मिळतेे.

आजही पुण्यातील अनेक प्रगातिक संघटनाच्या प्रत्येक कार्यात इनामदार सहभागी असतात. सामाजिक कार्यात त्यांचा वाटा पुण्यातील इतर कोणाही पुरोगामी संघटनांच्या तुलनेत अधिकच आहे. 

वाचा : एकात्म समाजाचे शांतीदूत मौलाना आजाद

वाचा : मौलाना आजाद : भारतरत्न नाकारणारा अवलिया

वाचा : हसरत मोहानी : संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी

() ए. डी. आत्तार : पश्चिम महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेच्या उभारणी व विस्तारामध्ये अब्दुल गणी अत्तार यांचं महत्त्वाचं योगदान होतं. त्यांनी आपले आत्मवृत्त कोकरुड ते बर्हिंगम’ यामध्ये रयत शिक्षण संस्थेसाठी व त्याच्या विस्तारासाठी केलेल्या कामाचा सविस्तर आढावा दिलेला आहे. भाऊराव पाटलांसोबत त्यांनी केलेल्या अनेक कार्याचा व शैक्षणिक दूरदृष्टीचा अंदाज रयतच्या अभिलेखारामध्ये सहज फेरफटका मारून येऊ शकतो.

त्यांच्या आत्मवृत्तातून रयतचा विस्तार व त्यात अग्रेसर असलेली मुस्लिम नावं सहज दिसून येतात. 

(७) हमीद अली : ब्रिटिश इंडियातील सातारा विभागाचे तत्कालीन कलेक्टर हमीद अली रयत संस्थेचे सचिव होते. त्यांनी रयतच्या विस्तार कार्यात महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. हे हमीद अली म्हणजे बरुद्दीन तय्यबजी यांच्या वंशावळीतील थोर पुरुष आहेत.

पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांचे ते बंधू होत. त्यांच्या कार्याचा विसर रयत शिक्षण संस्था व पश्चिम महाराष्ट्राला अजूनही पडलेला नाही. ए. डी. आत्तार यांच्या मते रयत उभारणीत त्यांचा अतुलनीय वाटा आहे. रयतच्या विस्तार कार्यासाठी लागणारी भूमी अनेकवेळा त्यांनी बिनदिक्कत देऊन टाकली आहे.

(७) रफिक जकारिया (औरंगाबाद) : यांच्याबद्दल महामहीम लेखक श्री. सुरेश खैरनार यांना देखील माहिती असेल. तरीही माहितीसाठी जकारिया यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल इथं नमूद करतो.

जकारिया यांचा जन्म १९२० साली मराठी मातीत म्हणजे नालासोपारा येथे झाला. राजकारण असो वा सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दिल्ली स्थित जामिया केंद्रीय विद्यापीठाचे ते कुलगुरुदेखील होते.

विविध आपल्या कर्तृत्वाचा अभिमानास्पद ठसा उमटवणाऱ्या डॉ. जकारिया यांचे कर्तृत्व असामान्य होते. भारतीय मुस्लिमांच्या राजकीय व सामाजिक उत्थानासाठी त्यांनी केलेल कार्य जगप्रसिद्ध आहे. हिंदू-मुस्लिम समाजात बंधूभाव राखण्यात जकारियांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

एकाच वेळी ते अनेक आघाड्यावर कार्यरत होते. महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य ते राज्याच्या ओद्योगिक व नगररचना विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. शिवाय संसदेत जाऊन नागरिकांचे प्रश्नही मांडले. तसेच संयुक्त राष्ट्राचे १९६५, १९९० व १९९५ मध्ये भारताचे प्रतिनिधित्वही त्यांनी केलेलं आहे. देशाचे परराष्ट्र व सांस्कृतिक धोरण ठरविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 

औरंगाबाद स्थित आज़ाद कॅम्पस अर्थात मराठवाडा एज्युकेशन सोसायटीची त्यांनी १९६३ मध्ये स्थापना केली. मुंबईच्या अंजुमन इस्लामच्या धर्तीवर या शैक्षणिक सोसायटीची स्थापना झालेली आहे. १४४ विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या महाविद्यालयाचा विस्तार मुंबईपर्यंत आहे. इथून आतापर्यंत लाखों विद्यार्थी बाहेर पडून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहेत.

आधुनिक शिक्षणाचा हा विशाल वृक्ष आजही गौरवाने उभा आहे. औरंगाबाद शहरातील आज़ाद परिसर हा आधुनिक शिक्षण पद्धतीचा बालेकिल्ला मानला जातो.

इंजिनीअरिंग, मीडिया, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, सॉफ्टवेअर आणि टेक्निकल एज्युकेशनचे सर्वोच्च शिक्षण एकाच ठिकाणी मिळते. बारावी ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली. प्रतिष्ठित लोकांपासून ते सामान्य वर्गातील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात.

(८) इस्माईल यूसुफ (मुंबई): सर इस्माईल यूसुफ एक प्रतिष्ठित व्यवसायी होते. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे संचालक होते. त्यांची दूसरी महत्त्वाची ओळख म्हणजे ते मुंबईच्या जोगेश्वेरी स्थित इस्माईल यूसुफ कॉलेजचे संस्थापक अशी आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे १९२९ साली संबंधित कॉलेज उभं राहिलं. 

सर हाजी इस्माईल यूसुफ यांनी १९१४ मध्ये तत्कालीन बॉम्बे प्रांताला ८ लाख रुपयांची देणगी दिली. या देणगीचा उद्देश विशिष्ट आणि स्पष्ट असा होता. सरकारला या रकमेतून मुस्लिम समुदायासाठी शिक्षण संस्थेची उभारणी करायची होती. त्यातून समुदायातील तरुणांना उच्च शिक्षणासाठी निवासी संस्था निर्माण केली गेली. मुंबई सरकारचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ऑर्मे विल्सन यांच्या हस्ते १९२४ साली महाविद्यालयाची पायाभरणी झाली. संबंधित कॉलेज भारतातील चौथे सर्वात जुने महाविद्यालय आहे. अतिशय अल्पावधीत महाविद्यालय नावारुपास आले. आजही सदरील कॉलेज मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये गणलं जाते.

इस्माइल यूसुफ कॉलेजच्या माजी प्राचार्य प्रा. कुलसूम पारेख आपल्या ‘कन्फेशन्स ऑफ अ‍ॅन अग्नोस्टिक’ या आत्मकथनात लिहितात, “आपल्या  इस्लामी भाषा आणि इस्लामी संस्कृतीचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी या कॉलेजची उभारणी करण्यात आली होती. या कॉलेजचा बहुसंख्य ७ कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मुसलमान होते.” सदरील कॉलेज स्थापन झाल्याने मुंबईमध्ये केवळ मुस्लिम समुदायच नव्हे तर सर्वांसाठी उच्च शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र निर्माण झालं. 

फाळणी नंतर कॉलेजची विद्यार्थी पटसंख्या खूप कमी झाली. त्या काळात म्हणजे १९५० ते ५१ साली कॉलेज बंद पडेल की काय अशी अवस्था होती. त्यावेळी कॉलेजच्या प्राध्यापिका कुलसूम पारेख यांचे पती सत्तार पारेख यांनी कॉलेज बंद पडू नये म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांच्यामार्फत कॉलेजचे एक प्राध्यापक जनाब डार यांनी मौलाना आज़ाद यांच्याशी संपर्क साधून कॉलेजला वाचवलं.

संवाद लेखक व अभिनेता कादर खान या कॉलेजमधून शिकून बाहेर पडले. माजी केंद्रीय सचिव व औरंगाबाद स्थित मौैलाना आज़ाद कॉलेजचे संस्थापक जनाब रफिक ज़कारिया यांच कॉलेजचे विद्यार्थी होते. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री राहिलेले अब्दुल रहमान अंतुलेदेखील याच कॉलेजचे विद्यार्थी होते. ऐवढेच नाही तर पु.ल. देशपांडे यांची प्रतिभादेखील याच कॉलेजमधून पुढे आली, म्हणजे तेही याच कॉलेजचे विद्यार्थी होते.

श्रीयुत खौरनार यांच्यासाठी अजून एक धक्कादायक माहिती अशी की, हमीद दलवाईदेखील याच कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांच्या ज्या सामाजिक कार्याचा उल्लेख खैरनार यांनी केलेला आहे, त्याची बीजे दलवाईंना याच कॉलेजने दिली. 

वर्तमान स्थितीत या कॉलेजचं व्यवस्थापन महाराष्ट्र सरकारकडे आहे. या महाविद्यालयात कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स यासह सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम चालवले जातात. शिवाय बॅचलर इन मॅनेजमेंट, बॅचलर अकाउंटिंग आणि फायनान्स, बॅचलर बँकिंग आणि इन्शुरन्स बॅचलर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बॅचलर फायनान्शिअल मार्केटिंग इत्यादी विषय एकाच इमारतीत शिकवले जातात. याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध आहेत. 

वाचा : आधुनिक मदरसे... एक नवी पहाट!

वाचा : आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!

वाचा : जिवघेणा कोण? कोरोना की मराठी मीडिया

मुस्लिमद्वेशी मोहिमेचा भाग

फुले नंतर दोनशे वर्षांचा आढावा घेतल्यास शेकडागणिक मुस्लिम शिक्षणसेवक आपल्याला मराठी मातीत दिसू शकतात. पण डोळे बंद करून बसलेल्याना ते कसे दिसतील. उपरोक्त व्यक्ती अर्थातच प्रातिनिधीक आहेत. आसपासच्या परिसरात नजर जरी टाकली तरी अनेकजण दिसतात. त्यामुळे या दोनशे वर्षात एकही नाही, असं म्हणणे सयुक्तिक नाही.  

तात्पर्य असं की फातिमा शेख नंतर थेट हमीद दलवाई म्हणजे मधल्या काळात प्रबोधन चळवळीमध्ये कोणी झालेच नाही असं ठामपणे सांगणे वस्तुस्थितीला धरून नाही. विशेष म्हणजे वर उल्लेखित सर्व व्यक्ती दलवाईंच्या समकालीन होते.

लेखक महाशयांनी दलवाई यांच्या कार्याचा उल्लेख फातिमा शेख यांच्या कार्याशी जोडून केला आहे. कदाचित हा उल्लेख संघटनेतील सहकारी किंवा समाजवादी चळवळीच्या प्रेमापोटी केला असावा.

दुसरा अर्थ असा होतो की दलवाई शिवाय महाराष्ट्रात प्रबोधन चळवळीमध्ये कोणीच नव्हते व नाहीयेत असा होतो. अर्थात हा विचार म्हणजे मुसलमानांचा नाकर्तेपणा दर्शवणे, त्यांना परंपरावादी घोषित करणे, त्यांची धार्मिकता व प्रबोधन चळवळीला विरोध किंवा त्यांना मान्यता न देणे अशा बाबी प्रतीत करणार्‍या आहेत. 

लेखकाच्या मते, दलवाईंनी फातिमा शेख सारखं शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग व क्रांतिकारी कार्य केलेलं आहे. परंतु लेखक महाशयांनी त्यांचे नेमकं शैक्षणिक कार्य उल्लेखित केलेलं नाही. दलवाईंबद्दल आम्हा सामान्य वाचकांना फारशी माहिती नाही, जर दलवाईंनी अशा पद्धतीने शैक्षणिक क्रांतिकार्य केले असेल, शिक्षणसंस्था उभ्या केल्या असतील, तर लेखक महाशयला विनंती आहे की त्यांनी त्या कामाचा सविस्तर आढावा व रुपरेखा वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावी.

दलवाई शिवाय प्रबोधन चळवळीमध्ये महाराष्ट्रात दुसरा कोणीच जन्मला नाही, अशी मांडणी करणारे श्रीयुत खैरनार एकटेच नसून बरेच जण आहेत. ही मंडळी बिनदिक्कपणे अशी मांडणी आजही करतात. बहुधा त्यांचा कल हा दलवाईंना उभे करणे किंवा अन्य प्रबोधन परंपरांना बेदखल करणे असा असतो.

अर्थातच दलवाईंनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पण त्यांच्याव्यतिरिक्त कोणी नाही, ही महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरेची प्रतारणा करण्यासारखे आहे. अलीकडच्या काही घटनांवरून असंही लक्षात आलं आहे की, ही मंडळी इतर मराठी मुस्लिम महामानवाबद्दल एकतर अनभिज्ञ असतात किंवा माहिती नसल्याचा नाटकीय आव आणतात. त्यामुळे ते बिनधास्त कोणाही नाही असे ठोकून देतात. कोणीही नाही, असं म्हणत असताना ते आपलं अज्ञान जगासमोर उघडे करून ठेवतात.

स्मरण असावं की, महाराष्ट्रीत प्रबोधन परंपरेत उल्लेखित केलेली उपरोक्त मंडळी वृत्तपत्राच्या चर्चेत, प्रबोधन प्रवाहाच्या मुख्य केंद्रीत, तसेच सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून नित्य चर्चेत असणारी होती. त्यामुळे ह्या मंडळीबद्दल माहीत नसणे, हे हास्यास्पद आहे. तसंच आपल्याच सामाजिक कार्याची थट्टा करण्यासारखे आहे.

अलीकडे फातिमा शेख यांचा माहितीवर आधारित स्मरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्या व्यक्तींचे कुठलेही व्यक्तिमत्व उभे राहत नाही किंवा त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही अशा अज्ञात व्यक्तीबद्दल भरभरून लिहिलं-बोललं जातं. परंतु त्याच वेळी अस्तित्व असलेल्या मुस्लिम व्यक्तींबद्दल, विचारवंतांबद्दल, लेखकाबद्दल हेतुपुरस्सर विस्मरण केलं जातं. 

क्रांतिकार्य करणाऱ्या मराठी मुस्लिम व्यक्तींना विसरून ‘….यांच्याशिवाय कोणीही नव्हते असा प्रचार करणे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे व बहुसंख्य समाजाची दिशाभूल करणारे आहे. तसंच असं करणं म्हणजे मराठी मुस्लिम समाजाची प्रतिमा मलीन करणारे, हा समाज धर्मनिष्ठ, मागास, हेकेखोर व परिवर्तनाला विरोध करणारा आहे, असं जनमानसावर ठसविण्यासारखं आहे.  

गेल्या अनेक दशकांपासून सनातनी, ब्राह्मण्यवादी, हिंदुवादी मंडळीकडून मुस्लिमद्वेशाचे बीजारोपण करण्यासाठी असा प्रचार सातत्याने राबवला जातो. त्यात अपवाद वगळता प्रगातिक चळवळीचा हातभार लागताना दिसत आहे.

(सदरील टिपण साथी सुरेश खैरनार यांना १४ ऑक्टोबर २०२० रोजी पाठवलेल्या पत्राचा मसुदा आहे. त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने वर्षभरानंतर आम्ही तो नजरियाच्या वाचकांसाठी खुला करीत आहोत.)

 कलीम अजीम, अंबाजोगाई

मेल- kalimazim2@gmail.com


वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: शिक्षण क्षेत्रात क्रांतिकार्य करणारे मराठी मुस्लिम
शिक्षण क्षेत्रात क्रांतिकार्य करणारे मराठी मुस्लिम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgS9M6pLQG2yl6_MAnmh_fpszi13Wee8qkPjUxTwaqC5pS2L6p57PiCmY9WjGQKkEzJ2PfBKzACxI6ZimjS53dXW4C5AqaqhBrcvEJizxxMhCK48Ci-9pfrCXFYeZJcMDN087r2pIOhFG_sF8baYN4np_XZglPvs6vp4wXOJeWq21ztmzsWdQD4efsVmg/w640-h396/Muslim%20Educanist.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgS9M6pLQG2yl6_MAnmh_fpszi13Wee8qkPjUxTwaqC5pS2L6p57PiCmY9WjGQKkEzJ2PfBKzACxI6ZimjS53dXW4C5AqaqhBrcvEJizxxMhCK48Ci-9pfrCXFYeZJcMDN087r2pIOhFG_sF8baYN4np_XZglPvs6vp4wXOJeWq21ztmzsWdQD4efsVmg/s72-w640-c-h396/Muslim%20Educanist.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2021/10/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2021/10/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content