ऑगस्ट, १४ हा शुक्रवारचा दिवस! साप्ताहिक जुमा प्रवचनात मस्जिदीत भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि आधुनिक भारत निर्माणमधील मुस्लिम समुदायाचं योगदान या विषयावर मंथन झालं. प्रवचनासाठी राखीव असलेल्या पूर्णवेळात निव्वळ राजकीय विषयावर उपदेशपर भाष्य ऐकण्याची ही पहिलीच वेळ होती.
दुपारी मस्जिदमध्ये दाखल होण्यास थोडासा उशीरच झाला. कारण आज बाहेरचा भोंगा बंद होता. त्यामुळे कॉम्युटरवर काम करताना वेळेचं भान राहिलं नाही. भोंग्याचे शब्द कानावर पडले म्हणजे वेळ कळतो. पण आज माहीत नाही का बाहेरचा कर्णा बंद होता. सव्वा एकच्या सुमारास मस्जिदमध्ये दाखल झालो, त्यावेळी १८५७च्या लढ्याविषयी मीमांसा सुरू होती.
विवेचनात मौलवी साहेब ब्रिटिशविरोधी पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामातील मुस्लिम, हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रयोग, उर्दू वृत्तपत्रं, ईस्ट इंडिया कंपनीची फुटपाडी भूमिका, विश्वासघातकी-स्वार्थी चापलूस, फासावर लटकवलेले उलेमा इत्यादी विषय ओघानेच आले.
मुख्य नमाज़पूर्वीची औपचारिक नमाज आटोपून गर्भगृहात दाखल झालो, त्यावेळी पाच मिनिटं सरली होती. तोपर्यंत मौलवीसाहेब माल्टा येथील तुरुंगवासापर्यंत आले होते. उशीर झाल्याने तिसऱ्या रांगेत जागा भेटली. इतरवेळी पहिल्या रांगेत बस्तान असतं. थोडं लवकर गेलं की गर्भगृहाजवळ हमखास जागा मिळते.
आता मौलवी ‘रेशमी पत्रा’च्या (रेशमी रुमाल तहरीक) कटाविषयी उद्बोधन करत होते. इंग्रज सरकार उलथवून टाकण्याचे क्रांतिकारकांचे प्रयत्न कसे फसले, याविषयी त्यांनी थोडक्यात माहिती दिली. त्याची कारणमीमांसा करताना म्हटलं, काही गद्दारांमुळे आपला देश पुढची ५० वर्षे पारतंत्र्यात राहिला. त्याहीवेळी स्वार्थी-संधीसाधू गद्दारांपासून देशाला धोका होता, आजही आहे. मौलवी महमदूल हसन, मौलवी उबेदुल्लाह सिंधी, राजा महेंद्रप्रसाद, बरकतुल्लाह व इतर उलेमांच्या त्यागाविषयी सूत्रबद्ध माहिती देत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
पुढे मौलवी साहेब म्हणाले, सहारणपूर येथील ‘दार उल उलूम’ (देवबंद) स्वातंत्र्य चळवळीसाठी नायक घडवण्यासाठी उभारलेलं पीठ होतं. स्वातंत्र्य चळवळीत देवबंदच्या उलेमांचं समर्पण, त्याग, बलिदान व प्राणांची आहुती विसरणं कादपि शक्य नाही. स्वातंत्र्याने भारलेल्या राष्ट्रीय विचारांतून या पीठाची स्थापना मौलाना रशीर अहमद गंगोही व मौलाना याकूब नानोतवी यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय शिक्षणाचं हे धर्मपीठ उभं राहिलं, असं ते म्हणाले.
वास्तविक, मॅकालेच्या शिक्षणाच्या इंग्रजीकरणातून अस्वस्थ होऊन १८६६ साली या धर्मपीठाची उभारणी झाली होती. १८५७च्या लढ्यात भारतातील अल्पसंख्य व बहुसंख्याकांच्या धर्मं-परंपरावर अतिक्रमण व हल्ले झाल्याने दोन्ही धर्मातील अनेक धर्मावलंबी या लढ्यात उतरले होते. त्यांना ख्रिस्ती मिशनऱ्यांचं धर्मांतर व धर्मश्रेष्ठत्वाचा अतिरेक अमान्य होता. परिणामी स्वधर्माची शिकवण अधिक वृद्धिगंत करण्याचा विचार घेऊन देवबंद सारख्या पीठाची उभारणी झालेली होती. धर्मावरील कथित संकट व इंग्रजी भाषेचं अतिक्रमण परतावून लावणं असाही उद्देश यामागे होता.
मौलवी म्हणाले, देवबंद पीठातून स्वातंत्र्याची मोठी चळवळ राबवली गेली. त्यामुळे पीठातील अनेक मौलवींना ब्रिटिशांच्या रोषाला बळी पडावं लागलं. ब्रिटिशांनी अनेक मौलवींना लक्ष्य केलं. अनेकांना तुरुंगात टाकलं. १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात अशाच विचारांच्या अनेक मौलवींना ब्रिटिशविरोधी ठरवत फासावर चढवलं होतं. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात देवबंदचं कार्य विसरता येणार नाही असं स्मरणही त्यांनी करून दिलं. तसंच ‘जमियत उलेमा ए हिंद’ संघटनेचं कार्य व त्यांच्या पुढाऱ्यांच्या कुरबानीला कसं विसरता येईल? असाही प्रश्न त्यांनी केला.
१८५७ पासून स्वातंत्र्य चळवळीत अनेक मुस्लिम उलेमा धारातीर्थी पडले. मुसलमानांच्या या त्याग व बलिदानाची गाथा विसरया येईल का, असंही ते म्हणाले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुसलमानांचं योगदान केवळ पुस्तकी नाही तर ते कृतिशील आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी तो काळ डोळ्यासमोर आणून त्या इतिहासाचं स्मरण करावं लागतं.
देशातील मुसलमानांनी या इतिहासाची पारायणं करावीत. ‘जंग ए आज़ादी’तील मुसलमानांच्या योगदानाला वजा केलं तर स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासच अपूर्ण राहील. मुसलमानांच्या सहभागाची दखल घेतल्याशिवाय इतिहासच पूर्ण होणार नाही, असंही प्रतिपादन त्यांनी केलं.
मुसलमानांशिवाय स्वातंत्र्यलढा पूर्ण होऊच शकला नसता, असंही धाडसी विधान पुढे मौलवी करतात. म्हणतात,
मुसलमानांनी या देशाला आपली मातृभूमी मानली. त्यामुळेच त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता भारत भूमीच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. मुसलमानांच्या दोन पिढ्या स्वातंत्र्यलढ्यात गेल्या. आज त्यांच्या वारसांना दुर्लक्षित करण्याची व उपरे ठरविण्याचं पाप राजकीय पक्ष करत आहेत. पण या कृतीमुळे देशासाठी मुसलमानांनी केलेले त्याग, बलिदान पुसू शकत नाही.
स्वतः मुसलमानांनी आपल्या बुजुर्गांनी या देशासाठी काय-काय केलं, याची आठवण जागृत ठेवावी, त्यांच्या योगदानाचं सतत स्मरण ठेवावं. हा इतिहास समजून घ्यावा व त्यावर अभिमान बाळगावा. येणाऱ्या पिढ्यांसाठी हा इतिहास सजीव ठेवावा. त्यांना या इतिहासाची सतत जाण करून देत राहावी. तशी पुस्तकं, ग्रंथ घरात ठेवावी. त्याला वाचावी व नव्या पिढीला वाचायला द्यावी. त्या पिढीने पुढच्या पिढीकडे हा इतिहास हस्तांतरित करावा.
“मादरे वतन की आजादी और हिफाजत के लिए लाखो अपनों ने अपना खून बहाया है”, त्यांना असंच विस्मृतीत ढकललं जाऊ शकत नाही. त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगावी. स्वातंत्र्य चळवळीत सामील असलेल्या हरएक पुढारी व क्रांतिकारकाची आठवण ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, म्हणत त्यांनी मुसलमानांचा इतिहास पुसून टाकण्याची कृती व पक्षपाती इतिहास लिहिण्याच्या धर्मवादी प्रवृत्तीवर आक्षेप नोंदवला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आधुनिक भारताच्या जडणघडणीतील मुसलमानांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना मौलवी म्हणतात, स्वातंत्र्य चळवळीनंतरही ‘भारत को खड़ा करने में’ कई मुसलमान शामील थे. भारताच्या उभारणीत अनेक दिग्गज व नामवंत मुस्लिमांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मौलवी अबुल कलाम आज़ाद यांनी शिक्षणमंत्री या नात्याने भारताचे शिक्षण धोरण ठरवलं. आयआयटी, साहित्य अकादमी, नाट्य कला अकादमी, संगीत कला अकादमीसारख्या संस्था उभ्या करून भारताच्या सांस्कृतिक वारशाला ऐतिहासिक कलाटणी दिली. आयआयटी सुरू करून आधुनिक शिक्षण धोरणाची पायाभरणी केली. शिक्षणाला ब्रिटिशांच्या प्रभावातून मुक्त केलं.
मौलवी पुढे म्हणतात, जामिया इस्लामिया स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी संस्था होती. येथील प्रत्येक प्राध्यापक व विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य चळवळीनंतर भारत उभारणीसाठी आपली सर्व ऊर्जा लावली. देशात असंख्य मुस्लिमांनी कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रगतीत अतुलनीय योगदान दिलेलं आहे.
राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेवर भाष्य करताना मौलवींनी स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यत्रयीचं महात्म्य पटवून दिलं. म्हणतात,
राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये देखील मुसलमानांचा सक्रिय सहभाग होता. मौलाना हसरत मोहानी यांनी आग्रहाने काही कलमे राज्यघटनेत नोंदवली. घटनेत स्वातंत्र्य, समता व धर्म स्वातंत्र्य इत्यादी मुल्यांची रुजवणूक करण्याचं काम भारतातील थोर नेत्यांनी केले. त्यांच्या सोबतीला अनेक मुस्लिम होते.
धर्मस्वातंत्र्य हा भारतीय राज्यघटनेने दिलेला महत्त्वाचा व मूलभूत अधिकार आहे. आज काही सत्तापिपासू या अधिकारावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘वंदे मातरम’सारखं अँटी सोशल आक्रमण ते समस्त भारतीयांवर लादू पाहतात. त्यांचा हा प्रयत्न धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कदापी यशस्वी होणार नाही. कारण त्यांची ही सक्ती राज्यघटनेच्या मूळ तत्त्वाच्या विरोधात आहे.
सत्ताधारी सत्तेचा नशेमध्ये आहेत. त्यांनी लक्षात ठेवावं धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारावर टाच आणली तर तुमचं राजकीय अस्तित्व नष्ट होईल.
पुढे मौलवींनी वर्तमान राजकीय व्यवस्थेवरही भाष्य केलं. सत्तेने तुमचा छळ चालवला आहे. पक्षपाती भूमिका घेऊन तुम्हाला एकटं पाडण्याच्या मोहिमा सुरू आहेत. पण ‘नैराश्य अधर्म आहे.’ (मायुसी कुफ्र हैं) त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पराभव पत्करू नका. तुमचे धाडस, प्रयत्न व तगून राहण्याची जिद्द वर्तमान राजकीय संकटातून मार्ग काढू शकते. सत्ताधाऱ्यांच्या द्वेषी मोहिमेला लढण्यापूर्वी शरण न जाण्याचं आवाहन त्यांनी केलं.
पुढे मौलवींनी थोर विद्वान मरहूम वली रहमानी यांची आठवण काढली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात वली रहमानी यांनी म्हटलं होतं, "मुसलमानों यह तुम्हारा भी मुल्क है. मौजूदा सियासी करतुतों से मायूस होने की जरूरत नहीं. मायुसी कुफ्र है. उठो खड़े लहो जाओ. लढो."
या मतांची मीमांसा करताना वर्तमान राजकीय व सांस्कृतिक अतिक्रमणाला मुसलमानांनी बळी पडू नये. संपूर्ण ताकदीने त्याचा मुकाबला करावा, असं मौलवी म्हणतात.
मतदार यादीतून मुसलमानांची नावं वगळणाऱ्या कृतीवरही मौलवींनी आक्रमकपणे बोट ठेवलं. स्वातंत्र्य चळवळीत काडीचा सहभाग नसलेल्या शक्ती आज देशाला देशभक्ती शिकवत आहेत, ही घोर विडंबना आहे.
राष्ट्रभक्तीला पुढे करून येथील गरीब, निराश्रित, मागास समुदायातील लोकांना संदेहास्पद नागरिकांच्या यादीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. ही मंडळी गरीब, मागास, निराश्रितांचे शत्रू आहेत. त्यांना कोणाशीही कर्तव्य नाही. फक्त त्यांना आपला राजकीय स्वार्थ हवा आहे. मुसलमानांनी तर यापूर्वी मोठी संकटे झेलली आहेत, त्यांच्यासमोर वर्तमान संकटं किरकोळ आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे याचना करण्यापेक्षा ईश्वराकडे एकांतात याचना करा. कसून दुआ करा. त्याला मागा, पण हताश होऊन सत्ताधाऱ्यापुढे हात पसरू नका.
वर्तमान राजकारणात द्वेषवादी मोहिमा सातत्याने राबवल्या जात आहेत. अशावेळी सत्कर्माने बहुसंख्यांक समाजाची मन जिंकण्याची वेळ आहे, असंही मौलवी म्हणाले.
समारोप करताना त्यांनी समस्त मुस्लिमांना महत्त्वाची सूचना केली. म्हटलं, कुठल्याही परिस्थितीत शत्रू पक्षाला शरणागती पत्करू नये. हताशता किंवा नैराश्य अधर्म आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका. तेवढ्याच जोमाने लढा, संघर्ष करा.
स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकाराची, थोर महामानवांची आठवण नित्य ठेवा, त्यातून प्रेरणा मिळेलच, पण राष्ट्रीय कर्तव्याविषयी देखील बांधिलकी तयार होईल.
आज राज्यघटना संकटात असल्याची चर्चा आहे. राज्यघटनेच्या संरक्षणासाठी प्रत्येक मोमीन बांधवांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. कारण ती तयार करण्यासाठी व देशाला जम्हुरी मुल्क करण्यासाठी आपल्या बुजुर्गांनी खून, पसीना, वक्त, जान, माल लावलेला आहे. त्यांचे कष्ट व त्यागावर पाणी टाकू नका. राज्यघटनेवर येणारे संकट रोखून धरण्याची जबाबदारी मुसलमानांचीही आहे.
१५ ऑगस्ट या एका दिवसापूर्वी क्रांतिकारकाची आठवण ठेवणं बरोबर नाही तर सतत आपल्या थोर महापुरुषांविषयी आदर बाळगत त्यांच्या कार्याच्या स्मृती मनात ताज्या ठेवाव्या.
शेवटी, इस्लाममधील एक-दोन महत्त्वाच्या तत्त्वांची मीमांसा करत कोणत्याही परिस्थितीत शरणागती किंवा हतबलता येता कामा नये, याविषयी भाष्य करत मौलवींनी प्रवचनाचा समारोप केला.
*
आज १४ ऑगस्टदिनी राज्यातील अनेक मस्जिदीमध्ये जुमा प्रवचनात स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती देण्यात आल्याचं कळतं. हे टिपण लिहिताना लक्षात आलं की जुमा प्रवचनात १५ ऑगस्टविषयी सांगावं, असा एक मेसेज व्हाट्सअप ग्रुपला निदर्शनास आला होता.
मस्जिद : मोमीन मस्जिद
ठिकाण : इस्लामपुरा, भिवंडी
दिनांक : १४ ऑगस्ट २०२६
कलीम अज़ीम, पुणे
मेल : kalimazim2@gmail.com
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
“जर्द पत्तो का बंद जो मेरा देश हैं, दर्द की अंजूमन जो मेरा देश हैं” गीतकार गुलजार यांच्या या ओळी ‘अब्दुल वाहिद शेख’ यांच्या आयुष्याला कलाट...
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com