अलविदा, कर्पूरीजी!

२४ जानेवारी १९२४ ते १७ फेब्रुवारी १९८८ असे ६४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कर्पूरी ठाकूर यांनी १९४२च्या 'चले जाव' चळवळीत सहभागी होऊन तुरुंगवास भोगला होता. त्यानंतर चार दशके ते समाजवादी पक्षाचे नेते म्हणून कार्यरत राहिले. १९५२ मध्ये ते बिहार विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले, त्यानंतर शिक्षणमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष गेल्या आठवड्यात संपले आणि त्यांचा ३५वा स्मृतिदिन पुढील आठवड्यात येत आहे. शिवाय नुकताच त्यांना भारतरत्न सन्मान (मरणोत्तर) जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांचे परममित्र समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी १९८८ मध्ये, हिंदीत लिहिलेले हे अनावृत पत्र अनुवाद करून इथे प्रसिद्ध करीत आहोत.

त्या रात्री आम्ही तमाम विरोधी पक्षांचा एक कृतिशील व विश्वसनीय पर्याय तयार करण्यासाठी रणनिती म्हणून गैर-इंदिरा काँग्रेस मोर्चासोबत भाजपला जोडण्याविषयी मार्क्सवाद्यांच्या विवेकशून्य वर्तनाबद्दल विश्वनाथ प्रताप सिंह यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यात आपण चार शक्यतांना क्रमवारपणे पुर्ननिर्देशित केलं होतं. या शक्यतांची चर्चा तुम्ही ३० जानेवारी रोजी वीपी सिंह यांच्या घरी रात्रीचं जेवण घेताना माझ्याशी केली होती. त्यावेळी जनमोर्चाच्या नेत्याव्यतिरिक्त मधु लिमये, इंद्र कुमार गुजराल, भाजपचे जसवंत सिंह उपस्थित होते.


तुमच्या शब्दात सर्वोत्तम रणनिती म्हणजे, डॉ. राममनोहर लोहियांच्या बिगर-काँग्रसवादाकडे परत फिरावं लागणार होतं. म्हणजे जागांचा ताळमेळ आणि बिगर-काँग्रेसी सरकार स्थापन करण्यासाठी एक मजबूत आणि नियोजित कार्यक्रमांवर सर्व विरोधी पक्षांची संमती! त्यानंतर दूसरा पर्याय होता की, सहमती झालेल्या गटांची एकजूट आणि इतर घटकांसोबत प्रासंगिक सुसंवाद. तुमच्या दृष्टीने अजून एक तिसरा पर्याय होता, तो म्हणजे भाजपसहित अन्य पक्षांचा संयुक्त मोर्चा!

त्या रात्री तुम्ही आम्हा सर्वांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. आमच्या पाहुणचाराने तुम्ही उल्हासित झाला होता. त्या लहानशा टेबलावर पाच लोक होती. ज्यात जनमोर्चाचे विश्वनाथ प्रताप सिंह, मुफ्ती मुहंमद सईद, शंकर दयाल सिंह, वैद्यनाथ पांडे आणि मी. आपण बसण्यास नकार दिला. वास्तविक, तुम्ही तर वेटरचं काम करीत होता. फिरून फिरून जेवण वाढणं, ग्लासमध्ये पाणी भरून देणं, पाहुण्यांच्या इतर गरजांवर लक्ष ठेवणं, ताटात अधिक अन्न घेण्याचा आग्रह करणं, हास्यविनोद, पाक कलेची चर्चा करणं; या शिवाय अनुभूती देणं की ते सर्वजण आपल्याच घरात आहेत.

ज्या साधेपणाने आणि सहजतेने तुम्ही हे सर्व करीत होता, ते फक्त तुम्हीच करू शकता. कारण तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा, तुमच्या जीवन-व्यवहाराचा एक भाग होता. जेवणं आटोपल्यावर ९ वाजता जनमोर्चाच्या नेत्यांचा निरोप घेऊन आम्ही जेवणाच्या टेबलावर परतलो. तुम्ही लोकदलच्या चार सहकाऱ्यांसोबत जेवायला बसला होता. जेवता-जेवता थोड्या वेळापूर्वी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणाचं आम्ही मूल्यमापन करू लागलो. जेवताना सतत फोन वाजत होता. तुमच्या समोर बसलेले इंद्र कुमार हातात फोन धरून होते व तुम्ही त्यावर बोलत होता, हे पाहून मला हसू फुटत होतं.

लोकदलचे तरुण आमदार नितीश यांचा एक फोन एका गंभीर समस्येबाबत होता. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाची गरज होती. मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असं नीतीशला तुम्ही आश्वासन दिलं. लगेच मुख्यमंत्र्यांच्या घरातून दुसरा फोन आला आणि आपण मुख्यमंत्र्यांकडे पोहोचण्याची सूचना केली. इंद्र कुमारने फोन ठेवताच रिंग वाजली, तो नितीश कुमार यांचा फोन होता. तुम्ही नितीशला वीस मिनिटात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचण्याची सूचना केली. जेवत असतानाही तुमचं फोनवर बोलणं स्वाभाविक होतं, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जनसेवेसाठी समर्पित केलेला होता, विशेषत: अशा घटकांसाठी ज्यांना त्याची सर्वाधिक गरज होती.

जेवणाच्या टेबलावर मी काहीतरी पाहिलं, जे हास्यास्पद नव्हतं. पण तो क्षण पाहून नेहमीप्रमाणे माझा तुमच्याप्रती आदर द्विगुणीत झाला. अर्थात त्या रात्री घरात पुरेसं अन्न शिल्लक राहिलं नव्हतं. स्वयंपाक खूप चविष्ट झाला होता, त्यामुळे आधी जेवलेल्या लोकांनी जरा जास्तच खाल्लं असेल, त्यामुळे तुमचा अंदाज चुकला. मला आठवतं तुम्ही लोक, त्या रात्री सर्वांचं आटोपल्यानंतर जेवायला बसले होते. पण घरात अन्न उरलं नाही. ही घटना त्या व्यक्तीसाठी असामान्य नव्हती, विशेषत: ज्याने आयुष्यभर आपली सर्व संपत्ती लोकांना मदत करण्यासाठी खर्च केली. अशा प्रकारे आम्ही रात्री दहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या घरी निघालो.

मुख्यमंत्री बिंदेश्वरी दुबे यांना मी एक घृणास्पद, गुन्हेगार आणि संप तोडक मानत आलो आहे. बूथ लुटणे म्हणजेच मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून जनतेला वंचित ठेवण्यास ही व्यक्ती आपला जन्मसिद्ध हक्क मानते. अशा माणसाच्या घराजवळ जाण्याच्या कल्पनेनेही मला किळस येई. पण दुसरा पर्याय नव्हता, कारण तुम्हाला विरोधी पक्षनेतेपदापासून वंचित ठेवण्यात आलं होतं, तुमच्याकडून सरकारी वाहन काढून घेतलं होतं, तुमच्याकडे स्वतःची गाडी नव्हती. त्यामुळे लोकदलच्या आमदार सुधा श्रीवास्तव यांच्या कारने तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागणार होतं. ती गाडी तुम्हाला तिथं सोडून पुढे सुभाष तनेजा यांच्या घरी मला सोडणार होती.

मला तुमच्याशी पुढील कार्यक्रमाविषयी चर्चा करायची होती, ज्याची सुरुवात तुम्ही १२ नोव्हेंबरला गांधी मैदानावर रॅली काढून केली होती. तिथंच आपण २८ डिसेंबरला बिहार बंदची हाक दिली होती. भाकप, माकप, जनता पक्ष, लोकदल (अ) यासह काही पक्ष आणि गटांनी २८ सप्टेंबरच्या असहकार आंदोलनाला विरोध केला होता. एवढंच नव्हे तर उघडपणे बंदला विरोध दर्शवला होता. परंतु बंद यशस्वी झाल्याने तुम्ही उल्हासित झाला होता.

बंदच्या यशामुळे आनंदित होऊनच आम्ही सतत वाढणारी महागाई, बेरोजगारी, उच्च पदांमध्ये फोफावलेला भ्रष्टाचार, जनता, विशेषत: सामाजिक अर्थाने मागास वर्गीयांवर वाढणारी शासकीय हिंसा, पूर आणि दुष्काळग्रस्त लोकांना मदत देण्यास सरकारचं अपयश इत्यादी... त्याचप्रमाणे गरीबी व दारिद्य्राने होरपळलेली बिहारची जनता, त्यांच्या नशीबी स्वातंत्र्याच्या ४० वर्षानंतरही शोषणचं होतं, त्यांना या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी एक पर्यायी योजना तयार करण्याची कल्पना होती. त्यासाठी २५ फेब्रुवारीला पाटणा शहरात बंद समर्थक सर्व गट, ट्रेड यूनियन तथा घटकांनी एक अधिवेशन भरवण्याचा निर्णय घेतला होता. तुमच्या घरापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहचण्याच्या दरम्यानच्या काळात आम्ही या विषयावर चर्चा केली होती.

दुसऱ्या दिवशी पहाटे मला मुजफ्फरपूरसाठी निघायचं होतं. आपणही त्यादिवशी मुजफ्फरपूर जिल्हा दौऱ्यावर जाणार होता. परंतु आम्हाला माहीत होतं की, आम्हाला वेगवगेळ्या दिशेने जायचं आहे आणि मग तिथं पुन्हा भेटण्याची शक्यता नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांचा निरोप घेतला होता. पण आम्ही ठरवलं होतं की, ८ फेब्रुवारीला लखनौला भेटणार आहोत. परंतु नियतीने तसं लिहिलं नव्हतं. ती आमची शेवटची भेट ठरली. लखनौला मी ९ फेब्रुवारीला पोहोचलो आणि तुम्ही ९ तारखेच्या रात्रीच लखनौहून निघून गेला होता.

बेंगलोरला माझ्या घरी मला तुमच्या निधनाची बातमी समजली. १६ फेब्रुवारीला मी कालिकतला ‘लोहिया विचार वेदी’ शिबिरात होतो. त्या शिबिरात जवळपास २०० कर्तबार तरुण भाग घेणार होते. त्या लोकांनी ‘समाजवादी सिद्धान्त आणि व्यवहार’ या विषयावर चार दिवस चर्चा केली होती. तुम्ही त्या शिबिरात सहभागी होऊन आनंदित झाला असता. मी रात्रभर गाडीने प्रवास करून सकाळीच बेंगलोरला दाखल झालो होतो.

सकाळी साडेदहा वाजता घरातून बाहेर पडणार तेवढ्यात दिल्लीहून फोन आला. तो फोन श्रीनिवासचा होता. त्याने मला सांगितलं की, काही वेळापूर्वी पाटण्याहून सुभाष तनेजा यांनी बातमी दिली की, तुम्ही निरोप घेतला. मला अजिबात विश्वास बसला नाही. मला वाटलं की जणू मी सुप्त मानसिक अवस्थेत तर नाही? खरंच दिल्लीहून श्रीनिवासचाच तो फोन आहे? जणू कोणी मला गंडवत तर नाही? माझ्या मुखातून अनायासपणे एक शब्द बाहेर पडला, ‘नाही.’

मी टेलिफोन करणाऱ्याला म्हणालो की जे काही त्याने म्हटलं, ते परत एकदा सांगावं. त्याने आज्ञाधारकपणे पुनरुच्चार केला. आवाज श्रीनिवासचाच होता. मी त्याला विचारलं की, पाटण्याहून फोन करणारा व्यक्ती खरंच सुभाष तनेजाच होता का? श्रीनिवासने सांगितलं की निश्चितपणे तो फोन सुभाष तनेजा यांनीच केला होता. मग मी विचारलं की सुभाष तनेजाने घटनेचं विस्तृत माहिती दिली का. तेव्हा श्रीनिवासने सांगितलं की सुभाषने म्हटल्याप्रमाणे, तुम्हाला ८ वाजता हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ हॉस्पिटलला नेण्यात आलं आणि ९ वाजून ३० मिनिटांनी तुम्हाला मृत घोषित केलं गेलं. फोनवर बोलताना माझे दोन भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्य माझ्या चेहऱ्यावर उठणारे भाव टक लावून पाहत होते. माझ्या चेहऱ्याने त्यांना समजलं की, काहीतरी आकस्मिक घटना घडली आहे. मी फोन ठेवतच त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, कर्पूरीजी आता या जगात नाहीत, तशी घरात शोककळा पसरली.

तेच घर जिथं तुम्ही एकदा जेवण केलं होतं. त्यावेळी नेहमीप्रमाणे माझ्या आईने खूप मन लावून आणि प्रेमाने तो स्वयंपाक केला होतं. मासे शिजवले होते, काही कोरडी तर काही रसदार अशा अनेक प्रकारच्या भाज्या तयार केल्या होत्या. तुम्ही खूप चवीने सर्वकाही खाल्लं होतं. जेवताना तुमच्यापेक्षा वयाने १९ वर्षे मोठे माझे वडील तुमच्याशी हिंदीत बोलत होते. हिंदी वर्चस्वाचा मुद्दा काढून तुम्हाला डिवचत होते. उत्तर भारतातील माझ्या सर्व मित्रांना ते असेच डिवचत. तुम्ही ज्या टेबलावर खात होता, त्याच टेबलावर बसून एकदा चौधरी चरणसिंह जेवत होते, त्यांनी त्यावेळी चैधरी चरणसिंहना असंच डिवचलं होतं. ते चौधरी साहेबांपेक्षा एका वर्षांनी मोठे होते. त्यामुळे त्यांना वाटत होतं की, चौधरी साहेबांना सल्ला देण्याचा हक्क त्यांना आहे.

त्या दिवशी बेंगलोरमध्ये या घटना तथा वडिलांशी जोडलेल्या तुमच्या, चौधरी साहेबांच्या सर्व घटनांचे प्रसंग मन-मेंदूवर उमटू लागली. आता तुम्ही तिघंही या जगात नाहीत. सर्वांत आधी जून १९८२ला वडिल निघून गेले. त्याच्या मृत्युने माझ्या मनात निघून जाणाऱ्यांच्या रांगेत सर्वांत पुढे राहण्याचा एक विचित्र भाव भरून टाकला. माझे मित्र व स्नेहींना मी सांगून ठेवलं होतं की, आता घेऊन जाण्यासाठी इथं जी स्वारी येईल, त्यावर चढण्याची पाळी माझी असेल.

गेल्या वर्षी २८ मे रोजी चौधरीसाहेब निघून गेले. तेव्हा मी पंतप्रधानांनी केलेल्या बोफोर्स, जर्मन पानबुड्या आणि फेयर फॉक्स घोटाळ्याच्या मागे यूरोपमध्ये धावत होतो. आता तुम्ही निघून गेला आहात. पुन्हा तोच भाव भरून आला आहे की जाणाऱ्यांच्या रांगेत सर्वांत पुढे मी उभा आहे. तुमच्या निधनाच्या बातमीनंतर जितका वेळ बेंगलोरमध्ये राहिलो, त्यानंतर पाटणा पोहचेपर्यंत रस्त्यात बेंगलोर-मद्रास आणि मद्रास-दिल्ली उड्डाणाचा पूर्ण वेळ माझ्या मन-मस्तिष्कावर समाजवादी चळवळीचे दीर्घ चित्र उमटत राहिलं. ते संघर्षाचे दिवस, अभियान, त्याच्या स्मृती.. आम्ही एकत्र नेतृत्व केलेल्या चळवळी, मिळून लढलो ते क्षण. आणीबाणी आणि भूमिगत जगण्याचं दृश्य, यश तथा पराभव जे आम्ही पाहिलं व सोसलं, ते सर्व आठवत राहिलं. राजकारणाला मिरची-मसाल्यासारखे रुचकर करणारे डावपेच, रहस्यमय चाली, सर्वकाही डोळ्यापुढे येत होतं.

खूप वर्षापूर्वी १९६९-७० मध्ये जेव्हा तुम्ही संयुक्त सोशलिस्ट पक्षाचे अध्यक्ष होता व मी महामंत्री, तेव्हा तुम्हाला म्हणालो होतो की, तुम्ही व्हेल माशासारखे आहात, कधी पकडीत सापडत नाहीत. एखाद्या बाबतीत मग ते नैतिक असो का संघटनेचे किंवा केवळ डावपेच असो त्यावेळी तुम्हाला तयार करणं किती कठिण होतं? जेव्हा-जेव्हा आम्ही पकडीत धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण व्हेल माशासारखा निसटून गेला. निसटण्याचे मार्ग तुम्हाला चांगले ज्ञात होते. अर्थातच ते मार्ग प्रसंग आणि मुद्द्यावर निर्भर होते. कधी जोर देऊन मुद्द्याला बळ देणं असो वा कधी चुकीचं काम करताना पकडल्या गेलेल्या एखाद्या निरागस मुलासारखं निरपराध मुद्रा करून निघून जाणं.

मला एक घटना आठवते, जेव्हा तुम्ही पकडीत आला होता. ही घटना सन १९६९ची आहे. बिहारचा मुख्यमंत्री कोण असावा, असा प्रश्न होता. रामानंद तिवारी, ज्यांना आम्ही तिवारीजी म्हणत असू, ते मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक होते. आम्हालाही वाटत होतं की, ते मुख्यमंत्री व्हावेत. अडचण केवळ इतकी होती की, सरकार स्थापन करण्यासाठी जनसंघाचं समर्थन घ्यावं लागणार होतं. तिवारीजींनी अचानक सार्वजनिकरीत्या जनसंघ विरोधी भूमिका स्वीकारण्याचा निश्चय केला. त्यांनी एक पत्रक काढलं आणि त्यात जनसंघावर गैर-राजकीय टीका केली. त्यांनी पाटणामध्ये फिरून फिरून पत्रकं वाटली. देशभरातील पक्षसाथींना पाठवलं. वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या, त्यातही जनसंघावर कठोर शब्दात टीका केली. त्यावेळी तुम्ही तुमच्या अनासक्त स्वभावाने त्यांना ते सर्व करण्यास मदत केली. किंबहुना तुम्हाला चांगलं माहीत होतं की, तिवारीजी नेमकं त्यालाच लाथाडत होते, जे त्यांना हवं होतं.

गुंता सोडविण्यासाठी आम्ही – मधु लिमये आणि मी – पाटण्याला गेलो होतो. तुम्ही वारंवार म्हणत राहिला की आपण मुख्यमंत्री होण्यास कदापी इच्छुक नाही. वास्तविक, तुमची इच्छा होती की तिवारीजींनी मुख्यमंत्री व्हावं. त्यावेळी झिडकारत मी तुम्हाला म्हटलं होतं, ‘कर्पूरीजी केवल यह कहना ही काफी नहीं है कि आप चाहते हैं कि तिवारीजी मुख्यमंत्री बनें। बल्कि ऐसा काम भी करें, जिससे उन्हें विश्वास हो कि आप उन्हें मुख्यमंत्री के रूप में देखना चाहते हैं।’ ही ती वेळ होती जेव्हा तुमच्यासारख्या कुशल हजरजबाबीलाही काही सूचत नव्हतं की, याचं उत्तर कसं द्यावं?

एकदा जेव्हा तिवारीजींनी सार्वजनिकरित्या घोषित करून टाकलं की, जनसंघासोबत ते कुठल्याही स्थितीत सरकार स्थापन करू शकत नाही. किंबहुना आम्हाला माहीत होतं की, जनसंघाला सोबत घेऊनच सरकार स्थापन केलं जाऊ शकतं. त्यावेळी तुम्ही तेच केलं ज्याची आम्हाला खात्री होती. तुम्ही जनसंघासोबत मिळून सरकार स्थापन केलं आणि तिवारीजींना आपल्या हट्टापासून परावृत्त करत पोलीस खात्याचा मंत्री केलं.

तुमचं आणि तिवारीजींचं नातं खूप विलक्षण होतं. तुमच्या आपसातील वादाच्या प्रसंगावर मला हसू येई. मला आठवतं की, तुम्हा दोघांमध्ये चालणारे टोकाचे असंख्य वाद, एकमेकांचा भांडाफोड करण्याची आव्हाने, धमक्या आणि पोलखोल करण्यासाठी कितीही उत्तेजित केलेलं असलं तरी तुम्ही दोघंही आपलं तोंड उघडणार नव्हते.

माझ्या मन-मस्तिष्कावर ते दृश्य उमटते जेव्हा तिवारीजी म्हणत, ‘बोलिए कर्पूरीजी, कीजिए भंडाफोड़.’ आणि तुम्ही म्हणत, ‘मैं नहीं करूँगा तिवारीजी!’ आणि तिवारीजी म्हणत, ‘मैं नहीं करूँगा कर्पूरीजी.’ या दृश्यावर आम्हाला हसू येत. तुम्हा दोघांच्या व्यक्तिमत्वात बरेच अंतर होते, परंतु समानताही तेवढ्याच होत्या. तुम्ही दोघेही महत्त्वकांक्षी होता. एवढेच नव्हे तर त्यातही द्वंद्व होता. दोघांमध्ये भांडणं होती, पण दोघेही निर्धन आणि दलितांशी संबंधित बांधिलकी जपणारे होते. देशाचं हे किती दुर्दैव आहे की, असे लोक आमच्यातून निघून जात आहेत, अदृश्य होत आहेत. पडद्याआड होण्याविषयी मी खूप निराश भावनेने बोलत आहे. कारण नव्या पिढीमध्ये एकमेकांबद्दल प्रामाणिकतेची भावना नाही. तसंच कुठला सिद्धान्त किंवा कृती कार्यक्रमाविषयी प्रतिस्पर्धा नाही. त्याचप्रमाणे जनतेविषयी कुठलीही आत्मियता त्यांच्यामध्ये जाणवत नाही. जनतेच्या कार्याविषयी प्रतिस्पर्धेची बाब तर फार निराळी आहे.

एक विचित्र विचार नेहमी माझ्या मनात येत राहिला आहे की, कसं वाटेल जर एखादी व्यक्ती आपल्या मृत्युनंतर लोकांचं वर्तन पाहू शकेल? १८ तारखेला सकाळी पाटणा पोहचेपासून ते पुढच्या रात्री परत येईपर्यंत हाच विचार माझ्या मनात तरंगत राहिला. लोकांनी दिलेला निरोप कदाचित तुम्हाला आनंद देत असेल.

तुमच्या निधनाची बातमी कळताच सरकारने बिहारमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहिर केला. त्याचप्रमाणे राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला. हॉस्पिटलमध्ये, तुमच्या घरात आणि घाटावर तुमच्या पार्थिवाजवळ काँग्रेसी नेत्यांनी आणि सरकारी मंत्र्यांनी विलाप केला. त्या दृष्ट विधानसभाध्यक्षाने (त्याच्याविषयी मी इतरत्र सर्वकाही सांगून टाकलं आहे, जे सांगणं जरजेचं होतं) तुम्हाला श्रद्धांजली वाहताना म्हटलं की, ज्या सभागृहाची तो अध्यक्षता करतो, आता त्याचे ग्लॅमर नाहीसं झालं आहे. ही व्यक्ती आपल्या नावासोबत प्राध्यापक लावते आणि अशा रीतीने ती स्वतला शिक्षित समजते. तिचं हे विधान?

तुम्ही ज्या तत्त्वांना आदर्श मानत होता, त्यासाठी तुम्ही आपलं आयुष्य खर्ची घातलं, अशा या तत्त्वांचा द्वेश व तिरस्कार करणाऱ्या त्या विभिन्न विरोधी पक्ष नेत्यांनीही तुम्हाला श्रद्धांजली वाहिली. वृत्तपत्रं तुमच्या श्रद्धांजलीने भरलेली होती. बहुतांश वर्तमानपत्रं आता ते सर्वकाही लिहित होती, जे त्यांना आधी सांगायला पाहिजे होतं. गरीबांविषयी तुमची बांधिलकी, बिहारच्या समस्यांच्या सामाधानासाठी तुमच्याद्वारे केलेले संघर्ष, तुमचा दृढसंकल्प आणि या सर्वापेक्षा उच्चस्थानी असलेली तुमची निष्ठा आणि धैर्य इत्यादी. म्हणजे त्यात काहीही नवीन नव्हतं. प्रसिद्धी माध्यमांना प्रत्येकवेळी माहीत होतं की, तुमची ती सर्व तत्त्वं योग्य आहेत.

तुम्ही हयात असताना जर त्यांनी हे सर्व सांगितलं (जे त्यांना सांगायला पाहिजे होतं) असतं तर एका सर्वोत्तम बिहारच्या घडणीत तुम्ही यशस्वी झाला असता. बिहारच्या जनतेला गौरवाची अनुभूती मिळेल असं चारित्र्य आणि प्रतीमा राज्याला प्रदान करण्यात तुम्हाला यश लाभलं असतं. त्याचप्रमाणे असहाय मनस्थितीत वावरणाऱ्या लोकांमध्ये आशेची एक ज्योत पेटली असती. हे सर्व जर आधी झालं असतं तर तुमच्याविरुद्ध कुटिल डाव आखणाऱ्या समाजातील त्या तमाम प्रवृत्तीविरोधात अधिक कृतिशीलपणे व निर्णायक पद्धतीने लढा देण्यास समर्थ झाला असता.

वृत्तपत्रांनी तुमच्या निधनानंतर विशेष आवृत्त्या काढल्या. आपल्या पानांची कॉलमं भरली. तमाम ट्रेड यूनियन, व्यापारी संघ, व्यक्ती, समूह, क्लब इत्यादींनी तुमच्या मृत्युविषयी दुख: प्रकट करीत होती, श्रद्धांजली वाहत होती. परंतु धरतीवर ज्यांना कमनशिबी समजलं जातं अशा गरीब, निर्धन लोकांनी वास्तविक अर्थाने तुमच्या मृत्युचा दुखवटा साजरा केला. तुम्ही त्यांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतीक होता. तुम्ही संकटकाळात त्यांची मदत केली होती. अडचणीच्या वेळी त्यांना बळ दिलं होतं. त्यांच्या वेदना, क्रोधाला आवाज दिला होता. नैराश्यमय काळात आशा पल्लवित केल्या होत्या. ते तुमच्या पार्थिवाजवळ दुखी अंतकरणाने विलाप करीत होते. त्यांनी तुम्हाला त्या घराबाहेर पाहिलं, जिथं पोहचून ते आपली व्यथा सांगू शकणार नव्हते. तुम्ही त्यांच्या बाजुने आणि या दुर्दैवी जगाच्या बाजुने नेहमीसाठी डोळे मिटली होती.

गल्ली, वस्तीमधून बाहेर पडणाऱ्या या लोकांच्या महापूरात एक विलक्षण आवाज गर्जत होता, कर्पूरी ठाकूर अमर रहे... त्यांचे कंठ दाटून आले होते. अश्रू वाहून-वाहून डोळे निस्तेज झाले होते. त्यात आता अश्रू तर कुठे उरले होते! आम्ही पाहू शकत होतो की तुमच्या पार्थिवाच्या जवळपास किंवा दूर अंतरावरही असं कोणीही नव्हतं जे त्यांचं सात्वंन करू शकत होतं. त्यांची व्यथा तर फक्त तुम्हीच समजू शकत होता. ते आपल्या नुकसानीवर विलाप करीत होते. त्यांना माहीत होतं की, ते आता कधीही भरून निघणार नाही. त्या प्रत्येक लोकाकंडे तुमच्या आठवणी आहेत. राजसत्ता त्यांना लुबाडत होती, तेव्हा तुम्ही त्यांच्या आपत्तीकाळात त्यांना मदत केली, उर्मी दिली. त्यांचा जगण्याचा हक्क मान्य करायला तयार नसणाऱ्या असंख्य घटकांनी त्यांचा आवाज दाबून टाकला होता. त्यावेळी तुम्ही त्यांचा आवाज झाला. त्यांच्या प्रियजनांना बंदुकीच्या गोळीने चाळणी करून मृत्युच्या दरीत लोटलं जात होतं, त्यावेळी तुम्ही त्यांच्यासाठी अश्रू ढाळला होता. त्यांना जगण्यासाठी आधार व धैर्य देत होता, जेणेकरून ते या आशेवर जगू शकतील की एक दिवस ते यशस्वी होतील. जी उमेद ही लोक तुमच्यामध्ये पाहत होती, ती आता त्यांच्यामध्ये उरली नव्हती. तुमच्या सपूर्ण अस्तित्वात जे धैर्य ते पाहत होते, आता त्यांच्याकडे शिल्लक नव्हतं.

तुम्ही निश्चल, निर्जीव पडून होता. त्यांना माहीत होतं की जवळपास तुमच्यासारखा कोणीही नाही. कोणी काय म्हणालं, काय नाही याला काहीच अर्थ नाही; वास्तविक दुसरा कर्पूरी ठाकूर होईल अशी कुठलीही आशा नाही. कमीत कमी त्या लोकांच्या आयुष्यात तर नाही, जे तुमच्या निघून जाण्याच्या दुखाने शोकग्रस्त होते. मला वाटतं की, निश्चितच माझ्यासारख्या लोकांच्या जीवनातही कदापी नाही.

गरीब, असाहाय्य व्यतिरिक्त अजून काही लोक होती जे वेगळ्याच चिंतेने ग्रासली होती. भले ती तुमच्या अधिक जवळ असली किंवा कितीतरी दुःख वियोगात होती; ते या हिशेबाची जुळवणी करत होते की, आता तुम्ही नाहीत तर त्यांचं काय होईल? बिहारच्या राजकारणाचं काय होईल? त्यांच्या करिअरचं काय होईल? कोणासोबत नवीन संबंध प्रस्थापित करावेत? कोणाशी आणि का नवीन प्रामाणिक निष्ठा जोडावी? असेही लोक होते जे निश्चितच डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देत होते, परंतु तुमच्या जाण्याने ते आनंदीत होते, भार हलका झाल्यासारखं त्यांना वाटत होतं. कुठेतरी आपल्या अंतर्मनात जोड-तोड करीत असावेत की, तुम्ही केलेल्या कार्यावर कशा पद्धतीने घाव घालावा, पाणी टाकावं. कारण नेहमी हेच त्यांचं उद्दिष्ट राहिलं होतं. आता त्यांच्या व त्यांच्या पापी उद्दिष्टांना रोखू शकेल असं तुमचं विशाल व्यक्तित्व शिल्लक नव्हतं. ज्या लोकांकरिता तुम्ही परिश्रम घेतले, त्यांच्यासाठी तुम्ही शक्तिस्तंभ होता. आता त्यांच्या व दृष्ट लोकांच्या दरम्यान रोधक म्हणून उभा राहील असं कोणीही नव्हतं.

गंगा घाटावरील बांस काठावर तुमचं पार्थिव भस्म होणार होतं. तुमच्या घरापासून ते तिथंपर्यंत तुम्हाला अखेरचा निरोप देण्यासाठी विराट जनसमूह आणि स्त्री-पुरुषांचे जत्थेच्या जत्थे आले होते. जुनी-फाटकी कपडे घातलेली ही लोक अनवाणी पायाने व अश्रूपूर्ण डोळ्यांनी तुम्हाला शेवटचा निरोप देत होती. ही लोक त्या व्यक्तीसाठी शेवटचं चालत होते, जो त्यांच्यासोबत चालला होता.

तुम्हाला ट्रकवर नेलं जात होतं. त्यावर झेंडुची फुले व हारांचा ढिगारा होता. वारंवार रिकामा केला तरी हा ढिगारा वाढतच होता. वास्तविक, हे बिहारसाठी एक अभूतपूर्व दृश्य होतं. १९६७ ते १९७० आणि १९७७ ते १९७९ हा लहानसा खंड सोडला तर तुम्ही तुमच्या संपूर्ण राजकीय आयुष्यात मुख्यमंत्री म्हणून पोलीस दलास राज्यभर संचालित केलं, पण नंतर तो तुमच्यावर लाठ्या-काठ्यांचा वर्षाव करीत राहिला. आता तेच पोलीस तुमच्याविषयी सन्मान म्हणून आपल्या बंदूका वर उचलून तुम्हाला सलामी देत होते. हा शासकीय अंत्यसंस्कार निश्चितच कर्मकांडाविषयी त्यांना पढवल्या गेलेल्या कायद्याशी सुसंगत होता. परंतु बंदुका उंचावणे म्हणजे थोरवीचं प्रतीक होतं, ती थोरवी म्हणजे राज्यसत्ता प्रतिष्ठानची शक्ती. राज्यसत्तेच्या या शक्तीला आपण आयुष्यभर आव्हान देत राहिला. किंबहुना स्वत: सरकार चालवित होता तेव्हादेखील देत होता. पोलीस दलाची तुमच्याविषयी कृतज्ञता म्हणजे तुमच्या अंतिम विजयाचं प्रतीक होती. तुमच्या पार्थिव देहाला स्मशानभूमीपर्यंत आणण्यात आलं. अंत्येष्टी स्थळी नेण्यासाठी पोलिसांनी ट्रकवरून तुमची तिरडी उचलली. त्यांच्या पुढे-पुढे लयबद्ध स्वरात वाजणारा पोलिसांचा बँड होता. शासकीय इतमामाचा हा नियम पाळला जात राहिला आहे आणि पुढेही पाळला जाईल.

घाटावर सर्व पक्षातील नेते आले होते. बिहारचे राज्यपाल होते. हे तेच राज्यपाल होते, ज्याच्या राज्यात शासनाच्या कायद्याचा आदर केला गेला नाही. तरीही त्यांनी त्याविरोधात बोटही उंचावलं नव्हतं. कारण खरं पाहता भारतात राज्यपालांना अधिकार संपन्न मानलं जात नाही. ही बाब वेगळी आहे की, दिल्लीत बसलेल्या आपल्या वरीष्ठांच्या इच्छेखातर त्यांना हस्तक्षेपाची कृती करणं आवश्यक होऊन बसते. अशावेळी ते राज्य सरकारच्या कामकाजात थेट ढवळाढवळ करतात आणि सरकार पाडणं शक्य होईल, असे रिपोर्ट तयार करून देतात. तिथं मुख्यमंत्री होते. त्याचप्रमाणे सर्व पक्षातील नेतेही हजर होते. पाटणा शहरातील प्रत्येक लहान-मोठी महत्त्वपूर्ण व्यक्ती होती. शिवाय ज्याचा काहीतरी मरातब होता, असा प्रत्येकजण तिथं उपस्थित होता. त्यातील काहीजण तिथं यासाठी हजर होते की त्यांना वाटत होतं की लोकांनी आपल्याला अखेरचा निरोप देताना पाहावं. काही फक्त यासाठी आले होते की तुमचा अंत्यविधी म्हणजे एक राजकीय घटना होती.

एका विशिष्ट उदरातून जन्म घेतला असल्याने दिल्लीच्या गादीवर बसलेल्या त्या अशिक्षित पंतप्रधानानेदेखील तुमच्या मृत्युतून काही राजकीय कमाई करण्याचा विचार केला. ज्या नदीच्या काठी तुमचं पार्थिव शरीर सरणावर जळत होतं, त्या काठावर लावलेले लाउडस्पीकर वारंवार ओरडत होते, ‘कर्पूरी ठाकुर के शव पर प्रधानमंत्री की ओर से माल्यार्पण किया जा रहा है।’ या स्टंटसाठी नौकरशाह तैनात करण्यात आलेला आहे, अशी शक्यता वाटत होती. कारण त्या बेशरम पंतप्रधानाचे व्यवस्थापक मंडळ आणि छळकर्त्यांनी त्याला सल्ला दिला असावा की, लोकांना हे दाखवून द्यावं की, तुमच्या निधनाने तोही दुखी आहे. पण तो एक तुच्छ पंतप्रधान आहे. मतदान बूथ लुटण्याच्या कटांचे त्याने संचालन केलं आहे. जरुर त्याने इशारा केला असावा की विरोधी पक्षनेता म्हणून तुमची प्रतिष्ठा सपुष्टात आणावी. जेणेकरून पक्ष विखरुला जाईल.

तुमच्या निधनाने जो आनंदित झालेला होता, तोही दुख व्यक्त करण्याचा पाखंडपणा करीत होता. सत्तापक्षाविषयी तुम्हाला आयुष्यभर कसलाही आदर नव्हता, त्याच्याविरोधात तुम्ही सतत लढत होता. अशा या सत्तापक्षाने तुम्ही त्याचा अंग आहात, हे दाखवून देण्यासाठी ते सर्वकाही केलं, जे तो करू शकत होता. आपल्या अंतिम पराभवात त्याला हे दाखवून द्यायचं होतं की, त्याने तुमच्यावर विजय प्राप्त केला आहे. त्यांना दूर दूर पर्यंत केवळ हेच दिसत होतं की, तुमचा अंत्यविधी वैदिक रितीरिवाजाने पार पाडला जातो आहे. एका वृत्तपत्राने तुमच्या अंत्यविधीच्या महत्त्वाच्या विवरणाला याच शीर्षकाने प्रकाशित केलं. ही तर एक चलाखी होती. दिसत होतं की, सत्ता प्रतिष्ठानासोबत धार्मिक प्रतिष्ठानानेही तुम्हाला आपल्या कवेत जखडून घेतलं आहे. तुमच्या हयातीत या धार्मिक प्रतिष्ठानाला कसलाच थारा नव्हता. त्याचे पूर्वग्रह, अत्याचार, पाखंड आणि शोषणाविरोधात तुम्ही आजीवन संघर्ष करीत राहिला. जणू त्या धार्मिक प्रतिष्ठानालाही असं वाटत असावं की, त्याने तुमच्यावर भरपूर सूड उगवला आहे. हे खरं होतं की, हा सूड तो अशा वेळी घेत होता, ज्याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही नव्हता.

तुमच्यासारखा अचानक मृत्यू ओढवल्याचा एक आनंदही असतो. यात तुम्ही केलेल्या गल्लती किंवा घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची यादी करण्याची संधी मिळत नाही. आपल्या जीवनातील पश्चाताप, गमावलेल्या संधी तथा चुकीचे अंदाज इत्यादीचा मोजमाप करण्याची उसंत मिळत नाही. जर तुमच्याकडे आपल्या जीवनातील यशांवर विचार करण्याचा वेळ असता तर तुम्ही ते केलं असतं. तुम्ही जनकल्याणासाठी सर्वकाही केलं आणि त्या मोबदल्यात जनतेनेही तुम्हाला प्रेम केलं आणि अपार विश्वास दिला.

तुम्ही नेहमी म्हणत असत की डॉ. लोहिया आणि त्यांच्या दृष्टीमुळेच हे शक्य झालं की तुमच्यासारख्या न्हाव्याच्या घरात जन्मलेल्या एका गरीब माणसाला शिखरापर्यंत पोहचण्याचा किंवा आपल्या विश्वात विजय प्राप्त करण्याची संधी मिळू शकली. तुमचं म्हणणं खरं होतं. पण तुमच्यामध्ये आणखी काही वैशिष्ट्य होती. या वैशिष्ट्यांनी तुम्हाला बिहारचा थोर आणि देशाचा महान नेता केलं होतं. ते म्हणजे तुमचं तेज, तुमच्यातील अदम्य शक्ती, तुमचं धैर्य, तुमची निष्ठा, तुमची बांधिलकी, निस्वार्थ भाव आणि तुमचं चरित्र! या चारित्र्याने तुम्हाला घडवलं होतं. तुमच्या निधनामुळे बिहारच्या राजकीय जीवनात एक शून्य निर्माण झाला आहे. असं दृश्य जो इतर शून्यापेक्षा वेगळा भासतो, कारण हा शून्य तुमच्या निघून जाण्याने तयार झालेला आहे. तुमच्या हृदयाचा प्रत्येक ठोका जनतेसाठी असे.

तुमच्या जीवनातील यशाचं अंतिम ध्येय असेल की तुमच्यासोबत कुठल्या नि कुठल्या रुपाने जोडलेल्या लोकांची कामं, जे तुमच्या मिशनला पुढे घेऊन जातील आणि अशा रीतीने तुमचं जीवन आणि कर्माचे साक्षीदार होतील. त्यामुळे मृत्युनंतरही तुम्ही जीवंत राहू शकाल. तुमच्या आठवणी राहणार नाहीत, कारण काळ लोटतो तशा स्मृती मग त्या कितीही गडद असतील तरी त्या धुसर होत जातात. तुमच्या कार्याला विस्तारीत करूनच त्या शून्याला भरून काढता येईल. जर त्या लोकांनी तुमच्या जीवनातून काही शिकलं असेल तर त्यांनी हे जरूर करावं.

अलविदा, कर्पूरीजी!

(सदरील लेख कर्पूरी ठाकूर यांचे १७ फेब्रुवारी १९८८ रोजी निधन झाल्यावर हिंदीत लिहिला गेला आहे. भीम सिंह संपादित 'जननायक कर्पूरी ठाकूर' या पुस्तकात तो आहे, प्रभात प्रकाशनने २०१४ मध्ये ते पुस्तक प्रकाशित केले. त्यातून हा लेख घेतला आहे. मराठीत तो १० फेब्रुवारी २०२४च्या साप्ताहिक साधनेत प्रकाशित झालेला आहे.)

मराठी अनुवाद : कलीम अज़ीम 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: अलविदा, कर्पूरीजी!
अलविदा, कर्पूरीजी!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEieklUKQlMl3RPqjX-L1MMfFi_Nd5F-Zx29gFLUjTF6QhyphenhyphenVsMfyBRHm0Y2q0J656hT8nvL4FwfphD7YWbBSRrvxQAFffZ8Ov8Q-TwznVLbd1Tla5uO1-Dqjm9fi-e2KZR9j_I9m6PAfSgfCXrlvi0TJlhfLWLCIveCwR8B64-Q0d8q-utBYYDeG23F8eMmO/w640-h420/karpuri%20Thakur.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEieklUKQlMl3RPqjX-L1MMfFi_Nd5F-Zx29gFLUjTF6QhyphenhyphenVsMfyBRHm0Y2q0J656hT8nvL4FwfphD7YWbBSRrvxQAFffZ8Ov8Q-TwznVLbd1Tla5uO1-Dqjm9fi-e2KZR9j_I9m6PAfSgfCXrlvi0TJlhfLWLCIveCwR8B64-Q0d8q-utBYYDeG23F8eMmO/s72-w640-c-h420/karpuri%20Thakur.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/02/blog-post_10.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/02/blog-post_10.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content