रोहित सरदाना : मुस्लिमांच्या उद्ध्वस्तीकरणाचा खलनायक


डिसक्लेमर :
लोभ असावा, हे टिपण मीडियाकर्मी म्हणून नाही तर एक भारतीय व त्यातही मुस्लिम म्हणून लिहितोय, पत्रकार म्हणून लिहिणारे खूप भाऊबंद आहेत. ते भूमिका म्हणून लिहितील व लिहित आहेत.
प्रथम एक बाब स्पष्ट करतो की रोहित सरदाना ‘पत्रकार’ नव्हे तर ‘अभाविप’चे सक्रीय प्रवक्ते होते. त्यामुळे त्यांना पत्रकार किंवा एंकर म्हणवणं अन्यायाचं होईल. पत्रकारिता नि:ष्पक्ष व पीडित, शोषितांच्या बाजुने उभी असते. ती एकांगी, एककल्ली नसते. ती मानवतेच्या विरोधात तर कधीच नसते. संघटक, कार्यकर्ते भूमिका घेतात. ही भूमिका कधी मानवतेच्या बाजुने असू शकते तर कधी विरोधात.

रोहित भूमिका घेणारे अभाविपचे कार्यकर्ते होते, हे लेखक म्हणत नाही, तर भाजप-संघाच्या अनेक मान्यवरांनी त्यांना घोषित रुपाने आदरांजली देत म्हटले आहे. कार्यकर्ते आणि तेही अभाविपचे म्हणजे तो परंपरावादी, धर्मभिमानी, अस्मितावादी असणार आणि उदारमतवादी विचार व धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असणं साहजिकच आहे. कारण त्यांच्या मातृ-पितृसंघटनेची ती उघड भूमिका आहे.

प्रधानसेवक मोदीपासून ते गृहमंत्री शहा व राष्ट्रपतींनी रोहितना श्रद्धांजलि देत ‘ॐ शांति’ असा टॅग चालवला. या महामहीमनी आदंराजली द्यावी, खरंच ते इतके मोठे व्यक्ती होते का? याचं उत्तर ज्यानं-त्यानं ठरवावं. ते भाजपचे क्रियाशील प्रवक्ते असल्याने त्यांना श्रद्धांजली देणं या मंडळीचं नैतिक कर्तव्य होतं, त्यांनी ते पार पाडलं.

रोहित कोविडनं गेल्याचं दुख नाही, कारण आजघडीला दोन लाखांपेक्षा (२,११,८३५) अधिक भारतीय या रोगराईत आपण गमावले आहेत. माझ्या लेखी त्यातल्या अन्य मृतांपैकीच ते एक आहेत. रोहित सरदाना यांचं निधन झालं, त्यापेक्षा रोगराईनं (ज्याबद्दल ते सतत सरकारच्या चुकांची पाठराखण करीत होते) त्यांचा बळी घेतला याचं अधिक वाईट वाटतं. ज्या भाजपच्या राजकीय व सांघिक उत्थानासाठी ते झटत होते, त्याच सरकार अर्थात सिस्टिमच्या अनास्थेचा ते बळी ठरले. आज पर्यंत देशभरात १५६ पत्रकार कोविडने मरण पावले आहेत. त्यामुळे रोहित सेलिब्रिटी वगैरे होते, असा गैरसमज करून घेऊ नये.



पत्रकारितेची शैली (?)

‘मरणानंतर वैर संपते’ या कथनाला जरी जागलं; तरी रोहित यांच्या दृष्कृत्याची चर्चा करण्यास कोणीही रोखू शकत नाही. तेवढं व्यक्तिस्वातंत्र्य आहेच की! त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य वापरत मी सदरील व्यक्तीचा ‘एकेरी’ उल्लेख करत आहे. कारण तो इसम माझ्यालेखी कधीही महान व आदरणीय वगैरे नव्हता.

मीडियातली तमाम लोक म्हणत आहेत, रोहितच्या पत्रकारितेची खास शैली होती. होय, शैली तर होतीच. कारण त्याच्या या शैलीने अनेकजण उद्ध्वस्त झाली, देशधडीला लागली, लाखोंचे संसार, व्यापार, रोजगार उद्ध्वस्त झाले. अनेकजण आयुष्यातून उठली, हजारो जण अकारण तुरुंगात सडत आहेत. अनेकांचं अस्तित्व, त्यांची ओळख, जगणं, वागणं, दिसणं, असणं सारं काही संकटात आलेलं आहे.

त्याच्या शैलीरुपी कथित पत्रकारितेनं बहुसंख्याकाच्या मानसिकतेवर आघात केला. त्याच्या शैलीने समाजात जात, धर्म व वर्णविद्वेशी हेट क्राइमला जन्मठेपेची दिला. एका समाजाला हिंदू म्हणून प्रचारित करत मुस्लिमविरोधात उभं केलं. त्याच्या या शैलीने बहुसंख्याकाच्या मानसिकतेवर आघात झाला. निकडीचे मूलभूत प्रश्न विसरून त्याला ‘हिंदू.. हिंदू..’, ‘मोदी.. मोदी..’ करण्यास भाग पाडलं. खरंच त्याची शैली होती, जी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात नव्हे तर आरएसएसच्या वर्णद्वेशी शाखेत शिकवली जाते.

पत्रकारितेला माध्यम बनवून त्यानं संघाच्या वर्ण, वर्ग आणि जातद्वेशी प्रचार राबविला. त्यांच्या पत्रकारितेनं फैलावलेल्या विषाचे रोगट दंश रोजच भारतीय समाज सोसत, भोगत आहे. त्याच्या शैलीने भारतीय मुस्लिमांचं राक्षसीकरण व उद्ध्वस्तीकरण झालं. दलित-ख्रिश्चन, शोषित, पीडित असुरक्षित होऊन त्यांच्यापुढे अस्तित्वाचे प्रश्न उभे ठाकले.

रोहित दररोज संध्याकाळी भारतीय समाजात (न्यूज चॅनेलवर) ‘दंगल’ माजवायचा. विखारी विषय घेऊन रोज वाद व तेढ निर्माण करायचा. एफबी स्क्रोल करताना कधीतरी त्याचा वर्णद्वेशी चेहरा दिसायचा. दखल म्हणून चार-दोन मिनिट तिथं स्थिर होत. पण त्याची नेहमीची विखारी भाषा ऐकून किळस येई व बोटाने त्याला ढकलून लावत.

कधी कधी सहजच विचार येई की या माणसाला झोप कशी येत असेल? त्याला स्वप्ने कशी पडत असतील? सकाळी झोपेतून उठल्यावर पत्नीला काय विचारत असेल? लेकीला खेळताना पाहून त्यांच्या भविष्याबद्दल काय प्लॅनिंग करत असेन? कोरोना काळात मीडिया टेररनं भयग्रस्त झालो, त्यावेळी रोहित, सुधीर व अर्णबच्या दिनक्रमाविषयी मला सतत चिंता होत राही.

एकदा त्यानं फेसबुकला एकदा कुत्र्यासोबत आपला फोटो टाकला आणि धावतं घोडं अंगावर घेतलं. तो त्या दिवशी भाजपविरोधकांकडून जाम ट्रोल झाला. रोजच प्राइम शो पूर्वी लाइव्ह येऊन शिव्या खाऊन जायचा, त्या शिव्यांचा राग तो शो मध्ये काढायचा. एकदा आपल्या लहान मुलींसोबत फेसबुकला फोटो टाकला, लोकांनी त्याला विचारलं, या मोठ्या झाल्यावर कोणी त्यांना बलात्कार व अॅसिड फेकण्याची धमकी दिली तर तुम्ही काय कराल? त्या दिवशी तो ट्रोल्सवर खूप भडकला. 

कधी कधी अमित शाह, राजनाथ, मोदीसोबतचे आपले फोटो टाकायला. कधी वादग्रस्त भाषणे ठोकणाऱ्या भाजपच्या नेत्यांसोबत सेल्फी टाकायचा. त्यावर कोणी तुम्ही भाजपचे का? असं म्हटलं की वैताग, चिडचिड करायचा. असेच काहितरी उद्योग तो सतत करीत असे.



हेट क्राईम’चा कर्ता

२०१५ पासून टिव्हीत गेल्यावर त्याला नोटिस करायला लागलो. रोज रात्री तो आणि त्याचा सहकारी सुधीर चौधरी (तिहाडी) ‘झी न्यूज’वर मुस्लिमविरोधाचं स्पेशल शो करीत. दोघांचेही शो एका पेक्षा अधिक जहरी. पुढे तो ‘झी’ सोडून ‘आज तक’ला गेला. आला की पेरला गेला माहीत नाही. तिथेही रोजच विषाचे कितीतरी टँकर तो समस्त भारतीयांवर लोटत राहायचा.

गोमांस बाळगण्याच्या आरोपातून झालेल्या माणसांच्या हत्येचं तो वारंवार समर्थन करीत राहिला. कठुआची निष्पाप चिरमुडीीव हाथरसच्या तरुणीवर झालेल्या बलात्काराचं तो समर्थन करीत राहिला, कुलदिप सेंगर, चिन्मयानंदसारख्या बलात्कारीच्या संरक्षणार्थ उभा ठाकला. बलात्कार, निर्दोष व निष्पाप माणसांच्या हत्येचं समर्थन म्हणजे त्याची ‘देशभक्ती’ व ‘माणूस’ असण्याची ग्वाही असावी! असो.

रोजच तो मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या विरोधात ‘हेट क्राईम’ची सुपारी द्यायचा. ‘जिहादी’, ‘अर्बन नक्सली’, ‘देशद्रोही’ म्हणून देशातील युवकांना हिणवायचा. त्यानं जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर गलिच्छ शिंतोडे उडविले. कधी त्यानं मोदींच्या अपयशाला झाकून त्यांना विश्वगुरू म्हटलं. कधी निवडणुकीत भाजपचा प्रचारक झाला. कधी गौरी लंकेश असो की दाभोळकर; त्यांच्या खून्यांचं तो निर्लज्जपणे समर्थन करीत राहिला.

भाजपविरोधी पत्रकारांना शिव्याशाप द्यायचा. भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दलितविरोधी दंगलीचा समर्थक असो की, त्या दंगलीच्या निषेधार्थ झालेल्या ‘भारत बंद’चा विरोधक, आरक्षणावर घेतलेले तोंडसुख, दलित-ख्रिश्चनांच्या हल्लेखोरांना सरंक्षण, इत्यादी घटकांत तो रोजच आधिकाधिक ‘उजवा’ होत एका कंपू गटात सेलिब्रिटी होत गेला. तिकडे चीनने भारताची हजारो स्केअरकिलोमीटर जमीन बळकावली, इकडे त्याची मोदी(देश)भक्ती अधिक उजळून निघाली.

पाकिस्तान आर्थिक संकटात आला तरी मोदी, म्यानमारमध्ये रोहिग्या मुस्लिमांचं हत्याकांड झालं तरी मोदी, अरबमध्ये काही झालं तरी मोदी, अमेरिकेच्या निवडणुकीत मोदी, ट्रम्प हरले की मोदी, इस्रायल दौऱ्यात मोदी, संयुक्त राष्ट्र परिषदेत मोदी, गलवान घडले मोदी, जवान शहिद झाले मोदी, तलाक रद्द झाला मोदी, राम मंदिर निकाल मोदी, एनआरसी मोदी..अबब.. फक्त मोदीच मोदी.. 

हद्द म्हणजे कोरोना काळात मोदी, तबलिग प्रकरणी मोदी, कितीतरी दिवस मोदींनी कोरोना पळवून लावल्याची हकाटी पिटत राहिला. सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे मोदी असा प्रचार या गोदी मीडियाच्या कर्त्यांनी केला. 


वाचा : आधुनिक मदरसे... एक नवी पहाट!

मुस्लिम संज्ञेशी अतिव प्रेम

रोहितच्या मुस्लिमविरोधाबाबत किती व काय-काय सांगावे. सकाळी उठल्यापासून तो रात्री निजेपर्यंत तो मुस्लिमांच्या अस्तित्वाला कलंकित करत रहायचा. जणू  मुस्लिमच त्याचे अंथरून पांघरून झाले होते. रोज कुठलाही विषय मुस्लिमांवर आणायचा व त्यावर भाष्यकाररुपी श्वान सोडायचा. दोन नव्हे तर एकदाच चार-चार, सहा-सहा कोंबड्याची झुंज तो लावायचा. या सर्वांचा त्याचा विक्षिप्त पद्धतीने आनंद लुटायचा.

राम मंदिर, आयोध्या, कश्मीर, गोरक्षा, मॉब लिचिंग, तलाक, ओवैसी, अबू आझमी, आजम खान, सीएए, एनआरसी, दिल्ली दंगल इत्यादी विषयावर त्यानं फैलावलेले जहर रोजच राहून-राहून विखाराच्या ठिणग्या उडवित असतो. राम मंदिर, बाबरी प्रकरण चेतवून त्याने असंख्य सामान्य नागरिकांची माथी भडकवली.

कोविड संक्रमणात ‘तबलिग प्रकरण’ प्रपोगेट करत त्यानं कहरच केला. भाजप सरकारच्या (त्याच्या भाषेत सिस्टम) अकर्मण्येचे दोष दाखविण्याऐवजी त्यानं कोविड पॅन्डिमिकचं सारं खापर मुस्लिमांवर फोडलं. त्याच्या इतर सहकाऱ्यांसारखा नुसता तबलिग.. तबलिग... करीत ओरडत राहिला. सबंध वर्षभर त्याने भारतीयांना मुस्लिमांविरोधात ‘हेट क्राइम’ करण्यास उत्तेजन दिलं आणि झालंही तसंच. त्यानं फैलावलेलं विष डोक्यात भिनवून सामान्य माणसं रस्त्यावर उतरली आणि मुस्लिमांना जगण्याचा, व्यापाराचा, विहाराचा हक्क नाकारत राहिली.

ढेपाळलेली आरोग्य सुविधा, औषधांची कमतरता, बुडते रोजगार, लाखोंचे स्थलांतर, पायपिट करून मरणारे लोक, किंकाळ्या फोडणारे पेशंट, रस्त्यावर विलाप करीत मरणारी माणसं; सारंकाही मुस्लिमामुळे घडत आहे, असा तद्दन खोटा प्रचार त्यानं केला. 
मोदी सरकारचं दोष लवपून बुलेटिनमध्ये थाळ्या बडविण्याचा आनंद साजरा करू लागला. विरोधकांना नामोहरम केले. त्यांना देशाचे शत्रू म्हणून प्रचारित केलं. कोरोनासारख्या आणीबाणीत सरकारनं केलेल्या चुकांना दडवून हिंदू-मुस्लिम करू लागला. दुर्दैव म्हणजे ज्या चुकांना, कमतरतांना, दोषांना त्यानं दडवून ठेवलं अखेरीस त्याचाच तो शिकार झाला.



सौजन्यशिलता कुठली आणू?

मरणानंतर उणिवा, वैर, दोष विसरणे व मयताबद्दल सकारात्मक आणि चांगले बोलणे भारतीय संस्कृती आहे. माफ करा, पण मी रोहितबद्दल ते करू शकत नाही. त्यानं मुस्लिमाविरोधात उघडलेल्या आघाडीला मी विसरू शकत नाही. मॉब लिचिंग करण्यास उत्तेजित केेलेल्या झुंडीला मेंदूच्या स्मृतिपटलावरून काढू शकत नाही. घटनात्मक हक्काची मागणी करणाऱ्या दिल्लीच्या मुस्लिम तरुणांना त्यानं जिहादी म्हटलेलं विसरू शकत नाही.

कदाचित अशा व्यक्ती व प्रसंगासाठी कथाकार सआदत हसन मंटोंनी ‘गंजे फरिश्ते’ पुस्तकात लिहून ठेवलं होतं -
“ऐसे समाज पर हज़ार लानत भेजता हूं जहां यह उसूल हो कि मरने के बाद हर शख़्स के किरदार को लॉन्ड्री में भेज दिया जाए जहां से वो धुल-धुलाकर आए.”
कारण माणूस जसे बघतो, ऐकतो त्याच आधारावर तो आपली मते तयार करतो आणि प्रतिक्रिया देत राहतो. मी रोहितबद्दल जसा विचार करतो, त्याला नरेट करतो; तसंच मला बोलावं, लिहावं लागेल. जर मी ते करत नसू तर मी स्वत:शीच बेईमानी करत राहीन, आणि ते करणं माझ्या नौतिकतेत बसत नाही.

रोहितने एक सामान्य मुस्लिम म्हणून कधीही विचार करू दिला नाही. त्यानं मला नेहमी त्याच्याबद्दल द्वेश करायला, तिरस्कार करायला भाग पाडलं. अतिसामान्य व्हायला उत्तेजित केलं. माझ्यात नसलेल्या विकृत विचारांना उत्तेजन दिलं. त्याच्याबद्दल ‘एंकर’ म्हणून नव्हे तर मुस्लिमांचा शत्रू, संघाचा ‘द्वेशी प्रचारक’ म्हणून पाहू, बघू, विचार करू लागलो. तोच मला वारंवार तसं करायला भाग पाडू लागला होता. मग यात दोष कुणाचा?

तो मुस्लिमांचा सतत राग राग करायचा, त्यांना अपमानित करायचा, जिहादी संबोधन वापरायचा, इस्लाम व मुस्लिमांना हिंदूपुढील आव्हान म्हणून ट्रिट करायचा. त्यांच्या जगण्याचा हक्क नाकारायचा, शिव्या-शाप द्यायचा, मुस्लिम प्रवक्त्यांना चॅनेलवर बोलावून भलं-बुरं बोलायचा, झिडकारयचा, गद्दार म्हणायचा, पाकिस्तानला जा म्हणायचा, बहुसंख्याकांना मुस्लिमांच्या विरोधात गुन्हे करायला उत्तेजित्त करायचा. 

अशा हिंस्र व्यक्तीला मी ‘चांगला’ कसं काय म्हणू शकेन! त्यानं केलेलं मानवता विरोधी, संविधानविरोधी, समाजविघातकी कृत्य आणि हिंस्र, श्वापदी प्रचार व विचार सहज विसरू इतका विवेक व सौजन्यशिलता माझ्यात नाही. शिवाय मी ज्या भारतीय संस्कृतीत वाढलो ती मला तसे करायला परवानगीही देत नाही.

निधनावर आनंदोत्सव साजरा करावा, इतका विवेकहिन मी नाही. अशा विकृत कृतीचं समर्थनही होऊ शकत नाही. हे कृत्य सुसंस्कृत व ससभ्य नसलं तरी त्यांच्या नैसर्गिक भावनांचा तो उद्रेक आहे. काहींनी त्याला ‘रोहित दंगाना’ असं उद्बोधन वापरलं, तर त्यात काय वाइट! त्यानं नाही का घडविल्या दंगली? 

दिल्ली दंगल त्याच्या सारख्या पत्रकारांमुळे घडलेली ताजी घटनाच की! त्याच्या मृत्युवर हर्ष करणाऱ्या वर्ग-गटाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. कारण त्यानं आपल्या कृतीतून त्यांना तसे करायला उद्युक्त केलेलं आहे. इतिहास हिटलर व मुसोलिनीला ‘चांगलं’ म्हणून संबोधित करीत नाही. तसंच नथुरामचेही आहे. रोहितनं केलेला गुन्हा मानवतेविरोधी असून तो अक्षम्य आहे. तो सांप्रदायिक होता, द्वेषाचा, तिरस्काराचा प्रचारक होता. 

साहजिक त्याचे सर्वात जास्त विरोधक मुस्लिम होते. पण ते त्याचे शत्रू नव्हते. त्यानं केलेल्या कथित पत्रकारितेचं, अपप्रचाराचं, द्वेशी मोहिमेचं ते समीक्षक होते, टीकाकार होते. त्याचे कान टोचणारे होते. त्याच्याविरोधात मुस्लिमांनी कधीही जाहिररित्या हिंसक भाषा वापरली नाही. त्याच्या निधनावर ते ‘खिराजे अकिदत’ पेश करीत आहेत. त्यातले काही हर्षित झालेही असतील. त्याबद्दल नैतिक, अनैतिक चर्चा होत राहिल, पण त्यांना शोक प्रस्ताव पारित करायचा नसेल तर तो त्यांचा हक्क आहे. दलित व इतर घटकांतील लोकांना त्याच्या मृत्युवर दु:ख होत नसेल तर, ते करण्यास त्यांना भाग पाडलं जाऊ शकत नाही. त्यांच्या हक्कांचं जतन व संवर्धन करणं हे भारतीय संविधानाने त्यांना दिलेली हमी आहे.

बरं भारतात विरोधी मतांच्या व्यक्तीच्या निधनावर उत्सव साजरा करण्याची विकृत परंपरा राहिलीच आहे की! गांधी हत्येनंतर पेढे वाटणारी जमात इतिहासात नोंदली आहे. नथुरामला हुतात्मा म्हणणारी मंडळी महाराष्ट्रात निपजलीच की! कसाब व अफजल गुरुच्या फाशीवर उत्सव साजरा झालाच होता की! गौरी लंकेशचा मृत्युचा हर्षोत्सव साजरा करणारे विकृत ट्रोल्स आहेच ना?

तरीही इच्छेविरोधात जाऊन सर्वांनी रोहितला चांगलं म्हणावं, श्रद्धा सुमन अर्पित करावी, अशी ‘लिबरल’ व ‘सेक्युलर’ असण्याची अट; व ती प्रत्येकांनी मान्यच करावी, हा अनाठायी आग्रह आहे. हा हट्ट पूर्ण करण्यास कोणीही बांधिल असू शकत नाही. तेवढे व्यक्तिस्वातंत्र्य एक मानव म्हणून सर्वांनाच आहेच की!

सोशल मीडियावर रोहितबद्दल होत असलेली तिरस्काराची भावना गोदी मीडिया, त्याचे पत्रकार, एंकर व चालक-मालकांसाठी एक धडा आहे. प्रेम, करुणा व आपलेपण द्याल, तर समाज तोच तुम्हाला देईन. पण जर, तिरस्कार, द्वेश, शत्रूता, हिंसक विचार व विखारी वातावरण देणार असाल तर त्याचीही परतफेड समाज करेलच ना!

(लेखकाची मते व्यक्तिगत असून ती आक्रोषातून आलेली आहेत, ती सर्वांना मान्य असावी असा आग्रह नाही.  पुन:प्रकाशनाचा अधिकार मुक्त आहे, पण तो  लेखकाच्या नावासह आहे तसा प्रकाशित करावा, शीर्षक वा भाषा बदलू नये.)

कलीम अजीम, पुणे 
मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: रोहित सरदाना : मुस्लिमांच्या उद्ध्वस्तीकरणाचा खलनायक
रोहित सरदाना : मुस्लिमांच्या उद्ध्वस्तीकरणाचा खलनायक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLHRtCC7afzbfHtdLNfjyZlC-BcsQf2ywBji-zaEe0VFzeOe2ecR5_Dp5SYVEvrwpbbilj4kwfDPMwwlO2FT7Y1HpOsc78kmhfP8X52yQYdoasHcXFFstcw57zeSOZk38Wld7qtUZR2S4P/w640-h400/Muslim+Mukt.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLHRtCC7afzbfHtdLNfjyZlC-BcsQf2ywBji-zaEe0VFzeOe2ecR5_Dp5SYVEvrwpbbilj4kwfDPMwwlO2FT7Y1HpOsc78kmhfP8X52yQYdoasHcXFFstcw57zeSOZk38Wld7qtUZR2S4P/s72-w640-c-h400/Muslim+Mukt.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2021/05/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2021/05/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content