‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला मुस्लिमद्वेषी विरोध


र्फ एक्सेलच्या होळीच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादाला महत्त्व द्यायची गरज नाही. पण त्याआड सुरू झालेल्या द्वेषधारी प्रचाराला आणि मुस्लिमांच्या राक्षसीकरणाला मात्र उत्तर दिलं पाहिजे. या घटनेची जागतिक मीडियानं दखल घेतल्यानं त्यावर बोलणं क्रमप्राप्त ठरतं. निरागस बालकांच्या प्रेमात लैंगिक विकृती व भोगलालसा शोधली गेल्यानं हे प्रकरण अधिक गंभीर झालेलं आहे.

कुठल्याही मुद्द्यांवरून विनाकारण वाद घडवणं आणि त्यावर वादग्रस्त माध्यम चर्चेचे फड रंगवणं, भाजपच्या सत्ताकाळाला नवं नाही. गेल्या पाच वर्षांचे मीडिया रिपोर्ट्स पाहिले तर अनेक घटना स्मृतिपटलावर गर्दी करू लागतील. मुळात होळी हा सण भारतातील गंगा-जमुनी संस्कृतीचा प्रतीक मानला जातो. या आनंदोत्सवात हिंदूंसह सर्वधर्मीय सहभागी होतात. मुस्लिमही तेवढ्याच उत्साहानं या सोहळ्यात रंगाची उधळण करतात. एकात्मता, सामाजिक सौहार्द व सद्भभावनेचा संदेश या सणातून मिळतो.

भारतात संमिश्र संस्कृतीची प्राचीन परंपरा आहे. जगाच्या पाठीवर वैविध्य व बहुसांस्कृतिकतेसाठी भारताची विशिष्ट अशी ओळख आहे. किंबहुना भारत अशा संमिश्र सहजीवनासाठीच ओळखला जातो. सत्ताप्राप्तीसाठी आलेल्या विविध परदेशी शासकांच्या हल्ल्यातही ही प्राचीन संस्कृती टिकून राहिली. प्रयत्न करूनही अनेक परकीय शासकांना या समाजरचनेला छेद देता आलेला नाही. विश्वशांती व जात-वर्गविरहित सहजीवनाचा संदेश घेऊन आलेल्या अनेक सुफी-संतांनी भारताच्या या वैविध्यपूर्ण व बहुरंगी संस्कृतीला अबाधित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्यांनी इथली भाषा, राहणीमान, जीवनपद्धती, भौगोलिक रचना आणि मानसिकता लक्षात घेऊन मानवतेचा संदेश दिला. केवळ अमोघ वाणीतूनच नव्हे तर आपल्या आचरणातूनही त्यांनी बंधुभावाचं तत्त्वज्ञान दिलं.

वाचा : सरवरपूरची मस्जिद म्हणजे सेक्युलॅरिझमची पुनर्बाधणी

सुफी-संतांच्या आगमनाचा हा काळ भारतात मनुवादी व्यवस्थेचा होता. वर्ण आणि वर्गावर आधारित समाजाची विभागणी करून मानवाला धर्माधारित ओळख प्राप्त करून दिली जात होती. श्रमाला आर्थिक वर्गवारीत विभागून त्याला जातिआधारित ओळख चिकटवली जात होती. सर्वसामान्यांना जातीच्या उतरंडीत कैद केलं जात होतं, अशा काळात सुफी-संतांनी मानवतेची कास धरून बहुजन व शोषित घटकाला आपलंसं केलं.

साहजिकच ही आत्मीयता आणि बंधुत्वाच्या भावनेनं तमाम शोषित-पीडितांना सुफी-वारकरी परंपरेकडे खेचून घेतलं. वर्ण आणि जातिगत विभागणीला बळी पडलेल्या अनेकांनी मानवता आधारित या सहजीवनाची कास धरली. त्यातून मानवी मूल्यनिष्ठांची महती सांगणाऱ्या तत्त्वज्ञानाचा जन्म झाला. या तत्त्वज्ञानानं सर्व मानवजात एकसारखी असून त्यात उच्च-कनिष्ठ असा भेद नाही, अशी मांडणी केली. या सुफी-संत फकिरांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची सैद्धान्तिक मांडणी केली. अंधभक्ती व अंधश्रद्धेला अधर्म म्हटलं. अनिष्ठ रूढी-परंपरांवर हल्ला चढवला.

सुफी-संतांची ही विवेकी चळवळ सबंध मानव जातीसाठी कल्याणकारी ठरली. धर्माच्या नावानं अनीतीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला सुफी-संतांनी आव्हान दिलं. तसंच प्रस्थापित आणि धार्मिक अधिष्ठानाची मक्तेदारी कवटाळून बसणाऱ्या परंपरावाद्यांविरोधात बंड केलं. शुद्र आणि अतिशुद्रांना आदर व सन्मान देऊन आपलंसं करून घेतलं. ही चळवळ धर्मप्रथांना प्रश्नांकित करणारी होती. परिणामी यातून हजारो वर्षांपासून चालत आलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला हादरे बसले. परिणामी मनुस्मृतीवर आधारित समाजरचना नाकारण्यात आली.

सुफी आणि संतांनी मानवतेच्या सेवेसाठी आपलं सबंध आयुष्य व मधाळ वाणी खर्च केली. त्यातून एकीकडे सुफी संप्रदाय तर दुसरीकडे भक्ती संप्रदायाचा उदय झाला. जातीच्या जोखंडातून मुक्त होण्यासाठी पीडित व शोषित जमातींनी वारकरी संप्रदायाची काठी हाती धरली, तर काहींनी इस्लामचा स्वीकार केला. अशा प्रकारे दोन्ही चळवळींनी भारताच्या संमिश्र सहजीवनाची पायाभरणी केली. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही संमिश्र विचारधारा आज आधुनिक भारताची ओळख आहे.

अनेक सुफी-संत महात्म्यांनी एकत्रितपणे मानवतेची बीजं रोवल्यानं त्यांना मानणारा एक मोठा वर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. काही ठिकाणी संतांची पालखी मुस्लिम पिराला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही. गुरूनानक, बाबा फरिद, बुल्लेशाह, हजरत अमीर खुसरो, हजरत निजामुद्दीन, ख्वाजा मैनुद्दीन, संत तुकाराम, ज्ञानेश्वर अशा कितीतरी संतमहात्म्यांवर सर्वांची आजही अगाध श्रद्धा आहे.

मंदिरे आणि खानकाहमध्ये वेगवेगळ्या धर्माचे व पंथाचे लोक शुद्ध मनानं येऊन आत्मशांती मिळवतात. पण शुद्धीकरणाच्या नावानं दोन्हीकडच्या सनातन्यांनी या संमिश्र संस्कृतीला हादरे दिले. एकीकडे तबलीगसारखी चळवळ सुरू झाली, तर दुसरीकडे शुद्धीकरणाच्या मोहिमा सुरू झाल्या. अशा संमिश्र प्रवाहाला विरोध करणाऱ्या धर्मवाद्यांनी दोन्ही समाजात ढवळाढवळ केली. सामान्य मुसलमानांना सुफींपासून तोडलं तर दुसऱ्या गटानं बहुजन लोकव्यवहारामध्ये वैदिक धर्मनिष्ठांचं बळकटीकरण केलं.

भारतात सुफी-संतांची अनेक स्मृतिस्थळं आहेत. तिथं आजही भारताच्या हिंदू-मुस्लिम मिश्र संस्कृतीची महती गायली जाते. अनेक दर्गाह आणि मंदिरात मानवी हित, विश्वशांती व कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. देशात असे काही दर्गाह आहेत, जिथे आरती होते. तर अशी काही मंदिरं आहेत, जिथं दुआपठण केलं जातं. उरूस व जत्रा भरवली जाते. अनेक दर्गाहवर हिंदू-मुस्लिम मिश्र सहजीवनातून आलेल्या प्रथा पाळल्या जातात. कुरबानी, बळी देणं, नवस बोलणं, कंदुरी करणं, अन्नदान इत्यादि परंपरा दोन्हीकडे सारख्याच स्वरूपात आढळून येतात. परंतु दोन्हीकडील धर्मवाद्यांनी या गंगा-जमुनी सहजीवनाला शत्रुस्थानी आणलं आहे. मुस्लिम पिरांच्या दर्गाहचं भगवेकरण केलं, तर संतांच्या स्मृतीस्थळी धर्मांचा बाजार मांडला.

मुसलमानांनी धर्मवाद्यांचं ऐकून सुफी फकिरांपासून अलिप्तता बाळगली. हीच पोकळी लक्षात घेऊन दुसऱ्या गटानं त्या संतपीरांचं भगवेकरण केलं. अशा प्रकारे अनेक दर्गे आज मंदिराच्या स्वरूपात भक्तगण जमा करताना दिसत आहेत. पूर्वी सुफी-संतांकडे सर्व जाति-जमातीतल्या मानवांना प्रवेश होता, पण अलीकडे महिला व दलितांना या सुफी-संतांकडे जाऊन दर्शन घेण्यास मज्जाव केला जात आहे.

सुफी-संतांच्या नावानं पैशांचा बाजार मांडला जात आहे. सनातनी मंडळींनी पूर्वी सुफींना ‘धर्मप्रसारक’ म्हणून बदनाम केलं, तर आता इकडचे ‘धर्मबुडवे’ म्हणून त्यांचा तिरस्कार करत आहेत. हिंदुकरणाच्या नावातून अनेक सुफी-संतांचं वैदिकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुफींचं शुद्धीकरण करून त्यांना भगवं (वैदिक) स्वरूप दिलं गेलं. एवढ्यावरच न थांबता मुस्लिमांना बदनाम करण्याच्या हिंसक मोहिमा सुरू केल्या गेल्या. त्यासाठी मध्ययुगीन इतिहासाला आधार म्हणून वापरण्यात आलं. 

 

आजतागायत या रचित इतिहासाचा आधार घेऊन मुस्लिमांच्या राक्षसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. मानवीय सहसंबंध व निकोप नात्याला धर्माची लेबलं चिकटवण्यात आली. संमिश्र सहजीवनाची मुळं खालपर्यंत रुजल्यानं या सनातनी मंडळींना अजूनही आपलं उद्दिष्ट पूर्णपणे साध्य करता आलेलं नाही. त्यामुळे त्यांनी विविध पद्धतीनं मानवीय नात्याला व सहजीवनाला कलंकित करण्याचा प्रकार सुरूच ठेवला. सर्फ एक्सेलच्या जाहिरातीला विरोध त्याचाच एक विकृत व किळसवाणा नमुना आहे.
वास्तविक पाहता सदर जाहिरातीला विरोध करण्याची काहीच गरज नव्हती. 
यापूर्वीही सर्फ एक्सेलनं अशा सामाजिक सोहार्दाचा संदेश देणाऱ्या अनेक जाहिराती केलेल्या आहेत. सर्व जाहिराती गंगा-जमुनी मिश्र संस्कृतीचा उत्तम मिलाफ आहेत. त्या जाहिरातींतून दोन समुदायातील जिव्हाळा, सहजीवन व प्रेमाचा संदेश दिला गेला होता. याही जाहिरातीत अशाच प्रकारे धार्मिक एकात्मता आणि सहसंबंधांचा संदेश होता.
संघ व सरकार समर्थक ट्रोलरकडून संमिश्र संस्कृती व सौहार्दतेच्या परंपरेविरोधात लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांत भारतानं हेच पाहिलं आहे. विविध घटनांमधून भारतात असहिष्णुता नांदवली गेली. सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना ‘देशद्रोही’च्या व्याख्येत बंदिस्त केलं गेलं. राज्यघटना व त्याच्या मूलभूत तत्त्वाची उघडपणे अवमानना व पायमल्ली केली गेली.

अहिंदू म्हणून हल्ले करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास मानवीय नातं संपुष्टात आणण्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे. मुस्लिम असल्यानं सार्वजनिक सेवा नाकारल्याचे अनेक प्रकार देशात कधी नव्हे ते पाहायला मिळाले.

बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य असं अघोषित युद्ध भाजपकालीन सत्ताकाळात सुरू झालेलं आहे. बहुसंख्याकांच्या धर्मभावना अल्पसंख्याकांवर लादल्या गेल्या. त्यातून धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेचा संघर्ष निर्माण केला गेला. गेल्या पाच वर्षांत संपूर्ण मानवतेविरोधात युद्ध पुकारलं गेलं.

हिंदू धर्मसंस्कृतीच्या नावानं खाणं-पिणं, वेषभूषा आणि फिरण्यावर बंधनं लादली गेली. चांगली नाटकं, सिनेमे, चित्रं काढणाऱ्यांवर हल्ले झाले. लोकांना सिनेमे-नाटकं बघण्यास मज्जाव केला गेला. लेखक, कलावंतांची मुंडकी छाटून आणण्याचे धर्मादेश काढले गेले.

सोशल मीडियातून महिलांविरोधात अश्लील शेरेबाजी केली गेली. महिलांना भररस्त्यात बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या. इथपर्यंत न थांबता व्हर्च्युअल मीडियातून ट्रोलरनी बाहेर येऊन महिलांवर हिंसक व लैंगिक गुन्हे केले. बलात्काराला धर्मयुद्धाशी जोडलं गेलं. इतकंच नव्हे तर पीडितेला न्याय मिळू नये म्हणून मोर्चे काढले. धर्मयुद्धातून दलित मुलींची बलात्कार करून नग्न धिंड काढली गेली. दलित तरुणांच्या लग्नाच्या वरातीला रोखलं गेलं.

कथित ‘लव्ह जिहाद’चं बुजगावणं उभं करून मुस्लिम मुलींना बाटवण्याच्या सुपाऱ्या दिल्या गेल्या. संस्कृतीच्या नावानं उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांवर हल्ले झाले. सरकारविरोधात बोलणाऱ्या महिलांचे नग्न फोटो मार्फ करून त्यांना बदनाम केलं गेलं. मुस्लिम कर्मचारी पुरवत असलेली सार्वजनिक सेवा नाकारण्यासाठी प्रचार केला गेला. मुस्लिम मुलींना हिंदू तरुणांकडून बाटवण्यासाठी सुपाऱ्या दिल्या गेल्या. शिक्षण घेणाऱ्या तरुणांवर हल्ले केले गेले. ‘लव्ह जिहाद’चे आरोप करून मुलींची बदनामी केली गेली. भर रस्त्यात त्यांच्याशी दुर्व्यवहार करण्यात आला.

धर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत सुफी-संतांचा आहे, हा भारत महान तत्त्वज्ञांचा आहे, हा भारतातील बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.

आमचा भारत हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई-बौद्ध सहसंबंधांचा आहे. त्याला तडे देण्याच्या प्रकाराला रोखण्याची गरज आहे. माझ्या भारतात नमाज़साठी एक पंडित आपला गमछा अंथरतो. तर निराश्रीत हिंदूंच्या आश्रयासाठी गाव-मोहल्ल्यात मस्जिदा खुल्या केल्या जातात. माझ्या भारतात सर्व धर्मांचे लोक आपसात मिसळून राहतात. त्यांच्या सण-उत्सवात सामील होतात. माझ्या भारतात पुरीचा जगन्नाथ रथयात्रेपूर्वी भुवनेश्वरनजीकच्या सालबेगच्या दर्गाहला भेट देऊन पुढे जातो. जगतगुरू तुकोबांची पालखी देहू गावाबाहेर असलेल्या हजरत सैय्यद अनगडशाह बाबा यांच्या स्मृतिस्थळी एक थांबा घेऊन पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करते.

सलोख्याची परंपरा

माझा भारत अशा हिंदू-मुस्लीम सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे. अशा अनेक प्रतीकांनी भारताच्या महात्म्याच्या कथा रंगलेल्या आहेत. अशा भारताला गढूळ करण्याचे प्रकार रोखावे लागतील. सर्फ एक्सेलच्या उपरोक्त जाहिरातीतून सण-उत्सव-सोहळ्याची धार्मिक आधारावर विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा विकृत प्रकाराला रोखण्यासाठी शांतीदूतांना एकत्र येण्याची गरज आहे.

होळी हा सण कोण्या एका धर्माचा नाही, तर तो सर्व भारतीयांचा आहे. सुफी-संतांनी होळीकडे सामाजिक सोहार्द, एकात्मता म्हणून पाहिलं. त्यासाठी गीतांची व अभंगाची रचना केली. होळीवर सुफी-संतांनी अनेक रचना केल्या आहेत.

बुल्लेशाह होळीबद्दल म्हणतात,

होरी खेलूंगी, कह बिसमिल्लाह,

नाम नबी की रतन चढ़ी, बूंद पड़ी अल्लाह अल्लाह.

तेराव्या शतकात होऊन गेलेल्या हजरत अमिर खुसरोंनी (१२५३-१३२५) होळीला सलोख्याशी जोडत म्हटलं आहे,

‘खेलूंगी होली, ख्वाजा घर आए

धन धन भाग हमारे सजनी

ख्वाजा आए आंगन मेरे’

मुघल शासकांनीदेखील होळीला सामाजिक एकतेचा सण मानला. त्यांनी होळीला ‘इद-ए-गुलाबी’ व ‘आब-ए-पाशी’ (रंगीत फुलांचा पाऊस) असं म्हटलं आहे. सम्राट अकबरनं तर होळीला सांस्कृतिक सहजीवन आणि सहिष्णुतेला प्रोत्साहन देणारा सण म्हटलं आहे. नंतर आलेल्या अनेक मुघल सम्राटांनी होळीला महत्त्वाचा सण मानलं, त्याला शासकीय दर्जा प्राप्त करून दिला.

इतिहासात नोंदवलेल्या संदर्भाचा आधार घेतल्यास असं दिसून यईल की, लाल किल्ला आणि यमुनेच्या तीरावर शाही होलिकोत्सव साजरा केला जात असे. इतिहासतज्ज्ञ राणा सफवी यांनी मुघकालीन सणांवर भरपूर लेखन केलं आहे. स्क्रोलवरील एका लेखात त्या म्हणतात, मुघलकालीन होळीत सर्व धर्माचे लोक मोठ्या संख्येनं जमत असत. होळीच्या दिवशी अगदी सामान्य माणूसही मुघल बादशहावर रंगांची उधळण करत असे. होळीच्या दिवशी अनेक कलावंत लाल किल्ल्यात जमत असत. कविता, शायरी व संगीताच्या मैफली सजत. सर्वांना मिठाईची वाटणी होत असे.  

शेवटचे मुघल बादशहा बहादूरशाह जफर (१७७५-१८६२) यांनीदेखील होळीवर अप्रतिम रचना केलेल्या आहेत. धुडवडीबद्दल लिहिलेल्या एका रचनेत ते म्हणतात,

‘क्यों मोपे मारी रंग की पिचकारी

देख कुंवरजी दूंगी गारी (गाली)’

जगतगुरू इब्राहिम आदिलशाह आणि बंगालचे नवाब वाजिदअली शाह यांच्या काळातदेखील होळी मोठा उत्सव मानला जात होता. दोन्ही शासकांच्या राजवटीत होळीच्या दिवशी सामान्यांसाठी मिष्ठान्न, मिठाई आणि ठंडाई वितरित केली जात असे.

नवाब वाजिद अली शाह यांचं एक प्रसिद्ध ठुमरी गीत आहे. त्यात ते म्हणतात,

‘मोरे कान्हा जो आए पलट के

अबके होली मैं खेलूंगी डट के’
महान तत्त्वज्ञेता व इतिहासकार अलबेरुनीनं आपल्या संस्मरणात होलिकोत्सवाबद्दल भरभरून लिहिलं आहे. तो म्हणतो, ‘भारतात होळी हा केवळ हिंदूंचाच नाही तर बहुसंख्य मुस्लिमही हा सण पाळताना दिसून येतात.’ याच मुद्दयाला पुष्टी देत एकोणिसाव्या शतकातील बुद्धिजीवी मुन्शी जकाउल्लाह यांनी ‘तहरीक-ए-हिंदुस्तानी’ या पुस्तकात होळी सण हिंदूंचा असल्याच्या मांडणीला आव्हान दिलं आहे.

वास्तविक पाहता, होळीबद्दल अनेक धार्मिक मिथकं असली तरी तो, समस्त भारतीयांचा सण आहे. सोहार्द, सलोखा, बंधुभावाचा संदेश देणारा आणि भारतीयत्व जपणारा हा सण आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कितीही विकृती उफाळून वर आल्या तरी भारताच्या वैविध्य व एकात्मेच्या खांबांना कोणीही हलवू शकत नाही.

(21 मार्च 2019 रोजी अक्षरनामामध्ये प्रकाशित झालेला लेख)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला मुस्लिमद्वेषी विरोध
‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला मुस्लिमद्वेषी विरोध
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpPTXHzBsyLGnI4a6uxZxeC1Q3wQSogdAdLnQJAAoExYsPO4ZcQmWKxUk7p-7YwXfsHABk-HWO_A4T7kjzRgkl1sioS0GOvGws-Cl_DduLrhPgCPg_Fv0XTvU4zZ8lPlRSyX4TaSJKleZZ/w640-h344/Surf+Exal.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpPTXHzBsyLGnI4a6uxZxeC1Q3wQSogdAdLnQJAAoExYsPO4ZcQmWKxUk7p-7YwXfsHABk-HWO_A4T7kjzRgkl1sioS0GOvGws-Cl_DduLrhPgCPg_Fv0XTvU4zZ8lPlRSyX4TaSJKleZZ/s72-w640-c-h344/Surf+Exal.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/03/blog-post_17.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/03/blog-post_17.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content