मुस्लिमद्वेशातून विद्यार्थ्यांना विष देणारी श्रीराम सेना

“मी अभिमानाने सांगू शकतो की कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही”, लोकसभेत केंद्रीय गृहंमत्री अमित शाह यांनी उच्चारलेलं हे वाक्य आहे. २९ व ३० जुलै २०२५ रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर बाबतच्या चर्चेत त्यांनी हे विधान केलं होतं. दुसऱ्या दिवशी ३१ जुलै २०२५ रोजी विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव ब्लास्ट खटल्यातील सर्व हिंदू आरोपींना दोषमुक्त केलं. त्याहीवेळी अमित शहा यांचं वाक्य अनेक भाजप नेत्यांच्या तोंडी आलं होतं. हे वाक्य उच्चारण्याचे श्री. शाह यांच्याकडे कुठलेही औचित्य नव्हतं. पण मालेगाव खटल्याच्या निकालाला प्रभावित करण्यासाठी त्यांनी हे वाक्य जाणूनबुजून उच्चारलं होतं, असं म्हणता येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच वाक्याची पुनरुक्ती करत म्हटलं, “भगवा दहशतवाद कधीच नव्हता, आताही नाही आणि भविष्यातही असणार नाही.” दोन्ही मंत्रिमहोदय हे वाक्य उच्चारताना कर्नाटकमध्ये भगव्या गुंडांनी शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्यात विषय मिळून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. हे गुंड भगव्या आक्रमक दहशतवादी संघटना श्री राम सेनेचे कार्यकर्ते होते.

केवळ मुस्लिम द्वेषातून त्यांनी ही विकृत घटना अमलात आणली. केंद्रीय गृहमंत्र्यांसाठी ही घटना नक्कीच लज्जास्पद ठरणारी होती. परंतु भगवा दहशतवाद हा शब्द प्रयोग केल्याने काँग्रेसला माफीची मागणी करणारे भाजपचे नेते कर्नाटकच्या घटनेवर गप्प होते.

एकाच वेळी दोन शाळांमधील पिण्याच्या पाण्यामध्ये विष मिसळून निष्पाप मुलांच्या जीवीताला धोका निर्माण करणे सरळसरळ दहशतवादी कृत्य होतं. श्रीराम सेनेने हे कृत्य घडवून आणलं होतं. ही संघटना भगव्या दहशतवादाला पोसणारी आहे. संघटनेवर गौरी लंकेश व एमएम कलबुर्गी यांच्या हत्येचा आरोप आहे.

नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळात संघ व त्यांच्या हिंदुत्ववादी समर्थक संघटना समाजात हिंदू-मुस्लिम विभाजन करण्याचे प्रयत्न सातत्याने करीत आहेत. मुस्लिमांवर दोषारोपण करून सामाजिक कलह निर्माण करण्याऱ्या दोन धक्कादायक घटना कर्नाटक राज्यात घडल्या. दोन्हीत शाळेतील पिण्याच्या पाण्यात विषारी द्रव्य टाकून विद्यार्थ्यांचा जीव गेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवमोग्गा व बेळगाव जिल्ह्यातील या घटना आहेत.

बेळगावातील घटनेतील ३ ऑगस्ट २०२५ रोजी सौंदत्ती पोलिसांनी श्रीराम सेनेच्या २ कार्यकर्त्यांनी अटक केली. त्यांच्यावर आरोप आहे की, पिण्याच्या पाण्यात विष मिसळून विद्यार्थ्यांचा जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

सागर सकरेप्पा पाटील (२९) आणि नागनगौड़ा बसप्पा पाटील (२५) असं या आरोपींची नावं आहेत. आरोपी सागर श्रीराम सेनेचा तालुका (पारसगड) अध्यक्ष आहे. शासकीय शाळेतील मुस्लिम मुख्याध्यापकाला हटविण्यासाठी सागरने ही विकृत योजना आखली होती. दोघांसह मुख्य आरोपी कृष्णा यमनप्पा मदार (२६) यालाही पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

बेळगाव जिल्ह्यातील पारसगड तालुक्यातील हुलिकट्टी गावी ही घटना घडली. गावातील जनता राजकीय उच्च प्राथमिक विद्यालयात सुलेमान गौरीनाईक हे १३ वर्षांपासून कार्यरत आहेत. एक मुस्लिम शाळेत मुख्याध्यापक आहे, ही बाब श्रीराम सेनेला खटकली. संघटनेचा तालुका अध्यक्ष सागर पाटील याने मुख्याध्यापकाला बदनाम करून शाळेतून काढण्याचा कट रटला. त्यासाठी त्याने शाळेतील पण्याच्या टाकीत विष मिसळण्याची योजना आखली. विषाने विद्यार्थी मरण पावले तर त्याचा सर्व दोष मुख्याध्यापकावर टाकायचा व त्याला बदनाम करायचे, अशी त्याची योजना होती.


वाचा : ‘काश्मिर फाइल्स’च्या अनुपम अंकलना पत्र

पाचशे रुपयात दिलं काम

सागरने त्यासाठी कृष्णा मदारला हाताशी घेतलं. कृष्णाला ब्लॅकमेल केलं जात होतं. तपासात पुढे आलं की विषारी रसायन असलेली बाटली कृष्णाने शाळकरी मुलाला दिली होती व शाळेच्या पिण्याच्या पाण्यात टाकण्याचा आदेश सोडला.

 
बेळगावी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेद यांनी या संदर्भात मीडियाला माहिती देताना म्हटलं, “आरोपी कृष्णा मदारचे गावातील दुसऱ्या समुदायातील मुलीशी प्रेमसंबंध होते. मुख्य आरोपी सागर पाटीलने कृष्णा मदारला पाण्यात विष मिसळण्यास ब्लॅकमेल केलं. जर त्याने (कृष्णाने) त्याला मदत केली नाही तर तो हे प्रकरण उघड करेल अशी धमकी दिली.”

श्री. गुलेद पुढे म्हणतात, “कृष्णाने पाण्यात विष मिसळण्यास संमती दिली. त्यानंतर सागर त्याच्या नातेवाईक नागनगौडासोबत कीटकनाशक खरेदी करण्यासाठी मुनावल्ली (गाव) येथे गेला. त्यानंतर त्यांनी शाळेतील एका निष्पाप मुलाचा वापर पिण्याच्या पाण्यात कीटकनाशक मिसळण्यासाठी केला. मुलाला काहीही समजलं नाही आणि त्याने त्यांच्या सूचनेनुसार विष घातलं.” 

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शाळेतील ११ मुलांना अचानक पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाची तक्रार आली. मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण गावात भीती आणि चिंतेचं वातावरण पसरलं. 

‘दि हिंदू’च्या बातमीनुसार मुलांची तब्येत बिघडल्यानंतर, पोलिसांना प्रकरणाचे गांभीर्य समजले आणि त्यांनी तपास सुरू केला. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी चौकशी सुरू केली. पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं की, गावातील तीन रहिवासी सागर पाटील, कृष्णा मदार आणि नागनगौडा पाटील यांनी मुख्याध्यापकांवर दोषारोप करण्याचा प्रयत्न करत पिण्याच्या पाण्यात विष मिसळले होते.

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार योजना राबवण्यासाठी आरोपी सागरने शाळकरी मुलाला ५०० रुपये आणि नाश्ता देऊ केला. विषारी द्रव्य दिसू नये म्हणून प्लास्टिकच्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीत टाकण्यात आले. ते रसायन टाकीच्या आत पाण्यात मिसळल्यानंतर कृष्णाने बाटली जवळच टाकून दिली. ती बाटली हा गुन्ह्याचा उलगडा करण्यास मदत करणारा एक महत्त्वाचा पुरावा होता.

आरोपींनी कीटकनाशक खरेदी केलेल्या दुकानाचा पोलिसांनी शोध घेतला. दुकानदाराच्या जबाबावरून, तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीदरम्यान तिघांनी कट रचल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा शेवटी संबंध थेट कर्मठ हिंदुत्व विचारांची संघटना श्रीराम सेनेपर्यंत गेला. १ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांनी तिघांना अटक केली. तिन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS)च्या कलम १२३ (विष देऊन दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


वाचा : रोहित सरदाना : मुस्लिमांच्या उद्ध्वस्तीकरणाचा खलनायक

घृणास्पद कृत्य

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. संबंधित गुन्हा सांप्रदायिक द्वेषात रुजलेलं ‘घृणास्पद कृत्य’ असल्याचं त्यांनी म्हटलं. मुस्लिमद्वेषातून ही कृती झाली असल्याचं सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.

३ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांनी या संबंधी सविस्तर निवेदन जारी केलं. त्यांनी एक्सवर लिहिलं आहे की, “या घटनेचा उद्देश सरकारी शाळेतील मुस्लिम समाजाच्या मुख्याध्यापकाची गावातून बदली करणे हा होता. १५ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत अनेक मुले आजारी पडली, परंतु सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही.”

मुख्यमंत्री पुढे म्हणतात, “लहान मुलांचं हत्याकांड घडवून आणणारी ही घटना धार्मिक कर्मठता आणि सांप्रदायिक द्वेषामुळे कोणतेही घृणास्पद कृत्य घडू शकते याचा पुरावा आहे. दया हे धर्माचे मूळ आहे? असा उपदेश देणाऱ्या शरणांच्या भूमीत इतक्या मोठ्या प्रमाणात तुच्छता आणि द्वेष निर्माण होऊ शकतो का? मला या क्षणीही विश्वास बसत नाही.”
मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा थेट संबंध श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्याशी जोडला. म्हणतात, “समाजात द्वेष पेरणारे आणि धर्माच्या नावाखाली राजकीय भात शिजवणारे भाजप नेते काहीही आत्मटीका करू दे. पण या घटनेची जबाबदारी प्रमोद मुतालिक घेतील का?” त्यांनी भाजपचे राज्य प्रमुख वीजेंयद्र येडीयुरिप्पा व विरोधी पक्षनेते आर. अशोका यांना प्रश्न केला हे की, “अशा लोकांच्या समाजविघातक कृत्यांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना आता पुढे येऊन त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करावे.”

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सजग राहण्याच्या सूचना केल्या आहेत. म्हणतात, “द्वेषपूर्ण भाषणे आणि सांप्रदायिक दंगली रोखण्यासाठी सरकारने एक विशेष कार्यदल स्थापन केलं आहे. कायद्याच्या कक्षेत राहून द्वेष पसवणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करत आहोत. आमचे सर्व प्रयत्न यशस्वी होण्यासाठी, जनतेनेही अशा शक्तींविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, त्यांचा प्रतिकार केला पाहिजे आणि तक्रारी दाखल केल्या पाहिजेत.”

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हत्येचा दृष्ट कट उधळून लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं.

अशीच दुसरी घटना शिवमोग्गा जिल्ह्यातील हुविनाकोन (Hoovinakone village of Hosanagara taluk) गावात घडली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेला ‘दहशवादी कृत्य’ (Act of terror) म्हटलं आहे. गावातील सरकारी शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी रसायन मिसळण्यात आले.

शिवमोग्गा येथील सार्वजनिक सूचना उपसंचालक (डीडीपीआय) मंजुनाथ एसआर यांनी ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं की, शाळेत दोन पाण्याच्या टाक्या आहेत, एक स्वयंपाकघराशी जोडलेली आहे आणि दुसरी हात धुण्यासाठी बाहेर आहे. स्वयंपाकघराला जोडलेल्या टाकीत कीटकनाशक आढळले. तथापि, वीज नसल्याने आणि टाकी रिकामी असल्याने स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांनी बाहेरील टाकीतून पाणी आणलं. ते दूध तयार करण्यासाठी उकळले आणि ते विद्यार्थ्यांना दिले.

मध्यान्ह भोजन तयार करत असताना कर्मचाऱ्यांनी स्वयंपाकघरातील टाकीतून पाणी काढलं. पण ते दुधाळ दिसत होतं. त्यातून तीव्र वास येत होता. घाबरून त्यांनी मुख्याध्यापकांना कळवलं. त्यांनी ही बाब ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांना (बीईओ) कळवली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलिसांनी एफआयआर नोंदवला.

वाचा : नागरिकता विधेयक म्हणजे नव्या धोक्याची चाहूल

वाचा : मुसलमानांचे राजकीय व सांस्कृतिक आत्मभान

संशयाची सुई

कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (KSCPCR) या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आयोगाने शिवमोग्गा येथील सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडून घटनेसंबंधी अहवाल मागवला आहे. केएससीपीसीआरचे सदस्य शशिधर कोसांबे म्हणाले, “शाळेच्या पाण्याच्या टाकीत विकृतांनी कीटकनाशक मिसळले हे अक्षम्य कृत्य आहे. कर्मचाऱ्यांच्या वेळेवर लक्ष ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली. ही गंभीर बाब आहे, आम्ही पत्र लिहून डीडीपीआयकडून अहवाल मागवला आहे.”

शिवमोग्गाचे एसपी जीके मिथुन कुमार यांनी गुन्हेगाराची ओळख पटविण्यासाठी तीन तपास पथके स्थापन केली आहेत. आयपीएस अधिकाऱ्याने २ ऑगस्ट रोजी शाळेत तपासणी केली, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती गोळा केली. नंतर त्यांनी पत्रकारांना घटनेत वापरलेली कीटकनाशक बाटली जप्त करण्याबद्दल आणि संशयितांबद्दल माहिती मिळवण्याबद्दल माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी या कृत्याला दहशतवादी कृत्य संबोधलं आहे. म्हणतात, “डझनभर लहान मुलांचा नरसंहार घडवून आणण्याच्या दुष्ट हेतूने केलेले हे कृत्य कोणत्याही दहशतवादी कृत्यापेक्षा कमी नाही. स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांच्या वेळीच सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.”

मुख्यमंत्री पुढे म्हणतात, पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याची मानसिकता आपल्यातील मानवतेचा ऱ्हास दर्शवते. या प्रकरणात प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेतही घातपाताचा संशय व्यक्त कला आहे. त्यांनी संशयाची सुई पुन्हा श्रीराम सेनेकडे नेली. घटनेचा तपास १८ कर्मचाऱ्यांचे तीन पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

-कलीम अज़ीम, पुणे
४ ऑगस्ट २०२५
मेल : kalimazim2@gmail.com 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मुस्लिमद्वेशातून विद्यार्थ्यांना विष देणारी श्रीराम सेना
मुस्लिमद्वेशातून विद्यार्थ्यांना विष देणारी श्रीराम सेना
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh2_YzZkLBQc4I97bx8W5vkAcA-c8t7oQsrOrNR6zC698862jyKvxVzt529E4MYmLHIZyHBgaLfqJ41saYpfc7Lf3eqcFnSlHOUq3D3fWnmPblrEjcl40FsXZjlFihUN1dqABERiavQddFxmTVK3x69VZz2i6ke1ohXBpadEox_g81FOOlhbV3r7n9lbhnd/w640-h374/Sriram%20sena.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh2_YzZkLBQc4I97bx8W5vkAcA-c8t7oQsrOrNR6zC698862jyKvxVzt529E4MYmLHIZyHBgaLfqJ41saYpfc7Lf3eqcFnSlHOUq3D3fWnmPblrEjcl40FsXZjlFihUN1dqABERiavQddFxmTVK3x69VZz2i6ke1ohXBpadEox_g81FOOlhbV3r7n9lbhnd/s72-w640-c-h374/Sriram%20sena.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2025/08/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2025/08/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content