मराठी मुसलमानांचा साहित्य मेळा

प्टेंबर-ऑक्टोबरच्या एका व्हायरल बातमीने माझं लक्ष वेधलं. त्यात म्हटलं होतं, तब्बल २२ वर्षांनी नाशिकमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. त्याप्रमाणे २८ व २९ जानेवारीला नाशकात मराठी मुस्लिमांचा साहित्य मेळा भरला. घोषणेपासून संमेलन अनेक कारणांनी चर्चेत आलं. दोन साहित्य संस्थांचा वाद व नंतरचा घटनाक्रम त्यातील प्रमुख बिंदू होता.

पहिलं, १९९० साली सोलापूरला स्थापन झालेल्या मुस्लिम मराठी साहित्य परिषदेने २००९ साली औरंगाबादला शेवटचं संमेलन भरवलं होतं. त्यानंतर १४ वर्षांनी साहित्य परिषदेने नाशकात सदरील मेळावा घेतला. यापूर्वी २००० मध्ये असंच संमेलन नाशिकला झालं होतं. चर्चेत येण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे अध्यक्ष म्हणून निवड झालेले अब्दुल कादर मुकादम, यांचं पूर्वाश्रमीचं मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं सक्रीय सदस्यत्व ग्रहण करणे. कारण आजही महाराष्ट्रातील मुस्लिम समुदाय हमीद दलवाईंना मुस्लिमविरोधी धोरणांचा प्रचारक मानतो. वेळेचं भान राखून अध्यक्षांनी मी दलवाई विचारांपासून फारकत घेऊन एक तप लोटला आहे, तसंच मी मंडळाचा सदस्य व विचारांचा समर्थक नसल्याचा ऑडियो खुलासा केला. त्यामुळे तो विरोध तिथंच मावळला.

तिसरं कारण म्हणजे विहिंप, आरएसएस व त्यांच्या समविचारी विवेक सारख्या ब्राह्मणी व हिंदुत्ववादी विचारांच्या संस्था, संघटना व प्रचारकांनी संमेलनाचा घेतलेला धसका! शेवटचा आठवडा संघविचारांच्या अप्रचारामुळे नाशिकचं मुस्लिम मराठी साहित्य संमेलन गाजलं.

नियोजित वेळेच्या दीड-दोन तास उशीरा संमेलन सुरू झालं. उद्घाटन समारंभाला दि वायरच्या सुप्रसिद्ध न्यूज अँकर व पत्रकार आरफा खानम शेरवानी येणार होत्या. विमान तिकिटाची व्यवस्था करूनही काही कारणास्तव त्या पोहचू शकल्या नाहीत. परंतु त्याच दिवशी त्यांनी राहुल गांधीच्या भारत जोडोसाठी श्रीनगरच्या लाल चौकात उपस्थित असल्याचा फोटो ट्विटरवर अपलोड केला होता. म्हणजे श्रीनगरहून त्यांना नाशिकचं अंतर वेळेत कापता आलं नाही.

वाचा : मुस्लिम मराठी साहित्य मुख्य प्रवाहाचा घटक

वाचा : इस्लामचे जागतिक ज्ञान क्षेत्रात योगदान

संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी परिसरातून दिंडी काढण्यात आली. तसंच इकरा अरबी मदरसा इंग्लिश स्कूलच्या वतीने दिंडीत पथनाट्य सादर केलं. भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहातील प्रा. फकरुद्दीन बेन्नूर साहित्य नगरीत संमेलनाची सुरुवात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कुरआनच्या आयात पठणाने झाली. इरशाद पीरजादे यांनी आपल्या सुमधूर आवाजात आयात तर इकबाल मुकादम यांनी नात ए पाक सादर केली. त्यानंतर डॉ. युसूफ बेन्नूर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलं. वृक्षास जलपान करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.

प्रमुख संयोजक डॉ. फारुख शेख यांनी वर्तमान फुटपाड्या राजकीय स्थितीत सदरील संमेलन का घ्यावे लागत आहे, याची मीमांसा केली. संमेलन फक्त भाषा प्रेमींचा सोहळा नसून भारतीय व मराठी मुस्लिमांची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक अभिव्यक्ती असल्याचं त्यांनी म्हटलं. धर्म, जातीच्या नावाने भेद निर्माण करणाऱ्या विघातक शक्तींना उत्तर देऊ पाहणारा हा सांस्कृतिक प्रयत्न आहे, असंही त्यांनी म्हटलं.

उद्घाटक माजी राज्यसभा सदस्य हुसैन दलवाई, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, प्रमुख संयोजक डॉ. फारुख शेख, स्वागताध्यक्ष व अध्यक्षासह एकुण २० जण उद्घाटन मंचावर उपस्थित होते. हुसैन दलवाई यांनी राज्यातील प्रादेशिक मुस्लिम व भाषेचा अनुबंध उलगडून दाखवला. शिवाय अजूनही मोठ्य़ा प्रमाणात मुस्लिम मराठीपासून अलिप्त असल्याचीही खंत व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी वर्तमान केंद्रीय व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मुस्लिमविरोधी धोरणांचा समाचार घेतला. मराठी भाषेची मक्तेदारी मिरवणाऱ्या ब्राह्मणी प्रवृत्तीवरदेखील त्यांनी बोट ठेवलं.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी वर्तमान राजकारणावर भाष्य करताना म्हटलं, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिलं जाणारे शासकीय अनुदान बंद करावं. हा सगळा पैसा अशा छोट्या साहित्य संमेलनाकडे वळवावा. कारण त्या संमेलनातून जत्रेशिवाय दुसरं काहीच होत नाही. ..जेव्हा माणसांनी तयार केलेल्या विविध व्यवस्था फितूर होतात, बेईमान होतात तेव्हा साहित्यिकाची जबाबदारी वाढते आणि समाज सगळा त्याच्यामागे जात असतो. वर्तमान अवस्थेत कोणत्याही यंत्रणा प्रामाणिक राहिलेल्या नाहीत. आजचा काळ असा विचित्र आहे की कुठे पाऊल ठेवलं तर कुठे स्फोट होईल हे सांगता येत नाही.”

प्रस्तावना, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष, मुख्य संयोजक, प्रमुख पाहुणे इत्यादींच्या लांबणाऱ्या भाषणामुळे अध्यक्षांचे भाषण व वेळ कापली गेली. आयोजकांनी २० मिनिटात आटोपण्यात सांगितलं आहे, अशा सूचनेने अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी आपलं मनोगत सुरू कलं. मुकादम इस्लामचे अभ्यासक असल्याने त्यांनी इस्लामच्या नीती, धोरण, तत्वज्ञान व सुवर्ण युगापासून भाषणाला प्रारंभ केला. ..इस्लामचा संपूर्ण सार कुरआनमध्ये आलेला आहे. अर्थक्रांतीपासून संस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्टीची मांडणी त्यात केली आहे. पूर्वीपासून इस्लामला बदनाम करण्यात येत आहे. सध्या काही हिंदुत्ववादी संघटना तेच कार्य करत आहे. त्यामुळे समाजात दुष्परिणाम निर्माण होत आहे. भाषेला कुठलाही धर्म उपस्थित केलेले नसतो. भाषा वाचत नाही, तोपर्यंत त्याचा अर्थ समजत नाही. याचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाच आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली, तरीदेखील अद्याप समग्र क्रांती होऊ शकलेली नाही. क्रांती होण्यासाठी तसेच सर्वांना समान अधिकारासाठी ज्ञानाचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्य आणि साहित्यिकांची मोलाची भूमिका आहे.”

पुढे साहित्य, संस्कृती, लेखनाची प्रेरणा, लिखाणाच्या विविध प्रयोगावर भाष्य करत त्यांनी म्हटलं, राज्यात अनेक मुस्लिम लेखकांनी मराठीतून लेखन केले आहे. मुस्लिम साहित्य संमेलन हे त्याचे पुढचे पाऊल आहे. याविषयी मुक्त चर्चा होत असेल तर ते प्रगतीसाठी योग्य आहे. या चर्चेत काही मूलगामी मुद्दे उपस्थित होत असतील तर त्याचाही विचार केला जाईल.

वाचा : धार्मिक (?) चर्चांपुरता बंदीस्त केलेला मुस्लिम

वाचा : डॉ. अलीम वकील यांचं अध्यक्षीय भाषण

दुपारच्या जेवणानंतर साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद या पहिल्या महापरिसंवादाला सुरुवात झाली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान, प्रा. राम पुनियानी, प्रा. महेबूब सय्यद, साहिल कबीर, प्रा. अली निजामुद्दीन, अनवर राजन, प्रा. जावेद पाशा, प्रा. नारायण भोसले आणि मुजफ्फर सय्यद अशा तब्बल ९ वक्त्यांचा समावेश होता.

प्रा. मुस्तजीब खान यांनी आपले विचार मांडताना म्हटलं,सांस्कृतिक दहशतवादाची चौकट उभी करताना फ्रान्समध्ये काय घडलं, शार्ली हेब्दोवर हल्ला झाला, दिल्लीमध्ये एखाद्याने काही केलं, तर त्या एका घटनेचा, एका माणसाच्या वर्तनाचा ठपका संपूर्ण समुदायावर ठेवला जातो. शेजारी घडणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून परदेशात घडणाऱ्या विकृत गोष्टीवर लक्ष दिलं जातं. मुस्लिम लेखकांवरील धार्मिकतेच्या पगड्यामुळे ज्या गोष्टी लेखनातून बाहेर यायला हव्यात, त्या येऊ शकत नाही, याचाही विचार मुस्लिम साहित्यिकांनी केला पाहिजे.

प्रा. अली निजामुद्दीन यांनी भारतातील जातिभेदावर आधारित समाजाची कोंडी व त्यांच्या अभिव्यक्तींच्या मर्यादांवर भाष्य केलं. तसंच त्यांनी सामाजिक कुरती, धार्मिक वादावर मौन बाळगले जातं, यावर खंत व्यक्त केली. संवेदनशील कवी आणि भाष्यकार साहिल कबीर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दहशतवादावर चिमटे काढत म्हटलं, मोहसीनच्या मारेकऱ्यांची सुटका होते आणि आपण काहीच प्रतिक्रिया देत नाही, त्यावर बोलताना शरमेने मान खाली जाणे, हे इथल्या व्यवस्थेने तयार केलेला दहशतवाद आहे. पठाणची तिकिटविक्री किती झाली आणि त्याने अंधभक्ताच्या तोंडावर बॉक्स ऑफिस कसं फेकून मारलं, याचा आनंद टिव्ही इंटरनेट, मोबाईलवर घेत असू तर मोहसीन, बाबरी, अखलाक, पहलू-बिलकीसचे निकाल लागल्यानंतर आपण टाळ्या देत असू, तर दहशतवाद आपल्यावर स्वार झालेला आहे, आपण त्याच्या संमोहनात सापडलो आहे, हाच तर सांस्कृतिक दहशतवाद आहे.

अनवर राजन यांनी म्हटलं, खरं मुद्दे बोलल्याशिवाय आपल्या प्रश्नाला वाचा फुटणार नाही. दहशतवादाचा सामना आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. उद्या कोणाचा नंबर लागेल, याची शाश्वती नाही, किती लोक गेले त्यापेक्षा किती लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. मुस्लिम मराठी संमेलने घेणे म्हणजे हा एक बंडाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं.

ब्राह्मणी दहशतवादावर सडतोड प्रहार करताना मुंबई विद्यापाठातील प्रा. नारायण भोसले यांनी कथा-कादबऱ्यांतून प्रतित होणाऱ्या कुरघोडीवर बोट ठेवलं. म्हणतात, ब्राह्मणी दहशतवादाने क्षुद्र तथा मनुस्मृतीच्या बंदीची मागणी केली नाही. छत्रपतींच्या अनुषंगानेदेखील हा दहशतवाद पोसण्यात आलेला आहे, त्यातूनच त्यांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हटलं जाते. त्यावर आक्षेप नोंदवला तर पुन्हा ब्राह्मणी दहशतवाद फोफावतो.”

प्रा. राम पुनियानी यांनी भारतातील राजकीय संकटावर भाष्य करताना म्हटलं, आजच्या ज्या काळात आपण जगतो आहोत, त्यात साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. साहित्य सांस्कृतिक बदलाची एक पार्श्वभूमी तयार करतो. मुन्शी प्रेमचंद नवाबराय नावाने उर्दू भाषेमध्ये लिहित होते. त्यांनी तत्कालीन सत्तेला आव्हान दिलं होतं. आज आपल्या भारतीयतेवर जे संकट आलं आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी ही परिषदेने प्रयत्नशील असावे.”

भारतीय समाजात जातिव्यवस्थेचा पाया स्थिर असल्यामुळे इथल्या साहित्यात मुसलमानाच्या विकृतीकरणाची परंपरा उभी राहिली. त्यातून मुसलमानाच्या विकृतीकरणाला सामाजिक अधिमान्यता प्राप्त झाली. त्यामुळे बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी जनमताच्या जीवावर लोकसभेत पोहचतो. कोर्टाने एखाद्या माणसाला दोषी ठरवलं आणि शिक्षा ठोठावली, तरीही शासनसंस्था ती शिक्षा माफ करते. एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, आरोपींवर रितसर खटला चालला जातो, आरोपींना शिक्षा दिली जाते, तरीही त्यांनतर त्या आरोपींना सुटका केली जाते, त्यांना हारतुरे घातले जातात. त्यामुळे या अशा अत्याचाराला सामाजिक अधिमान्यता मिळू लागते, सांस्कृतिक मान्यता मिळते, असं प्रतिपादन अहमदनगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स कॉलेजचे प्रा. महबूब सय्यद यांनी केलं.

वाचा : प्रतिकांचे साहित्यकारण किती दिवस?

वाचा : सोशल मीडिया आणि नवलेखन

परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप करताना ब्राह्मणी मक्तेदारी व वर्चस्ववादावर प्रहार केले. आर्यामुळे दहशतवाद साहित्य निर्माण होऊ लागलं. या साहित्याविरोधात, एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम भांडले. या देशामध्ये पहिल्यांदा जे दहशतवादी ग्रंथ निर्माण झालं त्याचं नाव आहे मनुस्मृती. चार वर्षांसाठी नवीन फौज भर्ती करणे सुरू झालं आहे. म्हणजे येत्या पाच वर्षांमध्ये देशामधील किमान १० कोटी तरुण शासकीय खर्चाने मिलिटंट होतील. अशीच मिलिटरी पुष्यमित्र श्रृंगाने तयार केली होती. अशीच मिलिटरी हिटलरने तयार केली होती. सर्वांनी ही मिलिटरी आपल्या राजकीय उत्थानासाठी वापरून घेतली होती. जेव्हा विचारण्यात आलं, पाच वर्षानंतर बेरोजगार तरुण कुठे जातील, तेव्हा भारताचे अध्यक्ष महोदय बोलले, इनको हम अपने कार्यालय में रख लेगे. म्हणजे हे मिलिटंट कोणाविरोधात वापरले जातील?”

संध्याकाळी सातच्या सुमारास स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत मुस्लिम वास्तव अपेक्षा आणि प्रश्न या विषयावर मीडियाचे अभ्यासक कलीम अजीम यांनी आपलं मत माडलं. सुप्रीम कोर्टाने विखारी न्यूज अँकरविरोधात केलेल्या विधानाचा सार सांगत त्यांनी मीडियाला प्रश्न विचारण्याचा, त्याची तक्रार करण्याचा व कार्यवाही करण्याचा आग्रह केला. फुटपाड्या मीडियाच्या बातम्यांना बळी न पडता त्याला क्रॉस चेक करण्याची सवय लावा, असंही त्यांनी सूचवलं. याच परिसंवादात डॉ. यूसुफ बेन्नूर यांनी गेल्या ७५ वर्षांतील मराठी साहित्याची मीमांसा करताना त्यातील भेदाभेदवर बोट ठेवलं व मराठी मुस्लिम लेखकाकडून त्याला आव्हान देण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. मुस्लिम ओबीसी आंदोलनाचे संघटक हसीब नदाफ यांनी मुस्लिम आरक्षण, सच्चर समिती व वक्फ जमीनीच्या प्रश्नावर भाष्य केलं तसंच मुसलमानातील शिक्षणाच्या घसरत्या दर्जावर भाष्य केलं. परिसंवादाचे अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ साहित्यिक फ.म. शहाजिंदे यांनी उपाहासाने मुसलिम समुदायाला कोपरखळ्या मारल्या. ऐहिक जीवनाच्या कल्याणात व्यस्त असलेले मुस्लिम भौतिक विकासासाठी कशाला श्रम घेतील. त्यांना वर्तमान जगापेक्षा ऐहिक जीवनाची अधिक काळजी आहे. त्यांनी अध्यक्षीय भाषणात मुस्लिम तरुणापुढील शिक्षण व रोजगाराच्या आव्हानावर भाष्य केलं.

रात्री साडे आठच्या सुमारास फातिमाबीच्या लेकीचं काव्य संमेलन रंगलं. त्यात सुमारे १२ कवियत्रींनी सहभाग नोंदवला. तर मलेका शेख व नसीम जमादार यांनी त्याचं संचालन केलं. फरजाना डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या काव्य मैफिलीत रजिया डबीर, तहसीन सय्यद, सुरैय्या जहागीरदार, दिलशाद सय्यद, आलियागोहर शेख, नेहा गोडघाटे, अख्तर पठाण, सायराबानू चौगुले, अर्चना राहूरकर, जबीन शेख, समीना कुरैशी, कविता बिरारी यांनी सहभाग घेतला होता. या कवियत्रींच्या मांडणीत सांसारिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, व्यावहारिक ताण-तनाव, स्त्रीवादी मीमांसेच्या छटा होत्या.

त्यानंतर लागलीच बहुभाषिक काव्य मैफल सजली. ज्यात हिंदी, उर्दू व मराठी भाषिक असं तब्बल २५ कवी सहभागी झाले होते. मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही काव्यसभा पार पडली. लियाकत नामोले (नाशिक) यांनी उर्दू-हिंदीसाठी तर अरुण घोडेराव (नाशिक) यांनी मराठीसाठी संचालन केलं. शफी शेख (बोल्डा), अय्यूब नल्लामंदू (सोलापूर), बिस्मिल्ला सोनोशी (बुलडाणा), साहिल कबीर (कुरुंदवाड), वाय.के. शेख, (दौंड) बी.एल. खान (बुलडाणा), अहमद पीरनसाब शेख (हिंगोली), जाफर शेख (नांदेड) उपस्थित होते. उशीरा रात्री सुरू झालेल्या या मैफलीत श्रोत्यांची संख्या कमी पण मंचावर कविंची संख्या मुबलक होती. रात्री दीड वाजता ही काव्य मैफल संपली.

वाचा : नरेंद्र चपळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण

वाचा : वर्धा : विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचे भाषण

दुसरा दिवस

२९ जानेवारीला सकाळी साडे दहाला संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची प्रकट मुलाखत पार पडली. ही मुलाखत साहिल कबीर व कलीम अज़ीम यांनी घेतली. ५० मिनिटे चाललेल्या या मुलाखतीत मुकादमांनी बालपण ते नव्वदीपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास उलगडला. साहिल कबीर यांच्या प्रश्नांचं उत्तर देताना शिवसेनेचे संस्थापक सदस्य असल्याची त्यांनी कबुली दिली व अद्यापही सेनेचे विचार मान्य असल्याचं सांगितलं. कलीम अज़ीम यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना लालकृष्ण आडवाणी घरी कसे आले, त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर कशी दिली, किरिट सोमय्या यांनी त्यांना कसं उत्तर दिलं, हा रंजक किस्सा उलगडून दाखवला. अध्यक्षीय भाषणात राजकीय मते का नाहीत, या प्रश्नांच्या उत्तराला मात्र त्यांनी बगल दिली.

दुपारी बाराच्या सुमारास साहित्यावरील परिसंवाद मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके : साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक अन्वयार्थमध्ये प्रा. फारुख शेख, प्रा. इ.जा. तांबोळी, प्रा. शकील शेख, प्रा. जब्बार पटेल यांनी मांडणी केली. प्रारंभी शकील शेख यांनी मांडणी करताना म्हटलं, मराठी बोलणे, मराठी लिहिणे मराठी मुसलमानांचा एक नैसर्गिक व्यवहार झालेला आहे. फाळणीनंतर भारतीय मुस्लिमांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. शिक्षणाचा प्रसार होत असताना परदेशातून सांस्कृतिक राजकारणाच्या नावाने जोपासला जाणारा जमातवाद शहरी भागापासून ग्रामीण पातळीपर्यंत येऊन पोहोचत होता. अशा परिस्थितीत इथला मुस्लिम तरुण लिहिण्यास प्रवृत्त होत होता.

शफी शेख यांनी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्यावर भाष्य केलं. तीन दशकांचा ज्यावेळी विचार करतो, तेव्हा कवितेला वेगळे आयाम लाभलेले दिसतात. यावर्षीचे राज्य सरकारचे दोन्ही पुरस्कार मुस्लिम मराठी कवी हबीब भंडारे, रमजान मुल्ला यांना मिळाले आहेत. प्रा.फारुख शेख म्हणाले, गेल्या काही वर्षांत मराठी मुस्लिम लेखनात भाषिक प्रयोग झालेले आढळून येतात. प्रदेश बदलला की त्यातील शब्द भाषेत येत आहेत, उर्दू, खान्देशी, कोकणी, वऱ्हाडी मिश्रीत शब्द वाढले आहे. तसंच सामाजिक विचारवंत अगदी प्रगल्भ झाले आहेत. अलीम वकील यांच्यासारख्या विचारवंताच्या लेखनातून नव्या साहित्यिकांना प्रेरणा मिळते. प्रा. इ.जा. तांबोळी यांनी मुस्लिम मराठी साहित्यातील बदलत्या प्रवाहावर विस्ताराने भाष्य केलं. तसंच जब्बार पटेल यांनीही प्रस्थापितांच्या तुलनेत मुस्लिम मराठी साहित्य कसे प्रगल्भ होत आहे, याची मीमांसा केली.

त्यानंतर आम्ही भारताचे लोक हा महत्त्वाच्या परिसंवाद सुरू झाला. डॉ. अलीम वकील यांच्या अध्यक्षतेखाली जावेद पाशा कुरैशी, डीएल कराड इत्यादींनी मेत मांडली. प्रा. कुरैशी यांनी वर्तमान लोकसभेत मुस्लिमांच्या प्रतिनिधीत्वावर भाष्य केलं. तर कराड यांनी कष्टकरी व श्रमिकांच्या हक्कांना डावलणाऱ्या वर्तमान सरकारवर तोफ डागली. डॉ. अलीम वकील यांनी अध्यक्षीय समारोपात ब्रिटिशांच्या फुटपाड्या राजकारणाचा समाचार घेत, फाळणी, हिंदू राष्ट्रवाद, संघाच्या भेदनीतीवर प्रहार केले.

पाचव्या परिसंवादात वर्तमान स्थितीतील मुस्लिम मराठी साहित्यातील सामाजिक व सांस्कृतिक वेध चार मान्यवर वक्त्यांनी भाष्य केलं. विक्रम गायकवाड यांनी हिंदू राष्ट्रवादात दहशतीत लोटलेल्या साहित्यिकांविषयी खंत व्यक्त केली. तर अकबर लाला यांनी हिंदू धर्मांधतेच्या सत्ताकाळात अल्पसंख्याकावर होत असलेल्या हल्ल्याचा समाचार घेतला. डॉ. रफीक पारनेरकर यांनी इस्लामिक साहित्यातील अनुबंध मुस्लिम मराठी परिप्रेक्ष्यात मांडले. इकबाल मुकादम यांनी साहित्यातून कोकणी मुसलमान व त्यांची संस्कृती अदृश्य होत आहे, याविषयी खंत व्यक्त केली. पुण्यातील एमआयटी विद्यापीठाचे सल्लागार असलेल्या प्रा. एस.एन पठाण यांनी अध्यक्षीय भाषणात साहित्याने समन्वयाची भूमिका राबवावी असा सल्ला दिला. त्यानंतर हिंदू राष्ट्रवाद्याच्या कथित दुष्प्रचाराला पुढे रेटल्याने त्यांना भर भाषणात रोखण्यात आलं. डॉ. युसूफ बेन्नूर व जावेद कुरैशी यांनी आक्षेप घेतला व त्यानंतर त्यांनी आपलं भाषण मध्येच आटोपतं घेतलं.

त्यानंतर समारोपाचं सत्र सुरू झालं. अध्यक्षांसह तब्बल १८ जण मंचावर उपस्थित होते. हुसैन दलवाई यांनी राजकीय भाषण करू नये, असं आयोजकांनी सल्ला दिला असल्याचं सांगत मुद्दामहून राजकीय भाषण केलं. श्रोत्यांना उद्देशून येणाऱ्या निवडणुकीत उघडपणे सेक्युलर विचाराच्या (काँग्रेसला) मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं. तसंच असदुद्दीन औवैसी यांच्यावर नाव न घेता टीका केली. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी मुस्लिम समाजाला कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घेण्याचं आवाहन केलं. हा समाज अनेक गुण असूनही केवळ शिक्षणाअभावी मागे राहिला आहे. वृद्धाश्रमात एकही मुस्लिम आई-वडील आढळून येत नाहीत, असे संस्कार या समाजाजवळ आहेत. या समाजाला एकीची, क्रांतीची व इतर समाजांच्या पाठिंब्याची गरज आहे.

संमेलनाध्यक्ष मुकादम म्हणाले की मराठी साहित्य संमेलन हा मोठा भाऊ असून, त्याने मुस्लिम साहित्यिकांचीही दखल घ्यावी. त्यांची भाषाही मराठीच आहे. ‘होम मिनिस्टर’सारख्या मालिकेत अनेक वर्षांत एकाही मुस्लिम महिलेला सहभागी करून घेण्यात आलं नाही, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. हसीब नदाफ यांनी ठरावांचं वाचन केलं.

वाचा : विद्रोही साहित्य संमेलनातील अध्यक्ष गणेश विसपुते यांचे भाषण

वाचा : विद्रोही साहित्य संमेलनातील स्वागताध्यक्षा अंजूम कादरींचे भाषण

मंजूर झालेले ठराव

(१) राज्य सरकारने मुस्लिम स्वातंत्र्य सेनानीचा कोष तयार करावा.

(२) विज्ञान व संशोधन क्षेत्रात मुस्लिमांना प्रोत्साहन देत आर्थिक तरतूद करावी.

(३) मरहूम माजी आमदार सय्यद अमीन यांची १७ पुस्तके मंत्रालय तथा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध होण्यासाठी शासनाने आदेश काढावा.

(४) प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत मुस्लिम विद्यार्थ्यांना दहा टक्के शिष्यवृत्ती द्यावी. केंद्र सरकारने रद्द केलेली मौलाना आज़ाद संशोधन शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी.

(५) वक्फ जमिनीचा वापर मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासासाठी करावा.

(६) अलीगड विद्यापीठाचे औरंगाबाद येथे मंजूर केंद्रासाठी निधी देऊन कार्यान्वित करावे.

(७) मुस्लिम आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरवले आहे, त्यानुसार मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावे.

(८) मुस्लिम मराठी साहित्याचे विद्यापीठ स्तरावर अध्यासन केंद्र सुरू करावं. मुस्लिम साहित्यनिर्मितीसाठी नवलेखकांना अनुदान व पुरस्कार द्यावेत.

(९) साहित्य संस्कृती मंडळ व राज्यस्तरीय भाषा विकास मंडळाने प्रकाशित केलेल्या मुस्लिमांसंदर्भातील ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावं.

(१०) राज्यातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या नावाने राज्यातील सर्व विद्यापीठांत स्वतंत्र अध्यासन निर्माण करावं. तसंच फातिमाबी शेख यांच्या नावाने शिक्षिकांसाठी पुरस्कार सुरू करावा.

(११) साहित्य सांस्कृतिक व इतर शासकीय मंडळांवर मुस्लिम साहित्यकांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे.

काही वाद

* संमेलनाच्या चार दिवस आधी अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांना दलवाईवादी असल्याचा आरोप करत त्यांच्या निवडीला विरोध दर्शवण्यात आला. सारवासारव करणाऱ्या संयोजकांनी मात्र हमीद दलवाईंचे बंधू असलेले श्रीयुत हुसैन दलवाईंच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करून घेतलं. विशेष म्हणजे हुसैन दलवाईंच्या नावाला विरोध असूनही संयोजकांनी त्यांना पाचारण केलं.

* संघ विचारांचे प्रचारक असलेल्या प्रा. एस.एन. पठाण व भाजपचे पदाधिकारी विक्रम गायकवाड यांना संमेलनात का बोलावलं याविषयी स्थानिक उपस्थितांनी आक्षेप नोंदवला. गायकवाड भाजपचे सक्रिय पदाधिकारी आहेत तर प्रा. पठाण हिंदू राष्ट्रवाद्याचे व हिंदुत्ववाद्याचे विचार रेटतात असा आरोप केला गेला. बाबरी मस्जिदींवरील ताबा मुस्लिमांनी सोडावा, यासाठी जनमत घेतल्याचं व लोकांचे मन परिवर्तन केल्याचा पठाण यांच्यावर आरोप आहे.

* बहुभाषिक काव्य मैफलीत उर्दू शायरांनी वर्चस्व गाजवलं. मंचावरील सगळ्या खुर्च्या याच शायरांनी बळकावल्याचं दिसून आलं. त्यामुळे अनेक मराठी कवी नाराज दिसून आले. मराठी साहित्य संमेलनात उर्दू कवींना कशाला बोलावलं, यावरून धुसफूसही झाल्याचं ऐकिवात आहे.

* संमेलनातील सांस्कृतिक दहशतवाद या परिसंवादावर साप्ताहिक विवेकतरुण भारत सारख्या हिंदुत्ववादी पत्राने आक्षेप नोंदवत टीका केली होती. त्या टिपणाचे लेखक प्रमोद पाठक सभागृहात पूर्ण दोन दिवस हजर होते. अनेकांचं म्हणणे होतं की, मुस्लिमांची हेरगिरी करणाऱ्या पाठकला बाहेर काढावं. दोन्ही दिवस त्यांनी वारंवार उपद्रव माजवण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या द्वेशपूर्ण टिपणाच्या झेरॉक्स प्रती काढून संमेलन स्थळी वाटल्या. 

* काही सुत्रांच्या मते आरएसएस व हिंदुत्ववादी विचारांचे तब्बल १८ जण हॉलमध्ये बसून होते. काही जण औपचारिक चर्चांमधून किरकोळ वाद उत्पन्न करून वाद उभा करण्याचा प्रयत्न करत होते तर काहीजण ओळख दडवून बसले होते.

* समारोप सत्रावेळी एका आरएसएस स्वयंसेवकाचा मोबाईल हरवला. कार्यक्रम संपल्यानंतर दोन-तीन तासाने त्याच्या लक्षात आलं. तो धावत-पळत आला. त्याच्या मते त्यात सीमकार्ड नव्हतं, फक्त रेकॉर्डिगसाठी आणला होता. हे एकून काही कार्यकर्त्यांनी बरं झालं हरवला, मुसलमानांची हेरगिरी केल्याने दुसरं काय होणार असा टोला मारला.

* उद्धाटनाच्या दुसऱ्या दिवशी तमाम वृत्तपत्रात हुसैन दलवाई यांना कव्हरेज मिळालं. आयोजक व साहित्यिकांनी यावर नाराजी व्यक्त केल्याचं ऐकिवात आहे. शिवाय अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात होतं. समारोपानंतरही हुसैन दलवाईंना फोटोसह फुल्ल कव्हरेज मिळालं. त्यात अध्यक्षांचा फोटो कुठेच नव्हता. या वेळी मात्र दलवाईंनी राजकीय सोयीसाठी बातम्या मॅनेज केल्या आहेत, म्हणत अनेकांनी नाराजी वर्तवली. 

* संमेलनाला परवानगी मिळवण्यासाठी संयोजकांना खूप शिकस्त करावी लागली. पोलिसांनी बंदिस्त हॉलमध्येदेखील परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आलं. आदल्या दिवशी ग्रंथ दिंडीचा मार्ग बदलण्याच्या अटीवर परवानगी दिली गेली.

थोडक्यात प्रत्येक साहित्य संमेलनाप्रमाणे हेही भाषिक मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात वादात पार पडलं. पहिल्या दिवशी संमेलनाला श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. परंतु भाभा नगरमधील दादासाहेब गायकवाड हॉल साडे तीन हजार क्षमतेचा असल्याने उपस्थित श्रोते व प्रेक्षक चिमूटभर दिसत होते.

पुस्तकाच्या स्टॉलवर नेहमप्रमाणे गर्दी दिसत होती. जमात ए इस्लामीने लावलेल्या बुक स्टॉलवर बहुतेक गर्दी दिसून आली. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या आत्मकथनाला वाचकांची पसंती लाभली. चारही वेळी नॉनव्हेज जेवण असल्याने व्हेज इच्छुकांचा हिरमोड झाला. प्रमुख पाहुणे व साहित्यिकांच्या निवासाची सोय कालिका मंदिराच्या भक्त निवासात केली होती. पहिल्या दिवशी साहित्य रसिक व साहित्यिकांची भरपूर गर्दी होती. परंतु दुसऱ्या दिवशी रविवार असूनही ती ओसरली. स्थानिकांचं म्हणणे होतं की, संयोजक मुस्लिम मोहल्ल्यात पोहचू शकले नाही. अनेकांनी म्हटलं की, असा कार्यक्रम आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं.

संमेलनाचा उद्घाटन सोहळा व समारोपाचं संचालन मंगेश जोशी, शीतल भाटे व नीलोफर सय्यद यांनी केले. राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप झाला. रत्नागिरी व अहमदनगरला पुढच्या संमेलनाची निमंत्रणे मिळाल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

कलीम अजीम, पुणे

मेल: kailmazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मराठी मुसलमानांचा साहित्य मेळा
मराठी मुसलमानांचा साहित्य मेळा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUFTcjFFK12WUgcaC9G2LkN76_Q8ye3h2ViSiBlr4DiTgjWDXnx1fya_NC8MdWu45spkThrIkJsElSqnHH0j-iAcW9fYQRXsL_WkI4BCLM48IXb0KkTMyOE0QNzcYt8wIuVv9AdnAwzDUp8Oe9Gh7H0j7BDtTQlDyYFzH96xJu9k5QjGoMZxDqv4XtKFzZ/w640-h348/Nashik%20Muslim%20Marathi%20sahitya%20samelan.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUFTcjFFK12WUgcaC9G2LkN76_Q8ye3h2ViSiBlr4DiTgjWDXnx1fya_NC8MdWu45spkThrIkJsElSqnHH0j-iAcW9fYQRXsL_WkI4BCLM48IXb0KkTMyOE0QNzcYt8wIuVv9AdnAwzDUp8Oe9Gh7H0j7BDtTQlDyYFzH96xJu9k5QjGoMZxDqv4XtKFzZ/s72-w640-c-h348/Nashik%20Muslim%20Marathi%20sahitya%20samelan.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2023/02/blog-post_5.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2023/02/blog-post_5.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content