मुस्लिम मराठी साहित्य मुख्य प्रवाहाचा घटक

भाग-१

अखिल भारतीयमुस्लिम मराठी साहित्य परिषदेतर्फे दिनांक २८ व २९ जानेवारी २०२३ रोजी नाशिकला साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनाचे अध्यक्ष इस्लामचे अभ्यासक, भाष्यकार व संवादक अब्दुल कादर मुकादम होते. त्यांचं अध्यक्षीय भाषण नजरिया वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. 

जच्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, अध्यक्ष अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष अजीज नदाफ... साहित्य परिषदेच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी आणि मंचावरील मान्यवर... आपणा सर्वांस अभिवादन करतो.

या नवव्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला देऊन मला जो बहुमान दिला आहात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. या निमित्ताने माझे साहित्य आणि साहित्यिक या विषयींचे काही विचार आपणासमोर मांडत आहे.

साहित्याची प्रेरणा प्रयोजन

लेखक साहित्य का निर्माण करतात आणि वाचक ते का वाचतात? हा साहित्य क्षेत्रात सतत चर्चिला जाणारा विषय आहे. या चर्चेतूनच साहित्याची प्रेरणा प्रयोजन या संकल्पना पुढे आल्या आणि विकसित झाल्या. या विकास प्रक्रियेचा शोध घेतला तर हे हि लक्षात येते की काही वेळा प्रेरणेमुळे साहित्य निर्मितीला प्रयोजन मिळते. तर काही वेळा प्रयोजनातून साहित्य निर्मितीला प्रेरणा मिळते. याचाच अर्थ असा की प्रेरणा आणि प्रयोजन या दोन्ही संकल्पना एकमेकांना पूरक आहेत. कदाचित यामुळेच साहित्य निर्मितीच्या इतिहासात एकीकडे साहित्य निर्मितीची वेगवेगळी प्रयोजने नोंदली गेली आहेत. तर दुसरीकडे प्रेरणेमुळे साहित्य निर्मितीला प्रयोजन लाभले आहे. परिणामी एकाच वेळी परस्परांहून भिन्न आणि तरीही परस्परांना पूरक असलेल्या या दोन संकल्पनांमुळे विविध प्रकारची साहित्य निर्मिती होत आली आहे.

या साहित्य प्रकारांचा विचार करता ढोबळपणे ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य असे दोन प्रमुख प्रकार समोर येतात. पुन्हा या दोन प्रकारात काही उपप्रकार असल्याचेही आढळते. उदाहरणार्थ ललित साहित्यात कथा, कादंबरी, काव्य, नाटक, प्रवासवर्णने इत्यादीचा अंतर्भाव करावा लागेल. तर पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र अशा सारख्या वैज्ञानिक विषयांवरील लेखन किंवा इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र धार्मिक आणि सामाजिक परंपरा इत्यादी विषयांवरील साहित्याचा अंतर्भाव वैचारिक साहित्यात करता येईल.

साहित्याचे असे विविध प्रकार असल्यामुळे त्यांचे प्रयोजन आणि प्रेरणा याही भिन्न असणार हे ओघानेच आले. या प्रयोजनांचा शोध घेतल्यास त्यात आत्माविष्कार, स्वप्नरंजन, निवेदन, रसनिर्मिती, जीवनभाष्य असे अनेक प्रकार साहित्यशास्त्राच्या इतिहासात नोंदले गेले आहेत. या पैकी बहुतांश प्रकार ललित साहित्याशी संबंधित आहेत हे मान्य केले तरी त्यातील काहींचा संबंध वैचारिक साहित्याशीही येतो. यामध्ये आत्माविष्कार, निवेदन आणि जीवनभाष्य यांचा उल्लेख करता येईल.

साहित्य ललित असो की वैचारिक, त्याची निर्मिती करणारा लेखक त्याला जे जाणवते, ते तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला व्यक्त करण्याच्या या प्रयत्नालाच आत्माविष्कार म्हणतात. म्हणून लेखकाची सर्व प्रथम बांधिलकी त्याच्या जीवनानुभवाशी आणि ते व्यक्त करणाऱ्या ऊर्मीशी असते. ही ऊर्मीच लेखकाच्या आत्माविष्काराची प्रेरक शक्ती असते. तीच त्याच्या लेखनाचे स्वरूप आणि प्रयोजन निश्चित करत असते. ज्या आंतरिक इच्छेमुळे लेखकाला आत्माविष्कार करावासा वाटतो ती त्याची प्रेरणा असते. तसेच जीवनानुभव आणि जाणिवा यांच्या आधारे लेखक आपल्या साहित्य प्रकारची निवड करत असतो आणि शब्दांच्या माध्यमातून त्या व्यक्त करत असतो.

माध्यमाशिवाय आत्माविष्कार होऊ शकत नाही. म्हणूनच प्रत्येक कला प्रकाराला त्याचे स्वतंत्र असे माध्यम असते. स्वर हे संगीताचे, रंगरेषा हे चित्राचे, पाषाण हे शिल्पाचे, मुद्रा ताल हे नृत्याचे, तसेच शब्द हे साहित्याचे माध्यम असते. या माध्यमाच्या द्वारे निर्माण होणारे साहित्य ही एक नवनिर्मिती असते. ललित लेखकाच्या बाबतीत ही नवनिर्मिती साधन नसून साध्य असते. पण वैचारिक साहित्यिकाच्या बाबतीत शब्दाचे माध्यम हे साधन असते. ललित वाङ्मयाची निर्मिती ही एका संवेदनशील मनाची निर्मिती असते. तिचा संबंध वाचकांच्या भावजीवनाशी असतो, तर वैचारिक साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकाच्या निर्मिती-प्रक्रियेचा संबंध प्रामुख्याने बुद्धीशी असतो. म्हणून वैचारिक लेखन करणारा लेखक बुद्धिवंत किंवा विचारवंत असतो, असे म्हटले जाते

वैज्ञानिक हा चराचर सृष्टीच्या विविध घटकांचे स्वरूप, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया, त्यातील कार्यकारण भाव याचा शोध घेऊन त्यातून गवसलेलं सत्य लोकांसमोर ठेवून त्यांचे बौद्धिक प्रबोधन पर्यायाने मानवी जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच इतिहासाचा अभ्यास वर्तमान जाणून घेऊन भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी करावयाचा असतो. या जाणिवेने आणि बांधिलकीने इतिहासकार भूतकाळाचा वेध घेऊन, होऊन गेलेल्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करीत समाजाने वर्तमान भविष्यातही कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो.

वाचा : भाग-२ : इस्लामचे जागतिक ज्ञान क्षेत्रात योगदान

वाचा : मराठी मुसलमानांचा साहित्य मेळा

सामाजिक विषयांवर निर्माण होणारे साहित्य ही नाण्याची दुसरी बाजू आहे. व्यक्ती आणि समाज यावर धार्मिक परंपरांचा जबरदस्त प्रभाव असतो. त्यामुळे माणसाचे मन आणि बुद्धी कुंठित झालेली असते. परिणामतः पारंपरिक समाजव्यवस्थेत अंगभूत असलेले अन्याय शोषण यांचे बळी झालेले समाजघटक त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु काळाच्या ओघात धार्मिक परंपरेतील कालबाह्य मूल्ये त्यामुळे होणारे शोषण अन्याय यांची तीव्र जाणीव होणाऱ्या त्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती निर्माण होतच असतात. अशा प्रज्ञावंतांना त्यांच्या अनुभवातूनच समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळते आणि त्यातूनच प्रबोधन आणि परिवर्तनासाठी ते साहित्य निर्मिती करतात

पारंपरिक समाजात माणसांची मने आणि बुद्धी धर्मपरंपरेने बंदिस्त केलेली असतात. या परिस्थितीतून त्यांना मुक्त करण्यासाठी समता न्याय या मूल्यांचा आणि पुरोगामी विचारांचा प्रभावी प्रचार करू शकणाऱ्या साहित्याची गरज असते. असे साहित्य निर्माण करण्यासाठी या मूल्यांची आणि आधुनिक विचारांची बांधिलकी जशी आवश्यक असते तसेच सामाजिक आणि धार्मिक परंपरेतील कालबाह्य काळातीत भाग कोणता कालबाह्य झालेल्या गोष्टींमुळे समाजात निर्माण होणाऱ्या अन्याय अत्याचार वा शोषणाचे नेमके स्वरूप काय आहे, हे जाणून घेणेही आवश्यकच असते. कारण या जाणिवेमुळेच लेखकाच्या अंतर्मनी वैचारिक संघर्ष सुरू होतो

हा वैचारिक संघर्षच त्या लेखकाला त्याचे अनुभव आणि विचार व्यक्त करण्यास प्रवृत्त करत असतो. वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकाचा हा आत्माविष्कारच असतो. पण ललित लेखन आणि वैचारिक साहित्यातील आत्माविष्कारात एक सूक्ष्म भेद आहे. ललित लेखक त्याला जे जाणवते ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याची ती सहजप्रवृत्ती असते. तिला प्रतिभा किंवा सृजनशीलताही म्हणता येईल. ही प्रतिभा किंवा सृजनशीलताच त्याला साहित्यनिर्मितीस प्रवृत्त करत असते. ललित लेखकाच्या साहित्यातून व्यक्त होणारा आत्माविष्कार त्याच्या सृजनशीलतेची अभिव्यक्ती असल्यामुळे, इतरांना ती समजेल किंवा रुचेल की नाही, या विषयीची त्याची भूमिका काहीशी विरक्ततेची किंवा उदासीनतेची असते.

वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकाची भूमिका यापेक्षा वेगळी असते. ललित लेखकसारखाच वैचारिक लेखन करणारा लेखकही त्याच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटनांनी प्रभावित होत असतो. या अनुभवांचा अन्वयअर्थ जाणीवपूर्वक समजून घेऊन तो अर्थ आपल्या साहित्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न वैचारिक लेखन करणारा साहित्यिक करत असतो. त्या अर्थाने त्याची वैचारिक अभिव्यक्ती हा त्याचा आत्माविष्कारच असतो. पण असा लेखक केवळ आत्माविष्कार करून थांबत नाही. त्या पलीकडे जाऊन त्याला समाजात प्रबोधन आणि त्या मार्गाने परिवर्तन घडवून आणायचे असते.

बदल हा चराचर सृष्टीचा स्थायी भाव आहे तर स्थितिप्रियता हा पारंपरिक समाजाचा स्वभावधर्म असतो. अशा परिस्थितीत सतत बदलत जाणाऱ्या जीवनाचे स्वरूप समजून घेऊन त्याच्याशी सुसंगत असे परिवर्तन आचारविचारांत घडवून आणल्याशिवाय व्यक्ती आणि समष्टीची प्रगती होऊ शकत नाही. असे परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रथम प्रबोधनाची गरज असते. आणि अशा प्रबोधनाला बुद्धिवादाची पुरोगामी विचार आणि मूल्यांची भक्कम बैठक असावी लागते. म्हणूनच प्रबोधन आणि परिवर्तनवादी या दोन्ही बाबी एकमेकांस पूरक असतात तशाच त्या एकमेकांशी कार्यकारण भावाने जोडलेल्याही असतात. म्हणून वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकाच्या साहित्याचे प्रबोधन आणि परिवर्तन हे प्रयोजन असते. या प्रयोजनातूनच त्याला लेखनाची प्रेरणाही मिळत असते.

वाचा : डॉ. अलीम वकील यांचं अध्यक्षीय भाषण

वाचा : संमेलन संपले, अखिल भारतीयच, पण मुस्लीम मराठी!

मुस्लिम मराठी साहित्य भिन्नता आणि एकात्मता

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक मुस्लिम लेखक मराठीतून लेखन करत आहेत. या लेखकांना आपल्या व्यथा वेदना आणि नातेसंबंधांतून निर्माण होणारे भावनिक ताण तणाव प्राधान्याने काव्यातून व्यक्त करावेसे वाटतात. साहजिकच या लेखनात काव्य निर्मिती अधिक झालेली दिसते. तरीही काही लेखकांनी आपले जीवनानुभव गद्य लेखनातूनही व्यक्त केले आहेत. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे त्याचे पुढचे पाऊल होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम मराठी साहित्य संमेलनांचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. ही प्रथा खरोखरच स्वागतार्ह आहे. पण मुस्लिम मराठी लेखकाची साहित्य निर्मिती आणि साहित्य संमेलने चिकित्सक साहित्यिक चर्चेचे विषयही झाले आहेत. ही या नाण्याची दुसरी बाजू आहे.

सर्वच भाषांच्या साहित्यिक निर्मितीविषयी मुक्तचर्चा होणे हे त्या भाषेच्या आणि त्या भाषेत निर्माण होणाऱ्या साहित्याच्या प्रगतीचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. तेव्हा मुस्लिम मराठी साहित्य निर्मिती विषयी मुक्त चर्चा होत असेल तर ती मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य आहे, असे समजूनच त्या चर्चेचे स्वागत केले पाहिजे. पण या चर्चेत काही मूलगामी मुद्दे उपस्थित करण्यात आले असतील, तर त्याची योग्य ती दखल घेऊन त्याचे तर्कशुद्ध विश्लेषण करून या साहित्यिक वेगळेपणाचे स्वरूप उलगडून दाखविणे, ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, ही बाब आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही.

या पार्श्वभूमीवर आपण मुस्लिम मराठी साहित्याचा विचार करू गेल्यास आपल्या लक्षात येईल की मुस्लिम मराठी साहित्यिक ज्या मराठी भाषेतून आपल्या साहित्याची निर्मिती करत असतात ती मुख्य प्रवाहातील मराठीपेक्षा कुठल्याही अर्थाने वेगळी नाही. किंबहुना त्यांच्यात पूर्णतः एकरूपता आहे. मात्र मराठी मुसलमानांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन पद्धतीतील एक पैलू मराठी भाषा आणि संस्कृतीच्या विविध पैलूंपेक्षा काहीसा वेगळा असतो.

मराठी भाषा आणि संस्कृतीच्या मूलभूत स्वरूपातील हे वेगळेपण आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हे वेगळेपण कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील आहे आणि त्याचा उद्गमबिंदू धर्मभिन्नतेमुळे त्याच्या दैनंदिन जीवनशैलीत आणि संस्कृतीत झालेल्या परिवर्तनात आहे किंवा असतो. हे गुणात्मक परिवर्तन विचारात घेतल्याशिवाय मुस्लिम मराठी साहित्याची समीक्षा यथायोग्य रीतीने करता येत नाही. कारण मुस्लिम मराठी साहित्यातील हा वेगळा पैलू एकीकडे आपल्या वेगळेपणाचे दर्शन घडवित असतो तर दुसरीकडे व्यापक मराठी साहित्याशी आणि पर्यायाने मराठी संस्कृतीशी असलेले अतूट नाते अधोरेखित करीत असतो

वाचा : उदगीर : विद्रोही साहित्य संमेलनातील अध्यक्ष गणेश विसपुते यांचे भाषण

वाचा : उदगीर : विद्रोही साहित्य संमेलनातील स्वागताध्यक्षडॉ. अंजूम कादरी यांचं भाषण

मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता

तेव्हा मुस्लिम मराठी साहित्यातील हा वेगळा पैलू आणि मुख्य मराठी साहित्य प्रवाहाशी असलेले त्याचे अतूट नाते समजून घेण्यासाठी मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे.

या देशात जन्माला येणारे प्रत्येक मूल आपल्याबरोबर तीन अस्मिता घेऊनच जन्माला येत असते. ज्या आई-वडिलांच्या पोटी ते मूल जन्माला येते त्यांचा धर्म त्याला आपोआपच प्राप्त होत असतो. ही त्याची पहिली अस्मिता असतो. आपण तिला धार्मिक अस्मिता म्हणू शकतो. त्या मुलाचे आई-बाप ज्या प्रदेशाचे किंवा राज्याचे मूळ रहिवासी असतात ती त्यांची प्रादेशिक अस्मिता असते. तीच त्यांच्या मुलाला वारसा हक्काने प्राप्त होते. म्हणजे ही त्याची दुसरी अस्मिता असते. आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्या मुलाचे आईवडील भारताचे नागरिक असतात आणि त्यामुळे भारताचे नागरिकत्वही त्याला त्याच वारसाहक्काने प्राप्त होते. ही त्याची तिसरी आणि राष्ट्रीय अस्मिता असते.

या तिन्ही अस्मितात समतोल साधणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असते. पण त्याच वेळेस भाषा आणि साहित्याच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास दुसरी म्हणजेच प्रादेशिक अस्मिताच निर्णायक ठरत असते. कारण त्यामुळेच त्या भाषेतील साहित्य निर्मितीला प्रेरणा आणि प्रयोजन मिळत असते. या साहित्यिक प्रक्रियेमुळेच भाषा समृद्ध होत असते.

या प्रक्रियेत आणखी एक घटक कार्यरत असतो आणि तो म्हणजे धर्म! कुठल्याही राज्यात किंवा प्रदेशात प्रादेशिक आणि राष्ट्रीय अस्मिता समान असतात. पण धर्मभिन्नतेमुळे धार्मिक अस्मिता मात्र भिन्न असते. त्यामुळे मुस्लिम मराठी साहित्यिक लेखकांच्या साहित्यात या धार्मिक अस्मितेचे प्रतिबिंब या ना त्या स्वरूपात पडलेले आढळते.

मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूपया संपादित ग्रंथात अनेक मराठी कवी गद्य लेखकांच्या कविता, लेख प्रसिद्ध झालेले आहेत. (संपादक प्रा. .. शहाजिंदे आणि प्रा. फारुख तांबोळी) या लेखांतून आणि कवितांतूनही या लेखकांच्या धार्मिक अस्मितांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष दर्शन घडले. इथे श्रीमती आशा आपराद या प्रथितयश लेखिकेच्या उपरोक्त ग्रंथातील मी का लिहिलेया शीर्षकाच्या लेखाचा उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो.

मी का लिहिलेया त्यांच्या लेखात त्यांनी म्हटले आहे की, “माझ्या वयाची पन्नास वर्षे पूर्ण होईतोपर्यंत अनेकविध अनुभवातून नाना प्रकारे यातनामय जीवन जागून झाल्यावर, अंतरात जे साठत गेले त्याचा निचरा व्हावा असं वाटू लागलं आणि त्यातूनच लिहिण्याची निकड भासू लागली.” ही निकड हेच त्यांच्या लेखनाचे प्रयोजन होते, असे आपण म्हणू शकतो.

आशाताईंचे वरील उद्धरण तत्सम कौटुंबिक आणि सामाजिक संस्कारात वाढलेल्या एकूणच मराठी महिलांचे प्रातिनिधिक स्वरूप आहे, असे निश्चित म्हणता येईल. पण त्याचबरोबर धार्मिक आणि सांस्कृतिक भिन्नतेमुळे अशा संस्कारात वाढलेल्या लेखक कविंंच्या अभिव्यक्तीत किंवा आविष्कार शैलीत काही भिन्नता असणे अपरिहार्य असते, ही बाबही दुर्लक्षित करता येणार नाही.

मात्र ही भिन्नता किंवा वेगळेपण मराठीच्या मुख्य प्रवाहापासून पूर्णतः वेगळे आहे असे समजण्याचे कारण नाही. किंबहुना मराठी भाषेच्या मुख्य प्रवाहाचा एक अविभाज्य घटक आहे. आणि तीच त्याची मर्यादा आहे. हीच मुस्लिम मराठी कवी लेखकांची भूमिका आहे. असे मला वाटते. माझ्या या भूमिकेशी ते सहमत होतील अशी मी आशा करतो. अनेक मुस्लिम आणि इतरही साहित्यिकांनी या पूर्वीच अशी भूमिका आपल्या गद्य आणि पद्य साहित्यातून मांडली आहे.

कवी जावेद कुरैशी हे त्यापैकीच एक. “डॉ. आंबेडकरया शीर्षकाच्या त्यांच्या कवितेतून त्यांनी हीच भूमिका मार्मिकपणे मांडली आहे, ते म्हणतात:

डॉ. आंबेडकर, तुमच्या विचारांचे शस्त्र हाती घेऊन मी युद्धरत आहे

पण आंबेडकर सांस्कृतिक अस्मितेसह मी शोषित कसा?

याचे उत्तर धर्मग्रंथात नव्हे तुझ्या लेखणीत गवसले!

आता मी निर्धास्त आहे. एका हातात मुस्लिम अस्मिता

दुसऱ्या हातात संविधान आहे

आणि या दोहोंच्या मध्ये त्यांची प्रादेशिक अस्मिताही अध्याहृत आहे.”

वाचा : उदगीर : शरद पवार यांचे उद्वघाटनाचे भाषण

वाचा : उदगीर : भारत सासणे यांचे अध्यक्षीय भाषण

डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांचे काहीसे वेगळ्या वळणाचे विश्लेषणही दखल घेण्यासारखे आहे. ‘मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूपया उपरोक्त ग्रंथातील त्यांच्या याच शीर्षकाच्या लेखात त्यांनी म्हटले आहे की मुस्लिम साहित्य प्रवाह इतर साहित्य प्रवाह यात एक महत्वाचा असा गुणात्मक फरक आहे आणि तो म्हणजे नव्या मुस्लिम पिढीस हे तीव्रपणे जाणवते की महाराष्ट्रात जवळपास ११ टक्के मुस्लिम समाज असताना देखील या समाजाचे चित्रण तटस्थपणे मराठी साहित्यात झालेले नाही.

सर्वात चीड आणणारी बाब म्हणजे आज पर्यंतच्या (सन १८८५ नंतरचे) मराठी साहित्यात मुसलमानांना एकतर खलनायक, विदूषक किंवा बदमाश गुंड याच रूपात करण्यात आलेले आहे. एक माणूस म्हणून त्याचे चित्रण झालेले नाही. (तत्रैव पृष्ठ १२१).

याचाच अर्थ असा की महाराष्ट्रात दहा/पंधरा टक्के असलेल्या मराठी मुसलमानांच्या काहीशा वेगळ्या परंतु वैशिष्टयपूर्ण असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात जितक्या प्रभावीपणे पडायला हवे आहे तितक्या प्रभावीपणे ते पडलेले आढळत नाही.

वरील उद्धरणातून व्यक्त झालेली नव्या पिढीतील मुस्लिम साहित्यिकांचे खंत डॉ. रणसुभेनी नेमकी हेरली आहे.

नव्या पिढीतील मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या विशेषतः कवींच्या काव्यातून मुस्लिम समाजाची व्यथा वेदना आणि निराशा मोठ्या प्रमाणावर प्रतिबिंबित झालेली आढळते. अर्थात ते समाज जीवनाचे वास्तव असल्यामुळे साहित्य व्यवहारात त्याचे प्रतिबिंब पडणे साहजिक आहे.

पण हे मान्य केल्यानंतरही, आशावाद हाच मुस्लिम मराठी साहित्याचा स्थायीभाव आहे असे मला वाटते. कारण तशा तऱ्हेने आश्वासित करणारे संदर्भ काही काव्य पंक्तीतून आढळतात. पण स्थलकालाच्या मर्यांदांमुळे त्या सगळ्यांची नोंद घेणे इथे शक्य होणार नाही. पण नमुना म्हणून काही काही काव्यपंक्तींचा संदर्भ देणे हेही तितकेच आवश्यक आहे असे वाटते.

जावेद पाशा (कुरैशी) यांच्या खालील पंक्तीत त्यांनी हाच आशय सांगितला आहे:

या दंग्यांनी हाताना सवड दिली तर

टाकाऊ वस्तूंतून ही पोट जागविणारे

देशही जागवून दाखवतील

या दंग्यांनी हाताना सवड दिली तर

बेचिराख झोपड्यांतूनही

मानवतेचे मनोरे बांधून दाखतील

इथे मी आणखी एका मुस्लिम मराठी साहित्यिकाचा उल्लेख करु  इच्छितो. मला वाटले आपणा सर्वांना ते नाव माहित आहे. कारण २०१६मध्ये याच परिषदेच्या विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे नाव आहे शफाअत खान!

वाचा : काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर

वाचा : मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तीन दशकं

आता पर्यंत मी आपणाशी बोलत असताना काव्य, ललित लेखन, वैचारिक लेखन या विषयी बोललो. पण नाटक आणि नाटककार या विषयी बोललोय नाही. आता बोलतोय. कारण शफाअत खान एक प्रथितयश नाटककार आहेत. विशेष म्हणजे त्यांचे अनुभवविश्व नुसते व्यापक आहे असे नव्हे तर ते वगळे ही आहे. या अनुभवविश्वात त्याना भेटणारी माणसेही सामान्यजनांपेक्षा वेगळी आहेत. साहजिकच त्यांना आपणासमोर आणण्यासाठी शफाअत खान यांनी Black Comedy, Dark Humor आणि Satire अशा विविध शैलींचा वापर केला आहे आणि असा वापर करत त्यानी स्वतःची शैली, रंगभाषा विकसित केली आहे. ही विविध पात्रे रंगभूमीवर येतात तेव्हा प्रेक्षकांना हसवता हसवताना त्यांच्या डोळ्यात पाणी आणतात, ही त्यांच्या नाटकांची खासीयत आहे.

त्यांच्या गाजलेल्या नाटकात, शोभायात्रा, टाईमपास, गांधी आडवा येतोय मुंबईतले कावळे, भूमितीचा फार्स यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. त्याना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नाट्यदर्पण पुरस्कार, राज्य साहित्य पुरस्कार (महाराष्ट्र शासन), मामा वरेरकर प्रतिष्ठान महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार झी अपना अॅवॉर्ड ही त्या पैकी काही. पण नाट्य क्षेत्रापुरताच त्यांचा वावर सिमित राहिलेला नाही. नाट्यलेखनापासून ते मुंबई ड्रामा (Drama) नॅशनल थिएटर सम्मिट, महारंग परिषद फॉर अॅकेडेमी ऑफ थिएटर आर्ट अशा अनेक नाट्यरंगी संस्थांमध्ये ते सतत वापरत असतात.

आतापर्यंत आपण मुस्लिम मराठी साहित्यिक, त्यांचे अनुभवविश्व त्यातून निर्माण होणारे त्यांचे साहित्य, त्या साहित्याची प्रेरणा आणि प्रयोजन याची विश्लेषणात्मक चिकित्सा केली. आता थोडे वेगळे वळण घेऊन इस्लामी इतिहासाची वाटचाल आणि संस्कृतीचा उगम आणि विकास कसा झाला याचा वेध घेणार आहोत. कारण आपले कौटुंबिक आणि सामुदायिक जीवन साहित्य प्रमाणेच आपल्या सांस्कृतिक विकासाचा सर्वात महत्वाचा घटक असतो. आणि हे सामुदायिक जीवन एखाद्या साखळी सारखे असते

या साखळीतील प्रत्येक दुवा (सांधा) एकीकडे मागच्याला आणि दुसरीकडे पुढच्याला जोडलेला असतो. यालाच आपण जीवनाचे सातत्य म्हणत असतो. म्हणूनच कुठलाही समाज आपला भूतकाळ विसरू शकत नाही. हा भूतकाळ समजून घेतल्याशिवाय आपल्याला वर्तमान समजून घेता येत नाही. या प्राक्रियेने आपण भूतकाळ आणि वर्तमान काळ समजून घेतला की आपल्याला भविष्याची नवी दिशा समजून घेता येते. यालाच आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या विकासाची नवी डिश म्हणतो.

क्रमश:

संमेलनाध्यक्ष

अब्दुल कादर मुकादम

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मुस्लिम मराठी साहित्य मुख्य प्रवाहाचा घटक
मुस्लिम मराठी साहित्य मुख्य प्रवाहाचा घटक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjymW80oNPHygJQXYlNPH-LZqDQqcexII4J-ETFpeYc2mW4XObeJ_gj-hNQihPCApivta4obHsMTTqbHL7Cm9S-x29qS0OpA1eT1OhX6xFeat73TW-iIySdgi9lt-5uBE-O8yG21Uknax3WDcNVD7AopQEJp27BQg2lYntHqeerxEJ_sYhBblZYEXeCIw/w640-h392/Mukadam%20NSK.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjymW80oNPHygJQXYlNPH-LZqDQqcexII4J-ETFpeYc2mW4XObeJ_gj-hNQihPCApivta4obHsMTTqbHL7Cm9S-x29qS0OpA1eT1OhX6xFeat73TW-iIySdgi9lt-5uBE-O8yG21Uknax3WDcNVD7AopQEJp27BQg2lYntHqeerxEJ_sYhBblZYEXeCIw/s72-w640-c-h392/Mukadam%20NSK.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2023/01/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2023/01/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content