सहस्त्रकानंतरचा मराठी सिनेमा अभ्यासताना प्री
फ्रॅण्ड्री व आफ्टर फॅण्ड्री असे दोन भाग केले जातील. नागराज मंजुळेंच्या फॅण्ड्री
नंतर महाराष्ट्रातील मराठी सिनेदर्शकांची सिनेअभिरूची कमालीची बदलली आहे. 72 मैल
एक प्रवास, फॅण्ड्री, कोर्ट, ख्वाडा, हलाल, दशक्रिया आणि बबनसारख्या सिनेमाला
गरीब-मध्यमवर्गीय दर्शकांनी ‘हेच मला म्हणायचं होतं’
म्हणत कवटाळलं.
फॅण्ड्री आणि ख्वाडाने चातुवर्ण्य व्यवस्थेविरूद्धचा विद्रोह व बंडाचा
नवा पायंडा पाडला. सामान्य दर्शकांनी या सिनेमांची स्वत:हून
माऊथ पब्लिसिटी करत लोकांपर्यंत पोहचवलं. त्यामुळे फेसबूक, यूट्यूब, व्हॉट्स
एपवरुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच काय तर जगभरात हे सिनेमे पोहचले.
आशयाच्या पातळीवर सर्वोत्तम असणारे हे सिनेमे
तांत्रिकदृष्ट्या अनेक ठिकाणी चुकले असतीलही पण, त्यांची अभिव्यक्ती प्रामाणिक
होती. बहुसंख्यांकाच्या प्रश्नांना भिडणारा आशयघन या सिनेमांनी चित्रपटसृष्टीला दिला.
प्रश्न व समस्यांना वाचा फोडणे व शुद्ध अभिव्यक्ती परंपरेतून हे सिनेमे काढले गेले
आणि काढण्यात येत आहेत.
ज्या पद्धतीने साठच्या दशकात दलित साहित्याने आपले प्रश्न
मांडत साहित्य लेखनकलेला विविध आयाम दिले, अगदी त्याच पद्धतीने सिनेक्षेत्रात
शोषित वर्ग आपले मुलभूत प्रश्न मांडू पाहत आहे. या व्यतिरिक्त दुसरा अन्य हेतू,
दृष्टिकोन यामागे नाही व नसावा. पण गेल्या कित्येक वर्षांपासून सिनेनिर्मितीची
मक्तेदारी असलेल्या निर्मात्यांकडून विशिष्ट प्रकारचा सांस्क़ृतिक, जातीय, धार्मिक
आणि वर्णभिमानी, वर्गीय वर्चस्ववाद नियोजनबद्धरीत्या प्रसवणे सुरू होता व आहे. पूर्वी सुप्त असलेला हा
प्रकार अलीकडे उघडपणे सिनेमा व मालिकांमधून प्रदर्शित होऊ लागला आहे.
मागील 70 वर्षांचा सिनेमा काढला तर प्रत्येक
फ्रेममध्ये सिनेसायकोलॉजी दडलेली आपणास पाहायला मिळेल. असे सिनेमे अभिजात
कलाकृतीच्या नावाने सर्रास खपवले गेले. अशा प्रकारे ठरावीक वर्ग गटांचे अत्यंत
सुमार, टुकार सिनेमे सांस्कृतिक ठेवा व मूल्यांच्या पोकळ नावाने गाजवले व फुगवले जात असतात.
हे तंत्र जुनं झालं असलं तरी त्य़ाचं मोल आजही तेवढंच आहे.
गेल्या काही वर्षांपासून
चित्रपट समीक्षा वाचून थियटरकडे जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढली आहे. त्यानुसार
मीडिया मॅनेजमेंट करून कौतुकाचे ‘पेड’ समीक्षण लिहिणे
अलीकडे करिअरचं नवं क्षेत्र म्हणून उदयास आलं आहे. यातूनच काकस्पर्श, बालगंधर्व,
नटसम्राट, किल्ला, कट्यार काळजात घुसली, मुराब्बा, गुलाबजाम सारखे इत्यादी सिनेमे
समीक्षणाचे शब्दखेळ करून गाजवले गेले.
अशा प्रकारच्या सिनेमांना एका ठरावीक वर्गाने अक्षरश:
डोक्यावर घेऊन शाब्दिक मिरवणुका काढल्या. आपल्याच कंपू गटात या सिनेटीमचे कौतुक
सोहळे पार पाडले गेले. हे मराठी सिनेमे आशयघनच्या फुलपट्टीत मोजून चिकित्सा केली
तर गणित शून्य येईल. केवळ तांत्रिकदृष्ट्या बरी निर्मिती करून सिनेमे हीट होत
नाहीत, हे अलीकडच्या हिंदी सिनेमांचे काही उदाहरणे पाहता स्पष्ट झालं आहे. पण हाच
फंडा महाराष्ट्रातील काही निवडक चित्रपटांना लागू करण्यात आला,
सिनेमटोग्राफी,
महागडे कलाकार, बडेजाव मिरवणारे सेट्स उभारून, गीत-संगीतावर जोर देत परदेशात
चित्रीकरण करून पब्लिसिटी व मार्केटिंगच्या जोरावर पुणे-मुंबईला अवघा महाराष्ट्र
म्हणत मोजक्या लोकांच्या सिनेअभिरुचीवर मराठीत सिनेमे बळजबरी हीट केले गेले.
विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उर्वरीत पश्चिम
महाराष्ट्रातील समीक्षक-दर्शकांनी अशा सिनेमाच्या कुळ आणि मूळावर भाष्य करून
त्याची चिरफाड केली. या समीक्षकांना उत्तर देताना ‘तुम्हाला सिनेमातलं
काय कळतंय?’ अशी हेटाळणी केली जाते. अशा प्रकारे
उच्चवर्णीय जाणिवा, सांस्कृतिक आक्रमण थोपवणे व विशिष्ट वर्णीय अजेंडा रेटण्यासाठी
अलीकडे काही सिनेमा तयार केले जात आहेत. हा छुपा अजेंडा व कुरघोडी सामान्य दर्शक
सहज ओळखू शकणार नाही, पण सिने तंत्रज्ञान माहीत असलेला किंवा Film
Appreciation ज्ञात असलेला कुणीही त्यावर
पटकन बोट ठेवू शकतो.
हे सांस्कृतिक षडयंत्र अलीकडे मोठ्या प्रमाणात उघडकीस आणलं जात आहे. आपली पोल-खोल होत असल्याचं कळतातच संबंधित गटाकडून खालची पातळी गाठत त्यांच्यावर टीका
करण्याचं धोरण राबविलं जाते. सोशल मीडियावर तर वर्ग व जातीयवादी मानसिकतेचे
ओंगळवाणं प्रदर्शन करण्याचा उद्योग ही मंडळी करतात.
सुधारणावादी म्हणवणारे अशांना
उघड समर्थनही देतात. फॅण्ड्री, ख्वाडा व कोर्ट संदर्भात पूर्वग्रहदूषित लिखाणाचं
गाजर गवतासारखं पीक आलं होतं. आजही गप्पांमध्ये या सिनेअभिव्यक्तीची कुठलीही
आडपडदा न बाळगता हेटाळणी केली जाते.
गेल्या तीन-एक वर्षांत नव-माध्यम क्रांतिचं
फलित म्हणून सामान्याच्या हातात मोबाईल कॅमेरा आला. दृकश्राव्य माध्यमांचे महत्व
एकेका फोटो क्लीकमधून त्यांना उमजत गेले. आता हा वर्ग एडटिंग एपच्या साहाय्याने
शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत. काहींनी थेट सिनेनिर्मितीचा अभ्यास व प्रशिक्षण घेऊन
चित्रपट निर्मितीत उडी घेतली आहे.
सिनेमाचा तंत्र आणि मंत्र अवगत झालेला हा वर्ग
समूह उच्चवर्णीयाच्या निर्मितीवर प्रश्न उपस्थित करत आहे. विषय, आशय, निर्मिती
तंत्रावर भाष्य करत आहे. इथून पुढे अत्यंत सुक्ष्म पद्धतीने अशा प्रकारच्या
कलाकृतीची चिरफाड केली जाईलच. फॅण्ड्री, कोर्टनंतर वस्तुनिष्ठ समीक्षणाचा दर्जा
आणखीन उंचावला आहे. त्यामुळे भविष्यात सिनेमा आणि त्याच्या तंत्रावर भाष्य होईलच
पण ‘छुपा अजेंडा’ व ‘सास्कृतिक
वर्चस्ववाद’ लादणाऱ्या वर्गीय गटांची तेवढ्याच आक्रमक
पद्धतीने चिकित्सा होईल.
अलीकडे आलेल्या काही वर्गीय चित्रपटांच्या
दर्जा व आशयसुत्रावर सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा झडल्या. काही व्यक्तिगत होत्या,
तर काही अत्यंत सुमार.. गुलबजाम सिनेमानंतर अनेक ग्रूप्समध्ये व्रण आणि वर्गाच्या
सिनेअभिरुचीबद्दल अनेक चर्चा केल्या गेल्या.
16 फेब्रुवारी 2018ला ‘गुलाबजाम’ रिलीज झाला. ‘झी स्टुडिओ’ने त्याची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शक सचिन कुंडलकर आहेत. तर सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी अभिनय केला आहे. आदित्य आणि राधा, त्यांची ही कथा नेमकी काय आहे, त्याचं नेमकं राजकारण, एक समूह गटाबद्दलची तुच्छता, एकाच वर्णगटाच्या खाद्यसंस्कृतीचा बढाई करणारा हा सिनेमा आहे, अशी त्यावर टीका सुरू आहे.
‘शोधार्थी अभ्यास
गट’ नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रूप, फेसबुकवर गुलाबजामसारख्या
ब्राह्मणी गटांतील सिनेअभिरुचीवर टीका करण्यात आली. इतकेच नव्हे तर, खिमा, पाया,
वजळी अशा बीफ गटातील खाद्यसंस्कृतीवर भाष्य करण्यात आलं. या सारख्या सिनेअभिरुचीवर
भाष्य करणाऱ्या निवडक चर्चा ‘नजरिया’च्या वाचकांसाठी
संकलित स्वरुपात देत आहोत. -संपादक
**
१) देबोराह डिसुझा यांचा हा लेख मला पाठवून अनेक माणसे प्रतिक्रिया विचारत आहेत. मला माझ्या
लहानपणीची आणि माझ्या आठवणीतील परिसर,
जेवण आणि माणसे ह्यांची लाज वाटत नाही.
मी शहरी माणूस आहे आणि मला विविधतेचे सौंदर्य कळते. मला लिहिता येते आणि
सिनेमासाठी लिहिताना मी सजग असतो. मला माझ्या सिनेमातील वास्तवाची रचना कशी केव्हा
आणि का करायची ह्याचे स्वातंत्र्य मिळते म्हणून मला सिनेमा करायला आवडते.
मी पक्षी
मारून, कोंबड्या चोरून आणून, खाटकाकडून
उरलेले मास मागून आणून लहानपण घालवले नाही. ह्यात माझे काही चुकले असे मला अजिबात वाटत
नाही. माझी पात्रे माझ्यासारखी आहेत. त्यांनी काय खायचे आणि काय बनवायचे ह्याचा
विचार नीट मी केला आहे.
महाराष्ट्रातील जेवण
किती वैविध्यपूर्ण आहे ह्याची जाणीव मला नसेल असे वाटणे हे विनोदी आहे. मला ती आहे, सामाजिक
जाणीव असलेल्या लोकांना उगाचच स्वतःच्या सगळ्या विचारांबद्दल एक नको तेवढी खात्री
असते आणि आपल्या घरातील उंच स्टुलावर बसून ही पर्यायी विचार करणारी माणसे चांगल्या
कलांचा मर्यादित आणि संकुचित दृष्टीकोनाने विचार करत बसलेली असतात हे मी अनेक वेळा
पाहिलेले आहे.
देबोराह डिसुझा यांच्या लेखाबद्दल मला
काय वाटते? मला हा लेख पटला आणि मला ह्या ताई विषयी
आदर वाटतो. कारण माझा सिनेमा अजून थियटरमध्ये सुरू आहे. जेव्हा
आपला सिनेमा थियटरमध्ये चालू असतो तेव्हा मला सगळ्यांचे सगळे
पटते आणि सगळे मान्य असते. त्यामुळे ताई मी चुकलो. मला माफ करा. पण मी जातीयवादी
माणूस नाही.
माझ्याकडे फुटक्या कपातून कुणाला चहा दिला जात नाही. मी तुम्ही खात
नसाल तेवढे सगळे प्राणी पक्षी आवडीने चाखले आहेत. पण सिनेमा म्हणजे आपली आणि फक्त
आपली राजकीय दृष्टी मांडायचा आणि आरडा ओरडा करायचा सामाजिक रंगमंच
नसतो. मला हे कळते.
-सचिन कुंडलकर, लेखक व दिग्दर्शक, गुलाबजाम
२) १-१५ एप्रिल २०१८च्या परिवर्तनाच्या
वाटसरूमध्ये प्रकाशित झालेला प्रा. माधुरी दीक्षित यांचा ‘पुणेरी
पाकातला ब्राह्मणी गुलाबजाम’ हा लेख मराठी मूल्यव्यवस्था, त्यातील
मराठी जाणिवा कुठल्या प्रकारच्या असतात आणि वास्तवात त्या कोणाच्या असतात.
त्याचे
सांस्कृतिक राजकारण काय असते हे समजून घेण्यासाठी हा लेख आपल्यासाठी एक मापदंड
ठरतो. या अगोदरही त्यांनी ‘देऊळ’वर लिहिलेले
आहे. निव्वळ मराठी साहित्य संस्कृतीच नव्हे तर मराठी चित्रपट सुद्धा ब्राम्हणी
सांस्कृतिक जाणीवांपासून अलिप्त राहू शकले नाही. किंबहुना हीच बाब मराठी
ज्ञानव्यवहारासही लागू आहे.
-चंपत बोड्डेवार, पुणे
३) ‘राज्यसंस्था
कायद्याच्या अंगाने लोकांच्या ताटात घुसली आहे’ प्राप्त
परिस्थितीचे अतिशय चपखल विश्लेषण.
-शिवाजी माटेगावकर
४) हो, राज्यसंस्थेचं सांस्कृतिक अंग ब्राम्हणी
मूल्यव्यवस्थेवर उभं असल्याचं ते कारण असल्याचं त्यातून दिसतं. शालेय पाठ्यपुस्तक
असो वा जेवणाच ताट इथपर्यंत सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारण घुसलेलं दिसतं, हेच
त्या सांगू इच्छितात.
-चंपत बोड्डेवार, पुणे
५) माधुरी मॅडमचा लेख खाद्यान्नची चिकित्सा करत
आहे व सांस्कृतिक राजकारणावर परखड भाष्य करणारा आहे, या लेखाच्या
निमित्ताने एक संदर्भ देत आहे, शर्मिला रेगे मॅडम, गोपाळ
गुरु सर आणि राम बापट सरांनी ‘ही थाळी भारतीय आहे का?’
यावर विस्तृत मांडणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केली आहे, या विषयावर याची पुस्तिका सुद्धा
प्रकाशित झाली आहे.
-केदार देशमुख
६) माधुरी दीक्षित यांच्या लेखाच्या अनुषंगाने
काही quick takes
सांस्कृतिक वर्चस्ववाद वगैरे.. पटकथा लेखक सचिन
कुंडलकर व बाकी मंडळी “चला आता एक सांस्कृतिक षडयंत्र रचूया, एक चित्रपट
काढून ब्राह्मणी जेवणाला महत्व देवूया”, असं वागतात असं माधुरी यांना वाटत की काय?
या न्यायाने उद्या मांसाहारी स्वयंपाक दाखवला
तर त्यात वजडी, खिरी, बकऱ्याचा भेजा
का दाखवला नाही, असंही विचारता येईल. माझ्यासारखा
म्हणेल की बीफ फ्राय का दाखवलं नाही?
पुढे याच धर्तीवर सध्या सुरू असलेल्या ऐतिहासिक
पात्रावरील मालिका एका जातीच्या भलामण करण्यासाठी आहे असंही म्हणता येईल.
या फिल्मच्या फूड डिझायनर सायली राजाध्यक्ष
देशस्थ ब्राह्मण आहेत. मी त्यांच्याशी बोललोय. देशस्थ लसूण तिखट फोडणी मजबूत
करतात. तेंव्हा जातीय अंगाने पाहायचं तर ती थाळी ब्राह्मणीही नसून कोब्रा मराठी
जेवण आहे.
सर्वात मुख्य बाब म्हणजे गेल्या काही वर्षात
बहुजन किती ब्राह्मणी जेवण जेवू लागले माहीत नाही, पण ब्राह्मण
मांसाहारी होऊ लागले हे आपण सर्वच जाणतो, या लॉजीकमुळे
सांस्कृतिक वरचष्मा वगैरेला फार अर्थ नाही.
शेवटचं, फिल्म हे त्या
त्या पटकथाकार व दिग्दर्शकाचे माध्यम आहे जोडीला बिझनेस आहे, ज्याला-त्याला
आपला niche पकडून व्यवसाय करायचा असतो. असो.
हे विसरू नये की सैराट व गुलाबजामचे निर्माता
झी टॉकीज आहे.
-प्रसन्न जोशी, मुंबई
७) ब्राम्हणी हा शब्द केवळ जातसूचक नसून
सांस्कृतिक विश्लेषणामध्ये एक category
म्हणून वापरतात.
-बसवंत विठाबाई
८) ब्राम्हणी आणि अब्राम्हणी
या अन्वेषण पद्धतीनेच सांस्कृतिक वर्चस्वाच्या नेणीवपर्यंत जाता येते.
-आप्पासाहेब देशमुख
९) जाऊ दे अप्पा, शोधार्थी गटावर
अधिक काय बोलणे? ब्राम्हणी या एका शब्दाने कितीतरी लोक इथं घायाळ
होतात. हर्ष जगझाप यांचा समाज प्रबोधन पत्रिकेमधील ‘ब्राह्मण
शाहीचे ब्राह्मणेत्तर वाहक’ हा लेख या संदर्भात जरूर वाचावा..!
-बसवंत विठाबाई
१०) प्रा. माधुरी दीक्षितांचा वरील लेख
जाता-जाता गडबडीत वाचण्यासाठी किंवा Quick
takes साठी नाहीये. हा काही वृत्तपत्रीय लेख
नाही किंवा फेसबुकवरील कमेंट नाही ज्याचा वाचक कोणीही असू शकतो. किंबहुना जाता-जाता takes घेता
येऊ शकतात. हा लेख गंभीर तर आहेच त्याचबरोबर मराठी सांस्कृतिक चर्चाविश्वाच्या
आकलनाच्या मर्यादा उघडया पाडणारा आहे. त्यासोबत साहित्य कृतीच्या समीक्षात्मक
चर्चाविश्वामध्ये हस्तक्षेप करणारा आहे.
त्यासाठी किमान काही संकल्पनात्मक
स्पष्टता (Conceptual Clarity) आणि त्यातील परस्परविरोधी दृष्टिकोन
माहिती असायला हवेत. अन्यथा मुख्य वक्ता बोलल्यानंतर त्याचेच मुद्दे घेऊन अध्यक्ष
जसा बोलतो तसं इथे करता येत नाही. इथे एखादा दृष्टीकोन किंवा संकल्पना समजून
घ्यायला कित्येक दिवस निघून जातात. ही प्रक्रिया समजून
घेण्याची आहे. त्यानंतर प्रश्न विचारण्याची आहे. Quick takesच्या
नावाखाली टीका करण्याची नाहीये. किंवा त्याआडून काहीतरी एक उदारमतवादी भूमिका
(बिनबुडाचे तर्क) मांडण यात येत नाहीये.
हे मी अस का मांडतोय त्याची कारण पुढीलप्रमाणे:
*वास्तविक पाहता
तुमच्या Quick takes चे उत्तर एका ओळीत देता येते. एव्हाना
ते ग्रुपचे सदस्य बसवंत यांनी दिलेलच आहे. पण मी तसे न करता मुद्दा माझ्या परीने
समजावून देण्याचा प्रयत्न करतो. खरेतर तुम्ही वाचन चुकीच्या पद्धतीने करता आहात.
ते misreading आहे. तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढताय
किंवा तुम्हाला कळत नसावं असं वाटतं. प्रा. दीक्षित यांच्या प्रत्येक मुद्द्याला
संकल्पनात्मक बैठक आहे. एक ऐतिहासिक परिप्रेक्ष्य (Perspective) आहे,
तो कळला नसेल तर मग खूप अवघड आहे. जसं लिहीलं तसं वाचायचं नसतं. प्रत्येक
text ला एक context असतो.
‘बिटवीन द लाईन’ त्यात काही
सांगितलेलं असतं. ते समजून घ्यायचं असतं. हा लेख तुम्हाला दिसला तसा प्रत्यक्षात
नाहीये.
*हा लेख “ब्राम्हण
जातवर्चस्वाबद्दल” बोलत नाही किंवा हा “ब्राम्हण
जातीला” समोर ठेऊन लिहिलेला नाही. हा लेख त्या
कलाकृतीमधून येणाऱ्या ब्राम्हणी मूल्य व्यवस्थेबद्दल, त्यांतील
सांस्कृतिक जाणिवाबद्दल बोलतो. या मूल्यांच्या आधारे नकळतपणे होणाऱ्या सांस्कृतिक
वर्चस्वाच्या राजकारणाबद्दल काहीएक चिकित्सक मांडणी करतो. हे मी वर ग्रुपवर
लिहिलेलं आहे. ते तुम्ही वाचलेलं दिसत नाही. लेखिकेच्या
शब्दात, "सिनेमा हे एक दृक्श्राव्य माध्यम
आणि सांस्कृतिक उत्पादन असल्यामुळे हे राजकारण त्याच्या सुरुवातीपासून ते
शेवटापर्यंत पेरलेल्या वेगवेगळ्या खुणा जोडून समजू शकते."
*ब्राम्हणी
मूल्ये-जाणीवांवर आधारलेलं सांस्कृतिक राजकारण केवळ ब्राम्हण किवा समकक्ष
जातींकडूनच होत नसतं, ते बहुजन जाती वर्गाकडूनही होत असतं. किंबहुना
ते तुम्हाला आवडत नसलेल्या पुरोगाम्यांकडूनही नकळतपणे होत असतं.
*ऐतिहासिक
पात्रावरील मालिका या संबंधित जाणीवांचं भलावण किंवा रुजवण म्हणा, ते करीतच असतात. नुसत्या रामायण
नावाच्या मालिकेमधून काय प्रकारच्या सांस्कृतिक जाणीव घडवून त्याची परिणती कशात झाली
हे आपल्याला चांगले माहिती आहे. तरी तुम्ही म्हणताय अस बघू नये, वारे वा, असं कसं. म्हणजे मालिका एवढ्या निष्पाप, तटस्थ
साध्या-सरळ असतात का? २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान
हिंदी मराठी मालिकांमधील बायकांची पात्रेसुद्धा ‘बदल हवाय’
असा मध्येच डायलॉग मारून जायच्या.
*सामाजिक
शास्त्रामध्ये सर्वच व्यवहाराची चिकित्सा करायची असते. एखाद्या
बातमीची सुद्धा, बातमी कशाची आहे, तिची
मांडणी कशी आहे, भाषा
कोणती वापरली आहे, इत्यादी.
*अगोदर जाहीर तर
करा की मोदक, पुरणपोळी मराठमोळी खाद्य संस्कृती
नाहीये. मटन, चिकन, बीफ हीच मराठमोळी खाद्य संस्कृती आहे, कोण
वजडी आणि भेज्याचा विषय काढते ते नंतर बघू. तुम्ही मात्र बीफ परदेशात जाऊन खाता इथ
मात्र दीक्षितांनी उपस्थित केलेल्या ब्राम्हणी सांकृतिक जाणीवांनी बीफवर बंदी
घालून गरिबांच्या रक्तातील लोह काढून घेतलं या बद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाही.
*तुम्ही फूड
डिझाईनर सायली राजाध्यक्ष यांचा उल्लेख केला म्हणून मी काही बोलू इच्छितो. देशस्थ
हे कोकणस्थापेक्षा लसणाची तिखट फोडणी मजबूत करतात हे दाखवण्यासाठी सिनेमा काढलात
का हे त्यांना विचारायला हवं होतं. फूड डिझायनर कोर्समध्ये मराठी खाद्यपदार्थांचा
अभ्यासक्रम कसा आहे. त्यात विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण
येतात का, नुसत्या अन्न पदार्थांच्या डिझाईनलाच
(मांडणीला)महत्व आहे का वगैरे.
खरे तर प्रा. माधुरी दीक्षित या
सिनेमातील फूड डिझाईनला सुद्धा अधोरेखित करतात. आणि त्या डिझाईनमधील ब्राम्हणी
सांस्कृतिक जाणिवांचं आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या वर्चस्वाचं राजकारण आपल्या समोर
आणतात. हे समजत नसेल तर कपाळावर हात टेकवलेलेच
बरे.
*तुम्ही उल्लेख
केला म्हणून मी सांगतो आता ऐका, बहुजन नुसते केवळ ब्राम्हणी (शाकाहारी)
जेवण जेवू लागले नाहीतर ते ब्राम्हणी मूल्य-जाणिवांचे नकळतपणे वाहक ही बनलेले
आहेत. ब्राम्हण मांसाहार करू लागल्याने सांस्कृतिक तर्काला काही अर्थ नाही असे
तुम्ही म्हणता. बापरे काय ठोकून देता तुम्ही… आणि काय अजब
तर्क आहे. खरेतर मांसाहार केल्यामुळे ब्राम्हणी सांस्कृतिक जाणीवा- नेणीवा (sub-consciousness) गळून पडतीलच असही नव्हे.
*आता सगळे कसे
आपण एकसारखे बनलो आहोत, वागत आहोत. एकाच प्रकारचं खात आहोत
वगैरे. त्यामुळे आता आपल्या आपल्यात चिकित्सा करायची नाही असा याचा अर्थ होतो, जसं
शाळेत प्रवेश घेताना जात काढून टाकून माणूस असं लिहिलं की जात संपून आपण कसे सगळे
एक होणार असं म्हटल्यासारखं आहे याला सुद्धा सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारण
म्हणतात.
*या लेखातून प्रा.
दीक्षितांनी अस कुठ म्हटलं कr, पटकथाकार आणि मंडळींनी सांस्कृतिक
षड्यंत्र रचण्यासाठी हा सिनेमा बनवला. मी वर म्हटल्याप्रमाणे चुकीच्या पद्धतीने
वाचन केले की आपण असाच अर्थ लावणार, वास्तविक पाहता मी जे वर म्हटलंय ते आणि इतरही
बऱ्याच बाबी त्या पुढे आणतात. दुसरे म्हणजे पटकथा लेखक हा काही सुटा प्राणी असतो
का? तो ज्या सांस्कृतिक पर्यावरणात राहतो त्यातून
तो घडत असतो.
खरेतर पटकथाकार त्याच्यात असलेल्या सांस्कृतिक जाणिवेतूनच तो माध्यम
वापरत असतो. सिनेमा त्याचा बिझनेस असतो आणि मी म्हणतो तो तर असायलाच हवा. पण
म्हणून चिकित्सा करू नये, हे कुठल्या तर्कात बसते. पटकथाकार
नुसता बिझनेस करीत नाही ना.! तो आपल्या कथेतून संवादातून नकळतपणे
सांस्कृतिक मूल्यांची पेरणी करत असतो. संशोधनाच्या क्षेत्रात त्याचीही चिकित्सा
करायची असते.
*हा काही कोकणस्थ
आणि देशस्थ मधील मुद्दा नाहीये. आपल्या लेखात त्यांनी नुसती थाळीच नाहीतर थाळीतील
अन्न पदार्थांची मांडणी, त्याचा सुगंध यातून सहजपणे घडून येणार
सांस्कृतिक वर्चस्वाचे सूक्ष्म पदर प्रा. दीक्षित आपल्याला उलगडून दाखवतात.
*तुम्हाला कोणी
सांगितलं की सैराटमध्ये ब्राम्हणी सांस्कृतिक जाणीवा नाहीत म्हणून, त्यातही
असू शकतात. कदाचित त्याची चिकित्सा झाली नसेल. सिनेमा बनवताना सर्व बहुजन असले तरी
त्यातून ब्राम्हणी मूल्यांचं सांस्कृतिक राजकारण घडू शकतं. त्यासाठी ब्राम्हण
जातीचा निर्माता किंवा पटकथाकार असण्याची गरज नसते. सिनेमा कोण बनवतो या पेक्षा
सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये कोणाच्या सांस्कृतिक जाणीवा-नेणीवा त्यात
प्रतिबिंबित झालेल्या आहेत हे पाहायला हवं. ब्राम्हण जात विरुद्ध बहुजन जाती ही
जुनाट मांडणी झाली. ती आता कालबाह्य झाली आहे. मुद्दा आहे पुढे येणाऱ्या
सांस्कृतिक जाणिवांचा- नेणीवांचा.
*शेवटी मी असे
म्हणू शकतो की, हा लेख (Internal critique) म्हणून समजून घ्या, त्याचे
सूक्ष्मवाचन (Micro reading) करण्याची आवश्यकता आहे. त्या विषयातील
तज्ज्ञांकडून समजून घेऊ शकता. यासाठी नवी दृष्टी शिकण्याची उर्मी असण आवश्यक आहे
ज्यातून आम्हीही गेलो आहे.
-चंपत बोड्डेवार, पुणे
११) सहमत! या संदर्भातील
‘ही थाळी भारतीय नाही’
याची प्रस्तावना शेअर करतो.
विवेक घोटाळे, पुणे
१२) बुध्दिनिष्ट किंवा जात न मानणारे ब्राह्मण
असो किंवा ब्राह्मणेत्तर हे जाणिवेच्या पातळीवर जातविरहीत असतात. परंतु नेणीवच्या
पातळीवर ते असतीलच हे सांगता येणार नाही. यासाठी
अब्राह्मणी सौंदर्यशात्राकडे जावे लागेल. आणि ते बुध्दाशिवाय शक्य नाही. "ब्राम्हण जात विरुद्ध बहुजन जाती ही जुनाट
मांडणी झाली. ती आता कालबाह्य झाली आहे. मुद्दा आहे पुढे येणाऱ्या सांस्कृतिक
जाणिवांचा-नेणिवांचा." ह्याला पर्याय पण देण्याचा प्रयत्न करावा
-आप्पासाहेब देशमुख
१३) मी प्रवासात आहे, म्हणून
फक्त काही मुद्दे उपस्थित केले, लिहिन सविस्तर यावर. शाहू पाटोळे यांचं, ‘अन्न
हे अपूर्ण ब्रह्म’ हे पुस्तकही या निमित्ताने वाचावे..!!
-बसवंत विठाबाई
१४) अर्जुन अप्पादुराई यांचेही लिखाण फूड कल्चरवर
आहे, तेही महत्वाचे आहे
-अनिल जायभाये
१५) आपून रिव्हूअ वाचून सिनेमा बघायला जात
नसतो. आपल्या कलेतंल फार कळतं, असाही आपला दावा नाही. पण मराठी
माध्यमांमध्ये चित्रपटांवरील शेरेबाजी कम समीक्षण नावाचा जो प्रकार लिहला जातो, तो
फारंच ‘ओतपाणी, टाक पाट्या
च्यामारी’ या अॅटीट्युटनं लिहला जातो, असं
म्हणयाला वाव आहेच. (काही सन्मानिय अपवाद प्रत्येक क्षेत्राला असतात तो भाग
वेगळा).
आता हे 'उथळ वृतपत्रीय
सुमार पद्धतीचे दर्जेदार' लेखन करणं काही जिकरीचं काम नसतं, असं
आपल्या कुत्सीत नजरेला वाटून राहलंय. याचं कारण म्हणजे 'बबन' सिनेमा
मीही पाहिला, 'उगा व्यक्त कशाला व्हायचे', असे
वाटून आपुन शांतही बसलो.
सगळ्याच गोष्टीतलं आपल्याला कळतं, असा
नवथर पत्रकारीय दावा करण्यात पाईंट नसतो, असे आपले हल्ली
मत झाले आहे.
पण आता हे मत मराठी वृत्तपत्रांतील बबन सिनेमाचे
रिव्हूअ आणि सध्या 'बबन'ला लोकांनी
डोक्यावर घेतल्याचे चित्र पाहता. आपणास जरा ह्या रिव्हूअ लिहणाऱ्यांच्या कुत्सित
माजाचं वाढलेलं तण जरा खुरपलं पाहिजे,
असं मनोमन वाटून गेलं.
उथळ स्तंभलेखन किंवा समीक्षण लिहायचं असेल तर, मी
सिनेमा न पाहताही त्याचा रिव्हीअ लिहू शकतो, असा दांडगा
आत्मविश्वास मला 'मनाला न भावणारा बबन' असा
लोकमतमधील रिव्हूअ वाचून आला.
असे लिहण्यासाठी चार ते पाच शब्द वारंवार आणि
असंबद्धपणे शाळा करून वापरायचे. ते वाक्यात असे वापरायचे
'वेगळ्याच
प्रकराचि मांडणी केली' (म्हणजे नेमक्या कोणत्या प्रकारची)
'एक
वेगळंच वळण लागलं' (म्हणजे नेमकं
कसं)
'तंत्रावर
थोडी पकड हवी होती' (नेमकी किती पकड)
'वेगळ्याचं
धाटणीचा' (कोणत्या धाटणीचा बाई)
आता या वाक्यांमध्ये सारखी सारखी 'वेगळी' मांडणी
केली की, कशावरही रान हाणता येतं मित्रांनो. बर सगळ्याच
पेपरमधले रिव्हूअ सगळ्यांनी एकाच ठिकाणी बसून लिहल्यासारखे वाटावे अशी शंका आमच्या
भाबड्या मनाला येते.
इतकं ठरवून एखाद्या कलाकाराला कोनाड्यात दाबणं
आणि संबधित निर्मीतीला बाद ठरवतं,
आपलीचं अभिरूची रेटत राहण्याचे वंशपरंपरागत
तुच्छतावादी तेजोमय आपले काम, सामान्य खेड्या-पाड्यातील प्रेक्षकांनी
बबन सिनेमाला डोक्यावर घेऊन उघडं पाडलंय.
बबन सिनेमा किती श्रेष्ठ आहे किंवा नाही? हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की, हा अभिरूचीचा संघर्ष आहे. कला म्हणून मापं
काढायचे तर, जरा चांगले काढले पाहिजे. त्यातून आपला
उथळपणा दिसता कामा नये.
आणि आता तर सगळ्यांना इंटरनेट उपलब्ध
झाल्यामुळे जगातल्या कोणत्याही गोष्टीवर अगदी तासाभरात त्याविषयातील तज्ज्ञ
असल्यासारखे अगदी तासाभरच्या अभ्यासावर बोलता येते.
बाकी मुरांबा-गुळांबा छाप आपण सिनेमा काढा, त्यात
पैसा कमवा, त्यांवर चांगले समीक्षण लिहा, आपणास
या 'गोटीचोळ' अभियानविषयी
शुभेच्छा. पण कधीकधी वाटून जातं की,
नागराज भाऊ सारखे लोकं सिनेमे करायलेत, ते
हिट व्हायलेत, तर माध्यमात असलेला आणि शेवटची पिढी
राहिलेला एक वर्ग दबक्या आवाजात त्रागा करत असतो.
तो हाच वर्ग असतो 'जो
शिवजंयती आणि भीम जयंतीवर' कुत्सीतपणे टोमणे मारत असतो'. आणि त्यांच्यात असलेली तुच्छता अधूनमधून
दिसतेही. बाकी कोथरूडवासियांनी डोबिंवलीकरांसाठी सिनेमे काढायचे आणि दोघांनीच तो
मराठी सिनेमा आहे, असे म्हणायचे. हे चालू द्या.
एकानं तर भाऊ शिंदेचा अभिनय 'ठिक' आहे, असे
आपल्या युटुब चॅनेलवरून रिव्हूअमध्ये सांगितले, मला तर वाटलं आता स्वप्नील जोशीला ऑस्कर देऊन
टाकला पाहिजे, त्याशिवाय ह्यांना चैन पडणार नाही.
बाकी ज्यांना दूध कुठुन येतं? असं
विचारल्यावर 'चितळे'तून येतं, असा
बलदंड विश्वास आहे. त्यांना दुध डेअरी व एमआयडीसीचं
राजकारणं कसं कळणारं? आणि कोणत्याही सिनेमात ज्यांना 'चिन्मय' हवा
असतो, त्यांच्या 'मनाला बबन कसा
भावणार?'
आता बबन सिनेमाविषयी
बबन हा महाराष्ट्रातील शेतकीसमूहातील
विस्थापित वर्गजातीतील एक उमेदीनं जगणारा पोरगा आहे, तो तुमच्या
माझ्यासारखा स्वप्न बघणारा आहे. त्याचं समूहातील प्रस्थापित वर्गातील
बांडगूळांकडून त्याच्या स्वप्नात खोडा घातला जातो. तो लढतो.
पण महाराष्ट्रातल्या अनेक सामान्य प्रामाणिकपणे
धडपडणाऱ्या पोरांसारखा त्याचा करूण अंत होतो.
बबन हा शेतकीसमूहातील प्रस्थापित टोणग्यांच्या
विरोधात लढणारा एक सामान्य नायक आहे. तो शेतकी समूहातील 'मारूती
कांबळे' आहे. तो तुमच्या माझ्यासारख्या लोकांना आवडेल.
- कुणालगायकवाड, पुणे
(संपादकीय टिपण आणि संकलन कलीम अजीम यांनी केलेलं आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com