मुघल सम्राट बाबर लेखक व कवी होता

चँग एज कहान हा मंगोलचा पराक्रमी पुरुष. त्याचे मुळ नाव तमोचीन. तमोचीनला मंगोलियाच्या एका बुजुर्गाने त्याला झालेल्या एका साक्षात्काराचा प्रसंग सांगून त्याचे नाव ‘चँग एज कहान’ असे ठेवावयास लावले. पुढे या चँग एज कहानचे अपभ्रंशाने चंगेज खान हे नाव इतिहासात प्रचलित झाले. विशेष म्हणजे, हा चँग एज कहान मुसलमान नव्हता. उलट मुसलमानांचे सर्वाधिक नुकसान याच चँग एज कहानने केले.
मुसलमानांची कित्येक शहरे याने बेचिराख केली. गावे उठवली. माणसे कापली. म्हणून मुसलमानांमध्ये याच्याविषयी प्रचंड रोष होता. बाबरदेखील मंगोलांचा द्वेष करायचा. स्वतःला तुर्क म्हणवून घ्यायचा. मात्र बाबरच्या दुर्दैवाने भारतीय इतिहासात मोगल म्हणूनच तो ओळखला गेला.
इतिहासकारांनी तुर्क बाबराला मोगलशाहीचा संस्थापक ठरवले. कारण बाबराची आई ही चँग एज कहानच्या वंशाची होती. आपले नाते मंगोलाशी जोडले जाऊ नये म्हणून बाबरने आईचा उल्लेखदेखील अर्धचगताई तुर्क म्हणून केला तो यासाठीच. बाबरने स्वतःला मंगोलापासून वेगळे ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात तो निष्फळ ठरला. इतिहासाने बाबरशी पत्करलेले हे वैरच म्हणावे लागेल. त्याच्याविषयीचा इतिहास लिहिताना अनेकांनी त्याला राजकारणापुरते बंदिस्त करून टाकले आहे.
बाबर जसा राज्यकर्ता होता, तसा तो हळव्या मनाचा कवी होता. जसा तो कवी होता, तसा तत्त्वचिंतकही होता. त्याच्या चिंतनाची फलश्रुती म्हणजे त्याने सुफीवादावर लिहिलेली मसनवी; पण हा बाबर इतिहासातील काही घटना आणि बाबरनाम्याच्या पलीकडे स्मरला जात नाही.
बाबरने राजकारण केले. आक्रमणे केली. सत्ता गाजवली; पण त्याने स्वतःमधल्या माणसाला पावलोपावली उन्नत केले. त्याचा वसिअतनामा ही त्याची साक्ष मानता येईल. बाबरला परिस्थितीने राज्यकर्ता बनवले. तो मूळचा अभ्यासू, निसर्गाची निरीक्षणे टिपणारा, निसर्गातले एखादे तत्त्व शोधून त्यामागील सूत्र मांडणारा, साध्या-साध्या गोष्टींवर हळहळणारा, नेहमी सर्जनाची साक्ष देणारा सर्जक होता. 
बाबरचे साहित्य
प्रख्यात इतिहाससंशोधक आणि आधुनिक काळातील बाबराचे चरित्रकार राधेश्याम यांनी बाबराच्या साहित्यावर चर्चा केली आहे. ते लिहितात, ‘त्याने जवळपास 116 गजल, 8 मसनवी, 104 रुबाई, 52 मुआम्स, 8 कोते, 15 तुयुग तथा 29 सीरी मुसुन्नची तुर्की भाषेत रचना केली. याव्यतिरिक्त फारसी भाषेत त्याने गजल, किता तथा 18 रुबायांची रचना केली आहे.’ याव्यतिरिक्त त्याने फारसी भाषेमध्ये एक दिवानदेखील लिहिले आहे.
बाबरचे साहित्य आणि काव्य यावर अनेकांनी लिखाण केले आहे. मध्ययुगीन फारसी साहित्याचे अभ्यासक सय्यद अतहर अब्बास रिजवी यांनी बाबरच्या साहित्यिक रचनांची माहिती विस्ताराने दिली आहे. ते लिहितात, ‘दिवान आणि बाबरनाम्याच्या व्यतिरिक्त त्याची एक अन्य महत्त्वपूर्ण रचना ‘मुबीन’ आहे. ज्याला त्याने 928 हिजरीमध्ये (1522-23) पूर्ण केले. हे तुर्की पद्य आहे. जे फिकहच्या (इस्लामी धर्मशास्त्र) संदर्भात आहे.
मीर अला उद्दौलाने ‘नफायसुल मुआसीर’मध्ये लिहिले आहे, ‘त्यांनी (बाबरने) फिकहच्या विषयावर ‘मुबीन’ नावाच्या पुस्तकाची रचना केली आहे. यामध्ये उमामे आजम यांच्या सिद्धांतावर पद्यरचना केलेली आहे. कुरोह तथा मैलाच्या हिशेबासंदर्भात त्याने बाबरनामामध्ये ‘मुबीन’चा संदर्भ दिला आहे. शैख जैन यांनी यावर टीकादेखील लिहिली आहे. ब्रेजीनने क्रेस्टोमयी टरके नावाच्या रचनेत याचा खूप मोठा भाग 1857मध्ये प्रकाशित केला आहे.’
ऑगस्ट 1527मध्ये बाबरने अरुज (कवितांच्या सिद्धांताचे ज्ञान) संदर्भात एका पुस्तकाची रचना केली. 1528मध्ये त्याने ख्वाजा उबैदुल्लाह एहरार यांच्या ‘वालिदिया’ नावाच्या पुस्तकाच्या पद्यरचनेला प्रारंभ केले. बाबरच्या साहित्यात त्याच्या फारसी भाषेत लिहिलेल्या सुफीवादावरील मसनवीला विशेष महत्त्व आहे. पण दुर्दैवाने सुफीवादावरील या ग्रंथाचे अनुवाद अद्याप होऊ शकले नाही.
बाबर हा बहुभाषी विद्वान होता. त्याने त्याच्या एकाच ग्रंथात अनेक भाषांतील शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे त्याच्या ग्रंथात मध्ययुगीन जगातील अनेक भाषांचा परिचय होतो. हैरात शहरातल्या साहित्यिकांना पाहून त्याच्या प्रेमात पडला. त्याने आपल्या आत्मवृत्तात हैरात ‘बुद्धिजीवींची’ नगरी म्हणून गौरवले आहे.
परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरीही त्याने लिखाणात कधी खंड पडू दिला नाही. तो सातत्याने वाचत व लिहीत राहिला. ग्रंथ जमवणे व ते सोबत बाळगणे त्याला आवडत असे. मोहिमांवर असताना नैसर्गिक संकटात त्याने जमवलेले अनेक ग्रंथ गहाळही झाले. त्यामुळे तो खूप व्यथित झाल्याचे, त्याने स्वतः बाबरनाम्यात लिहून ठेवले आहे.
लिपीच्या निर्मितीत योगदान
आयुष्यभर बाबरने स्वतःची बौद्धिक भूक भागवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. जितके त्याने राजकारण केले, तितकेच किंबहुना त्याहून अधिक त्याने साहित्याची सेवा केली. सय्यद अतहर अब्बास रिजवी ‘बाबरनाम्या’च्या प्रस्तावनेत बाबराने नव्या लिपीचा आविष्कार केल्याचा संदर्भ दिला आहे. ते लिहितात, ‘910 हिजरीमध्ये ‘बाबरी’नामक एका लिपीची निर्मितीदेखील केली होती. निजामुद्दीन अहमदने लिहिले आहे की, बाबरने या 
लिपीत कुरआन लिहून भेटस्वरूप मक्का येथे पाठवले होते. बाबरने ज्या पद्धतीने नव्या लिपीचे निर्माण केले आहे; त्या पद्धतीने उर्दू भाषेच्या निर्मितीची बीजं ही साहित्याच्या प्रांगणात पेरली आहेत. त्याने फारसी भाषेमध्ये काव्यरचना करत असताना आगऱ्याच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या ब्रज किंवा हिंदवी भाषेतील शब्द फारसी भाषेत वापरले आहेत.
फारसी लिपीत भारतीय शब्द वापरण्याची पद्धत रूढ करण्यात कुली कुतबशहापाठोपाठ बाबरचे योगदान महत्त्वाचे आहे. बाबर स्वतःचे भाषाप्रभुत्व वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील होता. एकाच पुस्तकात त्याने अरबी, तुर्की, फारसी भाषांतले शब्द वापरले आहेत. बाबर हा बहुभाषाप्रभू होता, हे डेनिसन रासपासून बेवरीजपर्यंत सर्वांनीच मान्य केले आहे.
भारताविषयीची मते
बाबरने प्रत्येक प्रदेशाविषयी त्याच्या ‘बाबरनामा’मध्ये लिखाण केले आहे. निरीक्षण टिपण्यात बाबर निरपेक्ष होता. टिपलेल्या निरिक्षणांवर त्याने कधी अभिनिवेश लादले नाहीत. भारतात जे काही दिसले ते जसेच्या तसे त्याने आपल्या आत्मवृत्तात मांडले. त्यातील सौंदर्यस्थळे त्याने दाखवून दिली. बाबर मर्मग्राही चिंतक होता. त्याच्या चिंतनात निसर्ग हा मुख्य घटक आहे.
मानवी समाजाच्या विविध रूपांचे अनेक पडसाद त्याच्या समग्र लिखाणात सातत्याने जाणवत राहातात. भारतातल्या मानवी समाजाविषयी बाबरने त्यांच्या व्यावसायिक परंपरावर केलेले भाष्य महत्त्वपूर्ण आहे. इथले लोक वर्षानुवर्षे परंपरेने हे काम करत असतात, असे बाबर म्हणतो. त्याचे हे निरीक्षण अल् बेरुनीच्या जातसंस्थेवरील भाष्याशी साम्य पावणारे आहे. भारतीय समाजाच्या विविध घटकांवरदेखील बाबरने अशाच पद्धतीने विश्लेषण केले आहे.
धार्मिक विचार
बाबर हा वृत्तीने धार्मिक होता, तर विचाराने तो सहिष्णू होता. बाबरने धार्मिक कारणामुळे मंदिर पाडण्याचा आदेश दिल्याचे एकही उदाहरण नाही. उलट त्याने वसीहतनाम्यामध्ये हुमायनूला सहिष्णू धार्मिक दृष्टीचा अंगीकार करण्याच्या सूचना केल्या होत्या.
बाबर सुफींच्या प्रभावात आला होता. त्याने अनेक सुफींच्या कबरींची जियारत केली. मीर सैय्यद अली हमदानी, ख्वाजा खाविन्द सईद, शेख निजामुद्दीन औलिया यांच्या दर्गाहला त्याने भेटी दिल्या होत्या. सुफीवादामुळे उदारता हा त्याचा स्वभावधर्म बनत गेला होता. ज्या पद्धतीने मुस्लीम सुफी संतांच्या कार्यात त्याला रुची होती, त्याच पद्धतीने अनेक हिंदू योग्यांचीदेखील त्याने माहिती घेतली होती.
इस्लामी फिकहवरील त्याची चर्चादेखील धर्ममूल्यांशी निष्ठा सांगणारी होती. तर सुफीवादावरील भाष्य त्याच्या सहिष्णू धार्मिक प्रवृत्तीचे पडसाद होते. प्रख्यात इतिहाससंशोधक राधेश्याम हे बाबर सुन्नी विचारांचा आणि हनफी पंथी असला तरी त्याने राजकारणात धर्मांधतेचे प्रदर्शन टाळले असल्याचे मत मांडतात.
बाबर राज्यकर्ता असल्याने राजकारणाविषयी त्याने काय लिहिले असावे हा अनेकांच्या कुतुहलाचा विषय आहे. हुमायूनला दिलेल्या वसीहतनाम्यावरून त्याची राजकीय दृष्टी कळण्यास आपल्याला मदत होते. हुमायून दिल्लीला गेल्यानंतर त्याने खजिना ताब्यात घेऊन तो उघडला ही बाब बाबरला योग्य वाटली नाही. खरमरीत पत्र लिहून बाबरने त्याचा समाचार घेतला. त्याला राजकारणसंहिता सांगितली.
बाबर जसा राजकारणी तसा सेनापती होता. तुर्कवंशीय असल्याने त्याला युद्धशास्त्रातले अनेक बारकावे माहीत होते. बाबरनाम्यात तो लिहितो, ‘जरी हिंदुस्थानचे लोक तलवार चालवण्यात दक्ष असतील, परंतु अनेक लोक सेनेचे संचलन आणि आक्रमणाच्या कारवायांपासून अनभिज्ञ आहेत. 
त्यांना सैन्याला आदेश देण्याच्या संबंधात कोणतेच ज्ञान नाही.’ बाबर पुढे ‘बाबरनाम्या’त अनेक ठिकाणी युद्धाचे शास्त्र सांगतो. बर्फाळ प्रदेशातून मार्ग काढताना शत्रूचे आक्रमण कसे परतून लावायचे याविषयी त्याने दिलेली माहिती इतिहासाच्या इतर साधनांपेक्षा भिन्न आहे. लोदीवंशाला पानिपतात पराभूत केल्यानंतर बाबरने काही निरीक्षणे त्याच्या ग्रंथात नोंदवली आहेत. तीदेखील त्याच्या युद्धशास्त्राविषयीचे विचार समजून घेण्यास साहाय्यभूत ठरतात.
कवितालेखन
बाबरचे काव्यावर प्रचंड प्रेम होते. त्याने जितके गद्य लिहिले तितकेच पद्यदेखील रचले. ‘बाबरनाम्या’मध्ये त्याच्या अनेक कविता आहेत. बाबरच्या काव्यात अनेक विषयांची जंत्री आहे. बाबर कधी मद्यावर लिहतो, तर कधी प्रेयसीवर कल्पना करायला लागतो. जीवनाच्या काही रूपांवर काव्यातून बाबर बोलायला लागतो. बाबर आयुष्यभर फिरत होता. या फिरस्तेगिरीतून त्याने अनेक प्रदेशांच्या संस्कृतीच्या समृद्ध जाणिवा टिपल्या आहेत.
काबूल शहरतल्या बाबराच्या कविता आणि तो दिल्लीत आल्यानंतर त्याने रचलेल्या कविता यामध्ये खूप फरक आहे. वेगवेगळ्या प्रदेशांतल्या जाणिवा त्याच्या काव्यातून डोकावतात.
बाबर कवी म्हणून समजायला खूप सोपा आहे. बाबरने कवी म्हणून मांडलेली मतेदेखील सहज स्पष्ट होणारी नाहीत. त्याच्या काव्यात दुर्बोध दिसत नाही. सहजबोध हा त्याच्या काव्याचा आत्मा आहे. बाबरला त्याच्या आप्तेष्टांनी खूप त्रास दिला. बाबरच्या व्यक्तिगत आयुष्यातला हा दर्द त्याच्या काव्यातून व्यक्त होतो. मात्र बाबर मूळचा हळव्या मनाचा होता. त्याने काव्यात देखील आपला दर्द मांडताना कुठेच क्रूरता दाखवली नाही. तो एका कवितेत म्हणतो,
“तुझ्यासोबत जो वाईट करेल त्याला नशिबावर सोडून दे
कारण की, भाग्य एकेदिवशी सेवक बनून त्याचा बदला घेईल”
पुढे एका कवितेत बाबरने त्याच्या दुखावलेल्या हृदयाची व्यथा सांगितली आहे. त्यामध्ये तो म्हणतो,
“माझे गुलाबाच्या कळीप्रमाणे, रक्ताच्या शिंतोडय़ांनी रंगलेले आहे,
तिथे लाखो वसंत आले तरी, कळी उमलू शकत नाही.”
आप्तेष्टांनी दगाफटका केल्यानंतर बाबर भारताकडे फिरला. काबूलमध्ये आल्यानंतर बाबरने एका कवितेत लिहिले आहे,
“गवत आणि उमललेल्या फुलांमुळे काबूल वसंतात स्वर्ग बनते.
या व्यतिरिक्त बारान आणि गुलबहार वसंतात अप्रतिम असतात”
बाबराला निसर्गातील सौंदर्याची खूप ओढ होती. संपूर्ण ‘बाबरनाम्या’त शंभरहून अधिक कविता निसर्गावर केल्या आहेत. बाबरच्या साहित्यात प्रतीकावरच्या कविता देखील कमी नाहीत. पण बाबर एकाच विषयाभोवती रेंगाळत नाही. जीवनावर बोलणारा बाबर दुसर्याच क्षणी मृत्यूवर बोलायला लागतो. एखाद्या ओळीत उदास वाटणारा बाबर दुसर्याच ओळीत वसंत, पाऊस, हिमालयाचे सौंदर्य यावर काही लिहून जातो. म्हणून बाबर हा विषयकेंद्री नाही, तर प्रवाही लिखाण करणारा जिंदादील कवी आहे.
बाबर बहुरूपी असतानाही तो जसा होता तसा कधी मांडला गेला नाही. बाबर इतिहासकारांना जसा हवा तसा मांडला गेला. इतिहासाची विटंबना करण्याची परंपरा वृद्धिंगत होत राहिली आणि बाबर विकृतीच्या ढिगार्यात गाडला गेला. बाबराविषयीची चर्चा अभिनिवेशांच्या सीमेत बंदिस्त झाली आणि इथेच बाबराचा इतिहास खुंटला गेला.

(मूल लेखक सरफराज अहमद यांचा हा जुलै २०१८च्या मुक्तशब्द अंकात प्रसिद्ध झाला आहे.)
लेखकाचा मेल-sarfraj.ars@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मुघल सम्राट बाबर लेखक व कवी होता
मुघल सम्राट बाबर लेखक व कवी होता
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGc4eqqXDDrYE7R-z0ALvB7O757eoNHAH0EIy7Y8QQPNNNXcBhkgnPfdpVBJymlwoQbo4btMfxfqhhO5b1pA18kM_FrY4EDwzwmIH360es1eAkuLXzx_SPv1zsdEe-oxlODVpmLQmOD46I/s640/Babur.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGc4eqqXDDrYE7R-z0ALvB7O757eoNHAH0EIy7Y8QQPNNNXcBhkgnPfdpVBJymlwoQbo4btMfxfqhhO5b1pA18kM_FrY4EDwzwmIH360es1eAkuLXzx_SPv1zsdEe-oxlODVpmLQmOD46I/s72-c/Babur.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/08/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/08/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content