इतिहासलेखनासाठी पुरावे हवेच आणि समता-करुणा या मूल्यांना मानणारी, संशोधकाला शोभणारी विनम्र जाणीवसुद्धा हवी. अखेर, कोणतंही ज्ञान ही अनेकांच्या श्रमावर उभी राहिलेली गोष्ट
असते. श्रम कुणाचेही असोत, पुरावे कुठल्याही
स्वरूपातले असोत, ते नाकारणार कसे?
‘आपण सर्वज्ञ नाही’ हे विनम्रतेनं मान्य करणं
ही ज्ञान मिळवण्याच्या प्रवासातली महत्त्वाची शिदोरी ठरते असं डनिंग आणि क्रूगर या
मनोवैज्ञानिकांचं प्रतिपादन प्रसिद्ध आहे. इतिहास लेखनाच्या बाबतीतदेखील इतरांकडून
स्वीकारलेल्या वेगवेगळ्या पुराव्यांच्या आणि सिद्धांतांच्या आधारानं हा प्रवास
सुखरूपपणे करता येतो. पण आज कुणीही उठून आपापल्या अजेंडय़ानुसार इतिहास लिहून आत्मनिर्भर होण्याच्या धांदलीत
असताना हे दुसऱ्यांनी दिलेले पुरावे पारखून, त्यांना योग्य ते श्रेय देऊन, विवेक वापरून, निष्कर्ष काढण्याचे वेळकाढू आणि परावलंबी उद्योग कशाला
करावे? असंही कुणी विचारतील. तर त्याचं उत्तर असं की
कोणतंही ज्ञान ही अनेकांच्या श्रमांवर आधारलेली गोष्ट आहे. ज्ञानाच्या, सामूहिक शहाणिवेच्या काही वैशिष्टय़ांचा विचार आजच्या लेखात
करून पाहू या.
सतराव्या शतकात इसाक न्यूटननं आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं,
की ‘मला जर काही दूरवरचं दिसलं
असेल, तर त्याचं कारण म्हणजे मी महाकाय लोकांच्या
खांद्यावर उभा आहे’. आपले विचार, आचार आणि उच्चार हे आधीच्या लोकांनी निर्माण केलेला
ज्ञानाचा प्रवाह आपल्यापर्यंत पोहोचल्यामुळे घडत जात असतात. याची संशोधकाला साजेशी
विनम्र जाणीव न्यूटननं पत्रात व्यक्त केलेली दिसते. या उमद्या विनम्रतेपायी ना
कुणी न्यूटनचं योगदान नाकारलं, ना कुणी त्याला कमी लेखलं.
संशोधकांकडे जेव्हा कृतज्ञता असते, तेव्हा आपल्या कामाला
हातभार लावणाऱ्यांचं ऋण फेडता आलं नाही तर किमान त्याचा निर्देश ते करतात. यामुळे
न्यूटनचा पत्रव्यवहार संपादित करणाऱ्या एच. डब्ल्यु. टर्नबुल यांचं ऋणदेखील
आपल्यावर आहेच.
ज्ञान निर्माण करताना- मग ते इतिहास लेखन असो, वा अधिक चांगल्या पद्धतीनं लोणचं घालण्याची कृती असो- समता हे मूल्य अगदी
पायाभूत असायला हवं. म्हणजे ज्या वाचकांसाठी, ग्राहकांसाठी आपण ज्ञान निर्माण करतोय, त्यांनादेखील काहीएक बुद्धिमत्ता, अनुभव, ज्ञान, कौशल्यं आणि मानवी
प्रतिष्ठा आहे हे आपल्याला मनापासून पटलेलं असायला हवं. आपण ज्ञान निर्माण करताना
कोणकोणते पुरावे कुठून मिळवून वापरले हे वाचकांनादेखील सांगणं म्हणजे समतेचा विचार
मानणं. यामुळे काय होतं, तर नुसती पाककृती वाचून
सोडून न देता, वाचक स्वत:देखील लोणचं
घालून पाहतात, प्रयोग करू पाहतात, इतिहास लिहू-वाचू पाहतात. संस्कृतीचा प्रवाह वाहता राहतो.
याउलट ‘आमची कोठेही शाखा नाही’ असा विचार हा व्यापारात मक्तेदारी राहण्यासाठी काही वेळा उपयोगी पडत असेल,
तरी एकूण ज्ञानव्यवहाराला मारक ठरतो. समता अंगीकारणारे
संशोधक नवं ज्ञान निर्माण करतात तेव्हा त्यासाठी वापरलेले पुरावे आणि पद्धती
पारदर्शीपणे सर्वासमोर खुले करतात.
मानवी संस्कृतीच्या आणि ज्ञानाच्या निर्मितीमध्ये आणखीनच महत्त्वाचा विचार हवा
तो म्हणजे करुणेचा. करुणा या शब्दाची एक व्याख्या अशी की अहितदु:ख- अपनयकामता
म्हणजेच रंजल्या गांजलेल्यांचं दु:ख दूर करण्याची इच्छा. इतरांच्या खांद्यांवर उभं
राहून पुढं पाहण्याची धडपड ही आपल्या सोबतचे किंवा मागाहून येणारे लोक ठेचकाळू
नयेत, वाट चुकू नयेत यासाठी असायला हवी. आज आपल्या
देशात रोगट वर्तमानाचं ओझं घेऊन अनिश्चित भविष्याकडे स्थलांतर करणारे कोटय़वधी लोक
मानवनिर्मित संकटाचे बळी ठरताहेत. रखरखत्या उन्हात शेकडो किलोमीटर पायपीट करणारे,
मरणारे लोक पाहूनही आपण जर किमान माणूस म्हणून त्यांचा
विचार करत नसलो, तर आपल्या सर्वोत्तम
पाककृतींची आणि इतिहास लेखनाचीही किंमत झूठ आहे.
करुणा असेल, तर आपापल्या क्षेत्रात,
वावरात राहूनदेखील आपण या मानवी शोककथेला थोडं तरी सुसह्य
करू शकतो. भूतकाळात अशा संकटप्रसंगाचा मुकाबला कसा केला याचा विचार करताना
लखनौच्या बडा इमामबाडम नावाच्या वास्तूकडे लक्ष वेधलं गेलं. १७८४ साली भयंकर
दुष्काळ आणि अन्नान्नदशा झालेली असताना असफ उद्दौला या अवधच्या नवाबानं गरीब
भुकेल्या लोकांना सन्मानानं रोजगार मिळावा यासाठी या वास्तूचं बांधकाम करायला
घेतलं. अशी जनश्रुती आहे की या सुंदर इमारतीच्या कामानं सलग दहा वर्ष हजारो
कामगारांना रोजीरोटी आणि मानवी प्रतिष्ठा दिली. भारतीय राजांनी करुणेच्या
ओलाव्यातून अशी लोकोपयोगी कामं केल्याच्या ऐतिहासिक पुराव्याचं अस्तित्व मान्य
करणं हे ज्ञानशास्त्रीय दृष्टीनंही आवश्यक आहे, पण भारतीय राज्यकर्ते- विशेषत: आधुनिकपूर्व काळातले राज्यकर्तेदेखील
प्रजाहिताचा विचार करत होते हे वास्तव साम्राज्यवादी इतिहासकारांना आणि त्यांच्या
ओंजळीनं पाणी पिऊन घेणाऱ्या इतरही लेखकांना पचायला जड जातं. त्यामुळे योग्य
पुराव्याच्या मात्रेचे वळसे देऊनच त्यांचा पित्तप्रकोप शांत करावा लागतो.
इतिहासातून मिळणाऱ्या अशा दाखल्यांचा उपयोग आत्ताच्या वास्तवाला दिशा दाखवण्यासाठीही करता येतो.
दुष्काळात धान्याची कोठारं खुली करणाऱ्या दामाजीपंतांची तीनचारशे वर्षांपूर्वीची
कथा सांगणारं ‘उदारदामोदर’ हे नाटक १८८० मध्ये मराठी रंगभूमीवर आलं होतं. त्याच्या
प्रेक्षकांना १८७५ सालच्या मे महिन्यात दुष्काळ आणि सावकारांच्या विरुद्ध
दख्खनच्या शेतकऱ्यांनी केलेल्या खतफोडीच्या बंडाची पार्श्वभूमी परिचयाची होती. ‘‘हे कसले राजे हो? प्रजेला केवळ हे
जनावरें समजतात. त्यांची थैली भरली म्हणजे झाले, प्रजा मरेनां! ..ज्या राज्यांत प्रजेला अतिशय दु:ख, ती राज्ये रसातळाला गेलीच म्हणून समजा!’’ हा या नाटकातला संवाद म्हणजे लेखकाची इंग्रजी सत्तेला उद्देशून बोलण्याची ताकद दाखवणारा पुरावाच आहे.
दुसरीकडे पुरावे म्हणजेच जणू इतिहास किंवा कोणतंही ज्ञान असा गैरसमजही करून
घेणं योग्य नाही. कारण वर्तमानकालात पुरावे निर्माण करण्याइतकं सांस्कृतिक भांडवल
आणि सवड सर्वानाच लाभते असं नाही. पुराव्यांच्या रेलचेलीच्या बळावर ज्यांना मिरवता
येत नाही अशा माणसांच्या वर्तमानाची दखल घेणारं, संवेदनशीलता असणारं समाजमन आणि इतिहासभानदेखील दुर्मीळ आहे. ‘पान पाणी नि प्रवाह’ नावाच्या कादंबरीमधल्या आदिवासी तरुणाला प्रश्न पडतो, ‘‘दादा, हमारा नाम इतिहास में लिखा जायेगा क्या?’’
बाहेरच्या जगाच्या दृष्टीनं ज्याच्याकडे गमावण्यासारखं
काहीच नाही, त्याच्या त्यागाची दखल
इतिहास घेतो की नाही याबाबत शंका वाटण्याजोगी परिस्थिती आहेच. तरीही पुरावे न
ठेवता जगलेल्या लोकांच्या बाबतीत विचार करताना दस्तऐवजांची व्याख्या अधिक समावेशक
करण्याचा समजूतदारपणा काही इतिहासकार
दाखवताना दिसतात. त्यामुळे कागदोपत्रांत
कुणाचं नाव आलं नाही तरीही ‘आईबापानं दिली लेक। नाही
पाहिली चालरीत। जाई अडकली चिलारीत।।’ अशा अनाम ओवीमधून
सासुरवासरूपी काटेरी चिलारीच्या जाळीत अडकलेल्या जाईसारख्या लेकीच्या वास्तवाची
इतिहासाला दखल घ्यावी लागते.
इतिहासाची आणि एकूणच ज्ञानाची निर्मिती करताना पुरावे आवश्यक असतात. त्यांचा
कृतज्ञतेनं निर्देश करणं आवश्यक असतं. या संपूर्ण प्रक्रियेमागं समतेचा विचार
महत्त्वाचा असतो. आणि जिथे हे नियम काटेकोरपणे पाळता येत नाहीत, तिथेही करुणा आणि संवेदनशीलता ही माणसाच्या ज्ञानाचा आणि
संस्कृतीचा झरा जिवंत ठेवू शकते. अन्यथा
आरती प्रभू लिहितात तसं-
‘वेदनांची गाणी म्हणजे, पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा, पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे..
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’
असं वास्तवाचं क्रूर ओझं घेऊन वणवणत मायदेशांतर करणाऱ्या मजुरांसारखीच आपल्या
ज्ञानपरंपरेचीही स्थिती होईल.
(श्रद्धा कुंभोजकर यांचा हा लेख 28 मे 2020ला लोकसत्ता देनिकात
प्रकाशित झालेला आहे. लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात. त्यांचा मेल : shraddhakumbhojkar@gmail.com)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com