साहित्य: वास्तव आणि यूटोपिया


९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन २ फेब्रुवारी २०२४ला अमळनेर येथे झाले. अध्यक्ष म्हणून डॉ. रविंद्र शोभणे यांची निवड झालेली आहे. त्यांनी आपल्या भाषणात बेरोजगारीचा प्रश्नावर बोट ठेवले. बेरोजगारीच्या याच विवंचनेतून शेतकऱ्यांप्रमाणे उद्या तरुणही जीवन संपवू लागले तर ते खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे? एक लक्षात ठेवा, तरुणांची ऊर्जा वाहत्या पाण्यासारखी असती. ती जशी सृजनाची गंगोत्री होऊ शकते, तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारणही ठरू शकते, अशा थेट शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी सरकारला इशारा दिला. त्यांचं अध्यक्षीय भाषण आम्ही नजरिया वाचकासाठी दोन भागात देत आहोत. हा दुसरा भाग...

भाग-२

नॉस्टॅल्जिया आणि समकाल

कथात्म साहित्यात नॉस्टॅल्जिया असावा की असू नये हाही वाद असतो. नॉस्टॅल्जियाचा अर्थ आपण साधारणतः पूर्वस्मृतिरंजन असा घेतो. जगातील सगळेच साहित्य नॉस्टेल्जिया स्वरूपाचे आहे. पण या लेखनातून निघणारा ध्वन्वर्थ हा जर समकालीन समाजवास्तवाशी नाते सांगणारा असेल तर तो निश्चितच अर्थधन उरतो. उदाहरणच द्यायचे झाले तर आजच्या बहुतेक ललितलेखन या स्वरूपाचे आहेत हेही नाकारता येत नाही, थोडक्यात भूतकाळाचे उदात्तीकरण असे म्हणता येईल, पण यातही काही कलाकृती या समकालाशी, समकालीन वास्तवाशी पत्र नाते सांगणाऱ्या उरतात. 

रणजित देसायांची स्वामीवाचताना जुनी मंडळी सत्ता सोडत नाही आणि नव्यांना सत्ता चालवू देत नाहीहा आशय स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या राजकारणाचे चित्र प्रतिबिंबित करणारा आहे, हे नाकारता येत नाही. विश्वास पाटलांची पानिपतसमूहनिष्ठ राजकीय स्वाभिमानाचे चित्र आपल्यासमोर उभे करते. वसंत कानेटकरांचे रायगडाला जेव्हा जागा येतेमधून पिता-पुत्राच्या संघर्षाचे कालातीत चित्र उभे राहते. पण आपण नॉस्टेल्जिया या संकल्पनेचा अर्थ त्या त्या लेखकाच्या भूतपूर्व आयुष्याशी निगडीत केला तर हा उलगडा अधिक चांगल्या प्रमाणात होईल. उदाहरणार्थ- मराठीतील दलित साहित्यात आलेले बहुतेक कथात्म लेखन हे साठोत्तरी काळात झालेले आहे आणि त्यातील वर्ण्य व पटित काळ हा बघितला तर तो स्वातंत्र्यपूर्व आहे, पण हे भीषण वास्तव कालातीत होते, ते त्या क्षणापर्यंत अस्पर्शित असे होते. आणि आपल्या कित्य म्हणविणाऱ्या सांस्कृतिक इतिहासाच्या पटावर एक मोठी चपराक होती. म्हणून हे पर्व साहित्याच्या इतिहासात अधिक महत्त्वपूर्ण म्हणून गणले जाणारे ठरले, आणखी एक दोन उदाहरणे देऊन या मुदद्याचा परामर्श घेता येईल. बनगरवाडी, गारंबीचा बापू’, ‘रथचक्रइत्यादी कलाकृतीचा लिखित काल आणि घटित काळ यातही असेच अंतर आहे. पण यातून ध्वनित होणारा आशय हा सार्वकालिक असा आहे. मराठीत सशक्त म्हणून उल्लेख करता येईल आणि तरीही दर्लक्षित राहिलेली एक कादबरी म्हणून शंकर पाटलांच्या टारफुलाया कादंबरीचा उल्लेख करता येईल बदलत्या सत्ताचक्राचे राजकीय रूपक म्हणून ही कादंबरी महत्त्वपूर्ण अशी आहे. याच आशयाची पण मोठे सन्मान पदरात पडलेली व्यंकटेश माडगूळकरांची सत्तांतरही कादंबरी विचारात घेता येईल. मराठीत आत्मचरित्रात्मक कादंबरीचीही एक शाखा अस्तित्वात आलेली आहे. हा प्रयोग आनंद यादवांनी झोंबीच्या निमित्ताने केला. अर्थात या आधीच्या कादंबऱ्यांचा विचार करता चरित्रात्मक कादंबरी नव्हती, असे म्हणता येणार नाहीच, फक्त त्यातील नाचक लेखकाच्या नावाने रेखाटलेले नसायचे एवढेच. हा प्रयोग यादवांनी मुद्दाम केला. आणि तो यशस्वीही झाला; पण पुढे या चतुष्ट्यात त्यांनीच बदल करून आत्मचरित्र असे संबोधले. यादवांच्या या लेखनावर अनेकांनी भरपूर तोंडसुख घेतले, पण मराठीत तेव्हा आणि आता तर भरपूर प्रमाणात छुप्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांचा घाऊक माल अस्तित्वात आलेला आहे. आपलंच जगणं साहित्यात मांडाअसा आदेश एखाद्या त्यांच्या प्रेषिताने, प्रतिभावंताने दिल्यानंतर हे लेखन घाऊक स्वरूपात होणार नाही तर काय?

विजय तेंडुलकर या अशा कृप्या आत्मचरित्रात्मक लेखनाच्या प्रखर विरोधात होते, आणि त्यांचा या संदर्भातला विरोध समजून घेत्ता तो योग्यच होता असे म्हणावे लागते. कारण आत्मचरिरात्मक लेखनात लेखक काही काळातच संपतो. मराठीतील दलित साहित्याचे उदाहरण यासाठी अतिशय बोलके आहे. आपल्या आत्मचरित्रवना आशयदव्याला आपल्या लेखनात फारसे महत्त्व न देताही आपली वाड़मयीन कारकीर्द लखलखीत ठेवणारा एक महत्वाचा कादंबरीकार म्हणून अरुण साधू यांचे उदाहरण अधिक सार्थपणे येता येईल. त्यांच्या गाजलेल्या सर्वच कादंबऱ्यांचा इथे उल्लेख करणे शक्य होणार नाही; पण त्या सगळ्या कादंबऱ्या वा अनि तटस्थ वर्तमान रेखाटणाऱ्या म्हणून मला महत्त्वाच्या वाटतात, त्यांची मुखवटाही कादंबरीही त्याला अपवाद नाही. शोधयात्राही मराठी साहित्यात एक महत्वाची कादंबरी म्हणून अधोरेखित करता येईल

वाचा : मराठी नष्ट होण्याचा ‘बागुलवोबा’ (भाग-१)

वाचा : वर्धा : नरेंद्र चपळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण

नागपूर येथे भरलेल्या ८०व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी अलीकडच्या साहित्यातील प्रवृत्तीविषयी माढलेले मुद्दे आज अधिक बोलके वाटतात. आजकाल स्वतःच्या लेखनाचे समर्थन करण्यासाठी आणि त्याच्या उच्च दर्जाची टिमकी मिरवण्यासाठी स्वतःच समीक्षक आणि टीकाकार बनण्याची संशयास्पद चाल काही मराठी साहित्यिकात पडली आहे की काय असे कधी कधी वाटते मराठी समाजामध्ये इतर क्षेत्रात आत्मविद्यासाचा जो अभाव आढळतो त्याचेच हे साहित्य क्षेत्रात पडलेले प्रतिबिंब नाही ना, असाही प्रश्न पडतो, विचारांचे समर्थन करणे, लेखनाचा प्रसार करणे ही गोष्ट समजू शकतो, पण लेखकाने स्वतःच समीक्षक बनून मापदंड तयार करणे आणि स्वत:च्या लेखनावर ए ग्रेडचा शिक्का मारून घेणे हे स्वतःच्या प्रतिभेवर विश्वास नसल्याचे लक्षण आहे. आत्मविश्वास नसलेले विद्यार्थी परीक्षेत गुण वाढवून घेण्यासाठी खटपटी लटपटी करतात तसे हे वाटते. अरुण साधू यांचे हे विवेचन फार महत्वाचे आणि अंतर्मुख करणारे असे आहे.

याच संदर्भात एक वस्तुस्थिती आज पुन्हा नमूद करणे महत्त्वाचे वाटते सत्यकथानावाचे मासिक आणि मौज नावाचे प्रकाशन मराठी साहित्यातील जाणकारांना ठाऊक आहे. सत्यकथामासिक १९८२ साली बंद पडले, पण सत्यकथेत आपले साहित्य छापून आले तर आपला भाग्योदय झाला, आपण मोठ्या साहित्यिकांच्या मांदियाळीत जाऊन बसलो अशी धारणा त्या काळी सर्वसामान्य लिहित्या लेखक-कवींमध्ये होती. काही प्रमाणात ते खरेही होते. सत्यकथे ने अनेक चांगले कसदार लेखक दिलेत, पण या मांदियाळीत प्रवेश करणे महाकठीण होते. अनेक लेखक चर्षान् वर्षे खटाववाडीत चकरा मारीत होते. त्याकाळी काही बंडखोर लेखकांनी सत्यकथेच्या या मांदियाळीचर कंपूशाहीचा उपड उपड आरोप करीत हल्ला चढविला होता. त्यात काहीसा जातीय अभिनिवेशाही होता, पुढे या हल्ला करणाऱ्या मंडळींनी आपली वेगळी मांदियाळी उभी केली, आणि या कंपूशाहीचा नव्याने अधिक प्रखर अनभव मराठी साहित्यविश्वाला आज येत आहे. आज मराठी साहित्य या कंपूशाहीच्या विळख्यात अडकलेले आहे हे नाकारता येत नाही. हुकुमशाहीविरुद्ध एल्गार पुकारणारा क्रांतिकारक सत्ता हस्तगत करताच पुन्हा जनतेला हुमुकशाहीचा प्रत्यय देतो, हा राज्यशास्त्रातील एक सिद्धांत आहे, त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि हा अनुभव साहित्यविश्वातील प्रखर जातीय अभिनिवेशातून येतो ते अधिक उद्वेगजनक आहे.

साहित्य: वास्तव आणि यूटोपिया

साहित्याने काळासोबत चालावे असे म्हटले जाते. अर्थात यात दोन प्रकार संभवतात. पहिला महणजे अगदी समकालीन, वर्तमानकालीन समाजवास्तव रेखाटणारे साहित्य आणि दुसरा प्रकार म्हणजे बदलत्या काळाचा, वर्तमानाचा विचार न करता मानवी नात्यातील सनातन मूल्ये आपल्या प्रकृतीने मांडणारे लेखन, अर्थात समकालाचे, वर्तमानाचे साहित्यात चित्रण करताना मानवी नात्यातील सनातन मूल्ये येत नाहीत, असेही कुणी समजू नये, पण काही लेखक समाजातल्या बदलांकडे, परिवर्तानांकडे, वृत्यंतरांकडे स्थित्यंतरांकडे पूर्णतः पाठ फिरवून लेखन करीत असतात. अर्थात अशा लेखकाचे लेखन कमअस्सल असते असेही मानता येणार नाही, उदाहरणच द्यायचे झाले तर मराठी कथेचा मानबिंदू समजले जाणारे जी.ए. कुलकर्णी, चि.त्र्यं. खानोलकर, ग्रेस ही मंडळी या दुसऱ्या प्रकारच्या लेखन करणाऱ्या मंडळीत येतात.

समाजात बऱ्या वाईट घटना घडताना या लेखकांनी आपल्या डोळ्यांवर जणू कातडे ओढलेले असते, ते स्वतः संवेदनशील असताना सुद्धा त्यांच्या संवेदना समाजातील कुठल्याच घटनेने जाग्या होत नाहीत. त्यांचा विश्वास या अशा वास्तव जगातील घटनांपेक्षा आपल्या आंतरिक बळावर अधिक असतो. देवावर, नशिबावर नियतीवर त्यांची भिस्त अधिक असते. आपण या प्रचंड, महाकाय शक्तीच्या हातातील बाहुले आहोत आणि त्या शक्तीच्या बळावर आपण खेळवले जातो अशी या प्रतिभावंतांची धारणा असते. त्यामुळे ते वा असल्या स्थितिशील जीवनानुभवाच्या चित्रणात रंगून जातात, त्यांच्या लौकिक जगण्याला या असल्या व्यावहारिक जगातील घटनांनी काहीही इजा होत नाही, असे मानावे लागते. दुष्काळ, अवर्षण, अतिवर्षण, युद्ध, महामारी या अशा वर्तमानकालीन घटनांशी त्यांना काहीही देणे घेणे नसते. त्यामुळे हे लेखक जनमानसात आदरणीय, लोकप्रिय असले तरी ते आपण फार फार तर मखरात, देव्हाऱ्यात बसवून ठेवतो, त्यांचा चाहता वर्ग वेगळा असतो, कदाचित त्यांच्या शब्दसामर्थ्याने, शब्दप्रभुत्वामुळे ते वाचकांवर गारुड करतात, उदा, ग्रेसची कविता आपल्याला फारशी कळलेच, हे सांगता येत नाही. उदाहरणच घ्यायचे झाले तर पुढील कवितेचे घेता येईल-

भूलभिंगरी नदीकिनारी उत्तररात्री मला दिसे

जळात अपुले पातळ सोडून बान्याला ती गाव पुसे

आता या कवितेतून अर्थ काढताना भल्याभल्यांना चकरावल्यासारखे वाटते, पण अर्थ कळला नाही, तरी ती कविता आपल्या नजाकतीने, प्रभावाने आपल्याला खेचून घेते. ही मंडळी अनुकरणासाठी कठीण असतात, कारण त्यांच्या लेखनावर त्यांची त्यांची नाममुद्रा उमटलेली असते. ती अनुववंशहीन असते, त्यामुळे नवे लेखक त्यांच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करू लागले तरी पाच दहा पावलातच ते माघारी वळतात, हेही तेवढेच खरे

या लेखनप्रकृतीच विचार करताना एक सशक्त नाव घेण्याचा मोह होतो. आणि ते नाव म्हणजे भारत सासणे, जी.ए. कुलकर्णी यांच्या नंतर एक मोठी झेप घेणारा कथाकार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. एकाच वेळी वास्तवाधीहित अनुभव आणि अज्ञाताचा शोध घेणारी त्यांची कथा-कादंबरी आज मराठी साहित्यात गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे भक्कमपणे उभी आहे, कथा, दीर्घकथा, लघुकादंबरी, नाटक अशा वेगवेगळ्या आकृतिबंधांतून सासणे वास्तव, अतिवास्तव, फटसी, रूपक अशा अनेकविध अंगाने फिरत जीवनाचे अस्पर्शित वास्तव मांडताना दिसतात. बाउलट सामाजिक परिवर्तनाच्या अंगाने, स्थित्यंतरांच्या दिशेने जाणारी मोठी परंपरा मराठी साहित्यात आहे. या लेखनाची परंपरा मराठी साहित्यात पूर्वापार, प्राचीन अशी आहे. आणि आपण आपल्या लेखनासाठी मातत्याने नव्या नव्या विषयांच्या शोधात असतो. या लेखनाला दूसरे नाव समस्याप्रधान लेखन असेही आहे. उदा. गोविंद बल्लाळ देवलांचे शारदाहे नाटक, एखादा नवा विषय आपल्या लेखनातून येत असेल आणि त्या लेखनाकडे आधी वाचकांचे, जाणकारांचे लक्ष जात असेल तर ते विषयाच्या नाविन्यामुळे, पण एवढ्यावरच ते लेखन महत्त्वाचे ठरत नाही. त्या लेखनाची प्रकृती सांगणारे ते एक वैशिष्ट्य ठरते. त्यापलीकडे ते टिकते ते त्यातील मानवी जीवनातील मूळ वृत्ती-प्रवृत्तींच्या दर्शनामुळे कालातीत आशयामुळे. ती त्या त्या काळातली समस्या असली तर त्यातील व्यक्तींचे वर्तन, नातेसंबंध, बदलते आस्थाबंध वा गोष्टी कालातीत होऊन जातात. म्हणूनच या लेखनाला महत्त्व असते. उदाहरणार्थ व्यंकटेश माडगूळकरांची बस सर्व्हिसही कथा घेऊयय या कथेवर माडगूळकरांनी तू वेडा कुंभारहे नाटकही लिहिले आहे. यात गावात बस सुरू झाल्यानंतर बदलू लागलेल्या मूल्यांची, होऊ लागलेल्या वाताहतीची आणि मानवी स्वभावातील आसक्ती-लोभाची बेगळ्या पातळ्यांवरून येणारी प्रचीती ही काही त्या काळापुरती सीमित नसते. तर ती प्रातिनिधिक, सार्वकालिक ठरते. आणि स्वातंत्र्यानंतर बदलत्या सामाजिक संदर्भातील झालेले लेखन महत्त्वाचे लेखन म्हणून गणले जाते.

राजकीय, समाजिक परिस्थिती बदलली की माणसांची मूल्येही बदलतात, हिंदी साहित्यातील एक कादंबरीकार फणीश्वरनाथ रेणू यांची मैला आंचलही कादंबरी त्यादृष्टीने भारतीय साहित्यात मैलाचा दगड म्हणून गणली जाते. मराठीत फारशी चर्चा न झालेली वसंत वरखेडकर यांची प्रतिनिधीही कादंबरीही या दृष्टीने तपासून पाहता येईल, किंवा त्र्यं. वि. सरदेशमुखांची डांगोरा एका नगरीचा या कादंबरीचाही उल्लेख राजकीय रूपक म्हणून विचारात घेता येईल. राजकीय रूपकाचा मराठी साहित्यात झालेला प्रयोग फार मोठा नसला तरी तो काही उदाहरणांच्या दृष्टीने फार अर्थपूर्ण आहे, असे म्हणावे लागेल. या प्रयोगाचे एक ताजे उदाहरण म्हणजे नागनाथ कोत्तापल्ले यांची अगदी नव्याने आलेली काल किलाकही बृहद कादंबरी, या कादंबरीत कोत्तापल्लेंनी वापरलेले राजकीय रूपक अधिक अर्थपूर्ण असे आहे. राजेशाही, घराणेशाही, धर्माधसत्ता, राजकीय प्रभुत्वाच्या सातत्यासाठी केला जाणारा धर्माचा आणि दंडशक्तीचा वापर आणि त्या सगळ्या काळाचा, सामान्य जनतेचा लोकशाही मूल्यांच्या अंगाने होऊ लागलेला प्रवास याचे अतिशय वेधक आणि प्रातिभ पातळीवरील श्रेष्ठत्वाकडे जाणारे चित्रण मुधोळ संस्थानाच्या माध्यमातून त्यांनी उभे केले आहे. ही कादंबरी वाचताना सातत्याने समकालीन राजकीय परिप्रेक्ष्य समोर उभे राहते आणि ध्वन्वर्याच्या अंगाने आपण समाजवास्तवाची मांडणी कशी करू शकतो, याचा अतिशय सुंदर असा वस्तपाठ म्हणून काल-त्रिकालकादंबरीकडे पाहू लागतो. एवढी सुंदर, अर्थपूर्ण कादंबरी आमच्या हाती सोपवून हा प्रतिभासंपन्न लेखक, समाजभानाचा सातत्याने साहित्याच्या संदर्भात विचार करणारा हा आमचा मित्र, माझा वाङ्गयीन सहोदर काळाने हिरावून नेला, हे दुःख फार मोठे आहे.

वाचा : नाशिक : अब्दुल कादर मुकादम यांचे अध्यक्षीय भाषण

वाचा : उदगीर : विद्रोही साहित्य संमेलनातील अध्यक्ष गणेश विसपुते यांचे भाषण

विषयातील नाविन्य आणि कालातीतता

मराठी साहित्यात नव्या ताज्या विषयांना मराठी नाटकांनी अधिक प्राधान्याने रसिकांसमोर आणले. आणि यात अनिल बर्वे हा नाटककार, कादंबरीकार अग्रेसर होता, सरोगसी मदरसारखा विषय त्यांनी कधीचाच आपल्या पत्रकामेष्टीसारख्या नाटकातून आणला, त्यांच्या डोंगर म्हातारा झाला’, ‘युद्धविरामकादंबऱ्या सुद्धा वेगळ्या विषयांवरच्या म्हणून उल्लेखिता येतील, अर्थात्त नवीन आणि ताजे विषय असले की ती कलाकृती श्रेष्ठ ठरते, असे मानणे चुकीचे ठरेल शेवटी विषय कुठलाही असला तरी त्यात जीवनविषयक गंभीर दृष्टिकोन आणि कालातीत आशय किती आहे, यालाच अधिक महत्त्व असते. म्हणूनच खानोलकरांच्या रखेलीया नाटकापेक्षा त्यांच्या एक शून्य बाजीरावला अधिक महत्त्व आहे तेंडुलकरांच्या श्रीमंतपेक्षा सखाराम बाइंडरअधिक महत्त्वाचे मानले जाते. किवा वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटला कालातीत महत्त्व प्राप्त होतं ते यामुळेच अर्थात हे सगळं मान्य करूनही सामाजिक भानाच्या दृष्टीने, घटनांच्या दृष्टीने हा लेखक किती सजग आहे हेही महत्त्वाचे ठरते.

शेवटी कलाकृती ही नव्या किंवा जुन्या विषयावरील आहे यापेक्षा ती कोणता आशय मांडते, याला अधिक महत्त्व आहे. या सबंध विवेचनानंतर सामाजिक, राजकीय घटना आणि मराठी लेखक यांचा काय संबंध आहे, यावरही काही मते मांडणे महत्त्वाचे वाटते. आपल्या अवती भवती घडणाऱ्या घटनांशी आपले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाते असतेच. कारण त्या त्या घटनांनी आपल्या जीवनात काही बादले येतात, आलेली असतात. आपल्या जीवनमूल्यांवर त्यामुळे बरे वाईट आघात होत असतात, एक जागतिक उदाहरण देण्याचा मोह या ठिकाणी होतो. नेपोलियनच्या रशियावरील आक्रमणाने संपूर्ण रशियाच तळामुळातून हलला होता. आता ही झाली पडलेली पटना. पण याच पटनेवर लिओ टॉलस्टॉयची वॉर अँड पीसआलो आणि त्यात नेपोलियनची रशियावर स्वारी ही घटना दुय्यम ठरते आणि सपूर्ण रशियन समाजाची चाताहत आणि पुनःस्थापना हा आशय प्रधान होती.

भारतीय राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर मागच्या शतकाच्या उत्तरार्धात काही महत्त्वाच्या पटना पडून गेल्या, त्यातली महत्त्वाची पटना महणजे १९७५ ची आणीबाणी, किंवा त्यानंतरच्या आणखी काही राष्ट्रीय स्तरांवरील काही घटना घेता येतील. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात अशा घटनांनी होणारी उलथापालथ खूप विमनस्क करणारी उरते, माणसे आपल्या मुळापासून उद्‌ध्वस्त होतात. हे परिणाम केवळ राजकीय नसतात तर ते सामाजिक, मानसिक, धार्मिक अशा सगळ्याच अंगांनी गावपातळ्यांवर दीर्घकालीन स्वरूपात उमटतात. मराठी कादंबरी इथे कुठे आहे? ‘संधिकाल (मधु मंगेश कर्णिक), ‘ताम्रपटआणि दिवे गेलेले दिवस’ (रंगनाथ पठारे इत्यादी कादंबऱ्यांतून आणीचाणीचे काही संदर्भ म्हणून या पटना येतात. आत्मस्तुतीचा दोष पत्करून पडघमचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते. याच काळातला मराठवाड्यातील भूकंप किंवा १९९३चा मुंबईत घडून आलेला बॉम्बस्फोट आणि त्यात उद्ध्वस्त झालेली शेकडो कुटुंबे, मारली गेलेली हजारो माणसे या घटना मराठी कादंबरीत कुठाय? मणीरत्नमचा बॉम्बेहा चित्रपट आठवा किंवा याच घटनेवर वेगळ्या शैलीतली २००७ साली हिंदीत प्रकाशित झालेली दूधनाथ सिंह यांची आखिरी कलामही कादंबरी वाचली की मराठी साहित्याची, कादंबरीची प्रकृती आपल्यासमोर आल्यावाचून राहत नाही, घडणाऱ्या घटना आणि त्यावर लिहायला घेतलेले लेखन यात बन्यापैकी काळाचे अंतर असावे, तो अनुभव लेखकाच्या मनात खोलवर रुजणे, परिपक्व होणे आवश्यक असते; पण तो परिपक्व होण्याची वाट पाहता पाहता शिळाही होऊ नये. मराठीत श्रेष्ठ कलाकृतीच्या संदर्भात असणाऱ्या काही मोजपट्टया पाहिल्या की अनेक महत्वाच्या कलाकृती का आणि कशा नजरेआड केल्या जातात किंवा अनुल्लेखांनी मारल्या जातात याचे उत्तर मिळते. यात प्रभाकर पेंडारकर यांची रारंग डांग, अनंत सामंत यांची एम टी आयबा मारू’, अरुण साधू यांची शोधयात्राइत्यादी कादंबऱ्यांची उदाहरणे देता येतील.

एक दोन उल्लेख काही वेगळ्या संदर्भात करू इच्छितो. मराठी साहित्यात नवकथेचे मानदंड म्हणून चार कथाकारांच्या वांगमयीन कार्याचे स्मरण इथे करणे गरजेचे आहे. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, आणि माडगूळकरां सोबतच आमच्या नागपूरच्या पु.भा. भाव्यांनीही मराठी नवकथेला शैलीचे देणे दिले आहे, हे त्यांचे वाइचीन मोठेपण नाकारता येणार नाही, पुढे ही कथा अधिक लोकप्रिय करण्यासाठी, जनमानसात रुजवण्यासाठी व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. म. मिरासदार यांनी केलेले कार्य मराठी साहित्याच्या इतिहासात अधोरेखित करण्याएवढे महत्वाचे आहे.

साठोत्तरी प्रवाह: नव्या वाटा

मराठीत साठोत्तरी काळात दलित साहित्याचा मोठा प्रवाह वेगाने आला आणि संपूर्ण जाणकार वाचकांचे, रसिकाचे लक्ष त्याकडे वेधले गेले, युगानुयुगांपासूनची ठसठसती वेदना, दुःख त्या साहित्यातून व्यक्त होऊ लागले, त्यात व्यक्त होणाऱ्या विद्रोहाने इथल्या पारंपारिक मूल्यांना जबरदस्त हादरे देत हे साहित्य एका दशकाच्या आतच प्रस्थापित झाले. या साहित्याचा अमोप वेग आणि जीवनानुभव पाहता श्रेष्ठ, भारतीय पातळीवरची महाकादंबरी दलित साहित्यातूनच जन्माला येईल असा विश्वास अनेक जाणकारांनी व्यक्त केला होता. पण जवळ जवळ पन्नास वर्षे उलटूनही या अपेक्षा मात्र त्या साहित्याने पूर्ण केल्या नाहीत, असे तटस्थपणे विचार करता म्हणावे लागते,

काही लक्षवेधी, चांगल्या कादंबऱ्या नक्कीच या साहित्याने दिल्यात; त्या सगळ्यांच्या आदराचा विषयही ठरल्या. बाबुराव बागूलांच्या सूडसारख्या लघुकादंबरीने आपण हादरतोच, नामदेव कांबळेंच्या राघववेळया त्रयीने एक महत्त्वाचा प्रयत्न केला आहे. शरणकुमार लिंबाळे आपल्यापरीने शोध येत दलित साहित्याला सरस्वती पुरस्कार मिळवून देणारा लेखक माणून ताठ पणे उभा राहिला; पण पुढे काय? मराठी दलित साहित्य कविता आणि स्वकथने इतपतच सीमित राहिली आहेत का? यातली समीक्षा ही त्या साहित्याच्या प्रस्थापनेसाठी कामी आली मराठी दलित साहित्याने मराठी साहित्यातील आत्मचरित्राचे दालन अधिक समृद्ध केले, पण हाच अडसर श्रेष्ठ कादंबरीसाठी आड आला असेही म्हणावे लागते.

दलित साहित्यातले बहुतांशी लेखक आपल्या पहिल्यावहिल्या स्वकथनाने प्रसिद्धीच्या झोतात आले आणि आतून रिते झाले. सगळा शक्तिपात्त झाल्यासारखी या लेखकांची अवस्था झाली आपल्या जवळचा सगळाच ऐवज ओतून झाल्यानंतर पुन्हा सांगण्यासारखे काहीही राहिले नाही, ही वस्तुस्थिती त्यांना कळली. आणि मग हीच पहिल्या वहिल्या कलाकृतीने मान्यवर झालेली मंडळी एक तर विचारवंत होण्यासाठी धडपडू लागली किंवा त्या लेखनाच्या पुण्याईवर राजकीय हितसंबंध सांधू लागली. यातली बऱ्यापैकी मंडळी राजकीय व्यासपीठावर वावरू लागलेली आणि आपल्याच समाजाला विसरलेली दिसू लागली, महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाला, विचारांना आपल्या सोयीने मुडपून घेऊ लागली. हे कमी की काय म्हणून दलित साहित्य की आंबेडकरवादी साहित्य असल्या वादाच्या रणधुमाळीत आपापले गटतट तयार करून अनुभवाच्या कसदार मांडणीपासून हे साहित्य दूर गेले. एका मोठ्या साहित्यप्रवाहाला मराठी साहित्य पारखे झाले. आज या प्रवाहाला ऐतिहासिक प्रवाह म्हणून आपण अभ्यासात ठेवणार आहोत की काय अशी शंका येऊ लागते. आणि यामागील कारणांचा शोध घेतला तर असे दिसते की हे लेखक आपल्या वर्तुळापलीकडील समाजातील अनुभव आणि त्या अनुभवातील ताणेबाणे समजून घेऊन त्यावर आंबेडकरी विचारांचे कलम करून तो अनुभव साहित्यात मांडू शकले नाहीत, कारण आज दलित समाजासमोरील प्रश्न आणि बहुजन समाजातील प्रश्न यात फारसा फरक राहिलेला नाही, उदाहरणच सांगायचे तर पुढे ते जागतिकीकरणाच्या संदर्भात सांगता येईल.

वाचा : उदगीर : भारत सासणे यांचे अध्यक्षीय भाषण

वाचा : उदगीर : शरद पवार यांचे उद्वघाटनाचे भाषण

नव्वदोत्तरी उन्मेष, देशीवाद आणि खाउजा संस्कृती

साठोत्तरी काळात जन्मलेली आमची पिढी नव्वदीच्या उंबरठ्यावर लेखन करती झाली. याच काळात आनंद यादवांनी आधुनिक ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू केली होती. शहरी सुधारणा, मूल्ये, जगण्याच्या तऱ्हा, यंत्र, बदलती शेती आणि त्यामुळे बदलत जाणारी ग्रामीण समाजव्यवस्था, गावगाडा या साहित्य चळवळीतून जन्माला आला, सहकार क्षेत्रामुळे, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार झाल्यामळे गाव-खेड्यातही आमूलाग्र बदल होऊ लागले होते. खेड्याकडे चला, तिथल्या लघुउद्योगाला प्राधान्य द्या, या महात्मा गांधीजींच्या हाकेच्या संदर्भात विचार केला तर प्रस्तुत बदल अगदीच विरुद्ध होते. पण हा बदलत्या काळाचा रेटा नाकारता येत नव्हता, या रेट्याचे आणि गावगाड्यातील स्थित्यंतराचे अधिक यशस्वी चित्रण आनंद यादवांनी गोतावळामध्ये केले. तोच आशय घेऊन रा.रं. बोराडेंची पाचोळाआली. १९७५ ते १९९० या काळात या प्रकृतीच्या लेखनाने मराठी साहित्यात आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. ग्रामीण भागात जन्मलेली आणि नव्याने लिह-व्यक्त होऊ लागलेली पिढी या काळात साहित्याच्या क्षितिजावर ठळकपणे दिसू लागली त्यातूनच ग्रामीण साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि त्या छताखाली डी, आनंद यादवांसोबत रा.रं. बोराडे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, भास्कर चंदनशिव, बाचा पाटील, द. ता. भोसले, अनुराधा गुरव, वासुदेव मुलाटे, प्रतिमा इंगोले, बाबाराव मुसळे, इंद्रजीत भालेराव, सदानंद देशमुख इत्यादी मंडळी येऊन साहित्यात आपल्यापरीने आपली अभिव्यक्ती करू लागली. पण १९९२ नंतर भारत सरकारने मुक्त बाजारपेठेचे धोरण स्वीकारले. त्यातून खाऊना संस्कृती उदयास आली. आणि पुढे याच बाटेने जात देशीवादाने जन्म घेतला, आणि मग आपली आंतरिक गरज म्हणून ग्रामीण साहित्य चळवळीतले बहुसंख्य लेखक, कवी वा देशीवादाचे समर्थन करते झाले. तिकडून पक्षांतर केल्यासारखे ते इकडे दाखल झाले.

१९९२ सालानंतर आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली नसती तर आपला देश भिकेला लागला असता, भारताची बाजारपेठ तत्कालीन अर्थमंत्री डी मनमोहन सिंग यांनी जगाला खुली करून दिली आणि भारत आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला, या जागतिकीकरणात अनेक गोष्टी पैशांसोचातच भारतात आल्या, भारतीय समाजाचे, अर्थव्यवस्थेचे एक वेगळे चित्र उभे राहिले. Globalization and Politics in India या २००७ साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ने प्रकाशित केलेल्या आणि बलदेव नायर यांनी संपादित केलेल्या ग्रंथात अनेक लेखकांनी जागतिकीकरणाच्या संदर्भात अधिक तात्त्विक मीमांसा केली आहे.

“The benefits of integration with the world economy, through globalization, world accrue only to those countries which have laid the requisite foundations for industrialization and development. This means investing in the development of human resources and the creation of a physical infrastructure. This means raising productivity in the agricultural sector. This means using strategic industrial policy for the development of technological and managerial capabilities at a micro level.”

हा जागतिकीकरणाचा अर्थ विषद करणारा त्यातील दीपक नय्यर यांचा लेख या संज्ञेला अधिक विषद करून सांगणारा आहे

१९९२ साली भारतात प्रवेश करत्या झालेल्या या जागतिकीकरणाने २०००च्या आसपास आपली पाळेमुळे भारतात सर्वत्र पसरविल्याचे चित्र दिसून येते. या पार्श्वभूमीवर श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर च्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानसत्रांतून सर्वप्रथम देशीवादाची जाहीर चर्चा घडवून आणली गेली आणि मग मराठी साहित्यात देशीवाद विरुद्ध जागतिकीकरण असे खुले युद्ध सुरू झाले. देशीवादाची मांडणी करताना देशीवादी मंडळींनी ग्रामीण व्यवस्था, कृषिसंस्कृती, ग्रामनियत रीतिभाती, जल-जंगल-जमीन इत्यादी संबंधीच्या ऱ्हासाच्या, अवनतीच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे. आणि या देशीवादाचे जनक किंवा उहाते म्हणून हे श्रेय रा. रा. भालचंद्र नेमाडे यांना दिले जाते. पुणे येथे २०१० साली भरलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या एका परिसंवादाच्या अध्यक्षीय पदावरून बोलताना डॉ. गो. मा. पवार असे म्हणाले होते की मराठीने पर्यायाने भारताने जगाला दोन साहित्यविषयक देणग्या दिल्या आहेत. पहिली दलित साहित्याची आणि दुसरी म्हणजे देशीवादाची किंवा नेटिव्हिझमची त्यातला नेटिव्ह हा शब्द महत्त्वाचा आहे

जागतिकीकरणाचा प्रारंभ नव्वदोत्तरी असा मनाला जातो; पण जागतिकीकरणाची खरी सुरुवात वास्को द गामाने भारताच्या किनाऱ्यावर पहिले पाऊल ठेवले तेव्हापासूनच झाली असेही समजतात. भारताची व्यापारीपेठ तेव्हाच जागतिक व्यापारासाठी खुली झाली होती, आज त्याला वेगळी परिमाणे मिळाली आहेत, एवढेच ही परिमाणे प्रगत औद्योगीकरणाची, तंत्रज्ञानाची आहेत. आता या जागतिकीकरणाच्या सगळ्याच गोष्टींना विरोध करायचा का? आणि असा आपण कितीही निकराचा विरोध तरी जागतीकीकरणाचा हा प्रपात कोसळायचा राहील का? उलट तो कोसळतच जाणार कारण आज आपण ज्या काळात उभे आहोत त्या काळाच्या काही भौतिक, सास्कृतिक, औद्योगिक गरजा आहेत, हे कसे नाकारायचे? भालचंद्र नेमाडे देशीवादासंबंधी म्हणतात - जागतिकीकरणाला थोपवून धरणारं देशी परंपरेसारखं दुसरं कोणताही अमोघ शख नाही तुमची परंपरा डोळसपणे सुरू ठेवली ना की तुम्हाला नाहीसं होण्याची भीती नाही. तुम्ही जुन्या काळाप्रमाणे मुंडासं वापरत असाल तर तुम्हाला नव्या हंटचा धोका नाही, पण तुम्ही बोडके राहिलात तर हंटचा धोका आहे. कारण हॅट अशा रिकाम्या जागेवर बसू शकते, हॅटच्या ठिकाणी परदेशी संस्कृतीच कोणतंही एक तत्त्व म्हणून पोशाख रचनेमधला एक जोड syntagm म्हणून मी हे रूपक वापरले, प्रत्येक परंपरेचं अस आहे, तिथे पोकळी निर्माण झाली तर आपोआप आगंतुक परक्या क्रयवस्तूने ती पोकळी भरून निघेल आणि ती तुमच्या इच्छेशिवाय भरून निघणार हे विवेचन लक्षात घेतले की या देशीवादाचे सूत्र हाती येते. समजा, हे देशीवादाचे सूत्र स्वीकारत आपण जागतिकीकरण नाकारले तर काय? नेमाडेंनी पोशाखाचेच रूपक वापरले म्हणून मीही तेच वापरतो. जीन्स पँट आणि टी शर्ट घालून आपण जागतिकीकरण नाकारणार का? मोबाईल फोनवरून किंवा आय फोनवरून आपण देशीवादाच्या गप्पा मारणारा काय? लॅपटॉप वर आपण देशीवाती कादंबरी लिहून जागतिकीकरणाला हद्दपार करणार का? ब्रेनडेनची शिकार झालेल्या आणि अमेरिका- इंग्लंड सारख्या किवा ऑष्ट्रेलियासारख्या देशात आपल्या मुलांना नोकरीसाठी पाठवून आणि त्यांना तिकडचे ग्रीन कार्ड मिळावेत म्हणून त्यांच्या धडपडीच कौतुक करणाऱ्या बापाने देशीवादी असल्याचा झेंडा हाती घेऊन नाचावं यात किती देशीवाद आपण प्रामाणिकपणे स्वीकारला आहे? शेती, नद्या, भाषा, संस्कृती यांच्यावर होणाऱ्या तत्सम प्रभावामुळे इथल्या देशी संस्कृतीला धक्का पोहचत आहे असे म्हणणारे या जागतिकीकरणावर आगपाखड करण्यापेक्षा इथल्या सरकारी धोरणांवर का पेटून उठत नाहीत? इथली राजकीय सत्ता या सगळ्यांच्या मध्ये दस म्हणून उभी असते हे आपण का सोयीस्करपणे विसरतो? नद्यांचं पाणी अडवतं कोण? नद्यांमधील रेतीघाट तयार करून नद्यां रखरखीत कोण करतं? आगतिकीकरण की इथली राजकीय व्यवस्था? जागतिकीकरण नावाची कुठली हाडामासाची व्यक्ती अस्तित्वात आहे। शेवटी जागतिकीकरण हे एक धोरण आहे आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करणे हे आपल्या शासनाच्या हाती आहे. आजच्या या विशी-पंचविशीच्या पिढीच्या दृष्टीने हा देशीवाद निव्वळ हास्यास्पद ठरू शकेल, इतका तो अव्यवहार्य आहे. तुमचं करियर पढविण्यासाठी आज तरी जागतिकीकरणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही, मग केवळ आपण वेगळे विचारवंत आहोत या अट्टाहासापोटी हे तत्त्वज्ञान मांडत जातो का? हे पारंपारिक तत्त्वज्ञान मांडून आपण आणखी नवे ते काय सांगतो?

वाचा : यवतमाळ : अरुणा ढेरे यांचे अध्य़क्षीय भाषण

वाचा : संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचं संपूर्ण भाषण

देशीवादाची दिशा

देशीवादाचे तत्त्वज्ञान पारंपारिक आहे हे देशीवादीही मान्य करतात त्याचे एक मासलेदार उदाहरण देतो, देशीवादाचे खंदे समर्थक असलेले श्री. रंगनाथ पठारे या देशीवादाची मांडणी करताना म्हणतात- देशीयतेचा अतिरेक एखाद्या समाजाला आत्मकेंद्रित करून हासशील करू शकतो, देशीपणाच्या जाणिवेत भावनाप्रधानता व काव्यात्मकता अधिक असते तर विवेकशीलता त्यामानाने कमी असते, परंपराभिमुखता जास्त आणि आधुनिकता कमी असते. तिचे तोंड भविष्यकाळापेक्षा भूतकाळाकडे जास्त वळलेले असते, देशीपणाचे तत्त्व गतिशील न उस्ता स्थितिशीलतेच्या जवळ जाणारे वाटते. सनातनी, प्रतिगामी वृत्तींशी हातमिळवणी करण्याकडे देशीयतेचा कल असतो.”

खरा देशीवाद, ग्रामजीवनातील कृषिसंस्कृतीतील सर्व आयामांसह पावणे दोनशे वर्षांपूर्वी पुरोगामी दृष्टिकोनातून महात्मा जोतीराव फुले यानी वेगळ्या शब्दात मांडून ठेवला आहे. हेच विचार त्र्यिंबक नारायण आत्रे यांनी आपल्या गावगाडामधून बरोबर शंभर वर्षांपूर्वी ग्रामसंरचनेसह मांडलेले आहेत. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी १९५५ मध्ये लिहिलेल्या ग्रामगीताया ग्रंथातून ग्रामविज्ञान, ग्रामसंरचना मांडून हा विचार अधिक स्पष्टपणे दृग्गोचर केला आहे. पण देशीवादी मंडळींना ग्रामगीताठाऊक असेल तर ना?

देशीवादाची ही झलक पाहता मराठी ललितसाहित्यात आलेला देशीवाद हाही तपासून पाहता येईल. जातिव्यवस्था अधिक घडू करणे, ग्रामीण व्यवस्थेतील सरंमाजी व्यवस्था अधिक बळकट करणे, जातीय उतरंड अधिक मजबूत करणे हे देशीवादाचे एक सूत्र आहे. हिंदू... मधील खंडेरावाच्या चिंतनातून, आठवणीतून ते अधिक प्रखरपणे व्यक्त होत जाते, आम्ही साहित्यातून पुढे जायचे की आणखी मागे वायचे, असा प्रश्न वाचकांना पडतो.

जातीव्यवस्थेचे समर्थन करताना प्रा. पठारे आणखी एक मुद्दा मांडतात, ते म्हणतात- माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला दोन अक्षात स्वतःला उभे करावे लागते, जातिव्यवस्था आणि देशव्यवस्था या दोन बृहदव्यवस्था दोन अस म्हणून काम करते.” या विधानातली गल्लत केवळ देशीपणाची पाठराखण करण्याचा संदर्भात अधिक ठळक होते देशीपणा ही एक ओळख आपण समजू शकतो, उदा. मी भारतीय आहे ही आपली ओळख असेल तर दुसरी ओळख ती प्रांतिक ओळख असू शकते. उदा, मी भारतीय असून मी महाराष्ट्रीय आहे. मी भारतीय असून कुणबी, तेली, माळी, शिंपी, मराठा, ब्राह्मण आहे, अशी आपली ओळख आपण की मागतो का? आणि आजच्या तरुण पिढीच्या मनात ही जात किती प्रमाणात आहे? त्यांच्या मनाला जातींची साधी कल्पनांही शिवत नाही. आज बहुसंख्य प्रमाणात होणारे आंतरजातीय विवाह पाहता या तरुण पिढीला आपण कोणता देशीवाद सांगणार आहोत? याचा दसरा अर्थ या देशीवादाचे वय किती? आणि हा देशीवाद कुणी कुणाला सांगायचा? पठारेंच्याच विधानाचा आधार घेता आणखी एक वैचारिक गोंधळ स्पष्ट दिसतो. बहुतेक देशीवादी स्वतःला पुरोगामी समजतात. आता हा देशीवादच जर प्रतिगामी दिशेने झकत असेल तर ही मंडळी एक तर गोंधळलेली आहे, नाहीतर खोटी आहे, असे महणावे लागते.

तथापि देशीवादी लेखनाला अलीकडे फारच चांगले दिवस आलेले आहेत. देशपातळीवरील पुरस्कार या देशी साहित्याला पटकन मिळतात. कदाचित या पुरस्कारांची ती एकमेव फुटपट्टी असेल, साठीनंतर मराठी साहित्यात आलेल्या दलित साहित्याच्या ओरकस पुरोगामी, ऊर्ध्वमुखी आणि समतेची स्वप्ने पाहणाऱ्या या प्रवाहाला मोठ्या कौशल्याने चगल देण्याच्या, शह देण्याच्या कृप्या कारस्थानातून ही देशीवादाची संकल्पना अस्तित्वात आली आणि सरंजामी व्यवस्थेला अधिक बळकटी आली, दलित साहित्याने फुले, राजर्षि शाहू आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आपले अधिष्ठान माणून स्वीकारले होते. कारण जगाच्या पाठीवरील कुठल्याही नव्या साहित्याच्या प्रवाहाला, प्रकृतीला, कुठल्यातरी मोठ्या विचारवंताचे ठोस असे वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले होते. मग तो मार्क्सवादी साहित्यप्रवाह असेल, आस्तित्ववादी साहित्यप्रवाह असेल, ब्लॅक लिटरेचरची चळवळ असेल, श्रीवादी साहित्याची चळवळ असेल या सगळ्या चळवळीमागे त्या त्या विचारवंतांचे मोठे अधिष्ठान होते. देशीवादाच्या मुळाशी असले कोणत्या महापुरुषाचे अधिष्ठान आहे याचा शोध मी अजूनही घेतोच आहे.

द्वेषभावना ही कुठल्याही साहित्याची अर्थात भारतीय साहित्याची एक ओळख, खूण असावी असा विचार मांडणे गैर नाही, या विचारांच्या पुष्ट्यर्थ काही अमराठी कलाकृतींचाही संदर्भ देता येईल. उदाहरणार्थ- आर. के. नारायण यांची द गाइडही कादंबरी किंवा अरविंद अडिगा यांची २००७ साली प्रकाशित झालेली आणि बुकर पारितोषिक विजेती कादंबरी द व्हाइट टायगरया भिन्न काळातल्या दोन कादंबऱ्या समोर ठेवल्या तर जवळ जवळ पन्नास वर्षे अंतर असलेल्या या दोन्ही कादंबऱ्यामध्ये भारतीयत्व हे एक सूत्र समान आहे आणि भारतातल्या कुठल्याही प्रांतातल्या कलाकृतीचे हेच एक सूत्र असू शकते.

बोली, तत्सम घटक आणि चिंताक्रांत मध्यमवर्गीय

जागतिकीकरण आणि भाषा-बोली यांच्या संदर्भात गंभीरपणे बोलले जाते. जागतिकीकरणाने मराठी भाषा सुद्धा ज्या शिल्लक राहील की नाही अशी भीती वर्तविली जाते. या जागतिकीकरणाने जगाच्या पाठीवरील किती बोली संपल्या आणि किती संपायच्या मार्गावर आहेत, याची मोजदाद भालचंद्र नेमाडेंनी आपल्या देशीवादाच्या निबंधात केली आहे. अर्थात त्यांनी ही आकडेवारी Atlas of world languages, Dead languages, Red Book या पुस्तकातून घेतली आहे. भारताने जागतिकीकरण स्वीकारले तेव्हा भारतीय भाषांच्या संदर्भातही अशी भीती दर्शविली जात आहे. व्यवहाराची एक भाषा आणि बोलण्याची वेगळी बोली अशी आपल्या बहुतेक समाजाची स्थिती आहे, व्यवहाराच्या भाषेसोचतच उपजीविकेची भाषा अशीही भाषेची वर्गवारी करावी लागेल. जागतिक बाजारपेठेत तुम्हाला ती भाषा बापरल्यावाचून दुसरा पर्याय नाही. कारण भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न अधिक प्रमाणात महत्त्वाचे असतात. जागतिकीकरण आल्यामुळे खरंच आपल्या भाषा संपणार आहेत का? यावर विचार होणे गरजेचे आहे. बोलींचा ऱ्हास होत आहे, हे नाकारता येत नाही; पण या विविध बोली खरंच आजच्या काळात तग धरून राहणार आहेत का? मुळात चोलींची निर्मिती हीच त्या त्या जातसमूहाच्या पोटसमूहाच्या गरजेतून झालेली आहे, हे कसे नाकारायचे? आपल्या समूहातील काही संकेत, चालीरीती, प्रथा सांभाळण्यासाठी, त्या फारशा कुणाला कळू नयेत म्हणून अशा बोली त्या त्या पोटसमूहात बोलल्या जाऊ लागल्या, पण त्या त्या जातीतली, पोट समूहातली मुले-मुली शिक्षण घेऊन नोकरतार झालीत आणि त्यांना पुढे आपल्या अस्तित्वासाठी आपल्या व्यावहारिक समाजाची केंद्र म्हणून असलेली प्रमाणभाषा स्वीकाराची लागली. पुढे पुढे त्यांची मूळ बोली ही त्यांच्याच विस्मरणात जाऊ लागली. त्यांच्या प्रथा, परंपरा वा त्यांना आता गैरसोयीच्या होऊ लागल्या, कारण त्या त्यांना या व्यवहारी जगात अनावश्यक वाटू लागल्या आहेत, घोडक्यात एखाद्या पोटसमूहातील मुले मुली शिकून नोकरदार झालीत की त्यांची बोली हळूहळू संपुष्टात येते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. उदाहरणेच द्यायची झाली तर आज महाराष्ट्रात पवार, पोवार, पारधी, कोष्टी, बंजारा, लोधी, गाँड इत्यादी पोट समूहाच्या बोली अस्तंगत होत आहेत. आपल्या शरीराच्या ज्या अवयवाची गरज संपते तो अवयव काही काळानंतर गळून पडतो. उदाहरणार्थ पूर्वी आपल्याला शेपटी होती असे म्हणतात; पण नंतर आपली ती शेपटी गळून पडली, हा मानववंशशास्त्रातला एक साधा नियम आहे; पण यामले अख्खी मराठी भाषा मरायला टेकली अशा स्वरूपात हा विचार मांडणे शंकास्पद वाटते गेली दोन हजार वर्षांआधी पासून महाराष्ट्रात मराठी होती आणि ती आजतागायत तशीच टिकून आहे. तिची रूपे बदललीत, तीवर परकीय भाषेची आक्रमणे झालीत. त्या आक्रमणांना, अतिक्रमांना आपल्यात पचवीत ती अढळपणे उभी राहिली,

यादवकालीन मराठी, बहामनीकालीन मराठी, शिवकालीन मराठी, पंडिती मराठी, आंग्लकालीन मराठी, आधुनिक काळातील मराठी, स्वातंत्र्योत्तर मराठी आणि ख्वदोत्तर मराठी असा मराठी भाषेचा इतिहास पाहिला तर ही भाषा आपल्या स्वत्यासह अजूनही सगळे बदल पचवीत भक्कमपणे उभी आहे, हे नाकारता येत नाही. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देता येईल त्यांच्या राज्याभिषेकाला यावर्षी साडे तीनशे वर्षे होय आहेत. त्यांनी आपल्या दरबारातील भाषा विद्वानांकडून राजव्यवहार कोश तयार करवून घेतला होता, त्यात मराठी- दख्खनीयावनी उर्दू संस्कृत शब्द होते त्यातले दहा टक्के शब्द आज प्रचलित आहेत. याचा अर्थ तत्कालीन शासनाची गरज म्हणून हा शब्दकोश सिद्ध झाला होता. आणखी खोलात आता असे दिसते की त्या काळी राज व्यवहारात आणि समाजातही मराठीतर इतर भाषा अस्तित्वात होत्या, मराठीसोबतच इतर भाषा गरज म्हणून त्या काळीही स्वीकाराव्या लागल्याचे हे उदाहरण आहे. ही मराठी कधीही मारणार नाही, पण ती भीती लोकांच्या मनात पालून काही मंडळी उगाच बागुलबोवा उभा करीत आहेत, हेही तेवढेच खरे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, माणदेश, खानदेश इत्यादी प्रांतातल्या बोली जोवर खेडी आहेत तोवर बोलल्या जाणारच. आणि खेड़ी कधीही संपुष्टात येणार नाहीत. भले त्यात कितीही बदल होवो. ती मानसिकता आणि लोकसंस्कृती काही बदलांसह तशीच टिकून राहणार आहे. आता प्रश्न पडतो या संस्कृतीतील परंपरा, रीतीभाती, लोकप्रया यांच्या हासाचा, या गोष्टी नहास पावू नयेत, असे अनेक भाषापंडितांना, वैयाकरणींना वाटते. या रीतीभाती, लोकप्रथा, काही प्रमाणात अंधश्रद्धा जर तिथल्या लोकांच्या प्रगतीच्या आड येत असतील तर त्यांचा हास अटळ आणि आवश्यक आहे. ग्रामजीवनातल्या या गोष्टी काही एका मचदिपर्यंत तिथल्या बोली, रीतीभातीसाठी पूरक आहेत. पण त्या कायम टिकाव्यात असे ज्या भाषावैज्ञानिकांना वाटते. त्यांच्यासमोर ग्नोस्कोने ठेवलेले रिपोर्टस असतात. ते खरेही असतील, पण त्यासाठी गावाखेड्यातल्या, पाड्यातल्या तरुण-तरुणींनी आपल्या शिक्षणासाठी बाहेर पडायचेच नाही का? तिथून बाहेर पडल्याशिवाय त्यांची प्रगती होऊच शकत नाही हे स्पष्ट आहे. आपल्या मुलांना शिक्षणासाठी, मोठ्‌या पगाराच्या नोकऱ्यांसाठी परदेशी पाठवायचे, त्यांच्या मुलांना, नातवंडांना आपली बोली-भाषा आली नाही तरी चालेल, पण गावपाड्‌यांतल्या तरुणांनी मात्र त्यांच्या बोली-भाषा-रीतीभातींच्या जपणुकीसाठी मात्र तिथेच, आपल्या गावातच कायमस्वरूपी राहायचे हे अरण्यरुदन किती काळ चालणार आहे?

आज मराठीच्या अधोगतीची कारणे आपण शोधू पाहत आहोत. ती शोधणे हे आपले कर्तव्यही आहे, आणि बाला जबाबदार कोण? अशी आपण चांगल्या अर्थाने शोधयात्रा सुरू केली आहे. मी या भाषणाच्या पूर्वपर्वात मांडलेला मुद्दा नाकारता येत नाही, आणि तो म्हणजे शासकीय पातळ्यांवरून मराठीची होऊ पाहणारी उपेक्षा त्यासोबतच आपली आपल्याच भाषेविषयी असलेली, वाढत चाललेली न्यूनगंडांची भावना, मराठीविषयी, आपल्या भाषेविषयी आपल्या मनात गोडी निर्माण होण्याचे वय किती असते? तर ते वय असते त्यांच्या प्राथमिक शाळेचे, किंवा त्यापूर्वी म्हणजे मूल बोलू लागते तेव्हाचे, संध्याकाळच्या प्रार्थना, परवाचा, अडगुलं मडगुलंसारखी बडबडगीते, देवासमोरच्या -तुळशी वृंदावना समोरच्या प्रार्थना, श्लोक, ऋचा, किमान भजनं, या गोष्टी मूल बोलायच्या वयात त्याच्या कानावर पडू लागल्या तर त्याच्या वाणीला तसे वळण लागते आणि त्याच्यात आपल्या मायबोलीविषयीची गोडी निर्माण होऊ शकते. मूल बोलायला लागतं त्या काळात त्याच्या कानावर इंग्रजी कविता पढतात, आणि इथूनच भाषेविषयी, आपल्या मायबोलीविषयी त्याच्या मनात नावड निर्माण होते. दुसरी पायरी मराठीच्या प्राथमिक अभ्यासक्रमाची हा अभ्यासक्रम ठरविणाऱ्या मंडळींना किमान आपल्या लोकभाषेचे, लोकगीतांचे, संस्कृतीचे ज्ञान असणे गरजेचे असते, आणि ते नसेल तर मुलाच्या मनातली ही मातृभाषेविषयीची नावड अधिकाधिक वाढत जाणार अन्योक्ती सप्तक सारख्या कविता, गेय कविता आपण अभ्यासल्या म्हणून आपल्या मनात कवितेची आणि पर्यायाने मातृभाषेची गोडी निर्माण झाली. इथून मातृभाषेविषयी प्रेमाची रुजवात मुलाच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे.

माध्यमांची जबाबदारी

या संदर्भातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा अधिक गंभीर आहे. काही अपवाद सोडला तर बहुतेक मराठी वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या बंद पडलेल्या आहेत, काही आहेत तर त्यात कथा-कविता छापणे बंद झाले आहे. आता कथा-कविता कोण वाचतं म्हणून वृत्तपत्रांचे मालक सवाल करतात. बालविभाग बहुतेक बंद झाले आहेत. शाळा-महाविद्यालयात एकांकिका नाटकांचे प्रयोग बंद झाले आहेत. तिथे पाश्चात्य धर्तीवरील कार्यक्रमांची रेलचेल असते, ग्रंथालयांची परिस्थिती आणखीच वाईट आहे. याचा संमिश्र परिणाम म्हणून आज मराठी भाषेची, संस्कृतीची पीछेहाट होताना आपल्याला पाहावी लागते.

आपल्या घरात चोवीस तास दूरदर्शनचा डबा बोलत असतो, धो धो अशा डेली सोप सुरू असतात. कुठल्यातरी गाण्याची, कवितेची पहिली ओळ घेऊन मालिकेची मांडणी केलेली असते. गात किती मालिका बधाण्या अशा असतात मराठीत शेकडोंनी उत्कृष्ट कादंबऱ्या कथा नाटके आहेत; पण आपण या मालिकांच्या कथा पहिल्या तर आपले अभिरुची दारिवन जणू अंगावर चालून येणारे असे दिसते. या मालिकांच्या पदरी लेखकांची टीम काम करते. या टीमपैकी किती कलमबहाद्दरांचे चांगल्या साहित्याचे वाचन आहे? आणि याचा दोष शेवटी दर्शकांवर येतो. दर्शक असलं काही पाहताच नाही होम्हणून निर्मात्यांचा सूर असतो. तुम्ही चागलं काही द्या, त्याच्या गळी उतरचा म्हणजे ते पाहतील ना? त्यांना वाईट पहायची सवय तुम्हीच लावली ना? मग आता टीआरपी चा विचार जरा या कार्यक्रमांच्या बाबतीत बाजूला ठेवा

शासन आणि मराठी भाषा

मराठी भाषेविषयीचा, साहित्याविषयीचा विचार करायचा झाला तर तो शासकीय पातळीवरून व्हावा असा विचार मी यापूर्वी मांडला आहे, आपण भारतीय घटनेचा विचार केला तर त्यात राष्ट्रपतींच्या, राज्यपालांच्या अखत्यारीत बारा जागा नामित सदस्यांसाठी ठेवलेल्या असतात. या बारा जागांवर विविध क्षेत्रांतील प्रतिभासंपन्न मंडळींची नेमणूक करून त्या त्या क्षेत्राला प्रतिनिधित्व देणे गरजेचे असते, पण आज राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर साहित्यिक म्हणून कोण प्रतिनिधित्व करतं? आपल्यासोबत विचारवंत, कलावंत, समाजिक कार्यकर्ते असूच नयेत, असे शासनाला वाटते का? की शासनाला आपल्यासोबत विचारवंत, प्रतिभावंत ठेवण्याची भीती वाटते आणि अशी भीती वाटत असेल तर ते सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय वाईट आहे. माझ्या माहितीनुसार ना. धों. महानोर आणि रामदास फुटाणे यांच्यानंतर मधल्या काही वर्षांपासून एकही साहित्यिक-कलावंत महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर सरकारने नेमला नाही, तुम्ही तुमचा बाटा घ्या ना. पण आमचाही वाटा तुम्ही ओढून घेत असाल आणि तुमच्याच माणसांना खूश ठेवत असाल तर हे गाऱ्हाणे कुणापुढे मांडायचे.

हे सगळे खरे असले तरी आजच्या साहित्यविचाचा विचार करता नव्या पिढीतील काही आशास्थाने निश्चितपणे खुणावतात यात विशेषत्वाने नावे घ्यायची तर पी. विठ्ठल, हृषीकेश गुप्ते, गणेश मतकरी, प्रणव सखदेव, मीनाक्षी पाटील, मनस्विनी लता रवींद्र, पवन नालट, नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले कृष्णात खोत, ऐश्वर्य पाटेकर, पंकज भोसले अशा काही लेखक-कवींच्या नावांचा उल्लेख करावा लागेल, यात आणखी काही नावांची भर पडू शकेल. आपल्या अनुभवांना वेगवेगळ्या आकृतिबंधात मांडत आपला शोध घेणारी म्हणून ही पिढी आज काही लक्षवेधी लेखन करीत आहे.

प्रणव सखदेव शैलीच्या अंगाने कधी फैटसी तर कधी चरचरीत वास्तव मांडताना दिसतो तर हृषीकेश गुमे जगण्यातील अनेकविध रहस्याच्या शोधात नवं काही शोधण्याचा प्रयत्न करतो. अनुभव, शैली, जगाकडे पाहण्याची भिन्नस्तरीय दृष्टी यांमुळे ही मंडळी मराठीतील पुढची आशा आहे, असे विश्वासपूर्वक नमूद करावेसे वाटते मित्र हो, आपला महाराष्ट्र हा संतांनी घडविलेला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या वैचारिक अधिष्ठानाने, साने गुरुजींच्या मातृप्रेरणेने, बहिणाबाईच्या काव्याने विकसित झालेला, अनेक प्रतिभावंतांनी पुलकित केलेला, समाजधुरिणानी ऊध्र्वमुखी ठेवलेला, कलावंतांनी-लोकशाहिरांनी गर्जवीत ठेवलेला असा आहे. हा महाराष्ट्र प्रांत भारताच्या भूमीवर सर्वाधनि अधिक प्रगत व्हावा यासाठी शासनकर्त्यांचीही तेवढीच जवाबदारी आहे. सर्वसामान्य जनता आणि सरकार वेगळे नाहीत, असे आम्ही मानतो, तुम्हीही हे माना, आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या गरजेसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी सरकार कटिबद्ध आहे, हे तुमचे ब्रीद साकारण्यासाठी या व्यासपीठावरून तुम्हीही काही बोध घ्यावा, अशी आमची विनंती आहे.

मराठी भाषा, संस्कृती, परंपरा यांच्या अभिवृद्धीसाठी या व्यासपीठावरून मी ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आपणा सगळ्यांना मनापासून आवाहन करीत माझ्या अध्यक्षीय भाषणाला विराम देतो आणि आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र !!

रवींद्र शोभणे

१६. पंचदीपनगर, हॉटेल रेडीसन ब्लूजवळ, वर्धा रोड, नागपूर-४४००२५

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: साहित्य: वास्तव आणि यूटोपिया
साहित्य: वास्तव आणि यूटोपिया
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVMnIPD9oiPTwWtXRjhp1F5oGCVdFyky4sFxjO-mEIUQ-ABadAKIg0VeIpVjyD5HVBtXhcjRNZNrrHnexDtZnXgcDSHPBS3K8LC8S97FRvV1T4UZWRID0LxMq-Kg_EFc7VGeylE5Lcf_jPmREVyHJLRxl_aYEvan0Uz90DAHXorc4gKs2q6d1cErLuBsa2/w640-h426/425572622_122147921174067292_5192826800446461651_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVMnIPD9oiPTwWtXRjhp1F5oGCVdFyky4sFxjO-mEIUQ-ABadAKIg0VeIpVjyD5HVBtXhcjRNZNrrHnexDtZnXgcDSHPBS3K8LC8S97FRvV1T4UZWRID0LxMq-Kg_EFc7VGeylE5Lcf_jPmREVyHJLRxl_aYEvan0Uz90DAHXorc4gKs2q6d1cErLuBsa2/s72-w640-c-h426/425572622_122147921174067292_5192826800446461651_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/02/blog-post_4.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/02/blog-post_4.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content