मराठी नष्ट होण्याचा ‘बागुलवोबा’


९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन २ फेब्रुवारी २०२४ला अमळनेर येथे झाले. अध्यक्ष म्हणून डॉ. रविंद्र शोभणे यांची निवड झालेली आहे. त्यांनी आपल्या भाषणात बेरोजगारीचा प्रश्नावर बोट ठेवले. बेरोजगारीच्या याच विवंचनेतून शेतकऱ्यांप्रमाणे उद्या तरुणही जीवन संपवू लागले तर ते खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे? एक लक्षात ठेवा, तरुणांची ऊर्जा वाहत्या पाण्यासारखी असती. ती जशी सृजनाची गंगोत्री होऊ शकते, तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारणही ठरू शकते, अशा थेट शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी सरकारला इशारा दिला. त्यांचं अध्यक्षीय भाषण आम्ही नजरिया वाचकासाठी दोन भागात देत आहोत.

भाग-१

अमळनेरच्या पावन भूमीत आयोजित होत असलेल्या या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तमाम महानुभावांना सर्वप्रथम मी मनापासून अभिवादन करतो, या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी गेली पाच महिने तन-मन-धनाने जीवाचे रान करून कष्ट उपसणाऱ्या या मंडळीच्या चेहऱ्यावरून आज ओसंडून वाहणारा हा आनंद पाहून मी कृत्याकृत्य झाल्याची भावना माझ्या मनात आहे. माझे कृतकृत्य होणे यासाठी मी नमूद करतो की आधी मी साहित्यक्षेत्रात वावरणारा एक हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनात या क्षणी कुठल्या भावना असू शकतात, याचा मला अंदाज आहे. आणि माझ्यासाठी आजचा हा प्रसंग म्हणजे अपूर्व भाग्याचा क्षण आहे. आणि या क्षणाची साक्षीदार ही भूमी आहे. १९५२ साली याच भूमीत तेव्हा ओळखले जाणारे महाराष्ट्र साहित्य संमेलन प्रा. कृ.पा. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. प्रा.कृ.पा. कुलकर्णी हे भाष्याभ्यासक होते. पूज्य साने गुरुजींच्या मृत्यूला केवळ दोन वर्षे झाली होती तेव्हा इथे ते साहित्य संमेलन झाले होते.

साने गुरुजींचे १२५वे जयंती वर्ष म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष गेल्या डिसेंबरपासून सुरू झाले आहे. आणि आज अशा पर्वावर या व्यासपीठावर मराठी साहित्याची आपल्या परीने बरी-वाईट सेवा करणाऱ्या एका सर्जनशील लेखकाला आपण अध्यक्षपदाचा मान दिला. मराठी साहित्य संमेलनाची परंपरा फार मोठी आहे. १८७८ पासून सुरू झालेल्या या परंपरेत उत्तुंग प्रतिभेची आणि प्रखर बुद्धिमत्ता असलेली वैचारिक शिखरे म्हणून ओळखली जाणारी मराठी साहित्यातील मोठी व्यक्तिमत्त्वे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर विराजमान होऊन ही साहित्य संमेलनाची परंपरा अधिक दैदिप्यमान झालेली आहे. त्यामुळे माझ्यावर या परंपरेचे स्मरण करताना काहीसे दडपण आलेले आहेच. अर्थात हे दडपण त्यांच्याविषयी असलेल्या भक्तिभावातून, अतीव आदरातून असू शकते, हेही नाकारता येत नाही. आता परंपरा- भाग्ययोगअसे शब्द वापरणे म्हणजे आपण एकदम उजवे वगैरे होऊन जातो. पण या डाव्या-उजव्याच्याही पलीकडे एक मोठा, विश्वव्यापी पसारा आपल्या सभोवती असतो, हे नाकारता येत नाही.

अमळनेरच्या भूमीविषयी

अमळनेर या भूमीची महती पुन्हा मी सांगायची गरज नाही. ही भूमी परमपूज्य साने गुरुजी यांच्या कर्तृत्वाने, संस्कारांनी पावन झालेली भूमी आहे. मराठी कवितेला सोन्याचा हंडा बहाल करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने मराठी साहित्य विश्वात अजरामर झालेला हा परिसर आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर इथल्याच भूमीतले, इथल्या दैवतांचा विचार करायचा झाला तर इथे मंगळग्रहाचे पूर्वापार मंदिर आहे. हा उल्लेख करताना आपल्या भारत देशानेही मंगळावर यान पाठवून सात वर्षे पूर्ण केलीत, याचाही उल्लेख करणे मला महत्त्वाचे वाटते. वारकरी संप्रदायाचे इथले अध्वर्यू समजले जाणारे संत श्री सखाराम महाराज यांच्या कार्याचा प्रभाव आणि परंपरा जवळ जवळ साडेतीनशे वर्षांपासून जिवंत आहे. प्रती पंढरपूर म्हणूनही या भूमीची महती आहे. या भूमीत रुजलेले आणि लोकमानसात रूढ झालेले हे संस्कार आजही तेवढ्याच श्रद्धेने जपले जातात. ग्रामीण जनजीवनात सगळ्याच परंपरा, रीतीभाती या अशा दैवतांना वाट पुसत प्रवाहित झालेल्या असतात, कदाचित आपणास माझ्यापेक्षाही या परंपरेची अधिक माहिती असणार, तथापि या परंपरांना, जनमानसातील अक्षय प्रवाहाला अभिवादन करणे हे माझे मी प्रथम कर्तव्य समजतो, आणखी एक गोष्ट अधिक ठळकपणे नमूद करणे आवश्यक आहे. आणि ती म्हणजे इथले संशोधन केंद्र, प्राचीन, दुर्मिळ ग्रंथ अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देणारे हे प्रताप तत्त्वज्ञान मंदिर पाहिले तर कुणीही हेवा करावा अशी ही वास्तू आहे. याच भूमीत अज़ीम प्रेमजी यांनी पहिला विप्रोचा कारखाना काढला होता. इथे कापडाची निर्मितीही कोणे एके काळी मोठ्या प्रमाणात होत होती. आणि म्हणूनच मी या सगळ्यांपुढे विनम्रभावाने उभा आहे.

१९५२ साली ३५व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात कृ.पा. कुलकर्णी यांनी साने गुरुजी यांच्या स्त्री गीतातील एक ओवी उद्भुत केली होती, ती अशी-

पंढरीचा देव । अमळनेरी आला

भक्तीला लुब्ध झाला पांडुरंग

याच भूमीचे सदगुरू श्री सखाराम महाराज वेगळ्या शब्दात वर्णन करतात-

गाव अमळनेर । पुन्नाईत जागा

समाधानी पुढे । बोरी वाहे चंद्रभागा

याच बोरी नदीने माधव जुलियन यांच्या संगमोत्सुक डोह’, ‘विरहतरंग’, ‘सुधारकया काव्यांना स्फूर्ती दिली आहे. अशा या भूमीत आपण आज ९७व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी जमलो आहोत.

वाचा : वर्धा : नरेंद्र चपळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण

वाचा : फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे अध्यक्षीय भाषण

धर्म आणि लेखकाचा धर्म

मित्रहो, मराठी समाजात महाराष्ट्रात तीन वेड महत्त्वाचे मनाले जातात, त्यातील तिसरे आणि महत्त्वाचे वेड साहित्य संमेलन परंपरा हे होय, साहित्य संमेलने भरवावीत की नाही इथपासून संमेलनासाठी जीवाचे रान करणाऱ्या वेड्या माणसांपर्यंत ही परंपरा आपल्यासमोर उभी आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपल्या पदरी पडणे म्हणजे आपल्या लेखकीय जीवनातला अंतिम सन्मान अशी धारणा बहुतेकांची असते, माझीही ती आहे. कारण या निमित्ताने त्या लेखकाला महाराष्ट्रात, मराठी साहित्य प्रेमींमध्ये कमालीचा आदर, प्रेम मिळते, हा माझा अनुभव मी सांगू शकतो. साहित्य संमेलनांच्या विरोधात ओरड करणाऱ्यांना आपण सोडून देऊ या. कारण अशी ओरड करणारेही कुठल्यातरी संमेलनाचे अध्यक्ष होतातच. किमान एखाद्या मोठ्या परिसंवादाचे अध्यक्ष होतात, त्यांच्या मते अशा म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनातून कुठलाही विचार दिला जात नाही. पण या संमेलनातील अध्यक्षीय भाषणांपासून सगळ्याच भाषणांची मोठी चर्चा होते. आणि आपल्या अनेक पूर्वाध्यक्षांनी याच व्यासपीठावरून अनेक नवे वाङ्मयीन प्रमेये मांडलीत, घमासान वैचारिक वादविवाद झाडलेत हे कसे नाकारता येईल? काहींचे म्हणणे असे की अलीकडे सुमारांची फार सद्दी झालेली आहे. अर्थात या मुद्यावर मी पुढे विस्ताराने येईनच, तूर्तास एवढेच म्हणेन की अशा महानुभावांनी आपल्या डोळ्यांवरचे चष्मे उरवून आपलेच परखड मूल्यांकन करावे. कारण हे जागतिक दर्जाचेच तथाकथित प्रतिभावंत, विचारवंत असतात. आणि त्यांचे जग त्यांच्या कडबोळ्यापलीकडे जात नाहीच, पण असा सुमार वगैरे मुद्दा मांडला की आपण फार मोठे आहोत, अशा भ्रमात त्यांनी आपली हयात घालवली असते.

मी अद्याप लिहिता लेखक आहे. फिरता लेखक आहे. म्हटले तर धावताही लेखक आहे. लोकांमध्ये वावरणे मला आवडते, मी माझ्या परीने माझी समाजनिष्ठा जपणारा आहे. ही समाजनिष्ठा जपताना मी समाजातील प्रश्नांना भिडणारा, त्या प्रश्नांना आपल्या लेखनातून मांडू पाहणारा लेखक आहे. प्रत्येकाचे संघर्षाचे, सामाजिक वर्तनाचे, निषेध स्वीकाराचे मार्ग विविध असू शकतात. मी माझ्या मार्गाची माझ्यापरीने आखणी करणारा लेखक आहे. त्यामुळे मी समाजातील प्रश्न माझ्या लेखनातून, माझ्या स्वरातून आत्मीयतेने मांडू पाहतो, बोलणे, अभिव्यक्त होणे, लिहिणे हा प्रत्येक संवेदनशील माणसाचा धर्म असतो, माझाही धर्म हाच आहे. मी लिहितो म्हणजे वाचकांची चार घटका करमणूक व्हावी, असा विचार माझ्या मनात कधीही नसतो. केवळ करमणूक हा सच्चा लेखकाचा धर्म नसतो. तर तो अधर्म ठरतो, आणि मी माझ्या लेखनाचा विचार करताना समाजाच्या प्रकृतीचा, संरचनेचा, भवतालाचा आणि समकालीन वास्तवाचा अधिक गंभीरपणे विचार करतो. हा विचार करताना मी इथली परंपरा, धार्मिक संरचना, राजकीय व्यवस्था आणि तळागाळातला सर्वसामान्य माणूस हे आणि इतर घटक माझ्या या चिंतनामागे असतात. या घटकांचा पीळ त्या त्या अंगाने विचार करता मला अधिक जाणवतो, अस्वस्थ करतो. हे अस्वस्थ होणं एका सामान्य माणसाचंही असू शकतं, पण सर्जनाच्या पातळीवरील हे अस्वस्थपण अधिक ठळक असू शकतं.

या अस्वस्थतेचा विचार करताना इथली धर्मव्यवस्था, धर्मसत्ता माझ्यासमोर येते, धर्माचा इतिहास फार मोठा आहे. मुळात धर्माची निर्मिती कशासाठी झाली? आणि इतिहासात धर्माने काय केले? या प्रश्नाजवळ येऊन मी थबकतो. मुळात सर्वसामान्य माणसाच्या मानसिक गरजेतून त्याच्या कल्याणार्थ धर्माची निर्मिती झाली आहे. प्राचीन काळी धर्म हा सर्वोच्चपदी होता. धर्मसत्ताक राज्ये त्यातूनच म्हणजे धर्माची वेगळी गरज म्हणून निर्माण झाले. पुढे राजसत्तेने धर्मसत्तेचे जोखड झुगारून देत धर्मसत्तेलाच आपल्या अंकित ठेवले, राजा हा सर्वोच्च समजला जाऊ लागला, तोच धर्माचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. राजसत्तेचा आणि धर्मसत्तेचा संघर्ष किती मूलभूत होता हे ग्रीक किंवा भारतीय इतिहासातून आपल्याला कळून येते. इतिहासाची ही चक्रे आजच्या परिस्थितीत पुन्हा नव्या रूपाने फिरू लागतात तेव्हा सर्वसामान्य माणूस भ्रांतचित्त होतो. पृथ्वीच्या पाठीवर भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे असे मानले जाते. आणि त्याची साक्ष म्हणजे याच संस्कृतीत निर्माण झालेली अतिभव्ये महाकाव्ये होत. रामायणआणि महाभारतया दोन महाकाव्यांनी आपल्या प्रातिभ उंचीने जागतिक वाश्यात सर्वोच्च स्थान मिळवले आहे. प्रचंड प्रतिभाबलाने निर्मिलेल्या या महाकाव्याचा मूलधर्म बाजूला सारून आपण त्यातील समाजदर्शन, व्यक्तिदर्शन, मानवी नातेसंबंध या गोष्टींना बाजूला सारून त्यातली धर्मचर्चा प्रधान मानून त्यांना धर्मग्रंथांचे स्वरूप दिले. या ग्रंथांतील धर्मचर्चा हा नेहमीच परिष्कृत भाग राहिलेला आहे. तो त्या ग्रंथाच्या मूळ निर्मितीत कधीही नव्हता, महाभारत हे महाकाव्य तर केवळ काव्य नसून तर तो भारतीय समाजाचा काव्याच्या आकृतिबंधात सांगितलेला मोठा इतिहास आहे. किंबहुना भारतीय इतिहासलेखनाची परंपरा महाभारतापासून सुरू झाली’ (मूळ शीर्षक हा जय नावाचा इतिहास आहे) असे विधान इतिहासाचार्य वि.का. राजवाडे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहासया ग्रंथात करतात, हेही समजून घेणे आवश्यक आहे. आणि या ग्रंथापुढे गटे, होमर, शेक्सपियर यांचे साहित्य सुद्धा कुठे उभे राहू शकत नाही, असे विधान विंदा करंदीकर एके ठिकाणी करतात; पण आपण हे सगळे विसरून उलट्या अंगाने प्रवास करीत गेलो. हा धर्म पुन्हा एकदा तपासून पाहणे अधिक अर्थपूर्ण ठरेल. कारण हा धर्म व्यास किंवा वाल्मीकी यांनीही कधी अपेक्षिला नसावा. ही दोन्ही नावे महाकवी म्हणून मान्यता पावलेली आहेत एवढे जरी लक्षात घेतले तरी यामागील भूमिका समजून येईल,

आजचे प्रश्न आणि शासनव्यवस्था : दोष कुणाचा?

आजचा एक ज्वलंत प्रश्न आणखी मला भेडसावीत आहे. तो म्हणजे मराठी भाषेच्या संबंधातला आणि तरुणांच्या एकूणच भवितव्याविषयीचा, आपण मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सार्थपणे आग्रही आहोत, तो आपला हक्कही आहे, हे आपण सिद्ध केले आहेच, पण एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपण धडपडत असताना मराठीच्या भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे? असा प्रश्न पडतो.

मराठी भाषेसंबंधी जवळ जवळ पस्तीस वर्षांपूर्वी बोलताना तात्यासाहेब शिरवाडकर म्हणाले होते, आज मराठी भाषा आपल्या शिरावर राजमुकुट घेऊन आणि अंगावर फाटके वस्त्र पांघरून मंत्रालयाच्या दारात उभी आहे. आज ही मराठी मंत्रालयात राजभाषा म्हणून प्रस्थापित झालेली असेल; पण तिला मखरात बंद करून किंवा केवळ कागदावर तिचे गोडवे गाऊन ती समाजात उभी राहू शकेल का? शासन मराठी विषयाच्या संबंधाने आदेशावर आदेश काढत असताना मराठीची गळचेपी कोण करतं, हेही तपासून पाहणं गरजेचं झालं आहे. मराठी माध्यमांच्या शाळा धडधड बंद पडत आहेत, आजवर जवळ जवळ १६ हजार मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्याचा आकडा आहे. एकीकडे असे म्हटले जाते की आजच्या समाजाची मराठी भाषेविषयीची अनास्था वाढीस लागलेली आहे. हेही समजू शकतो; पण मराठी भाषेसाठी, शाळांसाठी कोणते वेगळे प्रयत्न आपण करतो? मध्यंतरी ऐकिवात आले होते - सरकार या मराठी शाळा खाजगी संस्थांना चालवायला देणार आहेत. आज शिक्षणव्यवस्थेचं भग्न रूप कुणी उभं केलं असेल तर ते या खाजगीकरणाने. या खाजगीकरणाच्या वर्तुळात सर्वसामान्य, गरीब माणूस कुठे आहे? प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे, हे भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचे कलम आहे. हे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावे हा विचार त्या कलमात अध्याहत आहे, हे पुन्हा सांगायला नको, आणि असे असताना हा विसर आपल्याला का पडला? श्री. म. माटेंनी जवळ जवळ शंभर वर्षापूर्वी एक इशारा देऊन ठेवला होता - देश म्हणजे देशातील दगड धोंडे नव्हेत, तर देशातील माणसे होत. आणि या देशातील माणसांचा विसर आपल्याला पडणे यासारखे अक्षम्य असे दूसरे काही नाही, आज राज्यातील प्राथमिक शाळा वाचविणे, त्यासाठी वेगळा कृतिआराखडा निश्चित करणे अधिक महत्त्वाचे आहे. मराठी भाषेचे अध्ययन केवळ प्राथमिक किंवा माध्यमिक-उच्च माध्यमिक स्तरावरच राहू नये तर मराठी हा विषय पदवी परीक्षेपर्यंत सर्वच शाखांमधून शिकवणे आवश्यक करणे ही शासनाची जबाबदारी आहे. आज मराठी भाषेचे अध्ययन आणि अभ्यासक्रम अतिशय सुमार झालेला आहे आणि याला विद्यापीठीय अभ्यास मंडळे जबाबदार आहेत. सुलभीकरणाच्या प्रयत्नात केवळ वरवरची अशी क्रमिक पुस्तके तयार करून किंवा निवडून आपण मराठीचा उद्धार करतो, अशी धारणा आज झालेली आहे. आणि ती बदलणे गरजेचे आहे.

गावखेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा, राजभाषा म्हणून आपण ज्या मराठीचे प्रासंगिक गोडवे गातो, त्या भाषेला अभ्यासक्रमांत दुय्यम, तिय्यम स्थान देणे ही आपल्या भाषाविषयक उदासीनतेची साक्ष देणारी गोष्ट आहे. आणि यासाठी केवळ शासनाला जबाबदार धरणे यापलीकडे काहीही सांगता येणार नाही मराठी ही ज्ञानभाषा व्हावी अशी भावना सगळ्या मराठी जनतेची भावना आहे आणि तिला ज्ञानभाषा करण्यासाठी सर्वप्रथम शासकीय स्तरावरूनच प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन या व्यासपीठावरून करणे मला गरजेचे वाटते. मराठी भाषेचे विद्यापीठ रिद्धपूर येथे स्थापन झाले त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जाहीर अभिनंदन करणेही आमचे कर्तव्य आहेच.

वाचा : वर्धा : विद्रोही साहित्य संमेलनातील चंद्रकांत वानखेडे यांचे भाषण

वाचा : उदगीर : शरद पवार यांचे उद्वघाटनाचे भाषण
([डॉ. रविंद्र शोभणे यांचे संपूर्ण भाषण पहा ]

तरुणाईचा अंत किती पाहणार आहात?

या अनुषंगाने आणखी एक गंभीर मुद्दा मी पुढे ठेवतो. आणि तो म्हणजे देशातील बेकारीचाहा राजकीय मुद्दा आहे असे कृपया कुणी समजू नयेतर तो आजच्या पिढीचासमाजाचा एक ज्वलंत प्रश्न आहे. हा राजकीय विषय आहे आणि तो लेखकाने भाषणात वगैरे घेण्याचे कारण नाहीअसेही कुणी म्हणू शकेलपण लेखक हा शब्दांशी झटत असताना तो या शब्दांमागील वेदना याच समाजातून शब्दबद्ध करीत असतो. सामाजिक भान जपणारासमाजातील प्रश्न समजून घेत त्यावर आपल्या लेखनातून काही एक चिंतन करणाराराजकीय समकालाचा अन्वय विविध पातळ्यांवर लावू पाहणारा मी एक लेखक आहे म्हणून या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मला पुढे जाणार नाहीच.

नव्वदनंतर पहिल्या काही दिवसांतच आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खाउजा हे धोरण स्वीकारले. यातील खाजगीकरणाने आपल्या शैक्षणिक जीवनात आमूलाग्र क्रांती केली. प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंतच्या सगळ्या पायऱ्यांवरील शिक्षणात गेली तीस वर्ष आपला समाज अधिक सुधारलाआपली प्रगती झाली या समजात आपण होतोआहोतहीजे सरकार करू शकत नव्हते ते खाजगी शिक्षण संस्थांनी करून दाखविले. बहुतेक स्वायत्त विद्यापीठांनी आपले शैक्षणिक धोरण आखून शिक्षणक्षेत्रात प्रगती केली. आणि हे सुरू असताना सरकारने मात्र आता आपल्याला शिक्षणक्षेत्रात काहीही करायचे नाहीकिंबहुना करण्यासारखे काहीही उरले नाही अशा हेतूने या क्षेत्राकडे चक्क पाठ फिरवलीसरकार कालचे असो की आजचेपक्ष कुठलाही असोपण आज सरकारी शिक्षणक्षेत्राचे चित्र पाहता प्रचंड निराशा पदरी पडते. प्राथमिक शिक्षणासाठीकनिष्ठ महाविद्यालयासाठी शिक्षणसेवक म्हणून नवा पायंडा पाडला गेला आणि तीन वर्षे त्या उमेदवाराचे जगणे जणू हातावर आणून पानावर खाणे अशा स्वरूपाचे झाले. जवळ जवळ बहुतेक उच्च महाविद्यालयातील अनेक प्रध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत. २०१२ पासून कुठेही प्राध्यापकांच्या नेमणुका झालेल्या नाहीत. ही कशाची उदासीनता आहेआज याच महाराष्ट्रात हजारो तरुण प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहता पाहता पन्नाशीला आलेले आहेत. आपल्या सरकारी उदासीनतेचा हा कळस म्हणावा लागेलआणि या औदासीन्याला आणखी वेगळी वाळवी लागलेली आहे ती डोनेशनचीआज उच्च महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी उच्चशिक्षितसंपूर्ण अर्हता असलेल्या उमेदवाराला डोनेशन म्हणून लाखो रुपये द्यावे लागतातयावर कुणाचा अंकुश आहे?

शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसलेली आहे. जो डोनेशन देऊ शकतो तो प्राध्यापक होतो आणि ज्यांच्याजवळ पैसा नाही अशी हुशारप्रतिभासंपन्न तरुण-तरुणी खाजगी महाविद्यालयात दहा हजारांवर नोकन्या करीत आहेत. हे चित्र कधी बदलणार आहेआज आपण शिक्षणाच्या गुणवत्तेच्या स्खलनावर चर्चासत्रांतून तावातावाने बोलतो. पण पुढे कायशासन यावर कोणती उपाययोजना करेलहा विषय साहित्याचाकलाकृतीचा शोकात्म विषय आहे.

१९५६ साली या विषयावरचे जॉन ओस्बेन या नाटककाराचे Look Back in Anger हे नाटक रंगभूमीवर आले आणि युरोपात सर्वत्र खळबळ उडाली१९६५साली वसंत कानेटकरांचे अश्रूची झाली फुले’ किंवा १९७६ साली आलेले विजय तेंडुलकरांचे पाहिजे जातीचे’ हे नाटक किंवा भालचंद्र नेमाडेंचे कादंबरी चतुष्टय किंवा माझी पांढरे हत्ती’ ही कादंबरी किंवा अशा अनेक स्वरूपाचे मराठीत आलेले लेखन यातून या प्रश्नाची दाहकता वरचे वर मांडली गेली आहेहा प्रश्न जर निकाली लागला नाही आणि सुशिक्षित तरुण-तरुणी उद्या आत्महत्या करू लागलीत तर त्याचे खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचेआणि सुरुवात झालेली आहे. शिक्षणक्षेत्रात पस्तीस वर्ष घालविलेला मी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून अतिशय खेदाने ही भीषणता आपल्यासमोर मांडत आहे. सुशिक्षित बेकारांच्या आत्महत्येच्या बातम्या आज मधून मधून वर्तमानपत्रातून वाचवला मिळतात.

फुलेशाहूआंबेडकर यांचा वैचारिक वारसा लाभलेल्या प्रगत महाराष्ट्रात या अशा बातम्या अभिमानास्पद मानायच्या कामागील काही वर्षात महाराष्ट्र प्रांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी प्रथम क्रमांकावर होता. आजही आहे. आणि पुन्हा सुशिक्षित बेकारांच्या आत्महत्या होणारा एक प्रगत प्रांत म्हणून या प्रांताची ओळख व्हावी असे आपणास वाटते कायआणि एक लक्षात ठेवातरुणांची ही ऊर्जा वाहत्या पाण्यासारखी असते. ती सृजनाची जशी गंगोत्री होऊ शकते तशीच ती प्रलयाचे कारणही होऊ शकतेगुजरातमधील नवनिर्माण चळवळ किंवा जयप्रकाश नारायणांचा संपूर्ण क्रांतीचा नारा हा इतिहास खूप जुना नाहीमहाराष्ट्रातली युक्रांद चळवळ किंवा दलित पँथर किंवा अ.भा.वि.प.सारख्या चळवळी या काळाची अपत्ये होत्याआणि काळ कुठल्याही परिस्थितीत काहीही प्रसवू शकतो. हे विषय मी अत्यंत कळकळीने मांडत आहे. कारण हे आजच्या समाजाचे वास्तव आहे. आणि या वास्तवाने सामाजिक स्वास्थ्याला वाळवी लागणार असेल तर त्याचा विचार तेवढ्याच गंभीरपणे आपण सगळ्यांनी करणे गरजेचे आहे. १९६४ साली मडगाव येथे झालेल्या पंचेचाळीसाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून स्व. वि. वा. शिरवाडकर उपाख्य कवी कुसुमाग्रज यांनी जेरोम के जेरोम या पाश्चात्य विचारवंताचे एक वचन उद्धृत केले होते ते वचन असे आहे- सरकार आणि हवा ह्या दोन्हीसंबंधी सहसा कोणीही चांगले बोलत नाही. आजच्या मितीस दुर्दैवाने हे वाक्य खरे ठरू नयेहीच अपेक्षा आहे.

पूज्य साने गुरुजी : तेथे कर माझे जुळती

या मु‌द्यांचा विचार करताना मी पुन्हा पूज्यनीय साने गुरुजींकडे येतो. कोकणात जन्मलेले साने गुरुजी प्रताप शेट यांच्या आग्रहामुळे अमळनेर या भूमीत येतात आणि आपली हयात इथे घालवतात. एक लेखक म्हणूनकवी म्हणूनस्वातंत्र्य लढ्यातील सैनिक म्हणून त्यांचे काम खूप महत्त्वाचे आहे. पंढरपूरचे देवालय दलितांना खुले व्हावे म्हणून त्यांनी केलेला सत्याग्रह हा नाशिकच्या काळाराम सत्याग्रहाएवढाच महत्त्वाचा होता. या लढ्यात त्यांनी बडव्यांची मध्यस्थी नको म्हणून दिलेला लढा आजच्या साठीही तेवढाच बोलका आणि अनुकरणीय आहे. पण मी त्यापेक्षा गुरुजींच्या वेगळ्यापण सर्वश्रुत पैलूकडे वळणार आहेआणि तो पैलू म्हणजे त्यांच्यातील प्रतिभावंतत्यांच्या काळात एक रडकाभावुकबाळबोध लेखक म्हणून (आचार्य अत्रे मात्र अपवाद) आधुनिक कलावादी लेखकांनी त्यांची बोळवण करून त्यांना मुख्य साहित्य प्रवाहापासून बाजूला सरले होतेकारण त्यांनी गुलछबू प्रेमाच्या गोष्टी लिहिल्या नव्हत्यात्यांनी लिहिलेले श्यामचतुष्ट्यअनुवादकविता इत्यादी जवळ जवळ १११ पुस्तकांचे लेखन केले आहे. १९३३ साली लिहिलेल्या आस्तिक’ या कादंबरीत तक्षक नागाला मानवी रूपात दाखविण्याचा जो दूरदर्शीपणा आणि जी प्रातिभ प्रगल्भता त्यांनी दाखविली ती त्यानंतरच्या पन्नास वर्षात सुद्धा मराठी कादंबरीकारांना जमली नाहीहे समजून घेतले म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा आवाका आपल्या लक्षात येईल. त्यातही त्यांच्या बालसाहित्याच्या पुस्तकांना अधिक महत्त्व आहे. कारण त्या काळात बालकांच्या मानसिकतेचा विचार करून असे लेखन करणारे लेखक म्हणून साने गुरुजींना एकमेव श्रेय द्यावे लागते.

साने गुरुजी हे केवळ मराठीतीलच नव्हे तर भारतीय पातळीवरील लेखक ठरतातत्यांनी हेन् री थॉमस या अमेरिकन लेखकाच्या The Story of the Human Race या पुस्तकाचा मराठीत मानवजातीची कहाणी या नावाने केलेला अनुवाद किंवा भारतीय संस्कृती’ किंवा सुंदर पत्रे या लेखनाचा विचार करता माझ्या या विधानाला अधिक पुष्टी मिळते. रवीन्द्रनाथ टागोर यांनी आपली पुतणी इंदिरादेवी यांना लिहिलेली पत्रे आणि साने गुरुजींनी आपली पुतणी सुधास लिहिलेली पत्रे हा अनुबंध भारतीय सांस्कृतिक दृष्ट्या मला महत्त्वाचा वाटतो खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ सारखा माणुसकीचा संदेश किंवा बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो’ सारखी राष्ट्रभावना काय - कवितेच्या माध्यमातून साने गुरुजींनी सतत विचार केला तो मातृभाषेचाराष्ट्रभावनेचात्यांच्या पिढीतील ते काळाच्या पुढे आणारे लेखक-कवी-चिंतक होते. साने गुरुजींच्या लेखनाचे हे मोल नव्याने भालचंद्र नेमाडे यांनी पटवून दिले याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानायला हवेच.

साने गुरुजींनी आपली संपूर्ण हयात समाजसुधारणालेखनवाचनमनन-चिंतन आणि पत्रकारिता यात पालवली. शेवटी शेवटी म्हणजे १९४८ साली त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. १५ ऑगस्ट १९४८ रोजी साधनाचा पहिला अंक प्रकाशित झाला होताहा मुहर्त होता स्वातंत्र्याचा पहिला वर्धापन दिन, ‘वैरभाव आणि विषमता नष्ट करण्याची धोर साधना’ आपणास करावयाची आहे. हे साधना’ साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहेहे साधनाचे घोषवाक्य होते. आणि ११ जून १९५० रोजी साने गुरुजींचा मृत्यू झाला. तो कसा झाला हे आपणास सगळ्यांना ठाऊक आहे. केवळ वयाच्या पन्नासाव्या वर्षी एवढी साहित्यसंपदा मागे ठेवून साने गुरुजी आत्मनाशाचा मार्ग का स्वीकारतातप्रत्येक संवेदशील कलावंताच्या मनात एक अमूर्त स्वप्नावादयूटोपिया असतोत्याला सत्यात उतरविण्यासाठी तो कलावंत धडपडत असतोआणि जेव्हा भवतालाच्या कराल वास्तवात हा स्वप्नवाद भकास वाटेवर एकाकीपणे हिंडताना दिसतो तेव्हा आत्मनाशापलीकडे अशा कलावंताजवळ काहीही उरत नाही. तत्कालीन जनता पक्षाची शकले होत असताना अशीच दुखरी भावना जयप्रकाश नारायणांनी माझा बाग उजाड झाला’ या शब्दात व्यक्त केली होती. मृत्यूचे चुंचन घेणारा महाकवी’ म्हणून अशा उदात्त शब्दात आचार्य अत्रे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. सामाजिकराष्ट्रीयदृष्ट्यामानवतेच्या दृष्टीने आपण उराशी जपलेला स्वप्नवाद अवघ्या तीन वर्षातच भंगून गेलाया भावनेने हताश होऊन आत्मनाशाचा मार्ग अनुसरणारे एकमेव भारतीय व्यक्तिमत्व म्हणून आपण साने गुरुजींच्या एकूण जीवनाकडे पाहू लागलो तेव्हा एक प्रश्न माझ्यासारख्याला पुन्हा अस्वस्थ करतो. ज्या स्वातंत्र्यासाठी आपण इंग्रजांशी दीडशे वर्षे संघर्ष केला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या तीन वर्षात आपला भ्रमनिरास व्हावाहा आपला इतिहास आहे काआणि आज साने गुरुजी असते तरहा प्रश्न मनाला पुन्हा पुन्हा कुशा देत असतोच असतो.

साहित्यातील रूपकात्मता आणि मराठी लेखक

आमची पिढी नवसाहित्यावर किंवा स्वातंत्र्योत्तर साहित्यावर पोसली आहे. पण नवसाहित्याने गाजवलेला सौंदर्यवाद किंवा त्याच्या आधीच्या काळातील रसचर्चा आमच्यासाठी काहीही उपयोगाची नव्हती. रसचचेंची अडगळ’ म्हणून गंगाधर गाडगीळांनी या रसव्यवस्थेविरुद्ध झेंडा हाती घेतला होतातसाच सौंदर्यवाद आणि रूपवादाविषयीचा झेंडा साठोत्तरी काळात लिहू लागलेल्या काही प्रतिभावंतांनी आपल्या हाती घेतला होता. या काळात जन्मलेल्या वास्तववादी साहित्याने आमच्या जगण्याला नवा आकार दिलासाधारणतः पंचेचाळीस ते साठ हे दोड दशक कथेचे होते तर साठोत्तरी काळ हा कादंबरीचा होता असे हमखास म्हणावे लागते. काही अपवादभूत महत्त्वाचे कथाकार सोडले तर या काळात कादंबरीकारांची एक मोठी मांदियाळी दिसून येते. काही लेखक कथेकडून कादंबरीकडे वळले तर काही लेखक कथा आणि कादंबरी असा समांतर प्रवास करताना दिसतात. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांच्या यादीत मराठी कादंबरीची संख्या सर्वाधिक आहे. मराठीतील चार ज्ञानपीठ पुरस्कारांपैकी दोन ज्ञानपीठ पुरस्कार कादंबरीकारांना मिळालेले आहेत. तीन सरस्वती पुरस्कारात कादंबरीसाठीही (सनातन शरणकुमार लिंबाळे) एक पुरस्कार आहे. भारतीय भाषांमध्ये मराठी कातंबरीला मानाचे आणि नामाचेही स्थान मिळाले आहे. अनेक लेखक विविध भारतीय भाषांमध्ये गेलेले आहेत. त्यात विश्वास पाटील आणि शरणकुमार लिंबाळे अग्रणी आहेत. आता मराठी सद्यः कालीन समीक्षेच्या फुटपट्ट्या आणि हे मराठी लेखक यांच्या संदर्भात काही बोलले पाहिजे.

मराठी कादंबरीविषयी

मराठी कातंबरीच्या संदर्भात दोन निबंध महत्त्वाचे आहेत. पहिला निबंध इतिहासकार वि. का. राजवाडे यांचा कादंबरी’ याच नावाने प्रसिद्ध आहे तर दुसरा निबंध भालचंद्र नेमाडे यांचा १९५० ते १९७५ ह्या कालखंडातील मराठी कादंबरी: प्रेरणा व स्वरूप’ या नावाने प्रसिद्ध असलेला दोन्ही निबंधात कादंबरी या प्रकारावर विस्तृत आणि मूलभूत चर्चा केली आहे. या निबंधांच्या अनुषंगाने राजवाडेंसमोर हरिभाऊ आणि हरिभाऊपूर्व कादंबरी होती तर नेमाडेंसमोर प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळातील कादंबरी होतीजागतिक कादंबरीच्या तुलनेत मराठी कादंबरीची चर्चा करीत आता शेवटी तो हरि जाणे’ अशा आशयाचे विधान करून मराठी कादंबरीला राजवाडे हरिभाऊपर्यंत आणून ठेवतातकादंबरी संबंधीची ही चर्चा करताना राजवाडे जाज्वल्य मनोवृत्तीश्रेष्ठ विद्याविस्तृत वाचनमोठा प्रवासतीक्ष्ण निरीक्षणकडक परीक्षणथोर औदार्यगात सहानुभूती आणि नाटकी लेखणी हे काउंबरीकारासाठी आवश्यक असणारे गुण सांगताततर भालचंद्र नेमाडे कल्पितऐतिहासिक-पौराणिक आणि वास्तववादी अशा तीन प्रवाहांना समोर ठेवून प्रतिकृतीप्रधान- रीतिप्रधान आणि कृतिप्रधान अशाप्रकारे संपूर्ण मराठी कादंबरी वाङ्मयाची पुनः तपासणी करतात. नेमाडे आपल्या या निबंधातून एक विशिष्ट पोज घेऊन आपल्या प्रकृतीच्या कादंबऱ्यांना उचलून धरतात आणि काही महत्त्वाच्या कादंबरीकारांची दखल घेताना आपल्या आवडीनिवडीला प्राधान्य देतात. उदाहरणच द्यायचे झाले तर अरुण साचूंचा उल्लेख ते या निचंधात केवळ दोन ओळीत करताततर शरच्चंद्र मुक्तिबोध यांचा साधा उल्लेखही कुठे येत नाहीआणखी एक गंमत अशी की त्यांच्यामते सावित्री’ (पु.शि. रेगे)अंधारवाटा’ (सुभाष भेटे) या कादंबऱ्या लघुकथा वाटतात तर श्री.ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू’ ‘रथचक्रया दीर्घकथा वाटतातमग अर्नेस्ट हेमिंग्वेच्या Old Man & the Sea या कादंबरीला आपण कुठल्या आकृतिबंधात टाकायचे? ‘कोसला’ ला तरी कुठल्या आकृतिबंधात टाकायचे?

रा. रा. नेमाडे यांचे या संदर्भातील प्रस्तुत निबंधातील एक विधान समोर ठेवून त्यांचा हा विचार समजून घेता येईल का ते पाहता येईल. ते म्हणतात, "लघुकादंबरीत लघुकथा आणि दीर्घकथा या दोन्हीपेक्षा अवकाशाचा विस्तार तर असतोचपण आशयसूत्राचे पदर वाढतातत्यामुळे स्थलकाळाच्या मिती वाढतात. कादंबरीत ह्या प्रमाणात आशयसूत्रे व त्याचे पदर अनेक असतातह्यामुळे अवकाश प्रदीर्घ व विस्तृत होतोलघुकथा च दीर्घकथा यांच्या उलट कादंबरीवर लांबीच्या किमान मर्यादा असतात व्यामिश्र आशयसूत्रांमुळे हा अवकाश स्थळ व काळ यांना व्यापून ह्यापलीकडे वास्तव सुचवीत असतो. कादंबरीच्या ह्या कालातीत सूचक शक्तीमुळे तिचा अवकाश कितीही मोठा असू शकतो." (संदर्भ: निवडक मराठी समीक्षा: पृष्ठ क्र.२८८: साहित्य अकादमी प्रकाशन)

वरील परिच्छेदातील लघूकथा व दीर्घकथा यांच्या उलट कादंबरीवर लांबीच्या किमान मर्यादा असतात. हे वाक्य मागील पुढील संदर्भ लक्षात घेऊनही माझ्यासारख्या पामराला कळले नाही त्यांना असतात म्हणायचे आहे की नसतात म्हणायचे आहेथोडक्यात चकवे निर्माण करीत बटपटीतपणे विधाने करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. परंपरेच्या अंगाने भारतीय कादंबरी जाताना तिथा पैस तपासून पाहणे हेही अधिक महत्त्वाचे ठरते. परंपरेच्या अंगाने याचा अर्थ इथल्या सांस्कृतिक इतिहासाच्यामिथकांच्यापुराणकथांच्या अंगाने कादंबरी या प्रकारचा विचार करायचा तर तो कसा करता येईलआणि आपण तो कसा केलेला आहे किंवा करीत आहोतकिंवा करीतच नाहीतअसाही विचार समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.

पुराणकथांना किंवा ऐतिहासिक कथांना आपण पटित कथांच्या अंगाने समजून घेतोत्यातल्या काही कथा नक्कीच घटित कथा आहेत उदाहरणार्थ रामायण किंवा महाभारत या कथांना आपण घटित कथा मानतोपण या घटित कथांचा प्रवाह आपल्यापर्यंत मौखिक परंपरेतून चालत आलेला आहे. त्यामुळे त्यातील घटित संदर्भ पुन्हा तपासून पाहावे लागतातमुळात मेख अशी आहे की या कथा आपल्या श्रद्धेचाभक्तीचा विषय झालेल्या असतातत्यामुळे या कथांचे पावित्र्य भंगू नये हा अलिखित संकेत ठरून गेलेला असतो. आणि जेव्हा ललितलेखक किंवा कादंबरीकार या अशा कथांचा आपल्या लेखनासाठी विचार करू लागतो तेव्हा त्याच्यासमोर पहिला प्रश्न पडतो तो पावित्र्यभंजनाच्या भीतीचाआणि हा प्रश्न आज तर अधिकच नाजूक झालेला आहे. अशा वेळी मग रूपकाच्याप्रतीकाच्या अंगाने या कथांचा विचार होणेकिंवा समकालीन प्रश्नांचे प्रतिबिंब त्यात शोधून ती कथा नव्याने उद्भुत करणे त्या त्या लेखकाच्या प्रतिभेला विलक्षण आव्हान देणारे ठरतेसमकालीन समस्येचे प्रतिबिंब मिथकीय कथांमधून शोधण्याची परंपरा मराठीत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांच्या कीचक वध’ या नाटकापासून सुरू झाली. पण नंतर ती पूर्णतः क्षीण होऊन पुन्हा नाहीशी झाली. नंतर ती तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल’ या नाटकाने पुन्हा सिद्ध केली. पण पुन्हा तेच घाशीराम’ वर उठलेले वादळ आपण विसरलेलो नाहीचकिंवा हिंदीतील धर्मवीर भारतीचे अंधायुग’, असे प्रयोग मराठी कादंबरीच्या क्षेत्रात का झाले नाहीतहा प्रश्न मला पडतो.

या संदर्भात मला काही भारतीय भाषांमधील कार्यवन्या आठवतात कन्नड कादंबरीकार डॉ. एस. एल. भैरप्पा यांची पर्व ही भारतीय साहित्यातली एक अत्युच्च कादंबरी आहे. आजव्वा तिच्या कन्नड भाषेत शंभर आवृत्या निघालेल्या आहेत. या कादंबरीने महाभारताचा लावलेला नवा अन्वयार्थ खूप विलक्षण आहे. महाभारताच्या मूळ ढाच्याला कुठेही धक्का न लावता एक मोठा आधुनिक आशय ते त्यातून व्यक्त करतात. देवत्वाला माणूसपण बहाल करून त्यांच्या व्यक्तित्वातील नवा अर्थ ते प्रतीत करतातहिंदीमध्ये निरंजन जमींदार और क्षिप्रा बहती रही’ मधून पेशवाईतील बारभाई कारस्थान वेगळ्या शैलीत मांडतातअगदी अलीकडे म्हणता येईल अशी हिंदीत आलेली कादंबरी म्हणजे कमलेश्वर यांची कितने पाकिस्तान’ वेगळ्या रूपबंधात आपल्यासमोर येते मराठीतली ऐतिहासिकपौराणिक कादंबरी पवित्र्यभंजनाच्या सुप्त भीतीपोटी आक्रसून गेलेली असल्यामुळे आपण मग तीच ती मूळ कथा वारंवार सांगू लागतो. अर्थात अशा कथांतून त्या त्या कथानायकांचे उदात्त व्यक्तिमत्त्वच आपण पुन्हा पुन्हा चितारत असतो. अर्थात असे प्रयोग मराठीत झालेलेच नाहीत असेही नाही. शैला बेल्ले यांची दक्षिणायन’ ही कादंबरी (ग्रंथाली प्रकाशन) रामाच्या दक्षिण प्रवासावर वेगळा प्रकाश टाकणारी अशी आहे. राम हा कैकेयीच्या हट्टापायी दक्षिणेत जात नाही तर तर आर्य संस्कृतीच्या विस्तारासाठी आणि प्रभुत्वासाठी दक्षिणेत जातो आणि तिथे राजकीय वर्चस्वप्रभुत्व प्रस्थापित करतोरवींद्र शोभणे या लेखकाची उत्तरायण’ ही कादंबरी महाभारताचा नव्याने अन्वय लावत भव्य-दिव्य म्हणविणाऱ्या व्यक्तिरेखांना मानवीय पातळीवर आणून तर्कशाखीयवैज्ञानिक दृष्टिकोनातून नवा अर्थ लावू पाहतेपण काही लेखकांच्या लेखनाकडे आपण शपथपूर्वक दर्लक्षच करायचे असे मराठीतील काही दिव्य-भव्य प्रतिभावंतांनीसमीक्षकांनी अवलंबिले असेल तर त्याला काहीच उपाय असू शकत नाही. हे मराठी समीक्षेचे आणि अभिरुचीचे कोतेपण सिद्ध कराणारी घटना म्हणून मी तिला दुर्लक्षित करतो. या ठिकाणी मला पाश्चात्य विचारवंत नित्शे याची आठवण होते. नित्शे असे म्हणतो- कथालेखकाने किंवा सर्जनशील कलावंताने इतिहास पडविणाऱ्यांच्या बाजूने उभे राहण्यापेक्षा इतिहास भोगणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणे महत्वाचे ठरते. याचा अर्थ इतिहास पडत असताना सामान्य माणसे कशी चिरडली जातातते कसे अस्तित्वहीन होतातहे शोधणे महत्त्वाचे असते

आधुनिक मराठी साहित्याच्या पूर्वपर्यावर साहित्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस असावा ही जाणीव आम्हाला पहिल्यांदा महात्मा जोतीराव फुले यांनी करून दिली. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्याबलुतेदारांच्याकष्टकत्यांच्या जातिव्यवस्थेच्या संदर्भात केलेले लेखन खूपच मूलभूत असे आहे. या लेखनासोबतच त्यांनी आपल्या समाजात रुढ असलेल्या मिथकाचापुराणकथाचा लावलेला अन्वयार्थ अतिशय महत्त्वाचा आहे. गुलामगिरी’ या त्यांच्या पुस्तकातील हे सगळे विवेचन मुळातून वाचण्यासारखे आहे. या विवेचनाच्या पुष्ट्वर्ष मी दोन महत्त्वाच्या ग्रंथांचा उल्लेख आग्रहाने करेन. पहिले पुस्तक पंडित राहुल सांस्कृत्यायन यांचे व्होल्गा ते गंगा’ आणि दुसरे पुस्तक म्हणजे डॉ. रावसाहेब कसबे यांचे मानव आणि धर्मचिंतन. या दोन्ही ग्रंथातून आपल्या तथाकथित उज्ज्वल परंपरेची जी चिकित्सा केली आहे ती मुळातून वाचण्यासारखी आहे. आज संबंध मराठी कृषिप्रधानग्रामीण साहित्याची उभारणी जशी महात्मा फुलेंच्या या वैचारिक अधिष्ठानावर झालेली आहे तशीच उभारणी मराठीतील पौराणिक किंवा ऐतिहासिक साहित्याची झाली असती तर आज मराठीतील या प्रकृतीच्या लेखनाची स्थितिगती वेगळी राहिली असती.

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मराठी नष्ट होण्याचा ‘बागुलवोबा’
मराठी नष्ट होण्याचा ‘बागुलवोबा’
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9TAaTk8U3w5iU-Qz2tEpz52fdbhtdauu-6I946U8gn0TC1wgmR-BdFlA4WAPYl_fkboGn2FurI6lj-zxR4mqWWm1VPLKVAtUww4INUBfin-YaCPg1eetxok6FiNe3N8GCub_Yr0mgfh0vu6DGneJL4E0N4c2DHsF0LCCJPLTX25HFjzyW4GDB8uMFMQCI/w640-h394/425541901_122147921156067292_4409733377283200243_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9TAaTk8U3w5iU-Qz2tEpz52fdbhtdauu-6I946U8gn0TC1wgmR-BdFlA4WAPYl_fkboGn2FurI6lj-zxR4mqWWm1VPLKVAtUww4INUBfin-YaCPg1eetxok6FiNe3N8GCub_Yr0mgfh0vu6DGneJL4E0N4c2DHsF0LCCJPLTX25HFjzyW4GDB8uMFMQCI/s72-w640-c-h394/425541901_122147921156067292_4409733377283200243_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/02/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/02/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content