![]() |
Image: PTI |
भल्या पहाटे तीनच्या सुमारास
घरातील स्त्रियांचा दिवस सुरू होतो. मध्यरात्री होणाऱ्या ‘तहज्जुद’च्या नमाजनंतर त्या सहरीच्या कामाला लागतात. सहरी म्हणजे, रोजा ग्रहण करण्यापूर्वी घेण्यात येणारा अल्पोहार, न्याहरी
किंवा जेवण. अल्प आहार असला तरी स्त्रियांना त्यासाठी संपूर्ण स्वयपाक करावा लागतो.
त्यात खाण्याच्या बाबतीत
प्रत्येकांची आवडनिवड लक्षात घ्यावी लागते. तमका पदार्थ अमका खाणार नाही, काहितरी
दुसरं करू या... त्याला तमकं आवडत नाही, दिराला वांगी चालत नाहीत,
सासूला भाकरी हवीय, ननंदेला भात लागतो,
मुलं रुचकर मागतात अशी प्रत्येकांची मर्जी सांभाळावी लागते. घरात ननंद
किंवा कर्ती सासू असली तरीही साहजिक सगळा भार सुनेवरच असतो.
स्वयंपाक तयार होताच गाढ
झोपेत असलेल्या मंडळींना जागे करायची जबाबदारीदेखील गृहिणीच सांभाळते. आंघोळी-ब्रश
आटोपल्यानंतर सर्वजण एकत्र बसून सहरी ग्रहण करतात. चहा-कॉफीचंही सहरी जेवताना मध्येच
उठून तिलाच बघावं लागतं. सहरी संपली की उष्टं काढण्याची कामं दिवस उजाडेपर्यंत चालतात.
घरातला कर्ता (?)
पुरुष फजरनंतर तीन-चार तास झोपी जातो. काही (घरी) अपवाद वगळता तिला पहाटेची
झोप मिळेलच याची शक्यता कमी असते.
वाचा : रमज़ान ईद आणि आईची लगबग
घरातील ज्या मंडळींनी
रोजा धारण केला नाही,
अशांचा स्वंयपाक, चहा-पान, औषधे शिवाय धुणी-भांडी, उष्टं-खरकटं दिवसभर अर्हनिश सुरूच
असते. सर्व कामे उरकून तीनवेळा स्वयंपाक ठरलेला. पहाटे तीनपासून संध्याकाळी सातपर्यंत
सेवेकरी म्हणून स्त्रियांच जुंपलेल्या असतात. रमज़ानमध्ये कर्त्यां पुरुषांचा दैनंदिन
कार्यभाग (शेड्यूल) बदलतो, मात्र स्त्रीला दिनक्रम बदलण्याची
मुभा नसते, उलटपक्षी तो अधिकच विस्तारतो.
तान्ह्या बाळाची देखरेख, मुलांच्या
शाळा, अभ्यासावरही तिला नजर ठेवावी लागते. विशेष म्हणजे सर्व
कामे उरकून ती वेळेवर नमाज़, दरूद, कुरआन
पठण करते. निरीक्षण असं आहे की, बहुतेकवेळा इबादतमध्ये ती पुरुषापेक्षा
अधिक सरस ठरते. स्त्रिया रमज़ान महिन्यात सरासरी दोन-तीन किंवा त्यापेक्षा अधिक कुरआनचे
वाचन-पाठांतर पूर्ण करतात. तर लाखोंच्या संख्येत दरूद (नामजप) होतो.
मासिक पाळी आणि इतर किरकोळ
आजार तसेच कंटाळा, उबग दुर्लक्षित करून तिला किचनमध्ये राबणं
भागच असतं. सांयकाळी इफ्तारला स्वयंपाकाचं काम तिप्पटीने वाढतं. पाहुण्यांना इफ्तारीचं
आमंत्रण असो वा घरातील ज्येष्ठांचं पथ्य किचनमधील तिची दगदग वाढते. शिवाय इतर वेळीपेक्षा
ह्या काळात तिला जास्तीचं अन्न शिजवावं लागतं. कारण शेजारी-पाजारी, जवळच्या पाहुण्यांना किंवा मस्जिदमध्ये इफ्तारीसाठी ताटं पाठवली जातात,
ती व्यवस्थादेखील गृहणीचीच जबाबदारी असते.
सयुंक्त कुटुंब असेल तर
त्या घरातील स्त्रिया दुपारी चारपासून किचनमध्ये कोंबलेल्या असतात. प्रत्येकांच्या
फर्माइशनुसार वेगवेगळे पदार्थ, जिन्नस, डिशेस कराव्या
लागतात. त्यात बच्चेकंपनीची खास डिमांडदेखील पूर्ण करावी लागते.
संध्याकाळी इफ्तारच्या
अखेरच्या सेकंदापर्यंत दस्तरखान मांडण्यासाठी तिची तारांबळ सुरू असते. घरातले गडी नियोजित
वेळेच्या पाच-सात मिनिटं आधी दस्तरखानवर बैठक मारतात. राबणारी स्त्री कामात व्यस्त
असेल तर किचनमध्येच एखादा खजूर खाऊन दोन घोट पाणी पिऊन वेळेत इफ्तार उरकते. मग इतरांच्या
अन्न वाटपात गुंतून जाते. त्यात तिच्या इफ्तार/जेवणाची वेळ निसटते. कशीबशी दस्तरखानवर
आलीच तर घाईघाईत जेवण उरकावं लागतं. कारण मगरिबची नमाज सुटता कामा नये, असा संकेत जो असतो!
समजूतदार, उच्चशिक्षित
व सुसंस्कृत किंवा छोट्या कुटुंबात ह्या कालावधीत स्त्रियांची अतिरिक्त काळजी केली
जाते. त्यांचं आरोग्य सांभाळलं जातं. आवडीनिवडीकडे लक्ष दिलं जातं. पण सामान्य कुटुंबात
त्यांच्या दगदगीकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही.
इफ्तारनंतर महिलांना पुन्हा
जेवणाची तयारी करावी लागते. रात्रीची ही जेवणं सवडीनुसार दहा वाजेपर्यंत चालतात. यानंतर
घर आवरायला किमान ११-१२ तरी वाजतात. बारा वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत अंथरुणावर
जाणं भाग असतं,
कारण पहाटे पुन्हा तीनला स्वयंपाकाला उभं राहायचं असतं.
प्रत्येक सज्ञान, मानसिक
आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीला रोजा अपरिहार्य मानला जातो. परंतु अपवादात्मक
परिस्थितीत सुटदेखील देण्यात आलेली आहे. ९० किलोमीटरच्या प्रवासात रोजा धारण न करण्यास
मुभा असते. पूर्वीच्या काळी ‘सफर एक आज़ाब’ असं म्हटलं जायचं. त्यावेळी आजच्यासारखी वाहने उपलब्ध नव्हती. त्या प्रवासात
कष्ट, त्रास आणि हाल होत. परंतु हल्ली प्रवास हा आरामदायी झालेला
आहे तसेस खाण्या-पिण्याची उत्तम सोयही होते. त्यामुळे अनेकजण प्रवासात रोजा धारण करतात.
स्त्रियांना गंभीर आजार
व मासिक पाळीच्या काळात रोजा क्षम्य आहे. हेल्थ रिपोर्ट व अनेक नव्या संशोधनातून हे
सिद्ध झालं आहे की,
रमज़ान काळात मुस्लिम स्त्रियांच्या किरकोळ आजाराचं प्रमाण वाढते. मोठे
आजार बळावतात. पुरेसा आराम नसणे, झोप व जेवणाची वेळ बदल्याने
डोकेदुखी, चिडचिड, थकवा, अनिद्रा इत्यादी आजार घेरतात. नियमित औषधांच्या वेळासुद्धा बदलतात. काळजी म्हणून
बहुतेकवेळा अनियमित मासिक पाळीची तक्रार, मधूमेह, हायपर टेन्शन, उच्च रक्तदाबाच्या पेशंट स्त्रिया रोजा
धारण करत नाहीत.
अलीकडे मासिक पाळी पुढे
ढकलण्याचं प्रमाण स्त्रियामध्ये सर्रास वाढलेलं दिसतं. त्यासाठी स्त्रिया दहा-बारा
दिवस गोळ्या घेतात. परिणामी त्याचं शारीरिक संतुलन बिघडतं व त्याच्या आरोग्याग्चे प्रश्न
उद्भवतात. तसंच या गोळ्या हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात. नैसर्गिकरित्या चाललेलं
पाळीचं चक्र मागे-पुढे केल्याचे अनेक वाईट परिणाम रमज़ानच्या महिन्यांतर दिसू लागतात.
गरोदर किंवा अंगावरचं
दूध पिणारं बाळ असणाऱ्या महिलेला रोजा धारण करण्यास मनाई आहे. तसंच मानसिक रुग्ण, मोठे
आजार, सतत आजारी राहणारी व्यक्ती, मधूमेह, हृदयरोगींना रोजा धारण
न करण्याची मुभा आहे. इतरांच्या आधाराशिवाय हालचाल करू न शकणारी वृद्ध व्यक्ती आणि
रोजा केल्यास उपाशी राहिल्यामुळे जीव जाण्याची भीती असल्यास रोजा न करण्यास सूट आहे.
घरात एकटीच कर्ती महिला
असेल तर किरकोळ आजाराच्या काळातही गृहिणीला कामातून आराम, दिलासा
आणि विरंगुळा मिळत नाही. पुरुषाला कामचुकारपणा करण्याची मुभा असते, पण स्त्रिला ते (यंदाही) शक्य नसतं. पुरुष रोजा आहे म्हणून आजचं काम उद्यावर
ढकलतो. ऑफीसात, कामाच्या ठिकाणी सूट मिळवतो. पण एका स्त्रीला ती संधी नसते.
ईदच्या दिवशी तिचं काम
स्वाभाविक वाढतं. दोन दिवसापूर्वीपासून तिला घोर लागलेला असतो की, तयारी कशी होईल.
किराणा भरणे, दूधाची सोय करणे, ते संकलित करून त्याची काळजी घेणे, शिरखुर्मासाठी सुका
मेवा तयार करणे व इतर खाद्यपदार्थाचं नियोजनात ती व्यस्त राहते. या शिवाय जकात, फितरा
किती काढायचा, तो कोणाकोणाला वितरित करायचा, याचं नियोजनही घरातील स्त्रिया करतात.
चारएक वर्षांपूर्वी मी
स्त्रियांच्या अशा दगदगीवर फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्याला अनेकांनी (पुरुषांनी)
नापसंती दर्शवली. आमच्याकडे असं होत नाही, असा त्यांचा तोरा होता. पण बहुतेक
घरात स्त्रिची ही अबाळ ठरलेली असतेच. सक्ती व अपरिहार्यता नसली तरीही कर्तव्य व जबाबदारी
म्हणून ती सक्रीय राहते.
वाचा : मुसलमानांचे राजकीय व सांस्कृतिक आत्मभान
वाचा : 'मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे?'
रमज़ानमध्ये गृहिणीचे
श्रम अधिक वाढतात. त्याची फारशी दखल घरातला कुठलाच पुरुष घेत नाही, तरीही
स्त्री कर्तव्य म्हणून सर्व जबाबदारी उफ्फ न करता निमूटपणे पार पाडते. निरग्रह प्रेम,
आपुलकी, करूणा व उदारमनानं सर्वकाही करते. घरात
राबणारी ही स्त्री कधी आई असते, तर कधी बहिण, कधी भावजय, तर कधी पत्नी असते. तरीही त्यांच्या अव्यक्त
व्यथांकडे दुर्लक्ष होत राहते.
पुरुष मात्र रमज़ानमध्ये
अधिकाधिक दांभिक होत जातो. ओरडतो, खेकसतो, रागावतो त्याला
तो आपला अलिखित हक्क मानतो. पण पुरुषाने स्त्रीच्या अंतर्मनाचा आणि मन:स्थितीचा ठाव घेतल्यास बऱ्याच गोष्टी उलगडतात. अनेक प्रश्न, समस्या सुटून नातेसंबंध अधिक दृढ होतात.
रमज़ान औदार्य व करुणेचं
दूसरं नाव आहे. विनम्रता, शालीनता आणि सभ्यता रमज़ानचा दागिणा मानला जातो. सद्वर्तन,
शिष्टाचार, दानधर्माचा महिना मानला जातो. भूक अनैतिक कृत्यापासून परालंबित करते. एक
आफ्रिकन सूफी अबू मदायन लिहितात की “भुकेला माणूस नम्र होतो आणि नम्र व्यक्ती अधीन
होतो आणि जो अधीन असतो तो परमेश्वराला प्राप्त करतो.”
रोजा
धारण करण्याबरोबर मानवाचं नैतिक वर्तन, इच्छा-आकांक्षा नियंत्रित करण्यासाठी
आणि निरुपयोगी बाबी टाळण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. क्रोधासोबत स्वतःवर नियंत्रण
ठेवण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
चुका करणाऱ्यांना क्षमा
करणे, आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांशी विनम्रतेने वागणे, गरजूंना सहकार्य करणे आणि
त्यांच्या कार्यात हातभार लावणे हीदेखील रमजानची महत्त्वाची नित्यकर्म आहेत. वास्तविक
हाच रमज़ान मथितार्थ आहे. त्यामुळे घरातील व कुटुंबातील व्यक्ती त्याचे सर्वांत पहिले
हक्कदार आहेत.
घरातील स्त्रियांना थोडसं
प्रेम, आपुलकी मिळाली शिवाय काळजी व कृतज्ञतेचे दोन शब्द कानी पडले तर स्त्री अधिक
क्रियाशिल व तत्पर होऊन सक्रीय होते. पण त्यासाठी माणूस म्हणून तिची मन:स्थिती समजून घेतली तर रमज़ानचा आनंद अधिक द्विगुणीत होण्यास हातभार लागेल.
इस्लाम व कुरआनमध्ये ठिकठिकाणी
स्त्रियांना विशेष आदर व सन्मानाचं स्थान लाभलं आहे. हदीसमध्येदेखील स्त्रियांच्या
काळजी वाहण्याबद्दल वचने अनेक ठिकाणी विखुरलेली आहेत. तथापि पुरुषसत्ताक समुदायाचा
प्रवाह व रेटा तसंच वर्चस्व गाजविण्याच्या प्रवृत्तीमुळे साहजिक मुस्लिमांच्या स्वभावात
व वागणुकीत नकळत बदल होऊन वैगुण्य आलेलं आढळते.
इतर धार्मिक मान्यतेच्या
तुलनेत इस्लाम स्त्रियांच्या बाबतीत कर्मठ नसून अधिक उदार व लवचिक आहे. परंतु अनेक
वेळा कुरआनची स्त्रियांबद्दलची आध्याय-वचने वाचून, पाठ करून, मुखोद्गत करून, प्रसारित करून, प्रचारित करून, जाहिर प्रवचने देऊन, समज देऊन, उपदेश करूनही मुस्लिम पुरुषी समाजात अंमलबजावणीच्या
पातळीवर फारसा फरक पडलेला जाणवत नाही.
निरिक्षण असं आहे की, दैनंदिन
आयुष्यात इतर धर्मियांच्या तुलनेने मुस्लिम अधिक वेळा, अती जोमाने
व तत्परनेते किंवा बांधिलकी म्हणून नैसर्गिक पद्धतीने इस्लामचं तत्त्वज्ञान,
गुणवैशिष्ट्य, कुरआनच्या कल्याणकारी धोरणांची आपसात
देवाणघेवाण करतात. तासंतास चर्चा घडविली जाते. महत्त्वाच्या वेळेपैकी अधिकचा वेळ यात
खर्ची घातला जातो. मग हेच तत्त्व स्वत:मध्ये पूर्णपणे रुजवण्यासाठी,
आत्मसात करण्यासंबंधी शून्य का होतात, असा प्रश्न
पडतो. स्वाभाविक बहुसंख्यीय पुरुषसत्ताक मानसिकतेच्या प्रवाहापेक्षा भारतीय मुस्लिम
समुदाय हा वेगळा नाही.
स्वातंत्र्य, समता
आणि बंधुत्व ही मूल्ये इस्लामने जगाला दिलेली आहेत. अर्थाच फ्रेंच राज्यक्रांती आणि
फेमिनिस्ट चळवळीच्या शेकडो वर्षांपूर्वी! कुरआनचा एकूण सार समानता
आणि एकात्मता आहे. स्त्रियांबद्दल तर कुरआनने विशेष काळजी केली आहे. मग इस्लामच्या
अनुयायांना त्याचा विसर का पडला? किंबहुना स्त्रियांबद्दल असलेले
जुने विचार किंवा पारंपरिक मानसिकता बदलण्यास तसा वेळ लागतो, पण इच्छाशक्तीच्या प्रबळतेने हा प्रयत्न अधिक सुसह्य होऊ शकतो.
जगभरात स्त्रिया संदर्भात मानसिकता बदलत आहे. मुसलमानातही बदलत्या काळानुसार त्यात अधिक लवचिकता आलेली दिसते. पण पाहिजे तसा बदल अजूनही घडलेला नाही. जुन्या पिढीकडून आता अपेक्षा करणे अशास्त्रीय आहे, पण नवी पिढी मात्र या आश्वासक बदलांचा साथीदार होऊ शकते.
(सदरील लेख आज २० एप्रिल २०२१च्या दिव्य मराठीत प्रकाशित झालेला आहे. तो एप्रिल २०२३ला अपडेट करून तो नब्ज या इदोत्सव अंकात प्रकाशित केला आहे.)
कलीम अजीम, पुणे
मेल-kalimazim2@Gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com