यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक

स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिवीर, घणाघाती वक्ते आणि भारतीय युवक चळवळीचे अध्वर्यू यूसुफ जफर मेहरअली यांचा आज ६९वा स्मृतिदिन. मेहरअलींचे कार्य स्वातंत्र्य लढ्यापुरतेच सिमीत नव्हते तर त्यांनी अनेक ग्रंथाची रचनादेखील केली आहे. समाजवादी चळवळीसाठी दीशादर्शक असे अनेक ग्रंथ व पुस्तिका त्यांनी लिहिल्या आहेत. हा थोर स्वातंत्र्य सेनानी २ जुलै १९५० रोजी पैगंबरवासी झाला. चले जाव ही ऐतिहासिक घोषणा देणारे मेहरअलींच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा लेख आम्ही वाचकांसाठी देत आहोत. 

क प्रसिद्ध विधान आहे, “किती वर्षे जगला यापेक्षा जगणारा कसा जगला याला महत्त्व आहे.पिढ्या नि पिढ्या जगाने नामजप करावा, असं काम अनेक विभुतींनी अल्प आयुष्यात केलेलं आहे. तशी ही यादी फार मोठी आहे. या सर्वच लोकांच्या स्मृति आपण जागवतो असं नाही, पण दिशादर्शक कार्य करणारे चिरंतन कालासाठी स्मरणात राहतात. असेच एक आहेत यूसुफ मेहेरअली. केवळ ४७ वर्षांच्या आयुष्यात या माणसाने केलेलं कार्य अतुलनीय असं आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला वेगळी दिशा व वळण देणारा हा थोर स्वातंत्र्य सेनानी आज अनेकांच्या आठवतही नसेल.

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा निश्चिती करण्यास दोन घोषणांनी सर्वाधिक योगदान दिलेलं आहे. त्या म्हणजे, ‘गो बॅक सायमन’ (१९२७) व चले जाव’ (१९४२); या दोन्ही घोषणांचे जनक युसूफ मेहरअली आहेत. मेहरअली भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील मोठे नायक होते. त्यांनी भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. स्वातंत्र्य आंदोलनात ते इतके व्यग्र झाले की प्रकृतीच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आपल्या अल्प आयुष्यकाळात त्यांनी एक स्वातंत्र्यसेनानी, संघटक, राजकारणी व विचारवंत म्हणून वठवलेली भूमिका वादातीत आहे.

२३ सप्टेंबर १९०३ साली जन्मलेले मेहरअली कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. मुंबईतल्या एका प्रतिष्ठित खोजा व्यापारी कुटुंबाचा त्यांना वारसा लाभला होता. सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असताना हा तरुण ब्रिटिश शासनाच्या विरोधात उतरला. त्यांंचं प्राथमिक शिक्षण मुंबईच्या बोरीबंदरच्या न्यू हायस्कूलमधून झालं. 


शाळेच्या वयापासून ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या राष्ट्रवादी आंदोलनाशी समरुप झाले. कंपनी सरकार, ब्रिटिशांची गुलामगिरी, १८५७चा उठाव त्यांनी शाळेत असल्यापासून अभ्यास सुरू केला. कॉलेजमध्ये येता-येता ते स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय झाले. पण त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले. तरुण यूसुफने मुंबईच्या एलफिंस्टन कॉलेजमधून इतिहास आणि अर्थशास्त्रात बीएची पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी शासकीय विधी महाविद्यालयात कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. २६ जानेवारी १९२९ला त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं.

विधी कॉलेजमध्ये असताना ते बॉम्बे प्रेसीडेंसी युथ लिग संघटनेत सामील झाले. २० मे १९२८ला मुंबईच्या ओपेरा हाउसमध्ये एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची उपस्थिती होती. सभेत या नेत्यांची भाषणे ऐकून यूसुफ प्रभावित झाले. ते यूथ लीगचे सदस्य बनले. या संघटनेचे सचिव म्हणून ते विश्व शांती युवा काँग्रेसमध्ये सहभाग घेण्यासाठी होलँडला गेले. विद्यार्थी दशेपासूनच ते स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले.

कॉलेजमध्ये असताना फीवाढ आणि विद्यार्थ्यांविरोधातली सरकारच्या दडपशाहीचा विरोध केला. संपकरी मजुरांच्या हक्कासाठीदेखील त्यांनी जाहीर सभा घेऊन आपल्या संघटन कौशल्याची चुणुक दाखवली. त्यांच्या या कार्याने के.एफ. नरीमन, जोशिम अल्वा, एस.एम. जोशी आणि नानासाहेब गोरे सारखे दिग्गज नेते प्रभावित झाले होते.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी भारतात आलेल्या सायमन कमिशनचा विरोध केला. ७ नोव्हेंबर १९२७ला ७ सदस्यीय सायमन आयोग काही घटनात्मक दुरुस्त्यासाठी भारतात आला होता. यात ब्रिटिशांशिवाय एकही भारतीय सामील करण्यात आलेला नव्हता. इंग्रजांच्या या अयोग्य व अपमानकारक निर्णयाच्या विरोधात भारतीयांमध्ये असंतोष उफाळून आला. 

बॉम्बे यूथ लीग संघटनेअंतर्गत यूसुफ  मेहेरअलींनी सायमन कमीशनविरोधात मोहीम उघडली. त्यांची योजना लीक झाली. परंतु ते डगमगले नाहीत. ३ फेब्रुवारी १९२८ला ते वेषांतर करून आपल्या सहकारी मित्रांसह मुंबईतल्या त्या बंदरावर पोहोचले, जिथे कमिशनचं शिष्टमंडळ उतरणार होतं. सायमन कमिशन बंदरावर दाखल होताच त्यांनी आयोगाला काळे झेंडे दाखवले व सायमन गो बॅकची घोषणा दिली. 

ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. परंतु यूसुफ आणि त्यांच्या तरुण क्रांतिकारकांनी दिलेला नारा इतका बुलंद होता की, त्यांचा आवाज भारताच्या कोनाकोपऱ्यात पोहचला. (नंतर यूसुफ यांनी लाठीचार्ज करणारा पोलीस सार्जेंटवर खटला दाखल केला. कोर्टाने निकाल यूसुफ यांच्या बाजुने देऊन पोलिसाला १०० रुपयाचा दंड ठोठावला.) या घटनेने यूसुफ मेहरअलींचे नाव देशभरात पोहोचले. महात्मा गांधींसोबत अनेकांच्या तोंडी सायमन गो बॅक’ची घोषणा आली.
वाचा : रफीक झकेरिया : एक सुलझे हुए राजनितिज्ज्ञ
वाचा : लेखक व कवी होता मुघल सम्राट बाबर
यूसुफ मेहेरअलींच्या युथ लिगच्या सहकाऱ्यांनी सायमन गो बॅकचे पोस्टर मुंबईत चिकटवले. ग्रांट रोडवर झालेल्या ब्रिटिशविरोधी आंदोलनात यूसुफ यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात ते रक्तबंबाळ झाले, जखमी अवस्थेतच त्यांना अटक करण्यात आली. सायमन आयोगाला देशभरातून विरोध सुरू झाला. कमिशनविरोधात लाहौरमध्ये झालेल्या एका निदर्शनात पोलिसांनी लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले व उपराचादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लालाजींच्या मुत्युनंतर देशभरात इंग्रज सरकारविरोधात तीव्र निदर्शने झाली. अनेक ठिकाणी इंग्रजांविरोधात संप आणि उपोषणे झाली. भारतातील सर्वच राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला.

सायमन गो बॅकच्या घोषणेसोबत मेहरअली देशभरात परिचित झाले. लोकप्रियता आणि बेधडक स्वभावामुळे यूसुफ ब्रिटिशांसाठी त्रासदायक बनले. इंग्रजांनी त्यांच्याविरोधात सक्तीचं धोरण स्वीकारलं. परिणामी ब्रिटिशांनी यूसुफना मुंबई हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टीस करण्यास प्रतिबंध केला. त्याकाळी अनेक राष्ट्रीय नेते वकिली करत होते, परंतु यूसुफ मेहरअलींच्या समर्थनार्थ कोणीही आवाज बुलंद केला नाही.

सायमनच्या घटनेनंतर देशभरातील अनेक तरुणांचे गट यूसुफ मेहरअलींच्या संघटनेत सामील होण्यासाठी तयार झाले. पुढे ह्या तरुणांना यूसुफ मेहरअलींनी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाला सामील करून त्यांचे मनोबल उंचावण्याचे कार्य केले. 

१९३०ला यूसुफ मेहेरअली महात्मा गांधींच्या दांडी सत्याग्रहातही सामील झाले. मिठाच्या सत्याग्रहात सामील झालेल्या अनेक कांग्रेस नेत्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. पण यूसुफ मेहरअलींनी आपला लढा सुरूच ठेवला. अखेर मिठाचा कायदा मोडण्याच्या आरोपातून त्यांनाही ब्रिटिशांनी अटक करून ४ महिन्याची शिक्षा दिली. 

१९३२ साली त्यांनी पुन्हा एकदा तुरुंगवास झाला. यावेळी मात्र, त्यांच्यावर ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला. त्यांना जेलमध्ये पाठविण्यात आले. तुरुंगात त्यांची अनेक क्रांतिकारकांशी भेट झाली. या भेटीत यूसुफ मेहरअलींनी अनेक नियोजनाची आखणी केली. तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी आपला लढा चालूच ठेवला. 

१९३४ साली सोशालिस्ट काँग्रेसची स्थापना झाली. या संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते. यात त्याचा परिचय जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, नरेंद्र देव, अच्युत पटवर्धन, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, राम मनोहर लोहिया आणि मीनू मसानी यांच्याशी झाला. या संघटनेकडून देशभरात स्वातंत्र्य आंदोलनाला सुरुवात झाली. त्यांनी संघटना बांधणीचे कार्य करत शेतकरी आणि कामगारांना एकत्र केले. त्यांनी या संघटनेमार्फत ट्रेड यूनियनला सक्षम करण्याचा प्रयत्न केला. 

१९३८च्या समाजवादी संघटनेच्या लाहौर अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. याच वर्षी त्यांनी युरोप आणि अमेरिकेची यात्रा केली. लंडनमध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. भारतात परत आल्यानंतर त्यांना बिहारच्या समाजवादी संघटनेच्या अधिवेशनाची अध्यक्षता केली.  

१९४२ साली चले जावचळवळीने जोर धरला. 'ब्रिटिशांनी तत्काळ देश सोडून चालते व्हावे', असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. या घोषणेपूर्वी आंदोलनाची नेमकी रुपरेषा काय असावी, याबाबत गांधीजींनी अनेकांशी चर्चा केली होती. काहींनी 'गेट आऊट' हा शब्दप्रयोग सुचवला होता, पण तो उद्धट आहे या कारणाने गांधीजींनी तो नाकारला.  
यूसुफ मेहेरअली पद्मा प्रकाशनचे संपादक होते. त्यांनी अनेक ठोच्या पुस्तिका प्रकाशित केलेल्या होत्या. १९४२च्या चळवळीची मार्गदर्शक पुस्तिकाही प्रकाशित केलेली होती.
यूसुफ मेहेरअली पद्मा प्रकाशनचे संपादक होते. त्यांनी अनेक छोट्या पुस्तिका प्रकाशित केलेल्या होत्या. १९४२च्या चळवळीची मार्गदर्शक पुस्तिकाही प्रकाशित केलेली होती
सरदार वल्लभभाई पटेल यांनी 'रिट्रीट इंडिया' किंवा 'विथड्रॉ इंडिया' असे दोन पर्याय पुढे केले. परंतु सर्वसामान्यांपर्यंत आशय पोचवण्यास ते शब्द तितकेसे सुलभ नाहीत, म्हणून गांधीजींनी ते शब्दप्रयोगही नाकारले. त्याच दरम्यान यूसुफ मेहेरअली यांनी 'क्विट इंडिया' हा शब्दप्रयोग सुचवला आणि गांधीजींनी तो 'आमीन' म्हणून तत्काळ मान्य केला.
वाचा : टिपू सुलतानची खरी भीती कुणाला?
वाचा : 
द्वेषाच्या भांडवली बाजारात 'कमोडिटी शिवबा'

७ व ८ ऑगस्ट १९४२ला मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत चले जावचा ठराव मंजूर करण्यात आला. ८ ऑगस्टच्या संध्याकाळी मुंबईतल्या गवालिया टँक मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ही घोषणा देण्यात आली. या सभेत यूसुफ मेहरअलींनी लिहिलेली ‘Quit India’ नामक एक पुस्तिकाही वितरित करण्यात आली होती. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या घोषणेनंतर महात्मा गांधींना ९ ऑगस्टच्या पहाटेच मुंबईतून अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनाही अटक झाली. यूसुफ मेहरअलीदेखील त्यात होते.

मुंबईच्या तुरुंगात असताना त्यांना हार्टअटॅकचा झटका आला. जेल अधिकाऱ्यांनी त्यांना चांगल्या उपचारासाठी सेंट जार्ज हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी दाखवली. परंतु त्यांनी हीच सुविधा सामान्य कैदानांही मिळावी, म्हणत नाकारली. यूसुफ मेहरअलींच्या चिंताजनक प्रकृतीची बाहेर वाऱ्यासारखी पसरली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. जनमाणसाच्या दबावामुळे अखेर ब्रिटिश सरकारने यूसुफ मेहेर अलींची १९४३ला सुटका केली. 

यूसुफ मेहरअली ८ वेळा तुरुंगात गेले. १९४२ला ते लाहौरच्या तुरुंगात होते त्यावेळी राष्ट्रीय सभेने (काँग्रेस) त्यांना बॉम्बे (मुंबई) नगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर पदाची उमेदवारी घोषित केली. निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांची तुरुंगात सुटका करण्यात आली. ते बहुमताने विजयी होऊन मुंबईचे महापौर बनले. महापौर असताना त्यांनी अनेक कामे केली. ३१ मार्च १९४९ला ते मुंबई नगर (दक्षिण) मतदार संघातून विधान सभेवर निवडून गेले. 

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील हा थोर नेता २ जुलै १९५०ला जगातून अखेरच्या प्रवासाला निघून गेला. मृत्युसमयी त्यांचं वय ४७ होतं. इतक्या कमी वयात मृत्यु येणे खरोखरच धक्कादायक होतं. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी त्यांनी प्रकृतीची चिंता केली नाही, पण आपल्या हयातीत त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं पहायला मिळाले. त्यांच्या निधनाच्या दिवशी मुंबई ठप्प झाली होती. रस्ते ओस पडले होते. लोकल, बस गाड्या थांबल्या होत्या. या घटनेचा उल्लेख करत अनेकांनी लिहिलं आहे की, कधी नव्हे ती यूसुफ मेहेरअलींच्या निधनाच्या दिवशी मुंबईचे कामकाज लोकांनी स्वत:हून बंद केलं होतं. 

यूसुफ मेहरअलींच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान अतुलनीय असं आहे. ते केवळ स्वातंत्र्य लढ्यातच रमलेनाही तर त्यांनी उत्कृष्ट असा वैचारिक ग्रंथाची रचनादेखील केली आहे. त्यांनी १९३८ साली विश्व सांस्कृतिक संमेलनात प्रतिनिधी म्हणून भारताचे नेतृत्व केलं होतं. इथं पश्चिमी राष्ट्राच्या तुलनेत भारतीय समाजाला अधोरेखित करणारे साहित्य नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. 

ही कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी लीडर ऑफ इंडिया’ (१९४२) नामक पुस्तकाची रचना केली. पाकिस्तानच्या मागणीला त्यांचा विरोध होता. केवळ विरोध करून ते थांबले नाहीत तर त्यांनी पाकिस्तानच्या मागणीला विरोध करणारे  ए ट्रिप टू पाकिस्तान’ (१९४४), पुस्तकही लिहिले. याशिवाय आपल्या कारर्कीर्दीत त्यांनी अनेक दर्जेदार ग्रंथ लिहिले. त्यात व्हॉट टू रीड: ए स्टडी सिलेबस’ (१९४२), ‘दि मॉडर्न वर्ल्ड: ए पॉलिटिकल स्टेडी स्लेवस पार्ट-१’ (१९४५), ‘दि प्राइज ऑफ लिबर्टी’ (१९४८) आदी पुस्तके आहेत.

एकविसाव्या शतकातील अनेक घडामोडी इतिहासाच्या अभ्यासक्रमात स्थानबद्ध झाल्या आहेत, त्यामुळे भारताचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाच्या खुणा पुसट होत आहेत. समकालीन घटनांची नोंद इतिहासाने घ्यावी; पण ते करत असताना देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीचे पदचिन्हे नष्ट होत आहेत का, याची चाचपणी वेळोवेळी केली पाहिजे. ही दक्षता न घेतल्यास नव्या पिढीला मायभूमीचा सांस्कृतिक व राजकीय वारसा कळणार नाही. त्यामुळे भारताचा ऐतिहासिक व वैभवशाली वारसा वारंवार नव्या पिढीला सांगावा लागतो. सतत त्याची उजळणी केल्यास तो इतिहास स्मरणात राहतो.

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील अनेक महारथी आज विस्मृतीत गेले आहेत. काही ठरवून तर काही स्मृतिभंषाने आठवणीतून नाहीसे झाले. ज्या महामानवाने भारताला पारतंत्र्यातून काढून मोकळा श्वास दिला त्या महारथींचे स्मरण करणे क्रमप्राप्त ठरते. यूसुफ मेहेरअली भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतिभंषाचे असेच एक बळी आहेत. यूसुफ मेहेरअली फक्त सामान्य नागरिकांच्या स्मरणातून नाहीसे झाले नाहीत तर ते भाष्य़कार, अभ्यासक, विचारवंताच्या स्मरणातून नाहीसे झाले आहेत. राष्ट्रीय सभेने (काँग्रेस) अनेक थोर विभुतींना स्मरणातून काढून टाकले आहे. जिथे ते जवाहरलाल नेहरूंवर शत्रुपक्षाकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्य़ाला रोखू शकले नाही, तिथे स्वातंत्र्य समरातील आपल्या नायकांचा बचाव करण्याची अपेक्षा त्यांच्याकडे करणेही फोल आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्वातंत्र्य संग्रामातील लढ्याचा इतिहास विकृतपद्धतीने संपादित करण्याची मोहीम सुरू आहे, त्यामुळे स्वातंत्र्य समराच्या खऱ्या नायकांची उजळणी करणे आवश्यक झाले आहे. वाचनापासून दूर गेलेली नवी पिढी स्वातंत्र्य सेनानींविषयी अनभिज्ञ आहे. त्यामुळे त्यांच्या विवेकी जडणघडणीसाठी त्या इतिवृत्ताची मांडणी बदलत्या वेळेनुसार करावी लागेल. 

कलीम अजीम, पुणे
मेल- kalimazim2@gmail.com
Twitter@kalimajeem

(लेखाचे पुनप्रकाशन करताना लेखकाची परवानगी घ्यावी)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,43,इस्लाम,38,किताब,18,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,276,व्यक्ती,7,संकलन,62,समाज,234,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक
यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglHCsNNS4he5TqBdfMK6uOMy5KVOVRNZPe20CbgSLrrfKwTizSN-CL45dPEYsiDHRARNDETUg2f9S0nsVv7loMZCq6lma4bc8qxEWCTo8-adlQour11T908CjCY6J5y5-h29dNH0xCoGJq/s640/Yusuf+Meherally.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglHCsNNS4he5TqBdfMK6uOMy5KVOVRNZPe20CbgSLrrfKwTizSN-CL45dPEYsiDHRARNDETUg2f9S0nsVv7loMZCq6lma4bc8qxEWCTo8-adlQour11T908CjCY6J5y5-h29dNH0xCoGJq/s72-c/Yusuf+Meherally.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/07/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/07/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content