प्रतिकांचं साहित्यकारण किती दिवस?

माजाचा बदलता परिपेक्ष्य साहित्यामध्ये प्रतीत होतो, पण गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्यात परिवर्तशील समाजाचं नेमकं चित्रण येताना दिसत नाहीये, हा आक्षेप अनेक नवलेखक नोंदवतात. तंत्रज्ञान, बदलते नातेसंबंध, स्वभावविश्व, कुटुंबव्यवस्था, मानस, सामाजिक बदल, राजकीय संस्कृती, वर्चस्ववाद, अर्थकारण, बेरोजगारी, सांस्कृतिक आंदोलन इत्यादी साहित्य क्षेत्रातून दुरावले जात आहेत. फिक्शन आणि नॉन फिक्शन गटात साहित्याची विभागणी केली असता, नॉन फिक्शन गटातलं वैचारिक साहित्य प्रगतीच्या अतिउच्च टोकाला पाहायला मिळतं. पण फिक्शनच्या बाबतीत आजही प्रस्थापित मराठी साहित्यिक जुन्या स्टिरिओ टाईप भूमिकेमधून बाहेर पडायला तयार नाहीयेत.

जागतिकिकरण, एलिट प्रेमकथा, सेक्सुअल डिजायर, अप्पर क्लासचं जगणं, त्यांचे छंद, अभिजनाचं सौंदर्यशास्त्र, प्रतीकं, गुन्हेगारी, विमुक्त स्त्री, सुडकथा, गुढ आणि रहस्यकथा अशा रोमँटिक दुनियेत मराठी साहित्यिक वावरत आहेत. बरंच साहित्य ऐंशी व नव्वदच्या दशकातून बाहेर पडलेलं नाहीये. हीच अनास्था मुस्लिम मराठी साहित्यिकांमध्ये आढळते. प्रस्थापितांच्या कंपुतून बाहेर फेकले जाऊ अशा या अनामिक भीतीमुळे मुस्लिम मराठी लेखक ठराविक प्रतिमेत बंदिस्त झाले आहेत. त्यांचा हा बंदिवास समाजासाठी घातक ठरतोय का? याची मींमासाही केली जाऊ शकत नाही. जागतिक पटलावर २१व्या शतकात मुस्लिम समाजाचे प्रश्न बदलले आहेत. भारतासारख्या धर्मांध राजकीय संस्कृतीत त्यांच्या सामाजिक व नागरी समस्या वाढल्या आहेत. शिक्षण, रोजगार, स्पर्धा, संघर्ष, सामाजिक सुरक्षा, दहशतवाद, खोटे खटले, दीर्घकाळ तुरुंगवास, तुच्छतावाद इत्यादी विषयाला अजून साहित्यिकांनी स्पर्शही केला नाहीये. परिणामी मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या बंदिस्त भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहेत. आजही बरेच साहित्यिक प्रतिमेच्या जोखडात अडकले आहेत, तर काही अस्मितावादी लेखनात गुरफटले आहेत.

प्रगल्भ साहित्याने समाजात लहानसहान बदल होत असतात. जेवढे वैचारिक साहित्य प्रभाव करू शकत नाही, त्यापेक्षा जास्त फिक्शन अर्थात कथा, कादंबऱ्या मनात जाऊन भिनत असतात. त्यामुळे साहित्य प्रकारात कथा-कादंबऱ्यांनाही वैचारिक इतकंच महत्त्व आहे. पण आजचं मराठी साहित्य पाहता, ही भूक कशी भागणार असा प्रश्न पडतोय.

वाचा : मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तीन दशकं
मराठी लेखनाची परंपरा 

संतकवी शेख महंमद यांच्यापासून ते शाहिर अमर शेखांपर्यत महाराष्ट्राला मुस्लिम मराठी लेखकाची परंपरा लाभली आहे. शेख महंमद पंधराव्या शतकातील महत्त्वाचे कवी होते. शेख महंमद यांच्या अनेक रचना आजही लोकप्रिय आहेत. यांच्यानंतर शहा मुंतोजी, हुसेन अंबरखान, अलमखान, शेख सुलतान इत्यादी कितीतरी मुस्लिम कवी, लेखक मराठीत होते. रा.चिं. ढेरे यांनी ‘मुस्लिम मराठी संतकवी’ व डॉ. यू. म. पठाण यांनी ‘मुसलमान (सुफी) संतांचे मराठी साहित्य’ या पुस्तकात मुस्लिम मराठी लेखकांबद्दल सविस्तर लिहिलं आहे. या कवींनी लोकसंवादातून प्रबोधनाचं काम केलं. तत्कालीन राजकीय व्यवस्थेवर कोरडे ओढले, अन्याय-अत्याचाविरोधात भूमिका घेतली, पुरोहितशाहीला आव्हान दिलं, अंश्रद्धेवर भाष्य केलं. जनमाणस बदलला, लोकसाक्षरता घडवून आणली. इतकच नाही तर तत्कालीन समाजघटकाला दिशादर्शन केलं. गद्य, ओव्या व खंडकाव्यातून समाजात गंगा-जमुनी संस्कृतीची बीजं रोवली, जातीय व धार्मिक एकतेचा संदेश देऊन लोकशिक्षण केलं.

मुस्लिम मराठी लेखनाची परंपरा जरी खूप जुनी असली तरी मुख्य प्रवाहातील लिखाण बऱ्याच उशीरा सुरू झालं. या लेखन प्रक्रियेत १९३० सालचे सांगलीचे ‘सय्यद अमीन’ यांचं नाव हमखास घ्यायला हवं. माझ्या माहितीप्रमाणे सय्यद अमीन यांनी शाहू महाराजांनंतर प्रथमच कुरआन मराठीत आणलं. शाहूंनी कुरआनचा मराठीत अनुवाद करण्याचा प्रयत्नाला हातभार लावला, परंतु ते पूर्ण होऊ शकलं नाही. अमीन यांनी कथा, कांदबऱ्या, ललित लेखन, साहित्य समीक्षा, इस्लामी तत्वज्ञानावर विपुल लेखन केलं. मुस्लिम मराठी लेखकांना संघटित केलं. त्यांच्यानंतर अनेक मराठी कवी लेखक साहित्यिक व विचारवंत मुस्लिम मराठीला लाभले. तत्कालीन साहित्याची गरज म्हणा किंवा अन्य काही, या सर्व लेखकांचं लिखाण हे मुख्य प्रवाहातील मराठी लेखनाप्रमाणंच होतं. कोणीही प्रवाहाविरोधात जाऊन लेखन केलेलं आढळत नाही. किंवा त्यात सांस्कृतिक भान घेऊन उद्देशपूर्ण लेखन केलेलं जाणवत नाही.

१९६०च्या दशकात महाराष्ट्रात दलित साहित्य लेखनाची प्रक्रिया सुरू झाली. या साहित्यानं लेखन सौंदर्यशास्त्राची कथित सर्व परिमाणं मोडून टाकली. दलित साहित्याने देशाचं समाजकारण हादरवून सोडलं. याआधी अठराव्या शतकात महाराष्ट्राला महात्मा फुलेंनी विद्रोही साहित्य दिलं. या तुलनेनं दलित साहित्य लेखनाची परंपरा खूप उशीरा सुरू झाली. पण फुलेंच्या सत्यशोधक चळवळीतील पत्रिका तथा आंबेडकर संचालित केलेल्या विविध नियतकालिकातून दलित जणिवां रेखाटणारं स्फुट लेखन मात्र विपुल प्रमाणात आलेलं होतं. त्या तुलनेत मुस्लिम मराठी साहित्य फारसं काही लक्षवेधी लिखाण झालं नाही. किंबहुना त्यावेळी उर्दू किंवा हिंदोस्ताँनी भाषेत मकसदी अर्थात उद्देशपूर्ण लेखन ही भूमिका घेऊन साहित्य संघ अस्तित्वात आले होते. त्यांनी आधुनिक विचारांच्या साहित्य चळवळी सुरू केल्या होत्या. कथा-कांदबऱ्या, ललित, प्रवासवर्णने, स्वकथन, आत्मकथनातून विद्रोही लेखन सुरू केलं होतं. सर सय्यद यांच्या सुधारणा चळवळीतून आलेले मुमताज अली यांनी १८९० साली स्त्रियांच्या प्रश्नांना वाहिलेले हुकूक ए निस्वान नावाचं मासिक सुरू केलं होतं. त्यातील लेखनावर एक नजर जरी टाकली तरी त्यावेळचं उर्दूभाषिक लिखाण किती प्रगल्भ व आव्हानात्मक होते, याची कल्पना येते. प्रगतीशिल लेखक संघटनेचं मध्यवर्ती केंद्र मुंबईत होतं. १९३५ पासून आधुनिक विचार, प्रागतिक भूमिका, स्त्रिमुक्तीचा विचार घेऊन मुस्लिम समाजमन रेखाटणं सुरू झालं होतं. मराठी प्रदेशात राहून, सदाअत हसन मंटो, ख्वाजा अहमद अब्बास, राजेंद्रसिंह बेदी, इस्मत चुगताई सारखं कथाकार मराठी प्रदेशातील मुस्लिमांचं जगणं रेखाटत होते. त्या तुलनेत मराठीत अशा प्रकारचं लेखन होऊ शकलं नाही.

१९५०च्या दशकात शाहीर अमर शेखच्या रूपानं विद्रोही कवी मराठी मुस्लिम महाराष्ट्राला लाभला. ते प्रगतिशील लेखक संघ तथा इप्टाचं उत्पन्न होते. त्यांनी क्रांतिकारी कविता, लोकगीतं लिहिली. जी पुढे संयुक्त महाराष्ट्राची चळवळीला उर्जा देणारी ठरली. त्यांच्या लोकगीताशिवाय अखंड महाराष्ट्र चळवळीचं कल्पनाच केली जाऊ शकत नाही. त्यांचा विद्रोही साहित्याचा वारसा आजही त्यांची कन्या मल्लिका अमर शेख चालवत आहेत. १९६०-७०च्या दशकात आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून मुस्लिम मराठी साहित्याची निर्मिती झाली. कोकणात कॅप्टन फकिर मुहंमद जुळवे नावाच्या लेखकाने मराठीत उत्तम दर्जाची साहित्य निर्मिती केली. त्यांच्यानंतर अनेक वर्षांनी हमीद दलवाई आले. साधे पत्रकार जरी असले तरी त्याचं लेखन लोकांच्या भावविश्वाचं ठाव घेणारं होतं. त्यांनी सकस साहित्य निर्मितीच केली नाही, तर त्याला राजकीय व सामाजिक पदरेही जोडली. त्यांच्या ‘इंधन’, ‘लाट’ यासारख्या पुस्तकांना आजही मराठी साहित्यात मानाचं स्थान आहे.

सत्तर साली दलवाईंनी प्रवाहाविरोधात लिखाण केलं होतं. समाजाचं प्रतिबिंब त्यांनी साहित्यात मांडलं होतं. दलवाईंनी वैचारिक लिखाणही केलं. पुढे दाऊद दळवी, अब्दुल सत्तार दळवी, अब्दुल कादर मुकादम यांनी कोकण संस्कृतीची ओळख मराठी साहित्यविश्वाला करून दिली. तैय्यबजी कुटुंबात अनेक लेखक उदयास आले. त्याचं बहुतांश लेखन इंग्रजीत असलं तरी मुस्लिम समाजभान त्यांनी आवार्जून रेखाटलं आहे. समाजवादी चललीतील मोइनुद्दीन हारीस यांनीही साधनेत विपुल लेखन केलं. ते स्वत: ‘अजमल नावाचं उर्दू दैनिकही चालवित होते.

वैचारिक लेखन शैलीत कोकणी रफीक जकेरिया (नंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले) आणि औरंगाबादचे डॉ. मोईन शाकीर यांचा नाव न विसरण्यासारखं आहे. या राजकीय विश्लेषक द्वयींनी दलवाईपेक्षा सरस व उत्तम वैचारिक लिखाण केलं आहे. तात्पर्यमागोवा सारख्या नियतकालिकात शाकिरांचं मराठी लेखन नित्यनियमाने प्रकाशित होत. जकेरिया आणि शाकीर यांना आधुनिक भारताचे पोलिटिकल थिंकर मानलं जातं. राष्ट्रवाद, सांप्रदायिकता, सामाजिक सुरक्षा इत्यादी विषयात व्हिजनरी लिखाण त्यांनी केलेलं आहे. पण सुलभीकरणाच्या राजकारणामुळे दोघंही मराठी चर्चाविश्वातून बाहेर ढकलले गेले.

रफिक जकेरिया व मोईन शाकीर यांचं बरंचसं लिखाण इंग्रजीतून आहे. कदाचित हेदेखील कारण त्यांना मागे ढकलण्यास कारणीभूत असावं. तीच अवस्था प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या बाबतीत झाली. ते एक उत्तम वैचारिक लेखक आहेत. तसेच ते मराठी साहित्याचे समीक्षक व संवेदनशील कविदेखील आहेत. त्यांचा गुलमोहर कवितासंग्रह प्रस्थापित व्यवस्थे्ला आव्हान देतो. तसं तो प्रतिकांच्या डबक्यात अडकत नाही तर आधुनिक काळातील समस्यांशी सुसंवाद करू लागतो. त्यांचे वैचारिक  लिखाणही प्रस्थापित विचारवंत व अभ्यासकांना पुरून उरेल. इतकं असूनही दुर्वैवाने ते उपेक्षितच राहिले.

फ.म. शहाजिंदे हे मरावाड्यातील समकालीन लेखकात मोठं नाव. त्यांचे काही कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. शिवाय शेतकरी या खंडकाव्यातील त्यांनी कृषि संस्कृती व शेतकऱ्याचं भावविश्व रेखाटलं आहे. त्याचं ललित लेखनही मुस्लिमत्व दर्शवणारं आहे. 

वाचा : सोशल मीडिया आणि नवलेखन  
वाचा : कुठलीही हिंसा ती निंदनीयच
साहित्य परषदेची स्थापना

१९९० साली महाराष्ट्रात मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, अजिज नदाफ, फ.म. शहाजिंदे, विलास सोनवणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मुख्य प्रवाही साहित्य केंद्राला व प्रस्थापित मराठी सारस्वतांशी त्यांनी केलेला हा जणू एक विद्रोहच होता. मुसलमान मराठी लिहित नाही इथंपासून सुरू झालेला हा लढा साहित्य संस्कृती मंडळ, अभ्यास मंडळ व साहित्य संमेलनाचे निमंत्रित कवी इथंपर्यंत चळवळ पुढे गेली. पण मुस्लिम मराठी सहित्यिकांसह त्यांना इतरही प्रस्थापित साहित्यिकांनी दुर्लक्षित केलं. त्यांनीच स्थापन केलेल्या मुस्लिम मराठी चळवळीच्या बाहेर ते फेकले गेले.

मुस्लिम मराठी साहित्य चळवळीमुळे नव्वदच्या दशकात वैचारिक मुस्लिम लेखकांची एक मोठी फळी तयार झाली. प्रा. शहाजिंदे, मुबारक शेख, यू.म. पठाण, दाऊद दळवी, फकरुद्दीन बेन्नूर, अब्दुल कादर मुकादम, ऐहतेशाम देशमुख, जावेद कुरैशी इत्यादींनी सामाजिक व राजकीय भान स्वीकारून लेखन केलं. याच चळवळीतून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खान्देश, मराठवाडा आदी विभागात सकस लेखन व लेखक उदयास आले. आजही अनेकजण वयाच्या ज्येष्ठतेतही लिखाण करतात.

ऐंशीच्या दशकात याच काळात फिक्शन लिखाणालाही थोडीशी गती मिळाली. त्यात बशीर मुजावर सारखे रहस्यकथाकार पुढे आले. पण मुख्य प्रवाही प्रकाशक त्यांना उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांचे साहित्य दुलर्क्षित राहिले. तीच अवस्था जावेद कुरैशी व मुबारक शेख यांच्या साहित्यकृतीची आहे. अर्थातच मराठी लेखन परंपरेतील मुळं घेऊन हे लेखन आलं होतं तरीही पेठीय मराठी लेखकांनी त्यांचे लेखन साहित्य मानण्यास नकार दिला. या परिस्थितीतून लेखकांना बाहेर काढण्याासठी २०१७ साली प्रा. शाहाजिंदेनी 'भूमी प्रकाशन'ची स्थापना केली. मुळात मराठवाड्यातील लेखकांना प्रोत्साहन मिळवून देणे, त्यांच्या लेखनाला प्रकाशक मिळवून देणे ही भूमिका त्यामागे होती. भूमी प्रकाशनाकडून अनेक दर्जेदार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, जावेद कुरैशी, राजेखान शानेदिवान, प्रा. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. श्रीपाल सबनीस आदी लेखकांची पुस्तके भूमीकडून प्रकाशित झालेली आहे. आत्तापर्यंत भूमीकडून ८०पेक्षा जा्सत पुस्तकांची निर्मिती झालेली आहे. मुस्लिम मराठी लेखाला उभारी देणारा हा प्रयोग होता.

वाचा : मुस्लिमांची निर्भयतेकडे वाटचाल 
प्रवाही साहित्य

प्रस्थापित मराठी साहित्यात मुस्लिम समाजविश्व व सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब फारसं जाणवत नव्हतं. त्यामुळे मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे स्थापना झाली होती. मुख्य प्रवाही साहित्यिक व माध्यमातून डावलेल्या गेलेल्या लेखनाला धार देण्यासाठी ही साहित्य चळवळ सुरू झाली होती. मागे म्हटल्याप्रमाणे ऐकेकाळी मराठी प्रदेशातील उर्दू साहित्याने खूप मोठा टप्पा गाठून नव्वदीत तो क्षीण झाला होता. फाळणी व पुढे बाबरीच्या घटनेनंतरच्या संप्रदायिक उन्मादात उर्दू लेखक जपून लिहू-बोलू लागले होते. साम्यवादी चळवळ सेबाटाइज झाल्याने डावे लेखक व्यावसायिक लेखनात रमले होते. मजरूह सुल्तानपुरी, कैफी आज़मी, निदा फाजली, राही मासूम आदी लेखक व्यावसायिक लेखनात रमले. त्यामुळे मराठी प्रदेशातील मुस्लिम मराठी लेखनाकडे आशेने पाहिलं जाऊ लागलं.

फिक्शन साहित्य प्रकारात नव्वदीनंतर फारच बदल झाला. यू.म. पठाण संत साहित्यात रमले. प्रा. बेन्नूर यांना वैचारिक लेखनातून उसंत मिळेना. उर्रवित संघटक कविता, गज़लामध्ये रमले. शहाजिंदे कविता व स्फुट लेखनात व्यस्त झाले. साहित्य चळवळीतून पुढे आलेले एक जावेद कुरैशी सोडले तर कोणीही वांगमय-साहित्यात फारसं काही करू शकले नाहीत. कुरैशींनी लिहिलेल्या विविध लघुकथासंग्रहातून मुस्लिमत्व ठळकपणे प्रदर्शित होतं. कवितेतही सामाजिक व सांस्कृतिक उद्धवस्तीकरण झालेलं मुस्लिम पात्र हमखास येते. त्यांनी ब्राह्मणी धर्मांध राजकारणात होरपळेलं मुस्लिम पात्र साहित्यातून अधोरेखित केलं. यापूर्वी प्रस्थापित साहित्यकृतीत मुस्लिम हा एकजिनसी असायचा. दाढी-टोपी किंवा लुंगी नेसलेलं व गळ्यात ताइत असलेलं एखादं येई. तेही विकृत किंवा राक्षसी! नाट्य, चित्रपटातील मुस्लिम तर कहरच होता. दृष्ट व्हिलेन असो ड्रायव्हर असा एकजिनसी मुस्लिम हमखास असे. विजय तेंडुलकर यांच्या सखाराम बाइंडरमधलं दाऊद हे पात्र त्याचं प्रातिनिधिक उदाहरण होतं. शिवाय हिंदुत्व व्याख्येतला मुस्लिम पुढे मराठी साहित्यविश्वातील मध्यवर्ती पात्र ठरू लागला. आजही हीच परंपरा अनेक मराठी साहित्यिक पुढे घेऊन जाताना दिसतात.

प्रस्थापित साहित्य क्षेत्रात केवळ लोकमान्यता हवी व लाभाचं पद मिळावं म्हणून मुस्लिमाविरोधात लिहिणारे लेखक अनेक आहेत. काही नियोजनबद्धरित्या मुस्लिमांचं शत्रुभावी चित्रण व सांस्कृतिक कुरघोड्या करतात. ऐतिहासिक कथा-कांदबऱ्या असो वा सिनेमात सिनेमॅटिक लिबर्टी किंवा कल्पनाविश्वातून इतिहासाचं विकृतीकरण झालं. परिणामी त्याचं प्रतिबिंब जनमाणसाच्या व्यवहारात पडलं. मुस्लिमांविषयी गैरसमज निर्माण होऊन सहजीवनात खंड पडू लागला. त्यातून दंगलीचं राजकारण घडू लागलं. कल्पनास्वातंत्र्याने एका समाजाचं अस्तित्वाचे प्रश्न उभे केले. अशावेळी मुस्लिम मराठी साहित्यिक, कवि, गज़लकार प्रतिकांच्या बंदिस्त कोशात रमले.

नव्वदच्या दशकात भारताने ग्लोबलायझेशनचं धोरण स्वीकारलं, याची फळं भारतीय समाजातील अशरफ वर्गाने चाखली. आजही त्याचे फायदे तेच घेत आहेत. याच काळात कामगार वर्ग देशोधडीला लागला. जगभरात कामगार अधिकारांविषयी बोललं गेलं. ही एक बाजू भाषिक साहित्यात प्रकर्षानं आली. पण मागास जातीतील मुस्लिम जातिसमूह आणि ग्लोबलायझेशनमध्ये त्यांचं नेमकं स्थान याचं रेखाटन पाहिजे तसं झालेलं दिसत नाहीये. बाबरीनंतरचा असुरक्षित मुस्लिम मराठी साहित्यविश्वात जागा घेऊ शकला नाही. २०००च्या दशकात दहशतवादाचं मिथक हजारों मुस्लिम तरुणांचं सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करून गेलं. खोट्या आरोपात उच्चशिक्षित तरूण जेलमध्ये कोंबले गेले. इस्लामफोबियाचं प्रस्थ माजवून हेट इकोनॉमी उदयास आली. एका समाजाच्या राक्षसी कल्पनारंजनातून कोट्यवधीचा मीडिया मार्केट उभा झाला. परंतु साहित्यविश्व मात्र प्रतिकात अडकून राहिलं. दहशतवादाचा आरोप, मुस्लिमांचं अमानवी चित्रण, खोटे आरोप, मालेगाव कब्रस्तान स्फोट, मक्का मस्जिद, नांदेड ब्लास्टच्या आरोपात अनेक मुस्लिम गोवले गेले. परंतु एकाही साहित्यिकाने त्याची दखल घेतल्याचं आढळत नाही.

दहा-दहा, वीस-वीस वर्षात दहशतवादाच्या खोट्या आरोपातून अनेक तरुण सुटून बाहेर आले. त्यांनी लिहिलेल्या जेल डायऱ्यामधून त्यांनी जी व्यथा मांडली त्याची एकाही समीक्षकाने दखल घेतल्याचं आढळत नाही. किंबहुना हिंदी, इंग्रजी, उर्दूतील हे जेल अनुभव मराठीत आणण्याची तसदीही कोणी घेतली नाही.

फ.म. शहाजिंदे यांनी मराठी मुस्लिम लेखकांची लेखकसूची प्रकाशित केलली आहे. त्यात महाराष्ट्रातील विभागवार अशी २०० लेखकांची नावं आहेत. त्यातील चार-दोन नावं सोडली तर बदलत्या प्रश्नांची दखल कोणाही घेतली नाही. जावेद कुरैशी, प्रा. शहाजिंदे यांचा निधर्मी कवितासंग्रह, मुबारक शेख यांचा दहशतनामा व डीके शेख यांचा दंगल आणि इतर कविता सोडली तर मराठी मुस्लिम साहित्यिकात या ज्वलंत प्रश्नांची साधी दखलही आढळत नाही. उर्वरित चार-दोन नावं सोडली तर अनेकजण प्रतिकांच्या चौकटीत जेरबंद दिसतात. इथं नाव घेण्याची गरज नाही, पण बहुतांशी मुस्लिम मराठी कविंच्या कविता फुलं, काटे, प्रेम, विरह, आकाश, चंद्र, तारे इत्यादीत होरपळलेली दिसतात.

नव्वदीत सुरू झालेल्या साहित्य चलवळीतून अनेक लोक लिहिते झाले. परंतु त्यांनी सकस असं लिखाण केल्याचं आढळत नाही. चार-दोन वैचारिक लेखक सोडले तर इतरत्र वाणवाच! बहुतांश लेखक अभिजन सौंदर्यशास्त्र, ब्राह्मणी संस्कृती, उच्चभ्रू प्रेमकथा, शेत-शिवार, गावगाडा, गावकूस, निमशहरी, शहरी उच्चवर्ग या जोखडातून सुटू शकलेले नाहीत.

आजचा तरुण उच्चभ्रू विद्यापीठं व एमएनसी कंपनीत शिफ्ट हेड झालाय. स्पर्धा नामक जीवघेण्या घटकात तो कॉर्पोरेटचा गुलाम झाला, अल्प पगारी वेठबिगार झाला, चंगळवादात अडकून गुन्हेगार झाला; पण आमचे कवी फुलांचं सौदर्य टिपण्यात व पक्ष्यांची थवे मोजण्यात व्यग्र आहेत. झाडावर चढून बडबडगीते गात आहेत. समाजातील मोठा वर्गासमोर अस्तित्वाचं संकट असताना आमचा कवी मात्र विरह गीते किंवा सौंदर्यवतीच्या प्रशंसेत बुडाला आहे.

मुख्य प्रवाही मराठी वांगमयात आजही ८०-९०च्या दशकातील शेत-शिवार, गावगाडा रेखांकित होताना दिसतो. एकविसावे शतक आलं तरी विषय बदलत नाहीत. तंत्रयुगाने मानवाचं अवघं जगणं व्यापून टाकलं. शिक्षण आणि रोजगाराची साधने मोठ्या प्रमाणात बदलली. शहरीकरण आणि स्थलांतर या दोन टप्प्यांनी तरुणाईचं विश्व पालटलं. पण मराठी साहित्यात त्याचे प्रतिंबिब जाणवत नाही. तुलनेने हिंदी, इंग्रजी साहित्यव्यवहार आमुलाग्र बदल स्वीकारतोय. चेतन भगत सारखा लेखक बाजरू गणित ठरवतो. अमिश कोट्यवधींच्या प्रती खपवतो. पण आमचे मराठी साहित्यिक ऐंशीच्या दशकात रमलीत. क्वचित एखाद्या कथेतच मोबाईल, इंटनेट कारक घटक म्हणून पुढे येतो. कॉम्पुटर, तंत्र, विज्ञान अजूनही आमच्या कादंबऱ्याचे विषय होऊ शकले नाहीत.

 मुस्लिम समाजही नव्या सहस्त्रकाचं प्रतिनिधित्व करतोय. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सहा आकडी पगार कमवतोय. मर्सिडीज बेन्ज् घेऊन फिरतोय. उंच टॉवरमध्ये राहतोय. मॉलमध्ये शॉपिंग करतोय. जीन्स-टीशर्ट घालून धार्मिक कर्मकांड करतोय. स्त्रिया पाश्चिमात्य पेहरावात बाजारहाट करतात. अथलिट, पायलट, रेल्वे लोको पायलट होतात. कलावंत म्हणून प्रसिद्धी मिळवत आहेत. मुस्लिम तरुण विद्यापीठं, रिसर्च लॅब, प्रशासकीय कार्यालयं, नोकरदार, आमदार-खासदार झाला. उद्योजक होऊन लाखोंना रोजगार देतोय. शहरातल्या उच्चभ्रू सोसायटीत थ्री-बीचकेमध्ये राहतोय. मीडिया हाऊस सांभाळतोय. सुपर-डूपर हीट सिनेमे दिग्दर्शित करतोय. सुपरस्टार होऊन जगावर राज्य करतोय. महिला-पुरुष आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरताहेत. पब ऑर्केस्ट्रा, जीम, क्लब सारख्या आधुनिक म्हणवणाऱ्या शानशौकी पाळतोय. मुस्लिम मराठी साहित्य मात्र यापासून कोसो दूर आहे.

ग्रामीण निमशहरी भागातलं समाजकारण व अर्थकारण बदललं तसं राहणीमानात प्रचंड बदल झाला. पठाणी कुडता व टोपीतला मुस्लिम आज बहुसंख्याकांमध्ये नाहीये. क्लीनशेव, सलमान कट, फ्रेंच कट मुस्लिम तरुण बाईकगिरी करतोय. जीएममध्ये तासंतास गाम गाळतोय. मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी धडपडतोय. पण आजही समाजातले मुस्लिम प्रतीकं बदललेली नाहीत. मेनस्ट्रीमला मुस्लिम लांब दाढीत हवाय, महिला डोळेबंद बुरख्यात हवीय.

मेनस्ट्रीम मीडियाने मुस्लिमांना सिम्बॉलमध्ये बंदिस्त केलं. आजही बहुतेक सिनेमात अब्दुल नावाचं कॅरेक्टर ड्रायव्हर आहे. चहावाला बाबूभाईच आहे. इस्माईल हा मटणच विकतोय. सिनेमात मुस्लिमत्व म्हणजे मदिनेचा गुंबद व तसबिर... डोक्याच्या मागच्या बाजूला कलंडलेली टोपी अजूनही सिनेमात दिसतेय. गळ्यातला ताईत २१व्या शतकातही लटकलेलाच दिसतोय. बिर्याणीचे दस्तरखान, झुमर, कमानी, मस्जिदीचे भोंगे आजही ५०च्या दशकातील तपशिलासह मांडली जात आहेत. कधी बदलणार ही सुलभीकरणाची प्रतिमा? वर्षानूवर्षांपासून हीच प्रतिमा मुस्लिम समाज म्हणून रंगवली जात आहे. दुर्दैवाने मुस्लिम मराठी लेखक, विचारवंत सुलभीकऱणाची प्रतिमा तोडू शकले नाहीत.

साचेबंद प्रतीमा

इथल्या व्यवस्थेने मुस्लिम समाजाचं सामान्यीकरण नाकारलं. त्याचं एकजिनसी चित्रण रेखाटलं. त्याला धर्माच्या चौकटीतच पाहिलं. ते आणि आम्ही अशा विभागणी केली. ते टोप्या घालणारे! ते दाढ्या ठेवणारे! ते झब्बे घालणारे! ते बुरखा घालणारे! ते हजला सबसिडी घेतात! ते नमाजसाठी रस्ता अडवतात! ते अमके! ते तमके! कितीतरी आरोप... कोण देणार या मिथकाला उत्तर? कुठं आहे वस्तुनिष्ठ रेखाटन? किती दिवस स्वान्त सुखाय लेखन? कधी संपणार पांढरपेशा प्रतिनिधित्व?

आजचा मुस्लिम बदलतोय. मेनस्ट्रीममध्ये येऊ पाहतोय. सांस्कृतिक अवकाश शोधू पाहतोय. आधुनिक होऊ पाहतोय. कधी रेखाटणार ही प्रतिमा? रोजगारासाठी भल्या पहाटेच बाहेर पडणारा मुस्लिम हात रिक्षावाला, भाजीपाला विकणारा, नऊवारी नेसून धुणं-भांडीसाठी जाणारी मुस्लिम बाई, ब्रेड व कुरकुरे विकणारा सायकलवाल्याला कधी मिळणार  मराठी साहित्यात ‘स्पेस’? पाठीवर कुऱ्हाड घेऊन जाणारा लाकूडतोड्या, भंगारवाला, पंक्चरवाला, गॅजेरवाला आणि बांधकाम मजूराला आहे, का जागा सो कॉल्ड मराठी साहित्यात?

प्रा. फ.म. शाहजिंदे, जावेद कुरैशी, मुबारक शेख, राजन खान यांनी मुस्लिम पात्राला मोहल्यातून उचललं. सामाजिक व राजकीय स्तरावर न्याय देण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात अमर हबीब, एहतेशाम देशमुख, समर खडस, अजीम नवाज राही यांनी भाकरीच्या वेदना सांगणारा मुस्लिम रेखाटला. काही मुस्लिमेत्तर लेखकांनी मुस्लिम पात्रांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. बाकी मुस्लिमेत्तर साहित्यिकांनी सुप्त राजकीय मेख मारली. ती आजतागायत कथित प्रस्थापित साहित्यिक शोधू शकले नाहीत.

प्रा. फ.म. शाहजिंदे, एहतेशाम देशमुख अशा मुस्लिम मराठी साहित्यिकांनी पांढरपेशा, भांडवलदार व बुर्ज्वा वर्गाचे प्रतिनिधित्व साहित्यातून रेखाटलं. पण अलीकडे सर्व काही आलबेल आहे, या अविर्भावात बहुतांशी लिखाण सुरू आहे. मध्यंतरी समाजाचा सुधारवाद बाजूला ठेवून दहशवादाच्या भितीतून बरेचसे लिखाण झालं. परिणामी भाकरीच्या वेदना सांगणारं लिखाण बाजूला पडलं. बंडखोरी, विद्रोह साहित्यातून कोसो दूर निघून गेला. सामाजिक सोहार्दाचं वातावरण तयार करणारं लिखाण अदृष्य होत गेलं.

रफिक जकेरिया, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, अनवर राजन, अलीम वकील, अब्दुल कादर मुकादम, अमर हबीब, रजिया पटेल, हुमायून मुरसल यांनी गंगा-जमुनी संस्कृती, सामाजिक सलोखा, सहजीवन, संमिश्रता वृद्धिंगत करणारं लेखन केलं. असगर अलींनी इस्लामचा उदारमतवाद मांडला.

समर खडस यांचं ‘बकऱ्याची बॉडी’ बदलत्या सामाजिक परिस्थितीवर चपखल भाष्य करणारं समकालीन पुस्तक आहे. अज़ीम नवाज राही यांचं कल्लोळातील एकांत, ऐहतशाम देशमुख यांचा अजान व इतर कथासंग्रह दखलपात्र होती. पण अनेक लेखकांनी फुले-पाकळ्याच्या सुवासात रमणं पसंत केलं. अलीकडे कवितांमध्ये प्रतिकांचा भंकसपणा आलेला दिसतो. फ.म. शहाजिंदेसारख्या कविता आता लिहिल्या जात नाहीत. मुसलमानांचं सुलभीकरण व सहजीकरण करणारी प्रतिकं कवितेत अतिक्रमित झाली आहेत.

२०१४च्या सत्ताबदलानंतर देशातील मुस्लिम समाजाचं जगणं संकटात आलं. मागास मुस्लिम धर्मांध हिंदुत्व राजकारणाचा बळी ठरला. मॉब लिचिंग, गोगुंडाचा उत्पात, अमानवीकरण, मीडिया ट्रायल, जिहाद, घरवापसी, रामजादे, जयश्रीराम, मंदिर-मस्जिद, हिंदू-मुस्लिम इत्यादींनी समाजाचे राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक उद्ध्वस्तीकरण झालं. पक्षपात वाढीस लागला. विरोधी राजकारण, सामाजिक हल्ले, द्वेषभावना, तुच्छतावाद फोफावला.

गेल्या १० वर्षात इस्लाम फोबिया प्रचंड प्रमाणात वाढला. मुस्लिमद्वेष पराकोटीला पोहोचला. मुस्लिम राजकारणाची वासलात लागली. मागास, ओबीसी मुस्लिम ब्राह्मणी हिंदुत्वाचा बळी ठरले. पण साहित्यिक मात्र आपल्या कोशातच रमले. वैचारिक लेखकांनी वेळोवेळी भूमिका घेतली. व्यवस्थेला प्रश्न विचारले. पण साहित्यिक?

आज भाजप-संघाच्या धर्मांध राजकारणाने जनमाणस बदलला. सहजीवन धोक्यात आणलं. हजारो वर्षाची संस्कृती मोडकळीस आली. या स्थितीला काहीअंशी लेखकही जबाबदार आहेत. कारण त्यांनी लोकसाक्षरता व प्रबोधन सोडलं. अगतिक होऊन गप्प झाले. निरुत्तर झाले. वर्तमान राजकारणात कुठलाही हस्तक्षेप घडवू शकले नाहीत. या भयानक परिस्थितीला राजकीय नेतेच नव्हे, तर हे ‘सो कॉल्ड’ साहित्यिकही तेवढेच जबाबदार आहेत.

बदलत्या काळात अशा सामाजिक व लोकशिक्षण देणाऱ्या साहित्याची आज गरज आहे. पण आजचं बरेचसे मुस्लिम मराठी साहित्य प्रतिकांमध्ये अडकलेलं दिसते. नवलेखकांना अभ्यासाची बैठक नाही, निरक्षण नाही, व्हर्च्युअल मीडियाचा आहारी गेलेला तरूण आज कमेंटी व लाईका मोजण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा नाही, पण जे लिहीत आहेत, त्यांनी तरी किमान सकस लिखाण करावं.

आज तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या कक्षा वाढल्या आहेत. फेसबुकसारखं पर्यायी सशक्त मीडिया उभा राहिला आहे. यावर बरेच नवलेखक उत्तम प्रबोधनाची मांडणी करणारे लेखन करता येऊ शकते. पण त्याची लागण सोडून बाहेर पडलं तर ते शक्य आहे. दुसरीकडे वैचारिक लिखाणात मोठी पोकळी निर्माण होत आहे. त्यामुळे ज्वलंत प्रश्नांवर बोलणारे व लिहिणारे मुस्लिम मराठी लेखक तयार होण्याची गरज आहे. येत्या काळात मुस्लिमांची आर्थिक, सामाजिक व राजकीय स्तर घसरण्याची चिन्हे आहेत. भाजपने मुस्लिमांचं दानवीकरण करून त्यांचं अस्तित्व संपवण्याचं कारस्थान सुरू केलं आहे. त्यामुळे वैचारिक लेखन व लेखकाची जमात वाढणे महत्त्वाचं आहे.


कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: प्रतिकांचं साहित्यकारण किती दिवस?
प्रतिकांचं साहित्यकारण किती दिवस?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh4suDj3q24B9xZrs2o5baJNyH-Avspry07e3KMAOaQjbJmOucChxeNSdTnHG1XNvAv3PcLl2cis0kzCSDtlt9-XEiz3WvZu5fibL0G-QxE14FNCluWj4JZyyQymV2bsYcJ6UmzOPlq4rni/s640/22851953_2025503697683439_8972366700646511440_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh4suDj3q24B9xZrs2o5baJNyH-Avspry07e3KMAOaQjbJmOucChxeNSdTnHG1XNvAv3PcLl2cis0kzCSDtlt9-XEiz3WvZu5fibL0G-QxE14FNCluWj4JZyyQymV2bsYcJ6UmzOPlq4rni/s72-c/22851953_2025503697683439_8972366700646511440_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2017/11/blog-post_15.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2017/11/blog-post_15.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content