SIR भारतीय लोकशाहीतील काळा अध्याय : एस.वाय. कुरैशी


एस. वाय. कुरेैशी १९७१च्या बॅचचे IAS अधिकारी राहिले आहेत. त्यांनी २००७-१२ या काळात केंद्रीय निवडणूक आयुक्त (तीन वर्षे) व मुख्य निवडणूक आयुक्त (दोन वर्षे) म्हणून वैशिष्ट्यपूर्ण काम केले आहे. निवृत्तीनंतरही ते स्पष्ट व रोखठोक भूमिका घेत आले आहेत. ५ व ६ सप्टेंबर २०२६ रोजी भुवनेश्वरला ‘ओडिशा साहित्य संमेलन’ (OLF) पार पडलं. त्यात ‘India And I : Evidence of a Democracy in Action’ या सत्रात ज्येष्ठ पत्रकार कावेरी बामझाई (Kaveree Bamzai) यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरैशी यांच्याशी संवाद साधला. द न्यू इंडियन एक्स्प्रेस या यूट्यूब चॅनेलवर तो 30 मिनिटांचा व्हिडिओ उपलब्ध आहे. ती मुलाखत शब्दांकन व अनुवाद करून इथे प्रसिद्ध करीत आहोत.

कावेरी बामझाई : श्री. कुरैशी, तुम्ही इथं आला, त्यामुळे आनंद झाला. तुम्ही एक अतिशय चांगले सनदी अधिकारी आहात. मला वाटतं की, अतिशय कठीण प्रसंगीही सचोटी आणि प्रामाणिकपणा जपणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात.

मला सुरुवात अशा एका विषयाने करायची आहे, जो कदाचित थोडा वादग्रस्त वाटू शकतो. पण सद्यस्थितीत खूप महत्त्वाचा आहे. आज भारतातील सार्वजनिक जीवनात एक मुस्लिम असणं, हे किती आव्हानात्मक किंवा कठीण आहे?

एस.वाय. कुरैशी : किती कठीण? हा शब्दच खूप अवघड आहे. परंपरेने भारत हा जगातील सर्वांत धर्मनिरपेक्ष देश आहे. माझ्या आयुष्यातील सर्व मान-सन्मान मला हिंदूंच्या हातून मिळाले. मी अनेकदा म्हटलं आहे की, भारत धर्मनिरपेक्ष आहे, कारण येथील बहुसंख्य हिंदू धर्मनिरपेक्ष आहेत. या संदर्भात अनेकांनी मला प्रश्न केला की तुम्ही असं कसं म्हणू शकता? मी म्हणेन की, स्वातंत्र्यकाळात भारताचं धार्मिक आधारावर विभाजन झालं. त्यावेळी पाकिस्तानने इस्लामिक रिपब्लिकची निवड केली. आपण सहजपणे हिंदू प्रजासत्ताकची निवड करू शकलो असतो. पण संविधान सभेने एकमताने धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला. माझ्यासाठी ही कदाचित गरज असेल, पण देशासाठी ती निवड होती. त्यामुळे भारताचा मूलभूत स्वभाव धर्मनिरपेक्ष आहे, यात शंका नाही. पण सध्या हा शब्द अस्वस्थ करणारा ठरत आहे. कारण आज त्यावर संकट आलेलं आहे. पण मला निश्चितच आशा आहे की ही तात्पुरती अवस्था आहे, शेवटी भारताचा आत्मा पुन्हा उभारी घेईल. त्यातून धर्मनिरपेक्षता तथा विविधता पुनरुज्जिवीत होईल.

वाचा : SIR : ज्ञानेश कुमार देशाचे गुन्हेगार आहेत...

वाचा : SIR प्रक्रिया राज्यघटनेची फसवणूक

प्रश्न : निश्चितच! मला वाटतं की यासाठी टाळ्या वाजवायला हव्यात. मला तुम्हाला सुरुवातीच्या काळात घेऊन जायचं आहे. तुमचं कुटुंब जुन्या दिल्लीत पाच शतकांपासून आहे. या कुटुंबाला फारसी, इंग्रजी आणि अरबी भाषेतील विद्वत्तेची परंपरा लाभली आहे. त्याविषयी थोडसं सांगा.

उत्तर : आमच्या कुटुंबातील सर्वजण धार्मिक विद्वान, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. माझ्या आजोबांपासून प्रत्येक पिढीतील व्यक्तीने ४०, ५०, १०० पुस्तकं लिहिली असतील. परंतु माझे वडील या परंपरेला छेद देणारी पहिली व्यक्ती होती. त्यांनी दिल्लीच्या ‘सेंट स्टीफन्स कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. त्याला त्यावेळी ‘मिशन कॉलेज’ म्हटलं जात. त्यामुळे आमच्या कुटुंबावर एक प्रकारचा सामाजिक बहिष्कारच टाकला गेला. इतकं धार्मिक कुटुंब आणि त्यांचा मुलगा ख्रिश्चन कॉलेजमध्ये जातोय, हे काय चाललं आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. पण वडिलांनी कुटुंबातील इस्लामिक परंपरा आणि प्रगत विचारसरणी व आधुनिक शिक्षण यांच्यात एक दुवा साधला. ते शिक्षण क्षेत्रात आले. त्यांनी इंग्रजी व्याकरणाची शाळा सुरू केली. त्यांनी दिल्लीतील मुस्लिमांच्या तीन पिढ्यांना शिक्षित केलं.

मला अजूनही तिथं आलेल्या पालकांचं वडिलांशी झालेलं संभाषण आठवतं. पालक आपल्या मुलांच्या शिकवणीसाठी येत, तेव्हा वडील म्हणायचे, “मी तासाला १०० रुपये घेईन.” म्हणजे ते दररोज एक तास शिकवायचे आणि महिन्याअखेर १०० रुपये घ्यायचे. एवढंच नाही, जर दोन विद्यार्थी असतील, तर प्रत्येकी ५० रुपये. जर १० विद्यार्थी असतील, तर प्रत्येकी १० रुपये घ्यायचे. शिकवणीला ५० विद्यार्थी यायचे आणि प्रत्येकाला फक्त दोन रुपयेच द्यावे लागायचे. जास्त विद्यार्थी आणल्यास खर्च कमी पडेल, असं वाटून लोक अधिकाधिक मुलांना तिथं आणतील, अशी त्यांची त्यामागची कल्पना होती. कारण तो भाग दरिद्र्याने ग्रस्त होता. त्यांच्यामुळेच जुन्या दिल्लीतील अनेक मुस्लिमांना शिक्षण मिळालं. शिक्षणाबद्दलच्या माझ्याही आवडीमुळे मी एक व्याख्याता म्हणून सुरुवात केली. त्यानंतरच्या माझ्या कार्यकाळातही मी शिक्षणावरच विशेष भर दिला.

प्रश्न : तुम्ही ‘नॅको’, ‘दूरदर्शन’ आणि ‘निवडणूक आयोगा’त स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिथं संवाद नेहमीच महत्त्वाचा मानला. ‘राष्ट्रीय मतदार दिन’सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. तुम्ही नेहमीच नियमांचं पालन केलं. पण त्याचा अन्वयार्थ लावण्याची तुमची पद्धत कदाचित आधीच्या अधिकाऱ्यांपेक्षा थोडी जास्त उदार होती. त्याबद्दल थोडे सांगा.

उत्तर : तुम्ही परिचयात माझ्या सचोटीविषयी बोलला, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. खरं सांगायचं तर प्रामाणिकता चर्चेचा किंवा वादाचा विषय ठरावा, हीच अस्वस्थ करणारी बाब आहे. कारण आपण सर्वांनीच प्रामाणिक असणं अपेक्षित असतं, तो गुण आपल्यामध्ये असायला हवा. आमच्या काळात अधिकारी सेवेत रुजू व्हायचे, तेव्हा त्यांचं वय साधारणपणे २१ ते २४ च्या दरम्यान असायचं. त्या वयात माणसावर अनेक बाबींचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे जर आपण सुरुवातीच्या ५ वर्षांत सचोटी जपली, तर ती पुढील ३५ वर्षे ती सोबत राहते.

पहिली पाच वर्षे अत्यंत निर्णायक असतात. कारण तो असा काळ असतो जेव्हा तुम्हाला स्वतःचं महत्त्व खूप जास्त वाटू लागतं. अचानक, कुठूनतरी तुम्ही एक मोठे अधिकारी होता आणि मग तुमच्याभोवती खुशामतखोर व लाळघोटे लोक जमा होतात.

सर्व नोकरशहांना अशा खुशमस्कऱ्या वृत्तीचा सामना करावा लागतो. काहीजण मोहात पडतात, तर काही त्यामागील स्वार्थ ओळखतात. या खुशामतीमागचं वास्तव ओळखून त्यापासून अलिप्त राहणं खूप महत्त्वाचं असतं. खरं तर ही पाच वर्षे तुम्हाला खूप काही शिकवणारी व प्रभावित करणारी असतात. माझ्या पुस्तकात एक प्रसंग नोंदवला आहे. नम्रतेचा पहिला धडा मला एका माळ्याकडून मिळाला.

वाचा : भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे : एस.वाय कुरैशी

वाचा : ‘सांगकाम्या तयार करणारी आजची शिक्षण व्यवस्था’ : नेहा बोरा

वाचा : प्रत्येकाने दररोज लोकशाही जगली पाहिजे : आशुतोष रांका

प्रश्न : माळी? खरोखरच छान आहे. तुम्ही त्यावेळी जिल्हाधिकारी होता ना!

उत्तर : माझी पहिली नियुक्ती सोनीपतला ‘एसडीएम’ म्हणून झाली. ब्रिटिशांनी उभारलेल्या अतिशय सुंदर बंगल्यात मी राहत होतो. अविवाहित होतो. पण, त्या घरचा मालक असल्यासारखा वागत होतो. तिथं एक वृद्ध व हडकुळा माळी होता. जो अतिशय सावकाश आपली कामं करत. त्यामुळे मी वैतागून त्याला ओरडलो. त्याने हात जोडून मला उत्तर दिलं, “सर, आप मेरे २८वे डीएम हैं।”

कदाचित हे वाक्य दुसऱ्या कोणाच्या डोक्यावरून गेलं असतं. पण मला त्याचा संदेश समजला. तो मला सांगत होता, “तुमच्या आधी २७ एसडीएम होऊन गेले, तुम्ही २८वे आहात आणि उद्या २९वा येईल. तुम्ही कोण आहात? तुम्ही स्वतःला काय समजता?” त्याने मला आयुष्यभरासाठी एक मोलाचा धडा दिला. त्याचा उपयोग मी माझ्या नोकरीच्या काळात प्रत्यक्ष केला. जिल्हा कार्यालयात जाता, तेव्हा अधिकाऱ्याच्या मागे एक फलक दिसतो.

प्रश्न :  कोणता अधिकारी? खुर्चीवर पांढरा टॉवेलही असतो, हो ना? तुम्ही तो वापरला का?

उत्तर : थांबा, तो माझं लक्ष दुसरीकडे वळवेल, पण...

प्रश्न : मला नंतर तुम्हाला विचारायलाच हवं, हा पांढरा टॉवेल का असतो? [हशा]

उत्तर : मी त्या टॉवेलकडेही परत येतो. [हशा] तो फलक नेहमी आणि सर्व ठिकाणी अधिकाऱ्याच्या मागे असतो. जिथं जाईन तिथं तो फलक माझ्या डोळ्यांसमोर राहील याची मी काळजी घेतली. कारण तो मला स्मरण करून देतो की, तुमच्या आधी ४० लोक या खुर्चीवर बसून गेले आहेत. त्यामुळे मी नीट वागलं पाहिजे. तो त्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याला आठवण करून देतो. त्याचा मला खूप चांगला उपयोग झाला. त्यामुळेच पद कितीही मोठे किंवा लहान असलं तरी त्याचा माझ्यावर परिणाम होऊ दिला नाही. माझं मानसिक संतुलन टिकवून ठेवलं.

पांढऱ्या टॉवेलबद्दल सांगायचं तर, तो कुठून आला हे मला माहीत नाही. कदाचित उत्तर भारतातील हवामानामुळे असेल. तिथं बीडीओ, जिल्हाधिकारी, एसपी आणि प्रत्येकाच्या खुर्चीवर पांढरा टॉवेल असतो. मी जिथं-जिथं गेलो, त्यावेळी म्हणायचो, “कृपया तो काढून बाथरूममध्ये ठेवा. इथं त्याची गरज नाही.” म्हणजेच हवामानामुळे बहुधा सुरू राहिलेल्या या मूर्खपणाच्या प्रथेपैकी ही एक आहे.

प्रश्न : तुम्ही तुमच्या सर्व नियुक्त्यांबद्दल बोलता, तेव्हा तुम्ही एक बाब वारंवार सांगता, ते म्हणजे तुम्हाला मिळालेलं मार्गदर्शन; मग ते एस.के. मिश्रा असो किंवा सुषमा स्वराज यांच्याकडून! तुमचं नाव प्रत्यक्षात याकूब आहे. श्रीमती स्वराज तुम्हाला पहिल्या नावाने हाक मारायच्या?

उत्तर : अलीकडेच मला एक रंजक गोष्ट कळली. श्रीमती स्वराज माहिती व प्रसारण मंत्री होत्या. त्यांनी मला दूरदर्शनचं महासंचालक म्हणून नेमलं. त्यावेळी त्यांना त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली, ते त्यांनी मंत्र्यांची नावं घेऊन सांगितली, “तुझको कोई और नहीं मिला, एक मुसलमान को लेकर आई हैं।” त्यांनी शाहिद सिद्दीकी नावाच्या माझ्या एका पत्रकार मित्राला हे सर्व सांगितलं. त्याच्याकडून मला हे कळलं. [हशा]

श्रीमती स्वराज यांनी म्हटलं, “इस तरह लोग कहते थे। मैंने उन मंत्रियों से पूछा, याकूब! मुझे तो मालूम ही नहीं, वह मुस्लिम हैं?” ही त्यांची भावना होती. त्या एक विलक्षण महिला होत्या. निःसंशयपणे, माझ्या कार्यकाळातील त्या सर्वोत्तम मंत्र्यांपैकी एक होत्या.

एस.के. मिश्रा यांच्याविषयी सांगायचं तर, मिश्रा हे या शतकातील सर्वात प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांपैकी होते. ते हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. बन्सीलाल यांचे मुख्य सचिव होते. बन्सीलाल त्यांच्या काळातील अतिशय शक्तिशाली मुख्यमंत्री होते. त्यांनी संपूर्ण अधिकार श्री. एस.के. मिश्रा यांच्याकडे सोपवले होते. मिश्रा यांनी पहिल्याच भेटीत एक अशी गोष्ट सांगितली जी माझ्या मनावर कायमची कोरली गेली. ते म्हणाले, “मोठे अधिकारी तर तुम्ही आहात आणि सरकार तुमच्याकडून आपलं काम करून घेईलच. पण मला वाटतं की तुम्ही एक अत्यंत सक्षम आणि हुशार अधिकारी आहात. त्यामुळे, तुम्ही पदभार सोडताना ते पद तुम्हाला मिळालं होतं, त्यापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत सोडून जावं. तुम्ही नेहमीच काहीतरी भरीव वारसा (legacy) मागे ठेवला पाहिजे.”

ही बाब माझ्या मनावर ठसली. त्यांनी स्वतः शून्यातून ‘हरियाणा टुरिझम’ची उभारणी केली. ‘सुरजकुंड क्राफ्ट मेला’, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ (NIFT) किंवा ‘मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स’ सारख्या संस्था उभ्या केल्या. जिथं-जिथं गेले, तिथं एक उत्कृष्ट अधिकारी असण्याबरोबर त्यांनी आपली स्वतंत्र छाप पाडली. मीही तसंच करण्याचा प्रयत्न केला. हे काही फार जाणीवपूर्वक केलं असं नाही, पण ती माझी एक सहज सवय होऊन गेली. उदाहरणार्थ, १९७२ मध्ये प्रशिक्षणार्थी असताना मी मौलाना अल्ताफ हुसैन हाली यांच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. एकदा ‘आर्काईव्हज’ (अभिलेखागार) किंवा संस्कृती विभागाच्या संचालकांकडून एक पत्र आलं. ते सोनिपतच्य कवीवर पुस्तक लिहीत होते. त्यांनी प्रसिद्ध कवी हाली यांच्याविषयी माहिती मागवली होती. तेव्हा मी हालींबद्दल एक परिच्छेद लिहून पाठवला. ते खूप प्रसिद्ध कवी होते, वगैरे असा साधारण पाच-सात ओळींचा मजकूर होता.

पण मला वाटलं की ‘हाली’ (Hali) यांना अधिक चांगल्या प्रकारची ओळख मिळायला हवी. मी विचार करू लागलो की यासाठी काय करता येईल. मग मी एक द्विभाषिक पुस्तक तयार केलं. त्यात हाली यांचे विविध पैलू मांडले. जसं एक तत्त्वज्ञ, लेखक, कवी, स्त्रीमुक्तीचे उद्धारक आणि भाषेतील साधेपणाचा पुरस्कार करणारे व्यक्तिमत्त्व, असं सर्व काही. हे पुस्तक माझं एक कायमस्वरूपी योगदान ठरलं आहे. डॉ. सय्यदा हमीद (कवी हालींच्या वंशज व नियोजन आयोगाच्या माजी सदस्या) या पुस्तकाबद्दल आवर्जून बोलतात. त्यांना ते पुन्हा प्रकाशित करायचं आहे.

तुम्ही कार्यक्षम अधिकारी असाल, तर आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण निर्मिती करणं महत्त्वाचं असतं. मुख्य निवडणूक आयुक्त या माझ्या शेवटच्या पदावरील कार्यकाळातील चार महत्त्वाच्या कामगिरींबद्दल सांगताना मला खूप आनंद होईल.

पहिली बाब म्हणजे, मी जनसंपर्क संचालक (Director of Public Relations) म्हणून निवडणूक आयोगात रुजू झालो. माझ्या लक्षात आलं की शहरी भागात मतदानाची टक्केवारी खूपच कमी होती. मला हे मान्य नव्हतं. मला मतदारांमध्ये जागृती करणारा विभाग (voter education division) सुरू करायचा होता. तेव्हा माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं की, “हे काम तुझ्या कार्यकाळात कर; मतदारांना शिकवणं किंवा जागृत करणं हे आपलं काम नाही.” मी म्हणालो, नाही, हे मला मान्य नाही, कारण मतदानाची अल्प टक्केवारी तुमच्या वैधतेवर (legitimacy) प्रश्नचिन्ह निर्माण करते. तुम्ही केवळ १० टक्के मतं मिळवूनही निवडणूक जिंकू शकता, त्याचा अर्थ ९० टक्के लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं नसतं. त्यामुळे तुमच्या निवडीच्या वैधतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून, मी योग्य वेळेची वाट पाहिली. तोपर्यंत चार वर्षे वाया गेली. त्यानंतर मी ‘मतदार शिक्षण विभाग’ (Voter Education Division) स्थापन केला.

४ ऑक्टोबर २०१० रोजी झालेल्या पहिल्याच निवडणुकीत इतिहासातील सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं. त्यानंतर देशाने कधीही मागं वळून पाहिलं नाही. प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढत गेली. हा एक महत्त्वाचा वारसा आहे.

दुसरा लढा, निवडणुकीतील धनबलाच्या प्रभावाविरुद्ध होता. त्यासाठी आयकर विभागाच्या महासंचालकासोबत मी ‘खर्च संनियंत्रण विभाग’ (Department of Expenditure) स्थापन केला. त्या महासंचालकाचं नाव पी.के. दास होतं. ते ओडिशाचे आहेत. दास एक अतिशय चांगले अधिकारी होते. तिसरा वारसाही ओडिशात - भुवनेश्वरमध्ये जन्माला आला. मी एका नागरी समाजाच्या सभेला संबोधित करत होतो. त्यावेळी प्रेक्षकांमधील कोणीतरी हात वर केला. त्याने म्हटलं, “१८ वर्षे हे एक विशेष वय आहे, ते साजरं केलं पाहिजे.” मला ते विधान खूप आवडलं. आपण विचार करूया असं ठरवून, मी त्वरित डॉ. भगवान प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली. डॉ. भगवान प्रकाश माझे मित्र, मार्गदर्शक आणि एक सज्जन व्यक्ती आहेत.

मी त्यांना काहीतरी नवीन उपक्रम सुरू करण्याची विनंती केली. त्यातूनच ‘राष्ट्रीय मतदार दिन’ ही संकल्पना आकारास आली. मुळात हा दिवस सुरू करण्यामागचा उद्देश तरुण मतदारांची नोंदणी वाढवणं हा होता. कारण त्यावेळी १८ ते २३ वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी केवळ १२ ते १३ टक्केच होती. त्यामुळे आम्ही ‘राष्ट्रीय मतदार दिन’ सुरू केला. हा दिवस कधी साजरा करायचा? तर २५ जानेवारीला. २५ जानेवारीच का? कारण भारत प्रजासत्ताक होण्याच्या एक दिवस आधी ‘भारतीय निवडणूक आयोगाची’ स्थापना झाली होती, ही बाब फारशी कोणालाच माहित नव्हती. घटनाकारांनी निवडणुकीच्या प्रक्रियेला दिलेलं ते महत्त्व होतं. त्यामुळेच हा दिवस साजरा केला पाहिजे, असं ठरलं. अशा प्रकारे ‘राष्ट्रीय मतदार दिन’ सुरू झाला. तो दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने लाखो-कोट्यवधी नवयुवक-युवती मतदार म्हणून आपली नोंदणी करतात. हा तिसरा वारसा!

चौथा म्हणजे, मी ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट’ (IIDEM) नावाची संस्था २०११ ला स्थापन केली. साधारण ६ महिन्यांपूर्वी ही संस्था खूप चर्चेत आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितलं की ते भारतीय निवडणुकांसाठीचा निधी थांबवत आहेत. हा दावा पूर्णपणे निराधार होता. कारण आम्ही कोणत्याही देशाकडून कधीही एक रुपयाही घेतला नव्हता. वास्तविक, आम्ही ही संस्था स्थापन करण्यासाठी ‘इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्शन सिस्टिम्स’ (IFES) या संस्थेबरोबर सामंजस्य करार (MOU) केला होता.

वास्तविक, IFES ही एक अशासकीय संस्था आहे. तिला USAID कडून निधी मिळतो. १५० देशांमध्ये ती कार्यरत आहे. माझ्या निवृत्तीच्या १३ दिवस आधी मी हा करार केला होता. कराराचं स्वरूप असं होतं की, मी ही संस्था स्थापन करेन आणि जगभरातील निवडणूक आयुक्तांना प्रशिक्षण देईन. हे प्रशिक्षण मोफत असेल, पण त्यांचा प्रवास व निवास खर्च संबंधित देशांनीच करावा लागेल.

मला हे सांगताना खूप आनंद होतो की, त्या संस्थेत १४३ देशांच्या निवडणूक आयुक्तांनी प्रशिक्षण घेतलं आहे. ट्रम्पच्या सदरील घोषणेनंतर सामंजस्य करारावर टीका झाली. ‘नेशन वाँट्स टू नो’ म्हणणाऱ्या एका अँकरने कराराच्या प्रती हवेत हलवत म्हटलं, “निवृत्तीच्या १३ दिवस आधी करार करून कुरैशी यांनी भारताच्या हिताशी तडजोड केली.” १३ वर्षांपासून हा करार चालू आहे, मग का बंद केला नाही? उलट संस्थेचं कौतुकच होत होतं, कारण एस.वाय. कुरैशी व एस.के. मिश्रा यांच्या प्रेरणेने जगभरातील लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं. जगातील जवळपास ८० टक्के लोकशाही देशांना त्याचा फायदा झालेला होता.

प्रश्न : पण सध्याच्या निवडणूक आयोगाबद्दल बोलायचं झालं तर, त्याबाबत तुम्हाला काही चिंता वाटते का?

उत्तर : नक्कीच, खूपच चिंता वाटते. त्याच काळजीमुळे तुम्ही मला हा प्रश्न विचारत आहात. कारण मी त्या पदावर होतो. त्यामुळे कदाचित माझा दृष्टिकोन काहींसाठी पूर्वग्रहदूषित वाटू शकतो किंवा माझ्या नंतर आलेल्या लोकांना असूया वाटू शकते.

वाचा : विज्ञानात एका तासाने मागे पडणं, १०० वर्षांसाठी घातक : गौहर रज़ा

वाचा : लोक बोलते झाले, हेच आमच्या चळवळीचं यश : अभिजित दिपके

प्रश्न: ज्ञानेश कुमार यांना?

उत्तर : कोणी काहीही म्हणो, पण तुम्ही हा प्रश्न विचारत आहोत, यावरूनच हे स्पष्ट होतं की त्यांच्याबाबत काहीतरी शंका नक्कीच आहेत. निश्चितच, निवडणूक आयोगाने भारताच्या लोकशाहीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. हा भारताच्या लोकशाहीवरील सर्वात काळा अध्याय आहे. भारतातील ३३ टक्के लोकांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. एक तृतीयांश लोक आता मतदार राहिलेले नाहीत. कृपया त्यांनी बांगलादेशला जाण्यासाठी तयार राहावं. हे सर्व ढोंगी आणि अप्रामाणिकपणाचं लक्षण आहे. हा प्रकार दुष्ट आणि कपटी आहे. मी हे जाहीरपणे सांगतो.

बिहारमध्ये या प्रक्रियेची (SIR) सुरुवात झाली तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं? घुसखोरांची ओळख पटविण्यासाठी हे केलं जात आहे. अर्थातच, घुसखोर पकडले पाहिजे; त्यांना पकडून केवळ बांगलादेशातच नाही, तर थेट परलोकात पाठवलं पाहिजे, मीही योग्य कृती केली असती. ८ कोटी लोकांची पडताडणी करण्यात आली. पण किती घुसखोर पकडले, हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. अगदी सुप्रीम कोर्टानेही विचारलं नाही. मी वृत्तपत्रात वाचलं की ५०० परदेशी नागरिक आढळले. ८ कोटी लोकांना संकटात टाकून केवळ ५०० परदेशी शोधले; त्यापैकी १५० बांगलादेशी होते. शिवाय ३५० हिंदू महिला होत्या, ज्या लग्न करून नेपाळहून भारतात आलेल्या होत्या. हीच ती कामगिरी! आता पुन्हा १०० कोटी लोकांना पुन्हा छळलं जात आहे. कृपया आम्हाला सांगा की तुम्ही किती घुसखोर पकडले? जर तेच कारण होतं, तर आता जे काही घडत आहे, ते काय? भारताच्या लोकशाहीचं अपहरण करणं इतकं सोपं झालं आहे? संपूर्ण व्यवस्था व संपूर्ण देश मूकपणे पाहत आणि सहन करत आहे.

प्रश्न : इतकंही शांत नाही. मला वाटतं की ‘सीजेपी’च्या आंदोलनांमुळे राष्ट्रीय जाणीव जागृत होण्याची सुरुवात झाली. तुम्हालाही तसंच वाटतं का?

उत्तर : हो, तो एक आशेचा किरण होता. कारण जे काही घडत आहे, त्यात काही आशेचा किरण दिसेल का?, असं मी अनेकांना विचारायचो. त्यात बुद्धिजीवी, पत्रकार आणि इतर सूज्ञ होते. त्यांचं उत्तर नेहमीच नैराश्यमय असे. म्हणायचे, “नाही, यात कोणताही आशेची किरण नाही.” पण ही आंदोलने नक्कीच आशेची चिन्ह ठरली. निदान नवतरुणांनी देशातील भीतीचं वातावरण दूर केलं. हे काही सोपं काम नव्हतं. आपण ‘पोलीस राज्या’त (police state) जगत आहोत, अशी स्थिती निर्माण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच हे दिसून आलं. एका अधिकाऱ्याला (आशिष जोशी भारत सरकारचे माजी अतिरिक्त सचिव आहेत. काहीच महिन्यापूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यांच्या ट्विटर पोस्टचा सबब पुढे करत ३ सप्टेबर २०२६ रोजी त्यांना पोलिसांनी उचललं होतं.) मॉर्निंग वॉक करत असताना ताब्यात घेण्यात आलं.

प्रश्न : चौकशीसाठी?

उत्तर : हो, चौकशीसाठी. मी नुकतंच वाचलं की, पोलिसांच्या चौकशी यादीत नजीब जंग यांचंही नाव आहे. नजीब जंग प्रमुख असलेल्या एका टीममध्ये मीदेखील आहे. कदाचित एक दिवस ते माझ्याकडेही येतील. मलाही ताब्यात घेतील?

प्रश्न : अशाच स्थितीत, तुम्ही आणि इतर मुस्लिम बुद्धिजीवी मोहन भागवत यांची भेट घेत आहात. तुम्ही म्हणता की संवाद साधणं गरजेचं आहे. त्याबद्दल थोडे सांगा.

उत्तर : होय. वास्तविक, मोहन भागवत यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मी नेहमीच या भेटीची पाठराखण केली आहे. एकदा नव्हे, तर तीन वेळा आम्ही भेटलो. लोकांची अशी समजूत होती की, त्यांनी आम्हाला बोलावलं. त्यामुळे असा गैरसमज होऊ शकला असता की भागवत आम्हाला त्यांच्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तसं अजिबात नव्हतं.

आम्हीच त्यांना पत्र लिहिलं होतं की, “भागवतजी, तुम्ही दिल्लीला येत असता, तर पुढच्या भेटीत आम्हाला कृपया थोडा वेळ देऊ शकाल का?” आम्हाला मुस्लिम समुदायाविरोधात होणारे झुंडहल्ले आणि अत्याचारांविषयी चर्चा करायची होती. अशा घटना, ज्यांचं अस्तित्व सरकार नाकारू इच्छिते. हामिद अन्सारी म्हणतात की भारतीय मुस्लिमांना असुरक्षित वाटतं. तेव्हा प्रतिप्रश्न होतो की “तुम्ही असं कसं म्हणू शकता?” जणू तुम्ही त्यांच्यावर बंदूक रोखून धरली आणि तरीही विचारत आहात की त्यांना असुरक्षित का वाटतंय! अर्थातच त्यांना असुरक्षित वाटत आहे. दररोज द्वेषमूलक घटना घडत आहेत. कोणत्याही वर्तमानपत्रात त्या पाहता येतील. वरीष्ठ नेत्यांनी उन्मादींना शिकवलं आहे की कपड्यावरून ओळखा. त्यामुळे दाढी दिसली किंवा टोपी घातलेली दिसली की त्यांना मारहाण केली जाते.  हे वारंवार घडत आहे. तरीही हे हल्ले नाकारले जातात. मग त्यांची अपेक्षा काय आहे? तर, प्रश्न काय होता?

प्रश्न : भागवत यांनी तुम्हाला काय सांगितलं?

उत्तर : त्यांनी आम्हाला लगेच वेळ दिला. भेटीत त्यांनी सांगितलं, “हिंदू राष्ट्र तर आम्ही होतो, आहोत आणि राहू.” त्यांनी आणखी एक बाब सांगितली, “आम्हाला तुमच्या, म्हणजे मुस्लिमांविषयी, फक्त दोन तक्रारी आहेत. एक, तुम्ही गायीची कत्तल करता, बीफ खाता.” आम्ही उत्तर दिलं. संपूर्ण देशात बीफ बंदी आहे. दोन-तीन राज्यात ती नाही, तर तिथंही घाला. आम्ही तर ७० वर्षांत कधीही बीफ सेवन केल्लं नाही. खाद्य परिषदेला जातो, तेव्हा आम्हाला विचारलं जातं आणि आपोआप आमच्या मुखातून निघतं, “नो पोर्क, नो बीफ.” हे सवयीचं झालेलं असल्याने आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही.

दुसरी तक्रार त्यांनी सांगितली, ती म्हणजे ‘काफिर!’ आम्ही त्यांना समजावून सांगितलं की, ‘काफिर’ हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ श्रद्धा बाळगणारा असा होतो. म्हणजे काय? मी म्हणतो की, अल्लाह एक आहे आणि मुहंमद त्याचे प्रेषित आहेत, अशी श्रद्धा आहे. जर तुमची त्यावर श्रद्धा नसेल, तर अरबी भाषेत तुम्ही काफिर (अश्रद्ध) ठरता. त्यात अपमानाचा संबंध नाही. पण तो अवमानास्पद वाटत असेल आणि आम्ही तो बदलू.

मग आम्हीही म्हटलं की, “आमचीही तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. तुम्ही आम्हाला जिहादी म्हणता, पाकिस्तानी म्हणता. आम्हालाही खूप वाईट वाटतं.” ते म्हणाले, “हेसुद्धा बरोबर नाही.” त्यानंतर हिंदू राष्ट्राचा विषय निघाला. आम्ही विचारलं, “हिंदू राष्ट्र कल्पनेत मुस्लिमांचं काय स्थान असेल?” त्यांनी सांगितलं, “मुस्लिमांशिवाय हिंदू राष्ट्राची कल्पनाही होऊ शकत नाही.” हे खूप आश्वासक विधान होतं.

दुसरी शंका आम्ही त्यांना विचारली, “तुम्ही राज्यघटना बदलणार का?” ते म्हणाले, “असा प्रश्नच निर्माण होत नाही.” हीदेखील खूप आश्वासक बाब होती.

मग त्यांनी वारंवार सांगितलं, “जनमानस बदलण्यासाठी वेळ लागेल, कारण मंदिर तोडलं, धर्मांतर घडविले, याविषयी समाजात विष खोलवर भिनलेलं आहे. ते बदलायला वेळ लागेल.” लोक आम्हाला म्हणतात, “त्यांनी तर सांगितलं, पण प्रत्यक्ष जमिनीवर तर काहीच बदल दिसत नाही.” पण त्यांनीच आम्हाला आधी सावध केलं होतं की, “हे सहज घडणार नाही.”

विहिंप आणि बजरंग दलाचा उल्लेख निघाला, त्यांनी सांगितलं, “ही आमचीच अपत्य आहेत. पण ती आता आमच्यापेक्षा मोठी झाली आहेत आणि आमच्या नियंत्रणात नाहीत.” उलट ते म्हणतात, “ज्या दिवशी मी मुस्लिमांच्या बाजूने बोलतो किंवा निरपेक्ष विचार सांगतो, त्यावेळी माझ्यावर हल्ले होतात. म्हटलं जातं, यांना काढून टाका...” त्यांनी आम्हाला काही व्हिडिओही दाखवले, त्यातून त्यांनी म्हटलेलं खरं वाटत होतं.

त्यामुळे मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की, त्यांचा हेतू चांगला आहे. त्यांना हे करायचं आहे. त्याच वेळी प्रश्न असा आहे की, त्यांचं हे उद्दिष्ट आणि त्यांच्या कल्पना स्वयंसेवकापर्यंत का पोहचत नाहीत? यावर तातडीने काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण भारतात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी योग्य नाही.

एकदा मी परराष्ट्र सेवेतील एका सहकाऱ्याला विचारलं, “मित्रा, भारतात जे काही घडत आहे, त्याची जगाला माहिती असेल?” ते म्हणाले, “साहेब, दिल्लीत इतके राजदूत बसलेले आहेत. दिवसभर ते हेच तर करतात, भरभरून अहवाल पाठवतात. सर्वांना माहीत आहे.” अशा स्थितीत आपण भारताची प्रतिष्ठा बळजबरीने चांगली करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी न पटणारं बोललं तर ते परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप आहे, असं म्हणणं तर्कसंगत नाही.

आपण आपल्या जागतिक प्रतिष्ठा आणि प्रतिमेबाबत; विशेषतः विविधता जोपासणारी लोकशाही म्हणून असलेल्या आपल्या प्रतिमेबाबत अत्यंत सावध आणि जागरूक राहणं गरजेचं आहे. आपण जगातील सर्वाधिक वैविध्य जपणारा देश आहोत. या संदर्भात इतर कोणताही देश आपली बरोबरी करू शकत नाही. या गौरवशाली बहुलतेला ‘एकसाची’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे, जो चांगला नाही.

प्रश्न : तुम्ही मोदींनाही भेटला होता?

उत्तर : नाही, त्यांना भेटलो नव्हतो. लोक विचारतात, “त्यांना का भेटला नाहीत?” त्यांना भेटणं कठीण आहे. आम्ही तर भेटायला तयार आहोत. योग्य मार्ग असा होता की, आधी इकडं (भागवत) भेटावं आणि नंतर तिकडं! ज्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होतं, त्यांना आम्ही भेटलो. आम्हाला वाटलं की, आरएसएस हे सर्व प्रकारच्या धर्मवादाचं मूळ आहे, त्यामुळे त्यांच्याशीच बोलावं, आमच्या मते हा मार्ग योग्य होता. पण मोदीजी आम्हाला भेटले, तर नक्की भेटू आणि त्यांच्याकडे तक्रार करू की जे काही घडत आहे, ते बरोबर नाही. त्यांच्याकडून एक वाक्य जरी आलं तर सर्व सरकारे सरळ होतील. सर्व मुख्यमंत्री, सर्व डीजीपी यांना फक्त एका वाक्याची गरज आहे. पण त्यांच्याकडून कोणतं विधान आलं, “कपड्यांवरून ओळखा.” हे चालणार नाही. त्यानंतरही त्यांचं कौतुक करत राहायचं की, ‘ते चांगले आहेत.’ बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिक असलं पाहिजे.

प्रश्न : आजच्या काळात आयएएसमधील मुस्लिम अधिकाऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल?

उत्तर : सांगणं खूप कठीण आहे. सर्वात आधी टिकून राहा. असं काहीही करू नका ज्यामुळे तुम्हाला अडचणीत आणलं जाऊ शकेल. तसंही योग्य पदं मिळणं कठीण झालं आहे. भारत सरकारमध्ये सध्या किती मुस्लिम सचिव आहेत? कदाचित एकही नसेल. एखादा असलाच तर तो फारसं महत्त्व नसलेल्या खात्यात असेल. त्यामुळे, टिकून राहा. तुमचं काम प्रामाणिकपणे करा. विचलित होऊ नका. शक्य तेवढ्या प्रामाणिकपणे व सदसद्विवेकबुद्धीला जागून आपला सल्ला देत राहा.

प्रश्न : माझी इच्छा होती की श्री. कुरैशी यांनी आज गिटार वाजवावी. पण पत्नीच्या निधनामुळे ते दुखवट्यात आहेत. पण, ते एक उत्कृष्ट गिटारवादक आहेत. अकादमीत असताना त्यांचा ‘गिबाल्डी अँड हिज थ्री हेअर्स’ नावाचा बँड होता. तुमच्या आयुष्यात संगीताचं स्थान अजूनही किती महत्त्वाचं आहे? तुम्ही अजूनही गिटार वाजवता का? तुम्ही संगीत ऐकता?

उत्तर : हो, मला वाटतं, संगीत हा एक उपचार (थेरपी) आहे. संगीत अत्यंत महत्त्वाचं आहे. ते माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्यासोबत राहिलं आहे. मी माझ्या किशोरवयीन मनाला कधीच मोठं होऊ दिलं नाही. कॉलेजच्या दिवसांत माझा जो ‘बीट ग्रुप’ होता, तो आजही टिकून आहे. फरक एवढाच की त्यातील सर्व सदस्यांचं वय ८०च्या आसपास आहे. आमचे मुख्य गायक शिवशंकर मेनन आहेत, जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. आमच्या अतिथी गायिका निरुपमा राव आहेत. गृहसचिव असलेले मधुकर गुप्ता आमचे ड्रमर आहेत. थोडक्यात, या ग्रुपमधील सदस्यांचं वय वाढलं असलं तरी आमची आवड मात्र अजूनही चिरतरुण आहे.

प्रश्न : खूपच छान. श्री. कुरैशी, तुम्ही नेहमीच एक अत्यंत सभ्य गृहस्थ आणि उत्तम अधिकारी राहिला आहात, त्याबद्दल तुमचं खूप-खूप आभार. आपण त्यांच्या पुस्तकाचा नक्कीच प्रसार केला पाहिजे. त्यांच्या नवीन पुस्तकाचं नाव ‘इंडिया अँड आय : १०० मेमरीज, नॉट ए मेमॉयर’ आहे. हे फक्त  आत्मचरित्र नाही. वाचायला खरोखरच खूप आनंददायी आहे.

तुमचं खूप आभार.

शब्दांकन व अनुवाद :

कलीम अज़ीम, पुणे

(साप्ताहिक साधनेत १९ सप्टेबर २०२६ रोजी प्रकाशित झालेली मुलाखत)

वाचनीय

Name

अनुवाद,10,इतिहास,57,इस्लाम,45,किताब,27,जगभर,132,पत्रव्यवहार,4,राजनीति,321,व्यक्ती,35,संकलन,65,समाज,278,साहित्य,82,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: SIR भारतीय लोकशाहीतील काळा अध्याय : एस.वाय. कुरैशी
SIR भारतीय लोकशाहीतील काळा अध्याय : एस.वाय. कुरैशी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEimLdltvMFXMiHQAenOXj62cRPjc1czaFEgMOYAf2sj_6A28qgcIcqmnQQxIVi935TibaVjLK2onODgjzWQXtV-9Gu_XBIrQ8fNLe5fdiRgoX2TStFLfJKL1kWQqCQ6Q5IJ6CVaA3PUPayMqffQGL7BIpAyCdq3tipFZP8k2p4I09ZuijKTslZYQUMO9aYu/w640-h390/791419085_1727854726013434_3992790096452124081_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEimLdltvMFXMiHQAenOXj62cRPjc1czaFEgMOYAf2sj_6A28qgcIcqmnQQxIVi935TibaVjLK2onODgjzWQXtV-9Gu_XBIrQ8fNLe5fdiRgoX2TStFLfJKL1kWQqCQ6Q5IJ6CVaA3PUPayMqffQGL7BIpAyCdq3tipFZP8k2p4I09ZuijKTslZYQUMO9aYu/s72-w640-c-h390/791419085_1727854726013434_3992790096452124081_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2026/09/sir.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2026/09/sir.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content