वली रहमानी: श्रीमंताचं महागडं शिक्षण गरिबांना देणारा अवलिया


ली रहमानी हा २५ वर्षाचा बंगाली तरुण आहे. कोलकाता शहरात राहतो. राजकीय विश्लेषक व भाष्यकार म्हणून तो भारताला परिचित आहे. वयाच्या १७व्या वर्षी तो पब्लिक स्पीकर म्हणून जगभरात ख्यातकीर्त झाला होता. त्याचा अभ्यास, मांडणी, विश्लेषण, युक्तिवाद श्रोत्यांना मंत्रगुमग्ध करून सोडतात. बंगाली, हिंदी, उर्दू, इंग्रजी अस्खलित बोलणारा हा तरुण आघाडीच्या न्यूज चॅनेलवरील प्राइमटाइम डिबेटमध्ये फॅसिस्ट प्रवृत्ती, सांप्रदायिकता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक सालोखा इत्यादी विषयावर प्रभावी मांडणी करतो. त्याची भाषणं यूट्यूब असो की सोशल मीडिया, व्हॉट्सएपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

आपली लोकप्रियता तसंच इंटरनेट व सोशल मीडियाचा रचनात्मक कार्यासाठी त्याने वापर केलेला आहे. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने कोलकाता शहरात अनाथ मुलांची निवासी शाळा स्थापन केली. त्याच्या शाळेसाठी १५०० विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत. पण पर्याप्त संसाधने व जागेअभावी तो त्यांना प्रवेश देऊ शकत नाही. त्यासाठी त्याने प्रस्तावित शाळेचा आराखडा मांडून जनतेला निधीची मागणी केली. प्रत्येकांनी केवळ १०० रुपये द्यावीत. माझी अपिल १० लाख लोकांपर्यंत पोहचवा त्यातून १० कोटी रुपये संकलित होईल, असं आवाहन त्याने केलं. आश्चर्य म्हणजे केवळ सहा दिवसात तब्बल ६,००,००,०००चा (सहा कोटी) निधी त्याने संकलित केला.

१५ सप्टेबर २०२३ ते २० सप्टेबर २०२३ या पाच दिवसांच्या कालावधीत त्याने हा निधी उभा केला आहे. त्याची जडणघडण, कारकीर्द व रचनात्मक कार्य तथा दूरदृष्टीचा आढावा घेणारी ही मुलाखत उल्लेखनीय आहे. २०१९च्या साधनेच्या बाल दिवाळी अंकात वली रहमानीवर एक लेख केला होता. आता युवा दिवाळी अंकासाठी त्याची मुलाखत करीत आहोत.

 (सदरील मुलाखत हिंदी-इंग्रजी वाचण्यासाठी क्लिक करा)

कलीम अज़ीम: सर्वप्रथम वली रहमानी, आपलं… ‘उम्मीद अकेडमी’ आणि तुमच्या टीमचं अभिनंदन... तुम्ही फक्त सहा दिवसात तब्बल सहा कोटी रुपये लोकनिधीतून संकलित केली आहेत. लोकांना तुम्ही शिक्षणासाठी पैसा मागितला तो त्यांनी सढळ हाताने दिला. कल्पनेच्या पलीकडे तुम्ही कामगिरी करून दाखवली आहे. अनेक लोकांना तुमचा हा उपक्रम आवडलेला दिसत नाही... अनेकांनी तुम्हाला ट्रोल केलं आहे. तुमच्यावर टीका केली. मुलाखतीला सुरुवात इथूनच करूया..

तुमच्यासाठी टीका किंवा ट्रोलिंग नवं नसेल. कसं सामोरे जाता तुम्ही या सर्व परिस्थितीला?

वली रहमानी: खरंच, तुम्ही म्हणता ते माझ्यासाठी नवीन नाही. मागे एकदा फेसबुकवर भावना दुखावणारे काही शब्द माझ्या ओठातून निघाले होते. मीही माणूस आहे. कधी-कधी एखाद्या व्यक्तीच्या तोंडून अनावधानाने लोकांसाठी अप्रिय असलेली शब्द निघू शकतात. त्यातून जनसंवेदना दुखावू शकते. स्वाभाविक लोकांनी मला प्रचंड ट्रोल केलं. ही तीच लोक होती, जी काही क्षणापूर्वी माझ्या भाषणाने प्रचंड प्रभावित व्हायची, माझं भरभरून कौतुक करायची, बळ द्यायची, माझ्या विधानावर टाळ्य़ा वाजवायची, त्यांनीच आता मला ट्रोल करणं सुरू केलं होतं. मला त्यांच्या शेरेबाजी व टीकेचा खूप त्रास झाला. मी डिप्रेशनमध्ये गेलो.

माझ्या एक फीमेल फ्रेंड होत्या. त्यांनी मला फार मोठा आरसा दाखवला. त्या म्हणाल्या, “तुम्ही व्यथित का होता?” म्हणालो, “ही लोक मला शिव्या देत आहेत.” त्यांनी म्हटलं, “ही आयुष्यभर स्मरणात ठेवणारी बाब आहे. एकेकाळी त्यांच्या वाहवाहीवर तुम्ही आनंदी झाला. त्यामुळे त्यांच्या शेरेबाजीमुळे आज तुम्ही दुखी होत आहात? तुम्ही त्यांची स्तृती किंवा टाळ्यावर आनंदी झाला नसता आणि आपल्या कामावर फोकस केलं असतं तर आज त्यांच्या ट्रोलिंगचा तुमच्यावर परिणाम झाला नसता.” त्यांच्या या बोलण्याने मी आत्मचिंतनाला प्रवृत्त झालो. मला जाणीव झाली. त्यांचं बोलणं माझ्यासाठी दीशादर्शक धडा होता. इथून पुढे कोणी माझी प्रशंसा केली किंवा मला शिवी दिली तरी मला त्याविषयी आनंद किंवा दु:ख होता कामा नये, असं मी ठरवून टाकलं. कोणी स्तृती केली तरी ठीक, टीका दिली तरी ठीक.. आता मला माझ्या कामाशी कर्तव्य आहे. त्या क्षणापासून आजपर्यंत माझा हाच अंमळ राहिला आहे. जर कोणी टाळ्या वाजवल्या तरी मी हुरळून जात नाही, कोणी कौतुक केलं तरी त्याचा मनावर खोलवर परिणाम होत नाही किंवा कोणी टीका केली तर वाइट वाटत नाही, शिवी दिली तरी आघात होत नाही.  

प्रश्न : पुढचा प्रश्न तसा औपचारिक आहे. आजच्या तरुणांचे सर्वांत मोठे युथ आयकॉन वली रहमानी यांचा जन्म कुठे झाला, बालपण कसं गेलं आणि शिक्षण कुठे-कुठे झालं?

उत्तर : युथ आयकॉन म्हणणं खूप मोठी बाब आहे. तुम्ही फार मोठा शब्दप्रयोग माझ्यासाठी केला आहे. मी तर एक सामान्य मनुष्य आहे. रचनात्मक काम करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या कुवतीत जे शक्य होईल ते काम करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

माझा जन्म जून, १९९८ साली कलकत्ता शहरात झाला. शालेय शिक्षण शहरातील सेंट जेम्स स्कूलमधून पूर्ण केलं. तिथं मी दहावीपर्यंत होतो. त्यानंतर नोयडा येथील ‘जेनिसिस ग्लोबल स्कूल’मधून अकरावी-बारावी केली. ते एक इंटरनॅशनल स्कूल होतं. त्यानंतर ‘हमदर्द विद्यापीठा’तून मी विधीशास्त्रात एलएलबी केलं. तुकतंच चार महिन्यापूर्वी मी माझं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आता मी ग्रॅजुएट झालो आहे.

प्रश्न : तुम्ही ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आला आहात, तिथं रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असेन.. या सर्व परिस्थितीत स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी तुम्ही काय वेगळी तयारी केली होती.

उत्तर : लोक सांगतात तसं काही नव्हतं. माझे वडिल शफीउद्दीन साहेबांनी खूप श्रम आणि कष्ट उपसून स्वतचा मोठा उद्योग-व्यवसाय उभा केला होता. त्यांचं दारिद्र्य, श्रम आणि कष्टाचा काळ, माझ्या जन्मापूर्वीचा होता. किंबहुना ज्या वर्षी मी जन्मलो तोपर्यत दारिद्र्यता होती. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझे वडिल बिहारी आहेत. बिहार राज्यातील एका छोट्याशा गावाचे ते निवासी आहेत. १९८० साली रोजगाराच्या शोधात कोलकाता शहरात स्थलांतर करून आले.

त्यांना इथं जे पहिलं काम मिळालं, ते हातरिक्षा चालवण्याचं होतं. रिक्षावर चामड्याचं सामान लादून एका फॅक्ट्रीहून दुसऱ्या फॅक्ट्रीकडे घेऊन जात. छोटसं काम असल्याने त्यांना सतत आर्थिक चणचण जाणवायची. त्यात त्यांनी प्रचंड श्रम घेतले, कष्ट केलं. वेगवेगळी कामं केली. त्यांचं दारिद्र्य संपलं व आर्थिक स्थिती पालटली. त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. घरात सधनता आली. त्यांनी शिक्षणासाठी मला इंग्रजी मीडियमच्या सर्वोत्तम शाळेत पाठवलं. शिक्षणावर विशेष लक्ष दिलं. उत्तम पालनपोषण केलं. सत्कार्याने आत्मिक समाधान लाभतं असं ते नेहमी म्हणत. आम्हा भावंडांना आपल्या द्रारिद्र्य व मेहनतीच्या काळाविषयी सांगत. आम्हाला श्रम व कष्टाची जाणीव करून देणं, हा त्यांचा उद्देश होता. काय-काय भोगलं हे त्यांच्याकडून नेहमी ऐकायला मिळायचं. दरिद्री, बेकारी, उपासमार काय असतं, उपाशी राहणं काय असतं हे आम्हा भावंडाना कळत गेलं.

प्रश्न : २०१७ साली तुमचा पहिला यूट्यूब वीडियो प्रचंड व्हायरल झाला होता. त्याची कल्पना तुम्हाला कशी आली?

उत्तर : अकरावी-बारावीच्या काळात मी तो वीडियो तयार केला होता. त्यावेळी मी उत्तर प्रदेशमध्ये शिकत होतो. तेथील बदललेल्या राजकीय स्थितीची मला चिंता वाटत होती. मनात भिती व अनिश्चितता होती. धर्मांध राजकारणात श्रमिक, गरिब व निराश्रितांच्या स्वप्नाची होळी होताना दिसत होती. मनाला प्रचंड वेदना होऊ लागल्या होत्या. हीच चिंता, काळजी व वेदना माझी अभिव्यक्ती झाली. फार काही विशेष तयारी केली नव्हती. दरिद्र्यता, गरीबीविषयी असलेली करुणा, चिंता व वेदनांना मी वाट मोकळी करून दिली. बसं इतकंच!

प्रश्न : तुम्हाला राजकीय नेता व्हायचं होतं. तुम्ही खूप कमी वयात राजकीय प्रगल्भेचा विचार मांडला. तुमच्या चर्चा किंवा भाषणं पाहिली तरी त्यात खूप मोठा आशय आढळतो.

उत्तर : एक काळ असा होता की, जेव्हा मला वाटत होतं की, पॉलिटिक्समध्ये जाऊन देशाची स्थिती बदलली जाऊ शकते. पॉलटिक्समध्ये राहून काही रचनात्मक करता येईल, असं वाटत होतं. हेच कारण होतं की, मी डिबेटमध्ये जाऊ लागलो. न्यूज चॅनेलच्या प्राइमटाइम चर्चेचा भाग झालो. पॉलिटिक्सवर बोलू लागलो. मी जाहीरपणे सांगू लागलो की, २०४० पर्यंत मला देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे. माझ्या या सर्व स्पीचेस ऑन रेकॉर्ड आहेत. माझं बोलणं, भाषणं ऐकून लोक टाळ्या वाजवत. प्रोत्साहन, उत्तेजन देत. त्यांच्या कौतुकाने मला एनर्जी मिळे. माझ्यात उत्साह संचारे. परंतु आता माझा तो विचार बदलला आहे. आता ती स्थिती राहिली नाही.

वर्तमान स्थितीत पॉलिटिक्सची डेफिनेशन बदलत गेली आहे. राजकीय वर्तन-व्यवहाराचं स्वरूप पालटलं आहे. काळ सरत असता तुमचे विचार व तुम्ही प्रगल्भ होऊ लागता. नवीन विचार आत्मसात करू लागता. नवनवीन विचारसरणी तुम्ही स्वीकारता. त्यातून तुम्ही वेगळं विचार करू लागता. सामाजिक विषयावर चिंतन वाढू लागतं तेव्हा तुम्हाला कळतं की, तमूक विचार योग्य नव्हता. मी असा विचार करायला नको होता. तसा विचार करायला पाहिजे. त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने विचार करू लागलो. मला सद्यस्थितीची जाणीव झाली. माझ्यासाठीदेखील आता राजकारणाची व्याख्या बदलली आहे.

पॉलिटिक्सची डेफिनेशन ही नाही तुम्ही स्वतला लीडर घोषित करा. असं म्हणणारा माझ्या दृष्टीने सर्वांत खोटारडा मनुष्य आहे. जो स्वत: सांगतो की, मला लीडर व्हायचं आहे, तुम्ही त्याला अजिबात लीडर करू नका. उत्तम नेतृत्वगुण असलेला कधीही सांगत नाही की मला नेतृत्व द्या. त्याच्या मनातही तशी सुप्त इच्छा बळावता कामा नये. त्याने फक्त स्तत:मध्ये लीडरशिपच्या क्वालिटीज डेव्हलप करायला हव्यात.

माझ्या मते, नेतृत्व क्षमतेचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. पहिलं तर तुम्ही एक चांगला माणूस म्हणून स्वत:ला घडवा. तुमच्या कामात परफेक्ट व्हा. जे काही करीत आहात, त्यात परफेक्शन मिळवा. उत्कृष्टतेच्या अती उच्च पातळीवर पोहोचा. दुसरं म्हणजे सेवाकार्य! तुम्ही सतत गरजू लोकांची सेवा करीत राहा. जी सेवाकार्य करत आहात, त्यात तुमच्याऐवढी सेवा कोणीही केलेली नसावी. लोकासाठी काम करीत राहा. ही दोन कार्य केली तर कोणीही लीडर होऊ शकतो. मग तुम्हाला सांगावं लागणार नाही की, मी पुढारी आहे किंवा मला लीडर व्हायचं आहे.

तुम्हाला इच्छा बाळगण्याचीसुद्धा गरज नाही, नसता तुम्ही पुन्हा वाहवत जाणार. तुमचं कार्य पाहून लोक स्वतहून तुमच्याकडे येतील व म्हणतील हा आमचा नेता आहे. मला जाणवलं की, पोगंड वयात मी जे म्हणत होतो, ते बरोबर नाही. मला आता प्राइम मिनिस्टर व्हायचं नाही. तर मला सेवाकार्य (खिदमत) करायचं आहे. देश व त्यात राहणाऱ्या जनतेची सेवा करायची आहे. देशासाठी उत्तम नागरिक घडवायचे आहेत. मला माझ्या कामात सर्वश्रेष्ठ व्हायचं आहे. जे काही कार्य मी करत आहे, त्या माध्यमातून मला जनतेची सेवा करायची आहे. सर्वाधिक सेवाकार्य करायचं आहे. जेव्हा मी हे करू शकलो, तेव्हा लोक येतील व म्हणतील तुम्ही आमचे लीडर आहात. जर कोणी म्हटलं नाही तरी नो प्रोब्लेम! सेवाकार्य करत करत जगातून निरोप घेईन.

प्रश्न : तुमच्या प्राइमटाइम डिबेट लोकांवर प्रचंड प्रभाव टाकतात. त्यात अनेक पुस्तकाचे दाखले, युक्तिवाद, सुविचार असतात. दैंनदिन व्यस्ततेत वाचनासाठी वेळ कसा काढता?

उत्तर : मला वाटतं की तुम्ही माझ्या जुन्या वीडियोविषयी बोलत आहात. त्याला तीन साडे तीन वर्षे लोटून गेलेली आहेत. आता मी खूप पुढे आलो आहे. आता ती जुनी बाब झालेली आहे.

प्रश्न : हा प्रश्न यासाठी गरजेचा आहे, तुमच्या भाषणाच्या क्लिप प्रचंड व्हायरल होतात. देशभरात लोक आवडीने ते ऐकतात व फॉरवर्ड करतात.

उत्तर : मी अनेक कार्यक्रमांना जात असतो. लोक, संस्था बोलवतात. तिथं विषयानुरुप बोलत असतो. त्यासाठी अर्थातच वाचन करतो. अवांतर वाचत असतो. नोट्स काढतो. दररोज किमान एक ते दीड तास तरी वाचनासाठी राखीव असतो. हे मी नियमित करतो.

प्रश्न : तुम्ही इंटरनेटवर नोटिसेबल व्हायरल होत असता. खूप कमी वेळात तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून ख्यातकीर्त झाला आहात. एक मिलीयन पेक्षा अधिक तुमचे फॉलोअर्स आहेत. कमी वयात इतकी मोठी प्रसिद्धी तुम्हाला लाभली. त्याच्याशी डील कशी केली, कसं वाटलं तुम्हाला?

उत्तर : सुरुवातीला खूप मजा आली. पब्लिसिटी कोणाला नको असते. आम्ही माणसं आहोत. प्रत्येक मनुष्याला लोकप्रियता पसंत आहे. प्रत्येक व्यक्ती प्रसिद्धीच्या स्वानंदात बुडून जातो. जर ती कमी वयात भेटली तर मनुष्य विचलित होण्याची शक्यता जास्त असतात. तो प्रसिद्धीला सर्व विश्व कवेत आल्यासारखं समजतो. पब्लिसिटीच त्याच्यासाठी सारं काही होऊन जातं. पण मला योग्य वेळी अल्लाहने घाव मारला. खुदाने प्रत्येक वेळी मला सांगितलं की, तुला जी प्रसिद्धी मिळाली आहे, ती तत्कालिक आहे. ती काही दिवसांची मेहमान आहे आणि त्यातून काहीही फायदा होणार नाही. शेवटी तुमचं काम असो की सत्कार्य; तेच तुमच्या कामी येईल. जेव्हा अल्लाहशी भेट होईल तेव्हा प्रसिद्धी कामी येणार नाही. मी जगात काय कल्याणकारी व हितकारी कार्य केले, काय सेवा केली, किती सत्कार्य केलं, इतरांच्या आनंदासाठी किती त्याग केला, हेच माझ्या उपयोगी येईल. हेच कारण होतं की, खूप कमी वेळात प्राप्त झालेल्या प्रसिद्धीने मी हुरळून न जाता सावरलो आणि रचनात्मक कार्याला लागलो.

प्रश्न : तुम्ही गोदी मीडियात विरोधी गटातील मोठ्या-मोठ्या धुरीणांना मात दिली आहे. त्यांच्या एककल्ली गोंगाटातही तुम्ही तुमचं म्हणणं अगदी शांतपणे मांडत होता. खोट्या व फसव्या प्रचाराला वेळोवेळी सडेतोड उत्तर दिलं. आजच्या या दरबारी मीडियात तुम्ही सत्य आणि असत्यात किती अंतर पाहता?

उत्तर : मला वाटतं आजचा मीडिया खोटारडा आहे. एक वेळ होती, जेव्हा लोक प्रसिद्धीमाध्यमावर सर्वाधिक विश्वास ठेवत होती. आज तर खरं आणि खोटं यातील अंतराची रेषा मिटली आहे. मला खरं आणि खोट्यात काहीही फरक जाणवत नाही. चोहीकडे असत्याचा बाजार मांडलेला दिसतो, फसगत, दिशाभूल दिसते. सर्व लोक विकले गेलेले आहेत. हे राष्ट्राच्या पतनाचं एक भयाण दृष्य आहे.

आम्ही सर्व मूक होऊन पाहत आहोत की राष्ट्राची अवनती कशा रीतीने होत आहे. जेव्हा पतनाचं उच्च टोक गाठू तेव्हा आम्हाला कळेल की, ही... ही... ही... लोक होती, ज्यांनी देशाला उद्ध्वस्तीच्या मार्गाने नेलं होतं. मीडियाने अविश्वास जन्माला घातला आहे. आज देशात ट्रस्ट फॅक्टर नष्ट झाला आहे. कोणी कोणावर भरवसा करत नाही. तुम्ही आज एकाही बातमीविषयी खात्री बाळगू शकत नाहीत. न्यूज चॅनेल किंवा वृत्तपत्रावर विश्वास ठेवू शकत नाही. देशातील ट्रस्ट फॅक्टर हा प्रसिद्धीमाध्यमाने वाढतो, परंतु तोच मीडिया आज ट्रस्ट फॅक्टरची घसरण करण्यास कृतिशील ठरत आहे. सर्वसामान्य लोकामध्ये संशय बळावत चालला आहे. सामान्य जनतेमध्ये अविश्वास निर्माण होतो, त्यावेळी ते देशाच्या उद्ध्वस्तीकरणाचं चिन्ह असतं.    

प्रश्न : वर्तमान स्थितीत भाजपच्या द्वेषी व फुटपाड्या राजकारणात मुस्लिमांच्या सामाजिक व सांस्कृतिक विकृतीकरणाची एक मोठी मोहीम सुरू आहे. अशा वेळी तुम्ही सोशल मीडिया किंवा जाहीर सभेतून मुक्तपणे बोलत असता. द्वेषी राजकारणाची खबर घेता. या हेटनेसच्या वातावरणात मुस्लिम समुदायाने अगतिकतेतून बाहेर पडण्यास काय करायला हवं?

उत्तर :  भारतात इस्लाम पसरण्याचं एकमेव कारण मुसलमानांचं शुद्ध व निष्कलंक चारित्र्य होतं. तो धर्म खानकाहच्या माध्यमातून पसरला होता. मध्ययुगीन कालखंडात आमच्याकडे अनेक सुफी-संत आले. त्यांनी आपल्या उच्च चारित्र्याचा एक शानदार नमुना सादर केला. ज्यामुळे लोक इस्लामला जाणून घेऊ लागली, त्याला समजू लागली. उच्च-नीच, भेदाभेद, अस्पृष्यतेने नाडललेल्या इथल्या बहुसंख्य समाजाला सुफींच्या निस्वार्थ स्वच्छ चारित्र्याने आकर्षित केलं. आमच्या या बुजुर्गाच्या कृती व व्यवहाराकडे पाहून लोक इस्लाममध्ये दाखल होत होती. तेव्हा मुस्लिमांनी आज आपलं चारित्र स्वच्छ आणि निस्वार्थ ठेवणं गरजेचं आहे. आपल्या सत्कार्याच्या माध्यमातून लोकांची मने जिंकण्याची ही वेळ आहे.

दुसंर म्हणजे मुसलमानांनी देणारा म्हणजे ‘दाता’ झालं पाहिजे. आज देशात मुस्लिमांचा एक मोठा वर्ग ‘घेणारा’ झालेला आहे. मी असं म्हटल्यास कुठलीही अतिशोयक्ती नाही की, आम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीने ‘याचक’ करण्यात आलेलं आहे. नियोजनबद्धरित्या इथपर्यंत आणून सोडण्यात आलेलं आहे. षडयंत्राचा भाग म्हणून आम्हाला मागास ठेवलं जात आहे. अनेक शासकीय, निमशासकीय रिपोर्ट, अभ्यास व सर्वेक्षण अहवालांनी हे अधिक स्पष्ट करून सांगितलं आहे.

या क्षणी हे समजणं अधिक गरजेचं आहे की, आम्हाला देणारे व्हावं लागेल. ज्या दिवशी आम्ही देणारे होऊ त्यावेळी लोक, समाज, देश आम्हाला सन्मान देईल. जे आमचा द्वेश करत आहेत, आम्ही त्यांना देणारे होऊ. म्हणजे देशाचे शानदार डॉक्टर मुसलमान असावेत, सर्वांत दर्जेदार शाळा मुस्लिमांच्या असाव्यात, मुस्लिमांनी विश्वासपात्र हॉस्पिटल्स उभी करावीत, सर्वांत उत्तम कॉलेजेस त्यांनी स्थापन केले पाहिजेत. राष्ट्र उभारणीत आमच्या बुजुर्गांनी मोलाचं योगदान दिलं, पण आज आम्ही काय करत आहोत? राष्ट्र उभारणीत आमचा वाटा काय आहे? सकल उत्पादनात आम्ही कोठे आहोत? अर्थातच आम्ही देणारे झालो तर द्वेश आणि तिरस्कार करण्याची कुठलीच संधी त्यांच्याकडे नसेल. सर्वांत महत्वाचं म्हणजे आमची वाणी सौम्य असली पाहिजे, आमच्या ओठातून एक-एक शब्द असा निघावा, ज्यांनी आम्हाला लोकांची मने जिंकता येतील!

प्रश्न : आज बिघडत जाणाऱ्या पॉलिटिकल कल्चरवर खूप चर्चा होत असते. तुम्हाला अशा राजकारणाविषयी काय वाटतं?

उत्तर : आजच्या राजकारणाविषयी बोलायचं झाल्यास अगदीच खूप पेनफुल स्थिती आहे. सर्वसामान्य लोक पॉलिटिकल पार्टीचे दावे आणि त्यांच्या दिशाभूलतेत स्वत:ला विसरून जात आहेत. दररोज टीवी डिबेटमध्ये जे घडत आहे, आपण सर्वजण पाहत आहोत. तिथं विन्डोमध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षाची लोक बसलेली असतात. चर्चेनंतर बाहेर भांडताना तुम्ही त्यांना कधीही पाहिलेलं नसेल. मी तिथं गेलो आहे, त्यामुळे मला माहीत आहे. विविध राजकीय पक्षाचे प्रवक्ते डिबेटमध्ये एक-दीड तास नुसते भांडत असतात.

कधी-कधी वाटते की, ही लोक एकमेकांचे कठोर वैरी आहेत की काय? परंतु बाहेर पडताच ऐकमेकांसोबत चहापान घेतात. हसत खिदळत राहतात. आपसात मैत्रीचे संबंध राखतात. कारण त्यांना आपली हद्द माहीत असते. त्यांना कळतं की वाद कुठे घालायचा आणि भांडणं कुठे करायची! परंतु त्यांच्या फॉलोअर्सना हे कळू शकलं नाही. ते प्रवक्त्यांचं टीवीचं वर्तन पाहून समाजात विखार पसरवत असतात, लोकांची दिशाभूल करतात. परिणामी ही लोकं स्वतला देशवासी समजण्याऐवजी राजकीय पुढारी समजू लागली आहेत. आज देशात जेवढे राजकीय पक्ष आहेत, तेवढे समाजात गट-तट निर्माण झालेली आहेत. राजकीय पक्षाच्या विचासरणीने अनिश्चितीचं वातावरण देशात तयार केलेलं आहे. ही स्थिती फक्त प्रेमाने बदलता येऊ शकते. द्वेष व घृणा पसरवणाऱ्या शक्तींना पराभूत करूनच ही स्थिती ठीक करता येऊ शकते.

प्रश्न : सध्या तुमची व्यस्तता काय-काय आहे?

उत्तर : एक वेळ अशी आली होती की, मला वाटू लागलं, डिबेटमध्ये जाऊन माझं नाव होतं आहे, प्रसिद्धी मिळत आहे. टिकून राहिलो असतो तर एखादी पॉलिटिकल पार्टीही जॉईन केली असती. पुढे त्याला कंटीन्यू केलं असतं. उमेदवारीही मिळाली असती. पोलिटिकल करियरमध्ये बरंच पुढे गेलो असतो. पण मला वाटू लागलं की, ग्राउंड रियलिटी फार वेगळी आहे. जाणवत होतं की ग्राउंडवर काही बदल घडवू शकलो नाही. मला गरीबांविषयी आस्था होती. गरीबीशी लढा द्यायचा होता. गरीब, निराश्रितांसाठी रचनात्मक काम उभं करायचं होतं. मग मी स्वतची एक निवासी शाळा उघडली. कलकत्ता शहरात ही शाळा आहे. सध्या मी त्याचं संचालन करतो.

प्रारंभी दहा, वीस अशी मुलं वाढत वाढत गेली. आज ३०० विद्यार्थी आहेत. त्या सर्वांना मी दत्तक घेतलं आहे. त्यातील २० टक्के विद्यार्थी अनाथ आहेत. ६० टक्के मुलांचे आई-वडिल नाहीत आणि उर्वरित सर्वजण गरीब आहेत. सर्व विद्यार्थी मला अब्बाजी म्हणतात. मला फादर फिगरच्या जागेवर पाहतात. सध्या मी त्या सर्वांचं पालनपोषण करत आहे. माझा संपूर्ण वेळ या मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या उत्थानासाठी देतो. अजून १५०० विद्यार्थी असे आहेत, जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत. त्यांना माझी शाळा जॉईन करण्याची इच्छा आहे. परंतु माझ्याकडे पर्याप्त जागा नाही. इंफ्रास्ट्रक्चर नाही. आम्ही आता २४ परगणा जिल्ह्यात दोन एकर जागा खरेदी केली आहे. त्यावर स्कूल बिल्डिंग तयार करत आहोत. तिथं रेसिडेन्शियल स्कूल कॅम्पस उभं करणार आहोत. जिथं फुटबॉल, व्हॉलिबॉल आणि बास्केटबॉल कोर्ट असेल. इथं आम्ही श्रीमंताचं महागडं शिक्षण गरीब मुलांना देणार आहोत, इन्शाअल्लाह!

प्रश्न : शिक्षणदानाच्या या सामाजिक कार्यासाठी तुम्ही कसं प्रेरित झाला, तो कोणता क्षण होता ज्याने तुम्हाला या क्षेत्राकडे वळवलं?

उत्तर : चार-पाच कारणं होती. पण त्यातील दोन खूप महत्त्वाची आहेत, जी माझ्यासाठी खरोखरच प्रेरणास्त्रोत ठरली. पहिलं तर माझी टिचर लेनी लेसीवर! त्या माझ्या अकरावी-बारावीच्या शिक्षिका होत्या. त्या २५ वर्ष त्यांनी एका अनाथाश्रमात सेवाकार्य बजावली होती. रिटायरमेंटची वेळ जवळ आली, तेव्हा त्यांना वाटलं की आता जरासे पैसे कमवू या. मग त्यांनी मी शिकत असलेलं प्रतिष्ठित इंटरनेशनल स्कूल जॉइन केलं. परंतु नोकरीला लागल्यावर ६ महिन्यात त्या पुन्हा अनाथालयात परतल्या. त्या आपल्या कामाशी कमिटमेंट होत्या. नव्या वातावरणात फार काळ रमू शकल्या नाहीत. त्यांच्या त्या बांधिलकीमुळे माझ्या मनात कामाप्रती डेडिकेशन व चिंता वाढीस लागली.

दुसंर कारण हाकिम अब्दुल मजीद (१९०८-१९९९) साहेब होते. ते ‘हमदर्द’ हेल्थकेअर प्रॉडक्ट कंपनीचे संस्थापक होते. आपल्या स्वकमाईचे कोट्यवधी रुपये लावून त्यांनी दिल्लीत ‘हमदर्द विद्यापीठा’ची स्थापना केली आहे. त्याच विद्यापीठातून मी विधी शास्त्राचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.

हाकिम साहेब अब्जाधीश मनुष्य होते. त्यांच्याशी नियमित भेटीगाठी असणारे सांगत की, त्यांचे कपडे दोन-तीन ठिकाणी उसवलेले किंवा फाटलेले असत. त्यावर वेगवेगळे ठिगळ चिकटलेली असत. नेहमी अशाच कपड्यात वावरत. मी त्यांच्या जवळच्या लोकांकडून त्यांच्याविषयी खूप ऐकलं होतं. म्हणतात, एखाद्या नवीन व्यक्तीने त्यांना पाहिलं तर त्यास वाटे की हा भिकारी आहे. वाटे की, त्याच्याएवढा गरीब दुसरा कोणी नसेल. त्यांनी आपली सर्व कमाई देश आणि समाजाच्या सेवेसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी लावली. हजारो कोटी खर्च करून मुसलमानांसाठी विशाल इंस्टिट्यूशन उभं केलं. देश व समाजासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. त्यांची मेडिकल उत्पादनही इतरांच्या तुलनेत स्वत व गुणकारी असतात. अब्जाधीश असूनही साधं व दरिद्री अवस्थेत राहिले आणि एक भव्यदिव्य शिक्षण संकूल उभं केलं. त्यांना ओळखणाऱ्यांसोबत मी विद्यापीठात राहिलो आहे. त्यांच्याकडून हाकिम साहेबांचं चारित्र्य व त्यांच्या त्यागाविषयी कळलं. त्यांचं आयुष्य व त्यांच्या साधेपणाने मी खूप प्रभावित झालो. वाटलं की स्वतला देश आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित करावं, जेणेकरून इतरांचं आयुष्य, उज्ज्वल होऊ शकेल.

प्रश्न : ‘उम्मीद अॅकेडमी’चा विचार कसा आणि कधी अस्तित्वात आला?

२०१८मध्ये मी बारावी पास झालो. त्यानंतर इकडे-तिकडे जाऊन भाषणं देत होतो. चॅनेलवर जाऊन प्राईमटाइम डिबेटमध्ये सहभागी होत. जनकल्याणाच्या विषयावर आग्रही मांडणी करीत होतो. लोकांची गरीबी मला पाहवत नव्हती. त्यांची दारिद्र्यता मला त्रस्त करून जात होती. गरीब, निर्धनाविषयी माझ्या मनात आत्मियता व करुणा आहे. मला जाणीव झाली की देशात प्रचंड गरीबी आहे. मी चिंतन करू लागलो ती, ही लोक गरीब का आहेत? मला उमजलं की, हे गरीब यासाठी आहेत की त्यांना अनेक शतकं त्यात ठेवलं गेलेलं आहे. मी पाहिलं की संपूर्ण देशात चॅरिटीचा एक मोठी हेराफेरी चालू आहे. जे बिगरमुस्लिम आहेत, ते चॅरिटीचा व्यापार चालवतात आणि जे मुस्लिम आहेत, त्यांनी ‘जकात’चा बिझनेस सुरू केला आहे. जनभावनेशी खेळून मोठ्या प्रमाणात हा उद्योग सुरू झाला आहे.

आम्ही दर रमजानला चॅरिटी करतो, कारण प्रत्येकांना पुण्य कमवायचं आहे. चॅरिटीने कोणाला काय लाभ झाला, याच्याशी कोणाला कर्तव्य नाही. म्हणजे आम्ही एका गरीबाकडे जातो व त्याला चादर व घोंगड्या देऊन येतो. पुढच्या वर्षी पुन्हा जातो व कांबळी देऊन येतो. त्यानंतर पुन्हा त्यांना काहीतरी दिलं जातं. असंच एखादा गरीब तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही त्याला खायला देता. तो दुसऱ्या दिवशी तो पुन्हा येतो. आम्ही त्याला परत काहीतरी देतो. मी ज्या गरीबाला पैसे दिले, माझ्या वडिलांनी त्याच्या बापाला पैसे दिले, त्याच्या आजोबाला माझ्या आजोबाने पैसे दिले, त्याच्या पंजोबाला माझ्या पंजोबाने पैसे दिले. पण कोणाचीही गरिबी दूर होऊ शकली नाही. अनेक शतकापासून ही रुढ पद्धत आपल्याकडे चालू आहे.

आपल्या देशात तब्बल २० ते ३० टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आम्ही ही स्थिती बदलू शकलो नाही. ही लोक एका रात्रीत गरीब झालेली नाहीत. अनेक पिढ्यापासून ती निर्धन आहेत. त्यांचे वडिल गरीब, त्यांचे आजोबा गरीब, त्यांचा पंजोबा गरीब, खापर पंजोबा गरीब.. माहीत नाही किती पिढ्यापासून ते गरीब आहेत. पिढ्यामागून पिढ्या गेल्या पण त्यांची स्थिती बदलू शकली नाही. मला उमजलं की, जर मी यांना खायला दिलं तर ते पुन्हा येतील. या पिढ्यांना गरीबीतून बाहेर काढायचं असेल तर त्यांना उत्तम शिक्षण दिलं पाहिजे.  

एक इंग्रजी म्हण आहे, “If you give a man a fish, you feed him for a day. If you teach a man to fish, you feed him for a lifetime.” म्हणजे एका माणसाला तुम्ही मासा खायला दिला तर त्याची त्या दिवसाची भूक भागली जाईल. पण जर त्याला माझा कसा धरायचा, हे जर शिकवलं तर आयुष्यभर मासा खायची त्याची सोय होईल. मी त्यांना शिक्षण देत आहे, म्हणजे त्यांना मासा धरण्याची कला शिकवत आहे. ही लोक ७, १०, १५ माहीत नाही किती पिढ्यापासून गरीबीच्या चक्रव्यूहातून अडकले आहेत शिक्षणामुळे त्यातून बाहेर पडण्यास त्यांना मदत होईल. त्यामुळे मी ‘उम्मीद अॅकेडमी’ची स्थापना केली. ही संस्था १ एप्रिल २०१८ रोजी अस्तित्वात आली.

प्रश्न : तुम्ही अनेकदा म्हणता की, ‘उम्मीद अॅकेडमी’चा सिलेबस इतरांपेक्षा वेगळा आहे, काय वेगळंपणा आहे त्यात?

इतर सर्वांपेक्षा वेगळे नाही. पण मी असं म्हणू शकतो की मी ‘गरीबांना श्रीमंतांचं शिक्षण देत आहे.’ हेच आमचं वैशिष्ट्य आहे. सरकारी शाळांमध्ये गेला तर दिसेल की, तिथं बायोलॉजीची पुस्तकं शिकवली जातात. हा हार्टचा डायग्राम आहे, हे हार्ट आहे, या त्याच्या धमन्या आहेत, हे त्यातील चेंबर्स आहेत, वगैरे वगैरे... विद्यार्थ्यांनी हृदयाच्या डायग्रामचा अभ्यास केला आणि परीक्षेत ९० टक्के मार्कही मिळवले. नंतर मानवी हृदयाची एक आकृती त्यांच्या हातात ठेवली आणि विचारलं की हे काय आहे? तो तुम्हालाच विचारेल, मला सांगा हे काय आहे? त्यावेळी तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही का? कारण ९० टक्के गुण प्राप्त करूनही, त्याला मानवी हृदय नेमकं कसं असतं हेच माहीत नाही.

देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये लाखों रुपये घेऊन जे शिक्षण दिलं जातं, तेच शिक्षण मी गरीब मुलांना मोफत देत आहे. विद्यार्थ्यांना ऑडियो, विज्युअलच्या माध्यमातून सांगितलं जातं की, हा हार्ट आहे! तो असा दिसतो. हे त्याचे भाग आहेत. किंबहुना थ्रीडी होलोग्राम त्याच्या डेक्सवर ठेवला जातो. मुले प्रत्यक्ष हार्ट चेंबर पाहतात. हाताने मानवी हृदयाची अनुभूती करून घेतात. धीरूभाई अंबानी स्कूल असो वा इतर प्रतिष्ठित शाळांमध्येही अशा सुविधा आहेत. त्या शाळांची गुणवत्ता कशी गाठायची हा आमचा प्रयत्न राहील.

त्या मागील तत्त्व असं की, श्रीमंत आणि गरिबांचे कपडे वेगळे असू शकतात, त्यांची घरं वेगळी असू शकतात, त्यांची जेवणं वेगळी असू शकतील, त्यांचं राहणीमान वेगळं असू शकतं. परंतु श्रीमंत आणि गरीबांची पुस्तकं आणि शैक्षणिक संस्था भिन्न असू शकत नाहीत. आमच्या स्कूलमध्ये आला तर तुम्हाला दिसेल की, आमची लेसन प्लानिंगची सिस्टिम म्हणजे मॉडर्न टेक्निक ऑफ एज्युकेशन आहे. आमची सर्व साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

आमची प्रत्येक क्लासरूम स्मार्ट आहे. सर्व मुले प्रोजेक्टरवर शिक्षण करतात. लॅपटॉपवर अभ्यास करतात. सर्व शिक्षकांकडे लॅपटॉप आहेत. कला, कौशल्यावर आधारित शिक्षण आम्ही देत आहोत. इन्शाअल्लाह, पुढील वर्षी आम्ही रोबोटिक्स, एआय आणि कोडिंग ही तीन साधने लाँच करणार आहोत. आमचे विद्यार्थी मोठ्या शाळेत जाणार्‍या इतर मुलांपेक्षा मागे राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही मॉडर्न स्कूलचं एक मॉडेल तयार करत आहोत. आमची इच्छा आहे की, प्रत्येक शाळेत असं मॉडेल असावं. गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगळ्या शाळा नसाव्यात, सर्व मुलांसाठी एकसमान शाळा असाव्यात, असं आमचं धोरण आहे.

प्रश्न : अॅकेडमीत इस्लामिक शिक्षणावर जास्त लक्ष पुरवलं जाईल का?

तुमच्या प्रश्नाचा अर्थ मी काय समजू? आम्ही मायनॉरिटी एफीलिएशन घेऊ पाहत आहोत. यासाठी राज्यघटनेच्या कलम १३ मध्ये तरतूद आहे. आम्ही धोरणात्मक स्वरूपात मुस्लिम विद्यार्थ्यांवर काम करणार आहोत. आमच्या शाळेचा पॅटर्न सीबीएसई बोर्ड आहे. सीबीएसई करिकुलमबरोबरच आम्ही मुस्लिम मुलांना इस्लामिक शिक्षणही देत आहोत. इतर विषयांसह कुरआन आणि इस्लाम शिकवतो. हे दोन विषय अतिरिक्त आहेत. विज्ञानाला जितकं महत्त्व आहे, तेवढच कुरआनला दिलं जातं, जितकं महत्व इतिहासाला, तेवढं इस्लामिक स्टडीजला आहे. जेवढं लक्ष हदीसकडे दिलं जातं तेवढेच गणितालाही आहे. आम्ही सर्व विषयांवर फोकस करतो.

आम्ही इस्लामच्या मूल्य शिक्षणावर अधिक भर देतो, जो धर्माच्या पलीकडे जाऊन जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. इस्लामच्या नैतिक शिक्षणावर जोर देतो. चांगला मनुष्य घडवणं हे इस्लामची मौलिक शिकवण आहे, ती आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत नेतो. आमच्या शाळेतील १० टक्के मुले गैर-मुस्लिम आहेत. इस्लामिक स्टडीजचा तास सुरू असतो त्यावेळी ते वॅल्यू एजुकेशनचे धडे घेतात. आम्ही नावाला इस्लामिक स्कूल आहोत, पण आमच्या प्रिन्सिपॉल गैर-मुस्लिम आहेत. रिंकू भट्टाचार्य असं त्यांचं नाव आहे. संस्थेचा कणा असलेले आमचे जनरल मॅनेजर इंडियन आर्मीतून रिटायर झालेले गृहस्थ आहेत. त्यांचं नाव अभिषेक मुखर्जी आहे.

प्रश्न : तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अॅकेडमी विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूती प्रदान करते. त्यासाठी तुम्ही कोणते नवीन प्रोग्रॅम आणले आहेत?

उत्तर : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आम्ही दोन-तीन प्रयत्न करतो. पहिलं तर, विद्यार्थ्यामध्ये चांगले विचार विकसित करतो. सद्विवेक, सद्वर्तनावर आम्ही मुलांशी नियमित बोलतो. आमची जी पहिली असेम्बली भरते त्याचा अजेंडाच विद्यार्थ्यांचं कॅरक्टर बिल्डिंग करणं आहे. आम्ही रोज एकच तत्त्व सांगतो, खोटं बोलू नये, खोटं बोलू नये... खरं बोलावं... खरं बोलावं... प्रामाणिक राहावं... प्रामाणिक राहावं... कुणाबद्दल वाईट चिंतू नये. वाईट चिंतू नये... आठवडाभरानंतर एक विषय असतो.

पुढचं टॉपिक काय असेल, हे महिनाभर आधीच ठरते. या नैतिक शिक्षणामुळे मुलांचं मन आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत होतं. जेव्हा मुलं आमच्याकडे येतात तेव्हा ते खूप अशक्त असतात. १० वर्षांचं मूल ६ किंवा ७ वर्षांचं दिसतं. आम्ही त्यांना दिवसातून तीन वेळा सर्वोत्तम पौष्टिक अन्न देतो. मी स्वतः मुलांसोबत बसून जेवतो. मुले जे खातात तेच मीही खातो. आम्ही मुलांना दूध आणि अंडी देतो. एक-दोन वर्षात मुले त्यांच्या वयाची होती; तशीच दिसतात. इथं येणारी मुलं अतिशय घाबरलेली आणि भीतीच्या वातावरणातून आलेली असतात.

त्यांचं लैंगिक शोषण, मारहाण, छळ झालेला असतो. अशा विद्यार्थ्यांना आम्ही स्वसंरक्षणाचं प्रशिक्षणही देतो. हे प्रशिक्षण देताना आमच्या लक्षातही आलं नाही की, आमची मुलं एवढी चांगली फायटर झाली की ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही गोल्ड मेडलिस्ट झाली. त्यातून विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी डेवलपमेंट झाली. त्यांना खूप कॉन्फिडेंस आला आहे.

सीबीएसई करिकुलम व उपरोक्त दोन विषयासह आणखी दोन सब्जेक्ट एडिशनल आहेत. पब्लिक स्पीकिंग आणि रिसर्च अँड प्रेजेंटेशन ही दोन्ही क्लास मी स्वत: घेतो.

प्रश्न : सर्वसाधारणपणे दिसून येते की, आर्थिक आणि इतर परिस्थितीमुळे मुस्लिम मुली शिक्षणात मागे पडतात, याकडे ‘उम्मीद अकादमी’ काय विशेष लक्ष देणार आहे?

उत्तर : अर्थातच! मुलींचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, असं आमचं मत आहे. केवळ मुलीच नाही तर मुस्लिमांची मुलं आणि मुली दोघेही शिक्षणात खूप मागे आहेत. आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही फक्त मुलांना शिक्षण देत होतो. आम्ही ज्या भागात जायचो, तिथं लहान मुलीही आमचा हात धरून सांगायच्या की आम्हालाही शाळेत जायचं आहे. २०१९ मध्ये आम्ही मुलींना प्रवेश घ्यायला सुरुवात केली. सध्या आमच्याकडे ६० टक्के मुलं आणि ४० टक्के मुली आहेत.

मुलींची प्रगती बघून आम्हाला जाणवलं की आम्ही त्यांच्याकडून खूप चांगल्या रिझल्टची अपेक्षा करू शकतो. पण तुलनेत मुलं अभ्यासात जास्त डेडिकेट आहेत आणि त्यांच्यामध्ये डिसिप्लिनही जास्त आहे. सर्व शिक्षक सांगतात की मुलीच संस्थेचं नाव उज्ज्वल करतील. आमच्या मुलीही अभ्यासात हुशार आहेत. शिक्षकही तेच सांगतात. कारण मी अनेकदा म्हणत असतो की, मी मुलींना प्रवेश देणं बंद करेन, कारण त्यांना प्रवेश देणं म्हणजे मोठी जबाबदारी असते. हे काही सोपं काम नाही. हॉस्टेलमध्ये ठेवणे, त्यांची काळजी घेणं, सुरक्षेची व्यवस्था करणं ही अत्यंत अवघड कामं आहेत. आज देशात ज्या प्रकारचं वातावरण आहे, कोण कुठे बसलं आहे आणि मुलींकडे कुठल्या नजरेने पाहत आहे, हे कळत नाही. प्रचंड भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे आम्ही मुलींना प्रवेश देणं बंद केलं आहे. एक मजबूत टीम होईपर्यंत मी हा प्रवेश होल्डवर ठेवला आहे.

प्रश्न : तुम्ही मौलाना आज़ाद यांच्या भूमीत रचनात्मक कार्य उभं केलेलं आहे. ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. आज़ादांची दूरदृष्टी केवळ सामान्य शिक्षणापुरती मर्यादित नव्हती, त्यांनी ललित कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही खूप प्रगती साधली होती. या क्षेत्रात काही नवीन करण्याचा विचार आहे का?

उत्तर : सुरुवातीला आम्ही खूप बेसिक काम करत आहोत. आम्ही मुलांना खाऊ घालत आहोत. आम्ही मुलांना चालायला शिकवत आहोत. कला आणि संस्कृती हा खूप नंतरचा टप्पा आहे. यासह मौलाना आज़ाद यांचे इतर जे काही उपक्रम आहेत, ते खूप नंतर सुरू होतील. पण प्राधान्यक्रम असा आहे की कोणतंही मूल उपाशी झोपणार नाही. प्रत्येक मूल चांगला नागरिक होऊन बाहेर पडेल. जो शारीरिकदृष्ट्या अशक्त आहे, तो सदृढ होऊन बाहेर निघेल. तो अभ्यासात चांगला होईव, तो ज्ञानी असेल, आयुष्यात यशस्वी असेल. आम्ही अगदी प्राथमिक टप्प्यावर आहोत. तुम्ही खूप दूरदृष्टीविषयी बोलत आहात, आम्ही अद्याप त्याबद्दल विचार केला नाही, परंतु इन्शाअल्लाह नक्कीच विचार करू.

प्रश्न : भारताने तुमच्याकडे जनआंदोलनाचे नेते आणि सेक्युलॅरिझमचे पुरस्कर्ते म्हणून पाहिलं आहे, आगामी लोकसभा निवडणुकीत वली रहमानी कुठे दिसतील?

उत्तर : आधी म्हटल्याप्रमाणे मी पॉलिटिक्सपासून खूप लांब गेलो आहे. मला राजकारणात शांतता नव्हती. माझी शांतता हरवली होती. मी लहान असल्यामुळे प्रत्येक दुसरी व्यक्ती माझा वापर करण्याचा प्रयत्न करत होती. पण आता मी पॉलिटिक्स दूर सोडून आलो आहे. आज मला वाटतं की, मी करत असलेली १०० स्कूल्स, १०० हॉस्पिटल्स उभी करावीत आणि शांतपणे काम करत राहावं.

लोकांकडून मी शाळा उभी करत आहे. सरकार हेच काम सक्तीने टॅक्स घेऊन करते, पण मी तीच कामं लोकनिधीतून करत आहे. लोकनिधीतून मी हॉस्पिटल्सही बांधेन आणि त्यांच्या पैशातून सर्वसामान्यांना मदत करेन, इन्शाअल्लाह. आज मला पॉलिटिक्समध्ये माझं भविष्य दिसत नाही. पण हो, माझ्या लोकांनी येऊन सांगितलं की, राजकारणात माझी गरज आहे, तर कदाचित मी पुन्हा विचार करेन. पण सध्या मी स्वतः त्याबद्दल विचार करत नाही. जर माझ्या कम्युनिटीला वाटलं की मी त्यासाठी पात्र आहे, तर कदाचित मी पुन्हा विचार करेन.

प्रश्न : वळू या शेवटच्या प्रश्नाकडे... नुकत्याच केलेल्या फंड रेसिंगच्या आवाहनाद्वारे तुम्ही जगभरात पोहोचला... त्याचप्रमाणे गरीब आणि कष्टकरी लोकांची मदत आणि प्रेमही तुम्हाला मिळालं. तुम्ही ६ दिवसात ६ कोटी रुपये उभे केलेत, तुम्ही १० कोटींचं लक्ष्य निर्धारित केलं होतं, यामागचं तुमचं नेमकं व्हिजन आमच्या वाचकांना सांगा.

उत्तर : व्हिजन असं की मी लोकांकडून भीक मागून थकलो होतो. मी अनेकदा श्रीमंतांकडे जात आणि त्यांना पैसे मागत. लोक दोन तास बाहेर बसवित आणि हजार रुपये हाती टेकवत. मी त्याला अजिबात वाईट मानत नाही. पण मला मोठं काम करायचं होतं आणि ते शक्य तेवढ्या लवकर करायचं होतं. माझ्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येक व्यक्तीकडे कमी वेळ असतो. आज माणूस ६५ वर्षे जरी जगला तरी खूप मोठी बाब आहे. कमी वयात लोकांना हार्ट अॅटॅक येत आहे. लोकांचं जीवनमान कमी झालं आहे. मला आयुष्यात खूप काही करायचं होतं. समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं. माझ्या लक्षात आलं की हे करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे भारतातील प्रत्येक व्यक्तीकडून पैसे मागावे. मी प्रत्येक मुस्लिमाला पैसे मागेन. म्हणून सर्वसामान्याच्या वतीने निधी उभारणीची कल्पना पुढे आली. ५ वर्षांच्या कार्यामुळे, माझ्या ट्रॅक रेकॉर्डमुळे एक विश्वास निर्माण झाला होता. लोकांनी ती निष्ठा दाखवली. ६ दिवसांत ६ कोटी रुपये जमा झाले.

आता ७ कोटी रुपये जमा झाले आहेत. आठवडाभरात एखाद्याला तब्बल ७ कोटी रुपये देणे ही सोपी बाब नाही. फक्त १०० रुपये घेऊन ७ कोटी जमा होऊ शकतात, हे सिद्ध झालं. लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, आता लोकांचा तो अधिक दृढ करणं आणि शाळेची इमारत उभी करून जनतेला दाखवणं माझं कर्तव्य आहे. इन्शाअल्लाह, अशाच पद्धतीने १०० शाळा, १०० हॉस्पिटल्स उभी करू शकेन.

प्रश्न : तुम्ही २५ सप्टेंबरला एका वीडियोद्वारे सांगितलं की ५ दिवसात ५ लाखांहून अधिक ट्रान्झिक्शन झाले आहेत. याचा अर्थ सर्वसामान्यांनाही वाटतं की, आपली मुलं उत्तम शिकली पाहिजे.

उत्तर :  गरीबांची स्वप्ने पूर्ण होताना मला पहायची आहेत. मी पाहू शकलो नाही तर माझी पुढच्या पिढीला ते नक्कीच दिसेल. कोणताही बदल एका जनरेशनमध्ये घडत नाही. पहिली पिढी पाऊल टाकते, स्वत:ला समर्पित करते आणि पुढची पिढी त्याचे फळ चाखते. ही फळे मला माझ्या आयुष्यात नाही दिसली तरी हरकत नाही, पण माझ्या पुढच्या पिढीला ते नक्कीच दिसतील, हीच माझी मनोकामना आहे.

आमच्या खात्यावर १०, ५०, १०० रुपयांचे पाच लाख आर्थिक व्यवहार झालेले आहेत. त्यामुळे बँक असो किंवा इंन्टलेजिन्सवाल्यांना वाटलं की, काहीतरी मोठा स्कॅम होत आहे. त्यामुळे आमचा बँक ट्रान्सफर व्यवहार सध्या ब्लॉक झालेला आहे. आता आमच्यापर्यंत निधी पोहचत नाही. त्यामुळे आम्ही अॅक्सिस बँकेत नवीन अकाउंट उघडलं आहे. पूर्वी ते आयसीआयसीआयमध्ये होतं. जे वाचक आमच्या या उदात्त कार्यासाठी निधी देऊ इच्छितात त्यांना विनंती आहे की, त्यांनी पुढील खात्यावर बँक टू बँक पैसे ट्रान्सफर करावीत.

Al Hadi Educational Trust

AC: 923020049222542

IFSC: UTIB0002759

Branch: Topsia

Axis Bank | Current Account |

**

मुलाखतकार :

कलीम अज़ीम, पुणे

मेल : kalimazim2@gmail.com

(मुलाखतकार स्वतंत्र लेखक आहेत. मुस्लिमांच्या सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे ते अभ्यासक आहेत. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे.) 

(सदरील मुलाखत साप्ताहिक साधनेच्या युवा दिवाळी अंक-२०२३ मध्ये प्रकाशित झाली आहे.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: वली रहमानी: श्रीमंताचं महागडं शिक्षण गरिबांना देणारा अवलिया
वली रहमानी: श्रीमंताचं महागडं शिक्षण गरिबांना देणारा अवलिया
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhJz0KCYJ62ZEa8fKygrXWDj5fE7ItrPMgptmQJtcIuayCbnsZDw7mssxvUlzfkLAyvge6Hya1oRiCSlgCDSQSRTKPE9yUNQYFqLJvbqIcOcCfek0GMtp7vQpvBS2bp8mv4V8p3FT3tcuCiFmL1QYc3PhukkGYl1f3dL-I6Fvhi0aGmh6a9_m3AcEMLehIc/w640-h426/Wali-7.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhJz0KCYJ62ZEa8fKygrXWDj5fE7ItrPMgptmQJtcIuayCbnsZDw7mssxvUlzfkLAyvge6Hya1oRiCSlgCDSQSRTKPE9yUNQYFqLJvbqIcOcCfek0GMtp7vQpvBS2bp8mv4V8p3FT3tcuCiFmL1QYc3PhukkGYl1f3dL-I6Fvhi0aGmh6a9_m3AcEMLehIc/s72-w640-c-h426/Wali-7.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2023/11/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2023/11/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content