पुण्यातील एका मस्जिदीची कहाणी

ही मस्जिद अयोध्येतली नाही. कहाणी आहे पुण्यातल्या एका मस्जिदीची. तिचे नाव मक्केशाह मस्जिद!ती आहे पुणे शहराच्या मध्यभागी, डेक्कन जिमखान्यावर. मुठा नदीमुळे पुण्याची पूर्व विभाग आणि पश्चिम विभाग अशी विभागणी झालेली. दोघांना जोडणारा संभाजी पूल. पूर्वी त्याला लकडी पूल म्हणत. पुलाला खेटून डेक्कन कॉर्नरला ही मस्जिद दिसते. आज ती दिमाखात उभी आहे. 50 वर्षांपूर्वी नदीच्या किनाऱ्यावर ती छोटी होती. आता ती अनेक मजली आहे.

पानशेतचा पूर 1961 सालचा. त्या महापुरात नदीघाट उद्ध्वस्त झाला. पण 50 वर्षांत महापुराच्या पुण्यातल्या साऱ्या खुणा मिटल्या. नदीकाठी जिथे छोटे मंदिर होते, तिथे भव्य मंदिर उभे राहिले. कच्च्या घरांच्या जागेवर सिमेंट काँक्रीटची पक्की घरे उभी राहिली. पुणे महानगरपालिका धार्मिक स्थळांच्या बांधकामांना परवानग्या देते. मंदिरांना परवानगी नाकारण्याची सहसा कोणाची हिंमत नसते. अपवाद होता फक्त मक्केशाह मस्जिदीचा. काही केल्या त्यांचा प्लॅन पुणे महापालिका मंजूर करत नव्हती. त्रस्त झालेल्या मस्जिदीच्या विश्वस्त मंडळाने कंटाळून शेवटी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पुणे मनपावर पक्षपातीपणाचा आरोप ठेवून कडक ताशेरे झाडले. पुणे महापालिका मुस्लिमांना दुजाभाव दाखवत आहे, असा आरोप न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रात केला होता.

शेवटी हायकोर्टाच्या आदेशानुसार मस्जिदीच्या बांधकामाला पुणे महापालिकेने परवानगी दिली. बांधकाम सुरू झाले. पण लगेच त्यावर स्थगिती आदेश बजावण्यात आला. पुण्यातील हिंदुत्ववादी विचारधारेचे म्होरके मिलिंद एकबोटे (कोरेगाव भीमा दंगल फेम) यांनी पुणे पोलीस कमिशनरकडे एक तक्रार अर्ज दिला होता. पोलीस कमिशनर पदावर मीरा बोरवणकर होत्या. तक्रार अर्ज मिळाल्यानंतर त्यांनी लगेच बांधकामाला स्थगिती दिली. कुठल्याही धार्मिक स्थळाचे बांधकाम करताना मनपाची परवानगी मिळण्यापूर्वी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. पुणे महापालिकेने आधी गृहमंत्रालयाकडे हे प्रकरण पाठवले होते. महाराष्ट्र सरकारचे गृहखाते गुप्तहेर यंत्रणेमार्फत जातीय दंग्याच्या शक्यतेबाबत चौकशी करते. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विभागामार्फत बांधकामास परवानगी देण्यास हरकत नाही, असे पत्र देण्यात आले होते. जातीय दंगा होण्याची शक्यता नाही, असा गुप्तचर खात्याचा अहवाल होता. 

वाचा : एक भारतीय ख्रिश्चन जेव्हा दुबईमध्ये मस्जिद बनवतो!

वाचा : सरवरपूरची मस्जिद म्हणजे सेक्युलॅरिझमची पुनर्बाधणी

मस्जिदला आक्षेप का?

वास्तविक, मंदिरांना कुठलीही हरकत घेतली जात नाही आणि घेतल्यास त्यांचा भाविकांकडून योग्य तो बंदोबस्त केला जातो. लोकक्षोभाला टाळण्यासाठी अनेक धार्मिक स्थळांची बेकायदेशीर कामे नियमित केली जातात. मुस्लिमांना मात्र कोणी वाली नव्हता. गृहमंत्रालयाने गुप्त चौकशी करून परवानगी दिल्यानंतरही एका हिंदुत्ववादी व्यक्तीच्या तक्रार अर्जावर मस्जिदीचे बांधकाम बंद पडावे, हे मुस्लीम समाजामध्ये नाराजीचे कारण होते. अर्जातील एक तक्रार अशी होती की, डेक्कन जिमखाना हा भाग मुस्लीम वस्तीचा नसल्याने त्या मस्जिदीत नमाज अदा करण्यासाठी कोणी जाणार नाही आणि भविष्यातदेखील तिथे नमाजसाठी कोणी जाण्याची शक्यता नाही. कारण डेक्कन जिमखाना भागात कोणी मुस्लीम राहतच नाही. हा केवळ मालमत्तेचा अधिकार सिद्ध करण्याचा प्रकार आहे. दुसरी तक्रार अशी होती की डेक्कन जिमखाना भागात हिंदू वस्तीत मस्जिद बांधल्यामुळे हिंदूंमध्ये तीव्र संताप निर्माण होईल. पुण्यात हिंदू-मुस्लीम दंगे होतील. ही मस्जिद त्याचे निमित्त ठरेल.

मस्जिदीची विश्वस्त मंडळी न्याय मिळण्यासाठी दारोदार भटकली. सर्व मुस्लीम नेत्यांकडे त्यांनी मदतीची मागणी केली. काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील एका मुस्लीम मंत्र्यांनेदेखील यावर आपली असमर्थता व्यक्त केली. हा विषय पूर्ण बेवारशी झाल्यानंतर या मस्जिदची विश्वस्त मंडळी एक दिवस गांधी भवनमध्ये आम्हाला भेटायला आली. त्यांच्या परवडीची सविस्तर कहाणी आम्ही शांतपणे ऐकून घेतली. त्यांच्या न्यायालयीन वादाची, निकालाची सर्व कागदपत्रे अभ्यासासाठी आमच्याकडे ठेवून घेतली. आठ दिवसांनंतर त्यांना परत भेटीस येण्यास सांगितले. मधल्या काळात त्यांनी या प्रकरणात जबाबदारी स्वीकारणाऱ्या अन्य मुस्लीम नेत्यांचा त्यांनी शोध घ्यावा, असा त्यांना सल्ला दिला. 

आम्ही एकदा जबाबदारी स्वीकारली तर समाजाचा आमच्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे, म्हणून ही अट आम्ही स्पष्ट केली. त्याला कारण होते. जे स्वतःला विशिष्ट जातीचे वा जमातीचे मानतात ते अन्य लोकांचे जात व धर्म अवश्य लक्षात घेतात. म्हणून त्यांना स्पष्ट केले की आम्ही स्वतःला केवळ भारतीय नागरिक मानतो. तुम्हालादेखील आम्ही भारतीय नागरिक या नात्याने बंधू मानतो. तुम्हाला आम्ही केवळ मुस्लीम मानावे, नागरिक भाऊ मानू नये, ही अपेक्षा असेल, तर तुमच्या प्रश्नांची दखल घेण्यास आम्ही असमर्थ आहोत. मुस्लिमांच्या नजरेतून गैरमुस्लीम काफीर ठरण्याची शक्यता गृहीत धरायला हवी. आश्चर्य म्हणजे आमची भूमिका ऐकून त्यांना आनंद वाटला. जाती-जमातीच्या अस्मिता दूर केल्या की बंधुभाव सहज निर्माण होतो. जातीय अस्मिता ही नकारात्मक भावना आहे. असुरक्षितता, न्यूनगंड या मानसिकतेमधून अस्मितेचा उगम होतो. अस्मिता अंतर निर्माण करते. बंधुभाव माणसामाणसांमधील अंतर नष्ट करतो. गांधी स्वत:ला सर्व धर्मांचे पाईक मानत. आमची धारणा तशीच आहे हे त्यांना स्पष्ट केले.

आणि जबाबदारी स्वीकारली

आठ दिवसांनंतर ती मंडळी पुन्हा भेटायला आली. तोपर्यंत त्या कागदपत्रांचा आमचा अभ्यास झाला होता आणि सहकार्‍यांबरोबर चर्चा झाली होती. त्यांना म्हणालो, ‘‘तुमची कागदपत्रे पाहिली. न्यायालयांनी दिलेले निकालही वाचले. त्यावरून तुमची बाजू तर्कशुद्ध रास्त व न्याय्य आहे’’ याबद्दल आमची खात्री झाली आहे. तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, अशा निष्कर्षाप्रत मी व माझे सहकारी पोहोचलो आहोत. काही गोष्टी अधोरेखित करतो. त्या पटल्या, तर आपण नि:शंकपणे एकजुटीने काम करून यश मिळवू. आमच्यावर विश्वासाने तुम्ही जबाबदारी टाकल्यास आम्ही हे प्रकरण हाती घेऊन शेवटपर्यंत तडीस नेऊ.’’

हे ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला. पुढचे ऐकून घ्यायला ते उत्सुक होते. आम्ही मुसलमानांना भाऊ मानणारे हिंदू आहोत, हे पाहून त्यांना गोड धक्का बसला असावा.

त्या भेटीत त्यांना खुलासेवार सारे सांगून टाकले. त्यांना म्हणालो, ‘‘या प्रकरणात आमच्या संस्थेने आणि अध्यक्ष या नात्याने मी पुढाकार घेतला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मला एक प्रश्न नक्की विचारतील.’’ ते म्हणतील, ‘‘त्यांच्यावर अन्याय झाला असेलही, पण त्यांची बाजू घेऊन आमच्याशी भांडणारे तुम्ही कोण? तुम्ही पुण्याचे आमदार किंवा खासदार आहात काय? त्यांनी तुम्हाला वकील म्हणून नेमले आहे काय? तुम्ही तर मुसलमान नाहीत. त्या मस्जिदीत तुम्ही नमाज पढायला जाणार नाही? कृपया तुम्ही या प्रकरणात लक्ष घालू नका. यावर मी काय उत्तर देऊ?

‘‘यासाठी तुम्ही एक सभा घेऊन सर्वसंमतीने ठराव पास केला पाहिजे की, ‘आम्ही सभेत जमलेले सर्वजण एकमुखाने सांगतो की या प्रकरणी आमचे प्रतिनिधित्व डॉ. कुमार सप्तर्षी यांनी करावे. केव्हा आंदोलन करायचे, कधी सत्याग्रह करायचा, मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना कधी निवेदन द्यायचे, शिष्टमंडळ न्यायचे की नाही ते कधी न्यायचे वगैरे, याबद्दल सर्व निर्णय डॉ. कुमार सप्तर्षी घेतील. त्यांच्या नेतृत्वावर आम्हा सर्वांचा पूर्ण विश्वास आहे.

या प्रश्नाला फाटे फुटत चालले. काही मुस्लीम नेत्यांचे म्हणणे होते, ‘हिंदूने नेतृत्व का करायचे. आपण (मुस्लिमांनी) हातात बांगड्या भरल्या आहेत काय? एकाच मस्जिदचा प्रश्न हातात घेण्याऐवजी पुण्यातील सर्व मस्जिदींचा प्रश्न का घेऊ नयेवगैरे. बोलत अनेक, पण जबाबदारी घ्यायला कुणी तयार नव्हते.

त्यांनी गांधी भवनच्या सभागृहात एका मेळाव्याचे आयोजन केले. गांधीभवन कोथरूडमध्ये आहे. आमच्या सभागृहात फक्त 300 खुर्च्या. त्या सभेला हडपसरपासून मोठ्या संख्येने लोक आले. त्यांचा वेश टिपिकल होता. सारेजण दाढीवाले. हॉलची जागा पुरली नाही. गांधी भवनचे आवार मुस्लीम बांधवांनी गजबजून गेले. 

वाचा : सर्फ एक्सेलच्या जाहिरातीला मुस्लिमद्वेषी विरोध

वाचा : गंगा-जमुनीप्रतीकांची पुनर्मांडणी

पोलिसांचा पहारा

कोथरूड हे पूर्वी एक खेडे होते. तिथे जमिनी स्वस्तात मिळत. शहरालगत कोथरूड असल्याने सदाशिव, नारायण, शनिवार या पेठांमध्ये वाड्यात राहणार्‍यांनी इथे जमिनी खरेदी केलेल्या. यथावकाश कोथरूड गाव बंगले, हौसिंग सोसायट्यांनी गजबजून गेले. ज्या संस्कारामधून ही स्थलांतरित मंडळी आली, त्यांना स्वाभाविकपणे सावरकर, नथुराम गोडसे वगैरे अत्यंत प्रिय होते, आजही आहेत. सर्वसाधारणपणे त्यांना महात्मा गांधी भावत नाहीत. त्यांचे विचार त्यांना आवडत नाहीत. 

पचतही नाहीत. कोथरूडमध्ये गांधी भवन 1960 सालापासून आहे. ते दहा एकरावर उभे आहे. तथापी महात्मा गांधी त्यांना परिचित नाहीत. मुस्लीम बांधव या भागात फ्लॅट घेत नाहीत. कुणी घेतलाच, तर इतर मंडळी बिल्डरकडे आधी केलेले बुकिंग रद्द करतात. पुण्यात हे ठरूनच गेलेले आहे की मुसलमानांनी मोमीनपुरा, भवानी पेठ, सय्यदनगर, फातिमानगर, कोंढवा इत्यादी भागात वस्ती करावी. जणू कोथरूड, वगैरे भाग मिनी हिंदुराष्ट्र आहे. डेक्कन जिमखाना आणि तिकडचा भाग इतरांचा आहे. कायदा तसे सांगत नाही, परंतु मनात पूर्वसंस्कार साचलेले असतात.

कोथरूडमध्ये पाचशे-सहाशे मुस्लीम गांधीभवनच्या परिसरात एकगठ्ठा जमलेले पाहून महान संकट समोर आल्यासारखे त्यांना भासले. पोलिसांकडे धोक्याच्या सूचना गेल्या. गांधीभवनच्या गेटबाहेर पोलीस व्हॅन आणि पहारेकरी म्हणून अनेक पोलीस येऊन थांबले. दंगाविरोधी पोलीसपथक सज्ज होते. मोठा रोमांचकारक प्रसंग होता तो.

आम्ही सभागृहातील व्यासपीठावर बसलेलो. बाहेर काय चालू आहे याची कल्पना नव्हती. काही मुस्लीम नेत्यांची भाषणे झाली. मुस्लिमांना भाषण फार गोड भाषेत करता येते. त्यांच्या भाषणात शेरोशायरीचा वापर हमखास असतो. शिवीगाळ, आक्रोश वगैरे नसतो. भाषणातून तळमळ, अदब डोकावते. या प्रकरणी मी लक्ष घालावे आणि इन्साफ मिळवून द्यावा, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले. सभागृहाचे एकमत पाहून मी या प्रकरणात नेतृत्व करण्यास मान्यता दिली.

सभेच्या शेवटी उत्तरादाखल भाषण केले. मी म्हणालो, ‘‘प्रथम एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. आपण सारे भारतीय नागरिक असून एकमेकांचे बंधू आहोत. संविधानाने सर्वांसाठी एकाच कायद्याची हमी दिली आहे. पानशेतच्या पुरामध्ये आपले प्रार्थनास्थळ वाहून गेले. ती नैसर्गिक आपत्ती होती. पुरामुळे झालेली पडझड गेल्या पन्नास वर्षात आपण भरून काढली. ही बाब समस्त पुणेकरांसाठी अभिमानास्पद आहे. अपवाद आहे तो फक्त एका मस्जिदीचा. तो पूर्ण झाला की पुणेकर छाती फुगवून गर्वाने म्हणू शकतील, की आम्ही एकमेकांच्या सहकार्याने नैसर्गिक आपत्तीवर पूर्ण मात केली आहे. भावी पिढीपुढे एक आदर्श ठेवता येईल. मानवी प्रयत्नाने नैसर्गिक आपत्तीच्या खुणा पुसता येतात, त्याची नामोनिशाणी मिटवता येते. फक्त समाजात माणुसकी आणि बंधुभाव हवा.’’

प्रश्न आर्थिक नव्हता

मक्केशाह मस्जिद बांधण्यासाठी ट्रस्टींनी निधी उभा करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. प्रश्न फार थोड्या गोष्टींमध्ये अडकला होता. बांधकामाला पोलिसांनी स्थगिती दिली होती. ती काढून टाकली की प्रश्न मार्गी लागणार होता.

‘‘हा स्थगिती आदेश पुण्याच्या कमिशनरने बजावलेला आहे. पण जी परवानगी सरकारच्या गृह खात्याने गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करून दिली, त्या चौकशीत मस्जिदीचे बांधकाम चालू झाल्यावर हिंदू व मुस्लीम या दोन जमातींमध्ये दंगा होण्याची शक्यता नाही, असा निष्कर्ष काढलेला होता. या निष्कर्षामुळेच तर गृहमंत्रालयाने ना हरकतदाखला दिला होता. गृहखात्याची परवानगी शहरपातळीवरच्या पुण्याच्या पोलीस कमिशनरने नाकारली. म्हणजे हे उच्च न्यायालयाच्या आदेशाला जिल्हा वा तालुका पातळीवरच्या न्यायालयाने स्थगिती दिल्यासारखे झाले’’ असे मी भाषणात सांगितले.

पुण्याच्या पोलीस कमिशनरने राज्य पातळीवरील गुप्तहेर यंत्रणेला दंगा होणारच हे ठणकावून सांगण्याइतपत कस्सून चौकशी केली आहे काय? त्यांनी बांधकामावर बजावलेल्या स्थगितीचा आधार एकच, एका हिंदुत्ववादी माणसाचा तक्रार अर्ज! त्यांनी अर्जदाराची चौकशी केली काय? त्यांचा पूर्वइतिहास नीट तपासला काय? हे गृहस्थ आयुष्यभर मुस्लिमांच्या विरोधात बोलत, वागत आले आहेत. पुण्यात दंगा झालाच तर त्याला तेच जबाबदार मानायला हवेत.

मुस्लिमांचा न्याय्य अधिकार डावलल्यामुळे जातीय तणाव वाढण्याची शक्यता अधिक की कमी? तक्रारकर्त्याला टाडामध्ये आत टाकले तर शांतता नांदू शकेल काय, याचाही विचार व्हायला हवा. अन्यथा नाइलाजाने असे मानावे लागेल, की एका हिंदुत्ववादी व्यक्तीकडे पुणे शहराची शांतता गहाण ठेवण्यात आली आहे. किंवा दुसरा अर्थ असाही होतो की हे गृहस्थ पुणे शहराचे सुपर कमिशनर आहेत. पुण्याचे पोलीस कमिशनर सदर गृहस्थाला पुणे शहरातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती मानत असावेत. पोलीस कमिशनर आणि हे हिंदुत्ववादी नेते एकाच विचारधारेचे आहेत काय?

असे प्रश्न भाषणात उपस्थित करून मी म्हणालो, ‘‘दंग्याची शक्यता एक व्यक्ती वर्तवित असेल तर मी देखील माझी प्रतिष्ठा पणाला लावीन. ते कोण टिक्कोजीराव लागून गेले? गेल्या आठवड्यात मी सर्वेक्षण केले आहे. अंदाज घेतला आहे. मस्जिदीच्या बांधकामास सरकारने परवानगी दिल्यास संतापून दंगा करण्यास तयार असलेला एकही हिंदू मला आढळला नाही. 

नॉर्मल परिस्थितीत सामान्य मुस्लीम आणि सामान्य हिंदू यापैकी कुणी माणूस दंग्यात भाग घेणार नसेल, तर जगातला कोणीही हिंदुत्ववादी हिंदू-मुस्लीम दंगा घडवू शकत नाही, हे वास्तव आहे. दंगा होणार नाही याची लेखी हमी सरकारला देण्यास मी तयार आहे. माझी प्रतिष्ठा व तक्रारकर्त्याची प्रतिष्ठा यांच्यामधील जाहीर स्पर्धा व संघर्ष अंगावर घेण्यास माझी तयारी आहे. हिंदू व मुस्लीम हे दोन्हीही समाज शांतताप्रिय आहेत, याबद्दल मला खात्री आहे.

‘‘माझी एकच विनंती आहे. या प्रश्नावरून कोणी मामुली व बेजबाबदार मुस्लीम नेते भडकाऊ भाषणे करू लागले, तर त्यांना रोखण्याची जबाबदारी तुमची आहे. दोन्हीकडे भडकाऊ भाषणे करणारे दोन-चार लोक नेहमीच असतात. 99 टक्के लोक दंगा-धोपा होऊ नये, अशा मताचे असतात. समाजात दंगे होतात याचे मुख्य कारण शांतताप्रिय सामान्य नागरिक तुलनेने फार सक्रिय नसतात. याउलट ज्यांना समाजात द्वेष वाढवण्यात आणि हिंसाचार घडवून आणण्यात रस असतो, असे थोडे लोक अहोरात्र आपल्या कामात सक्रिय असतात. कधी मतांसाठी ध्रुवीकरण करणारे राजकारणी अशा लोकांना हाताशी धरतात. गुंडांना बळ पुरवितात. त्यांना हिंसाचारात आपली सत्ता दिसते. गुंडांवर कारवाई करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. पण शासनदेखील निष्क्रिय असते.

‘‘या विषयातील माझा अनुभव सांगतो. 1978 साली मी अहमदनगर शहरामधून जनता पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो होतो. नगर शहर जातीय तणावाचे आणि महाराष्ट्रातील संवेदनशील शहरांच्या यादीतले. आमदार झाल्यावर पहिल्याच जाहीर सभेत मी सांगितले होते की दंगा कधी आपोआप होत नसतो, मूठभर लोक दंगा घडवून आणतात. अशांना माझे आव्हान आहे. माझ्या आमदारकीच्या काळात त्यांनी दंगा घडवून आणावा. दंगा होऊच शकणार नाही. कारण दंगेखोर मंडळींवर माझे बारीक लक्ष असेल. नगरमध्ये जातीय दंगा घडल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन. 

काही सबब सांगणार नाही. माझ्या कारकिर्दीत अहमदनगरमध्ये दंगा झाला नाही. आमदार असल्याने मला गुप्तहेर यंत्रणेकडून दोन्ही जमातींमधील खोडेल लोकांची नावे मिळत. मी अचानक भल्या सकाळी त्यांच्याकडे चहा प्यायला जाई. काही बोलत नसे. उपदेश करीत नसे. फक्त त्यांच्या धंद्या-पाण्याची व मुलाबाळांची चौकशी करायची. दंगेखोर भ्याड असतात. मला अचानक पाहून ते चमकत. आमदाराला आपल्याबद्दल संशय आला की काय या संभ्रमात राहात. उचापतींमधून ते अंग काढून घेत.

‘‘आणखी एक गोष्ट. हा प्रश्न मी व माझे सहकारी महात्मा गांधींच्या पद्धतीने म्हणजे सत्याग्रही मार्गाने सोडविणार आहोत. तुम्हीदेखील शेवटपर्यंत अहिंसा हे तत्त्व सोडता कामा नये. अहिंसा हे इस्लाम धर्माचे ईमान आहे. प्रामाणिकपणा आणि अहिंसा या गोष्टी आम्ही कधी सोडणार नाही. सर्वांचे सहकार्य मिळवणार. जाहीर सभा घेणार. सरकारवर, दबाव आणणार. जनजागृती करणार. कायद्याचे राज्य सर्वांना हवे. जे मुस्लिमांचे, तेच हिंदूंचे हित आहे. दोन्हीत काडीमात्र अंतर नाही.’’

माझी भूमिका सर्वांना भावली. आपापसात विश्वास वाढला. संवादात मोकळेपणा आला. भाषणाच्या शेवटी मी म्हणालो, ‘अल्लाहतालाची प्रार्थना करताना सर्वांची साथ मिळावी म्हणून अजान दिली जाते. अजान म्हणजे ईश्वराच्या प्रार्थनेसाठी सर्वांना निमंत्रण देणे. या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी आपण अजान देऊन सर्वांना बोलवू या.’’

पुणे शहरात बिगर मुस्लीम भागात सभा घेऊन, आमची मागणी कशी रास्त आहे हे पुणेकर जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांतून सत्य माहिती प्रसारित केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा मेळावा घेतला. त्यात अनेक मौलवी आणि विविध पक्षांचे पुढारी बोलले. मागणी रास्त आहे हे लोकांना पटत होते. एक शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटले. महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यासाठी त्यांना एक निवेदन सादर केले.

तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ना. पृथ्वीराज चव्हाण हे होते. त्यांना प्रत्यक्ष भेटून एक निवेदन दिले. त्यात म्हटले होते की, ’‘आमच्या मुस्लीम बांधवांवर अन्याय झाला तर भारतीय नागरिक म्हणून आम्हालाही तीव्र वेदना होतात. कायदा सर्वांसाठी एकच आहे. पक्षपात झाला तर मुस्लीमेतर भारतीय नागरिक सरकारच्या विरोधात अहिंसक संघर्ष करतील. तो आमचा संविधानाने दिलेला हक्क आहे.’’

पत्रात नमूद केलेली भूमिका मुख्यमंत्र्यांना भावली. शिवाय त्या पत्रात म्हटले होते की, मस्जिदच्या बांधकामावरील स्थगिती उठवल्यास पुण्यात हिंदू-मुस्लीम दंगा होणार नाही, याची मी सरकारला हमी देतो. वास्तविक, प्रत्येक समूहाच्या कायदेशीर हक्कांबाबत सरकारने कायदा आणि सुव्यवस्थाबिघडेल अशी भीती कधीच बाळगता कामा नये.

मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. यथावकाश मस्जिदच्या बांधकामावरील स्थगिती उठविण्याचा आदेश सरकारकडून आला. पुण्यात मुस्लीम बांधवांचे पवित्र प्रार्थनास्थळ उभे राहिले. दर शुक्रवारी दुपारी नमाज पठणासाठी तेथे गर्दी असते. कॉलेज विद्यार्थी, डेक्कन जिमखान्यावरील छोटे दुकानदार, हातगाडीवर फळविक्री करणारे असे अनेकजण नमाजसाठी या मस्जिदमध्ये आवर्जून येतात. अल्लाहकडे सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना करतात. सर्वांसाठी दुवा, आशीर्वाद मागतात. कुणी हरकत घ्यावी, असे तिथे काही घडत नाही. 

चार मजले पूर्ण भरतात. या प्रकरणात सक्रिय असलेले मुस्लीम कार्यकर्ते आज गांधी भवनच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतात. पंढरीच्या वारीला निघालेल्या पालख्या मक्केशाह मस्जिदीच्या समोरच्या रस्त्यावरून पुढे जातात. मस्जिदीत वारकर्‍यांचे स्वागत केले जाते. त्यांना नाश्ता दिला जातो. रमजानमध्ये जवळपासच्या हिंदू बांधवांना बोलावून त्यांना शीर खुर्मा दिला जातो. अनेक हिंदू बांधव उत्साहाने सामील होतात. यालाच अस्सल भारतीय संस्कृती म्हणतात. माणुसकी अन् बंधुभाव यांच्यामध्ये धर्मभावना अडथळा आणत नाही. माणुसकीची भावना दृढ करण्यासाठीच विविध धर्म निर्माण झाले आहेत.

मक्केशाह मस्जिदीचे आंदोलन 4-5 महिने चालू होते. ते दिवस खूप आनंदात गेले. मुस्लिमांना आपण भारतीय नागरिक असल्याची प्रचिती आली. त्या काळात आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदू-मुस्लीम कार्यकर्त्यांना गांधीजी रोज भेटत. महात्मा गांधींची हत्या एका पुणेकराने केली. ती प्रवृत्ती सुप्तावस्थेत पुण्यात आजही शिल्लक आहे. पण आजही गांधीजी आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याचा वारंवार प्रत्यय येतो.

डॉ. कुमार सप्तर्षी

(सदरील लेख २०१९च्या सत्याग्रही विचारधारा दिवाळी अंकात प्रकाशित झालेला आहे. संपादकाच्या परवानगीने आम्ही तो पुनर्प्रकाशित करत आहोत.)


वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: पुण्यातील एका मस्जिदीची कहाणी
पुण्यातील एका मस्जिदीची कहाणी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggho4JK6yPpd9QOJvvuUrdfh5LCHtOcA_dyfCg54WgFAhEEX_stNirPzFnoY4QY4idFOwLEMnH3yVsgM9LzCTd12Kuh2_SCUtA3eZ7_HUS3KQMW1B49NXXH1J6RA1VSnk3JJjHPW0_H_i2/s640/IMG_20190928_181258.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggho4JK6yPpd9QOJvvuUrdfh5LCHtOcA_dyfCg54WgFAhEEX_stNirPzFnoY4QY4idFOwLEMnH3yVsgM9LzCTd12Kuh2_SCUtA3eZ7_HUS3KQMW1B49NXXH1J6RA1VSnk3JJjHPW0_H_i2/s72-c/IMG_20190928_181258.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_96.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_96.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content