द्वेषाच्या भांडवली बाजारात 'कमोडिटी शिवबा'

दोन वर्षापूर्वी औरंगाबादला शिवजयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारीला काही शाळकरी मुलांनी बाल शिवाजीसाकारला. अफजल खान वधाचा नाट्य देखावा पाहण्यासाठी कोवळी मुलं मोठ्या संख्येनं हजर होती. 
या प्रयोगाबद्दल काहीच आक्षेप नाहीये. लेखणीद्वेषी इतिहास आहे म्हटल्यावर तो स्वीकारावाच लागणार. तसा तो पिढ्या न पिढ्या स्वीकारला जात आहेच.  इतिहासाची समाजमनात द्वेष निर्माण करणारी पात्रं साकारून काय साध्य करायचं असतं, हेदेखील सर्वांना ठाऊक आहे. 
शिवजयंती दिनी हिंदु-मुस्लीम द्वेष पसरवणारी अशी पोस्टरं शहर आणि गाव पातळीवर सर्रास पाहायला मिळतात. अशा द्वेषधारी पोस्टर्सनं अनेक पिढ्या बरबाद केल्या आहेत. अनेक ठिकाणी पोस्टर्सवरून तुरळक वाद होऊन दंगली झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांच्या कॉलममध्ये इतिहासजमा झाल्या आहेत.
अशा द्वेष पसरवणाऱ्या मनोवृत्तींचा वेध घेतला असता अनेक गोष्टी पुढं येतात..
दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचा उत्साह सोशल मीडियावर भरभरून दिसतो. शिवराय मुस्लिमद्वेषी नव्हते, अशा स्वरूपाचे ग्राफिक्स, छायाचित्रं आणि अवतरणं शिवजयंती दिनी फिरतात. 
काहीजण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिवरायांना कुळवाळी-कुळभूषणाचा टिळा लावतात, तर त्याच संख्येनं गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणारेदेखील दिसतात. तर यावर वाद-विवाद करणारेही मोठ्या संख्येनं फेसबुकी विचारवंतही आपली अक्कल पाजळतात. दिवसभर शिवराय मुस्लिमद्वेषी नाहीयेत, अशा आशयाची पोवाडे सोशल कट्ट्यावर गायले जातात.
वाचा : टिपू सुलतानची खरी भीती कुणाला?
वाचा : टिपू सुलतान : भाजपचा स्टार प्रचारक
प्रत्येकाकडून आपापले शिवराय मांडण्यासाठी टाईमलाईनची वॉल रंगवली जाते. माहितीचा मजकूर, पुस्तकांचे उतारे, मोठ्या प्रमाणात टॅग, हॅशटॅग, ट्विट, रिट्विट कमेंट, लाईक्स शिवरायांचा जयजयकार करतात. मोठमोठ्या पुस्तकांचे संदर्भ दिले जातात. थोडक्यात दिवसभर सोशल कट्ट्यावर महाराज मुस्लिम द्वेषी नव्हतेहाच सुपर ट्रेंड होतो. गेल्या चार-पाच वर्षांपासून हेच पाहायला मिळत आहे.
२०१६ सालीदेखील हे सर्व सुरू होतं. तरुणांचा एक गट प्रत्यक्षात लातूर जिल्ह्यातील पानगांवच्या रस्त्यावर तांडव माजवत होता. व्हर्च्युअल शिवप्रेम दाखवणारा गट, प्रत्यक्षात मात्र शिवरायांच्या नावाला काळिमा फासत होता. संवेदनशील भागात झेंडे लावण्यास मनाई केल्याने, पोलीस अधिकाऱ्यांला मारहाण करत रक्तबंबाळ अवस्थेत धिंड काढली जात होती. दुसरीकडे, दरवर्षी प्रमाणे पुण्यात आजम कॅम्पस शिक्षण संस्थेतली २९ उर्दू शाळांमधील सुमारे १० हजार मुस्लिममुलं पारंपरिक वेशभूषेत शिवरायांच्या अभिवादन रॅलीत सामील होते.
दोन्हीकडं शिवरायांविषयी प्रेम होतं. एकीकडे सद्सदविवेकबुद्धीनं आलेलं तर, दुसरीकडे राजकीय पक्षाच्या सोयीच्या राजकारणातून आलेलं. प्रशासकीयदृष्ट्या रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नयेसांगणाऱ्या शिवरायांचे मावळे शासकीय अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयावर हल्ला करून अमानुष मारहाण करत होते. अधिकाऱ्याचा दोष एवढाच की, तो त्याचं नावयुनूस शेख होतं. बिचारा कुलकर्णी, कांबळे, भोसले असता तर कदाचित बचावला असता किंवा तो व्हर्च्युअलअसता तर, कमेंट बॉक्समध्ये एखाद-दुसरी घाण शिवी गिळून बसला असता.
पानगांवची ही घटना किंवा औरंगाबादचा बाल शिवाजीचा प्रयोग मला शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात घेऊन गेला. पाचवी-सातवीतला देशपांडेबाई आणि घोंगडेमास्तरांचा रसभरीत व नाटकीय पद्धतीनं हॅमर केलेला इतिहास आठवला. स्वातंत्र्यता, राष्ट्रप्रेम, समरसता, बंधुता,  सर्वधर्मसमभाव, लोकशाही मूल्य इतिहास शिक्षणातून मिळतात म्हणे, पण आमच्या पाठ्यपुस्तक मंडळाने असा इतिहास शिक्षणातून कधीचाच बाद केला होता. त्याजागी धर्मभिमानी वे हिंसा, रक्तपात, युद्धे, मारामाऱ्या असा इतिहास पाठ्यपुस्तकात शिरला. शाळेत मास्तर-मास्तरीनबाईनं शिकवलेल्या या धर्मद्वेषी आणि रंगद्वेषी इतिहासानं पानगावसारख्या कित्येक पिढ्यांना जन्म दिलाय.
शाहिस्तेखान आणि अफजलखानचा असलेला काळ्या इतिहासामुळे, वर्गातला मोहन कांबळे समस्त मुसलमानी भाषेवाल्यांना मात्र अफजल खानच्या अवलादी समजायचा. त्यामुळे वर्गमित्र  असलेला सलम्या इतिहासाचे आगामी धडे बघून सहसा शाळेतून गैरहजर राहायचा. दुसर्‍या दिवशी कांबळे म्हणायचा कारे सल्ल्या, काल प्रतापगडावर लपून बसला व्हता का?’
मास्तर अफजल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटे,  मोगलांविरोधातली सत्तेची लढाई समस्त मुस्लिम आणि इस्लामविरोधी सिद्ध करुन रंजकपणे शिकवायचे. मास्तरचे प्रत्येक शब्द सलम्याच्या कोवळ्या बालमनावर प्रहार करायचे. मात्र, मोहनचा धर्मभिमानासह मुस्लिमद्वेष द्विगुणीत व्हायचा. खानाच्या धड्यानंतर सबंध वर्ग,  सलम्याला खानच समजायचा. त्यांच्या नजरा बघून सलम्याला वाटायचं, आता इतक्यात घेतीलच हे माझ्या नरड्याचा घोट.
वाचा : शिवजयंतीदिनी मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याला मारहाण
वाचा : लेखक व कवी होता मुघल सम्राट बाबर
तोच सलम्या जय भवानीच्या घोषणेसह शेजारचा संभादादा रहीमकाकावर धावून जाताना पाहत होता. त्यामुळे सलम्या आणि मोहल्ल्यातील अन्य पोरांना शिवरायांचं नावंही ऐकू वाटत नसायचं. अशा भीतीदायक वातावरणात आमच्या पिढीनं इतिहासाचे द्वेषधारी धडे गिरवले.
जय भवानी...च्या घोषणेसह ९३ साली दंगली घडल्या. सलम्या मात्र, दाराच्या फटीतून सर्व पाहायचा. त्यावेळी सलम्या तळहातावर मुठ ठोकत शिवरायांबद्दल द्वेष वाढवायचा. त्यांचं नाव घेऊन मुंबईत मुस्लिमांची संपत्ती जाळली गेली. दलितांवर अमानुष अत्याचार केले गेलं. शिवगर्जना देणार्‍यांनी दक्षिण भारतीयांच्या मनात धास्ती निर्माण केली. 
याच शिवगर्जनेतून पुण्यात मोहसीन शेखचा मर्डर घडवून आणला गेला. युनूस शेखसारख्यांना जिवाच्या आकांतानं आजही दोन-दोन तास पळावं लागतंय. मात्र, शिवजयंतीला सोशल मीडियाचा गुळमुळीत कंटेट वाचून माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. शिवरायांच्या नावानं दंगली घडवताना कुठं गेली होती ही बहुजनप्रतिपालक शिवप्रजा आणि त्यांचं शिवप्रेम?
ज्या शिवरायांनी प्रत्येक धर्माचा आदर केला, त्यांच्या नावानं मोठ्या प्रमाणात धार्मिक तेढ निर्माण केला गेला. ज्यांनी इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचं रक्षण आणि त्याचं जतन केलं, त्याच धार्मिक स्थळांना शिवप्रेमी म्हणवणारे मावळे गुलालानं रंगवू लागली. एकीकडे रयतेच्या रक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या शिवरायांना आज मावळ्यांच्या फौजा मान खाली करायला भाग पाडत आहेत. दंगली घडवून माय-बहिणींची विटंबना करत आहेत. शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना हीच होती का?
शिवरायांची बहुजनप्रतिपालक प्रतिमा एका जुनाट ग्रंथातून बाहेर यायला तयार नाही. मात्र दुय्यम संदर्भावर आधारित नव्या जनआवृत्ती समाजद्वेष पसरवत आहेत. महाराष्ट्रात विविध राजकीय संघटनांनी शिवरायांना हायजॅक केलंय. यांच्या पोसलेल्या इतिहासकारानं शिवरायांना इतिहासापुरतं मर्यादित न ठेवता भाषा, जात, धर्म, संस्कृतीमध्ये बंदिस्त करून खुळचट राजकारण्याच्या हवाली केलंय. इतिहासकाराच्या अवकृपेनं शिवरायांना दैवत्व प्रदान करण्यात आलं. या देवाचा इतिहास नव्या पिढीला माहितीरंजनाच्या स्वरूपात सांगण्यात येऊ लागला.
कथा-कादंबर्‍यातून सोयीचे शिवराय साकारले जाऊ लागले. यात रंजकता तर आलीच, सोबत काही मिथकं व शौर्याच्या कहाण्या आल्या. हिंदू, क्षत्रिय, मराठा यांचे ब्रँड म्हणून कडवेपणाचं उदात्तीकरण करणं सुरू झालं. आणि बघता-बघता शिवराय पुस्तकातून बाहेर आले. पोस्टर्स, सिनेमा, व्याख्यानांतून आम्ही मिळेल ते शिवराय स्वीकारत गेलो. 
जागतिकीकरणानं शिवरायांचं मटेरियल मार्केट(भौतिक गरजा म्हणून) उभं केलं. असा हा कमोडिटी शिवबा(विक्रय वस्तू) थेट इंटरनॅशनल ब्रँडपर्यंत येऊन पोहचला. शिवजयंतीला ग्लॅमर प्राप्त झालं आणि डीजेच्या अश्लील ठेक्यावर मावळे ताल धरू लागले. कोथळा, मुजरा, हिंदूभिमानी स्लोगन्सची उत्पादने व्हॅन, चौका, शासकीय ऑफिसमध्ये सजू लागली यातून मिळणारे शिवराय आजच्या पिढीनं स्वीकारले.
शिवबांची कट्टर हिंदूधर्माभिमानी, मुस्लिम द्वेष्टा, गोब्राम्हणप्रतिपालक, जातवर्णाभिमानी, हिंदू धर्मरक्षक अशी प्रतिमा जनमाणसात रुजवली गेली. त्याचे परिणाम कळायला एक तप उलटावा लागला. इतिहासाचा असा दुराग्रह कशामुळे झाला, हे आता नवीन सांगायची गरज नाहीये. याची उत्तरे सर्वांनाच ठावूक आहेत. 
राजकारण आणि सत्तेसाठी समाजात विद्वेषाची बीजे पेरणं हा एकमेव हेतू डोळ्यासमोर होता हे आता हळूहळू कळू लागलंय. खुळचट आणि विद्वेषी राजकारणाला बळी पडून हे सर्व आम्ही केलं, असं आता चाळीशीत असलेली पिढी म्हणत असली तरी, आपल्या मुलांना आतातरी योग्य दिशा द्यावी असं त्यांना अजूनही वाटत नाहीये, ही मोठी शोकांतिका म्हणता येईल.
आता काळ बदलला, इतिहासलेखन बदललं. विशिष्ट कॅटेगरीतल्यांची बालभारतीची मक्तेदारी संपुष्टात आली. कांबळे, शिंदे, भोसले, शेख यांची तरुण पिढी इतिहास लिहू लागली, इतिहास वाचू लागली. त्यातून तरुण समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत उदयास आले. 
इतिहासशास्त्र, संस्कृती, धर्म, परंपरा, तत्त्वज्ञान याची नवी मांडणी बाहेर येऊ लागली. इरफान हबीब, हरबंस मुखिया, रोमिला थापर, एजाज अहमद, राजमोहन गांधी यांचे इतिहासलेखन ऑनलाईन बाजाराने खुले करून दिले. त्यातून राम पुनियानी, रामचंद्र गुहा, आकार पटेल, इत्यादी मंडळी जागतिक स्तरावर इतिहासाची दडवलेली माहिती, वेगळा दृष्टिकोन, आकलन आणि भाष्य बाहेर येऊ लागले.
वाचा : दोषपूर्ण लिखाणाला अकादमिक मूल्य धोक्याचे
वाचा : ‘हमारा नाम इतिहास में लिखा जायेगा क्या?’
महाराष्ट्रात कॉम्रेड शरद पाटील, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, अब्दुल कादर मुकादम, गोविंद पानसरे, मा. म. देशमुख, श्रीमंत कोकाटे, सरफराज अहमद इत्यादी मंडळीनं आत्तापर्यंतचा अगदी वेगळा मध्ययुगीन इतिहास मांडला. हळूहळू खरा इतिहास दडब्यातून बाहेर येऊ लागला. गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता?’ने खळबळ माजवून दिली. तसेच राम पुनियानी यांचे व्हीडिओने जगभरात अस्सल शिवबा पोहोचले.
महाराजांच्या सैन्यदलातही मुस्लिम होते. शिवाय अनेक अंगरक्षकही मुस्लिमच. महाराजांची लढाई धर्माविरुद्ध नसून सत्तेविरोधात होती, त्यांची कुळवाळी प्रतिमा व मांडणी बाहेर येऊ लागली. महाराजांचे गुरू कोण, भवानी तलवारीचं काय करायचं?, तुकारामाचा खूनच झालाय, असा विचारप्रवण इतिहास बाहेर येऊ लागला. शिवचरित्र आणि एक’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लासारखी नाटकं मास कम्युनिकेशन घडवू लागली.
तरुण पिढी आता नव्या इतिहासाची आणि वर्तमानाची मांडणी करू लागल्यानं माहितीचं जनरलायझेशन झालं आहे. त्यातून सत्य स्वरूपात प्रचंड माहिती समाजमनावर आदळू लागलीय. त्यामुळे येत्या एक-दोन दशकात राजकीय प्रवृत्ती सुधारेल का? याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र, सुशिक्षित समाज अफवांना आणि स्वार्थी राजकारणाला बळी पडून मोहसीन किंवा युनूस शेख घडवू देणार नाही, याची शाश्वती मात्र आम्हा तरुणांना द्यावी लागेल. कोवळ्या बालमनावर प्रहार करणाऱ्या लेखणीबहाद्दरांना चाप बसवला पाहिजे. द्वेषधारित प्रयोग बंद करता येतील का, याकडेही थोडसं लक्ष द्यावं लागेल.
इंटरनेटनं व्हर्च्युअल का असेना पण जागतिक स्तरांवर संवाद घडवून आणलाय. आंतरजालातून अफाट माहितीचं दालन अचानक समोर आलं, त्यातून नवी विचारप्रणाली डेव्हलप होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रचंड माहितीजालात आजचा यंगस्टर्स भरकटलाय. हे काहीअंशी खरं असली तरी, पूर्णत: सत्य नाही.
सोशल मीडियातून भरकटलेल्या वृत्तीनं कधी पुण्यात मोहसीन, दादरीत अखलाक तर दिमापूरचा शरफुद्दीन घडवलाय. मात्र, यातून तरुणाई मोठा धडा घेऊ शकते. भरकटणाऱ्या विखारी वृत्तींना ओळखता येऊ शकतं. आता कुठे युनूस शेख किंवा मोहसिन शेख घडणार नाही याची काळजी घेता येईल.

कलीम अजीम, पुणे
Follow on Twitter @kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: द्वेषाच्या भांडवली बाजारात 'कमोडिटी शिवबा'
द्वेषाच्या भांडवली बाजारात 'कमोडिटी शिवबा'
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPE8LXSKLM6WomcEtWCKzkD5yDuemLKXyyfZNwy2_ibCMekNFz0HOvMruL3mDviZ53HG60NsXmcEqmPI8i6ur32GyZ7kRFfVrGXKTMg7fHu40GfGX_uFd3lz1PBBAFdOm6Hub4NhiD3tT1/s640/Baj+Shivaji-Afzalkhan.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPE8LXSKLM6WomcEtWCKzkD5yDuemLKXyyfZNwy2_ibCMekNFz0HOvMruL3mDviZ53HG60NsXmcEqmPI8i6ur32GyZ7kRFfVrGXKTMg7fHu40GfGX_uFd3lz1PBBAFdOm6Hub4NhiD3tT1/s72-c/Baj+Shivaji-Afzalkhan.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/02/blog-post_19.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/02/blog-post_19.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content