शिवजयंतीदिनी मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याला मारहाण


शिवजयंतीदिनी लातूर जिल्ह्यातील पानगांवमध्ये एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. कर्तव्य बजावत असलेल्या एका शासकीय अधिकाऱ्याला संवदेवनशील भागात झेंडे लावण्यास मनाई केल्याने जमावाने पोलीस स्टेशनवर हल्ला केला. त्या पोलिसांचा दोष इतकाच होता की, ते मुस्लिम होते. 
भगवे झेडें लावण्यास मनाई केल्याचा राग मनात ठेवून शिवजयंती साजरा करणाऱ्या जमावाने युनूस शेख यांना मारहाण करत गावातून धिंड काढली. आमच्या महाराष्ट्र-१ न्यूज चॅनलमध्ये ही बातमी ध़डकताच त्याचे विज्युअल बघून अंगावर काटा आला. घटनेच्या आठवडाभरानंतर बरीच माहिती जमा करून मी हा लेख लिहिला आहे. सदर घटना केवळ नोंद म्हणून शब्दबद्ध केली आहे...
पानगांवच्या हल्ल्या प्रकरणी कडक कारवाई करण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिलंय. हा हल्ला व्यक्तिगत नसून तो, पोलीस दलावरील हल्ला असल्याचंही यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपलब्ध माहितीच्या आधारे अद्याप या प्रकरणात एकूण १८ जणांना ताब्यात घेतलं असलं तरी मुख्य आरोपीसह ६५ जण फरार आहेत.
घटनेचा पूर्ण तपास करण्याच्या सूचना दिल्यानं स्थानिक पोलीसदलाकडून निपक्षपाती कारवाईची अपेक्षा केली जाऊ शकते. मात्र ही भयाण आणि अंगावर काटा आणणारी घटना विसरणं शक्य नाहीये. राज्यभर शिवजयंती शांततेत साजरी केली जात असताना, लातूर जिल्ह्यात असा अमानूष प्रकार घडतो, ही खुप मोठी निंदनीय आणि लाजीरवाणी बाब आहे.
रेणापूरचं मुख्य पोलीस स्टेशन पानगावपासून अवघ्या दहा-पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे. असे असूनही अतिरीक्त पोलीस कर्मचारी युनूस शेख यांच्या मदतीला पोहचू शकले नाही. शासकीय सेवा बजावत असलेल्या ५७ वर्षीय सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याला उन्मादी जमावानं पोलीस स्टेशनमध्ये घुसून बेदम मारहाण केली. युनूस शेख यांनी बेशुद्ध पडण्याचं सोंग घेतलं नसतं तर, अंगात रक्त संचारलेल्या जमावानं युनूस शेख यांचा बळी घेतला असता.
दोन दिवस उलटूनही ही भीषण घटना माध्यमांनी दडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला. मात्र, सोशल मीडियामुळे ही घटना उघडकीस आली. २० फेब्रुवारीला दिल्लीच्या ‘टू सर्कल’ नावाच्या वेबसाईटनं पहिल्यांदा रक्तरंजीत फोटोसह बातमी प्रकाशित केली. (मात्र, जिल्हा वृत्तपत्रानं या प्रकरणासंबधी डोळेझाक करणं पसंत केलं) बघता-बघता दिवसभर सोशल मीडियावर बातमी वाऱ्यासारखी पसरली.
एकंदर घटनाक्रम पाहता अनेक प्रश्न उपस्थित झाले. एक म्हणजे अवघ्या १० किलोमीटर अंतरावर रेणापूरचं पोलीस स्टेशन होतं, युनूस शेख यांनी मदत मागूनही वेळेवर मदत का पोहचली नाही? पोलीस कर्मचाऱ्याला मारण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर जमाव कसा जमला? हा एक षडयंत्राचा भाग होता का, आणि तो कुणी रचलं असावं? मीडियानं बातमी का दाबली? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.
घटना आणि उन्मादी जमाव
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पानगांवमधील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवजयंतीनिमीत्त भगवे झेंडे लावण्यात आले. त्यावेळी गावात बंदोबस्तासाठी असलेले सहाय्यक पोलीस युनूस शेख यांनी उपस्थितांना हा ‘भाग संवेदनशील आहे, इथं दलित सवर्ण वाद वाढेल तुम्ही झेंडे लावू नका’ अशी समज दिली.
थोड्याशा वादानंतर जमाव झेंडे काढून निघून गेला. मात्र, १९ फेब्रुवारीला सकाळी आठच्या सुमारास एका राजकीय पक्षाचा स्थानिक पुढारी पोलीस स्टेशनवर आला. वर्दीवर असलेल्या युनूस शेख यांच्याशी अरेरावी करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तू जे केलंस चुकीचं केलंय. मी आत्ता पानगांव बंद करतोय. याचं फळ तुला भोगावे लागतील म्हणत धमकी देऊन निघून गेला.
यानंतर लगेचच युनूस शेख यांनी रेणापूर पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली. पीआयच्या खासगी नंबरवर फोन करुन इथंली परिस्थिती चांगली नसून अतिरीक्त बंदोबस्त पाठवण्याची विनंती केल्याचं युनूस शेख सांगतात.
यानंतर काही वेळात १०० पेक्षा जास्त संख्येनं असलेला जमाव पोलीस स्टेशनवर धावून आला. नाईट ड्युटीवर असलेल्या सहाय्यक पोलिसांवर जमाव तुटून पडला. पोलीस स्टेशनची मोठी नास-धूस करण्यात आली. टेबलं-खूर्च्या फेकून देण्यात आल्या. वायरलेस तोडण्यात आलं.
फायली फाडण्यात आल्या. जमावानं युनुस शेख स्टेशनमध्येच गाठून बेदम मारण्यास सुरवात केली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अन्य पोलीस कर्मचाऱ्याला ‘तुम्ही मध्ये पडू नका, तुम्हाला प्रकरण माहित नाही’ म्हणत जमावानं कर्मचाऱ्याला दम देत निघून जाण्यास भाग पाडलं. यानंतर जमावाकडून युनुस शेख यांना काठ्या, रॉड आणि लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
सभ्य समाजाला लाजवेल अशा भाषेत वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली गेली. लहान मुलांनाही मारण्यासाठी सांगण्यात आल्याचं युनूस शेख सांगतात. इतकं झाल्यानंतरही जमाव थांबला नव्हता, तर त्या पोलीस अधिकाऱ्याची हातात भगवी झेंडे देऊन गावातून धींड काढण्यात आली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला या मारहाणीचा व्हिडिओ पाहता बाकी काहीच सांगायची गरज उरत नाही. सबंध दोन तास गावातून जमाव युनूस शेख यांना मारहाण करत फिरवत होता. युनूस शेख यांना जिथं झेंडे लावण्यास मनाई केली होती, त्याच चौकात फरफटत आणण्यात आले.
त्यांच्या हातानं झेंडे लावण्यास सांगण्यात आले, यानंतर शेख यांच्याकडून आरती करवून घेतली. यानंतर पुन्हा शेख यांना पोलीस स्टेशनमध्ये फरफटत आणण्यात आले. परत एकदा अमानूष जमाव शेख यांच्यावर तुटून पडला.
पीआयची भूमिका संशयास्पद
पानगांव ते रेणापूर १० ते १२ किलोमीटरचं अंतर, रेणापूरच्या मुख्य पोलीस ठाण्यावर सूचना देऊनही कोणीही आलं नाही. दिड-दोन तास हा थरार चालू होता. मारहाण झाल्यानंतर पुढाऱ्यानं युनूस शेख यांना चौकातून पोलीस स्टेशनला आणलं. यानंतर त्यानंच फोन लावून पीआयला माहिती दिली. पीआयचा फोन बघून युनूस शेख यांना धीर आला. त्यांनी पुढाऱ्याच्याच फोनवरुन पुन्हा एकदा पीआयला लवकर येण्याची विनंती केली.
यानंतर बऱ्याच वेळानं अतिरिक्त पोलीस कर्मचारी आल्याचं युनूस शेख सांगतात. यावरुन प्रश्न असा उपस्थित होतो की, पोलिसांनी आपल्याच कर्मचाऱ्याप्रती भूमिका संशयास्पद वाटते. आपल्याच सहकाऱ्याला अशा स्थितीत सोडणं म्हणजे, एका मुसलमान अधिकाऱ्याप्रति आकस आणि हिणकसपणा असणं सिद्ध होतं.
 
युनूस शेख हे आधी रेणापूरच्या मुख्य पोलीस चौकीत सेवा बजावत होते. त्यामुळे वरिष्ठाच्या अशा वागण्याबाबत संशयास जागा आहे. काहीच दिवसापूर्वी त्यांना पानगावला पाठवण्यात आल्याचं युनूस शेख सांगतात. 
शेख यांच्या रिटायरमेंटला केवळ १४ महिने उरले आहेत. मग आपल्याच वरिष्ठांनी केवळ तुच्छतावाद आणि सुडबुद्धीतून युनूस शेख यांना वाऱ्यावर सोडलं होतं का? अशा संशयासही जागा उरते. मारहाण करणाऱ्या त्या स्थानिक गावगुंड पुढाऱ्यानं याआधीही पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचं त्याच्यावर आरोप असल्याचं गावकरी सांगताहेत.
विरोधी वातावरण
देशात भाजप सत्तेवर येताच प्रतिकांच्या राजकारणाला अचानक बळकटी आली. घरवापसी, ... जिहाद, बीफ बॅन, राष्ट्रवाद, देशद्रोही आणि नुकतच सुरु असलेलं भारतमाता अशा प्रतिकांची सत्तापक्षाकडून चलती सुरु झालीये. इतर मुद्द्यावरुन लक्ष वळविण्यासाठी हे भंपक प्रकार सुरु असल्याचं स्पष्ट असलं तरी, प्रशिक्षीत ‘भक्तां’च्या समुहाकडून सामान्यांच्या मानसिकतेवर भलतंच काही बिंबवण्याचं कार्य सुरु आहे.
भाजप आणि संघ परिवाराला अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद वदवून घेण्यासाठी देशात असहिष्णूतेचं वातावरण तयार केलं जात आहे. देशप्रेमाचे परिमाणं तयार करुन अनेकांना सरसकट मोजपट्टी लावून निकाली काढलं जात आहे. देशातल्या पांढरपेशा वर्गानं सत्तेची कूस बदलताच लाळघोटेपणा सुरु केला होता. मात्र आता सामान्य मध्यमवर्गदेखील अशा भंपक प्रतिकं आणि परिमाणांच्या आहारी गेलाय.
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तो सहिष्णूतेच्या नावाखाली असहिष्णू होत चाललाय. त्यातून या समुहाचं उन्मादी जमावात रुपांतर होऊ लागलंय. अशा उन्मादी जमावाकडून विशिष्ट धर्म आणि समुदायाविरोधात अस्थिरतेचं वातावरण तयार केलं जातंय. त्यातूनच कधी दलित वळी पडतोय तरी कधी मुस्लिम.
हैदराबादच्या रोहिथ वेमुला या रिसर्चर विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे निखारे विझले नाहीत तोपर्यंत दिल्लीच्या जेएनयूमध्ये कन्हैय्या अनिर्बन आणि उमर खालिदचा बळी घेण्यासाठी देशभरातून विखारी अवसान घेण्याचा प्रयत्न झाला.
झुंडीचे साम्राज्य
वर्षभरापूर्वी नागालँडमध्ये शरफुद्दीनचं शिरकाण करण्यात आलं. तर ६ महिन्यापूर्वी बीफ बाळगल्याच्या संशयावरुन दादरीमध्ये अखलाख आणि श्रीनगरमध्ये जाहीद अहमद यांच्या मृत्यूचं प्रदर्शन मांडण्यात आलं. या तीन हत्या पोलिटीकल मर्डर असून त्या केवळ मुस्लिमद्वेशातूनच करण्यात आल्याचं लेखकाचं मत आहे. आणि याच उन्मादी जमावानं नुकतंच लातूरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. इथं मात्र जमावानं प्रतिकं बदलली.
शिवरायाच्या नावानं बळी घेण्याचे प्रकार पुरागामी महाराष्ट्राला नवे नाहीत. बहुजनप्रतिपालक शिवराय सोयीस्कररित्या लपवून भगवा शिवबा काढण्यात आला. ज्या शिवरायाच्या नावानं एका पोलीस अधिकाऱ्याचा बळी घेण्याचा प्रयत्न झाला.
त्या शिवरायांना असा धार्मिक उन्माद अभिप्रेत होता का? ज्या दिवशी पानगावमध्ये शिवबाच्या नावानं युनूसचा बळी घेण्याचा प्रयत्न सुरु होता, त्याच दिवशी पुण्यात ३ हजार उर्दू भाषिक मुलं-मुली शिवरायांच्या नावानं सुरु असलेल्या अभिवादन रॅलीत सामील होते. शिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा शहरात शिवबांना अभिवादन करण्यासाठी हजारो मुस्लिमांनी सहभाग घेतला होता. मात्र, पानगावात परिस्थिती वेगळी होती.
वर्षानूवर्षापासून शिवबाचं नाव घेऊन जाळपोळ आणि दंगली घडविण्याचं कार्य अजुनही अविरतपणे सुरुंय. एकेकाळी संपूर्ण स्वराज्याची घोषणा देणाऱ्या महाराजाला दंगलीसाठी टूल्स म्हणून वापर होवू लागलाय. शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्माचा आदर केला, त्याच महाराजांच्या नावानं धार्मिक तेढ निर्माण केला जातोय. इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांची राखण आणि त्याचे जतन केलं, त्याच धार्मिक स्थळांना शिवप्रेमी म्हणवणारे मावळे गुलालानं रंगवण्यास धजत नाहीत.
सहजीवन धोक्यात
एकीकडे “रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये” असं म्हणणारे शिवछत्रपती, आणि दुसरीकडं रयतेची लक्तरे काढण्यास टपलेली मावळ्यांची प्रजा. शिवबाच्या स्वराज्याची संकल्पना हिच होती का? बहुजनप्रतिपालक शिवरायाची प्रतिमा एका चौकटीत बंदिस्त करुन समाजद्वेश पसरवला जातोय. यामुळेच वर्षानुवर्षापासून मुसलमानांबद्दल सामान्याच्या मनात द्वेशभाव तयार झालाय. शिवबाच्या नावानं ‘मुस्लिम द्वेशमुलक’ राजकारण केलं जातंय.
समाजमनात मुस्लिमाबद्दल गैरसमज निर्माण केला जातोय. परिणामस्वरुप मुस्लिमांच्या बाबतीत प्रशासन आणि समाजव्यवस्थेचा दृष्टिकोन एकांगी आणि पूर्वग्रहदूषित झालाय. समाजमनात तुच्छतावाद, हिणकसपणा आणि आकस तयार झालाय.
पानगावच्या घटनेतील मुख्य आरोपी कोण आहेत, घटना नेमकी कशासाठी घडली हो आता वेगळं सांगायची गरज नाहीये. पण धर्माचं नावं विशिष्ट समुहघटकावर कम्यूनल हल्ले सुरुच आहेत. युनूस शेख यांच्या जागी कांबळे, देशमुख, जोशी असले तर हा हल्ला झाला नसता हे स्पष्ट आहे. केवळ युनूस शेख असल्यानं त्यांच्यावर हल्ला झालाय. या घटनेतील मुख्य आरोपी हाती येतील की राजाश्रय घेऊन मुक्तपणे फिरतील.
स्वत:ला पुरोगामी म्हणवत मिरवणाऱ्या संभाजी ब्रिग्रेडच्या संघटकांना या घटनेचा साधा निषेधही करावासा वाटला नाही. अनेक मुस्लिम मावळ्यांना रायगडावर घेऊन जाणारेदेखील चिडीचूप होते. राज्यभरातून ठाराविक वर्ग सोडला तर या घटनेचा तिळमात्र फरक कोणावरही पडल्याचं जाणवलं नाही. मात्र, यानंतर झालेल्या ‘भारत माता’च्या मुद्द्यावर संघासोबत इतर सो कॉल्ड संघटकांनी आमदाराच्या निलंबनाला पाठिबा देत स्वत:ला राष्ट्राभिमानी सिद्ध करत होते. असो.
या घटनेला माननीय मुख्यमंत्र्यांनी सदर घटना व्यवस्थेवर हल्ला असल्याचं सांगितलं. तर गृहराज्यामंत्र्यांनी पोलीस दलावर हल्ला असल्याचं सांगत पीडित पोलीस अधिकाऱ्याची बदली केली. तर शासकीय कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत रेणापूरच्या पीआयला निलंबीतही केलं. मुख्यंमंत्री आणि गृहराज्य मंत्र्यांनी वेळेप्रसंगी गंभीर दखल घेत झाल्या घटनेवर पडदा टाकायचा प्रयत्न केला. 
मात्र, या घटनेनंतर मुंबई आणि वसईमध्ये पोलीसावर हल्ले झाले. या हल्ल्याची कारणं वेग-वेगळी होती.
देशात घडलेल्या अलिकडच्या काही घटना पाहता, सहिष्णू-असहिष्णूतेच्या पलिकडं जाऊन माणूसपणा गमावून बलयोय का? हा प्रश्न सतावतोय. प्रसार माध्यमं, सोशल मीडिया गॉसीप्स, चर्चा, मते मतांतरे आणि वागण्या बालण्यातून केवळ द्वेश पसरवण्याचं काम सुरु आहे.
खोटी प्रतिकं वापरुन सामान्याचं लक्ष वळविलं जातंय. जेएनयू प्रकरणानंतर देळात वेगळीच चर्चा सुरु झालीय. भारप आणि त्यांच्या समविचारी संघटनांनी देशात देशभक्तीचं सर्टीफिकेटस वाटायला सुरु केलंय. सरकारच्या धोरणाविरोधात बोललं की देशद्रेही न पटणारं बोललं की अण्टीनॅशनल, संघाच्या विरोधात बोललं की, पाकिस्तान टूरिझमला प्रोत्साहन दिलं जातंय.
डॉक्टरेट व्हिडिओचा आधार घेऊन केंद्र सरकारची अक्खी यंत्रणा काही संशोधक विद्यार्थ्यांना भारताचे शत्रू म्हणवू लागली. लोकप्रतिनीधी भर कोर्टात पत्रकार आणि कार्यकर्त्यांना तुडवू लागली. असं म्हटलं गेलं की, २०१४ च्या लोकसभेत तरुणाच्या मतांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळेच विरोधी पक्षाची परंपरा असलेल्या भाजपला सत्तेची चव चाखता आली. मात्र या तरुण वर्गाचा सत्ताधिशांनी सर्रास वापर सुरु झालाय.
अजुनही या आत्मा आणि सदसदविवेकबुद्धी गामावून बसलेल्या तरुणाईचे डोळे बंद आहेत. रोजगार आणि शैक्षाणिक कार्य सोडून प्रतिकांच्या मागावर आजचा हा तरुण आहे. लेखाच्या सरतेशेवटी झारकंडच्या रांचीमध्ये दादरीची पुनरावृत्ती घडल्याची बातमी आली.
म्हशीच्या तस्करीच्या आरोपावरुन २ तरुणांना मोरुन त्यांचे मृतदेह झाडावर टांगल्याची माहिती आली. मन स्तब्ध झालेच परंतु स्वत:चाच एकदा राग आणि कीव आली. बघूया अजुन किती अखलाक आणि रोहित चे बळी जातात. कारण आम्ही वोट देवून आद्यकर्तव्य पूर्ण केलंय ना.... बघूया व्यवस्थेवर अजुन किती हल्ले होणार आणि ही असामान्य भक्तांकडून देशाची मान आळखीण किती खाली घातली जाईल....

कलीम अजीम, मुंबई
Follow On Twitter @kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: शिवजयंतीदिनी मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याला मारहाण
शिवजयंतीदिनी मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याला मारहाण
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgrWJirJ84clx9Y6RKY4poKGH1zGGfvB2U8lxDmLYfgxJCfNl_mlm7PZiQQeql9MD3I3ZZxWUMfBD_4cfpv8hAtK97DwmntOaZmxDM5Caw6c-2Kn_t0g60dnaxW_RLNN9k5JfgLVO7srvZA/s16000/Muslim+policeman+was+allegedly+beaten+by+a+mob+and+made+to+parade+with+a+saffron+flag.jpeg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgrWJirJ84clx9Y6RKY4poKGH1zGGfvB2U8lxDmLYfgxJCfNl_mlm7PZiQQeql9MD3I3ZZxWUMfBD_4cfpv8hAtK97DwmntOaZmxDM5Caw6c-2Kn_t0g60dnaxW_RLNN9k5JfgLVO7srvZA/s72-c/Muslim+policeman+was+allegedly+beaten+by+a+mob+and+made+to+parade+with+a+saffron+flag.jpeg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2016/03/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2016/03/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content