जोतिबा फुलेप्रणित हिंदू-मुस्लिम सहजीवन


हात्मा फुले हिंदू-मुस्लिम सहजीवन व मागास मुसलमानांच्या प्रगतीविषयी किती आग्रही होते, हे त्यांच्या ‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथातून दिसून येते.

जोतिबांनी या ग्रंथात कष्टकरी व श्रमिक हिंदू आणि मुसलमानांची शैक्षणिक, सामाजिक व मानसिक प्रगती व्हावी, या संदर्भात ठिकठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. शिवाय वेळोवेळी दास्यप्रथेचे दाखले देऊन त्यातून बाहेर पडण्याचे उपदेश, सूचना, संकेत दिलेले आहेत. वेळेप्रसंगी कान उपटण्याचे देखील प्रयत्न त्यांनी केलेले दिसतात.

लिहितात,

[हजरत महमद पैगंबराच्या निस्पृह शिष्यमंडळीचें जेव्हां या देशांत पाऊल पडलें, तेव्हा तें आपल्या पवित्र एकेश्वरी धर्माच्या सामर्थ्यानें आर्यभटांच्या मतलबी धर्माचा फट्टा उडवू लागले. यावरून कांही शूद्र मोठ्या उत्साहानें महमदी धर्माचा स्वीकार करूं लागले, तेव्हां बाकी उरलेल्या अक्षरशून्य शूद्रांस नादी लावण्याकरितां महाधूर्त मुकुंदराज भटांनी जे संस्कृतच्या उताऱ्यावर थोडी नास्तिक मताची कल्हई करून त्याच्या विवेकसिंधु नामक एक प्राकृत ग्रंथ करून त्यांच्यापुढे मांडला व पुढे इंग्रज बहादराचा अम्मल होईतोपावेतों आर्यभटांनी आपल्या भाकड भारतरामायणांतील शेतकऱ्यांस गोष्टी सांगून, त्यांना उलटे मुसलमान लोकांबरोबर लढण्याचे नादीं लाविले; परंतु अक्षरशून्य शेतकऱ्यांस मुसलमानांच्या संगतीनें आपल्या मुलां, विद्या शिकविण्याचें सुचू दिलें नाही. यामुळे इंग्लिश अम्मल होतांच सहजच एकंदर सर्व सरकारी खात्यांनी मोठमोठ्या महत्त्वाच्या जागा आर्यब्राह्मणांस मिळून ते सर्वोपरी शेतकऱ्यांस लुबाडून खाऊं लागले व आर्यभट, इंग्रज वगैरे एकंदर सर्व युरोपियन लोकांस जरी मांगामहारासारखे नीच मानीत आहेत, तथापि त्यांच्या महाधूर्त पूर्वजांनीं महापवित्र मानलेले वेद, ज्यांचीं शेपटेंसुद्ध शूद्र शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडूं देत नाहींत, ते सोंवळे बुरख्यांतील वेद, हल्ली त्यांच्यातील मोठमोठाले जाडे विद्वान काखेत मारून गोऱ्या म्लेंछ लोकांच्या दारोदार जाऊन त्यांस शिकवित फिरतात. परंतु हे भटब्राह्मण खेड्यापाड्यांनी सरकारी शाळांत शूद्र शेतकऱ्यांच्या अज्ञानी मुलांस साधारण विद्या शिकवितांना थोडी का आवडनिवड करतात ? यावरून शेतकऱ्यांबरोबर अशा ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल ? (पान-३१७)]

अनेक अंगाने या टिपणाचं विश्लेषण होऊ शकतं. पण त्यासाठी वर्तमान सामाजिक व्यवस्था व संदर्भाची चौकट आखून घ्यावी लागते. असं असलं तरी त्यातील अनेक बाबी आजही तंतोतंग लागू पडतात.

जोतिबांना आजच्या संदर्भात वाचले तर त्यांचे विचार किती दूरदृष्टीचे होते हे दिसून येते. त्यांचा हा ग्रंथ १८८३ साली प्रकाशित झालेला होता. म्हणजेच तोपर्यंत हिंदू-मुस्लिम सहजीवनाची एक मोठी प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू होती, त्याचं प्रतिबिंब फुलेंच्या या ग्रंथातून दिसून येते.

अर्थात, अशा प्रकारच्या सहजीवनाला कुठलेही गालबोट लागले नव्हते.. किंवा ‘ते आणि आम्ही’ अशा प्रकारचा विचार तोपर्यंत प्रसूत झालेला नव्हता. हा विचार प्रसृत होण्यासाठी पुढच्या १० वर्षांत जे काही प्रयत्न झाले, ते पाहून फुले विचारांची मार्मिकता स्पष्ट होते.

फुले हिंदू-मुस्लिम सहजीवनाचे कर्मठ समर्थक होते. दोघांची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती समान आहे, असं त्यांना वाटत होतं. शूद्रातिशूद्रांना वर्णाश्रम आणि जातिव्यवस्थेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी धर्मांतर हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याचं फुले या ग्रंथात प्रतिपादन करतात. नंतरच्या काळात बाबासाहेब आंबेडकर देखील अशाच प्रकारचा विचार मांडत होते. म्हणजेच फुलेंचा कालावधी आणि १९३०-३५ दरम्यानची परिस्थिती अस्पृश्य व शूद्रातिशुद्रांसाठी सारखीच होती. हाच विचार अशाच पद्धतीने रामासामी नायकर यांनी देखील मांडला होता. म्हणजेच जातिव्यवस्था व तिने लादलेल्या गुलामगिरीच्या जोखडातून सुटण्यासाठी ती व्यवस्था अमान्य करणं हाच एक तत्कालीन मार्ग या थोर विभूतींना दिसत होता.

‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथात ठिकठिकाणी दास्य प्रथा व त्यातून मुक्तीचे मार्ग फुले सांगतात. हिंदू मुस्लिम दोघांनी वर्णश्रमाच्या जोखडातून मुक्त होऊन प्रगती साधावी असा त्यांचा वारंवार आग्रह आहे. म्हणजेच संमिश्र सहजीवनाचा आग्रह ते या माध्यमातून मांडतात.

परंतु फुलेंच्या निधनानंतर या प्रक्रियेत खंड पाडण्याचे अनेक सुनियोजित प्रयत्न झाले. जोतिबांना ज्या व्यव्सथेला आव्हान दिलं होतं, त्याच व्यवस्थेच्या समर्थकांनी फेलवनिरोधात षडयंत्रे आखून फुलेंचा विचार कालबाह्य ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यांना धर्मविरोधी घोषित केलं. या प्रक्रियेचा भाग म्हऊन संमिश्र जीवनपद्धती उद्ध्वस्त करण्याचे प्रकार सुरू झाले. या प्रक्रियेत टिळक अगदी उघडपणे समार येतात.

१८९३ला ‘प्रभासपट्टणम’ येथील एका घटनेच्या अनुषंगाने मुंबईत हिंदू-मुस्लिम दंगल घडली. या दंगलीच्या अनुषंगाने टिळकांनी केसरीमध्ये जे वृत्तांकन केलेलं आहे ते खूपच प्रक्षोभक होते. त्यांनी एकामागून एक असे असंख्य लेख लिहिले. त्या सर्व लेखनात टिळक दंगली वृत्तीचा सर्व दोष मुसलमानांवर देत होते व हिंदूंना पाठीशी घालत होते. धर्मांध हिंदूंनी केलेल्या सर्वच दुष्कृत्यांना, हिंसेला ग्राह्य मानत होते.

टिळकांच्या या वृत्तीवर म्हणजेच हिंसेला उत्तेजन देणाऱ्या लेखनावर आगरकरांनी सडेतोड हल्ला केलेला होता. आगरकरांनी या दंगली संदर्भात केलेले लेखन अत्यंत व्यवहारिक आहे. त्याचप्रमाणेच दोन्ही दोषी गटांची कानउघाडणी करणारे आहे.

आगरकर आणि टिळकांनी केलेलं या संदर्भात केलेलं लेखन समोरासमोर ठेवले तर दंगलीतील हल्लेखोरपेक्षा अधिक टिळक दोषी दिसून येतात. आगरकरांनी हिंदू आणि मुस्लिम दोघांतील सैतानी वृत्तीला बरोबर जबाबदार ठरवलं होतं. पण ब्राह्मणी हिंदू धार्जिणी भूमिका घेतात व बचावात्मक होतात. हे करत असताना ते उघड-उघड कर्मठ हिंदूंना पाठीशी घालतात व हिंसक प्रवृत्तीचा सर्व आरोप मुसलमानांवर लादतात.

वस्तुतः टिळकांनी केलेल्या लेखनामुळे पुढच्या काहीच काळात पुण्यात दंगल घडली.‌ जी त्या काळातील सर्वात मोठी दुसरी दंगल मानली जाते. टिळक या संदर्भात जे लेखन व प्रचार करत होते, त्या प्रवृत्तीचा इशारा ‘शेतकऱ्यांचा असूड’मध्ये महात्मा फुले यांनी १० वर्षांपूर्वी दिलेला होता.

धर्माच्या नावाने दास्यप्रथेची व्यवस्था तयार करणाऱ्या मानसिकतेवर फुले सातत्याने प्रहार करत राहिले. बहुजन समाजाने अप्पलपोटी व स्वार्थी धर्माभिमानी लोकांचे डावपेच ओळखून वेळीच सजग व्हावं असं त्यांना अभिप्रेत होतं.‌ हा ग्रंथ त्यांनी आपल्या या उदात्त उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी लिहिला होता.

मुकुंदराज स्वामी अंबाजोगाई येथील संत मानले जातात. त्यांची ख्याती मराठी साहित्यात अनेक ठिकाणी वर्णिलेली दिसून येते. बहुतांश ठिकाणी त्यांच्या गौरव गान दिसतं. परंतु महात्मा फुले यांनी त्यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला चढवला तो वेगळा विचार करण्यास प्रवृत्त करतो. उपरोक्त टिपणात त्याचा एक संदर्भ आलेला आहे. परंतु याच पुस्तकात इतर ठिकाणी ‘विवेक सिंधू’ व ‘मुकुंदराजा’वर त्यांनी धार्मिक गुलामगिरीच्या अनुषंगाने हल्ला चढवला आहे. त्यांच्या कृतीला फुले आक्षेपार्ह ठरवितात.

अशाच प्रकारच्या धर्मवादी व सांप्रदायिक वातावरण तयार करणाऱ्या इतरही अनेक वृत्तींवर फुले या ग्रंथात हल्ला सातत्याने चढवतात.

या बीज ग्रंथाचा मुख्य गाभा धर्म, श्रद्धेच्या व पुरोहितवादाच्या आड लपलेल्या विकृत प्रवृत्तीवर हल्ला चढविणे असा आहे. बहुजनांना दास्य प्रथेत लोटणाऱ्या कारक घटकांची वस्तुनिष्ठ चर्चा अत्यंत संयत व सोप्या भाषेत केलेली आहे.

कलीम अज़ीम, पुणे
मेल : kalimazim2@gmxil.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,54,इस्लाम,43,किताब,26,जगभर,132,पत्रव्यवहार,4,राजनीति,309,व्यक्ती,27,संकलन,65,समाज,272,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: जोतिबा फुलेप्रणित हिंदू-मुस्लिम सहजीवन
जोतिबा फुलेप्रणित हिंदू-मुस्लिम सहजीवन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhdHu0Y-OsXQ2EOoi7bidxRhWwqiKd3cx4Xrp_dqp8BXFp8Z8N6eV9Ai8ouaMQmoG37eBjQgVsxLvrk6qu6Yd5D5nGo8r8XhSIFAG4pDZpzpoSlPnoU2DroNfrvcMq2v2B8tNZh-SO7DWdiDauFFQHV7vXVoWzC9rzqEfNkvF0SsZNkUVrNEnVA3O9rQHGC/w640-h392/Mahatma%20Phule.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhdHu0Y-OsXQ2EOoi7bidxRhWwqiKd3cx4Xrp_dqp8BXFp8Z8N6eV9Ai8ouaMQmoG37eBjQgVsxLvrk6qu6Yd5D5nGo8r8XhSIFAG4pDZpzpoSlPnoU2DroNfrvcMq2v2B8tNZh-SO7DWdiDauFFQHV7vXVoWzC9rzqEfNkvF0SsZNkUVrNEnVA3O9rQHGC/s72-w640-c-h392/Mahatma%20Phule.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2026/04/blog-post_11.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2026/04/blog-post_11.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content