दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

हा ऑगस्ट १९९०ला भारतात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केली. त्याच्या परिणामातून उच्च व अभिजन जाती-समुदायात घडलेला गदारोळ सर्वज्ञात आहे. पंतप्रधान सिंग यांच्या ह्या महत्त्वाच्या निर्णयानंतर देशभरात विविध धर्मातील ओबीसींचे संघटन सुरू झाले. संघठन बांधणीच्या या कार्यात वेगवेगळे लोक आपापल्या पातळीवर सक्रिय झाले होते. महाराष्ट्रात विशेषत: राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी पक्षाच्या काळापासून वेगवेगळ्या धर्मातील ओबीसींचे संघटन मूळ धरत होते.

काका कालेलकर आयोगापासून ओबीसींचे एकत्रिकरण व त्यांच्या हक्काची मागणी सुरू झालेली होती. पुढे त्यात मंडल आयोग लागू झाला पाहिजे, ही मागणी प्रामुख्याने जोडली गेली. ह्या आयोगाची पार्श्वभूमी आणि एकूण ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात बैठका, चर्चा, सभा आणि परिसंवाद सुरू झालेल्या होत्या. त्यात जनार्दन पाटील नावाचे आगरी समाजाचे महाराष्ट्रामधील एक प्रमुख नेते होते.

बहुजन चळवळीतले ‘अर्ध्वयू’ ज्याला म्हणता येईल, असे हे व्यक्तिमत्त्व! नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे हे, आंदोलन सध्या सुरू आहे, त्या दिबांपेक्षा जनार्दन पाटील सिनियर होते. त्यांचे म्हणणे होते की सर्व धर्मातील ओबीसी संघटित झाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, त्या-त्या जातीतील प्रश्न कोणते आहेत, त्यांचे डॉक्युमेंटेशन करणे, छोट्या-छोट्या पुस्तिका प्रकाशित करणे, इत्यादी प्रकारची कार्य त्यांनी सुरू केलेली होती.

पाटील अत्यंत गरीबी व आर्थिक हलाखीच्या परिस्थितीतून आलेले होते. अत्यंत साधे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. पण विचाराने अत्यंत विद्वान होते. जातींच्या संघठनाकरीता वेगवेगळ्या गावांमध्ये ते पायी चालून जात. विशेषत: ठाणे, पालघर, मुंबई आणि कोकण परिसराचे वैशिष्ट्य असे की इथे ज्याला आपण ओबीसी म्हणतो हा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. जसे आगरी, कोळी, कोकणी, कुणबी, भंडारी अशा ओबीसी समकक्ष अनेक जाती या परिसरात व ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. अशा ओबीसींचे संघटन ते करत असत.

पाटील यांच्या या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील इतर लोकांना देखील असे संघटन करावे, अशी प्रेरणा मिळत होती. जनार्दन पाटील यांच्या बरोबर एक प्रमुख कार्यकर्ते होते, त्यांचे नाव शब्बीर अन्सारी. शब्बीरभाई मुळ जालना शहरातले. उंचापुरा असलेल्या ह्या कार्यकर्त्याचे वैशिष्ट्य असे की, त्यांना उर्दू शेरो-शायरी मुखोद्गत होती. अत्यंत ग्रामीण भागातील मराठवाडी ढंगाची दखनीमिश्रित उर्दू बोलत. शिक्षण कमी झाले असले तरी सामाजिक जाण असलेले अत्यंत प्रगल्भ व्यक्ती आहेत. ओबीसीच्या प्रश्नाबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता.

जनार्दन पाटील यांनीच त्यांना सुचवले की, शब्बीरभाई आपण मुस्लिम ओबीसीमध्ये काम केले पाहिजे. ह्या एका विचाराने महाराष्ट्रात ‘मुस्लिम ओबीसी चळवळी’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे शब्बीरभाईंनी अनेकांना ह्या संघटनेमध्ये जोडले. त्यावेळी कपिल पाटील मुंबईत मुंबई दिनांक वृत्तपत्राचे संपादक होते. त्यांनी शब्बीर अन्सारींवर ‘एका फकिराची गोष्ट’ शीर्षकाचे एक बहुचर्चित संपादकीय लिहिले होते. पुढे तेही या चळवळीशी जोडले गेले. विलास सोनवणे सारखे प्रगल्भ विचारांचे व माफुआ चळवळीतून पुढे आलेले दिग्गजही होते. ते पुण्यात राहत पण महाराष्ट्रभर त्यांचा वावर होता.

सोनवणे यांनी मुस्लिम समाज व इस्लामचा अभ्यास केलेला होता. कॉम्रेड शरद् पाटील यांच्या जातिव्यवस्थेच्या मांडणीतून मार्क्स-फुले-आंबेडकरवाद त्यांनी अमलात आणलेला होता. सार्वजनिकरीत्या त्यांनी तशी मांडणी सुरू केलेली होती. रावसाहेब कसबेदेखील या मांडणीमध्ये आघाडीवर होते. पुढे ‘माफुआ’ ह्या तत्त्वप्रणालीचा अभ्यास असलेले प्रा. फकरुद्दीन बेन्नूर हे देखील त्यात जोडले गेले. मुस्लिम ओबीसी चळवळ पुढे घेऊन जाण्याऱ्यामध्ये प्रा. बेन्नूर हे एक महत्त्वाचे नाव आहे.

खरे पाहिले तर प्रा. बेन्नूर यांना महाराष्ट्राने न्याय दिला नाही. अकॅडमिक पातळीवर ते एक उत्तम विद्वान म्हणून परिचित होते. फक्त मुस्लिम म्हणून त्यांची ओळख मर्यादित करणे न्यायाचे होणार नाही. तर ते महाराष्ट्रातील थोर राजकीय विश्लेषक होते. शिवाय राज्यशास्त्रातील नावाजलेले तज्ज्ञ होते. जसे मे. पु. रेगे, भा. ल. भोळे यांचे नाव राज्यशास्त्रात प्रसिद्ध होते, अगदी तसेच त्याकाळी प्रा. बेन्नूर यांचेदेखील नाव गाजत होते. पण पुण्या-मुंबईच्या परीघाबाहेर राहिल्याने किंवा कदाचित जातिव्यवस्थेचा (बागवान) एक भाग म्हणून असेल, पण त्यांना हवी तेवढी स्पेस मिळाली नाही.

महाराष्ट्रातच नाही तर भारताला एक अत्यंत मोठा राजकीय विचारवंत म्हणून त्यांचे नाव परिचित होते. त्याहीवेळी आणि आजही आदराने त्यांचे नाव घेतले जाते. प्रा. बेन्नूर यांना जातिव्यवस्थेचा प्रचंड अभ्यास होता. महाराष्ट्रातील सामाजिक व जातीय उतरंडीची त्यांना कल्पना होता, त्याचा वेगवेगळ्या अंगाने त्यांनी अभ्यास केलेला होता. विशेषत: मुस्लिम ओबीसी चळवळीच्या अनुषंगाने त्यांनी स्वतंत्र व अत्यंत मूलगामी अशी मांडणी त्यावेळी करत होते. अशा सर्व वातावरणाचा भाग म्हणून मुस्लिम ओबीसी चळवळ महाराष्ट्रात मूळ धरत होती.

एकूण देशात वेगवेगळ्या ओबीसी जातींच्या संघटनांचे आणि अस्मितांचे एक पर्व सुरू झालेले होते. १९७८पासून अशा प्रकारची मागणी करणारे गट महाराष्ट्रातील उदयास आलेले होते. मुस्लिम समुदायातही अशा संघटना सुरू झालेल्या होत्या. मंडल आयोग लागू झाला, तेव्हा महाराष्ट्रातील ह्या चळवळीला आणखी बळकटी लाभली. ह्या चळवळीमध्ये दोन-तीन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक तर, मंडल आयोग पूर्णत: लागू करावा ही मागणी पुढे आली. दुसरे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, हा आग्रह सुरू झाला.

सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोगावर आणलेल्या स्थगिती निकालामुळे ओबीसींचा प्रश्न बिकट झालेला होता. मंडलच्या तरतुदी लागू करावा यासाठी देशभरात सभा-समेलने, परिसंवाद सुरू झालेले होते. तर दुसरीकडे भाजपने सिंग सरकारमधून बाहेर पडून ‘मंडल विरुद्ध कमंडल’ अशी घोषणा दिली होती. अडवाणी, वाजपेयी सारखे नेते ओबीसींना दिल्या जाणाऱ्या सवलतीचा जाहिररीत्या विरोध करत होती.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभेत छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचा ठराव मांडला. मंडल आयोगाची तरतूद होती की देशांमधील ५२ टक्के ओबीसी आहेत, म्हणून त्यांना २७ टक्के आरक्षण मिळायला हवे. पण प्रश्न असा होता की, अद्याप अशा अनेक मागास जाती होत्या, ज्यांना आयोगात स्थान मिळालेले नव्हते. भारतातील ओबीसी जातींचा ‘इम्परिकल डेटा’ लोकसंख्येची जातिनिहाय गणना केल्याशिवाय मिळू शकणार नव्हता. ही माहिती जातनिहाय व त्याच्या सोशो-इकॉनोमिक आणि वास्तविक माहितीवर आधारित असते. भुजबळांनी अशी माहिती संकलित करण्याची मागणी केली. उत्तरेत कांशीराम यांनी एक गाजलेली घोषणा दिली होती, “जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी.” त्यामुळे साहजिकच उपरोक्त मागणीचे महत्त्व वाढले.

शिवाय वेगवेगळ्या जात-संघटनांनी संख्या वाढीबद्दल वेगवेगळे दावे सुरू केलेले होते. प्रत्येक संघटना व कार्यकर्ते विविध जातींच्या नोंदणीबद्दल आग्रही भूमिका मांडत होते. ह्या व इतर मागण्यासाठी राजकीय आंदोलन त्या काळात उभे राहिले. त्यातच महाराष्ट्रामध्ये ‘मुस्लिम ओबीसी चळवळ’ उभी राहिली. या सगळ्या आंदोलनाच्या पोटामध्ये एक अधिकृत अशी मुस्लिम ओबीसी चळवळ उभी राहिली. त्याचे प्रमुख शब्बीर अन्सारी होते.

सुरुवातीच्या काळात अन्सारी, विलास सोनवणे, फकरुद्दीन बेन्नूर, कपिल पाटील व त्यांच्याबरोबर अनेक छोटे-मोठे कार्यकर्ते महाराष्ट्रातील सक्रिय झालेले होते. त्यात मुंबईच्या अंजुमन इस्लाम संस्थेचे आत्ताचे चेअरमन जहीर काज़ी आणि प्रसिद्ध गीतकार हसन कमालही होते. हसन कमाल कला-साहित्य व सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव होते. तर कोकणस्थ मुस्लिम असलेले जहीर काज़ी व्यवसायाने डॉक्टर होते. दोघेही ओबीसी चळवळीचे समर्थक व कार्यकर्ते तथा मार्गदर्शक होते. काज़ी व हसन कमाल यांच्या प्रयत्नामुळे १९९० साली प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांचे ‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑरगनायझेशन’मध्ये पदार्पण झाले.

तत्पूर्वी मुस्लिम ओबीसी संघटनेची सगळी मंडळी दिलीपकुमार यांच्याकडे गेली. त्यांना सांगितले की आम्ही मुस्लिम ओबीसी चळवळ उभी करीत आहोत. त्यावेळी दिलीपकुमार त्यांच्या कारकिर्दीच्या अतिउच्च टोकावर होते. ह्या चळवळीला त्यांचा पाठिंबा मिळणे किंवा समर्थन मिळणे, मेंटॉरशिप मिळणे ही अत्यंत मोठी घटना होती. शिवाय दिलीपकुमार यांना सामाजिक प्रश्नांची जाण तर होतीच पण ते सार्वजनिकरीत्या अशा प्रकारची भूमिकाही सातत्याने मांडत होते. त्यातून प्रेरणा घेऊन मुस्लिम ओबीसी चळवळीचे हे संघटक त्यांच्याकडे गेले होते. दिलीपकुमार यांना ही कल्पना पटली. त्यांनी आपले समर्थन जाहिर केले.

या भेटीनंतर मुस्लिम ओबीसी संघटनेने मुंबईच्या भायखळा भागात एक मोठा मेळावा घेतला. या मेळाव्याला दिलीपकुमार आले. त्यांनी तिथे जोरदार भाषण दिले. त्या सभेला मी पत्रकार म्हणून हजर होतो. या सभेत त्यांनी मागास समुदायासाठी ‘पसमांदा’ हा उर्दू शब्द महाराष्ट्रात प्रथमत:च उच्चारला. पुढे परिवर्तनवादी चळवळीने हा शब्द केंद्रस्थानी आणला. आपल्या विवेचनात त्यांनी भारतातील व महाराष्ट्रातील एकूण सामाजिक प्रश्नांची मांडणी केली. त्यांना गरीब, शोषित, पीडिताबद्दल कणव होती.

भारतातील ८५ टक्के मुस्लिम पसमांदा आहेत व उर्वरित १५ टक्के इतर आहेत. मुसलमानांचे प्रश्न आणि त्याला सामाजिक व राजकीय अंगाने न्याय मिळाला पाहिजे, अशा स्वरूपाची सतत ते मांडणी करत राहिले. वर्तमानपत्रात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचा वृत्तांत प्रकाशित झालेला आहे. प्रकाशित वृत्तांमध्ये आवर्जून उल्लेख सापडतो की दिलीपकुमार यांची लोकप्रियता व प्रसिद्धीमुळे चळवळीला बळकटी लाभली. दिलीपकुमार मोठे नट होते, त्यांना उपखंडात प्रचंड लोकप्रियता होती. अर्थातच या सर्वांचा फायदा मुस्लिम ओबीसी संघटनेला झाला.

दिलीपकुमार यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त अभिनयच करीत नसे तर अत्यंत बुद्धिमान व प्रगल्भ असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते बहुभाषी होते. पंजाबी, हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि मराठी अशा विविध भाषा ते अगदी सफाईदारपणे बोलत. वास्तविक अर्थाने ते भाषा कोविद होते. उपस्थितांशी कोणत्याही भाषेमध्ये ते सहजपणे संवाद साधत. पुण्यात विद्यार्थिदशेत असताना मराठीत त्यांची अनेक भाषणे मी ऐकली आहेत. त्यांना अनेक मराठी लावण्या तोंडपाठ होत्या. तमाशाबद्दल त्यांना प्रेम होते.

त्यांनी अनेकदा जाहीर भाषणात सांगितले होते की ते फळ विक्रीचा व्यवसाय करायचे. नाशिकला व पुढे पुण्यातही काही दिवस राहिले. पुण्यात फळ विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी त्याकाळी ५००० रुपयांची बचत केली होती. तिथून ते मुंबईत दाखल झाले. म्हणतात, त्याकाळातील प्रसिद्ध सिने अभिनेत्री आणि प्रोड्यूसर देविका राणी यांनी त्यांना फळाच्या दुकानातच प्रथम पाहिले होते. अशा रीतीने ते मुंबईत व पुढे सिनेसृष्टीत दाखल झाले.

दिलीपकुमारचे कुटुंब मूळ पैशावरचे पण फाळणीनंतर ते भारतात आले. नाशिक जवळच्या देवळाली शरणार्थी कॅम्प येथे स्थिरावले. त्यांना महाराष्ट्र कळला होता आणि त्यांनी हा प्रदेश स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या संवेदनशीलतेचे एक उदाहरण म्हणजे करिअरच्या अतिउच्च टोकावर असताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीविषयी आत्मीयता होती. स्वतःहून मुंबई आणि औरंगाबादमध्ये त्यांनी आंबेडकरांची भेट घेतली होती. यातून त्यांच्या सामाजिक जाणिवा किती प्रगल्भ होत्या, याचा अंदाज लावता येऊ शकतो. पुढे ह्या जाणिवा अधिकच विकसित होत गेल्या.

त्यांनी सांगितलेले एक उदाहरण आहे, मुंबईच्या खालसा कॉलेजमध्ये ते विद्यार्थी होते. त्यांच्या फुटबॉल टीममध्ये बाबू नावाचा एक कॅप्टन होता. तो हिंदू महार होता. तोपर्यंत धर्मांतर झालेले नव्हते. त्याकाळी मुंबईसारख्या शहरात सुद्धा जातिव्यवस्था होती. त्यांच्या टीमचा दुसऱ्या टीमबरोबर सामना झाला. त्यात त्यांची टीम विजयी झाली. आनंदोत्सवात कॅप्टन बाबूने संध्याकाळी आपल्या घरी मटणाचे जेवण ठेवले.

टीमपैकी सर्वांना बोलावले, पण कोणीही आले नाही. फक्त दिलीपकुमारच एकटे तिथे हजर होते. त्यांनी विचारले, “अरे बाबू बाकी दोस्त किधर है.” बाबू म्हणाला, “वह नहीं आयेगे, मैं हिंदू महार हूँ. हम साथ खेलते है. आपस में दोस्ती है, यह बात अलग हैं.” तिथे त्यांना जातिव्यवस्थेचा दंश प्रथमत: बोचला.

अशा विविध प्रसंगामुळे जातिव्यवस्था, अस्पृष्यता त्यांना कळत गेली. त्यातून त्यांना सामाजिक भान आले. याच जाणिवेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत गरीब कलावंतांना सर्वतोपरी मदत सुरू केली होती. इतर समाजाबद्दल त्यांनी कधीही अलगता बाळगली नाही किंवा मला त्यांच्याशी काही देणेघेणे नाही, असे देखील त्यांच्या स्वभावात नव्हते.

दिलीपकुमार पेशावरचे उच्चकुलीन पठाण व जमीनदार होते. पण जातीचा अहंकार त्यांना नव्हता. मुस्लिम ओबीसी चळवळीला त्यांनी एक आत्मविश्वास दिला. तोपर्यंत देशभरात प्रसिद्ध व लोकप्रिय असा एकही मनुष्य या चळवळीत नव्हता. सगळे कार्यकर्ते होते. बाकी विचारवंत, प्राध्यापक किंवा मांडणी करणारे भाष्यकार आणि अभ्यासक होते. दिलीपकुमार यांना समाज मान्यता होती. एक अत्यंत नावाजलेले आणि एक मोठे वलय असलेले हे व्यक्तिमत्व होते.

दिलीपकुमार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मुस्लिम ओबीसी चळवळीला आणि इतरही ओबीसी चळवळीला एक आत्मविश्वास मिळाला. दिलीपकुमार जेव्हा विचारपीठावर बोलत तेव्हा त्यांना सर्वजण गांभीर्याने ऐकत. त्यांच्या विधानाच्या मोठ-मोठ्या बातम्या होता. प्रसारमाध्यमे त्यांच्या कार्यक्रमांचे वृत्तांत प्रकाशित करीत. एक प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटी ज्या वेळेस सार्वजनिक भूमिका घेऊन बोलायला लागतो, त्यावेळेस परिवर्तनवादी चळवळीला एक नैतिक बळ मिळते आणि ते मुस्लिम ओबीसी संघटनेला मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रात मुस्लिमांचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली.

एक उदाहरण म्हणून घेऊया. त्यांचे शिष्टमंडळ जेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटायला गेले. त्यावेळी तिथे भुजबळ हजर होते. दिलीपकुमार यांचे व्यक्तिमत्त्व तर प्रभावी होते पण एकूण आत्मविश्वास व बोलण्याची एक प्रभावित करून टाकणारी ढब होती. मनमोकळा संवाद व प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी होती. त्यांनी शरद पवारांना सांगितले, “भुजबळ हे माळी आहेत. त्यांना ओबीसीच्या सवलती मिळतात. मी ‘बागवान’ आहे. मग मला का त्या सवलती मिळत नाहीत? मग धर्म कोणताही का असेना!”

एक प्रसिद्ध माणूस जेव्हा असे बोलतो तेव्हा ताबडतोब त्याचा परिणाम होतो. दिलीपकुमार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने शरद पवार यांनी मुस्लिम ओबीसींचे सगळे प्रश्न धसाला लावण्याची भूमिका घेतली. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम ओबीसी जातींची यादी तयार करण्याचा निर्णय घेतला.

७ डिसेंबर १९९४ला त्याची नोटिफिकेशन काढण्यात आले. हा एक महत्वाचा निर्णय होता. कारण मुस्लिमांमधील छोट्या छोट्या अनेक जाती मंडल आयोगातून निसटल्या होत्या. या सूचीत त्या सर्वांना जागा मिळाली. ज्यात शिकलगार, फकीर, दगड फोडू इत्यादी अशा छोट्या-छोट्या जाती होत्या. धर्म म्हणून ते मुस्लिम (इस्लामी) होते, पण जातीच्या बाबतीत काहीच संदर्भ नव्हता.

अशा परिस्थितीत त्यांना सवलती कशा मिळणार? त्यांच्यामध्ये जागृती नव्हती. कोणी शिकलेली माणसे नव्हती. अशा छोट्या छोट्या जातींची यादी दिलीपकुमार यांच्या प्रयत्नामुळे व त्यांच्या नैतिक बळामुळे तयार झाली. मग प्रश्न आला की ह्या

जातींना प्रमाणपत्र कशी मिळणार? त्यांची कुठल्याच कागदपत्रात नोंद नव्हती. ना त्यांच्याकडे कुठले सरकारी दाखले होते. शाळेचे दाखले नव्हते. मग मुस्लिम ओबीसी संघटनेने सांगितले की, अमुक एक जात भटकी आहे, असे ज्यावेळी सांगते तेव्हा हेच शपथपत्र म्हणून प्रमाणपत्र तयार करताना ग्राह्य मानावे. इथपर्यंत मुस्लिम ओबीसी चळवळीची विश्‍वासार्हता समाज व राज्यकर्त्यांमध्ये वाढायला लागली होती. मला वाटते, दिलीपकमार सारखा माणूस चळवळीमागे उभे राहिल्यामुळे ते शक्य झाले.

तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये त्यांनी विविध परिषदा, सभा, संमलने घेतली होती. वर्तमानपत्रांमध्ये या परिषदा-कार्यक्रमांचा वृत्तांत नियमितपणे प्रसिद्ध होत हाता. मुंबई, भिवंडी, जालना, पुण्यातील बालगंधर्वमधील परिषद असो की मिरजची सभा सर्वांना भरपूर प्रसिद्धी लाभली. मिरजच्या सभेला प्रचंड मोठा जनसमुदाय आलेला होता. त्यात मुस्लिम ओबीसीच नव्हे तर सबंध जाति-धर्मातील लोक आले होते. सभांमधील दिलीपकुमार यांची भाषणे आणि ते मुस्लिम ओबीसी चळवळीचे समर्थन करत आहेत, अशा बातम्या वर्तमानपत्रातून येत होत्या. या सर्वांचा चळवळीसाठी सकारात्मक परिणाम होत गेला.

संघटनेला नवनवीन कार्यकर्ते मिळाले. त्याआधी सर्वांना वाटत होते की, “यह हो ही नही सकता, भला मुसलमानों को कैसा फायदा मिलेगा, ऐसा कोई भी किसी को सवलत नहीं देता,” अशी एक मानसिकता तयार झालेली होती. शिवाय सततच्या दंगलींच्या राजकारणामुळे मुस्लिम समुदायात अगतिकतेची भावना निर्माण झालेली होती. त्यामुळे समाज, संघटना व मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासच नव्हता. सामाजिक जाणिवांचे संघटन उभे करणे मुळात अवघड कार्य असते. धार्मिक मुद्द्यांवर एकत्रिकरण करणे सोपे असते. सामाजिक प्रश्नांवर संघटना निर्माण करणे अवघड असते. पण दिलीपकुमार यांच्यामुळे हे सहज शक्य झाले.

मुळात मुसलमानांमधील ज्या छोट्या छोट्या जाती होत्या, त्यांना आवाजच नव्हता. अशा अनेक मूक जाती मुस्लिम ओबीसी संघटनेमध्ये संघटित झाल्या. त्यांचे जमा होणे, एकत्र येणे, त्यातले कार्यकर्ते सक्रिय होणे, त्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास मिळणे आणि एकूण काही काळ का होईना महाराष्ट्रव्यापी चळवळ उभी राहणे; या एकूण प्रक्रियेमध्ये दिलीपकुमार यांचे खूप मोठे योगदान आहे.

दुसरा एक महत्त्वाचे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्या काळामध्ये मुस्लिम ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी मागणी सुरू झालेली होती. त्याच्यासाठी काही मतदारसंघात काँग्रेसकडून मिळवून घेण्यात दिलीपकुमार यांना यश आले. त्यांच्या शब्दामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी हे मतदारसंघ ताबडतोब मंजूर करून दिले. त्यातून १९९९ला मुस्लिम ओबीसी चळवळीचे दोन व्यक्ती आमदार झाले.

मिरजचे हाफिज धत्तूरे एक साधा बेकरी व्यावसायिक माणूस होता. जो ओबीसी चळवळीमुळे आमदार झाला, ही खरोखरच एक चमत्कारिक घटना होती. त्यांच्या निधनापर्यंत (फेब्रुवारी २०१८) मिरजमधील लोक हाफिजभाईंना आमदार म्हणत. हा साधा व्यक्ती ओबीसी चळवळीचा कार्यकर्ता झाला व पुढे आमदार झाला. दिलीपकुमार स्वत: त्यांच्या प्रचारासाठी मिरजेत आले होते. भिवंडीमध्ये रशीदभाई देखील आमदार झाले होते. राज्यात इतरही ठिकाणी ओबीसी कोट्यातून काही कार्यकर्ते उभे होते. तो एक भन्नाट प्रयोग होता.

मुस्लिम ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे आणि त्यासाठी काँग्रेसच्या कोट्यातून काही जागा मिळाल्या पाहिजेत, हा जो आग्रह होता, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी बोलणी करणे हे त्यावेळी सामान्य कार्यकर्त्यांना शक्य नव्हते किंवा त्यांना आलेच असते असे नाही. दिलीपकुमार यांच्यासारख्या सेलिब्रिटीने ते सहज शक्य करून दाखवले.

आमदार कपिल पाटील यांचे आणि दिलीपकुमार यांचे अत्यंत घरगुती संबंध होते. ते नेहमी त्यांच्या घरी जात. मी देखील अनेकदा त्यांच्या बरोबर दिलीपकुमार यांच्या भेटीला गेलेलो आहे. दिलीपकुमार यांच्या बोलण्यातून मला जाणवायचे की खऱ्या अर्थाने ह्या माणसाला महाराष्ट्रातील समाज कळलेला आहे. त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत, त्याला कसे सोडवले पाहिजे, एखादा राजकीय नेता किंवा अभ्यासक ज्या पद्धतीने या समस्यांचा विचार करतो, जसे वेगवेगळे पापुद्रे काढून याचा अभ्यास करतो किंवा खोल समजून घेतो, अगदी तसेच दिलीपकुमारही होते.

ते हिरो आहेत म्हणून त्यांची भाषणे ऐकायला लोक येतात त्यामुळे मुस्लिम ओबीसी चळवळीने त्यांना पाचारित केलेले नव्हते. मुळात दिलीपकुमार यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव होती, मागास व दुर्बल घटकाबद्दल कणव होती, त्यांचे प्रश्न, अडचणी सोडविल्या पाहिजेत आणि त्यासाठी वाटेल ते केले पाहिजे, सरकारदरबारी भांडले पाहिजे, चकरा मारल्या पाहिजे या वास्तवाचे भानही त्यांना होते.

दिलीपकुमार स्वतःहून सांगायचे की चळवळीसाठी माझा जो काही तुम्हाला वापर करता येईल, ते तुम्ही जरूर करावा. सभा, परिषदा किंवा व्याख्यानासाठी ते राज्य व देशभरात कुठेही यायला नेहमी तयार असत. लोकसुद्धा त्यांना गांभिर्याने घेत व त्यांचे ऐकत. त्यांच्यामुळे चळवळीला जनसमर्थन व पाठबळ लाभले. समीक्षेच्या पातळीवर मुस्लिम ओबीसी संघटनेचे चळवळीचे मूल्यमापन अजून व्हायचे आहे. पण या चळवळीमुळे मुस्लिम समाजात जी जागृती झाली त्याची दखल मात्र घेतलीच पाहिजे. चळवळीने सामाजिक भान असलेले कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार केली. त्यातून पुढे वेगवेगळे कार्यकर्ते राजकारणात आले. समाजकारणात आले, त्यांनी आपापल्या गावांमध्ये शैक्षणिक व सामाजिक संस्था काढल्या. चळवळीमुळे प्रमाणपत्रे मिळाली, त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मिळाला. काही लोकांची सरकारी नोकऱ्यांमध्ये निवड झाली.

महाराष्ट्रात अल्पसंख्यांक राजपत्रित अधिकाऱ्यांची एक मोठी संघटना काम करते. मुस्लिम ओबीसी चळवळीतले कार्यकर्ते जे नंतर पुढे अधिकारी झाले, क्लास वन ऑफिसर झाले, त्यांनी ही संघटना उभी केलेली आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणी नंतरच्या काळामध्ये अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, सरकार दरबारी ते अत्यंत एक कार्यक्षम अधिकारी म्हणून नावारुपास आले. कोणी तहसीलदार, तर कोणी डेप्युटी कलेक्टर, कोणी मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या सरकारी आस्थापनांमध्ये आत्मविश्वासाने काम करत आहेत. ते अभिमानाने सांगतात की आम्ही ओबीसी आहोत. ओबीसी चळवळीमुळेच आम्हाला ही संधी मिळाली. समाजामध्ये आत्मविश्वासाने ही लोक वावरत आहेत, अशा प्रकारचा एक मोठा इम्पॅक्ट या चळवळीमुळे झालेला आहे.

सकारात्मक अंगाने तर ह्या चळवळीचा अभ्यास केला तर आणखी वेगेवेगळे निष्कर्ष पुढे येऊ शकतील. सामाजिक जनजागृतीमध्ये ह्या चळवळीमुळे बरे-वाईक काय परिणाम झाले, हे समोर येईल. पुण्यातील पी.ए. इनामदार सारखे लोक ह्या चळवळीमध्ये आले. इनामदार स्वत: मान्यवर संस्थाचालक आहेत म्हणून त्यांची दखल घेणे उचित ठरते. पण असे तालुक्यात, गावात, जिल्ह्यात अनेक छोटे-मोठे संस्थाचालक, कार्यकर्ते या चळवळीमध्ये संघटित झालेले होते.

ह्या चळवळीच्या माध्यमातून त्यांच्या-त्यांच्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात सामान्य नागरिकामध्ये त्यांनी मोठा आत्मविश्वास मिळवून दिला. आपण ओबीसी आहोत, आपली जात छोटी (निम्न) आहे, आपल्याला आदर नाही, आपले काहीच होणार नाही, ही मानसिकता पूर्वी होती, पण मुसिलम ओबीसी चळवळीमुळे त्यात सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसते.

जातिव्यवस्थे वैशिष्ट्य असे की ती पहिल्यांदा माणसांना न्यूनगंड देते, तुम्हाला ती दाबून ठेवते, शोषणाला तयार करते. पण सामाजिक प्रबोधन आणि चळवळ शरणागत मानसकितेविरोधात बंड करायला प्रवृत्त करते. दबले जाणे, पिचले जाणे, शोषणाला नकार देते, त्याचा प्रतिकार करायला लावते. स्वतःला आत्मविश्वास देते आणि व्यवस्थेच्या विरोधात लढायला तयार करते.

ह्या मुस्लिम ओबीसी चळवळीमुळे माझे काहिती संविधानिक हक्क आहेत आणि ते मला मिळायला हवेत, अशा स्वरूपाची अत्यंत मोठी जागृती गावापासून ते तालुका जिल्हा पातळीपर्यंत झाली. हे मुस्लिम ओबीसी चळवळीचे सर्वात मोठे यश आहे, असे मला वाटते.

यामध्ये चळवळीच्या सर्वच कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. जसे शब्बीर अन्सारी, विलास सोनवणे, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, कपिल पाटील, पी. ए. इनामदार, जावेद पाशा आणि इतरही महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते आहेत. अनेक लोक त्या काळात विद्यार्थी होते आता ते अधिकारी आहेत.

काही राजकारणात करिअर करत आहेत. काही प्राध्यापक झाली. काही लेखक आहेत, बरेच कवी आहेत, काही पत्रकार आहेत इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चळवळीतून तयार झालेली मंडळी कार्यरत आहे. ह्या सगळ्या लोकांना जो काही आत्मविश्वास देणे असो किंवा सक्रिय होणे असो ह्या सगळ्यांना जे नैतिक पाठबळ हवे होते, ते दिलीपकुमार या आंदोलनात आल्यानंतर खऱ्या अर्थाने मिळाले.

महाराष्ट्रीत मुस्लिम ओबीसी चळवळीच्या इतिहासाने दिलीपकुमार यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेतलीच पाहिजे. यात कुठलीच सांशकता बाळगण्याचे कारण नाही. दिलीपकुमार चळवळीच्या मागण्या व समाजाचे प्रश्न धसाला लावण्यासाठी अनेकदा मंत्रालयांमध्ये येत. विविध ठिकाणी परिसंवाद, बैठका, जाहिरसभा घेत. लोक त्यांच्या सभांना गर्दी करत. अर्थातच प्रत्येक जण त्यांची ओबीसी संदर्भातली मते ऐकायलाच येत असे नाही. तर अनेक जण आवडत्या नटाला फक्त एक नजर पाहण्यासाठी देखील आलेले असत. अर्थातच या सर्वांचा परिणाम असा झाला की दिलीपकुमार यांची लोकप्रियता संघटनेचे मजबुतीकरण करण्यासाठी फायदेशीर ठरली.

दिलीपकुमार बोलताना उपस्थितांच्या नजरा स्टेजवर खिळलेल्या असत. प्रत्येक जण त्यांना आत्मीयतेने ऐकत. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आल्यावर ते फक्त कार्यकर्तेच राहत. त्या भूमिकेत जाऊन ते आपली मांडणी करत. कार्यकर्त्याला व माणसाला एखाद्या प्रश्नांबद्दल किंतु-परंतु असेल तर दिलीपकुमार यांचे विवेचन ऐकून त्याच्या मनातील शंका दूर होत. इतका मोठा माणूस म्हणतोय म्हणजे ते खरे असणार असे लोक त्या वेळेला मानू लागले.

कारण ती परिस्थितीच अशी होती की जातिव्यवस्थे संदर्भात मांडणी करणाऱ्याला लोक हेटाळणीने बघत. त्यातही मुस्लिम. काहितरीच की, मुसलमानांमध्ये जाती असतात का, अशी लोक म्हणत होती. किंबहुना हा माणूस आमच्यामध्ये फूट पाडतोय असा, आरोपही स्थानिक मुसलमानांकडून केला गेला. किंवा खुद्द जे ओबीसी होते तेच म्हणत होते, “ऐसा कुछ नही है. हम तो शेख हैं, सय्यद हैं.”

दिलीपकुमार यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते प्रत्येक सभांमध्ये भारतातील मागास जाती-समुदायाबद्दल कणव व कारुण्याने बोलत. दबलेल्या, पिचलेल्या वर्गाबद्दल सहानुभूती दर्शवत व त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसत्तेला प्रवृत्त करत. मागास समुदायांमध्ये जगण्याचे व संघर्षाचे आत्मबळ निर्माण करून देत. शोषित समाजाला मुक्ती मिळाली पाहिजे, त्यांच्या हिताचे निर्णय झाली पाहिजेत अशी त्यांची ठाम भूमिका होती.

वास्तविक पाहता दिलीपकुमार यांच्यावर महात्मा गांधी, पंडित नेहरू व मौलाना आज़ाद यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. फाळणीचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्यावर झालेला होता. फाळणीनंतर झालेल्या जातीय दंगली असो सांप्रदायिक हिंसा किंवा वांशिक हल्ले असो या सर्वांमध्ये ते भरडले गेले होते. ‌‌त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये संघर्षाचा मोठा काळ पाहिला होता.

पेशावर ते नाशिक असा स्थलांतरितांचा प्रवास करून ते मराठी मातीत आले होते. एका उच्च कुळातील असून देखील त्यांना विविध संघर्ष करावे लागले. पेशावरला त्यांचे कुटुंबीय जमीनदार होते. पण फाळणीमुळे सगळेच उद्ध्वस्त झाले. देशोधडीला लागले व नियतीने त्यांना देवळाली सारख्या एका छोट्याशा परिसरात शरणार्थी म्हणून दाखल केले.

या सर्वांचा परिणाम त्यांच्या जडणघडणीवर झालेला होता. त्यातून संघर्ष करण्याची व मागास समुदायांबद्दल, शोषित समाजाबद्दल एक सहानुभूती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती. त्यांची जडणघडण आणि स्वातंत्र्याची चळवळ होणे, स्वातंत्र्य मिळणे इत्यादी ते मोठे होत तसे तसे ह्या गोष्टी घडत होत्या. नेहरूंच्या समाजवादाने ते प्रभावित झाले होते. लोकांचे भले झाले पाहिजे, हा देश समृद्ध झाला पाहिजे, देशात दुःख नावाची गोष्ट नको, अशी त्यांची भावना होती. कारण आयुष्यामध्ये त्यांनी अनेक दुःख भोगली होती, संकटे सोसली होती.

मला अनेकदा प्रश्न पडतो की इतके चांगले गुण एकाच माणसामध्ये कसे येऊ शकतात. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार असा उच्च स्वरुपात कसा होऊ शकतो. एखादा माणूस तत्त्वज्ञानी पण आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो, अभिनेता म्हणूनही कारकीर्द गाजवतो. त्यांच्या अभिनयाला भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये मान्यता आहे, जो माणूस म्हणून सुद्धा अत्यंत उच्च दर्जाचा नैतिक किंवा आदर्शवादी आहे, हे सगळे गुण एखाद्या माणसात मिळणे दुर्मिळ. त्यांचे आयुष्य चित्रपटाच्या कथेपेक्षाही अद्भुत होते. एकूण हरहुन्नरी, विद्वान व बहुप्रसवा आणि अत्यंत अद्भुत असा हा माणूस होता.

एखादे झाड जमिनीतून उपटून दुसऱ्या ठिकाणी लावले तर ते पुन्हा बहरेल याची शाश्वती फार कमी असते. पण दिलीपकुमार यांनी ते शक्य करून दाखवले व समाजाला फुलांच्या रुपाने सुगंध देत बहरत राहिले. संघर्ष व अनुभवातून त्यांनी माणूस होण्यापर्यंतचा प्रवास केला होता. प्रतिकूल परिस्थितीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले होते. दुसऱ्यांच्या दुःखाबद्दलची जाण व त्याची तीव्रता अनुभवली होती. त्यांच्या भाषणातून व बोलण्यातून मानवीय नाते दृढ करणारा संवाद घडे. कार्यकर्ते म्हणून कुठल्या मीटिंगमध्ये असतील किंवा त्यांना बोलायला, भेटायला आलेल्या लोकांबरोबर बोलण्यातून त्यांच्या मानवी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन उत्तरोत्तर घडत राही.

इतिहास, साहित्य व संस्कृती तसेच समाजातील छोट्या-छोट्या गटांचा त्यांना प्रचंड अभ्यास होता. त्यांच्यामध्ये समाजाशी कनेक्ट होण्याची प्रचंड क्षमता होती. महाराष्ट्रातील हिंदू ओबीसी बद्दलदेखील त्यांना माहिती होती. प्रत्येक जातीचे वैशिष्ट्य, राहणीमान, संस्कृती, जगणे त्यांना ज्ञात होते. त्यामुळे ते प्रश्न मांडताना अधिक खोलवर जात. कॉन्फरन्समध्ये, मंचावर, जाहीर सभांमध्ये अत्यंत प्रेरणादायी अशी भाषणे देत.

दिलीपकुमार यांच्या प्रयत्नांमुळे या प्रश्नाला एक टोक व त्यांच्या नैतिक बळामुळे जनसमर्थन प्राप्त झाले. सगळे प्रश्न सुटण्यास मदत झाली. त्याला गती मिळाली ती दिलीपकुमार यांचे तिथे असल्यामुळे शक्य झाले. असे एकूण त्या काळाचे आणि मुस्लिम ओबीसी चळवळीचे विश्लेषण करावे लागेल.

राजा कांदळकर, मुंबई

शब्दांकन : कलीम अजीम

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’
दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCewR6Av31xI9AParuRcpw2aGYoDIYhUeuTN0niJhWFL6Pq06Loc14ashIEazVvL9Kchsj80GJpBTJRvsFYg3uHH_KjtqtfOD-G7Q6y8r38dmf8tXUvYZUaz3xM-qUf8oIVWWqJmwyNhrOztzR9XYVH74tW4FVIZOfJqtD6WTAonZhVKDpBZqMtKIZsQ/w640-h400/Dilip%20Kumar%20Jonhy%20Waker.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCewR6Av31xI9AParuRcpw2aGYoDIYhUeuTN0niJhWFL6Pq06Loc14ashIEazVvL9Kchsj80GJpBTJRvsFYg3uHH_KjtqtfOD-G7Q6y8r38dmf8tXUvYZUaz3xM-qUf8oIVWWqJmwyNhrOztzR9XYVH74tW4FVIZOfJqtD6WTAonZhVKDpBZqMtKIZsQ/s72-w640-c-h400/Dilip%20Kumar%20Jonhy%20Waker.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2022/07/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2022/07/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content