बालके, पालक आणि गेमिंग ॲडिक्शन



2018 साली ‘युनिसेफ’ व ‘चरखा’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझी निवड करत 50 हजार रुपयांचे संशोधनवृत्ती दिली होती. युनिसेफसाठी मी पाच-सहा संशोधनपर रिपोर्ट लिहिले होते. ते रिपोर्ट विविध ठिकाणी प्रकाशित झालेले आहे. त्या सर्व रिपोर्टचे ‘नजरिया’वर संकलन करत आहे. त्यातला हा दूसरा रिपोर्ट..

दोन वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेमनं जगभरात हाहाकार माजवला होता. भारतात या गेमच्या आहारी जाऊन अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे. परिणामी सुप्रीम कोर्टापासून ते केंद्र सरकार, मानसोपचार तज्ज्ञ आणि पालकदेखील यातून आपली सुटका करून घेण्यासाठी उपाययोजना आखत होते.
या आपत्तीचं गांभीर्य इतकं होतं की, सरकार त्याविरोधात कायदा करण्याची तयारी सुरू होती. तात्पुरती उपाययोजना म्हणून भारत सरकारनं इंटरनेटवरील गेम्सच्या लिंक हटविण्याचे आदेश दिले. तर तिकडे अमेरिकेत गेम बनविणाऱ्या संचालकाला अटक झाली. त्यामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली, पण हा धोका टळलेला नव्हता.
टाईम पास व कामाच्या ताणातून हलकं होण्यासाठी विरंगुळा म्हणून खेळ खेळले जाणं नवीन नाही. पूर्वी पत्त्याचा खेळ, कॅरम, बुद्धिबळ असे बैठे खेळले जायचे. तसंच मैदानी खेळाचंही चलन होतं. ग्रामीण भागात विटीदांडू, सूर पारंब्या, लपंडाव, कबड्डी आदी खेळ लोकजीवनात होते. जेवणानंतर व मधल्या वेळेत वरील सर्व खेळांना प्राध्यान्य दिले जायचे. पण संगणक क्रांतीनंतर असे खेळ, हळूहळू करत संपुष्टात आले. परिणामी मैदानी खेळांची जागा डिजीटल व आभासी खेळांनी घेतली.
बैठे खेळही डिजीटल स्वरुपात आले. त्यामुळे समूह किंवा संघटनात्मक पद्धतीने खेळले जाणारे खेळ बंद झाले.
आज इंटरनेटच्या माध्यमातून खेळल्या जाणाऱ्या व्हर्च्युअल (आभासी) खेळाचे प्रमाण वाढलं आहे. कॉम्प्युटर व मोबाईलच्या मदतीने असे गेम्स खेळले जातात. लोकल ट्रेनमध्ये, बसमध्ये उभे राहून, एका हाताने हँडल पकडून आणि दुसऱ्या हाताने मोबाइल गेम खेळताना अनेक तरूण दिसून येतात.
पायी चालताना, बँकाच्या लाईनमध्ये, हॉटेलमध्ये चहा घेताना, वेळ मिळेल तिथे अगदी ट्रॅफिक सिग्नलच्या काही सेकंदातही गेम्स खेळले जातात. एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर पोहोचेपर्यंत हा मंडळी गेमची एक लेव्हल पार करतात.
डोकी भ्रष्ट करणारी निर्मिती
मोबाईल गेमचं वेड इतकं भयानक असतं की, गेम खेळणारे अगदी खाणे-पिणेसुद्धा विसरून जातात. एखाद्याला व्यसन लावण्याइतपत निर्मिती प्रक्रिया गेम तयार करताना राबविली जाते. मानवी मेंदूंवर ताबा मिळवणे किंवा त्याला मुठीत ठेवण्याइतका गहन विचार या गेम्सच्या निर्मितीत केला जातो. मार्केट आणि ग्राहक कसे आहेत? त्यांच्या आवडीनिवडी नेमक्या काय आहेत? त्यांना कोणत्या प्रकारच्या गेमची आवड आहे? याचा रितसर आढावा घेऊन कंपन्या गेम्स तयार करतात.
व्हीडिओ गेम्सच्या निर्मितीत बेस्ट सेलर उत्पादनासारखा विचार केला जातो. गेम तयार करण्यासाठी उत्कृष्ट ग्राफिक्स व डिझायनिंगचा आधार घेतला जातो. गेम्सच्या निर्मितीपूर्वी मानवी मेदुंचा व व्हर्च्युअल हालचालीचा प्रचंड अभ्यास केला जातो.
गेम नेमका कोणासाठी आहे? कोणत्या लोकांना गेमकडे आकर्षित करून घ्यायचे आहे? त्यांनी गेमकडे वारंवार परत यावे असे अनेक विचार केले जातात. थोडक्यात, लोकांची मानसिकता आणि त्यांची विचारप्रवणता या गोष्टींचा विचार गेम तयार करताना केला जातो. वरील टप्प्यांचा सखोल विचार केल्यानंतरच कंपन्या गेमच्या प्रत्यक्ष निर्मितीकडे वळतात. त्यानंतर तयार झालेले गेम साहजिकच लोकांचे लक्ष आपल्याकडे वळवितात.
मानवी मेदुंचा सुक्ष्म विचार करून तयार केलेले हे विविध गेम्स इंटरनेटवर ग्राहकांचा खासगी माहिती (डेटा) चोरून त्यांच्यापर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचवले जातात. त्यानंतर गेम ॲडिक्शनचं सगळं चक्र सुरू होतं.
सर्वसामान्यांसाठी गेम म्हणजे निव्वळ करमणूक किंवा विरंगुळा असतो. पण कंपन्या त्यातून कोट्यवधींचे उत्पन्न मिळवतात. मोबाइल गेमवर होणारी उलाढाल तब्बल 137 बिलियन डॉलरच्या घरात आहे. जगभरात 2.70 अब्ज ऑनलाईन गेम खेळणारे आहेत. गेल्या तीन वर्षात गेम खेळणाऱ्यांची संख्या 50 कोटींनी वाढली आहे. संबंधित आकडेवारी पाहता 2023 पर्यंत आणखी 40 कोटी लोकांची ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांमध्ये भर पडणे अपेक्षित आहे.
हा गेमिंग बाजार तब्बल दोन लाख कोटींचा आहे. 2019-20 या आर्थिक वर्षांत भारतातील गेम इंड्स्ट्रीची उलाढाल तब्बल 6 हजार कोटी एवढी होती. गेमिंग हा अमाप महसूल प्राप्ती करून देणारा बिझनेस आहे. जाहिराती, बक्षीस म्हणून दिली जाणारी रक्कम (पाईंट), पेड एप्स इत्यादीतून कंपन्या महसूल कमावतात.अमेरिकेला सर्वांत जास्त म्हणजे 36,869 दशलक्ष कोटी डॉलर उत्पन्न मिळते तर चीनला 36,540 दशलक्ष डॉलर, जपान, कोरिया, जर्मनी यांचीही गेमिंगमधला उत्पन्नाचा वाटा मोठा आहे. 2023 पर्यंत ही उलाढाल 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
या उत्पन्नासाठी ग्राहकांना व्यसन लावणे गरजेचे असते. त्यानुसार कंपन्या ग्राहकांसमोर गेम्सचं वस्तुकरण करतात. मोबाईल गेममध्ये सध्या क्लाउड गेम, रिअलिटी गेमिंग, क्रॉस-प्लॅटफॉर्म प्ले, ब्लॉक चेन बेस्ड् गेम्स, हायपर कॅज्युअल गेम्स, कॉम्पिटिटिव्ह मल्टिप्लेअर मोबाईल गेम्स असे प्रकार आहेत. दर महिन्याला काहीतरी नवीन प्रकार लाँच होतो आणि सगळ्यांचा कल बदलत जातो.
आज लाखों व्हीडिओ गेम्स एका क्लिकवर अगदी सहज उपलब्ध होतात. आकर्षक डिझाईन, जीवंतपणाचा देखावे, क्षणिक व भौतिक सुखाचा आनंद देणारे हे गेम तासंतास खेळले जातात. एक-दोन-तीन-चार-आठ-दहा तास मनसोक्त खेळूनही मन भरत नाही.
खेळण्याच्या नादात कुठलेही भान राहात नाही. सतत मोबाईल गेम्स खेळतच राहावे वाटते. बॅटरी संपून मोबाईल बंद झाला की वैताग होतो. चिडचीड होते. पुन्हा-पुन्हा गेमकडे वळावं वाटतं. जोपर्यंत गेम पुन्हा सुरू करत नाही तोपर्यंत करमत नाही.
बाजारात नवा आलेला गेम साधारण आठ ते दहा महिन्यांच्या काळापुरताच टिकून राहतो. सतत गेम विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असते. सुरुवातीला ठराविक देशांमध्ये नवे गेम उपलब्ध करून दिले जातात. या देशांमध्ये मिळणाऱ्या प्रतिसादातून अन्य देशात मार्केट तयार केलं जातं.
50 रुपयापासून 5 हजारापर्यंत गेमच्या किमती आहेत. एखाद्या गेमचं मार्केटिंग करून तो काळ्या बाजारात हजारोंमध्ये विकला जातो. एका गेमसाठी भारतात साधारण 20 ते 25 लाख डाउनलोड्स मिळतात. तज्ज्ञांच्या मते ही संख्या फार मोठी आहे.
खेळ की व्यसन
मोबाईल गेम खेळण्याचं प्रमाण सगळ्याच वयोगटांमध्ये दिसून येतं. लहान मुलं आणि तरुणाईत हे प्रमाण जास्त आहे. किंबहुना हा वर्ग मोबाईल गेमच्या अधिकच आहारी गेल्याचं चित्र आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या टप्प्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन गेम खेळणे थ्रिल म्हणून विकसित होत आहे.
साधारण: टास्क, मारधाड व ॲडिक्शनच्या गेम्सना जास्त पसंती दिली जाते. प्रसिद्ध सिनेमा, त्याचे नायक, एखादा सुपरव्हिलेन गेमचा नायक असतो. लादेन, रा-वनपासून ते आयसिसपर्यंत अशा नायक-खलनायकाचे पात्र घेऊन गेम तयार केले जातात. हिंसा व क्रूरता असे घटक अनेक गेम्समध्ये पाहायला मिळतात. मोबाईल गेम खेळणारे व्यक्ती हिंसक झाल्याचे अनेक उदाहरणे आहे. अलीकडे शाळेकरी मुलांमध्ये हिंसेचे प्रमाण वाढलं आहे, तज्ज्ञाच्या मते त्याचं एक कारण मोबाईल गेम्स आहेत.
जर्मनीच्या संशोधकांनी गेम्समुळे हिंसेचे प्रमाण कमी होत आहे असंही निरिक्षण नोंदवलं आहे. हिंसेची बळावलेली भावना हिंसक गेम खेळल्यामुळे कमी होते, म्हणजे रागाचा गेममधून निचरा होतो, असं संशोधन जर्मनीच्या गेम बनविणाऱ्या कंपन्यांकडून जारी करण्यात आलं आहे. असं असलं तरी परिस्थिती यापेक्षा नेमकी उलटी आहे.
मोबाईल गेममध्ये एकमेकांना मारावं लागतं. एखाद्याला जीवे मारल्याशिवाय जिंकता येत नाही. म्हणजे नायक किंबहुना खेळणारा व्यक्ती अप्रत्यक्षपणे हिंसा करत सुटतो. रक्तपात, मारधाड, बंदुका, गोळ्यांचा वापर करून तो समोरच्याला संपवतो. क्षणोक्षणी समोर आलेल्यांना मारावं लागतं. एखाद्याचा जीव घेणे तिथे टास्क म्हणून पुढे येते. त्यामुळे वारंवार हिंसा करावी लागते. ही हिंसा काल्पनिक असली तरी त्याचा परिणाम खेळणाऱ्यांच्या मनावर होतो. सतत गेम खेळणाऱ्या व्यक्तीमध्ये कालांतराने बदल घडून येतो. म्हणजे तो अधिक प्रमाणात रागीट व चिडचिडा होतो. हेच कारण आहे की व्हीडिओ गेममुळं मुलांच्या स्वभावात लक्षणीयरित्या बदल होत आहे.
युनिसेफच्या 2011च्या एका अहवालानुसार जगभरात 10 ते 19 वयोगटातील 120 कोटी किशोरवयीन मुलं आहेत. भारतात ही संख्या जवळपास 24.3 कोटी आहे. जगभरात सर्वाधिक किशोरवयीन मुलं विकसनशील देशांमध्ये राहतात. युनिसेफच्या या अहवालानुसार मुलांना किती राग येतो, हे त्यांच्या वयावर अवलंबून असतं, असं निरिक्षण नोंदवलं आहे.
2014ला ‘जर्नल सायकोलॉजिकल मेडिसीन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अन्य रिसर्चनुसार मुलींपेक्षा मुलांमध्ये रागाचं प्रमाण अधिक असतं. हे संशोधन भारतातील 6 वेगवेगळ्या शहरात करण्यात आलं होतं. यात बंगळुरू, केरळ, दिल्ली, जम्मू, इंदौर, राजस्थान आणि सिक्कीम इथल्या 5 हजार 647 अल्पवयीन आणि युवकांनी यात सहभाग घेतला. या संशोधनानुसार 19 ते 19 वर्षं वयोगटातील मुलांमध्ये रागाचं प्रमाण अधिक असतं, तर 20 ते 26 वयोगटात रागाचं प्रमाण कमी असतं. म्हणजेच किशोरवयीन मुलं जास्त रागीट असतात. या संशोधनात असंही आढळून आलं आहे की, 12 ते 17 वयोगटातील 19 टक्के मुली शाळांमध्ये कोणत्या ना कोणत्या भांडणात सहभागी झालेल्या होत्या. मुळात मुलांमध्ये हिंसक प्रवृत्तीची कारणे रागात आढळतात. बऱ्याच संशोधनात मोबाईल गेम्स हे रागामागचं प्रमुख कारण म्हणून पुढे आलं आहे.
2012 साली एसोचैमनं एक अहवाल जारी केला होता. त्यानुसार गेम खेळणारे व्यक्ती जास्त प्रमाणात हिंसक होत जातात. या अहवालानुसार मेट्रो शहरातील लहान मुलांच्या मेंदुंवर वीडिओ गेम्स ताबा मिळवत आहे. परिणामी मुलं केवळ चिडचीडे होत नाहीत तर ते अधिक प्रमाणात आक्रमक स्वभावाचे झाले आहेत. या कारणामुळे मुलांमध्ये गुन्हे प्रवृत्ती वाढल्या आहेत, अशी नोंद एसोचैमच्या या रिपोर्टमध्ये होती. एसोचैमने हे सर्वेक्षण पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, कोचीन, चेन्नई, हैदराबाद, इंदोर, पाटणा, चंडीगड, देहरादून आणि अहमदाबाद शहरातील 5 ते 17 वयोगटात केले होते. या सर्वेक्षणात पालकांशीदेखील चर्चा करण्यात आली.
या सर्वेक्षणात असंही सांगण्यात आलं आहे की, मेट्रो शहरातील पालक नोकरीत व्यस्त राहतात. त्यांच्या बिजी लाइफ स्टाइलमुळे त्यांना मुलांकडे लक्ष देता येत नाही. परिणामी मुलं आपला बराचसा वेळ हिंसक व्हीडिओ गेम्स खेळण्यात व्यतित करतात. याचा परिणाम मुलांच्या मेदूंवर होत आहे. त्यातून मुलं अधिक एककल्ले व आक्रमक झालेली आहेत. मेट्रो शहरातील जवळ-जवळ 66 टक्के मुलं एकटे गेम खेळतात तर 32 टक्के मुलं आई-वडिल किंवा घरातल्या कुटुंबाच्या उपस्थितीत गेम्स खेळतात.
मानसिक आजार
दैनंदिन कामातील बराचसा वेळ हा मोबाईल गेमिंगमध्ये जातो. काम, अभ्यास, वाचन व इतर कामे टाळून किंवा त्याकडे दुर्लक्ष करून गेम खेळला जातो. या व्हर्च्युअल खेळात दिवसभरातील 50 टक्के वेळ जातो, असे एका निष्कर्षातून पुढे आले आहे. सर्वाधिक वेळ जाणाऱ्या देशात चीन, अमेरिका व जर्मन यांचा क्रमश: प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक लागतो. उपरोक्त निष्कर्ष असे म्हणतो की, दिवसभरातील 6 ते 10 तास दररोज ऑनलाइन गेम खेळण्यात खर्च होतात.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, अनेक कारणांमुळे मुलं हिंसक होत आहेत, अलीकडे त्याचं प्रमाण वाढत आहे. शहरांमधले पालक आपल्या मुलांवर पूर्णपणे लक्ष ठेवू शकत नाहीत म्हणून ते मुलांच्या हाती फोन देतात. मोबाईलवर मुलं असे गेम्स खेळतात, ज्यातून हिंसक प्रवृत्तींना चालना मिळते. त्यातून अश्लिल वेबसाईटचा शोध लागून त्यांच्याकरवी लैंगिक गुन्ह्याचे प्रकारही घडतात.
दररोज तीन-चार तास मोबाईल गेम खेळणाऱ्यामध्ये रागाचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आलं आहे. हिंसा किंवा लैंगिक हिंसा असलेले व्हीडिओ गेम मुलांना खेळू देऊ नका, असा महत्त्वपूर्ण निकाल 2010 साली अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निर्णयाआधी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनी एक कायदा केला होता, ज्यानुसार 18 वर्षांचे होईपर्यंत मुलांना हिंस्र व्हीडिओ गेम खेळता येणार नाहीत. (11 ऑगस्ट, बीबीसी हिंदी)
सतत ऑनलाईन गेम खेळणे मानसिक आजार असल्याचे निरिक्षण डब्लुएचओनं जून 2018ला नोंदवलं आहे. डब्लुएचओनं जाहीर केलेल्या ‘इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस’ म्हणजेच जागतिक स्तरावरचे आजारांचे प्रकार यामध्ये ऑनलाईन गेम खेळण्याच्या व्यसनाला एक मानसिक आजार म्हटलं आहे. सतत व्हीडिओ गेम खेळल्यामुळे आयुष्यातील इतर प्राधान्याच्या व महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचंही निरीक्षण यात नोंदवलं आहे. या निष्कर्षातून ऑनलाइन गेम खेळण्याच्या प्रवृत्तीवर व त्यातून होणाऱ्या दुष्परिणामांवर आळा घालण्याचा उद्देश जागतिक आरोग्य संघटनेचा होता.
डब्लुएचओनं ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन असल्यास वागण्यात दिसून येणाऱ्या बदलांचे तपशील दिले होते. त्यानुसार (1) दैनंदिन महत्त्वाच्या कृतींपेक्षा ती व्यक्ती गेम खेळण्यास जास्त पसंती देते. (2) किती वेळ गेम खेळावं यावर त्या व्यक्तीचं नियंत्रण राहत नाही. (3) आयुष्यावर नकारात्मक परिणाम झाला तरी ती व्यक्ती गेम खेळणं सोडत नाही. (4) वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आयुष्यातील इतर भागांवर गेम खेळण्याचा परिणाम होत असल्यास त्याला व्यसन म्हणता येईल. (5) ही लक्षणं वर्षाभरापासून दिसून आल्यास त्याला मानसिक आजार म्हणता येईल.
डब्लुएचओकडून इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस प्रकाशित केलं जातं. 27 वर्षांपूर्वी म्हणजे 1990 साली ही आकडेवारी अपडेट केली होती. या नियमावलीची 11वी आवृत्ती जून 2018ला प्रकाशित करण्यात आली. त्यात गेमिंग डिसऑर्डरला सतत वाढणारी आरोग्य समस्या म्हणून नोंदवण्यात आलं आहे, संघटनेच्या मते याला पुरेशा देखरेखीची गरज आहे.
वाढते धोके
तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर मानवी जीवन कमालीचे बदललं आहे. सतत नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीनं माणसाचं अवघं जीवनच व्यापून टाकलं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री जोपण्यापर्यंत तंत्रज्ञानाशी आपला वारंवार सबंध येतो. सहज उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढून कार्य अधिक गतीशील झालं आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यापार-उदीम वाढला आहे. 
इंटरनेट क्रांतीने व्यापारी बाजारपेठेला अधिक गतीमान बनविले आहे. कामाचा दर्जा वाढला आहे. परिणामी तंत्रज्ञानामुळे शरीराला धोके उत्पन्न झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाने मानवाला असाध्य आजाराला घेरलं आहे. इलेक्ट्रॉनिक चीप, सीएफएल, एलईडी, एलसीडी इत्यादींमधून मानवी शरीराला घातक असे रेडिएशन बाहेर पडत आहेत. या रेडिएशनमुळे मानवी समाज धोक्यात आल्याचं निरिक्षण अनेक नव्या संशोधनातून पुढे आलं आहे.
नोव्हेंबर महिन्यात सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने कबुली दिली की, सेमीकंडक्टर फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या 240 कामगारांना कॅन्सर झाला आहे. या संदर्भात सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची माफी मागितली. एकूण कामगारांपैकी 80 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कामगारांच्या कुटुंबाकडून दक्षिण कोरियातील एका कोर्टात हा खटला सुरू होता. या सुनावणीदरम्यान सॅमसंगनी आपली चूक मान्य केली. कंपनीने प्रत्येक व्यक्तीला 1.33 लाख डॉलर म्हणजे 95 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलेली आहे. (23, नोव्हेबर, फायनान्शियल एक्सप्रेस).
इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे मुलांना अनेक आजार चिकटले आहेत. पाठदुखी, डोळ्यात जळजळ, डोळ्यातून पाणी जाणे, डोकेदुखी, भूक न लागणे, मळमळ होणे, बोटं बधीर होणे, झोप न येणे, हाताची बोटं अकडणे, अचानक चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होत जाणे, कामात लक्ष न लागणे, चीडचीडेपणा, सतत एकटे राहू वाटणे, पालकांशी न पटणे असे अनेक डोकेदुखी अशा अनेक समस्यांना समोरं जावं लागत असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
गेमशिवाय जगात दुसरं काहीच शाश्वत नाही हा विचार लहान मुलांमध्ये बळावला आहे. मोबाईल गेम आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याची भावना अल्पवयीन मुलांमध्ये रुढ झाली आहे. पालकांनी गेम खेळू नको, असं बजावलं की मुलं आत्महत्या करण्यासदेखील मागे-पुढे पाहात नाहीत, असं अनेक निरिक्षणातून समोर आलं आहे. कारण गॅझेटला आपला सर्वात जवळचा व प्रिय मित्र म्हणून मुलं बघू लागले आहेत. गेमशिवाय आयुष्याचा ‘गेम ओव्हर’ होईल, अशी भावना लहान मुलांमध्ये तीव्र झाली आहे.
अलीकडे थ्री-डी गेम खेळण्याची प्रवृत्ती लहान मुलांमध्येही बळावली आहे. नव्या संशोधनातून असे गेम्स लहान मुलांसाठी हानिकारक असल्याचं दिसून आलं. मोठ्या शहरात तासंतास थ्री-डी गेम खेळणाऱ्या मुलांना लवकर डोळ्याचे आजार होण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे. थ्री-डीचा थ्रील अनुभवण्यासाठी डोळ्यावर विशिष्ट चष्मा धारण केला जातो. त्यामुळे व्हिजन सिंड्रोम आणि मोशन सिकनेससारखे आजार होत असल्याचे दिसून आलं. हा आजार व्यक्तीची दृष्टी कमकुवत करतो.
जास्त काळ व्हीडिओ गेम्स खेळत राहिल्याने लहान मुलांमध्ये हा आजार बळावत चालला आहे. नुकतेच मोबाईलमुळे तिरळेपणा येत असल्याची लक्षणे दिसून आली आहेत. सलग 4 तास मोबाइल वापरल्याने मुलांमध्ये तिरळेपणा वाढत आहे, असं निरिक्षण चंदीगडच्या पीजीआय हॉस्पिटलनं केलेल्या अभ्यासात दिसून आलं. न्यूरो ऑप्थोमोलॉजी जर्नलमध्ये या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. डोळे कोरडे पडणे किंवा डोळ्यांतून पाणी येणे या समस्यासह आणखी एक डोळ्यांचा नवा आजार उद्भवला आहे. 
उपाययोजना
शहरी जीवन धकाधकीचं झालं आहे. आई-वडील दोघंही नोकरी करत असल्याने मुलांसाठी त्यांना वेळ काढणं कठीण झालं आहे. आई-वडिलांचं आपापसांत कसं नातं आहे, यावरही मुलांची वर्तवणूक अवलंबून असते. आई-वडिलांतील संबंधाचा मुलांवर कसा परिणाम होतो, या संदर्भात बीबीसीवर एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात असं म्हटलं होतं की, ‘मुलांना शांत राहाण्याचा आणि सभ्य वर्तणुकीचा सल्ला देणारे आई-वडीलच जेव्हा आपसात भांडतात तेव्हा अशी मुलं राग आला की अधिक हिंसक बनतात. आपल्या मनाप्रमाणे सगळं झालं पाहिजे, अशी भावना मुलांमध्ये असते. जेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध होतं, तेव्हा ते वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात.
याच लेखात पुढे असं म्हटलं होतं की, पौगंडावस्थेत मुलांच्या हॉर्मोनमध्ये बदल होतो, या वयात मुलांच्या मेंदूचा विकास फार वेगाने होत असतो. मेडिकल एक्सपर्टच्या मते या काळात तर्क लावणारा मेंदूचा लॉजिकल सेन्सचा भाग वेगाने विकसित होतो. पण भावना समजणारा इमोशनल सेन्सचा भाग विकसित झालेला नसतो. अशा वेळी मुलं निर्णय घेताना भावनिक होतात. त्यामुळे या वयातील मुलांवर आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे मुलं रागीट होणं किंवा हिंसक होणं स्वाभाविक आहे.
अशा परिस्थितीत डॉक्टर मुलांशी संवाद साधण्याचा सल्ला देतात. मुलांना बाहेर घेऊन जाणे, त्याच्यांशी मोकळेपणाने बोलल्याने बराच फायदा होऊ शकतो. संवाद साधल्याने मुलांच्या व्यवहारात बराच बदल घडतो. आज कुटुंबातील व्यक्तीशी संवाद तुटल्याने नातेसंबधात वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे हरवलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
प्रत्येक वेळी मुलांच्या चुका काढणे चुकीचं आहे. वाढत्या वयाबरोबर त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असतं त्यामुळे त्यांना समजून घेणे फार आवश्यक आहे. लहान मुलं घरात असली की त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळा. त्यांना कोणत्या तरी ॲक्टिव्हीटीमध्ये गुंतवून ठेवा. त्यांना चित्रं काढायला सांगा, त्यासाठी त्यांना साहित्य आणून द्या. त्यांच्या कल्पक वृत्तीला चालना देण्यासाठी त्या प्रकारचं क्रियटिव्ह वातावरण तयार करा. त्यांच्या बुद्धीला चालना देणारी एखादी गोष्ट त्यांना सांगा. 
डोक्याला ताण देणारी आणि त्यासोबत त्यांचा विकास होईल अशी एखादी गोष्ट केल्यास ती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. वेळेप्रंसगी शीस्त लावण्यासठी मुलांना छोटीशी शिक्षा करा, पण शिक्षा करताना आई-वडिलापैकी एकाने मुलांशी प्रेमाची वागणूक द्याली. म्हणजे आई रागावत असेल तर वडिलांनी मुलांशी आपुलकीनं वागावे. दोघांनीही रागावणे सुरू ठेवले तर मुलांच्या वर्तुवणुकीत फरक पडतो.
लहान मुलांच्या विकासामध्ये खेळण्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. आई-वडील सोबत नसतात त्यावेळी ही मुलं त्यांच्या खेळण्यांसोबत खेळत मोठी होतात. मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल अशा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी त्यांना घेऊन द्या. ते त्यांच्यासोबत खेळण्यात गढून जातील.
लहान वयातच मोठे-मोठ्या आकृत्या, चित्रे, जसं चौकान, रिंग, बॉक्स, अल्फाबेट द्यायला सुरुवात करा. खेळ कसे खेळायचे हे शिकवलं तर मुलं मन लावून ते शिकतात. चित्रांतून व आकृत्यामधून त्यांची बुद्धिमत्ता वाढीस लागते. मुलांची जास्तीत जास्त शारीरिक हालचाल होईल अशा कृतींना प्राधान्य द्या. शक्य होईल तेवढं लहान मुलांना मोबाईल व इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून लांब ठेवा. 
लहान मुलांसमोर पालकांनीदेखील वारंवार मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन बसू नये. मुलं मोठ्य़ाचं इथंही अनुकरण करतील. घरात सर्वांनी पुस्तकांचं सामूहिक वाचन करावं. लहान मुलांसाठी चित्रकाला वही, छान-छान गोष्टींची पुस्तके आणऊन द्यावी. मुलांसोबत पालकांनीदेखील खेळावे. शक्य होईल तेवढा वेळ पालकांनी मुलांसोबत स्पेंड करावा. 
जेवताना मुलांसोबत गप्पा माराव्यात. सवय किंवा नियम आपण स्वत: आणि मुलांनाही लागू केल्यास मुलांचं मोबाइल आणि गेमवरचं लक्ष उडायला नक्की मदत होईल. इलेक्ट्रॉनिक खेळणी त्यांना लहान वयात देऊ नका. मुलांना बंदूक, तलवार यांसारखी खेळणी कदापी देऊ नका. मुलं त्याप्रमाणे अनुकरण करून त्यांच्यात हिंसक मानसिकता तयार होते.
शहरात मुलांना खेळण्यासाठी मोठी मैदानं नाहीत. त्यातून मार्ग काढण्यासाठी मुलांना पार्कमध्ये घेऊन जा, तिथं मुलं खेळतात. मैदानी खेळातून त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता वाढते. त्यांच्या कलागुणांचा विकास होतो. मोबाइलवर खेळले जाणारे गेम्स हे अभासी असतात, हे मुलांना पटवून द्या. मुलांना त्यामधला फोलपणा पटवून द्यावा. मोठ्या मुलांना मोबाईल देताना त्याचे वेळापत्रक बनवा. मुलांसाठी मोबाइल, मैदानी खेळ, अभ्यास याचं वेळापत्रक पाळणं बंधनकारक करावं.
गेल्या महिन्यात मलेशियाच्या एका पालकांनी 10 वर्षांच्या आपल्या मुलीला मोबाईल घेऊन देताना तिच्याशी लिखित करार केला. यात तिनं मोबाईलमध्ये जास्त वेळ गंतून राहू नये असा सल्ला होता. पालकांनी तिला शाळेत मोबाईल नेण्यास बंदी केली आहे. हा लिखित करार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पालकांनी मुलांना मोबाईल देताना अशा प्रकारचा प्रयोग करायला हरकत नाही.

(22, डिसेंबर 2018, रोजी अक्षरनामावर प्रकाशित झालेला रिपोर्ट)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: बालके, पालक आणि गेमिंग ॲडिक्शन
बालके, पालक आणि गेमिंग ॲडिक्शन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEipSAZ0lepc9NUQOo23QegIZmXl52sX7yqjUmDhAJvXizWVQO0YeFNhG6R0Mho-qR4xTfeqB6d3QFV7baHGyc2ix3NEFXkUl3JR2S0la8tc7_8CcZbL-DZB902WIwDUXVPFXn9bh7ZF_8Y3/s640/ARTICLE_COVER_PIC_1545613941.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEipSAZ0lepc9NUQOo23QegIZmXl52sX7yqjUmDhAJvXizWVQO0YeFNhG6R0Mho-qR4xTfeqB6d3QFV7baHGyc2ix3NEFXkUl3JR2S0la8tc7_8CcZbL-DZB902WIwDUXVPFXn9bh7ZF_8Y3/s72-c/ARTICLE_COVER_PIC_1545613941.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_89.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_89.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content