'साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे' (२)

उस्मानाबाद येथे होत असलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रानकवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. १०, ११ आणि १२ जानेवारीला होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. त्यांचे अध्यक्षीय भाषण आम्ही नजरिया वाचकांसाठी संपूर्ण स्वरूपात दोन भागामध्ये प्रसिद्ध करत आहोत. त्याचा हा दूसरा भाग.
 
मातृभाषेस जिवे मारिले?
आपण आईच्या दुधातून आपल्या बोलीभाषेचे धडे घेतले. त्यानंतर अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मायबोलीतून आपले शालेय शिक्षण झाले आणि मायबोली मराठीशी आपली नाळ जुळली गेली. मातृभाषेबरोबरची नाळ तुटली की संस्कृतीपासून फारकत होण्यास फारसा वेळ लागत नाही. भाषा ही संस्कृतीकडे उघडणारी खिडकी असते. आपल्या अस्तित्वाचा अर्थ आपल्या अध्यात्म-जीवनात दडलेला आहे. खिस्ती अध्यात्म आणि धार्मिक जीवनाचा परिचय मला मराठीच्याच माध्यमातून झाला. चर्चमध्ये मराठी भक्तिगीते कानांवर पडली. आत्म्याचे पोषण करणारी येशूची वचने मराठीतून ऐकली. धर्मगुरूंनी मराठीतून केलेल्या बायबल निरूपणाचे धडे काळजाच्या कप्प्यात साठवले. थोडक्यातआमचा आध्यात्मिक पिंड मराठीवर पोसला गेला. पडक्या किल्ल्याच्या बुरुजावर डौलाने वाढणाऱ्या पिंपळ रोपट्याची मुळे ‘जीवनाचा’ शोध करीत करीत धरणीमातेच्या गर्भात पोहोचावीतत्याप्रमाणे मायबोलीच्या संस्काराची पाळेमुळे मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या वृद्धांपर्यंत पोहोचली आहेत. मातृभाषेच्या परिचयामुळे ज्ञानोबांचे काव्यमय गीता-तत्त्वज्ञानतुकोबांचे रांगडे अध्यात्मजनाबाईंची भावविव्हळ भक्तीफादर स्टीफन्सनी केलेला शोकरसाचा हृदय हेलावणारा आविष्कारशाहिरांच्या लावण्यांतून व्यक्त होणारा खट्याळ शृंगारदलित साहित्यातून व्यक्त होणारी भळभळती वेदना या साऱ्यांचा आस्वाद मला मराठी भाषेतून घेता आला. किती परमभाग्ययोग आहे हा !

इंग्रजी माध्यमाचे आव्हान

१९८०च्या दशकात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची त्सुनामी देशभर आली. १९९१मध्ये आपल्या देशाने मुक्त आर्थिक धोरणाचा अवलंब केला. मुक्त बाजारपेठ आली. सर्व क्षेत्रांत स्पर्धा आली. राष्ट्राराष्ट्रांतील सीमारेषा पुसट झाल्या. ‘ग्लोबलाइज्ड’ जगामध्ये टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषा सर्वांना आवश्यक आणि अपरिहार्य वाटू लागलीकारण ती धनाची भाषा झाली होती. आपण मराठी माणसे तशी चतुर आहोत. आपण अगोदरच सोयीस्कर म्हणींचा साठा करून ठेवला आहे. ‘माय मरो नि मावशी जगो’, ही अशीच एक म्हण आहे. ‘मराठी माय मरो नि इंग्रजी मावशी जगो’, असेच जणू आपण ठरवले आहे. 
इंग्रजी ही जागतिक संपर्काची भाषा आहे. तिच्यावर निश्चितच प्रभुत्व मिळवावे. आजच्या परिस्थितीमध्ये फ्रेंचजर्मनजपानी आदी इतर परदेशी भाषाही शिकाव्यातकारण त्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक झाल्या आहेत. न्यूनगंडाच्या किंवा वृथा राष्ट्राभिमानाच्या आहारी जाऊनइंग्रजी किंवा कुठल्याही भाषेचा दुस्वास करणे अयोग्य आहे. बहुभाषिक असणे ही आधुनिक काळाची गरज आहे. जगभर इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढतो आहेहे सूत्र फ्रान्सजर्मन, इटलीपोर्तुगालस्पेन इ. युरोपियन राष्ट्रांनी मान्य केले आहे. तथापि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडलेल्या नाहीततर ते आपल्या राष्ट्रीय भाषेतच शिकत आहेत. 

इंग्रजी शिकण्यासाठी ब्रिटनने सुलभ अभ्यासक्रम तयार केले आहेत. सुट्टीच्या दिवसांत युरोपातील मुले त्या अभ्यासक्रमांचा लाभ घेतात व कामचलाऊ इंग्रजी शिकतात. याच धर्तीवर परदेशी नागरिकांनी फ्रेंच शिकण्यासाठी फ्रान्सने ‘अलायन्स फ्रान्से’ व जर्मनीने जर्मन भाषा शिकण्यासाठी ‘गटे इन्स्टिट्यूट’ सुरू केल्या आहेत व आपली भाषा परकीयांना दोन-तीन महिन्यांत शिकण्याची सोय केली आहे. त्या संस्थांच्या शाखा पुणे-मुंबईत आहेत. आपल्याकडे अन्य भाषकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी डेक्क्न कॉलेज निरनिराळे प्रयोग करत आहे. थोडक्यात शिक्षणाचे माध्यम आमुलाग्र न बदलतासुद्धा एखादी भाषा शिकता येते.

इंग्रजी भाषा शिकताना मायबोलीचा बळी का द्यावाइंग्रजी भाषा महत्त्वाची असलीतरी ती मातृभाषेची जागा कधीच घेऊ शकत नाहीहे वास्तव आहे. इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत गेलेतेव्हा देशातील शिक्षणतज्ज्ञभाषापंडित आणि शासन ह्यांनी एकत्र येऊनमायबोलीचे संवर्धन करीत असतानासुलभपणे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व कसे मिळवावेयासंबंधी पर्याय शोधून काढायला हवा होता. त्यात ते कमी पडले. काही मोजक्या व्यक्तींनी तशा प्रकारचे प्रयोग सुरू केले. उदा. मायबोलीकडे दुर्लक्ष न करता इंग्रजी कसे अस्खलितपणे शिकता येतेहा प्रयोग मॅक्झिम बर्नसन ह्यांनी फलटणला आपल्या शाळेत यशस्वीपणे राबवला. 

हसत-खेळत कसे शिकवावेहे तंत्रही त्यांनी आपल्या शाळेला लागू केले. मी त्या शाळेला भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मी त्यांना विचारले, ‘तुम्हाला सुट्टी आवडते की शाळेत यायला आवडते?’ त्यांनी एकसुरात उत्तर दिले, ‘शाळेतशाळेतशाळेत !’ मॅक्झिमबाईंनी आपल्या मुलांना फक्त विषय शिकवले नाहीततर त्यांना शाळेचा लळा लावला. तसे प्रयत्न पुण्यालाही झालेपरंतु दुर्दैवाने ते लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले नाही. उलट इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी पालकांनी सोपा मार्ग स्वीकारलातो म्हणजे बालवर्गापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा स्वीकार केला. प्रश्न माध्यमांचा नसून शिक्षणाच्या दर्जाचा आहे. तो दर्जा आपण मराठी माध्यमांच्या शाळांत सांभाळला आहे का?

पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांती मोहिनी पडली आहे. इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केल्यामुळे इंग्रजी भाषेचा पगडा शहरातल्या लोकांवर अजूनही आहे. त्यांच्या भाषेबरोबर त्यांच्या संस्कृतीचाही! मे. पु. रेगे ह्यांनी आपल्या ‘मधली स्थिती’ या लेखात म्हटले आहे कीआपण फक्त भाषा घेत नाहीतर तिच्याबरोबर आलेले पॅकेजही आपल्याला स्वीकारावे लागते. 

भाषेबरोबर संस्कृतीचे आदिबंध जोडलेले असतात. विशिष्ट भाषा ज्या संस्कृतीमधून विकसित झालेली असतेती त्या संस्कृतीमधील भल्या-बुऱ्या गोष्टी आपल्याबरोबर घेऊन येत असते. इंग्रजी भाषा ही पाश्चात्त्य संस्कृतीची अग्रदूत आहे. उदा. इंग्रजी माध्यमातल्या मुलांनी ‘आई’ नि ‘बाबा’ हे शब्द हद्दपार केलेले आहेतत्याऐवजी ते ‘मम्मी’ आणि ‘डॅडी’ असे म्हणतात. त्याची काही जरूरी आहे का 

अन्य भाषेतून मराठी शिकणारे त्यांच्या मातृभाषेतील संज्ञा बदलत नाहीत. आपणास ती गरज का भासतेकारण आपला न्यूनगंड! मल्याळीतमिळकोकणीबंगाली आदी भाषक अवश्य इंग्रजी शिकतातमात्र एकमेकांशी संवाद साधताना कटाक्षाने आपल्या मातृभाषेचाच वापर करतात. शिकलेसवरलेले शहरांतले लोक ज्या मार्गाने जातातत्यांचेच अनुकरण बहुजन समाज करीत असतो. आज खेड्यापाड्यांपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे लोण पसरत आहे. याचे कारण पुण्या-मुंबईतील उच्चभ्रू समाजाने मराठी माध्यमाचा पूर्णपणे त्याग करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा केलेला स्वीकार. त्याअर्थाने ते खरे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. यांची मुले शिकून परदेशी जाणार आणि आमची मुले मात्र खेड्यांतच राहणार काया भयगंडाने इतरांना पछाडले आहे. म्हणून खेड्यापाड्यांतील लोकांचा इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढला आहे. कारण त्यांच्यापुढे इंग्रजीभाषा सुलभपणे शिकण्याचा दुसरा पर्याय नव्हता.

मायबोलीचा प्रश्न

प्रत्येक लोकसमुहाचे सांस्कृतिक संचित असते. रीतीभातीसणसोहळेे भावभावना असतात. त्यांचा आविष्कार त्या त्या लोकसमुदायाच्या मातृभाषेतून होत असतो. त्या त्या भाषेच्या शब्दकळेतूनम्हणी-वाक्प्रचारांतूनलोकसंगीतातून संस्कृती व्यक्त होत असते. त्यासाठी मायबोलीचे संवर्धन करणे अत्यावश्यक असते. भाषेच्या माध्यमातून मनाच्या मातीत मूल्ये झिरपत असतात. नातेसंबंधाच्या धाग्यांची घट्ट वीण साधण्यासाठी भाषा मोलाचे योगदान देत असते. आपल्या देशात भाषावार प्रांतरचना हे सूत्र लावण्यात आले. हेतू हा कीत्या त्या राज्यातील मातृभाषेचा सर्व बाजूंनी विकास व्हावा. त्या दृष्टीने सुरुवातीला काही प्रयत्नही झाले. मात्र अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे स्तोम वाढल्यामुळे मायबोलीकडे दुर्लक्ष होत आहे 

जागतिकीकरणाच्या महापुरात अनेक वृक्ष कोसळून पडत आहेत. देशीवादाची पाळेमुुळे उखडली जात आहेत. ज्यांच्या अबोध मनात न्यूनगंडाने घर केले आहेते सहज परक्या संस्कृतीला बळी पडतात आणि हळूहळू त्यांना आपल्या अस्मितेचा विसर पडतो. आज पाश्चिमात्य संस्कृतीने जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. अशा वेळी आपल्या देशीपणाचेआपल्या मायबोलीचे जतन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. एकेकाळी बीबीसीचे भारतातील प्रतिनिधी असलेले मार्क टुली हे ब्रिटिश पत्रकार सांगतात, "If you want to destroy a people, destroy it’s language." (तुम्हाला एखादा समाज नष्ट करायचा असेलतर त्याची मातृभाषा नष्ट करा.). मायबोलीची हेळसांड करून आपण निराळे काय करीत आहोत?

मराठीच्या अस्तित्वाचा लढा

निजामशाहीत मराठी भाषेची गळचेपी होत होतीतेव्हा (१९४३साली) श्री. म. माटे म्हणाले होते, ‘‘आपली मातृभाषा जितक्या ठिकाणांहून हाकून देता येण्यासारखी आहेतितक्या ठिकाणांहून तिची हकालपट्टी होत आहे. मराठीच्या शाळा बंद होत आहेत. राजदरबारी तिला कसलीही प्रतिष्ठा उरलेली नाही.’’ ही स्वातंत्र्यपूर्व काळातली व्यथा.

स्वातंत्र्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९५७ साली झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्री. वि. द. घाटे यांनी एक स्वप्न रंगवले होते. ते म्हणाले होते, ‘‘माझी मायमराठी भाषा महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसली पाहिजे आणि तिने प्रेमाने भरवलेला घास आमच्या सर्वांच्या पोटात गेला पाहिजे.’’

१९६० साली महाराष्ट्राला सिंहासन लाभले. मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आलेतरी मराठी भाषेला सिंहासन लाभले काया प्रश्नाचे उत्तर १९८९ साली झालेल्या जागतिक मराठी परिषदेत सापडते. परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी कुसुमाग्रज गहिवरून म्हणाले,‘‘स्वातंत्र्याच्या चाळीस आणि राज्यस्थापनेच्या पंचवीस वर्षांनंतरही मराठीला आपले हक्काचे सिंहासन अद्याप मिळालेले नाही आणि ते मिळत नाही याचे कारण ते रिकामे नाही. या मातीशी कोणतेही नाते नसलेल्या एकापरकीय भाषेनेइंग्रजीने ते बळकावले आहे. आज मराठी भाषा लक्तरांमध्ये मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे.’’ भाषा केवळ व्यवहाराचे नियमन करणारे निर्जीव साधन नाहीती भावभावनांच्या प्रकटीकरणाची जातिवंत वस्तुस्थिती आहेहे आपण केव्हा लक्षात घेणार आहोत?

अव्वल इंग्रजी काळात उच्चभ्रू वर्गाने इंग्रजीच्या बळावर सरकारी नोकऱ्या मिळवल्या. इमानेइतबारे त्यांनी परक्या सरकारची सेवा केली. दुसऱ्याबाजूला परकीय मिशनरी मात्र मराठी भाषेची सेवा करीत होते आणि मराठी भाषेमध्ये लेखन करीत होते. उदा. मोल्सवर्थचा शब्दकोश (१८३१). विल्यम कॅरी ह्यांनी मराठी भाषेचे व्याकरण १८०५मध्ये लिहिले. त्यांनी वैजनाथ पंडित ह्यांच्या सहकार्याने ‘मॅथ्यूचे शुभवर्तमान’ हे बायबलमधील पुस्तक देवनागरी लिपीत बंगालमधील सेरामपूर येथून प्रसिद्ध केले. त्यांनी १८१५मध्ये कोकणीतही हेच शुभवर्तमान प्रसिद्ध केले. 

विल्यम कॅरीप्रमाणे थॉमस कँडीनेही मराठी भाषेची केलेली सेवा मोलाची आहे. त्याने ‘विरामचिन्हांची परिभाषा’ हे पुस्तक १८५० साली प्रसिद्ध केलेतसेच त्याने मराठी भाषेमध्ये पाठ्यपुस्तकेही लिहिली. मिशनऱ्यांच्या मराठी साहित्याचा सविस्तर परिचय डॉ. श्री. म. पिंगेडॉ. गंगाधर मोरजे ह्यांनी ‘मराठी वाङ्मयाचा अभ्यास’ ह्या आपल्या ग्रंथात करून दिलेला आहे. बाबा पद्मजींनी (१८३१ ते १९०६) ‘शब्द रत्नावली’ हा कोश लिहिलातसेच संस्कृत-मराठी कोश तयार केला. त्यांनी म्हटले आहे, ‘सर्वांस इंग्लिश भाषेने वेडावून टाकले आहे. त्यांचा मातृभाषेबाबत अभिमान व प्रेम कमी व ती शुद्ध रीतीने बोलणे व लिहिणे याबाबत उपेक्षा वृत्ती फार. हायस्कूलांतून सर्वच विषय इंग्रजीतून शिकवितात. त्यामुळे मूल जसे लहानाचे मोठे होतेतसे त्यास इंग्रजी भाषेचा संबंध अधिक जडतो. इंग्रजीचा अधिक प्रभाव राहतो व मराठीची उपेक्षा होते.

इंग्रजीबद्दल अहंगंड व मराठीबद्दल न्यूनगंड हा आजार खूप जुना आहे. साहेब गेल्यावरहीसाहेबांच्या भाषो fवषयी अतिप्रेम आणि स्वत्वाविषयीसुप्त न्यूनगंड उच्चवर्णीयांत कायम आहे. त्याला आपल्या पोटापाण्याची आणि नोकरीधंद्याची फार मोठी काळजी. आज इंग्रजी उपयुक्त आहे म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळांपुढे लांबलचक रांगा लागलेल्या दिसतात.

परभाषेच्या माध्यमामुळे भाषा आणि संस्कृती यांच्यावर विपरीत परिणाम होतोच. परंतु त्यापेक्षा एक मोठे संकट देशावर ओढवते आहेते म्हणजे देशाच्या अभंगत्वाला सुरुंग लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे दोन वर्ग देशात आहेत. ‘आहे रे’ हे इंडियाचे (रेसिडेंट) सिटिझनतर ‘नाही रे’ हे भारताचे साधेभोळे नागरिक. इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थी हे ‘इंडियातील असतात. इंग्रजी शाळात प्रवेश मिळवणे हे त्यांच्यापुढील एकमेव ध्येय असते. महागडी कॅपिटेशन फी त्यांनाच परवडते. सुटाबुटातील ती मुले सहलीसाठी परदेशांतही जातात. याउलटभारतातील मुलांच्या काही शाळांतअजून खडूफळा पोहोचलेला नाही. उच्चभ्रू शाळांतील मुले पॉकेटमनी म्हणून जितका खर्च महिन्याला करताततितके या गरीब मुलांच्या या पालकांचे माासिक उत्पन्नसुद्धा नसते. 

भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षा इंडिया-भारत ही फाळणी अधिक घातक आहे. मायबोली मराठीवर आपले आतड्यापासून प्रेम आहे काहा खरा प्रश्न आहे. ज्याच्यावर आपले प्रेम असतेत्याच्यासाठी आपण कुठलाही त्याग करण्यासदिव्य करण्यासअगदी प्राण द्यायला सुद्धा तयार असतो. सगळा न्यूनगंड दूर सारूनआपल्या ओठांनी नव्हेतर आत्म्याने मराठीत बोलू या आणि मुला-नातवंडांशी मराठीत संभाषण करू या. त्यामुळेच त्यांना मायबोलीची गोडी लागेल.

मायबोलीवर कसे प्रेम करावेे, हे गोव्यातील कोकणी भाषक लोकांकडूनआपण शिकू शकतो. गेल्या पन्नास-साठ वर्षांत कोकणी भाषकांनी आपल्या मायबोलीला वैभव प्राप्त करून दिले आहे. शासनाकडे आशाळभूत नजरेने न पाहताप्रसंगी शासनाची उदासिनता असतानाही त्यांनी कोकणी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. स्वबळावर पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. व्याकरणाची पुस्तके उपलब्ध नसतानाश्री. सुरेश बोरकार ह्यांनी व्याकरण रचले. प्राथमिकमाध्यमिकउच्च माध्यमिक आणि विश्वविद्यालयीन स्तरांवर कोकणी भाषासाहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सारखी वाढ होते आहे. प्राथमिक शाळेत कोकणी माध्यम आणि पुढे इंग्रजी माध्यम असा प्रयोग गोव्यात सुरू आहे.

वयाच्या सातव्या वर्षांपर्यत जे संस्कार होतातते धन आयुष्यभर पुरत असते. ह्याच वयात मातृभाषेचा संस्कार झाला पाहिजेह्याची जाणीव जगात सर्वत्र आहे म्हणून मूठभर आशियाई देश साडे ले (त्यात भारत आघाडीवर आहे)तर सर्वत्र मायबोली हेच शिक्षणाचे माध्यम आहे. तिथे दुय्यम भाषा म्हणून अन्य भाषा आवडीने शिकवल्या आणि शिकल्या जातात. मायबोलीच्या संवर्धनाचे आणखी एक उदाहरण. इसवी सनाच्या पहिल्या शतकात इस्राएलमध्ये झालेल्या परकीय अत्याचारामुळे मोठ्या प्रमाणात ज्यू लोक जगभर पांगले गेले. ते त्या त्या देशाच्या संस्कृतीशी एकरूप झाले. त्यांनी स्थानिक भाषा अवगत केल्या. त्यांच्या प्रार्थना मात्र हिब्रू भाषेत होत असत. १९४८ साली इस्राएलला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर जगभर विखुरलेले ज्यू लोक इस्राएलला परतू लागले. त्या सर्वांना एकत्र ठेवून संस्कृती ऐक्य कसे साधावेअसा प्रश्न तत्कालीन शासनाला पडला. म्हणून त्यांनी प्राचीन हिब्रू भाषेचे आधुनिकीकरण केले. 

एक माणूस आपल्या जिद्दीच्या बळावर कसे आपल्या प्राचीन भाषेचे पुनरुज्जीवन करू शकतो हे आपल्याला एलिझेर बेन यहुदा यांच्या ‘टंग ऑफ द प्रॉफेट्स’ या चरित्रावरून जाणवते. हिब्रू भाषा ही इस्राएलची राष्ट्रभाषा असून ती त्यांची संपर्क भाषा आहे. त्यांचे इंग्रजीवरही प्रभुत्व आहे. कोकणी आणि हिब्रू ह्या भाषांनी आपले अस्तित्व टिकवलेत्यासाठी त्यांना भगीरथ प्रयत्न करावे लागले. आपल्यालाही मातृृभाषेचा बळी न देता इंग्रजी शिकता येईल की नाहीइच्छा असेल तर अशक्य असं काहीच नाही. जी मुले मातृभाषेत अस्खलितपणे वाचन करू शकतातती नंतर इंग्रजीतही चांगली प्रगती करतात. 

झांबिया देशाने केलेल्या प्रयोगाचे उदाहरण घेऊ या. त्या प्रयोगानुसारकाही निवडक मुलांना पहिल्या इयत्तेत इंग्रजी व मातृभाषेचे धडे देण्यात आलेतर इतर मुलांना पहिल्या इयत्तेत फक्त मायबोलीचे आणि दुसऱ्या इयत्तेपासून इंग्रजीचे शिक्षण देण्यात आले. त्यानंतर निरीक्षण केल्यावर आढळून आले कीपहिल्या इयत्तेत ज्यांना दोन भाषा शिकवल्या गेल्या त्या मुलांपेक्षाज्यांना पहिल्या इयत्तेत फक्त मायबोली आणि दुसऱ्या इयत्तेपासून इंग्रजी शिकवण्यात आले त्यांनी इंग्रजी वाचन आणि लेखन या दोन्ही बाबतींत लक्षणीय प्रगती केली. तसेच त्यांचे मातृभाषेचे ज्ञानही मोठ्या प्रमाणात वाढले. झांबियन शासनाने ही पद्धत नंतर संपूर्ण देशाला लागू केली. बालवर्गापासून मायबोली मराठीचे बाळकडू पाजणे हाच मराठी वाचवण्याचा रामबाण उपाय आहे. त्याला पर्याय नाही.

ट्यूशन संस्कृती

वाचन संस्कृती मंदावली आहेअशी सर्वत्र ओरड आहे. त्याची अनेक कारणे असू शकतात. शिक्षणाचे माध्यम बदलले. वर्गात इंग्रजीत शिकवलेले मुलांना फारसे समजायचे नाही. त्यासाठी ट्यूशनची गरज भासू लागली. कारणघरातील व व्यवहारातील भाषा मराठी अन् शाळेतील भाषा इंग्रजी आणि सर्व विषय इंग्रजीत. मुलांची इंग्रजी शब्दसंपत्ती अतिशय मर्यादितत्यामुळे त्यांना शिकणे अवघड झाले. पालकांना चिंता लागली आणि इंग्रजीवर तितके प्रभुत्व नसल्यामुळे ते इंग्रजी शिकवणी घेऊ शकले नाहीत. आणि ट्यूशन संस्कृती उदयास आली. हळुहळू तो जोड धंदा बनला. त्याचे व्यापारीकरण झाले. त्याला संस्थात्मक रूप प्राप्त झाले व त्यातून ट्यूशनसम्राट निर्माण झाले. लाखो रुपयांची पॅकेजेस जन्माला आली.

ट्यूशनसंस्कृतीचे अजून एक कारण म्हणजे शाळा-महाविद्यालयातील शिक्षणाचा घसरलेला दर्जा. ट्यूशन-सम्राटांनी शाळेतील उत्तम शिक्षकांना आपल्याकडे ओढले. ते वर्गात थातुरमातुर शिकवायचे आणि ट्यूशन वर्गात मात्र जीव ओतून शिकवू लागले. शाळा-महाविद्यालय आणि ट्यूशनवर्ग ह्यांतील फरक विद्यार्थ्यांना जाणवला. आता तर ‘इंटिग्रेटेड कॉलेज’ हा नवाप्रकार चालू झाला आहे. ही पद्धत म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस आहे. त्यात सामील झालेले सारे शिक्षक व प्राध्यापक ह्यांना शिक्षकदिनी आणि गुरुपाौर्णमेला ‘गुरु: साक्षात परब्रह्म’ म्हणून विद्यार्थ्यांकडून स्वत:भोवती आरती ओवाळून घेताना काहीच वाटत नसेल काट्यूशन संस्कृतीमुळे बिचाऱ्या पालकांवर लाखो रुपयांचा भार पडतो आहे. म्हणजे शिक्षण ही फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी बनली आहे.

युरोपात कुठेही मुलांसाठी ट्यूशन्स लावल्या जात नाहीतकारण खाजगी किंवा सरकारी शाळांचा दर्जा सारखाच आहे. पालक आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करतातकारण खाजगी शाळांची फी अव्वाच्या सव्वा असते. तसेच तेथे पालकांसाठी ट्यूशन्स असतातपण त्या सुजाण पालकत्वासाठी! आता बिगरीपासून डिगरीपर्यंत ट्यूशनशिवाय मुलांचे पान हलत नाही. त्यामुळे मुलांचा सगळा वेळ निरनिराळे छंदवर्गशाळा-महाविद्यालय व ट्यूशन वर्गात जातो. 

पावसात भिजायचे त्यांचे वय निघून जाते आहे. त्यांना ना अवांतर वाचनासाठी वेळना खेळासाठी वेळ. हा मुलांवर केला जाणारा जुलूम आणि अत्याचार आहे. या जुलमाचे वाटेकरी पालकशासन आणि ट्यूशनसम्राट आहेत. आपल्याला ट्युशनमुक्त भारत कसा करता येईलनिदान ट्यूशनमुक्त रविवार तरी करता येईल काम्हणजे मुलांना पालकांच्या आणि पालकांना मुलांच्या संगतीत एक दिवस तरी घालवता येईल. पालकांनी मुलांसाठी वेळ काढून ठेवला पाहिजे.

पालक आणि मार्कांचा बुडबुडा

मुलांची स्थिती आज शर्यतीच्या घोड्यासारखी झाली आहे. घोड्यावरज्यांनी पैसे गुंतवले आहेतत्यांना आपला घोडा पहिला यावाअसे वाटतेपण घोड्याला तसे वाटते काआपल्या मुलाने ९८ टक्के, ९९ टक्के मार्क मिळवावेतत्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा व परदेशात जाता यावेही पालकांची इच्छा असते. या संदर्भात डॉ. अमर्त्य सेन ह्यांचे मत लक्षणीय आहे. ते म्हणतात, ‘‘भारतात पहिला येणाऱ्याचे फाजील लाड होतात. भारतामध्ये आयटीआय, ए. एस.डॉक्टरइंजिनियरसी.ए. ह्यांना विशेष भाव आहे. त्यासाठी पालकांचे प्रयत्न चाललेले असतात. त्यामुळे पहिला क्रमांक हे भारतीयांचे सामाजिक वेड झाले आहे’’

ह्या वेडामुळे पालकांना वाचनसंस्कृतीचे काहीही पडलेले नाही. डॉ. अमर्त्य सेन ह्यांच्या ह्या मार्मिक चिंतनाकडे आपण कधी लक्ष देणार आहोतमुलांचा कल जिकडे असतोत्याविषयात त्यांना रस असतो. एखादा कमी गुण मिळालेला मुलगा आयुष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावही काढू शकतो. ह्या गुणांच्या स्तोमाचा प्रभाव प्रसारमाध्यमांवरही पडत आहे. त्यांची छायाचित्रे पहिल्या पानावर प्रसिद्ध करून बालवयामध्ये त्यांना अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. 

कधीकधी दहावी-बारावीत प्रथम आलेल्या मुलांची ही धुंदी पुढच्या प्रवासात उतरते. अशा उच्च गुण मिळालेल्या मुलांचे काही संस्था ‘गुणवंतांचे सत्कार’ ह्या नावाखाली सत्कार करीत असतात. अशा किती गुणवंतांनी पुढे देशाचीगोरगरिबांची सेवा केलेली आहेअण्णा हजारे ह्यांनी नापासांची शाळा’ हा वेगळाच प्रयोग चालू केला आहे. तथाकथित गुणसम्राट विद्यार्थ्यांचा गौरव करण्याऐवजी ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे,त्यांना इतरांबरोबर वर कसे आणता येईलयाचा विचार करणे आवश्यक आहे.
मराठीच्या बोली

बोलीभाषा हे मातृभाषेचे निर्झर आहेत. बोली ही जीवनपद्धतीचा आविष्कार असते. त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा असतात. बोलीला आणि समाजजीवनाला विभक्त करता येत नाही. आपल्या मातीचा गंध घेऊन येणारी बोली मातेच्या गर्भाशयाचे जणू अस्तर असते. शब्दकोश ह्या शब्दाचा अर्थ असा की कोश जसा एखाद्या किटकाच्या गर्भातील तंतूपासून निर्माण होतो आणि त्यातूनच नवा जीव जन्माला येतो. तसेच आईच्या गर्भकोशातून बाळ जन्माला येते. ती ज्या संस्कृतीत वावरतेज्या भाषेत विचार करते त्याच भाषेत बाळ बोलू लागते आणि परिसराच्या परिणामातून त्याची भाषा जन्माला येते. त्यातून भावनांची अभिव्यक्ती होऊ लागते आणि सांस्कृतिक शब्दकोश विणला जाऊ लागतो. 

भाषेच्या अंकुराचा शोध घेण्याचा प्रयत्न मोल्सवर्थ (१७९५ १८७१)जॉर्ज अब्राहाम ग्रिअर्सन (१८५१ – १९३९) आणि अलीकडे गणेश देवी (१९५०) इत्यादींनी आपल्या भाषाशास्त्रीय अभ्यासातून केलेला आहे. शब्दकोश तयार करून आपल्या तळपातळीचा शोध त्यांनी घेतलेला आहे. येथेच आपल्या संस्कृतीच्या खुणा आपणास सापडतात. महाराष्ट्रामध्ये शेकडो बोली भाषा आहेत. ह्या बोली मराठी नामकमहानदीचे झरे आणि ओढे आहेत. ह्याचे प्रत्यंतर बोली भाषांमधून आणि बोलींमधून विशेषकरून दिसून येते. आपल्या एका गीतात बहिणाबाई चौधरी म्हणतात,

माय म्हणता म्हणता होट होटालागी भिडे ।

आत्या म्हणता म्हणता केवडं अंतर पडे ।

ताता म्हणता म्हणता दातांमधी जीभ अडे ।

काका म्हणता म्हणता कशी मांदे मांदे दडे ।

जिजी म्हणता म्हणता झाला जिभेले निवारा ।

सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा ।

भारतीय संस्कृती कुटुंबवत्सल आहे. नात्यागोत्यांच्या जाळ्यात आपण वावरत असतो. त्याचे प्रत्ययकारी प्रतिबिंब या गीतात पडले आहे. प्रतिभावंत बहिणीबाईनी नात्यातील जवळीक किंवा दुरावा उच्चारांवरून गमतीदारपणे स्पष्ट करून दाखवला आहे. इंग्रजीने ‘कजन’ (cousin) याएका शब्दात सर्व नात्यांची एक मोळी बांधली आहे. मराठीत मात्र प्रत्येक नात्याचे वेगळेपण दाखवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ही आमची भाषिक श्रीमंती नाही का

बहिणाबाईच्या या गीताचे इंग्रजीत भाषांतर करता येईल काप्रत्येक भाषेचे आणि बोली भाषेचे अशा प्रकारचे अंगभूत सौंदर्य आहे. त्यामुळे सांस्कृतिक वारसा अधिक संपन्न होत असतो. नदीप्रमाणे संस्कृती गतिशील असते. आपल्या मूळ स्वभावाशी एकनिष्ठ राहूनती नवनवे बदल स्वीकारीत असते आणि असे करून अधिकाधिक संपन्न होत असते. भाषेचेही तसेच आहे. हे सूत्र ब्रिटिशांनी जपले. त्यांनी सर्व भाषांमधून उधारउसनवारी करून त्यांची भाषा संपन्न केली आणि आजमितीसही ते करीत आहेत. मराठीमध्ये प्रमाण भाषेच्या शुद्धीसाठी प्रयत्न झाले. दरवर्षी इंग्रजी भाषेमध्ये परक्या भाषेतून घेतलेल्या शब्दांची यादीच प्रसिद्ध केली जाते व ती त्यांच्या शब्दकोशात समाविष्टही केली जाते. उदा. बंदोबस्तगुरूयोगठग हे भारतीय मराठी शब्द.


भाषाशुद्धी की भाषावृद्धी?

आपल्याला भाषाशुद्धी पाहिजे की भाषावृद्धी पाहिजेभाषेचा कल नेहमी सुलभीकरणाकडे असतो. ‘स्टेशन’ ह्या शब्दासाठी अग्निरथविश्रांति स्थळ असा शब्द भाषा शुद्ध करणाऱ्यांनी सुचवला होतात्याचे काय झालेग्रामीण भाषेमध्ये त्याऐवजी ‘ठेसन’ असे म्हटले जातेतर उत्तरेकडे ‘इस्टेशन’ असे बोलले जाते. डेक्कन क्वीन जेव्हा धावू लागलीतेव्हा रेल्वे कामगार म्हणायचे, ‘डाकीण’ आली. ‘डाकीण’ हा शब्द किती सार्थ शब्द होता! राक्षसिणीसारखी ती धाडधाड धावत जायची. आपल्याकडे परकी शब्दांना पर्यायी शब्द काढण्याऐवजी त्याचे आपण सरसकट भाषांतर केले व त्याला आपण भाषाशुद्धी हे नाव दिले. अभिजनांवर संस्कृत भाषेचा पगडा होता. पंडिता रमाबाई ह्यांनी हिब्रू आणि ग्रीक भाषांमधून बायलबचे मराठी भाषांतर केले. ते संस्कृत प्रचूर झालेले आहे. त्यामुळे ते दुर्बोध वाटते. संस्कृतला देववाणी म्हटल्यामुळे प्राकृत भाषांकडे तुच्छतेने पाहिले गेले.

संस्कृतवाणी देवे केली

प्राकृत काय चोरापासूनी आली?

असा सवाल एकनाथांना विचारावा लागला. संस्कृत ही एक प्राचीन भाषा आहे आणि इतर प्राचीन भाषांप्रमाणे तिचेही अंगभूत सौंदर्य आहे. भारतात ती उच्चवर्णीयांची भाषा होती. एक प्राचीन भाषा म्हणून तिचे जतन अवश्य व्हावेपरंतु ती कुणावरही लादण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. जेव्हा भाषा लादली जाते तेव्हा प्रतिकार होतो. संस्कृतच्या दबदब्यामुळे पाली आणि अर्धमागधी ह्या भाषा विकसित झाल्या.

बोली भाषांचे भांडार

मराठी भाषा संपन्न करण्यासाठी बोली भाषांचे खूप मोठे भांडार आपल्या पदरी आहे. शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषा असा भेदभाव केल्यामुळे आपल्या बोली अंधारात राहिल्या. परंतु आपल्या पूर्वजांनी विशेषत: स्त्रियांनीबोली भाषेतील लोकगीतांद्वारे तिचे जतन केले आहे. खरे म्हणजे भाषेला मातृभाषा असे म्हटले जातेकारण आपल्या पोटच्या पोराप्रमाणे स्त्रिया आपल्या भाषेचे संगोपन व संवर्धन करीत असतात. प्रमाण भाषेचा आग्रह आणि त्यानंतर इंग्रजीचे आगमन ह्या प्रकारामुळे बोली भाषेत संभाषण करणे हे अनेकांना कमीपणाचे वाटते. वास्तविक प्रमाण भाषा ही कधी एकेकाळी बोली भाषाच होती ना 
बोली भाषांमध्ये शब्दांचे फार मोठे भांडार दडलेले आहे. त्या शब्दसंपत्तीच्या खाणी आहेत. मराठी भाषेने आता आपल्या बोली भाषांतून शब्दसंपत्ती स्वीकारण्याची वेळ आलेली आहे आणि अशा बोली भाषांच्या शब्दांचे व म्हणींचे कोश तयार झालेले आहेत. उदा. सामवेदी (कुपारी) ही माझी बोली भाषा. सामवेदी बोलीमध्ये म्हणींचे संपन्न भांडार आहे आणि ते लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. उदा. ‘सक्की आय अन वडापिपळाई हायहवतार आय आन ताडामाडायी हाय’ (सख्खी आई म्हणजे वडापिंपळाची सावलीसावत्र आई म्हणजे ताडामाडाची सावली.) 

तसेच ‘पुढच्याच ठेच मागचा शहाणा’ या म्हणीसाठी सामवेदी भाषेत म्हटले आहे. ‘पुडश्याओ तुटल्यो वानोमागसो जालो शानो.’ (पुढच्याच्या तुटल्या वहाणामागचा झाला शहाणा.) मराठी भाषेनेदेखील सोवळ्याओवळ्यातून बाहेर पडूनअन्य भाषाभगिनींकडून आणि विशेषत: बोली भाषांकडून चपखल प्रतिशब्दांचा स्वीकार करायला हवा. 

आमच्या वसई तालुक्यात दर दहा मैलांवर बोली भाषा बदलते. उदा. ‘कुठे चाललास’ ह्या प्रमाण भाषेतील शब्दांसाठी वाडवळी भाषेत ‘कटे सालला?’, सामवेदी भाषेत ‘कडे साललो?’ वलकर भाषेत ‘कंला चालला?’ आणि कोळी भाषेत ‘तू कंय चालला?’ अशीविविधता सापडते. भाषा-अभ्यासकांच्या अंदाजानुसार जवळजवळ सहा हजार भाषा व असंख्य बोली अस्तित्वात आहेत. जर योग्य उपाययोजना केली नाही तर येत्या शतकभरात चार हजार भाषा व त्याहून अधिक बोली संपून जातील. मराठीलाही तोच धोका आहेअशी भीती व्यक्त केली जात आहे.

बोली भाषांचा अभ्यास

महाराष्ट्रात गणेश देवी ह्यांनी भारतीय भाषांचे सर्वेक्षण करून बोलींच्या अभ्यासाचा प्रकल्प पूर्णत्वास नेला. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६० बोलींचा स्वतंत्र खंड आहे. त्या अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संपादन श्री. अरुण जाखडे ह्यांनी केले आहे. डॉ. अशोक केळकरडॉ. ना. गो. कालेलकर ह्या भाषाशास्रज्ञांनी मराठीला आधुनिक भाषाविज्ञानाची ओळख करून दिली. डॉ. हरिश्चंद्र बोरकर ह्यांनी ‘बोली’ विषयीचा अभ्यास मांडलेला आहे. बोलींचे महत्त्व ओळखून आज पाठ्यपुस्तकातही त्यांचा समावेश होत आहे. मराठी साहित्यात अनेक कथाकादंबरीकारांनी वऱ्हाडीवाडवळीसामवेदीमालवणी आणि बोली भाषांचा आपल्या साहित्यात यशस्वीपणे वापर केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही बोली भाषा जिवंत राहाव्यात म्हणून प्रयत्न केले जातात. उदा. लॅटिन अमेरिकेमध्ये सुमारे ८० लाखांपेक्षा जास्त ‘केचुआ’ ह्या बोली भाषेतून व्यवहार करतात. ह्या भाषेला स्वतंत्र लिपी नव्हती. पण १९७५ पासून पेरू देशामधील सरकारने प्रयत्न करून रोमन लिपीतून ह्या भाषेचे लिखित स्वरूपात पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रोक्साना क्युसो कोलान्तेस हिने ‘केचुआ’ भाषेचा अभ्यास करून त्या भाषेमध्ये पीएच.डी.चा प्रबंध सादर केला आहे.  

भाषेची मुळं निवडुंगासारखी असतात. ती खूप खोल पोहोचलेली असतात. त्याप्रमाणे मायबोलीची मुळे आपल्या अबोध मनाच्या कोशामध्ये गेलेली असतात. ती उपटून काढता येत नाहीत. परिस्थितीमुळे व्यवहाराच्या भाषेमध्ये बदल झाला तरी भाषा बोलीच्या रूपाने आपल्या काळजाच्या कोशात ती जाऊन बसलेली असते. 

उदा. वसई-मुंबईतील वळकर किंवा ईस्ट इंडियन बोली. हा समाज मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या सेवेत होता. काहींनी वसई-उत्तनमधून मुंबईला स्थलांतर केले. मात्र त्यांना आपल्या वळकर बोलीचा मुळीच विसर पडला नाही. वळकर भाषेतील लोकगीतांच्या दरवर्षी स्पर्धाही होतात. यावरून काय दिसून येतेबोलीला मरण नाही. आपणही जर प्रयत्न केलेबोली भाषेशी एकनिष्ठ राहिलोतर कुठलीही भाषा नष्ट होत नाही. त्यासाठी अथक प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत आणि ते तसे होत आहेतही आशादायक बाब आहे.

लेखनअनुवाद आणि प्रकाशन

आज महाराष्ट्रातील तळागाळातील घटक साक्षर होऊ लागले आहेत. ज्ञान ही शक्ती आहेह्याचा अनुभव ते घेत आहेत. ते शब्दांद्वारे व्यक्त होऊ लागले आहेतडोंगरदऱ्यांतूनशेताशिवारांतूनगिरण्या-कारखान्यातून मराठी साहित्याला नवनवे अंकुर फुटू लागले आहेत. मराठीच्या भवितव्याच्या दृष्टीने हे शुभचिन्ह आहे. अलीकडे काही नवोदित लेखकांना साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार मिळत आहेत. राज्य पुरुस्कार व साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार मिळालेले काही नवे लेखककवी हे पेशाने शेतकरी आहेत. त्यांना त्यांच्या साहित्याचे विषयत्यांच्या कसत्या जमिनीतून आणि उन्हात गाळलेल्या घामातून स्फुरतात.  

सध्या मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जाते आणि शहराकडे पाहिले तर ते खरे वाटू लागते. परंतु महाराष्ट्र खूप मोठा आहेव्यापक आहे. तिथे मराठी साहित्याच्या निर्मितीसंबंधी नवनवे प्रयोग चालू आहेत. ही अतिशय स्वागताची बाब आहे. अशा प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवे. लेखककवी हे काही प्रयोगशाळेत तयार केले जात नाहीत. तरीदेखील नवोदित लेखकांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. 

याबाबत काही प्रकाशनसंस्था तीन-तीन दिवसांच्या लेखन कार्यशाळा आयोजित करतात. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. नामवंत लेखक आणि प्रकाशक त्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांना लिहिण्यासाठी दिशा सापडू शकते. अनेक संस्था निबंधकथाव कवितांच्या स्पर्धा घेतात. होतकरू लेखकांकडून लेखन करवून घेतात. ह्या लेखनस्पर्धांमध्ये इंग्रजी माध्यमातील मराठी भाषक विद्यार्थीदेखील सहभाग घेऊन उत्कृष्ट लेखन करतात. काही दिवाळी अंंकांमध्ये कादंबऱ्या प्रसिद्ध होतात. नंतर त्या पुस्तकरूपाने बाहेर येतात. लेखनसंस्कृती वाढविण्यासाठी हे सर्व स्तुत्य उपक्रम आहेत.

अनुवाद संस्कृती

जागतिकीकरणामुळे जगाला एका खेड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आपले अनेक मराठी तरुण-तरुणी परदेशात नोकऱ्या करीत आहेत आणि तिथे वास्तव्य करून राहत आहेत. इंग्रजीअन्य युरोपियन भाषांतून इंग्रजीत भाषांतरित झालेल्या पुस्तकांची भांडारे त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. त्यात वाचलेले आणि भावलेले उत्कृष्ट साहित्य हे लेखककवी मराठीमध्ये अनुवादित करीत आहेत. 

केल्याने भाषांतर’ हे अनुवादाला वाहिलेले मासिकआंतरराष्ट्रीय साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देते. काही मराठी प्रकाशक उत्कृष्ट अनुवादकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून उत्तमोत्तम साहित्याची पुस्तके मराठीत प्रकाशित करीत आहेत. दिलीप चित्रेचंद्रकांत बांदिवडेकरशांता गोखले आदींचे अनुवादाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. गेल्या वर्षी (२०१९) मूळ स्पॅनिश लेखक रोबेर्तो आल्र्ट ह्यांच्या ‘Los Siete Locos’ ह्या स्पॅनिश पुस्तकाचा अक्षय काळे ह्यांनी तर ‘सात विक्षिप्त माणसे’ ह्या नावाने सरळ मराठीमध्ये अनुवाद केला आहे (लोकवाङ्मय प्रकाशन). 

मराठी लेखक विश्वाची मुलुखगिरी करताना विविध भाषांत आढळलेल्या या उत्कृष्ट साहित्याचा मराठी वाचकांना लाभ होणार आहे. तसेच काही मराठी पुस्तकेविशेषत: दलित आत्मचरित्रे इंग्रजीत अनुवादित झाली आहेत आणि इंग्रजीतून ती अन्य युरोपियन भाषांमध्ये अनुवादित होत आहेत. त्यांचे चांगले स्वागत होत आहे. ह्या ग्रंथव्यवहारामुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळत आहे.

प्रकाशन व्यवसाय

प्रकाशन हा इतर व्यवसायाप्रमाणे एक व्यवसाय आहे. व्यवसायाची काही गणिते असतात. जिथून चार पैसे मिळतील तिथेच गुंतवणूक केली जाते. प्रकाशन व्यवसायाचे तसेच आहे. त्यामुळे दोन गोष्टी घडतात. साहित्य विश्वात ज्यांचा दबदबा आहेत्या लेखक/कवींची पुस्तके प्रसिद्ध करण्यात प्रकाशक रस घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे ‘मागणी तसा पुरवठा,’ हे अर्थशास्त्रातील सूत्र. कधी कधी मोठे नाव झालेल्या लेखकांचे सुमार लेखनही प्रकाशित होते व वाचकांची फसवणूक होते.  

काही प्रकाशक उत्तमोत्तम पुस्तकांची निर्मिती करीत आहेत. त्यासाठी खूप मोठे भांडवल गुंतवण्याची जोखीम ते घेतात. कधी त्यांना तोटाही सहन करावा लागलेला आहे. आपली पुस्तके सकस कशी होतील यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अशा कितीतरी तरी पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत. हे कशाचे द्योतक आहेवाचक चोखंदळ झााला आहे. ‘मिळमिळीत अवघे टाकू न द्यावे आणि उत्कटभव्य तेचि घ्यावे’ या नियमानुसार वाचक उत्तम साहित्याची निवड करीत आहेत आणि उत्तम वितरण व्यवस्थेमुळे त्या प्रकाशकांच्या पुस्तकांचा चांगला प्रसार होत आहे. या प्रकाशकांना आपल्या लेखकांविषयी आत्मियता वाटते आणि लेखकांना त्यांच्याविषयी. प्रकाशन व्यवसायाच्या काही अडचणी आहेत. 

ट्रेनमध्ये आजकाल पूर्वीसारखी कुणाच्या हातामध्ये वर्तमानपत्रे/पुस्तके दिसत नाहीत. नेटवरून बातम्या पाहून सोडून दिले जाते. मार्मिक अग्रलेखावर मंथन होत नाही. तसेच समाज मोबाईलसोशल मीडियाचॅनेलच्या अति मनोरंजनाकडे ओढला जातोय. सवंग किंवा हलक्याफुलक्या गोष्टींकडे त्यांचा कल दिसतो. वाचन संस्कृतीला हा मोठा धोका आहे. पुस्तके ही विक्रीची वस्तू ठरवून शासनाने जीएसटीचा नियम त्यांना लागू केला आहे. ‘पुस्तक निर्मितीसाठी एकूण सुमारे ४७ टक्के जीएसटी भरावा लागत आहे’, असे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. (सकाळ१२/१२/२०१८) यामुळे प्रकाशन व्यवसायाचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. सांस्कृतिक ऱ्हासाला दिलेले हे आमंत्रण नाही का?   

प्रकाशनाप्रमाणे वाचनालयांच्याही अडचणी वाढत आहेत. आपल्या वाचकांना चांगली पुस्तके उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो व अनेक वाचनालयांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पुस्तकांचे डिजिटलायझेन करीत आहेत. उत्तम पुस्तके खरेदी करीत आहेत. त्यासाठी शासनाकडून मिळालेले अनुदान त्यांना पुरेसे पडत नाही व त्यामुळे ते त्यांच्याकडील सेवकांना योग्य वेतनही देऊ शकत नाही. वाचनालयांच्या अडचणीवर मात करण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत.

पुस्तकांच्या किंमती परवडत नाहीतअशी काहींची तक्रार असते. परंतु त्याचबरोबर सोन्याचाही भाव सारखा वाढत आहे नामग सोन्याच्या खरेदीमध्ये खंड पडला आहे कासणासुदीला कपड्यालत्त्यांवर किती खर्च केला जातो! अलीकडे मध्यमवर्गाचा आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यांच्या वार्षिक बजेटमध्ये उत्तम पुस्तकांसाठी किती टक्के रक्कम बाजूला काढली जातेसमाजाचा पुस्तकांबाबत प्राधान्यक्रम बदलला आहेही दु:खद बाब आहे.

नवोदित लेखक

नवोदित लेखककवींच्या काही तक्रारी आहेत. त्यांच्यापैकी काही होतकरू आहेत. ते बऱ्यापैकी लेखन करू शकतात. परंतु त्यांची मोठ्या प्रकाशकांपर्यंत जायची हिंमत होत नाही. म्हणून ते परिचयाच्या प्रकाशकाकडे जातात. आपल्या लेखककवीचे नाव झाल्याशिवाय प्रकाशक सहसा त्यांचे लेखन प्रकाशित करू इच्छित नाहीततर काही लेखक-कवी उधार- उसनवारी करूनप्रकाशकांना पैसे देऊन आपले पुस्तक प्रकाशित करतात.  

पुस्तक प्रकाशित झाल्याचा आनंद त्यांना वाटतो पण पुस्तकांची विक्री किती झाली ह्याची माहिती बिचाऱ्या लेखकाला नसते. अशा व्यवहारामुळे अनेक संशयास्पद गोष्टी घडतात. ह्या खेळात लेखकांचा बळी जातो. लेखन हा फावल्या वेळातला छंद नाही. ती एक अखंड साधना आहे. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. ही गोष्ट नवोेदित कवी-लेखकांनीही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

चांगले लेखक हुडकूनत्यांचे उत्तमोत्तम साहित्य आवर्जून प्रकाशित करणारेलेखक घडवणारे चोखंदळ प्रकाशक लाभणे हे लेखकाचे भाग्य असते.

पर्यावरण : श्वासाची लढाई

लेखनग्रंथप्रसार आणि पर्यावरणाचा समतोल ह्यांचे घनिष्ट नाते आहे. कागद करण्यासाठी लगदा लागतो आणि लगद्यासाठी वृक्षतोड करावी लागते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण हे आपले प्राथमिक कर्तव्य ठरते. जागतिक पर्यावरणाने जे उग्ररूप धारण केले आहेत्याची माहिती आपणा सर्वांना आहे. ओझोन खिंडार विस्तारत आहेनद्यांना पूर येत आहेत. अतिवृष्टीमहापूरवणवे आणि उन्हाच्या झळा यांचे प्रमाण वाढले आहे. जैवविविधतेची अपरिमित हानी होत आहे. यावर्षी जगभरातील १५३ देशांतील ११५८ शास्त्रज्ञांनी पर्यावरणाबाबत निर्वाणीचा इशारा देत म्हटले आहे की, ‘आपण समजत होतोत्यापेक्षा लवकर ही अत्यवस्थ स्थिती येऊन ठेपली आहे. आपल्या भवितव्याच्या भल्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल करावे लागणार आहेत.

गेल्या वर्षी ग्रेटा थुनबर्ग ह्या सोळा वर्षाच्या मुलीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून जगाच्या विवेकबुद्धीला आवाहन करणारेहृदय हेलावणारे भाषण केले. तिने हात जोडून विनंती केली की आमच्या भवितव्याला धोकानिर्माण करू नका. आज जगाने विविध क्षेत्रात प्रचंड घोडदौड केली आहे. ज्ञान ही शक्ती आहेहे माणसाने ओळखले. परंतु ह्या शक्तीवर विवेकबुद्धीचाअंकुश नसेल तर ज्ञान धोकादायक ठरू शकते. आपले पूर्वज तीर कामठ्यांचा वापर करून युद्धे खेळत असत. आजचा मानव क्षेपणास्त्रांचा वापर करतो. ही प्रगती झाली का?

अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य

ज्ञानाच्या विकासाबरोबर व्यक्तिगत स्वातंत्र्याचाही विकास झाला आहे. मला जे पटतेमाझ्या जे सोयीचे आहेमला जे उपयुक्त आहे ते करण्यास मी पूर्णपणे मोकळा आहे. त्या माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर कुणीही निर्बंध आणू शकत नाही. म्हणून जे जे शक्य आहेते अनुज्ञ आहे. ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मला आहे. उदा. जीवनसंहारक अण्वस्त्र बनवायचे ज्ञान माझ्याकडे आहे आणि मी ती बनवू शकतो. समुद्रामध्ये भराव टाकून जमीन वाढवण्याचे तंत्रज्ञान मला अवगत आहेसाधनसामुग्री माझ्याकडे आहे आणि मी ते करणार. माझ्याकडे ज्ञान आहेधन आहे आणि मला स्वातंत्र्यही आहे म्हणून मी गरीब राष्ट्रांतील साधनसामुग्रीची राजरोसपणे लूट करू शकतो. ह्याला व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विकास म्हणता येईल का 

ज्ञान आणि स्वातंत्र्य अंतिम मानले गेले आहे. आगीवर तेल पडावे त्याप्रमाणे त्याला सापेक्षवादाची आणि उपयुक्ततावादाची जोड मिळाल्यामुळे मानवीजीवनासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्ञानाच्या विस्फोटाने आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावावर सर्वकाही करता येते अशी भूमिका घेतल्यामुळे आज जगात पर्यावरणाच्या विध्वंसाने कळस गाठला आहे. ज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य ह्यांचा जसा विकास झालातसा नैतिकतेचा विकास झाला नाही. विवेकबुद्धीची धार तीक्ष्ण झाली नाही कारण मानवाला ते प्रश्न महत्वाचे वाटेनासे झाले आहेत.

आपण पर्यावरणाच्या विनाशावर विचार करीत आहोत. कारण पर्यावरणाचा प्रश्न केवळ वातावरणाशी निगडित नाहीतो नैतिकतेशी जोडलेल्या आहे. जगाने जी विकासनीती स्वीकारली आहेत्या विकासनीतीचाही नैतिकतेच्या निकषावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे. निसर्गाचे चक्रबदलले आहे असे आपण मानतो. परंतु ते का बदलले आहेकारण माणसाचे आणि राष्ट्रांचे विचारचक्र बदलले आहे.

नैतिकतेच्या ऱ्हासाची कारणे :

नैतिकतेचा ऱ्हास हा अचानक घडलेला नाही. त्यालाही इतिहास आहे. तो म्हणजे माणसांचा तुटलेला संवाद किंवा निर्माण झालेला दुरावा. ह्या संदर्भात बिशप रॉबर्ट मॅक एल्रॉय ह्यांनी अमेरिकेतील क्रेगटन येथे झालेल्या ‘क्लायमेट कॉन्फरन्स’ ह्या परिषदेवेळी केलेल्या चिंतनातील काही मुद्दे :

परमेश्वराबरोबर तुटलेला संवाद

पर्यावरणाच्या विनाशाच्या कारणांवर विचार करताना आपण निर्माणकर्त्या परमेश्वरापर्यंत येऊन पोहोचतो. आपला भारतीय समाज प्रामुख्याने देवावर विश्वास ठेवणारा आहे. जगात कुठे होत नसेल त्यापेक्षा जास्त देवाची उपासना आपल्या देशात होत असते. प्रार्थनास्थळे बांधण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. या सर्वांचे प्रतिबिंब आपल्या सामाजिकआर्थिकराजकीय जीवनात उमटते का? ‘तो’ म्हणजे सर्व ‘परम’ (absolute) मूल्यांचा संचय आहे. माझ्यासाठी तो ‘येशू पिता’ आहे. सर्व मूल्यांची मुळे त्याच्यात आहेत. तो सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. त्यामुळे सृष्टीचा वापर व पर्यावरणाचा के लेला विनाश ही खरी नास्तिकता आहे. 

बायबलच्या पहिल्या पुस्तकात पर्यावरणाच्या हानीची मीमांसा केलेली आहे. अर्थात ती विज्ञानपूर्व भाषेत आहे. आपण तिचा मथितार्थ समजणे आवश्यक आहे. परमेश्वराने आदिमातापित्याची निर्मिती केली आणि त्यांना निसर्गसंपन्न अशा नंदनवनात ठेवले. त्या सुखाचा हेवा करणारी दुष्ट शक्ती होती. त्या दुष्ट शक्तीने त्या आदिमाता-पित्यांना वश केले. ते त्या दुष्टशक्तीच्या मोहाला बळी पडले. त्यामुळे निसर्गसंपन्न नंदनवनातून त्यांची हकालपट्टी झाली. ती दुष्ट शक्ती म्हणजे आजचे पर्यावरणाचे विरोधक होत. 

आपल्या ‘पॅरेडाइज लॉस्ट’ या महाकाव्यात कवी मिल्टनने ह्या प्रसंगाचे प्रत्ययकारी वर्णन केले आहे. खिस्ती मठामध्ये प्रार्थनेसाठी जितका वेळ दिला जातो तितकाच वेळ पर्यावरणाच्या संवर्धानालाही दिला जातो. उदा. ग्रेगोर जोऑन मेंडेल (१८२२- १८८४) हा मठवासी असून शास्त्रज्ञ होता. तो जनुुकशास्त्राचा (जेनेटिक सायन्स) पितामह मानला जातो. त्याने वनस्पतींवर अनेक प्रयोग करून मठामध्ये शोध लावले. मठवासी गोपालन करीत असत. दुग्धजन्य पदार्थांचा उदा. चीजचा त्यांनी प्रथम शोध लावला. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स शोधून काढल्या. मधमाशीपालन करून शुद्ध मध तयार केला.  मानवाची सेवा आणि निसर्गाची सेवा म्हणजे देवाची सेवा असे सर्व मठवासी मानतात.

२१व्या शतकात आपले धरतीबरोबरचे नाते बिघडले आहेकारण आपण ह्या वसुंधरेचे विश्वस्त नाहीत मालक आहोतअसे आपण समजू लागलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाला पृथ्वीवरच्या साधनसामुग्रीचा मनमानी विध्वंस करण्याचा जणू हक्कच प्राप्त झाला आहे. ‘सबका मालिक एक आहे’ अशा परमेश्वराबरोबरचा संवाद तुटण्याचे एक कारण आहे. वसुंधरेला मन मानेल तसे लुटण्याचा जणू काही आपल्याला हक्क मिळालेला आहे. कारण आपण आपल्याला विश्वाचे राजे समजतो.

निसर्गाबरोबरचा तुटलेला संवाद

आज जगाने निरनिराळ्या क्षेत्रांत वाखाणण्यासारखी प्रगती केली आहे परंतु आपण निसर्गाचे अध्यात्म नाकारले आहे. आपल्याकडे तुकोबांनी म्हटले आहे ‘वृक्षवल्ली वनचरे आम्हा सोयरे.’ तेराव्या शतकात युरोपमध्ये होऊन गेलेले संत फ्राान्सिस चंद्रसूर्यालाताऱ्याग्रहांनावृक्षवेलींनाहिंस्र प्राण्यांना आपले बंधू आणि भगिनी समजत असत. मात्र आज आपण ते नाते विसरलेले आहोत आणि तुकोबांनी वर्णन केलेल्या सोयऱ्यांचा आणि संत फ्रान्सिसने सांगितलले या नात्याचा आपण विध्वंस करीत चाललो आहोत.

वास्तविक आपल्या देशात तरी तसे व्हायला नको होते. आपले आदिवासी बांधव निसर्गपूजक आहेत. जगातील प्रत्येक आदिम जमातीमध्ये निसर्गाचा आदर केला जातो. हिंदू धर्मात सूर्यनमस्काराची पद्धत आहे. अग्निपूजेचे अनेक मंत्र आहेत. नदी किंवा समुद्रातल्या पाण्याने सूर्याला अर्ध्य देतात. सरोवराच्या किंवा तलावाच्या पाण्यात शिरताना प्रथम पाय स्वच्छ करूननमस्कार करूनप्रार्थना करून मगच प्रवेश केला जात असे. आपले पारसी बांधव अग्निपूजक आहेत. ते अग्नीला पवित्र मानतात. खिस्ती धर्मामध्ये अग्नीचा वापर प्रार्थनेमध्ये केला जातो. 

आज आपण उपयुक्ततावाद हे एकमेव मूल्य मानलेले आहे. त्यामुळे आपण सरोवरांचीतलावांची डबकी करत आहोत. समुद्रकिनाऱ्यांची आपण काय अवस्था केली आहेहे आपणांस माहीत आहेच. अगदी मध्यरात्रीसुद्धा हजारो वृक्षांची तोड करीत आहोतजंगलांना वणवे लावीत आहोत. ह्याचे कारण निसर्गाबरोबरचा आपला तुटलेला संवाद हेच आहे. जे अस्तित्वात आहेते सर्व केवळ मानवासाठीच आहेहे सूत्र मानल्यामुळे निसर्गाची फार मोठी हानी झाली आहे. त्याच्यामधून ‘वापरा आणि फेका’ ही नीती जन्माला आलेली आहे आणि ती माणसाठीदेखील वापरली जात आहे.

सत्याबरोबरचा तुटलेला संवाद

कर्ब वायूमुळे होणारे प्रदूषणनिसर्गाचे बदललेले चक्रपाण्याची बिघडललेली गुणवत्ताजैवविविधतेचा होणारा ऱ्हासमानवी जीवनाची होणारी हानी अशा अनेक कारणांमुळे आजचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण सर्व एकमेकांशी जोडलेलो आहोत ह्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आर्थिक विकास आणि फसवे विज्ञान ह्यांच्या नावाखाली हवापाणी आणि मानवी जीवन धोक्यात आलेले आहे.

शाश्वत सत्य असा काही प्रकार नाही. त्यामुळे सापेक्षतावाद हा जगण्याचा अंतिम निकष ठरलेला आहे. परिणामत: अंतिम सत्याबरोबरचा आपला संवाद तुटला आहे. नैतिकतेचे हरवलेले भान हे आपल्या सर्व ऱ्हासाचेमग तो पर्यावरणाचा असू द्याराजकारणाचा असू द्या किंवा आणखी कशाचा असू द्याएक मुख्य कारण आहे. म्हणून अंतिम सत्याकडे वळण्याशिवाय अन्य पर्याय नाही.

आपला एकमेकांबरोबरचा तुटलेला संवाद

उपयुक्तता आणि सापेक्षततावाद ह्यांचा अवलंब केल्यामुळे निसर्गाची कशी हानी होते हे आपण पाहिले. हेच तत्त्वज्ञान मानवी संबंधानाही लागू केले जात आहे. जन्म आणि मृत्यू ही जीवनातील परमसत्ये आहेत. आज ह्या दोन्ही पातळ्यांवर धोके निर्माण झालेले आहेत. त्यामुळे उदरातील बालकाला जगण्याची शाश्वती नाही आणि वृद्धावस्थेची उपेक्षा केली जात आहे. संवेदनाकरुणादयासहवेदना या भावना बोथट होत आहेत.

वेश्याव्यवसाय आणि गरीब राष्ट्रांतील मुलींची व स्त्रियांची होणारी निर्यात ह्यांच्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आपले ‘वसुधैव कुटुंबकम्’ ह्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. पर्यावरणाच्या हानीमागे वरील चार प्रकारचा तुटलेला संवाद कारणीभूत आहे. संवाद तुटल्यामुळे काय अनर्थ होतात ह्याचे मार्मिक वर्णन हिंदी कवी गिरिजाकुमार माथुर ह्याच्या ‘क्रांति की भूमिका’ या कवितेत केले आहे.

सिर्फ अपनेही लिए जब जीने लगते है आदमी

तब उनकी हर चीज बिकाऊ हो जाती है !

जब जोखिम उठाने की आदत मिट जाती है

हर कौम मर जाती है

जेव्हा मानवी संबंध धोक्यात येतात आणि मनुष्य स्वार्थाच्या आहारी जातो आणि जेव्हा त्याला आजूबाजूचे भान उरत नाहीतेव्हा समाजदेखील मृतावस्थेला पोहोचतो. आपण पर्यावरणाच्या रक्षणाविषयी खूप बोलत आहोतनामशेष होणाऱ्या प्रजातीबद्दल चिंता व्यक्त करीत आहोतपण त्याचबरोबर जेव्हा माणुसकीला ग्रहण लागतेगरिबांना समाजात स्थान राहत नाहीआपला सारा विकास धनधार्जिणा होतोजेव्हा आपल्याला अडचण असलेल्या व्यक्तीला नष्ट केले जातेतेव्हा मानवतेपुढे मोठे आव्हान उभे राहते. 

ह्याउलटजेव्हा सारी मानवजात आपल्या प्रेमाचा विषय होतेत्यांचीसुखदु:खे ही आपली सुखदु:खे बनताततेव्हा जगण्याला आणि जीवनाला खरा अर्थ प्राप्त होत असतो. जेव्हा विश्वाच्या भल्याचा विचार मागे पडतो आणि केवळ राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य मिळतेजेव्हा माणसामाणसांमध्ये जातिधर्मावरून विभागणी केली जातेतेव्हा मानवतेची मोठी हानी होते. माणसाचे जग कुटुंबापुरते मर्यादित होते तेव्हा भोगवादाला आणि चंगळवादाला आमंत्रण मिळते. जेव्हा माणसाचे हृदय पोकळ होतेतेव्हा तो आपले घर उंची फर्निचरने सजवत असतो. मग आपले घरगुती कार्यक्रम श्रीमंतीचे देखावे बनतात.

पूज्य विनोबा भावे नेहमी मानवतेच्या भल्याचा विचार करीत असत. ‘यत्र विश्वं भवति एक नाडी ’ हे सारे विश्व पक्ष्याच्या एका घरट्यासारखे व्हावेअसे त्यांचे स्वप्न होते आणि ते स्वप्न साकार व्हावेह्यासाठी ते प्रयत्नशील होते. अतिरिक्त राष्ट्रवाद स्वार्थालादहशतवादालाराष्ट्रांच्या द्वेषाला जन्म देत असतो. ‘ते’ आणि ‘आपण’ अशी राष्ट्राची विभागणी किंबहुना फाळणी केली जाते. 

विनोबा भावेंची घोषणा असे ‘जय जगत!’ ही ‘सब भूमि गोपालकी’ म्हणजे ही भूमी अन् त्याच्यावर जे जे निर्मित आहेती परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे. त्या धनावर भावी पिढ्यांचाही हक्क आहे. तो नाकारून फक्त वर्तमानकाळाचा विचार करणे हा आत्मघात आहे. त्यामुळे केवळ आपल्याच नाहीतर विश्वाच्या भल्यासाठी एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे विचार करणारी ग्रेटा थुनबर्ग ही जगाच्या व्यासपीठावरून भरल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणाने आपल्या आणि आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांचा विचार केला जावा असा संदेश देऊन मानवतेच्या विवेकाला आवाहन करते. तो संदेश सर्वदूर पसरवण्यासाठी आपल्या शाळेला रामराम ठोकून ती बालिका वणवण हिंडते आहे.

ह्या सगळ्यांवर विचारमंथन करणे हेदेखील आपल्या साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. जर माणूूसच टिकला नाहीतर साहित्याची निर्मिती कोण करणार आणि वाचणार तरी कोणआज देशाला आणि सगळ्या जगाला गांधीजींसारख्या प्रेषितांची नितांत गरज आहे. त्यांनी केवळ भारताचा नाहीतर विश्वाच्या भल्याचा विचार केला. त्यामुळे लघुदृष्टीच्या राजकारण्यांना गांधीजी नकोसे झाले आहेत. ज्या देशातज्या भारतीयसंस्कृतीत निसर्गाची पूजा केली जातेत्या देशाने निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जगात आघाडीवर असले पाहिजे.

समारोप

सुसंवाद सदा घडो

सध्या हे डिजिटल क्रांतीचे दिवस आहेत. माहितीचा विस्फोट होत आहे. माहिती मिळाली म्हणजे ज्ञान मिळालेअसे नाही. ज्ञानाची भाषा निराळी असते. माहिती आणि ज्ञानविज्ञान ह्याच्यावर जेव्हा मनन- चिंतन होतेमंथन होतेतेव्हा माहितीचे रूपांतर हळूहळू ज्ञानात (Wisdom) होत असते. हे ज्ञान आपल्याला आयुष्यभर साथसंगत करते. ते कुठल्या भाषेच्या माध्यमातून दिले जातेह्यापेक्षा ते आपल्याला काय देतेहे महत्त्वाचे असतेकारण आपला पिंड उत्तम ग्रंथांच्या सहवासात घडवला जातो. मानवी जीवनातील ताणेबाणेहर्ष-विमर्षदु:ख-वेदनाआशा- निराशा हे सारे एखाद्या शोभादर्शक यंत्राप्रमाणे (कॅलिडोस्कोप) असतात. अशी पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचावीशी वाटतातप्रत्येक वेळी आपल्याला जीवनाचे आगळे-वेगळे दर्शन घडते. 

उदा. कालिदासांचे ‘शांकुतल’, भवभूतींचे ‘मालतीमाधव’, ग्रीक लेखकांच्या शोकांतिकाशेक्सपिअरच्या मानवी जीवनावर भाष्य करणाऱ्यानाट्यकृतीलिओ टॉलस्टॉय ह्यांच्या प्रत्ययकारी कथागटेचे ‘फाऊस्ट’ आणि महाराष्ट्राकडे वळलो तर कुसुमाग्रजदुर्गा भागवतविंदा करंदीकरजी. ए. कुलकर्णीदया पवार अशा कितीतरी प्रतिभावंताच्ं या साहित्यकृतींनी आपल्या अबोध मनाचा ठाव घेतला आहे. ही ग्रंथसंपदा आपले वैचारिक धन आहे. जगायचे का आणि कशासाठीह्याचे उत्तर इथे आहे.

संत नामदेवांनी म्हटले आहे,

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी,

एकतरी ओवी अनुभवावी

त्याचप्रमाणे ह्या संमेलनातून साहित्य-सोनियांच्या खाणी अनुभवल्यानंतर एकतरी वाचनीय ग्रंथ आपापल्या

घरी घेऊन जावे.

धर्मसंवाद

माझ्या बोलण्यात आणि लेखनात बायबलप्रमाणे संत-साहित्यातील संदर्भ सहजपणे येत असतात. त्याचे कारण मला संतांच्या साहित्यामध्ये सापडते. संत तुकारामांचे अभंग अभ्यासत असताना मी तुकारामांच्या प्रेमात पडलो.बायबलमधील स्तोत्रकारांना भेटलेली तृषित हरिणी तुकोबांच्या ‘कन्या सासुरासी जाय’ ह्या अभंगात प्रतिबिंबित होते. त्यांची रंजल्या-गांजल्यासंबंधीची कणव मला आकर्षित करते. जनाबाईंची भावविव्हळ भक्ती पाहून मला फ्रान्समधल्या संत तेरेेजाची आठवण होते. चोखामेळ्याच्या वेड्यावाकड्या उसाच्या कांडांतून निघणारा भक्तिरस मला मोहित करतो.

केशवाचे भेटी लागलें पिसें ।

विसरलें कैसें देहभान ।

झाली झडपणी झाली झडपणी ।

संचरलें मनीं आधीं रूप ।

असे म्हणत संत गोरोबा हे कर्मधर्मपाप पुण्य ह्यांच्या पलीकडे गेले होते आणि त्यांना निर्गुण निराकाराचा ध्यास लागला होता. १२व्या शतकातील दक्षिण भारतातील संत बसवेश्वर हे रूढीपरंपरा भंजक होते. त्यांनी अनेक जुन्या प्रथा मोडीत काढल्या. त्यामुळे त्यांना विद्रोही संत असेही म्हटले जाते.संत थॉमस-ए-केम्पीससंत बर्नर्डसंत बेनेडिक्टसंत फ्रान्सिस असिसी ह्यांचे लेखन म्हणजे अध्यात्मपाठ आहेत. अजूनही ते आमचे पोषण करतात.

सुफी संत रूमीसलीम चिश्तीगाझी पीर हे भक्ती परंपरेतले होते. शीख संप्रदायाचे गुरू हे त्यांच्या भजनाद्वारे आपल्या भक्तिरसाने भक्तांचे पोषण करायचे. ह्या सर्व संतांनी आपल्या आकाशाचे अंगण सुशोभित आणि संपन्न केले आहे. तुका नामक सेतूवरूनी रेव्ह. टिळक खिस्तचरणी लीन झाले. आपण भारतात जन्माला आलो म्हणून हे भाग्य आपल्याला लाभले आहे.

चर्चमध्ये आज मोकळेपणाचे वातावरण आहे. बिशप डॉ. थॉमस डाबरेआर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडोफादर डॉ. खिस्तोफर शेळके इत्यादींनी भागवत संतांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला आहे. २१व्या शतकात टिकून राहायचे असेल तर सर्व धर्म मैत्री साधणे गरजेचे आहे. ‘भूतां परस्परें पडोमैत्र जिवांचे’ ही आपल्या सर्वांची भूमिका आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी माझ्यासारख्या अपात्र व्यक्तीचे अत्यंत उदार अंत:करणाने स्वागत केले आणि गेल्या तीन-चार महिन्यांपासून माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. म्हणून आज ह्या व्यासपीठावर उभे राहत असताना कविवर्य तांब्यांच्या ओळी माझ्या ओठांवर खेळतात.

न द्यावा जिथे पाय तेथे दिला ।

बहु लाजलो भान येता मला ।।

जय जगत ! जय भारत ! जय महाराष्ट्र !
***

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,50,इस्लाम,41,किताब,26,जगभर,131,पत्रव्यवहार,4,राजनीति,307,व्यक्ती,25,संकलन,65,समाज,267,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: 'साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे' (२)
'साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे' (२)
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgI63gtfsGM8laI3zC7T5PPrwhKA_fc-WjDDoJbitQ1X2i6X0nQ-tA1mOTMMIlGHLXqQt7cG1kHkJIOWp79B8AbRlo0GQAmJrCd7R_2pxdbt8x-XZGSgIRow5Q3qNmK6pHML3l70tl3CNqn/s640/81874671_161325705207525_8982760590179041280_o.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgI63gtfsGM8laI3zC7T5PPrwhKA_fc-WjDDoJbitQ1X2i6X0nQ-tA1mOTMMIlGHLXqQt7cG1kHkJIOWp79B8AbRlo0GQAmJrCd7R_2pxdbt8x-XZGSgIRow5Q3qNmK6pHML3l70tl3CNqn/s72-c/81874671_161325705207525_8982760590179041280_o.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/01/blog-post_87.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/01/blog-post_87.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content