राजकीय पक्षांची अवनती

निवडणुकीत स्पष्ट विचारसरणी, त्यानुसार नित्य व्यवहार करणारी पक्षसंघटना आणि प्रत्येक बूथभोवती मतदान केंद्रापर्यंत मतदारांना आणून त्यांचे मतदान करवून घेणारी निवडणूक यंत्रणा यात राजकीय पक्षाचे बळ सामावलेले असते. भाजपच्या विरोधातील पक्षांमध्ये हे बळ दिसून आले नाही. म्हणून भाजप सर्वांवर वरवंटा फिरवू शकला. विपक्ष नष्ट झाला तर लोकशाही संपणार आणि फॅसिझम नक्की येणार.

महात्मा गांधींनी ब्रिटिश साम्राज्याचा अंत करण्यासाठी बळ कसे प्राप्त केले याचा खोल अभ्यास केला पाहिजे. हिंदू राष्ट्र भाजपच्या दृष्टिपथात आले आहे. ते निर्माण होण्याआधी हिंदू राष्ट्र म्हणजे विनाश असे मानणार्यांनी सामाजिक, सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात बलवान व्हायला पाहिजे. त्याशिवाय तरणोपाय नाही.

शिस्त, संघटन आणि पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणे ही कसरतच आहे. पण ती पुरोगामी शक्तींना, पक्षांना ते साध्य करावी लागेल.

लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल काहीही लागलेले असोत. तथापि ही निवडणूक सर्वांना भारतीय समाजाचे सर्वांगीण दर्शन घडवून पार पाडली. मुठीत सत्ता असेल तर काय फंडे करता येतात याबाबत पराकोटीचे दर्शन झाले. सत्ताबदल झाला तरी समाजपरिवर्तन होत नसते. भारतीय समाजाला आमूलाग्र बदलावे लागेल याबद्दल दुमत व्हायचे कारण नाही. परिवर्तनाशिवाय भारतीय समाज टिकू शकणार नाही. परिवर्तनाच्या या प्रक्रियेत राजकीय पक्षांना मग ते राष्ट्रीय वा प्रादेशिक पातळीवरचे असोत, सहभागी व्हावेच लागेल. समाजपरिवर्तनामधून ज्या नवीन शक्ती उदयाला येतील त्यांचे राजकारण अर्थातच भिन्न असेल.

2019 सालापर्यंतजैसे थे वादीसरकारे देशात सत्तारूढ झाली. परिवर्तनाची वा क्रांतीची भाषा करणारे राजकीय पक्ष सत्तेवर आल्यावर स्थितीशील बनले. समाजात परिवर्तनाच्या शक्ती पुरेशा शक्तिमान झाल्या तर त्यांचे सरकार स्थापन होऊ शकते, परंतु सत्तेवर येण्यापूर्वीचा त्यांचा क्रांतिकारक कार्यक्रम ते सत्तेत आल्यानंतर अंमलात आणू शकत नाहीत. सत्तेवर राहण्यासाठी देखील त्यांना हिंसेचा वापर करावा लागतो. हिंसेचा वापर केल्यानंतर त्या सरकारविषयी लोकांमध्ये अप्रियता वाढते. त्याचा लाभ प्रतिगामी शक्तींना हमखास मिळतो. त्या शक्ती दबा धरून बसलेल्याच असतात. हे भारतीय घडामोडींनंतर सिद्ध झाले आहे.

बंगालचे उदाहरण बोलके आहे. काही वर्षांपूर्वी तेथे सलग 35 वर्ष कम्युनिस्टांची सत्ता होती. त्यांच्यामध्ये कमी हिंसा की अधिक हिंसा केली पाहिजे यावरून फूट पडली. नक्षलवादी तरूण डाव्या कम्युनिस्टांना हिंसेचा त्याग केलेले, म्हणजे स्थितिशील मानू लागले. प्रत्यक्षात  डाव्या कम्युनिस्टांच्या सत्ताकाळात बंगालमध्ये हिंसाचार होत होता. खरे म्हणजे यामागे ज्या प्रमाणात परिवर्तन त्या प्रमाणात हिंसा आवश्यक असा सिद्धान्त होता. वैचारिक गोंधळाची ही कहाणी आहे. भूतकाळाकडे दृष्टिक्षेप टाकल्यावर असे लक्षात येते की भारतामध्ये परिवर्तनाचा मार्ग मध्यममार्गी आहे.

जेव्हा प्रतिगामी शक्ती मवाळ मध्यममार्गी असतात, तेव्हा त्या संयमाने वागतात. परंतु जेव्हा त्यांना भोवताली पुरोगामी शक्तींची पिछेहाट दिसते, तेव्हा त्या रस्ता सोडतात. त्या सैराट होतात. त्याची प्रतिक्रिया म्हणून काजळी आलेल्या वा मलूल झालेल्या पुरोगामी शक्ती उचल खातात. अशा प्रकारे प्रतिगामी पुरोगामी शक्ती आलटून पालटून प्रभावी होताना दिसतात. हे चक्र भारतात शेकडो नव्हे; तर हजारो वर्षे चालू आहे. याचे कारण आहे. कोणा एकाचा कायमस्वरूपी निःपात होत नाही. याचे मूळ भारतीय मानसिकतेत दडलेले आहे. आपल्याला आधुनिक राष्ट्र म्हणून जगण्याची इच्छा आहे, यात शंका नाही. म्हणून आपण गांधींच्या नेतृत्वाने ब्रिटिशांच्या विरोधात झुंजार लढा दिला. पण भारतीयांवर भूतकाळाचे एवढे ओझे आहे की संकट आले की आपल्याला भूतकाळात रमायला आवडू लागते.

सापाला बाहेरची मोकळी हवा आवडते, परंतु मोकळेपणात धोके दिसले की तो वेगाने बिळात जातो. लपून बसतो. जगात अन्यत्र कुठेही नसलेली जातिसंस्था भारतात आहे. आपापल्या जातीच्या बिळात निपचित पडून राहाणे सवयीने आवडू लागले आहे. सर्व नागरिकांना भारतीय व्हावे असे मनापासून वाटते. पण इतरांचा जातिवाद थैमान घालताना दिसला की त्याची सहज प्रवृत्ती आपल्या जातीच्या बिळात जाण्याची आणि त्यात स्वस्थ बसण्याची आहे.

2019च्या निवडणुकीने सारे ढवळून निघाले. पुरोगामी विरूद्ध प्रतिगामी शक्ती असा जोरदार मुकाबला घडला. एका अर्थी हे बरे झाले. परस्परविरोधी सैन्याला रणांगणात एकमेकांची ओळख झाली. भविष्यकाळात कोणी हवेत काम करणार नाही. हेही नसे थोडके! संभ्रम दूर होतील आणि नवीन वैचारिक मांडणी उदयाला येईल.

शेवटच्या लढाईत पुरोगामी, परिवर्तनवादी क्रांतिकारी शक्तींचाच अंतिम विजय होईल. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रतिगामी शक्तींनी सध्या आपल्या प्रभावाची उच्चावस्था गाठली आणि शासनसंस्थेवर त्यांनी ताबा मिळवला. इथून पुढे मात्र त्यांना वाढायला, पुढे जायला, वेग घ्यायला इंधन पुरणार नाही. त्यांचे इंधन सृजनशीलतेतून येत नाही. त्यांच्या प्रेरणाशक्तीचे इंधन भूतकालीन धर्मशास्त्रे, मनुस्मृती, चुकीच्या परंपरा-रूढी आणि मानवतेच्या घोर विरोधातील प्रथा ह्या आहेत. आणखी एक गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडली आहे, ती म्हणजे देशाची फाळणी आणि इस्लाम धर्माचे आधिष्ठान असलेल्या पाकिस्तानची निर्मिती.   

भारतात पूर्वी कधी जातीजातींमध्ये अथवा धर्माधर्मांमध्ये स्पर्धा नव्हती. परंतु पाकिस्तान निर्मितीनंतर हिंदू इस्लाम या दोन धर्मांमध्ये तीव्र स्पर्धा चालू झाली आहे. तुमचे इस्लामिक राष्ट्र, तर आमचे हिंदू राष्ट्र! मुसलमानांना एकदा त्यांचे राष्ट्र मिळाले. आता त्यांनी भारतात राहण्याचे कारण नाही, अशी प्रतिगामी शक्तींची भूमिका आहे. म्हणून ते सहजपणे म्हणतात की आमची सत्ता आमचे फंडे मान्य नसतील तर पाकिस्तानात जा. पाकिस्तानात जावे हा त्यांचा आग्रह केवळ मुस्लिमांंसाठी मर्यादित नाही. तर ते पुरोगामी हिंदूंनादेखील पाकिस्तानात जावे असे ठणकावून सांगतात. पुरोगामी शक्तींना जशी शासनसंस्था धर्मनिरपेक्ष हवी, तसेच त्यांना भारतात हिंदू मुस्लिमांत सलोखा हवाय. हिंदू मुस्लीम हे दोन संख्येने मोठे समूह आहेत. या दोन समूहात कायम सलोखा राहिला तर छोट्या समूहांमध्ये आपोआपच सलोखा राहातो.

भारतीय संविधानाने जाती धार्मिक समूहांना प्राधान्य देता स्वतंत्रपणे भारतीय नागरिकाला, म्हणजेच व्यक्तीला, कायद्याचा मूलभूत पाया बनविले आहे. घटनेने मूलभूत अधिकार धर्माला किंवा जातीला देता त्यातील व्यक्तीला दिले आहेत. भारतीय नागरिक या संज्ञेला कायदेशीर अस्तित्व आहे. धर्माला धर्मपालनाचे स्वातंत्र्य जरूर आहे; पण ते तेवढ्यापुरतेच मर्यादित आहे. धर्माला वा जातीला त्यांच्यातील व्यक्तीवर बंधने लादण्याचा अधिकार दिलेला नाही. हे इतके स्पष्ट आहे की घटनेला स्वतःमध्ये रीतसर विशिष्ट पद्धतीने बदल करता येईल असे घटनाकार म्हणतात. परंतु भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये संविधान, लोकसभा, सरकार वा सर्वोच्च न्यायालय यापैकी कोणी बाधा आणू शकत नाहीत. व्यक्तीचे मूलभूत अधिकार आणि त्यांच्यामधील समानता हाच संविधानाचा मूळ गाभा मानण्यात आला आहे. ते बदलणे म्हणजे संविधानाचा आत्मा नष्ट करण्यासारखे आहे.

दोनच विचारधारा

1980 सालानंतर राजकीय पक्षांची अवनती झपाट्याने सुरू झाली. जात, काळा पैसा, गुंडागिरी या अपप्रवृत्ती राजकारणात शिरल्या. पक्षांतर्गत लोकशाहीचे तत्त्व पक्षांनी स्वतःच धुडकावून लावले. परिणामतः प्रतिगामी शक्ती जात, पैसा गुंड यांचा आधार घेऊन राजकीय स्पर्धेत उतरल्या. ज्याच्याकडे अधिक धन तो जिंकू लागला. धन मतदाराला पराजित करू लागले. नोटबंदी करून मोदींनी सर्व राजकीय शक्तींना आर्थिक दृष्ट्या दुबळे केले आणि भाजप या एकाच पक्षाकडे काळ्या पैशांचा महासागर निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर प्रतिगामी शक्तींशी लढताना पुरोगामी मंडळींना साधी राहाणी, पदयात्रा, लोकांशी अपार जिव्हाळा, त्यांच्या गार्हाण्यांवर बेतलेले राजकारण, सत्याग्रही जनआंदोलने यांचा आधार घ्यावा लागेल. यापुढे त्यांना प्रतिगामी शक्तींचे अनुकरण करून जात, पैसा, धर्म गुंडशक्ती यांचा आधार घेऊन राजकारण करता येणार नाही. तसेच राजकीय प्रशिक्षण दिल्याशिवाय अमुक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कोणालाही मिरवता येणार नाही. अन्यथा ते प्रतिगामी शक्तींचा मुकाबला करू शकणार नाहीत.

याला नव्या राजकारणाची नांदी म्हणता येईल. ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे, त्यांचे तथाकथित कार्यकर्ते ध्येयप्रेरणे शिवाय केवळ पैशासाठी काही काळ काम करतील पण अंतिमतः पराभूत होतील, हे उघड आहे. पुढील काळात मूल्ये, विचारसरणी यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त होईल.  प्रतिगामी शक्तींनी आर्थिक बळावर प्रसारमाध्यमे लाचार करून ठेवली आहेत. म्हणून पुरोगामी शक्तींना सोशल मीडियाचा वापर करून पक्षयंत्रणा उभ्या कराव्या लागतील.

उपरोक्त प्रतिपादनाचा मथितार्थ एवढाच की सर्व पुरोगाम्यांना परिवर्तनवाद्यांना पुन्हा महात्मा गांधीनी दाखविलेल्या मार्गांचा स्वीकार करावा लागेल. कम्युनिस्ट, समाजवादी अन्य राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष यांना महात्मा गांधींना आत्मसात करणे आवश्यक ठरणार आहे. बंगालमध्ये ज्या कम्युनिस्टांनी हिंसेशिवाय परिवर्तन नाही असे मानून काम केले, त्यांचा प्रवास बंद गल्लीत अडकला. तेच समाजवादी चळवळीचे झाले. त्यांनी अर्धवटपणे गांधी स्वीकारला. आणि अर्धामुर्धा मार्क्स स्वीकारला. शेवटी ती चळवळ नामशेष होण्यापर्यंत पोहोचली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर देशात दोनच विचारधारा रणांगणात उरतील असे दिसतेय.

आगामी काळात रणांगणात युद्ध रेषेच्या एका बाजूला गांधींना मानणार्या लोकांचे सैन्य असेल आणि दुसर्या बाजूला नथूराम गोडसेला मानणारे सैन्य असेल. दोघात घनघोर युद्ध होईल. 2019च्या लोकसभा निवडणुकीत फक्त एकच मुद्दा लोकांसमोर प्रभावीपणे आला. मोदी पुन्हा पंतप्रधान हवेत की नकोत, हाच तो मुद्दा! निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मात्र भाजपच्या धोरणात बदल घडला. भोपाळ येथे प्रज्ञा ठाकूर यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. त्या कशाच्या प्रतीक आहेत? त्या मुस्लिमांना दुसरेपरके राष्ट्रमानतात. त्यांना बाबरी मस्जिद पाडणे, बाँबस्फोट घडवून मुसलमानांना मारणे, हेमंत करकरेंचा मृत्यू या गोष्टी प्रिय राष्ट्रभक्तीच्या द्योतक वाटतात. त्यांचा राष्ट्रवाद म्हणजे मुस्लिमांविरूद्ध कोणतेही गुन्हेगारी हिंसक कृत्य करण्यास संकोच बाळगणे! स्वातंत्र्य लढ्यानंतर राष्ट्रबांधणीची जी प्रक्रिया सुरू झाली ती त्यांना खंडित करायची आहे. मोदी आता काहीही म्हणोत, पण प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी त्यांच्यामुळेच देण्यात आली. मोदी केवळ पंतप्रधान नाहीत, तर ते भाजपचे सर्वेसर्वा मालक बनले आहेत.

कोणताही राजकीय पक्ष तिकिटाचे वाटप करताना कोणाला निवडतो हे फार महत्वाचे असते. त्यातून त्याचे अंतरंग स्पष्ट होते. हिंदुत्ववादी शक्तींमध्ये स्वतःबद्दल इतका आत्मविश्वास वाढला आहे की ते अतिरेकी मार्गांचा सहजपणे आश्रय घेतात. हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. प्रज्ञा ठाकूर बेताल बोलू लागल्या. त्याचबरोबर नथूराम गोडसेही थडग्यातून बाहेर आला. तो महान देशभक्त आहे, हे भाजपवाले सांगू लागले. त्यांच्यापैकी काहीजण महात्मा गांधी राष्ट्रद्रोही होते, असा सूर लावू लागले. याचा अर्थ स्वातंत्र्य लढ्यात भारतीय जनतेने ज्या राष्ट्रवादाच्या मांडणीचा विकास केला, तो हिंदुत्ववाद्यांना समूळ नष्ट करावयाचा आहे. त्यांच्या डोक्यात महात्मा गांधी हा प्रारंभापासून मोठा अडथळा होता. म्हणजे त्यांना स्वातंत्र्यलढाच मान्य नाही. भारतीय जनतेमध्ये महात्मा गांधींचे स्थान नष्ट केल्याशिवाय त्यांना पुढचे पाऊल टाकता येत नाही. ही त्यांची खरी अडचण. त्यांच्या मनातील नथुरामबद्दलची श्रद्धा पुनःपुन्हा उफाळून येणार आणि गांधींची हजारो वेळा हत्या करणार.

गांधी आणि नथुराम असे दोन अलग रस्त्यावरचे पथदर्शक वाटाडे प्रत्येक भारतीयाला, राजकीय पक्षाला, छोट्यामोठ्या संघटनांना खुणावत आहेत. येणार्या काळात देश कोणत्या दिशेने पुढे जाणार हे ठरणार आहे. दोन दिशा इतक्या भिन्न आहेत की भिन्न रस्त्याने थोडे अंतर पार केले तरी माघारी फिरणे अशक्य आहे.

महात्मा गांधींच्या गोतावळ्यात सामील व्हायचे असेल तर त्याची सुरुवात हिंदू-मुस्लीम ऐक्य करणे, जातीय दंगली रोखणे आणि दुबळ्या वर्गाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहाणे या गोष्टी मनोमन स्वीकारून करावी लागेल. ज्या नागरिक बंधूंच्या सुरक्षिततेसाठी जो कोणी त्यांच्या पाठीशी उभा राहील त्याच्यावर प्रतिगामी शक्ती प्रखर टीका करतील. त्यांना ज्या वर्गावर हल्ले करायचे आहेत त्यांची बाजू जो घेईल त्यांना प्रतिकार करील त्याला ते मतदानप्राप्तीसाठी केलेले लांगूलचालन म्हणतील. प्रतिगामी शक्तींची भाषा ही ओळखावी लागेल. पुरोग्याम्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे भाषाविश्व त्यांनी तयार करून ठेवले आहे. पुढील काळात ते त्या विश्वाचा विस्तार करणार आहेत. या संभ्रमाच्या भोवर्यात जो अडकेल त्याच्या पुरोगामीपणाचा अंत होईल.
               
डॉ. कुमार सप्तर्षी
सभार-जून 2019च्या सत्याग्रही विचारधाराचे संपादकीय

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: राजकीय पक्षांची अवनती
राजकीय पक्षांची अवनती
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUfXsOg8U8IPKV-U8eFGIpZaPNWpENOf_ZLIVSFsTsH6m8ZqKAxQy2S9x-bl3vxJ4gV5L6uxt2HGTdwj2QOmvn1qo18KK6IpMW9_fVBlCXAxJekVEmAkeqBF-my7qb49j6Yetgm9ALY27E/s640/Lok-Sabha-Election-2019-Candidate-List-for-Andhra-Pradesh.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUfXsOg8U8IPKV-U8eFGIpZaPNWpENOf_ZLIVSFsTsH6m8ZqKAxQy2S9x-bl3vxJ4gV5L6uxt2HGTdwj2QOmvn1qo18KK6IpMW9_fVBlCXAxJekVEmAkeqBF-my7qb49j6Yetgm9ALY27E/s72-c/Lok-Sabha-Election-2019-Candidate-List-for-Andhra-Pradesh.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/05/blog-post_31.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/05/blog-post_31.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content