टिपू सुलतानची खरी भीती कुणाला?


भारतात दरवर्षी ‘टिपू सुलतान जयंती’ समारोहाला विरोध होतोय. कुठलं तरी निमित्त काढून विरोधाचं राजकारण रेटलं जात असते. या विषयावर राजकीय स्वार्थ साधणारी एक यंत्रणा दोन्ही समूहांमध्ये तयार झाली आहे. अर्थातच प्रसिद्ध होण्याची व चर्चेत राहण्याची संधी म्हणून टिपू सुलतान वादाकडे पाहिलं जात आहे.

गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्रात समर्थकांकडून ‘टिपू ब्रिगेड’चे थवे उंडारताना दिसत आहेत. दुसरीकडे विरोधी गटही चांगलाच आक्रमक दिसतोय. इतिहासाच्या पुराव्याकडे व वस्तुनिष्ठतेकडे बेदखल करून चर्चांचं फड रंगवलं जातं.

२०१५ साली कर्नाटक सरकारने टिपू जन्मोत्सव सोहळा शासकीय घोषित केला अन् त्या अनुषशंगाने वादाला सुरुवात झाली. सरकारचा निर्णय काहींना राजकारणाची आयती संधी घेऊन आला. परिणामत: दरवर्षी काहीतरी निमित्त काढून विरोध व समर्थनांचं राजकारण सुरू आहे.

अलीकडे काही ठरावीक मुस्लिम समूहांकडून टिपूला ‘चलनी सिक्का’ म्हणून मिरवण्याची प्रथा वाढली आहे. काही राजकीय हौशी मुस्लिमांत टिपूच्या नावानं संघटना काढून मिरवण्याचा प्रघात सुरू झालाय. या गट-समूहांना खरंच टिपू सुलतानबद्दल आस्था व आदर आहे का? असा प्रश्न यांच्या कृतीकडे बघून पडतो.

दोन्हीकडील गटांना टिपू एक राज्यकर्ता व प्रशासक म्हणून निखळपणे समजून घ्यायचा आहे का? अर्थातच नाही. तिकडे केवळ विरोध म्हणून तर इकडे कुठल्याही परिस्थितीत समर्थन करायचे म्हणून.



काय आहे भाजपचा वाद?
२००७ साली कर्नाटकमधील तत्कालीन भाजप सरकारनं शालेय पाठ्यपुस्तकातून टिपूचा इतिहास वगळला. या निर्णयामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर देशभरातून टीका झाली. इतिहासकार व अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली. निर्णयाच्या काही दिवसानंतर वेगळ्या कारणानं सरकार अल्पमतात आलं. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

एव्हाना येडियुरप्पा यांना आपली चूक लक्षात आली होती. ती मान्य करून त्यांनी जाहीर माफी मागितली. २००८ साली राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या. यात येडियुरप्पा यांनी टिपूची पगडी घालून मुस्लिमबहुल भागात प्रचार केला होता. ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. २००६ ते २०१३ पर्यंत भाजपचे सहा मुख्यमंत्री कर्नाटकात झाले.

याच काळात टिपूच्या ऐतिहासिक दस्तऐवजासोबत छेडछाड झाल्याचे आरोप काही इतिहासाचे अभ्यासक करतात. दरम्यानच्या काळात टिपूला कन्नड व हिंदूद्वेष्टा ठरवण्याचा दुष्प्रचार मुस्लिम विरोधकांसोबत सरकार दरबारीही करण्यात आला. हा वादही वेळोवेळी चांगलाच गाजला. २०१३ साली राज्यात काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसी सरकारने टिपूला वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस सरकारनं ब्रिटिश सामाज्यशाहीचा कर्दनकाळ व स्वातंत्र्य सेनानी म्हणून टिपूचं गौरवीकरण करण्यात आलं. याच दरम्यान २०१५ साली शासकीय खर्चातून जयंती महोत्सव साजरा करण्याची घोषणा सरकारने केली. यामुळे साहजिकच भाजप व मुस्लिम विरोधी संघटना भडकल्या. भाजपने आपल्या नेहमीच्या गुळगुळीत शब्दात काँग्रेसवर मुस्लिम व्होट बँकेच्या राजकारणाचा आरोप केला.

खऱ्या अर्थानं वादाला इथून सुरुवात झाली. भाजपनं केद्राची शक्ती वापरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारला निर्णय बदलण्याची सक्ती केली, पण सरकार निर्णयावर ठाम राहिलं. कडेकोट बंदोबस्तात जन्मोत्सव साजरा झाला.
हिंदू संघटनांनी कायदा व सुव्यवस्था झुगारून विरोध केला. सरकारनं अनेकांना ताब्यात घेतलं. सरकार व विरोधकांसोबत झालेल्या संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुरू झालेला विरोध आजतागायत चालू आहे.

यंदाही टिपूची जयंती साजरी करू नये, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली. टिपूच्या गृहनगर कोडगुमधून याचिका दाखल झाली होती. मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावत जयंती समाहोराचा मार्ग मोकळा करून दिला.



हिंदूविरोधी ठरवण्याचा कट
गेल्या अनेक वर्षांपासून टिपूला हिंदूविरोधी ठरवण्याचं कारस्थान नियोजितपणे सुरू आहे. यासाठी इतिहासाची मोडतोड करून संदर्भ देण्याची प्रथा राबवली जात आहे. अनेक मिथक-दंतकथांची निर्मिती करुन टिपू कथित हिंदूविरोधी होता, असा विचार रेटण्यात येत आहे.

राजकीय विश्लेषक आकार पटेल याबद्दल मत व्यक्त करतात, “अलीकडे भारतात अनेक गोष्टी अकारण हिंदू-मुस्लिम वादाचं रूप घेतात. भारतामध्ये राजे-रजवाड्यांना चांगले आणि वाईट अशा दोनच वर्गीकरणांत विभागले जातं. म्हणजे अशोक, अकबर हे चांगले आणि औरंगजेब, टिपू सुलतान हे वाईट. समाजाने तयार केलेला हा एक मापदंड आहे.”

ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरणाला पुरून उरल्यामुळे इंग्रजांनीच इतिहासातून टिपूचं दानवीकरण केल्याचं मत अनेक इतिहासकार मांडतात. आकार पटेल म्हणतात, “१७६१ मध्ये जेव्हा मुहंमद अब्दालीने पानिपत जिंकले तिथपासून १७९९मध्ये टिपूचा मृत्यू होईपर्यंतच्या घटनांचा विचार इथे (टिपूच्या इतिहासात) अपेक्षित आहे. या मोजक्या वर्षांत इंग्रजांनी आपल्या शत्रूंना संपवले, पण टिपू आणि पंजाब यांना ते पराभूत करू शकले नाहीत.”

इंग्रजांनी देशी संस्थानं बळकावण्याासाठी बदनामी मोहीम सुरू केली. चुकीचा व नियोजित इतिहास अर्थातच प्रा. बेन्नूर यांच्या भाषेत हिंदू विरुद्ध मुस्लिम शत्रुकरणाचा इतिहास रचला. टिपूच्या किरमानी नावाच्या अधिकाऱ्याला हाताशी (माफीचा साक्षीदार करून) धरून मिथकांवर आधारित नवा इतिहास रचून तो आपल्या हस्तकाकडून प्रमाणित करून घेतला.

हा विकृत इतिहासलेखनाचा पायंडा आजही भारतीय इतिहासकार संदर्भ साधने म्हणून वापरतात. इतकंच नाही तर ब्रिटिशधार्जिण्या, मुस्लिमद्वेशी आणि अर्थात उजव्या इतिहासकारांनी ब्रिटिशांचाच कित्ता गिरवत देशी राजाला अर्थातच टिपूला ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टिकोनातून क्रूर पुरुष ठरवलं. 

टिपूच नाही तर अनेक देशी संस्थानाविरोधात हस्तक लेखकांना निधी देऊन दुष्प्रचारी साहित्य, इतिहास रचून घेतला. विस्तारवादाला विरोध करणाऱ्या देशी राजाचा अपप्रचार करून त्यांच्याविरोधात बदफैली पसरवली, अशी ठोस मांडणी नवइतिहासकार करतात. यातूनच म्हैसूरच्या वाघाबद्दल अनेक काल्पनिक कथा रचण्यात आल्या आहेत. ‘टिपू हा अत्याचारी होता, त्यानं हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली, तो हिंदूद्वेष्टा होता’ असा नेहमीचा प्रचार राबवला जातो.

१० नोव्हेंबर २०१५ला बीबीसीने टिपूवर एक स्पेशल स्टोरी केली आहे. यात बीबीसी म्हणते, ‘वेगवेगळ्या लेखकांनी टिपू सुलतान सांप्रदायिक होता, अशी कथा रचली आहे.’ अशा कथांवर आकार पटेल म्हणतात, “आपला देश हा इतिहासाकडे तथ्यांनुसार किंवा तर्काने पाहत नाही, तर भावनेने पाहत असतो.”

इतिहासाचे प्रसिद्ध अभ्यासक राम पुनियानी म्हणतात, एकदा मराठा फौजा टिपूवर हल्ला करण्यासाठी श्रीरंगपट्टणला गेल्या. त्यांच्यात युद्ध झालं. मात्र हे युद्ध कुठल्याही निर्णयाशिवाय संपुष्टात आलं. म्हणजे एक प्रकारे ही लढत ‘टाय’ झाली. मराठा सैन्य आपापल्या प्रदेशात परतत होते. सर्व सैनिक खूप संतापले, त्यांना वाटू लागलं की आपण टिपूचा पराभव करायला आलो होतो, पण आपण त्याला हरवू शकलो नाही. या रागात परत निघताना त्यांनी टिपू सुलतानच्या राज्याचे अर्थात श्रीरंगपट्टणचे मंदिर तोडले.

टिपू सुलतानाने त्या मंदिराची डागडुजी केल्याचं इतिहासातील हे सत्य जाणून मला खूप आश्चर्य वाटलं. मराठा (हिंदू) असूनही श्रीरंगपट्टणमचे मंदिर त्यांनी का उद्ध्वस्त केलं? हिंदू धर्माचा का अपमान केला? अर्थातच त्यांना टिपू सुलतानचा अपमान करायचा होता. मग टिपू सुलतानने ते मंदिर पुन्हा का बांधले? अर्थातच रयतेच्या धर्मभावनांचा आदर करण्यासाठी, हिंदू धर्माचा अपमान करण्यासाठी नव्हे!

बीबीसीने उपरोक्त रिपोर्टमध्ये टिपू संदर्भात विविध दस्तऐवज अभ्यासणारे इतिहासकार टी.सी. गौडा यांचं वक्तव्य देऊन म्हटलंय की, ‘टिपू सुलतानने कधीही मंदिराची विटंबना केली नाही. उलट त्याने श्रृंगेरी, मेल्कोटे, नांजनगुंड, सिरीरंगापटनम, कोलूर, मोकंबिका इथल्या मंदिरांना दागिणे दिले तसेच या मंदिरांना सुरक्षा पुरवली होती, याचे सर्व सरकारी दस्तऐवज आजही आहेत. कोडगू वर नंतर एका अन्य राजाने शासन केले, त्याच्या शासनकाळात स्थानिक महिलांवर अत्याचार झाले. हे सर्वजण या घटनेविरोधात का बोलत नाहीत?’

टिपूचे चरित्रकार व इतिहासाचे अभ्यासक सरफराज अहमद याला स्वातंत्र्य आंदोलनातील प्रतीकं मोडून टाकण्याचं षडयंत्र म्हणतात, “ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाला विरोध करणारे अनेक देशी शासक होते. त्यात मुस्लिमही अर्थातच ईस्ट इंडिया कंपनीला व नंतर ब्रिटिशांना विरोध करणारे मुस्लिम असंख्य होते. याउलट उजव्या विचारांच्या व्यक्ती व संघटनांनी ब्रिटिशांच्या समर्थनाची भूमिका स्वीकारली होती, हे पुराव्यातून सिद्ध झालंय, अशा वेळी शत्रूपक्ष आमच्यापेक्षा वरचढ ठरता कामा नये यातून मुस्लिमांचे विकृतीकरण व राक्षसी चेहरा उभा करण्यासाठी त्यांची ऐतिहासिक प्रतीकं नष्ट करण्याचा कट उजवे विचारक असा कट आखत असतात.”

वास्तव काय आहे?
सरफराज आपल्या ‘सल्तनत ए खुदादाद’ या त्यांच्या बहुचर्चित पुस्तकात टिपूच्या हिंदूविरोधी मिथकावर लिहितात, “१७७९मध्ये दक्षिणेत निज़ाम मध्य भारतात पेशवे व म्हैसूर प्रांतात हैदरअली यांच्या एक ठराव झाला, त्यानुसार ब्रिटिशांना रोखण्यासाठी तिघांनी एकत्र येण्याचा ठराव संमत झाला. त्या नुसार लष्कर व इतर बाबींची आखणीही करण्यात आली. हैदरअलींनी म्हैसूर प्रांतात इंग्रजांविरोधात लढा सुरू केला. इकडे पेशवा व निजाम फितूर झाले. 

१७ मे १७८२ साली आणि पेशव्यांनी विश्वासघात करून ब्रिटिशांसोबत ‘सालबाहीचा तह’ घडवून आणला. पेशवा व निज़ाम कंपनीच्या वसाहतवादाला शरण गेले. यानंतर निज़ाम व पेशव्यांनी हैदरअली विरोधात ब्रिटिशांसोबत युद्ध पुकारले. पाठीचा कॅन्सर असतानाही हैदरअली इंग्रजविरोधात एकटेच लढले, या लढाईत हैदरअलीला डिसेंबर १७८२ला वीरमरण आलं, टिपूनंही ब्रिटिशांविरोधात अखेरपर्यंत लढा दिला व इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणांचा विरोध केला.” (पृष्ठ-६५-७५, पहिली आवृत्ती)

ही खूप महत्त्वाची घटना लेखकानं नोंदवली आहे. याचा अर्थ असा की, म्हैसूरच्या शासकाने ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाला स्पष्टपणे विरोध केला होता. जो ब्रिटिशविरोधी आहे तो हिंदूद्वेष्टा कसा होऊ शकतो, असा प्रश्न लेखक उपस्थित करतात. अभ्यासक सदानंद मोरेंच्या मते ‘म्हैसूर प्रांताच्या चलनावर हिंदू देवतांची चिन्हं होती.’ बीबीसीच्या ‘मिसाइलमैन टीपू के पास थी 'राम' नाम की अंगूठी!’ या लेखामध्ये टिपू राम अक्षरे कोरलेली अंगठी वापरत होता. म्हणजे याचा अर्थ टिपू हिंदूद्वेष्टा नव्हता.

अनेक इतिहासकार म्हणतात की, भारतात इतिहास लेखनाची परंपरा द्वेशावर आधारित राहिली आहे. इतिहास लिहिणाऱ्या वर्गाने सबंध इतिहास हा मुस्लिम द्वेषातून रचला आहे. यातूनच इस्लाम व मुस्लिमद्वेशी राजकारण जन्माला आलं.

या वृत्तीवर पुनियानी म्हणतात, “भारतात गेली काही दशके मुस्लिम शासकांचे दानवीकरण करून हिंदुत्ववादी इतिहासकार प्रस्थ माजवताना दिसत आहेत. जमातवादी शक्ती नेहमी इतिहासातील घटनांचा वापर त्यांच्या राजकारणासाठी करून घेताना दिसतात. त्याच सूत्रांद्वारे भूतकाळातील मुस्लिम शासकांचेच प्रतिनिधी आजच्या मुस्लिम समाजाला ठरवून, आजचे हिंदू हे त्या मुस्लिम शासकांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदूंचे वंशज आहेत, असे मांडून मुस्लिमांचे राक्षसीकरण करण्यात येत आहे.” 



उत्तम प्रशासक
उजव्या इतिहासकारंनी टिपूला हिंदूविरोधी घोषित केलं. तर मध्यममार्गी भाष्यकारांनी टिपूला रॉकेटपुरतं बंदिस्त केलं आहे. मात्र ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास केल्यास असं लक्षात येईल की, टिपू या सर्वांच्या पलीकडे एक उत्तम व दूरदृष्टी असणारा प्रशासक होता. तसंच तो एक उत्तम कुटनितीकार होता. 

त्यानं आपल्या राज्यात जलपुर्नभरण, कृषी धोरण, धरणं, व्याजविरहित बँकींग प्रणाली, कृषिपूरक उद्योग, साखर कारखान्याची उभारणी, आधुनिक यंत्रनिर्मिती, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा अशी विविध धोरणं राबवली.


बीबीसीनं एका ठिकाणी म्हटलंय की, टिपूचं कृषी धोरण इतकं चांगलं होतं की, त्याच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी ती अमलात आणली. हेही खरं आहे की, हिकीज् गॅझेटनंतर तब्बल १४ वर्षानंतर टिपूनं ‘फौजी अखबार’ नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. म्हणजे टिपू किती आधुनिक दृष्टिकानाचा राजा होता, हे यातून कळून येते.

सरफराज अहमद त्यांच्या टिपू चरित्रात लिहितात, टिपूनं परराष्ट्र संबध, जहाज बांधणी इत्यादी क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केली आहे. त्यानं रयतेसाठी ‘आठ कलमी’ घोषणापत्र प्रसिद्ध केलं होतं. यात राज्यकर्ते म्हणून आपण कोणती कर्तव्यं पार पाडणार आहोत, आपली ध्येयधोरणं काय आहेत, या विषयी भूमिका मांडली होती.

राज्यकर्ता म्हणून शासकीय खजिन्यात अपहार केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसंच कोणत्याही लष्करी मोहीमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करेन, यात कसूर केल्यास फाशी देण्यात यावी, राज्यात कोणत्याही प्रकारचा धार्मिक आणि वंशीय भेदभाव करणार नाही, समाजात धार्मिक व नैतिक पातळीवर समन्वय घडवण्याचा प्रयत्न करीन, नैतिकतेच्या पातळीवर प्रबोधन व सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन.

टिपू पुढे म्हणतो, शेवटच्या श्वासापर्यंत सल्तनत-ए-खुदादादच्या एक-एक इंच भूमीच्या रक्षणासाठी प्रयत्न करीन, ब्रिटिश आपल्या देशाचे वास्तविक शत्रू आहेत, त्यांना देशातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण भारतातील लोकांना एकत्र करेल. निष्पाप आणि लाचार रयतेला जमीनदार आणि जहागीरदारांच्या अन्यायातून मुक्त करेन, प्रत्येकाशी समान न्याय करण्याचा प्रयत्न करेन. (पान-१०, सल्तनत-ए-खुदादाद). असा जाहीरनामा टिपूनं प्रसिद्ध केला होता. यावरून टिपूची नैतिकता स्पष्ट होते.

माजी दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीदेखील टिपूच्या पराक्रमाचं मुक्तहस्तानं कौतुक केलं आहे. ‘विग्स ऑफ फायर’मध्ये कलाम यांनी मोठी जागा टिपू सुलतानला दिली आहे. अमेरिकेतील मेरीलँड स्टेटमधील ग्रीनबेल्ट या गावी गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरच्या भव्य स्वागतकक्षामध्ये टिपूचंं भव्य चित्र लावलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 
लिहितात, “टिपू सुलतानच्या देशात त्याच्या शौर्यगाथेवरील चित्राचा विसर पडला, तरी सातासमुद्रापलीकडे ते चित्र एका स्पेस सेंटरच्या स्वागतकक्षाच्या भिंतीवर विराजमान झाले होते. अंतराळ युद्धाच्या पार्श्वभूमीसाठी एका भारतीय योद्ध्याच्या नावाने केलेला सन्मान मला अतिशय आनंदित करून गेला.” (अग्निपंख, पान, ४५)

सरफराज अहमद यांनी लिहिलं आहे, टिपूच्या ग्रंथालयात एक हजार ८८९ इतकी पुस्तकं होती. म्हणतात, त्यातली काही पुस्तकं आजही मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीमध्ये आहेत. टिपूनं स्वत: ४४ पुस्तकं लिहिली आहेत.

समाजशास्त्र, अर्थशास्त्र, प्रवासवर्णन, न्यायशास्त्र, कला, स्त्रीजीवन इतिहास अशा विविध विषयांवर टिपूची ही पुस्तकं असून म्हैसूर गॅझेटमध्ये ती उपलब्ध आहेत. पण इतिहासाच्या विद्रुपीकरणामुळे ही पुस्तकं प्रकाशझोतात आलेली नाहीत. कदाचित यामुळेच भाजपला टिपूचा धोका वाटत असावा. त्यामुळे टिपूला बदनाम करण्याचं षडयंत्र भाजपनं आखलं आहे.



इतिहासाचा भाजपाई दृष्टिकोन
भाजप हा मुस्लिमद्वेषी पक्ष असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळे भाजपाई आता उघडपणे भूमिका घेत आहेत. किंबहुना ते मुस्लिमांना एका प्रकारे आव्हान करत आहेत. स्वातंत्र्य आंदोलनात काडीचाही सहभाग नसलेला हा वर्ग आज मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींना खलनायक ठरवण्यात अग्रेसर आहे. यातून कधी टिपू, तर कधी मुघलांना हिंदूविरोधी सिद्ध करण्याचा आटापिटा केला जातो आहे.

याउलट सामान्य वाचकांनी टिपूचा इतिहास हा भाजपाई दृष्टिकोनातून समजून न घतेा, तटस्थपणे स्वतहून अभ्यासला पाहिजे. आकार पटेल म्हणतात, “अशा प्रकारच्या माहितीत व त्याआधारे होणाऱ्या वक्तव्यात काहीच तथ्य नाही. टिपू सुलतानबद्दल नुसतीच चर्चा करत राहण्यापेक्षा इतिहासाची पुस्तके वाचून कोणाही व्यक्तीने अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे. आपल्या देशातील सुजाण लोकांनी अशी पुस्तके मिळवून ती आवर्जून वाचली पाहिजेत.”

सत्तेत आल्यानंतर इतिहासाचं भगवेकरण करण्याचा सुनियोजित डाव भाजपनं सुरू केलाय. या कटशाहीवर अत्तापर्यंत बरंच लिखाण झालंय. तरीही मुस्लिम विरोधकांचे कुत्सित मनसुबे सुरूच आहेत. यावर उत्तर म्हणून नवइतिहासकारांनी लेखनाच्या परंपरेत पुढे यायला हवं. त्यांनी तटस्थ राहून इतिहासाची मांडणी करावी.

भावी पिढीसाठी जो घडला, तोच इतिहास मांडावा, अतिशयोक्ती टाळावी. अशा इतिहास लेखकांची मोठी फळी तयार व्हायला हवी. नसता इतिहासाचं सुलभीकरण केवळ भारतीय संस्कृतीच गिळंकृत करणार नाही, तर येणाऱ्या भावी पिढ्यादेखील उदध्वस्त करू शकते. त्यामुळे आपणासही एक वाचक म्हणून आत्तापर्यतच्या इतिहास लेखनाच्या परंपरेचा चिकित्सक व तौलनिक अभ्यासही करावा लागणार आहे.
(सदरील लेखाचा संपादित भाग १ ते १५ डिसेंबर २०१७च्या परिवर्तनाचा वाटसरूमध्ये प्रकाशित झालेला आहे.)

कलीम अजीम
Twitter@kalimajeem

(पुनप्रकाशित करण्यासाठी परवानगीची गरज नाही, फक्त लेखकाच्या नावानं ते प्रकाशित करावं लागेल. शिवाय मूळ लिखाणात मोड़तोड करण्याचा अधिकार नसेल.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: टिपू सुलतानची खरी भीती कुणाला?
टिपू सुलतानची खरी भीती कुणाला?
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjH6vcr6jJUSDQySOySpan2p3IO-vXOXxntG3aJgT-Mbm-yn9wSyMrBsvuZTpoINyft2UE7uNjutGa6xVnrPFj5kn9Ka_Qp-wgnw4wZzKG4iNihq_VIjiHM561dsPEuSNnzF8-we79uFmK_rZZxPeCxts7uI7MC0tTZc7s4KFFNv7tcmFlwytwxs0HDRQ=w640-h400
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjH6vcr6jJUSDQySOySpan2p3IO-vXOXxntG3aJgT-Mbm-yn9wSyMrBsvuZTpoINyft2UE7uNjutGa6xVnrPFj5kn9Ka_Qp-wgnw4wZzKG4iNihq_VIjiHM561dsPEuSNnzF8-we79uFmK_rZZxPeCxts7uI7MC0tTZc7s4KFFNv7tcmFlwytwxs0HDRQ=s72-w640-c-h400
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/11/blog-post_14.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/11/blog-post_14.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content