विद्यार्थी जंक फूडच्या आहारी का जातो?

यूजीसीनं विद्यापीठ व कॉलेज कॅम्पसमध्ये जंक फूड बंदीच्या सूचना केल्या आहेत. हा निर्णय चांगला आहे पण पर्यायावर यूजीसीनं कुठलंच भाष्य केलेलं नाही. मुळात जंक फूडची गरज आणि अडचण समजून घेण्याआधी आपण मूळ प्रश्नांवर थोडसं बोलावं लागेल. आपण घेत असलेल्या आहारावर जीवनशैली व आरोग्याचं कंट्रोलिग होत असतं. पण आज आज आपल्या आहारशैलीचं गणितच पू्र्णत: बिघडलंय. त्यामुळे नसते प्रश्न व आरोग्याच्या भयंकर समस्या उभ्या राहत आहेत.

विद्यार्थी दशेत खाण्याच्या बाबतीत विचार केला तर उपलब्ध वेळ व आर्थिक कुवतीनुसार मेस निवडली जाते. अनेकवेळा प्रोजेक्ट, प्रात्याक्षिके, असाईनमेंटमध्ये विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ खर्ची जातो, अभ्यासाच्या बैठकीत जेवायची वेळही अनेकदा टळून जाते. अशावेळी काहीतरी पोटात ढकलून पुन्हा अभ्यासाला लागणे हा मार्ग विद्यार्थी निवडतात. या सर्वांत साहजिकच भूकची आबाळ होतं.

पुण्यात मेसच्या व टिफीन डब्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या वेळेत सर्व झालं तर ठीक; नसता उपासमार ठरलेली. ती टाळण्यासाठी रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या स्ट्रीट फूड सेंटरचा आधार घेतला जातो. इथं इच्छा नसतानाही कमी वेळात तयार होणाऱ्या इंन्स्टंट फूडमधून भूक भागवली जाते.

पुण्यातील कुठल्याही रस्त्यावर असे स्टॉल रात्री उशीरापर्यंत सुरू असतात. पण पुणे विद्यापीठ आवारात जेवणासाठी हॉस्टेल मेस व रिफेक्टरीशिवाय पर्याय नाही. काही कॅण्टीनमध्ये सुमार दर्जाचा नाश्ता व स्नॅक्स मिळतो, जेवण पैसे देऊनही समाधानकारक मिळत नाही. ओपन कॅण्टीन बंद झाल्यानं जेवणाचे व नाश्त्याचे हाल होत आहेत. हॉस्टेल मेस व रिफेक्टरी आपल्या ठरलेल्या वेळेत चालू व बंद होते. तिथं लवकर गेलो तर भल्या मोठ्या रांगेत तीष्ठत उभं राहावं लागतं. उशीरा गेलं तर जेवण संपण्याची भीती.

अशा प्रकारच्या दोन्ही अडचणींचा सामना करून अनेकजण आपली जेवणाची गरज भागवतात. जेवणाच्या गुणवत्तेबद्दल काय बोलायचं अशी परिस्थिती आहे. २०१३-२०१४ साली रिफेक्टरीच्या जेवणात निघालेल्या अळ्यांवर अनेकदा आंदोलनं झाली. पण दर्जा अजूनही सुधारलेला नाही. मुंबई विद्यापीठ, बामू विद्यापीठात अशीच काहीशी अवस्था आहे.



विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण मिळावं असा आग्रह शासन दरबारी अनेकदा केला जातो. पण त्यासंदर्भात प्रयत्न कुठलीच यंत्रणा करत नाही. आहारशास्त्राचा आधार घेतला तर पुण्यात कुठलीच मेस त्या अटी पूर्ण करू शकत नाही. गोखले इन्स्टिट्यूट, सीओयूपी, बीएमसीसी, सिम्बी सारख्या हॉस्टेल मेसमध्ये जेवणाची क्वालिटी उत्तम असते. तिथं गुणवत्तेत तडजोड केली जात नाही, जसा पैसा विद्यार्थ्याकडून पैसा घेतला जातो, त्याचप्रमाणे जेवणंही उपलब्ध करून दिलं जातं.

पुणे विद्यापीठात असताना तर आमचे जेवणाचे रोजच प्रचंड हाल व्हायचे. परिसरात असलेल्या कॅण्टीनमध्ये जेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा, बाहेर येऊनही नुसते पैसे जायचे समाधान मिळायचंच नाही. पर्याय म्हणून आम्ही अनेक वेगवेगळ्या मेस शोधल्या. आयएलएस, कृषी महाविद्यालय, एफटीआय, फर्ग्युसन, एमएमसी अनेक ठिकाणी जेवलो, कुठंच जेवणाबाबत समाधानाची बाब आढळली नाही.

टिफीन नसेल तर दुपारचं प्रॉप्रर असं जेवण कधीच होतंच नाही. तीन-साडे तीननंतर अनेक हॉटेलात जेवण संपते. मग स्ट्रीट फूड खाण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा वडा पाव, पाव भाजी सारख्या जंक फूडवर भागवावं लागतं. स्पर्धा परीक्षांचा अभ्याास करणारे विद्यार्थी तर स्ट्रीट फूडवरच जगतात. चहा, क्रीमरोल, वडापाव तासा दोन तासाला बाहेर य़ेऊन पोटात ढकलला जातो. त्यामुळे जेवणाची इच्छाही मरून जाते.

अनेक मुलं रात्री उशीरापर्यंत रिडिंगमध्ये बसतात. बारा एकला झेड ब्रीजखाली फ्राईड राईस, नूडल्स, पावभाजीसारखे जंक फूड तर कधी सुमार दर्जाची राईस प्लेट, खिचडी, पुलाव गिळून गरज भागवावी लागते. दररोज हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकजण रात्री चहा-बिस्किटावर भागवतात. काहीजण एफसी रोडला पाश्चात्त्य फूड कंझ्यूम करतात. इथं अमाप पैसा जाऊनही शरीराला पोषक असं अन्नद्रवे मिळत नाही.

आहारशास्त्राचा विचार केला तर किमान साडे चारशे ग्राम फूड एका माणसाला हवा असतो. विद्यार्थी हा बौद्धिक आधारावरच शैक्षाणिक प्रगती साधू शकतो. योग्य आहार व झोप मिळाल्यास विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती वाढते. पण शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवणाच्या अभावामुळे सदृढ आरोग्य लाभत नाही. दैनंदिन जेवणाचा दर्जा चांगला असावा एवढ्यावरच भागत नाही, तर त्यातून मिळणाऱ्या कॅलरीज महत्त्वाच्या असतात.

आज रस्त्यावर मिळणाऱ्या बऱ्याच खाद्य पदार्थांतून प्रथिने व शरीराला लागणारे पोषक तत्त्वे मिळतात असं नाही. ब्रेड व पावाला जोडून मिळणारे प्रत्येक पदार्थ शरीरासाठी घातक आहेत, हे अनेक संशोधनातून सिद्ध झालंय. तरीही असे पदार्थ सर्रास खाल्ले जातात. मुंबईनं तर वडा पावला नॅशनल फूड घोषित केलंय.



मुंबई स्पीरीट मिरवणारे वडा पावच्या कौतुकाचे गोडवे गातात. मुळात वडा पाव भूक भागवणारे ते स्वस्तातले एक साधन आहे, बिगारी मजूर, कामगारांचा उपाशी झोपण्यापासून बचाव व्हावा ही भूमिका त्यामागे आहे. पण अलीकडे मुंबईच्या तरुणाईत वडा पावचं कल्चर फोफावलं आहे. गरज व भूक नसताना उगाच ते गिळलं जातं. असे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या हानीकारक असल्याचं भारतीय खाद्य सुरक्षा व मानांकन संस्थेनं केलेल्या अनेक सर्वेक्षणातून समोर आलंय.

फॅशन म्हणून विद्यार्थी अनेकदा पिझ्झा, स्नॅक्स, बर्गर खातात. ट्रीटपासून सुरू झालेला हा प्रकार दैनंदिन आहाराचा भाग बनतो. काहीजण तर असे आहेत की त्यांना असे जंक फूड खाल्याशिवाय त्यांची भूकच भागत नाही. अलीकडे चायनिज फूड खाण्याची फॅशन तरुणात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

कुठल्याही चायनिज फूडमध्ये अजिनोमोटो हा घटक असतो. याचा उपयोग खाद्य पदार्थांची चव वाढविण्यासाठी केला जातो. म्हणजे तो पदार्थ तुम्हाला वारंवार खावासा वाटतो. याचा परिणाम मेंदूवर होत असल्याचे अनेक संशोधनातून समोर आलंय. असे पदार्थ सतत खाल्ल्यानं स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती कमी होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

जंक फूड अती प्रमाणात खाल्याने कालांतराने भुकेवर नियंत्रण राहत नाही. याचा परिणाम मेंदूच्या विकासावर होतो. अलीकडे लहान मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये मॅगी, कुरेकुरे, चीप्स जागा करू लागले आहेत. पालक वेळ वाचावा म्हणून सहज लहान मुलांना चीप्स, कुरकुरे लंच बॉक्स म्हणून देतात. मुबईत तर भल्या सकाळीच ना.म. जोशी रस्त्यावर पोह्यांच्या स्ट़ॉलला मी पालकांची गर्दी अनेकदा पाहिलीय. पौष्टिक टिफीन तयार करून देण्याऐवजी पालक दहा रुपये टिफीनमध्ये टाकून मुलांना देतात, मुलं बाहेर स्ट़ॉलला जाऊन टिफीनमध्ये कुरकुरे, चीप्स भरून शाळेला जातात. या पोह्यांचा दर्जा सर्वांनाच माहीत आहे.

विद्यार्थी जंक फूड गरज व पर्याय म्हणून स्वीकारतात. परिणामी शरीरात रसायनिक बदल होऊन कालांतराने उदासिनता व नैराश्याचं प्रमाण विद्यार्थ्यामध्ये वाढते. मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल होतो. शरीरात फॅटचे प्रमाण वाढून लठ्ठपणा वाढतो. जंक फूड खाण्याची इच्छा रोखता येत नाही, भूक नसतानाही वारंवार खात राहण्याची इच्छा बळावते. त्यामुळे जंक फूड खाण्यायची सवय रोखता येऊ शकत नाही. पण त्याला पर्याय म्हणून पौष्टिक खाद्य स्टॉल उभे करता येऊ शकतात.

अशा पद्धतीनं जंक फूड खाण्याच्या सायकोलॉजीवर घाव घालता येऊ शकतो. याआधी सरकारनं शाळा परिसरात जंक फूडला बंदी केली होती, त्यानं फारसा काही पडलेला जाणवत नाही. आता यूजीसीनं जंक फूड सेंटर बंद करून काही उपयोग होणार नाही. त्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे.

पर्याय

* देशात जेएनयू व हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी मेस क्वालिटी कंट्रोलमध्ये आदर्शवत उदाहरण म्हणून पाहिले जातात. यूजीसीनं अशा पद्धतीनं सबसीडाईज मेस विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुरू कराव्यात.

* व्यवसायिक कंत्राटदारांना ठेका देण्याऐवजी ना नफा ना तोटा तत्त्वावर सेवाभावी संस्थाना मेसचं कंत्राट दिलं जाऊ शकतं.

* कमवा शिका योजनेतून विद्यार्थ्यांच्या मदतीनं एखादी मेस उभारता येऊ शकते.

*मुंबईत टीआयएसएस (गोंवडी), आयआय़टी (पवई), आयसीटी (माटुंगा) क्वालिटी मेससाठी प्रसिद्ध आहेत. विद्यार्थ्यांकडून पुरेसा पैसा घेऊन उत्तम दर्जाचं जेवण मेसमधून देता येऊ शकते.

* मुंबईत स्ट्रीट फूड म्हणून पोळी-भाजी, वरण-भात, राईस प्लेट अगदी तीस-पस्तीस रुपयात मिळते. अशा परवडणाऱ्या स्टॉल ठिकठिकाणी सुरू करता येऊ शकतात.

* पुण्यातही तुरळक ठिकाणी हमाल पंचायतीद्वारे कष्टाची भाकर केंद्र चालवली जातात. त्यांची संख्या वाढवता येऊ शकते. विद्यापीठ, कॉलज परिसरात असे सेंटर सुरू करता येऊ शकतात.

*ठिकठिकाणी झुणका भाकर केंद्र पुन्हा एकगा स्थापन केले जाऊ शकतात. महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली तर बचत गटाच्या माध्यामातून असे सेंटर उभे राहू शकतात.

विद्यार्थी काय करू शकतात

* रूम/घरातून निघताना एखादी पोळी-ऑम्लेट तयार करून बॅगमध्ये टाकता येऊ शकतो.

* शेवाया फोडणी देऊन किंवा वाफ देऊन बाहेर निघताना टिफीनमध्ये टाकता येऊ शकतात.

* टी-मेकर जवळ बाळगल्यास त्यात दूध तापवून किंवा रात्री अंडी उकळून खाता येतात.

* गावाकडून जाताना सुक्या भाकऱ्या, शेंगदाण्याची चटणी घेऊन जाता येऊ शकतात.

* आर्थिक सुबत्तेनुसार खारिक, सुका मेवा खिशात बाळगता येऊ शकतो.

* कुणीही शेंगदाणे अगदी सहज खरेदी करू शकतो. एकावेळी शंभर ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यानं पोट भरते.

* डझनभर केळी बॅगमध्ये घेऊन ठेवल्यास दिवसभर जातात.

* सफरचंद, पेरू, सारखी फळे पिझ्झा बर्गरपेक्षा कमी किमतीत मिळू शकतात.

* लहान मुलांसाठी पालकांना टिफीन बनवणे शक्य नसेल तर किमान उपमा, थालीपीठ, फोडणीचा भात, ओट्स, फळे व ड्रायफ्रूट्स टिफीनमध्ये द्यावीत. 

(सदरील लेख लोकमतच्या 30 ऑगस्ट 2018च्या ऑक्सीजन अंकात प्रकाशित झाला आहे.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: विद्यार्थी जंक फूडच्या आहारी का जातो?
विद्यार्थी जंक फूडच्या आहारी का जातो?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjdqZk6MRnwGDEHfcVSxLyBc94uSF06cHpBCgTrnkdw1OrDiXGT1H3cJ2QAT4TVBhy4Z47J54xQia4-toZyOpG197fi4ONZ-enpjyp9bPUQK9Fnc50VvYSX4-dHEpVhPQC_bIJkRqEPNmAn/s640/Junk+Fook.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjdqZk6MRnwGDEHfcVSxLyBc94uSF06cHpBCgTrnkdw1OrDiXGT1H3cJ2QAT4TVBhy4Z47J54xQia4-toZyOpG197fi4ONZ-enpjyp9bPUQK9Fnc50VvYSX4-dHEpVhPQC_bIJkRqEPNmAn/s72-c/Junk+Fook.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/08/blog-post_34.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/08/blog-post_34.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content