'सहा डिसेंबर' मनावर कोरली गेलेली एक जखम

हा डिसेंबर लक्षात का ठेवावा मला पडलेला पहिला प्रश्न, कारण याच दिवशी देशाच्या अखंडतेला व सार्वभौमत्वाला धक्का देणारी घटना देशात घडली होती. आणि दुसरं बाबासाहेबांचं जाणं. या दोन्ही घटना तशा दुखदच आहेत. घटनेतील क्रमवारी जरी सारखी नसली तरी या घटना एकाच दिवशी म्हणजे सहा डिसेंबर रोजी घडल्याचे साधर्म्य आहे. 
या रोजी दलिताकडून मुंबईत चैत्यभूमीवर विविध पक्ष-संघटनाकडून अभिवादन सभा आयोजित केली जाते तर मुस्लिमाकडून निषेध सभांमधून काळ्या पट्ट्या लावून ‘इसाले सवाब’ अर्पीत केलं जातं. तसेच प्रथेप्रमाणे बहुसंख्यक व अल्पसंख्यक समाजाकडून यादिवशी बाबरी पाडल्याच्या कथा ऐकविल्या व सुनावल्या जात असतात.
माझा जन्मच ऐंशीच्या दशकाचा त्यामुळे ‘बाबरी पतन’ आणि त्यानंतर घडलेली घटनाक्रमं मला बर्‍यापैकी आठवतं. त्यावेळी जरी लहान असलो तरी मला हे सर्व न कळण्यासारखं नव्हतं. या घटनेनंतर देशासोबत आमच्या मोहल्ल्यातही अस्वस्थतेचं वातावरण होतं. अल्लाहकडे ‘आनेवाली बला’ पासून संरक्षण मागण्यासाठी मस्जिदीमध्ये गर्दी सुरु झाली होती. सामुहिक नमाज पठन करुन ‘दुआ की गुजारीश’ म्हणलं जात होतं. अशातच मुंबईमध्ये दंगली उसळल्याच्या बातम्या येऊ लागल्या. 
शहरात शांतता कमिट्यांच्या बैठका सुरु झाल्या. मस्जिदीत प्रार्थनांचा ओघ वाढू लागला. शहरात दंगलीचे लोण पसरु नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न मोहल्ल्यातील बडी मंडळी करत असल्याचे मी बघत होतो. त्यामुळे सुदैवाने आमच्या अंबाजोगाई शहरात कसल्याच दंगली त्यावेळी घडल्या नाहीत. 
दुसरीकडे शनिवारची शाळा करुन गल्लीतील माझे समवयस्क दलित शाळकरी मित्र आपल्यापेक्षा वयाने मोठ्या भाऊबंदकीसोबत मुंबईकडे चैत्यभूमीला रवाना झाली होती. हे सगळं घटनाक्रम लेखाच्या निमीत्ताने विस्मृतीत ठेवल्याने परत आठवावं लागलं, असो. पण हे सगळं भयाण होतं. यानिमित्ताने आजीकडून ‘पोलिस अ‍ॅक्शन’च्या कथा परत ऐकण्याचा योग आला होता. आज या संदर्भात माहिती ज्यावेळी मी वाचतो बघतो ऐकतो त्यावेळची भितीची भीषणता लक्षात येते.
बाबरीनंतर घडलेल्या मुंबई दंगलीत मारले गेलेल्यांच्या संबधीतांना वापरुन प्रतिक्रिया म्हणून मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्यात आले. हे स्फोट घडवून त्यांच्या आयुष्याची दैना करण्यात आली. देशद्रोहाचा डाग घेऊन तुरुंगात तरुण खितपत पडले आहेत. यांना वापरणारे आजही मोकाट फिरत आहेत. देशद्रोहाचा डाग राहिलेल्या कुटुंबांनासुद्धा दंश देऊन गेला. शिक्षण व रोजगारासाठी खेटा माराव्या लागत आहे. 
आजही सामाजिक अवहेलना झेलत ती कुटुंबे कशीबशी दिवस ढकलत आहेत.  त्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्यता अजूनही लाभलेली नाही. त्यामुळे दंगली, विध्वंस, वाईट घटना लक्षात ठेवून काय साध्य काहीच होत नसतं. या आठवणीने केवळ वर्तमानच खराब होत नाही तर भविष्यकाळावर देखील याचा परिणाम पडतो. पण भुतकाळातील घटना कशामुळे घडल्या याची कारणमिमांसा करुन त्या दुरुस्त करता येईल का यासाठी प्रयत्न करावा. दंगल, विध्वंस आठवणे म्हणजे द्वेश व सुड भावना पोक्त करणे होय.  
बाबरी पतनानंतर देशभरात अनेक दंगली घडल्या आहेत ओरिसा वगळता प्रत्येक दंगलीत मुस्लिम समाज टारगेट करुन मारला गेला आहे. त्यामुळे मुस्लिमांचे सामाजिक आर्थिक, शैक्षिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. प्रत्येक दंगल मुस्लिमांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कितीतरी वर्षे मागं घेऊन जाते. दंगली रोखण्यामागं सुरक्षा यंत्रणा फोल ठरली आहे. दंगल घडताना पोलिस मुस्लिमांना कसलीच संरक्षिय मदत पुरवत नाहीत. अशावेळी सामान्य मुस्लिमांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. 
अलीकडच्या काळात फक्त उच्चशिक्षित मुस्लिम तरुणांच नव्हेतर दलित तरुणांना दहशतवाद व नक्षलवादच्या खोट्या आरोपाखाली अडकवण्याचे षडयंत्र सुरु आहे. दोन-तीन वर्षे तपासाच्या नावाखाली तुरुंगात ठेवायचं आणि बाहेर सोडायचं, त्याचे शैक्षाणिक व सामाजिक आयुष्य संपवण्याचे षडयंत्र सुरु आहे. अशावेळी मुस्लिम व दलित तरुणांची जबाबदारी वाढली आहे. आर्थिक व शैक्षिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी त्यांना नव्या संधीचा विचार करण्याची गरज आहे.   
सहा डिसेंबर दिवस साजरा करण्यासाठी मागील दोन आठवड्यापासून ‘आमच्या’ तथाकथीत कंपू गटातून यादिवशी ‘काळा दिन’ (पलिकडच्या गटातून भगवा दिवस) पाळण्याचे मॅसेजस ‘व्हॉटस अप’ आणि ‘सोशल माध्यमा’तून सडा पडल्यासारखे पडत आहे. ‘प्रोफाईल्स पिक’ काळ्या करणारी अवाहनं करण्यात येत आहेत. दरवर्षीप्रमाणे बाबरी पुन्हा उभी राहावी यासाठी मुस्लिमातील उजव्या गटातून ‘दुआ’ रिलीज केली जात आहे. 
प्रत्येक मॅसेजिंग सर्व्हीसवर स्वंयसेवक अ‍ॅक्टीव्हतेने मॅसेज पाठवण्याचे काम करत आहेत. म्हणजे परत एकदा सामाजिक व धार्मिक ठेकेदार मंडळीकडून सर्वसामान्य मुस्लिम तरुणांचे डोकी भडकवण्याचे काम सुरु आहे. तर पलिकडे बहूसंख्यककाडून ‘विजय दिवस’ साजरा करण्याच्या कवायती सुरु असतात. त्यामुळे अल्पसंख्यकाच्या निषेधातही मी सहभागी आहे, त्याचप्रमाणे बहुसंख्यकाच्या ‘विजय दिवसात’ही माझा सहभाग असेलच, आज बहुतांश ‘पोस्ट मॉडर्नायझेशन’ नंतरची नवतरुणं पिढी, 1992 साली घडलेल्या ‘बाबरी पतन’ संदर्भातल्या ‘कॉन्सपिरंसी’ वर सोयीचे विचार ऐकून मारणं-मरण्याची भाषा करत आहेत. 
वेगवेगळे गैरसमज ज्यांना ते सत्य समजून (या ‘अ’सत्याचे ओझं वाहन्यापलिकडे ते काहीच करु शकले नाही) स्वत:चीच फसगत करत आहेत. इतिहासाची नीट जाण नसलेल्या पिढीकडून विषारी कृत्य घडविण्याचे कारस्थान काही ‘विखारी’ मंडळीकडून केली जात आहे, आणि तरुणंदेखील स्वत:ला वापरण्यासाठी इतरांच्या हवाली करुन मोकळे झाले आहेत. अशा तरुणांची मला कीव येते. 
सध्या सत्ताधारी असलेली मंडळी मागील वीस वर्षापासून ‘मंदीर वही बनायेंगे’ म्हणत सामान्य मतदाराच्या भावनेशी खेळत राजकारण करत आहे. यालाच समातंर असा मुस्लिमात एम.आय.एम. हा कडवा पक्ष महाराष्ट्रात उदयास आला आहे. त्यांनी ‘बाबरी की एक इंच भी जमीन नही देंगे’ म्हणत राजकारण सुरु केलं आहे. या भुलथापांना आहारी जाणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
बाबरी पतनाला आज बावीस वर्षे पुर्ण झालीत, त्याच्या बर्‍याच जखमा कोरड्या झाल्या आहेत. त्यानंतर देशात मुंबईत दंगली घडल्या यात अनेक कुटुंबाचे संसार उधवस्त झालेत. अनेकजण बेघर झालेत, ते आजही न्यायाच्या प्रतिक्षेत कोर्टाच्या पायर्‍या झिजवत आहेत. परंतु बाबरी पतनाची प्रतिक्रिया म्हणून मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले त्या सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. पण मुंबई दंगल घडवणारे अजूनही सरेआम खुले फिरत आहेत. दंगलग्रस्तांचे कसलेच पुर्नवसन व नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. हा वेगळा न्याय का, असा जाब दंगलग्रस्त भागातील नागरिक सरकारला विचारत आहेत.
लेख लिहल्याने व आपण वाचल्याने क्रांती घडेल अशी कोणतीच शक्यता नाही. पण तरीही लेखाचं प्रयोजन असं की, विवादीत जागेसाठी आम्ही किती दिवस भांडत राहणार. त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही, याची कल्पना देशातील सर्व नागरिकांना आहे. कोर्टाने दिलेला निर्णय दोन्ही उभयपक्षाच्या आस्थेला अमान्य असल्याने सुप्रिम कोर्टात गेले आहेत. कोर्टाने निर्णय दिला आहे. 
दोन्ही गटाकडून तेवढाच जोर असल्याने विवादीत जागेवर येणार्‍या पन्नास वर्षात तरी भौगोलिक बदल घडणार नाही. यातून फलस्वरुप समाधान न येता नवा वाद उभा राहणार आहे. त्यामुळे माझ्या मते विवादीत जागेवर देशातील प्रत्येक नागरिकास उपयोगी पडेल असे जागतिक दर्जाचे ग्रंथालय उभारले जावे, त्यात सामाजिक व राज्यशास्त्राचा अभ्यास व संशोधन केलं जावं. 
अत्यल्प खर्चात जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल अशी सोय करण्यात यावी. जेणेकरुन देशातील प्रत्येक जाति-धर्माच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल. तसेच मंदीर व मस्जिद उभारणीसाठी शहरात इतर ठिकाणी दोघांना समान अशी जागा वाटप करुन आंतरराष्ट्रीय शांतीचं प्रतिक म्हणून आयोध्या नगरीचा विकास केला जावा. विवादीत जागेवर तोडगा काढण्यासाठी ‘आस्थेला’ बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धर्मगुरु, सेवाभावी संस्था, बुद्धीजिवी वर्ग, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरु इतरांच्या उपस्थितीत सल्ला-मसलत करुन योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा विवादीत परिसरात पडलेला ‘फुफाटा’ नव्या दंगली घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल.

शेवटी इंद्रजीत भालेरावांची एक लेखाला साजेशी व बोलकी कविता

रामानंतर बाबरही गेला
थडग्यांना आला
भाव आता.
मढे उकरुन जगती जे-जे
पुरले पाहिजे
त्यांना आधी.

(दिव्य मराठीच्या 6 डिसेंबर 2014 विशेषांकासाठी लिहिलेला पण प्रकाशित न झालेला लेख)

कलीम अजीम, पुणे
मेल- kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: 'सहा डिसेंबर' मनावर कोरली गेलेली एक जखम
'सहा डिसेंबर' मनावर कोरली गेलेली एक जखम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh-8o5VZtShq9EQi0cV4oKJll9dXk9_MftDSUEMnqyZY9Jd7U5VWU-mLIQBSSAccV-Igg4v842OzEnJ7ruxpOkFlSs5HSfnKmNE4mFZcIPIh6Ywz0EQt44qU6hs7cZlI5RUmId-YUKpLWhA/s640/Baburi+Masjid.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh-8o5VZtShq9EQi0cV4oKJll9dXk9_MftDSUEMnqyZY9Jd7U5VWU-mLIQBSSAccV-Igg4v842OzEnJ7ruxpOkFlSs5HSfnKmNE4mFZcIPIh6Ywz0EQt44qU6hs7cZlI5RUmId-YUKpLWhA/s72-c/Baburi+Masjid.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2014/12/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2014/12/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content