चंगळवाद आणि स्टारडमची व्यथा


मागच्या आठवड्यात सोशल साईट, मीडिया हाऊसेसच्या वेबसाईट आणि एकूण माध्यमात दोन बातम्या विक्रीय ठरल्या. पहिली बातमी अर्थातच मोठी होती ती म्हणजे देशाचे पंतप्रधान शिक्षकदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. तर दुसरी बातमी होती ती एक राष्ट्रीय “पुरस्कार प्राप्त चित्रपट अभिनेत्री” सेक्स रॅकेटमध्ये गुंतल्याची. 
दोन्ही न्यूजने ‘सोशल कट्टा’ अक्षरश: फोडून टाकला. पहिल्या ‘सकारात्मक’ बातमीची  विरोधकांनी टर उडवण्यात कोणतीच कसर सोडली नाही. ज्यात फक्त सत्ता उपभोगलेलेच नव्हते तर सामान्यसुध्दा होते. या सर्वांनी मजकूर, छायाचित्रे, स्लोगन्स, टीका-टिप्पणी, शेरेबाजी व मानहानीकारक स्टेटसचा सोशलसाईटवर अक्षरश: पाट वाहत होता. तर दुसरी बातमी आदल्या दिवशीची होती ती म्हणजे अभिनेत्रीच्या शरीरविक्रयसंदर्भात हैद्राबादला उघडकीस आलेली घटना. 
ज्या गुरुवारी (माध्यमासाठी हॉट ठरलेली) बातमी लिक झाली, त्यावेळी प्रधानमंत्र्याची बातमी आलेली नव्हती. त्यामुळे प्रसार माध्यमांनी ‘मानवी अभिरुची’ जागवणारी बातमी म्हणून सदर न्यूज प्रसारित केली. तसं पाहिले तर या बातमीला ‘वृत्तमुल्य’ किती होते माहीत नाही. पण, माध्यमांनी मीडिया लॉ आणि प्रेस इथिक्सचा भंग करत आरोपीत व्यक्तीचे नाव प्रसारित केले. फक्त प्रसारितच नव्हे तर सदर प्रकरणाचा बोभाटा मोठ्या प्रमाणात केला.   
बालकलाकाराची विकाऊ सवरुपाची बातमी हाती येताच प्रसारमाध्यमांनी धुव्वा उडवला. दिवसभर सदर बातमी ‘कॅची’ हेडलाईनसोबत, फोटो, व्हीडीओ देऊन संकेतस्थळे वेगवेगळ्या स्वरुपात मांडत होती. 
इलेक्ट्रानिक माध्यमात काय स्थिती होती माहीत नाही, पण इंटरनेटवर या बातमीची जणू जत्राच भरली होती. या घटनेनंतर या स्वरुपाच्या अनेक बातम्याची लाट परंपरेनुसार प्रसारमाध्यमाने सुरु केली. अजूनही यास्वरुपाच्या बातम्या येत आहेत. तसं पाहिलं असता वेश्याव्यवसायात जाहीररित्या अभिनेत्री सापडणे ही गोष्ट जरी नवीन असली तरी यात वेगळपण काहीच नाही. ऐंशीच्या काळातील ‘स्मिता सिल्क’ नावाच्या मोठ्या अभिनेत्री सोबत हेच घडले होते. 
अगदी अलिकडे मराठी चित्रपटाचा नायिका शरीरविक्रय करताना ‘रंगेहाथ’ पकडण्यात आल्या होत्या. त्यामुळे अशा घटना अधून-मधून घडत असतात. फक्त फरक एवढाच की अशा प्रकारणाचा बाऊ होत नाही. पण यावेळी या प्रकरणाचा मोठा बाऊ केला गेला. 
पाच-सहा वर्षापूर्वी ‘चित्रलेखा साप्ताहिका’ने अशा प्रकारची कव्हर स्टोरी प्रकाशीत केली होती. त्यात लहान पडद्यावरील फीमेल कलाकार अतिरिक्त पैसा मिळावा, शान-शौकीपणाने राहण्याची हौस भागावी, महागडे खर्च पेलावे या हेतूने आपल्या मर्जीने बड्या निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला शरीरसुख देत असल्याचा कबुलीनामा दिला होता. 
काहींनी तर निर्मात्याची मागणी पूर्ण केली असता त्यातून भरपूर पैसा मिळतो, म्हणजे हा आपण केलेल्या कामाचा हा मोबदला नव्हे का? मग त्यात वाईट काय? अशा बिनधास्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर काही काम नसताना अशा प्रकारचे काम आम्ही करतो असेदेखील म्हणताना दिसल्या.
2002 साली उत्कृष्ठ बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘त्या’ अभिनेत्रीला या प्रकरणात अटक झाल्यानंतर तिने दिलेली प्रतिक्रिया धक्कादायक होती. तिच्या मते “मी हे काम कुटुंबाच्या पालन-पोषनासाठी करत असून काम नसल्यामुळे माझ्यावर हलाखीची परिस्थिती ओढवली असून त्यातून मार्ग काढण्यासाठी मला हे काम स्विकारावे लागत आहे, माझ्यासारखीच परिस्थिती इंडस्ट्रीतील कितीतरी अभिनेत्रीवर आहे. त्यांनी देखील अशा परिस्थितीत हे काम स्विकारले आहेत” असा धक्कादायक जबाब तिने माध्यमांना दिला. 
वरकरणी ‘चकचकीत’ वाटणारं हे फिल्मी आयुष्य आतून किती त्रासदायक आहे याची कल्पना या घटनेनंतर आली. वासनांध आंबट नजरा व डोळ्यांची लैंगिक भूक भगवणार्‍या म्हणून महिला कलाकाराकडे पाहिले जाते. या शोषणाच्या दुनियेत त्या एकट्याच असतात. कुटुंब किंवा मित्र पैसा आणि प्रसिध्दीसाठी हपापलेले असतात. 
अशा महिला कलावंताना कुटुंब, नातं, व्यवसाय सांभाळताना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. मग त्यातून नातेसंबध टिकवण्याची धडपड, कामाचा ताण, प्रवास, मर्जी राखणं, यश-अपयश, वैवाहीक असंतुष्टता, घटस्फोट, लैंगिक भूख, अशा असंख्य त्रासातून जाताना चेहर्‍यावर नकली हास्य आणत जगावं लागतं. तारुण्यात मित्र असलेला ‘आरसा’ वय ओसरताना टीकाकाराची भूमिका वठवतो. मग शेवटी उरते ते नैराश्य!! मानसिक त्रास!! यातून मार्ग शोधण्यासाठी किंवा तात्पूरते समाधान मिळवण्यासाठी मद्य, धुम्रपान, नशा याच्या आहारी जाऊन पाऊलं चुकीच्या दिशेनं पडतात. 
जून्या काळातील चरित्र अभिनेत्री ललिता पवार, अभिनेत्री परविन बॉबी यांचा मृत्यु आमच्या संवेदनशिल मनाला चटका लावून गेला. मीनाकुमारी देखील याच व्यवस्थेच्या आहारी गेल्या. गुरु दत्त, दिव्या भारती, लैला खान, जिया खान तसेच फॅशन क्षेत्रातील अनेक मॉडेल यांच्या आत्महत्या अनेक प्रश्न उपस्थित करुन गेल्या. 
तीन-चार वर्षापूर्वी एक नामांकीत मॉडेल फाटलेल्या वस्त्रानिशी दिल्लीच्या रस्त्यावर भीक मागताना आढळल्याची बातमी माध्यमातून येऊन गेली. नंतरच्या काळात ‘फॅशन’ सिनेमातून मॉडेलींग विश्वातलं कटूसत्य बाहेर आलं. यापूर्वीही गुरुदत्त यांनी ‘कागज के फूल’ तर श्याम बेनेगल यांनी ‘भूमिका’ महेश भट्टने ‘अर्थ’ चित्रपटातून फिल्मी पडद्यावरील अभिनेत्रीचं दुख: बाहेर काढलं होतं. अलिकडे ‘पेज-थ्री’ आणि हेरॉईनच्या माध्यमातून सेलेब्रिटी विश्वातलं काळं जग आणि फिल्मी वेदना मांडण्याचा प्रयत्न झाला. यानंतर सेलेब्रिटी विश्वाकडे माध्यमाचे लक्ष वेधलं. 
आताचे प्रकरण वेगळं असलं तरी घटनेमागची दाहकता तीच आहे. काही वर्षापूर्वी ‘अमन वर्मा स्टिंगगेट’ प्रकरणानं समाजात खळबळ माजवली होती. याचकाळात शक्ती कपूरही ‘कास्टींग काऊच’मध्ये अडकला होता, आपला जबाब देताना शक्तीनं “अनेक मोठ्या नेत्री-अभिनेत्री ‘फिल्म इंडस्ट्री’मध्ये काम मिळवण्यासाठी ‘कास्टींग काऊच’ मधून गेल्या आहेत” असे विधान करुन बॉलीवूड जगतात भूकंप आणला होता. 
नंतरच्या काळात या विधानाला दुजोरा देणारं खळबळजनक स्टेटमेंट ‘प्रीती जैन’ नावाच्या मॉडेलने मधूर भांडारकरसंदर्भात केलं होतं. यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता यात बजारमूल्य ओळखून मधूरने ‘पेज-थ्री’ सारखा विकाऊ सिनेमा बनवून मोठा गल्ला जमवला. नंतर मॉडेलचे आणि ‘त्या’ आरोपाचे काय झालं माहीत नाही पण, या शोषणीय जगाचे दर्शन जरुर समाजाला झालं. जून्या जमान्यातील अभिनेत्री परविन बॉबीने महेश भट्ट, कबीर बेदी, डॅनी डेझोंपा यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा मीडियासमोर लावला असल्याचा इतिहास आहे. 
तत्कालिन परिस्थितीत परविन बॉबीच्या या आरोपाचं खंडन करणारे महेश भट्टने तिच्या मृत्युनंतर त्यांच्यात असलेल्या ‘वो लम्हे’चे बाजार मांडलं. या प्रकरणानंतर “जीते जी रिश्तेकी कबुलियत न दी जिसने, बाद मरने के किस तरह उसे सरेबाजार किया” म्हणण्याची वेळ परविनच्या चाहत्यावर आली होती. 
झटपट प्रसिध्दी, पैसा, यश, स्टारडमच्या नावाखाली नट्या वाट्टेल ते करायला तयार होत आहेत. पूनम पांडे, शर्लीन चोप्रा, सनी लियोनी, सारख्या नट्यांची आजच्या तरुणीचे आदर्श म्हणून प्रतिमा निर्मीती केली जात आहे. गुगल सर्चमध्ये यांना शोधण्याचे विक्रम मोडले जात आहेत. ‘डर्टी पिक्चर’ला राष्ट्रीय पारितोषक दिले जातात. त्यामुळे गल्लाभरु व पब्लिक डिमांड सिनेमाची मागणी वाढू लागली आहे. 
नफा एके नफा या तत्वावर चालणारा हा उद्योग जनरल कॅटेगरीतल्या सिनेमापासून पाठ फिरवत आहे. त्यामुळे साहजिक आहे जेमतेम, सामान्य व आदर्श नारीच्या भूमिका करण्यार्‍या नेत्री-अभिनेत्रीच्या रोजगारावर गदा आली. अशा कितीतरी कलावंत मंडळी उत्तम अ‍ॅक्टींग येत असतानाही कामाच्या शोधात आहेत. दहा वर्षापूर्वी आलेल्या नवख्या व उत्तम अ‍ॅक्टींग करणार्‍या नट-नट्या आज बॉलीवूडमधून गायब झाल्या आहेत. याची कारणमिमांसा कोणी शोधली आहे का? 
ए. के. हंगल, जोहरा सहगल, ललिता पवार, परविन बॉबी शेवटच्या वेळी अत्यंत हलाखीच्या अवस्थेत होत्या, त्यातच त्यांचा दुर्दैवी व करुण अंत झाला. अमाप पैसा प्रसिध्दी असताना देखील यांच्यावर अशी वेळ का यावी हे मोठे व न सुटणारे कोडं आहे. याची यानिमीत्ताने चर्चा व्हायला हवी. शासनाकडून कला क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद दरवर्षी केली जाते. पण याचा लाभ कोणाला होतो हा प्रश्न आहे. 
ज्येष्ठ नट-नट्या आज कोणत्या अवस्थेत आहेत याचा तपास करुन त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान करने ही सरकारची जबाबदारी आहे. लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन, ऑटोग्राफच्या आवाजामागे या नट-नट्यांचे आवाज दाबले जाता कामा नये. याची खबरदारी शासनाने घ्यायला हवी.   
कलिम अजीम
पुणे 
(लेखक सुंबरान मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत)
*14 सप्टेंबर 2014 रोजी दैनिक प्रजापत्रमधे प्रकाशित 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,25,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,302,व्यक्ती,23,संकलन,65,समाज,265,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,54,
ltr
item
नजरिया: चंगळवाद आणि स्टारडमची व्यथा
चंगळवाद आणि स्टारडमची व्यथा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzgjPxFTiZ8s2Q5s26bBrWQqjKKhoC1suWEIOAlhnphAf1h9CVCYaVrNiZciJt6xr2JHZmNADugZNm5iZcZbwSjVWoyoI4Vt0iTkKkM4nZkKFsmaXEZy-fk-_W_EFhxaYgcH5fAMnIy2Mz/w640-h380/Sex-racket-busted-in-Cuttack-house-owner-held.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzgjPxFTiZ8s2Q5s26bBrWQqjKKhoC1suWEIOAlhnphAf1h9CVCYaVrNiZciJt6xr2JHZmNADugZNm5iZcZbwSjVWoyoI4Vt0iTkKkM4nZkKFsmaXEZy-fk-_W_EFhxaYgcH5fAMnIy2Mz/s72-w640-c-h380/Sex-racket-busted-in-Cuttack-house-owner-held.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2014/09/blog-post_16.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2014/09/blog-post_16.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content