समझोता एक्स्प्रेसमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात स्वत:चा हात असल्याबद्दलचा कबुलीजबाब असीमानंदाने दिल्याने संघ परिवाराची आणि त्यातल्या त्यात भाजपची गोची झाली आहे. ज्याला हिंदू दहशतवादी म्हणून पकडण्यात आले आहे आणि ज्याच्या कबुलीजबाबाने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही खळबळ माजवली आहे, तो स्वामी असीमानंद याचे संघाशी काहीही नाते नाही, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने डॉ. मनमोहन वैद्य यांनी हात झटकले आहेत.
वनवासी कल्याण आश्रमाशी असीमानंद हा निगडित होता आणि तो डांगमध्ये त्यांचे काम पाहात होता. आता वनवासी कल्याण आश्रमाशीही आपला संबंध नाही असे संघाचे म्हणणे असेल तर मग प्रश्नच नाही. असीमानंदलाही हृदय आहे असा दावा करता येईल, असा आपल्या गुन्ह्य़ाचा कबुली जबाब त्याने दिला आहे. त्याच्या सहवासात आलेल्या एका मुस्लिम तरुण कैद्याने आपली कहाणी त्याला सांगितल्यावर त्याच्या असे लक्षात आले, की अरे आपण जर या स्फोटांसाठी जबाबदार आहोत, तर मग या निर्दोष असणाऱ्याला विनाकारण अडकवण्यात काय अर्थ आहे? त्याला पाझर फुटला आणि त्याने कबुलीजबाब द्यायचा निर्णय घेतला. हे खरे असेल, नसेल, पण वस्तुस्थिती असे सांगते, की या बॉम्बस्फोटांबद्दल ज्या मुस्लिमांना पकडण्यात आले आहे, त्यांचा त्या स्फोटांशी फारसा संबंध नसू शकतो.
असीमानंदचा जबाब ४२ पानांचा आहे आणि त्यातला काही वेचक भागच प्रसिद्ध झाला आहे, तो जर सविस्तर प्रसिद्ध झाला तर काय होईल याचा विचार या संबंधात भाष्य करणाऱ्यांना करावा लागेल. तेव्हा थोडे जपून! असीमानंदच्या जबाबात असंख्य विसंगती आहेत आणि त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असेही वैद्य यांनी म्हटले आहे. यामध्ये प्रश्न असा उभा राहतो, की त्याचा जर संघाशी काडीमात्र संबंध नसेल तर मग संघाने त्याला आव्हान द्यायचे कारण काय? त्यात जर विसंगती असतील तर न्यायालये त्या तशा आहेत की नाहीत ते ठरवायला समर्थ आहेत.
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही ‘काँग्रेस पक्षाचा विश्वासू सहकारी असलेल्या’ केंद्रीय गुप्तचर खात्याने असीमानंदांच्या कबुली जबाबातला काही भाग हेतुत: उघड केल्याचे म्हटले आहे. ‘हिंदू दहशतवाद’ असा काही प्रकारच अस्तित्वात नाही, असे गडकरी यांचे म्हणणे आहे. इंद्रेशकुमार हा पाकिस्तानच्या ‘इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स’ या संघटनेचा हस्तक असल्याचे असीमानंदाचे म्हणणे आहे आणि त्याच इंद्रेशकुमारवर गुप्तचर खात्याचा वहिम असल्याबद्दल गडकरी यांना संतापायला झाले आहे. भ्रष्टाचारावरून देशाचे लक्ष दूर करण्यासाठी असीमानंदचा जबाब हा मुद्दाम वृत्तपत्रांना देण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. असीमानंदकडून केंद्रीय गुप्तचर खात्याने गुन्ह्य़ातला सहभाग वदवून घेतल्याचे ते म्हणतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणाऱ्यांची त्या संघटनेवर असणारी अनन्यसाधारण निष्ठा आणि त्यांची अविचल जिद्द लक्षात घेता त्या संघटनेत असणारा कोणीही गुप्तचर खात्याच्या दमदाटीने त्यास शरण जाईल आणि गुन्ह्य़ातल्या आपल्या सहभागाबद्दल भडाभडा कबुली देऊन मोकळा होईल हे संभवत नाही. तो पोलिसांच्या दहशतीला बळी पडल्याचे मान्य करणे म्हणजे संघाचीच बदनामी करण्यासारखे आहे. महात्मा गांधीजींचा खुनी नथुराम गोडसे याने गुन्हा कबूल केला होता आणि या गुन्ह्य़ात सहभागी असलेल्या त्याच्या भावाने तर गांधी खून खटल्याबद्दल नंतर पुस्तक लिहून हे सगळे कारस्थान कसे घडवण्यात आले ते सांगितले होते.
आजही ही गोडसेवादी मंडळी अगदी निलाजरेपणाने त्या कृत्याचे कसे समर्थन करत असतात हे आपण अनेकदा अनुभवले आहे. नथुरामच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्याचा ठाण्याच्या साहित्य संमेलनामध्ये स्मरणिकेमध्ये गौरव केला जाणे हाही त्या निगरगट्टपणाचाच भाग होता. सांगायचा मुद्दा हा, की असीमानंदाने दिलेल्या कबुली जबाबाने संघ परिवार हडबडून जागा झाला आहे. अजून बरेच काही पुढे येणार असल्याची जाणीव असल्यानेच त्यांनी त्याच्या कबुली जबाबावर काही भाष्य करण्याऐवजी त्यातला निवडक भाग वृत्तपत्रांकडे दिल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. या असीमानंदने समझोता एक्स्प्रेसमध्ये इंद्रेशकुमारबरोबर एक लष्करी अधिकारी होता, असे म्हटले आहे.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याला या प्रकरणात सर्वात आधी ताब्यात घेण्यात आले होते. इंद्रेशकुमारचे नाव राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथकाने ऑक्टोबर २००७ मध्ये झालेल्या अजमेर दग्र्यात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पहिल्यांदा घेतले होते आणि त्याला असीमानंदने आता दुजोरा दिला आहे. असीमानंदच्या कबुलीची संगती लावायचे काम करायचे असल्याने त्याच्या सर्व जबाबाला बाहेर आणण्यात आलेले नाही, पण त्यावरून देशात स्फोट घडवून दहशत माजवायचा कट खूप आधीपासून रचला गेला होता, हेही उघड झाले आहे.
ऑक्टोबर २००५ मध्ये गुजरातेत जी बैठक झाली, तिला प्रज्ञासिंह ठाकूरसह कोणकोण हजर होते तेही असीमानंदने सांगितलेले आहे. अजमेरच्या स्फोटानंतर दोनच महिन्यांनी डिसेंबर २००७ मध्ये सुनील जोशी याचा देवासच्या बाहेरून जाणाऱ्या रस्त्यावर खून करण्यात आला. त्यानंतर रामचंद्र कलासंग्र तथा रामजी याचाही खून करण्यात आला. या रामजीने एका गोठय़ात जोशीच्या सांगण्यावरून स्फोटके दडवली होती. मार्च २००८ मध्ये रामजी इंदूर जिल्ह्य़ात गौतमपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मृतावस्थेत सापडला.
समझोता एक्स्प्रेसमध्ये झालेला स्फोट १८ फेब्रुवारी २००७ रोजी झाला. हे दोघेही अजमेरच्या स्फोटाशी संबंधित होते असे असीमानंदचे म्हणणे आहे. मालेगावमध्ये २००६ आणि २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाले. यापैकी पहिल्या स्फोटात याच मंडळींचा हात असल्याचे गुप्तचर खात्याचे म्हणणे आहे. २००८ च्या बॉम्बस्फोटातही आपला हात असल्याचे असीमानंदने आपल्या जबाबात म्हटले आहे. हा सर्व भाग काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते दिग्विजय सिंह यांनी जेव्हा उघडकीस आणला तेव्हा त्यांच्यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून ते बोलत असल्याचा आरोप संघ परिवाराकडून करण्यात आला. यासंबंधात आपल्याशी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात चौकशीची सूत्रे ज्यांच्या हाती होती ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे तेव्हाचे प्रमुख हेमंत करकरे यांचे बोलणे झाले होते आणि त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे आपल्याला सांगितले होते, असे दिग्विजय सिंह यांनी म्हणताच त्यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठवण्यात आली.
मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला तोंड द्यायला निघण्याच्या तयारीमध्ये असताना करकरे त्यांच्याशी बोलतीलच कसे असेही विचारण्यात आले. तथापि त्यांनी आपल्या आणि करकरे यांच्या चर्चेत वापरण्यात आलेल्या दूरध्वनींचे क्रमांकच उपलब्ध करून दिल्याने टीकाकारांची दातखीळ बसली. पुण्यामध्ये अगदी अलीकडेच संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी ‘हिंदू दहशतवाद’ असा काही प्रकार अस्तित्वातच नसल्याचे सांगितले होते. दहशतवादाला असा काही रंग असतो यावर आमचाही विश्वास नाही, पण गेल्या काही दिवसांमध्ये ज्यांना वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांबद्दल पकडण्यात आले आहे ते सारे हिंदू आहेत आणि त्यांचा संबंध संघाशी पोहोचतो, एवढेच फारतर म्हणता येईल. ‘सर्व मुस्लिम दहशतवादी नाहीत, पण पकडण्यात आलेले सर्व दहशतवादी मुस्लिम आहेत’ या गावगन्ना फिरणाऱ्या ‘एसएमएस’वर यापूर्वी जल्लोष करणाऱ्यांनी आता आपण कोणते ‘एसएमएस’ फिरवणार आहोत तेही असीमानंदच्या लेखी जबाबानंतर सांगायला हरकत नाही.
गुजरातेत २००६ मध्ये ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या ‘शबरी कुंभा’ला हजर असणाऱ्यांची नावेही मग तपासून पाहावी लागतील. या ‘शबरी कुंभा’च्या नावाने जमवलेल्या निधीची चौकशी करायची सूचनाही दिग्विजय सिंह यांनी केली आहे. इतके सगळे बाहेर येऊनही गडकरी म्हणतात, की हा सगळा काँग्रेसचाच डाव आहे. ‘राष्ट्रीय विचारसरणी’ला काँग्रेस पक्ष लक्ष बनवत आहे, हा त्यांचा दावा आहे.
बॉम्बस्फोटांच्या निमित्ताने जे बाहेर येते आहे, ते राष्ट्रीय आहे असे गडकरींना म्हणायचे असेल तर प्रश्नच नाही, पण ते जर तसे नसेल तर केंद्रीय गुप्तचर खात्याने देशाला वेळीच दहशतवादी शक्तींपासून वाचवले म्हणून त्यांनी गौरवायला हवे. तसे करायलासुद्धा हिंमत लागते. इंद्रेशकुमारच्या बाजूने चुरुचुरु बोलणारे आणि असीमानंदशी आपला काडीइतका संबंध नाही म्हणणारे ती करतील अशी शक्यता मात्र नाही.
संकलन - कलीम अजीम
लेखक : अनाम
प्रकाशन : सोमवार, १० जानेवारी २०११

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com